जगणं श्रीमंत करू पाहणारी माणसं

By
(जळगावात 'परिवर्तन'संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी 'अभिवाचन महोत्सवाचे' आयोजन केले जाते. यानिमित्ताने केलेलं हे लेखन संगणकाच्या फोल्डरमध्ये पडून होतं. हवा असणारा लेख शोधताना अनपेक्षितपणे हे हाती लागलं. कार्यक्रम पार पडून तीनचार महिने तरी उलटून गेले असतील. प्रासंगिक निमित्ताने लिहिलेला हा लेख पुन्हा वाचताना जाणवले की, काही कामे अशी असतात, ज्यांची प्रासंगिकता कधीच पूर्ण होत नाही. म्हणूनच...)

स्थळ: रोटरी हॉल, मायादेवी नगर. वेळ: रात्रीचे दहा. ‘परिवर्तन’ आयोजित अभिवाचन महोत्सवात दिशा शेख हिच्या कवितांच्या अभिवाचनाचा आणि मुलाखतीचा कार्यक्रम संपला. अर्थात, संपवावा लागला. हॉलमधून बाहेर पडलो. कार्यक्रम पाहून, ऐकून एकेक माणसे बाहेर पडतायेत. आजचा कार्यक्रम कसा, याविषयी त्यांच्या आपापसात चर्चा सुरु आहेत. यशस्वीतेची प्रमाणपत्रे सुपूर्द करीत निघालेली माणसे प्रसन्न मुद्रेने आपापल्या घराकडे मार्गस्थ होतायेत. हॉलबाहेरील मोकळ्या जागेत थांबून काहीजण बोलत आहेत. मी आणि माझा एक स्नेही कार्यक्रमाविषयी बोलत उभे. कुणीतरी एक गृहस्थ आमच्याकडे चालत आले. माझा त्यांचा कुठलाही परिचय नाही. पण माझ्या स्नेह्याशी त्यांची ओळख. स्नेह्याने त्यांची जुजबी ओळख करून दिली. आम्ही काय बोलत आहोत, याचा अदमास घेत राहिले थोडावेळ. माझं आणि स्नेह्याचं बोलणं सुरु.

आमच्या चर्चेत सहभागी होत ते म्हणाले, “सर, आजच्या अभिवाचन कार्यक्रमाविषयी तुमचं मत काय आहे हो?”
“अप्रतिम...! शब्दातीत...!!” - मी

“अहो, सर! नुसतं अप्रतिम काय म्हणतात. अद्वितीय, न भूतो... वगैरे असं काय असतं ते बोला हो! काय उंचीचा कार्यक्रम घेतात ही माणसे. परिवर्तनविषयी नुसतं ऐकून होतो, आज अनुभव घेतला. काय बोलू... माझ्याकडे शब्द नाहीत.”

त्याचं मनापासून बोलणं ऐकून सुखावलो. पुढे त्यांच्याशी याच विषयावर आम्ही बोलत राहिलो. माझं बोलणं थांबवत ते म्हणाले, “सर, अण्णांशी बोलताना तुम्हाला मी पाहिले. तुमची चांगली ओळख दिसते. शंभू अण्णांना सांगा हो, हा मुलाखतीचा आणि अभिवाचनाचा कार्यक्रम अर्धाच झाला. दिशा शेख आणि अण्णांना पुन्हा ऐकायचं आहे. या कार्यक्रमाचं आयोजन नाही का करता येणार पुन्हा?”

या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं आणि असतं, तरी माझ्या सांगण्याने त्यांचं समाधान झालं असतं की नाही, माहीत नाही. पण एखाद्या कार्यक्रमाची उंची किती असावी आणि यशाची परिमाणे कोणती असावीत, याचा वस्तुपाठ ही प्रतिक्रिया होती. अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया किती कार्यक्रम आणि आयोजकांच्या नशिबी असतात? सांगणं अवघड आहे. पण एखादी संस्था, त्या संस्थेच्या कार्यक्रम, उपक्रमांना वाहून घेणारी, निरपेक्ष मानसिकतेने काम करणारी माणसे काहीतरी वेगळ्या वाटा निवडून चालत राहतात, इतरांनाही आपल्यासोबत नेतात, तेव्हा यशाची व्याख्या सामान्यांच्या प्रतिक्रियांच्या शब्दांत परिभाषित होते आणि तीच प्रमाण असते अन् तेच अशा कार्यक्रमांचं यश असतं.

