कविता समजून घेताना... भाग: एक

By // No comments:
कविता समजून घेताना...
भाग: एक

सरकारी दवाखाना

शहरातल्या सरकारी दवाखान्यात
भरती झालंय गाव,
कुणीतरी वयात आलेली पोरगी
मोजतेय शेवटच्या घटका
आयसीयूच्या पलंगावर
आवडत्या जोडीदाराशी
थाटता आला नाही संसार
अन् परक्या जातीतल्या
मुलाशी नाव जुळल्यानं
बदनामीच्या भीतीपोटी
जीव संपवण्याचा प्रयत्न केलाय तिनं

पहिल्या बाळंतपणाचा
खर्च बापानं करावा
म्हणून माहेरी पाठवलेल्या सासुरवाशिणीचं
अर्ध्याराती दुखू लागलं पोट म्हणून
आणलंये तिला बैलगाडीतून
अधमेल्या अवस्थेत
मालकाकडून उचल घेत घेत
खजील झालेल्या बापाला
भरवश्याचा वाटतो सरकारी दवाखाना

'तुम्ही मजूर लोकं
हातावर पोट भरणारी
आमचा खर्च तुम्हांला
परवडणारा नाही'
म्हणून खाजगी
हॉस्पिटलातून परतलेली चिल्ली-पिल्ली
अडले-नडले पेशंट
दाखल झालेयेत सरकारी
दवाखान्यातल्या जनरल वार्डात

वावराच्या बांधावरून
गल्लीतल्या चारी-मोरीवरून
झालेल्या वादात भावाभावात
पडलेले कुऱ्हाडीचे घाव
बायकोला चारित्र्याच्या संशयावरून
घातलेला विळ्याचा वार
असे कितीतरी ओले घाव बुजवायला
आलेयेत गावकरी
हक्काच्या धर्मशाळेसारख्या
सरकारी दवाखान्यात
 
घासलेटच्या भडक्यात भाजून मेलेल्या बाया
वाटेहिश्यातल्या भानगडीत
मारून टाकलेले भागीदार
पोराबाळांसकट मालकाच्या विहिरीत
उडी घेतलेलं मजुराचं कुटुंब
गरिबीला आजाराला नापिकीला कंटाळून
मरून पडलंय अवघं गाव शवागारात
शहरातल्या सरकारी दवाखान्यात

- नामदेव कोळी
••
सांप्रत काळास साक्षीला घेऊन परिस्थिती परिवर्तनाचे प्रयोग केल्याच्या वार्ता आपल्या आसपास कितीही घडत राहिल्या, तरी सामान्य माणसांच्या जगण्यातले भोग काही केल्या मिटत नाहीत, यावर विश्वास ठेवावाच लागतो. मूठभरांच्या सुखांच्या संकल्पित संकल्पना म्हणजे जगणं नसतं. जगण्याला अनेक कंगोरे असतात. त्यांचे परीघ असतात. प्रगतीच्या स्वप्नांना ध्येयाची क्षितिजे खुणावत असतील, तर त्यांना सामान्यांच्या ओंजळभर आकांक्षा का पूर्ण करता येत नसतील? हा प्रश्न अधिक अस्वस्थ करीत जातो.

आसपास नांदणारे अस्वस्थपण घेऊन शब्दांकित झालेली ‘सरकारी दवाखाना’ ही कविता जगण्यातील अभावाला आणि आपल्या वागण्यातील विसंगतीला अधोरेखित करते. विसंगतीच्या वर्तुळात वैषम्य विहरत असते, तेव्हा प्रश्न अधिक जटिल होत जातात, म्हणून उत्तरांचे धारदार पर्याय शोधावे लागतातच. भले ते आपल्या संयमाची परीक्षा घेणारे असतील. खूप मोठ्या अवकाशाला आपल्यात सामावणारी ही कविता आयुष्याच्या परिघात विसावलेल्या संगती-विसंगतीवर प्रखर भाष्य करते. ज्यांच्याकडे पद, पैसा, प्रतिष्ठा आहे त्यांच्यासाठी सुविधा पायघड्या घालून स्वागताला उभ्या असतात. पण ज्यांच्याकडे यापैकी काहीच नाही, त्यांच्यासाठी व्यवस्थेत काहीच नसावं का? हा प्रश्न कवीला अस्वस्थ करीत राहतो. ‘सरकारी दवाखाना’ या शब्दाचा ‘अगतिकांचे अखेरचे आश्रयस्थान’ असाही एक अर्थ असू शकतो, असे कोणाला वाटत असेल तर त्यात अतिशयोक्त काही नाही. सगळे विकल्प संपले की, धूसर क्षितिजाकडे दिसणारे हे एकमेव ओयासिस आशेचा कवडसा जागता ठेवते. पुरेसे पर्याय उपलब्ध नसणे ही व्यवस्थेतील विसंगती नाही का? जगणंसुद्धा पैशाच्या परिघाभोवती बांधलेलं असणं, हा आपल्या सामाजिक वर्तनातला विपर्यास नाही का?

