आंतरिक समाधान या शब्दाला काही एक अंगभूत अर्थ असतात. आशयाचे कंगोरे असतात. ते काही कोणी त्याच्या पदरी पेरलेले नसतात. ना ही कुणी आंदण दिलेले असतात. परिस्थितीच्या पायवाटा धरून ते चालत असतात. चालता चालता कधी आपल्या अंगणी येऊन विसावतात. तसं आयुष्य नावाचा किनारा धरून वाहणाऱ्या सगळ्याच गोष्टीत समाधान सामावलेलं असतं असं नाही. खरंतर आयुष्य अथपासून इतिपर्यंत अर्थासह समजणं जरा अवघडच. कोणी सांगत असेल की, समाधानाच्या सगळ्याच नसतील, पण किमान जगणं सजवण्याइतपत व्याख्या अवगत आहेत. कुणी सांगेल प्रगतीच्या परिमाणांनी प्रमाणित केलेल्या शिड्या चढून आम्ही सुखांची नक्षत्रे खुडून आणून आयुष्याला आनंदयात्रा केलंय. आता मागण्यासारखं मागे काही राहिलंच नाही काही, तर सुखांच्या शोधात का वणवण करीत राहावं? अर्थात, असं काहीसं कुणी म्हणत असेल तर त्याचा प्रतिवाद करण्याचं कारण नाही. कारण, असं काही सांगणंही सत्याचा अपलाप आहे. नसेल तसं तर या शब्दाला वेढून असणारे अर्थ अन् त्या अर्थात सामावलेला आशय सांगणाऱ्याला समजून घ्यायला आणखी काही पावले प्रवास करायला लागणार आहे. खरं हे आहे की, समाधान अन् सुख शब्दांचे अर्थ कधीही पूर्ततेचे किनारे धरून प्रवास करत नसतात.
बरेच उन्हाळेपावसाळे देहावर झेललेल्यापैकी कोणी असं काही म्हणणं एकवेळ तत्त्वतः समजून घेता येईलही, पण ते सगळं पर्याप्त असेलच असं नाही. सुख आणि समाधान शब्दात खूप तफावत आहे. त्यांचा अर्थ आणि आशयात अंतर आहे. खरंतर समाधान शब्द त्याच्या वास्तव रुपात किती जणांना कळतो? समजा कळला असेल तर, ते केवळ काही कालावधीसाठी हाती लागलेलं मृगजळही असू शकतं. खरा आनंद कालातीत असतो. तो परिमाणांच्या पट्ट्यां लावून नाही मोजता येत. असा आनंद किती जणांना गवसतो? सुनिश्चित सांगणं अवघड आहे. कारण समाधान शब्दाची अद्याप समाधानकारक व्याख्या झालेली आहे असं वाटत नाही. असं असेल तर आंतरिक समाधान शब्दाच्या आशयाचं आकलन तर बराच दूरचा प्रवास.
कृतार्थ क्षण आयुष्यात काही सहज अवतीर्ण होत नसतात. ते काही वाहत्या उताराचं पाणी नाही, सापडला मार्ग की घरंगळत राहायला. एखादी गोष्ट करताना पदरी पडलेलं यशापयश त्यात्या वेळी घेतलेल्या भल्याबुऱ्या निर्णयांचा परिपाक असतो. परिणाम असतो भविष्याच्या पटलावर कोरल्या जाणाऱ्या आकृत्यांना आकार देणारा. काळाच्या अंधारात दडलेल्या तुकड्यात सामावलेला असतो तो. आपणच आपल्या घेतलेल्या धांडोळ्यात त्याची उत्तरे एकवटलेली असतात. इतिहासाच्या परिशीलनाने त्याची कारणे समजून घेता येतात. तपासून पाहता येतात गेलेल्या काळाच्या कपाळी त्याने कोरलेल्या पाऊलखुणाचे ठसे. उमजून घेता येतात प्रवासाचे संदर्भ. वैगुण्ये पाहता येतात. स्वतःला शोधता येतं.
भविष्य सुंदर करण्यासाठी वर्तमानातील मृगजळी सुखांचा मोह त्यागता येत नसेल, तर मिळवलेलं महात्म्य वांझोटे ठरते. त्याला आकार तर असतो, पण आत्मा नसतो. मोठेपण मिळवण्याच्या मोहात माणसे परिणामांची पर्वा न करता बऱ्याच उलाढाली करत राहतात. कणभर सुखासाठी मणभर मातीचे ढिगारे उपसत राहतात. सुख पाहता जवापाडे... वगैरे माहीत असूनही धावत राहतात. हे सगळं कळतं. नाही असं नाही, पण वळायचं राहून जातं. सुखांचा अवास्तव हव्यास माणूस म्हणून जगण्यावर प्रश्नचिन्हे अंकित करतो. तसंही समाधान सापेक्ष संज्ञा असते. त्याचे संदर्भ कुणाला कुठून, काय अन् कसे गवसतील कसं सांगावं? पूर्तता भोगात नसते, ती त्यागातून उजळून निघते. हे म्हणणं कितीही युक्त असलं तरी त्यागाच्या वाटेवरून घडणारा प्रवास काही सगळ्यांनाच साधतो असं नाही.