अशाच धवल यशाला सोबत घेऊन चालणारी ‘परिवर्तन’ संस्था नव्या वाटा जळगावच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात निर्माण करू पाहते आहे. भले तिची पदचिन्हे मनोभूमीत अजून ठसठशीत उमटली नसतील; पण या पाऊलखुणा आश्वस्त करणाऱ्या आहेत, याविषयी संदेह नाही.

‘परिवर्तन’ प्रयोग करते आहे. परिसराच्या प्रांगणात वाचन संस्कार रुजवण्याचा अन्  माणसांच्या मनाला आणि विचारांना कुबेराचं वैभव देण्याचा. म्हणूनच जळगावच्या साहित्य, कला क्षेत्रात काम करणाऱ्यांना ही बाब खूप दिलासादायक वाटते. 
     
पुस्तक नावाचा प्रकार ज्या समाजात सामावलेला असतो. तो समाज वैचारिकदृष्ट्या समृध्द असतोच, पण त्याच्या सामाजिक जगण्याला अनेक आयाम मिळत असतात. तुमच्याकडे स्थावर-जंगम संपत्ती किती याला महत्त्व असेल, तर त्याचे परीघ सीमित असू शकतात. पण ज्ञानाने संपन्न श्रीमंतीला मर्यादांची कुंपणे सीमित करू शकत नाहीत. मुलभूतगरजांच्या पूर्तीकरता अनेक विकल्प असतात. जगण्याची आसक्ती त्यांचा शोध घ्यायला बाध्य करते. मनाला नैतिक उंचीवर अधिष्ठित करण्याची परिमाणे, साधने अनेक असली तरी पुस्तकासारखे खात्रीलायक साधन अन्य आहे की नाही, माहीत नाही. पुस्तकांचा माणसांच्या आयुष्यातला प्रवेश त्याच्या जगण्याच्या दिशांना निर्धारित मार्गाने नेण्यासाठी प्रेरणा देणारा असतो, याविषयी संदेह नाही.

समाजात पुस्तकांचे वाचक असे कितीसे असतात? असा एक प्रश्न पुस्तक आणि वाचनसंस्कृती या विषयाच्या अनुषंगाने नेहमीच चर्चिला जातो. याविषयी आपल्या सामाजिकविश्वात फारशी अनुकुलता आढळत नसल्याने वाचन, वाचनसंस्कार, पुस्तके याबाबत नकाराचे सूर स्पंदित होतांना दिसतात. याचा अर्थ वाचनवेडे, पुस्तकवेडे नाहीतच, असे नाही. त्यांची संख्या आपल्या आसपास तुलनेने अल्प आढळते आणि हाच खऱ्याअर्थाने आमच्या सांस्कृतिकदृष्ट्या किंतु-परंतुचा प्रश्न आहे. खरंतर आपल्याकडे पुस्तके नाहीत असंही नाही. पण आपण पुस्तकांकडे फक्त एक साहित्यकृती म्हणून पाहतो. त्यांना भाषिक, सांस्कृतिक, वैचारिक अस्तित्व असतं, हे बऱ्याचदा आमच्या गावीही नसतं. पुस्तकांच्या वाचनाबाबत उदासीन असणारा विचार जगण्याची परिमाणे संकुचित करतो. अशावेळी अभ्यास, व्यासंग हे शब्द खूप दूरचे वाटायला लागतात. माणसे कोणती पुस्तके वाचतात त्यावरून त्याच्या वैचारिक श्रीमंतीचा अदमास करता येऊ शकतो.

वाचनाचे हेतू ज्ञान, माहिती, व्यासंग, अभ्यास, आनंद आदि काही असले, तरी पुस्तकांच्या वाचनाने, परिशीलनाने जगण्याला उंची प्रदान करता येते, हे भान सतत असणे म्हणूनच आवश्यक असते. पुस्तकांचं आणि समाजाचं नातं दैनंदिन व्यवहारापुरतं सीमित राहू नये, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. अर्थात, असे करूनही आपल्या विचारविश्वात वाचनविषयक सजगता किती आहे? हा प्रश्न नेहमीच संदेहाच्या परिघावर असतोच असतो. कधीकाळी समाजात शिक्षितांचे प्रमाण मर्यादित असल्याने आणि विद्याव्यासंग काही लोकांपुरता सीमित असल्याने पुस्तकांच्या हजार-पाचशे प्रतींची विक्री फार मोठे यश वाटायचं. काही अपवाद वगळता, आताही यात फार मोठा फरक पडला आहे असं नाही. वाचनाविषयी अनास्था असेल किंवा स्वतः पुस्तक विकत घेऊन वाचायचं, हा विचारच मूळ धरू शकत नसल्याने असेल असे घडतं. म्हणून वाचनवेड्या माणसांनी आपले प्रयत्न सोडून दिले आहेत असे नाही. ही माणसे संख्येने विरळ असतील, पण आशेची अशी बेटे अथांग अनास्थेच्या आवरणात आशावाद जागवत उभी असलेली दिसतात.