 कुठल्याही दवाखान्यात काही कोणी स्वखुशीने दाखल होत नसतो. परिस्थिती तेथे जायला भाग पाडते. आजार असला तर एकवेळ समजून घेता येईलही, पण अवकाळी मरणाला सामोरे जाणारी माणसे आणि त्या मरणाची कारणे यांचा शोध दुर्दैवाने सरकारी दवाखान्याच्या भिंतींमध्ये पूर्ण होतो. माणसासाठी ही काही फार अभिमानास्पद बाब नाहीये. एखाद्या मुलीला जोडीदार म्हणून कोणी आवडत असेल, तर तिच्या आवडीचा भाग स्वीकारणीय का होत नसावा? तिच्या ओंजळभर आकांक्षाना आनंदाचे गगन विहारायला देणे खरंच अवघड असते? की समाजमान्य संकेतांच्या संकुचित चौकटींना ते नकोच असते? की मुलगी म्हणून तिने परंपरेचा पडलेला पायबंद प्रमाण मानायचा. जात, धर्म, वंश आदी जटिल पेच जगण्यातून निरोप घेत असल्याच्या आम्ही कितीही वार्ता केल्या, तरी विचारतून त्या काही काढता पाय घेत नाहीयेत हेच खरे! अजूनही आम्हांला आमचीच वर्तुळेच प्रिय आहेत. माझं तेच खरं, असं वाटायला लागतं, तेव्हा प्रगतीची शिखरे संपादित करण्यासाठी वळते झालेले सगळे पथ अवरुद्ध होतात. कोण्या लावण्यवतीच्या ललाटी कोरलेले प्रमुदित प्रेमाचे अभिलेख केवळ संकुचित बेगडी आत्मसन्मानाच्या समर्थनार्थ रक्ताच्या रंगाने रंगतात, तेव्हा केवळ अहं जिंकतो आणि प्रेम, माणुसकी, मूल्ये पराभूत झालेली असतात. माणसांचं देहाने मरणं एकवेळ समजून घेता येईलही, पण मूल्यांनी माणसांच्या मनातून मरणे खूप मोठे नुकसानदायक असते.

मातृत्वाच्या पथावर पडणारी कोण्या मानिनीची पावले खरंतर सर्जनाचा सुंदर सोहळा, पण त्याला वेदनेची किनार का लागावी? आयुष्याच्या गणितांना समर्पक उत्तरे शोधावी लागतात हे मान्य. पण उत्तरे देणारी सूत्रे सामान्यांना का सापडत नसावीत? हाती दमडी नसताना मालकाकडून उचल घ्यायला भाग पाडणारी परिस्थिती अगतिकतेचे आणखी किती सोहळे संपन्न करणार आहे? आरोग्यसुविधांचा उद्घोष वर्तमान युगाच्या साक्षीने केला, तरी जिवावरचे संकट निभावून नेण्यासाठी सुपरसॉनिक वेग धारण करणाऱ्या काळात अन् त्यामागे धावणाऱ्या जगात श्वास अडलेल्या कुण्या रुग्णाला उपचारार्थ इस्पितळात नेण्यास एक साधे वाहन हाती लागू नये, याला काय म्हणावे? मजुराकडे महागडे उपचार करायला पैसा आहे कुठे? कितीही जीवनदायी योजना आखल्या, आणल्या, तरी सामन्यांच्या जीवनाला त्याचा स्पर्श घडत नसेल, तर त्या योजनांचे देखणे आराखडे फक्त कागदांचे रकाने सुशोभित करीत राहतात. त्यांचे उपयोजन घडण्यासाठी मनाचे परीघ विस्तारत जाणे आवश्यक असते. खर्च परवडणार नाही, म्हणून कुणाच्या आयुष्याला आश्वस्त करणारी एकच वाट शिल्लक असावी आणि ती फक्त सरकारी दवाखान्याकडे वळती व्हावी अन् तोच अंतिम पर्याय असावा. हे असणे आपल्या प्रगतीच्या कोणत्या निकषांना परिभाषित करते?