काळाच्या अथांग विवरांमध्ये डोकावून पाहण्यासाठी नजर कमवावी लागते. चिमूटभर त्यागही समर्पणाची परिमाणे उभी करू शकतो. फक्त त्याची परिभाषा समजून घेता यायला हवी. संचिताचे गोडवे गाऊन, मूल्यांचे परिपाठ करून संस्कारांचे संवर्धन होत नसते. त्यांचं संक्रमण होणे आवश्यक. मूल्य शिकवण्यात असतातच, पण आचरणात आल्यास अधिक देखणी होतात. माणसांचा सहज स्वभाव स्वार्थाच्या परिघाभोवती प्रदक्षिणेचा असला, तरी त्यागाची वर्तुळे निर्मितीचाही आहे. फक्त या दोहोंतलं अंतर आकळायला हवं. पण हेच अवघड असतं. आणि वास्तव हेसुद्धा आहे की आपल्या आकृतीच्या प्रेमात पडलं की, आसपासचे आकार ओबडधोबड दिसायला लागतात. त्याग, समर्पण वगैरे गोष्टी कृतीत सामावल्या की, अधिक देखण्या दिसतात, नाही का?
काळ कधी नव्हे इतका माणसाला अनुकूल असताना आणि हाती विज्ञानाने दिलेली निरांजने असताना अभ्युदयाच्या नव्या क्षितिजाकडे निघालेल्या माणसांच्या पायाखालच्या वाटा का अंधारून येत असतील? अज्ञानाची सांगता करण्याची संधी सोबत असतानाही माणसे संकुचित विचारांच्या साच्यात का गुंतत असतील? जगण्याच्या गतीत प्रगतीऐवजी गुंताच अधिक वाढतो आहे. ‘स्व’ला स्वैर सोडून ‘स्व'तंत्राने संचार घडणे, म्हणजे स्वातंत्र्य नाही. सामान्यांच्या आकांक्षांना मुखरित करणारा स्वर स्वातंत्र्याचे सहज रूप असतो. तो आसपासच्या आसमंतात अनवरत निनादत राहणे सार्वकालिक आवश्यकता असते.
माणूस वकुब विसरून आत्मकेंद्रित जगण्याला प्रमाण मानायला लागला की, संवेदना परीघ हरवून बसतात. आकाश आपलं अफाटपण विसरलं की, समोरची क्षितिजे खुजी होत जातात. अनभिज्ञ दिशांनी आणि अनोळखी वाटांनी साकळून आणलेली मोहतुंबी सुखे मनाला सुखावू लागली की विस्ताराचे अर्थ हरवतात. विश्वाच्या कल्याणच्या प्रार्थना कोरड्या होऊ लागतात. आयुष्याची क्षितिजे संकुचित झाली की, स्वार्थाची वर्तुळे विस्तारत जावून आत्मकेंद्री जगण्याला आत्मलब्ध प्रतिष्ठा प्राप्त होत जाते. संस्कृती, संस्कार वगैरे गोष्टींचे संदर्भ साखळ्यातून सुटू लागतात. उच्छृंखलपणाचे वारे वाहू लागले की, विचार पाचोळ्यासारखे सैरभैर भिरभिरत राहतात. मनाचं आसमंत अविचाराच्या काजळीने काळवंडू लागलं की, उजेड पोरका होतो. स्वतःभोवती सुखांचा परिमळ सतत दरवळत राहण्याची आस असली की, प्राप्तीची परिमाणे बदलतात. त्याग, समर्पण आदि गोष्टी सांगण्यापुरत्या उरतात, तेव्हा संस्कार घेऊन वाहणारे प्रवाह किनारा हरवून बसतात. ‘मी’ नावाच्या संकुचित वर्तुळाभोवती माणसाचं मन घिरट्या घालू लागलं की, परिघावरच्या प्रदक्षिणा त्याच्या प्रगतीची परिभाषा होऊ पाहतात. माणूसपण संकुचित विचारांच्या वर्तुळांनी वेढलं गेलं की सहजपणा संपतो. जगण्यातून सहजपण सहजपणे निघून जाणे वर्तन विपर्यास असतो, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••