जळगावच्या सामाजिक, सांस्कृतिक परगण्यात ‘परिवर्तन’ नावाचं आशेचं भूशिर कला, साहित्य, संगीत, नाटक विषयक आस्था असणाऱ्यांना आश्वस्त करीत उभे आहे.

एखाद्या संस्थेच्या यशाची परिमाणे कोणती असावीत? तिच्या कार्याला कोणत्या पट्ट्यांनी मोजावे, याची काही परिमाणे असतीलही. अशा गोष्टींची पर्वा न करता निरासक्त विचारांनी कार्य करणाऱ्यांचे मोल शब्दातीत असते. असे काम ‘परिवर्तन’ जळगावात करते आहे. संवेदनशील विचारांनी संपन्न व्यक्तित्वे जळगावच्या आसमंतात पाहणाऱ्यास लीलया आढळावीत, याकरिता अनवरत धडपड करीत आहेत.

शंभू पाटील आणि परिवर्तन हा द्वंद्व समास आहे. त्यांचे हे सगळे सायासप्रयास पाहून, ही माणसे हे सगळं का करीत असावेत? असा प्रश्न साहजिकच मनात उदित होतो. बरं या सगळ्या धावपळीतून यांना असा कोणता मोठा लाभ होणार आहे? लाभ नाहीच, पण प्रसंगी पदरमोड करून, झिजून ही माणसे कोणता आनंद मिळवतात कोण जाणे? प्रत्येकवेळी केली जाणारी कामे लाभाची गणिते समोर ठेऊनच करावीत असे नसते. खरंतर यांची जातकुळी ‘ऐसी कळवळ्याची जाती, करी लोभावीण प्रीती’ हीच आहे. आणि हाच कळवळा या माणसांना उर्जा देत असतो. म्हणूनच की काय पद, प्रतिष्ठेची वसने बाजूला सारून शंभू अण्णांना कार्यक्रमस्थळी एखाद्या प्रेक्षकाला बसायला खुर्ची नसेलतर कुठूनतरी स्वतः उचलून आणून देण्यात कोणताही कमीपणा वाटत नाही. इतकं विनम्रपण ज्यांच्या ठायी आहे, त्यांना विनम्रतेच्या परिभाषेची पारायणे करण्याची आवश्यकताच काय?

‘परिवर्तनच्या’ कार्याला अनेक आयाम आहेत. सगळ्याच चौकटीना स्पर्श करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे परिवर्तनच्या माध्यमातून आयोजित केला जाणारा ‘अभिवाचन महोत्सव’. खरंतर ‘अभिवाचन महोत्सव’ परिवर्तनची वेगळी ओळख होत आहे. अभिवाचन कार्यक्रम जळगावच्या वैचारिक श्रीमंतीला वैभव प्राप्त करून देण्याचा यशस्वी प्रयत्न आहे. गेल्या तीन वर्षाच्या कार्यक्रमांवर एक ओझरता कटाक्ष टाकला तरी याचं प्रत्यंतर येईल. अभिवाचन महोत्सवात वाचनासाठी निवडलेल्या साहित्यकृती अभिजात वाचनाच्या निकषांना प्रमाण असल्याची साक्ष देतील. वाचनाने अंतर्यामी आनंद निनादत राहावाच; पण सोबत विचारविश्वाच्या वर्तुळाचा परीघ विस्तारत राहावा, याची काळजी असतेच असते. म्हणूनच की काय मागच्या वर्षी कोणत्या साहित्यकृतींचे वाचन झाले, हे यावर्षाच्या अभिवाचन महोत्सवात आवर्जून आठवते. यातच त्यांचे यश सामावले आहे.

वाचनाचे प्रयोग माणसांना नवे नाहीत. पण त्यात नावीन्य निर्माण करण्याचे प्रयास नक्कीच नवे असतात. अभिवाचन महोत्सवात निवडलेल्या साहित्यकृतींचे वाचन करताना घेतलेल्या मेहनतीचा परिपाक कार्यक्रमस्थळी प्रत्ययास आल्यावाचून राहत नाही. वाचनासाठी निवडायच्या वेच्यांपासून मंचावरील सादरीकरणापर्यंत कोणत्या दिव्यातून जावे लागते, हे थोड्या संवेदनशील विचारांनी या धडपडीकडे पाहिले तरी कळते. वाचनाचा प्रयोग तास-दीडतास असला, तरी त्यामागे काही आठवडे वेचाल्याचे विस्मरणात जाऊ नये. रंगमंचावर सादरीकरण करताना विषयाला न्याय देणारी ही माणसे म्हणूनच आस्थेचा विषय होतात. आशयानुरूप वेशभूषा असो, रंगमंचीय व्यवस्था असो किंवा परिवर्तनच्या कसलेल्या कलाकारांनी साहित्यकृतींचे केलेले वाचन असो, ही एका ध्यासाची काहणी आहे, हे मान्य करावेच लागते.

गेल्या तीन वर्षापासून होणारा हा महोत्सव नव्या दिशेने, नव्या वळणाने वळताना निखरतो आहे. या वर्षी सात दिवसाच्या प्रयत्नांकडे पाहिले तरी सहज दिसेल. जयंत दळवींच्या ‘संध्याछायाने’ प्रारंभ आणि कविवर्य ना. धों. महानोर यांच्या पंच्याहत्तरी निमित्त ‘गगनाला पंख नवे’ या कार्यक्रमाने समारोप झालेला हा महोत्सव आनंदाची अनवरत पखरण करणारा होता, याबाबत दुमत नसावे. रसिकांना प्रत्येक दिवशी नव्या वळणावर नेणारा हा कार्यक्रम वाचनाचा आनंदपर्यवसायी विकल्प होता. दिशा शेख हिच्या कवितांचं अभिवाचन आणि शंभू अण्णांनी दिशाच्या घेतलेल्या मुलाखतीतून अभिवाचन महोत्सवाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन अधिष्ठित केलं. या कार्यक्रमातून तृतीयपंथी वर्गाला व्यवस्थेत वर्तताना वाट्यास येणाऱ्या वेदनांचे एकेक पदर उलगडत गेले. सामाजिक, सांस्कृतिक प्रवाहासोबत वाहताना यांच्या रोजच्या जगण्यातील जाणवणाऱ्या समस्यांना मुखरित करणारा ठरला. तास-दीडतास सलग कार्यक्रम असला की, प्रेक्षकांमध्ये चुळबुळ सुरु होते; पण दोन तास उलटूनही हॉल आणखी काहीतरी ऐकण्यास आतुर आहे, हा अनुभव सुखावणारा होता.

डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचा ‘गालिब और मै’ या कार्यक्रमाची बैठकच वेगळ्या विषयाला आणि विचाराला अधोरेखित करणारी आणि म्हणूनच गालिब सोबत गजल आणि शेरांना समजून घेताना या साहित्यप्रकारची जाण आणि भान अधिक विस्तृत करणारा ठरला. ‘सय’- सई परांजपे , ‘प्रेमाकडून प्रेमाकडे’- अरुणा ढेरे यांच्या साहित्यकृतींवर आधारित वाचनाने मंजुषा भिडे, हर्षल पाटील, श्रेया सरकार, आर्या शेंदुर्णीकर, मानसी जोशी आदींनी अभिवाचनाचे प्रयोग कोणत्या उंचीवर नेता येतात याची परिमाणे प्रेक्षकांच्या मनात कोरून तुलना करण्यासाठी कायमच उपलब्ध दिली. ‘झाड लावणारा माणूस’ आणि ‘एक ध्येयवेडी- मलाला’ या साहित्यकृतींना अनुभूती आणि पलोड शाळेच्या उमलत्या वयाच्या मुलांकडून सादर करणे परिवर्तनच्या दूरदृष्टीचा परिपाक आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये. मुलं भविष्य आहेत. या भविष्याला सुसंस्कारित करण्याचा हा प्रयत्न दूरगामी परिणाम करणारा आहे. ‘गगनाला पंख नवे’ हा समारोपाचा कार्यक्रम कविवर्य ना. धों. महानोर यांच्या पंच्याहत्तरी निमित्त कृतज्ञ सोहळा होता. खरंतर याला कृतार्थ सोहळा म्हटल्यास वावगे ठरू नये. महानोर दादांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली असली, तरी अभिवाचन महोत्सवाने रसिकांच्या मनात वाचनाचे पेरलेले बीज पुढच्या वर्षापर्यंत नक्कीच तरारून येईल याबाबत आश्वस्त करणारे होते.

एखाद्या कार्यक्रमाचे अपयश तात्काळ नजरेस पडते. यशाच्या व्याख्या करताना माणसे हात जरा आखडता धरतात. तो धरू नये, असे नाही. पण काहीतरी वेगळं करण्यासाठी वाटाही निराळ्या शोधण्याची तयारी ठेवावी लागते. एवढेच नाही, तर आलेलं अपयशही पचवायची मानसिकता असायला लागते. धोपट मार्ग टाळून प्रघातनीतीच्या परिघाबाहेर काही करू पाहणाऱ्यांना कुठलं तरी वेड धारण करून धावावं लागतं, म्हणूनच आजचे वेडे उद्याचे प्रेषित ठरतात. ही सगळी माणसे कुणी प्रेषित, कोणी महात्म्ये वगैरे नाहीत. ती तुमच्या आमच्यासारखीच आहेत; पण त्यांच्यात एक गोष्ट वेगळी आहे, ती म्हणजे, आपण जे काही करतो आहोत, ते काही समाजावर उपकार म्हणून नाही, तर समाजाप्रती असणारं आपलं उत्तरदायित्त्व आहे, या भावनेने काम करत आहेत. त्यांच्या या कार्याला उदंड यश मिळो, असं म्हणणं म्हणूनच अप्रस्तुत होणार नाही. ही माणसे पुस्तके वाचतात. अभिवाचन कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेक्षक श्रवण करतात. श्रवणाकडून आपल्यापैकी काहीजण वाचनाकडे वळले, तरी यांच्या प्रयत्नांना यश मिळालं, असं म्हणता येईल. वाचनासाठी वेळ नाही, ही सबब लटकी वाटते. वेळ शोधावा लागतो. आर्थिक गणिते पुस्तकांसाठी जुळवता येतात, त्यांना जगण्याची श्रीमंती शिकवावी लागत नाही. म्हणूनच या माणसांनी समाजातील माणसांना श्रीमंत करण्यासाठी चालवलेल्या या उद्योगाला अंगभूत श्रीमंती आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये.
***

11 comments:

 1. Replies
  1. सर
   काय बोलू
   तुमचे शब्द ही ऊर्जा आहे
   बळ वाढल आमच
   ऋणात आहोत

   Delete
  2. अण्णा, मी फक्त शब्दांचे तीर धरून वाहतो आहे. स्रोत तर आपणासारखी उदंड कर्तृत्वाची माणसे आहेत. मनःपूर्वक आभार!

   Delete
 2. सर आपली लेखणी खरचं प्खुरवाही व प्परभावी आहे . चव्हाण

  ReplyDelete
 3. सर , आपली लेखणी खरचं खुप प्रवाही व प्रभावी आहे . शंभू पाटील सरांना मी अमळनेरच्या राष्ट्र दलाच्या छावणीत ऐकलयं . खरचं खुप छान अनुभव होता. शंभू पाटील सरांच्या टीमचं मनापासुन कौतुक . खुप चांगले सामाजिक विषय ते नेहमी अभिवाचनाच्या माध्यमातून ते समाजासमोर मांडत आलेत . परिवर्तन टिमचं मनपुर्वक अभिनंदन व शुभेच्छा !!!

  ReplyDelete
  Replies
  1. खरंय, योगेशजी, मनःपूर्वक आभार!

   Delete
 4. वि. स. खांडेकरांच्या 'वेडी माणसं' या पाठाची आज आवर्जून आठवण झाली. व्यावहारिक जगाने वेडी ठरविलेली ही माणसे स्वान्त:सुखाय जगता जगता नकळत जगाला आपल्या श्रीमंतीची ओळख करून देत असतात. आपल्या सारख्या संवेदनशील रत्नपारख्यांना ही श्रीमंती जाणवत असते व ते ती जगापुढे अधोरेखित करीत असतात. धन्यवाद सर ! सांस्कृतिक क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने कार्य करणाऱ्या 'परिवर्तन' संस्थेची खरी ओळख आपल्या लेखातून होते.

  ReplyDelete