गावाचा गंध सांगणाऱ्या मातीत वावराचे बांध अजूनही कलहाचे कारण आहेत. भले शेतात काही पिकणार नाही, पिकवणार नाहीत, चालेल; पण शेताचा बांध मात्र सतत कोरत राहिला पाहिजे, ही मानसिकता शेकडो वर्षापासून तणकटासारखी गावाच्या मातीत रुजली आहे. घराशेजारी वाहणारे चारी-मोरीचे पाणी उताराकडे वाहण्याचा धर्म पाळते; पण माणसे सहकार्याचा संस्कार विसरून त्याला रक्ताच्या रंगाने का रंगवत असतील? खरंतर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या संकुचित मानसिकतेत सामावली आहेत. मनाचा परीघ विस्तारायला अजूनही प्रदक्षिणा घडणे क्रमप्राप्त आहे.

केवळ बायको आहे आणि ती आपल्या जगण्याशी बांधली गेली आहे. तिने आपल्या तालावर चालावे, तंत्रावर वागावे आणि आपणच लिहलेल्या मंत्रांवर बोलावे, ही कुठली मानसिकता. स्त्रीदेह घेऊन जन्म घेतला, म्हणून आयुष्यभर कुणाच्या तरी अंकित राहणे तिच्याच ललाटी का? हे भोग केवळ तिच्याच पदरी नियतीने का द्यावेत? पदरी पडलेलं पवित्र मानायचं. प्राक्तनाचे प्रहार सहन करीत, ती आल्या प्रसंगांना सामोरी जात संसार सावरून धरते; पण केवळ संशयाने तिच्यावर आघात करणारे हात संस्कृतीचे तीर धरून वाहत आलेल्या स्त्रीदाक्षिण्य शब्दाचा अर्थ समजून का घेत नसतील? तिच्या देहावर वार करणारा विळा आपण कोणत्या युगात आणि जगात जगतो आहोत, याचा विचार करायला लावतो. रॉकेलच्या भडक्यात देहाची राख करायला निघालेल्या बायांसमोर असे नेमके कोणते कारण असते, टोकाचे पाऊल उचलायला? कदाचित क्षणिक राग कारण असू शकतो, पण त्यावर आपल्याला अजूनही फुंकर का घालता येत नसेल. वाटेहिश्यातल्या भानगडीत केवळ चतकोर जमिनीच्या तुकड्यासाठी, दोनचार फुटक्या भांड्यांसाठी भावाभावात जीव घेण्याची स्पर्धा लागावी. कुणा मजुराला पोटासाठी राबराब राबूनही हातातोंडाची गाठ पडू नये. चंद्रावर विहार करण्याच्या वार्ता जग करीत असते, पण भाकरीचा ओंजळभर चंद्र हाती लागणे अवघड झाल्याने परिवारासह विहरीत देह विसर्जित करायला लागत असेल, तर ही कुठली प्रगती? माणूस म्हणून हा प्रवास नेमका कुठे चालला आहे? कष्ट करण्याची तयारी असूनही दोन घास पोटाला देऊ न शकणारी व्यवस्था नेमकी कुठे पोहचते आहे?

ज्यांच्या जगण्यात सदैव अंधारच साचलाय, त्यांचं जगणं मुखरित करणाऱ्या नामदेव कोळींच्या कवितेचं नातं सतत भळभळणाऱ्या जखमांशी आहे. सर्वसामान्यांच्या जगण्यात असणारी असुरक्षिता, अस्वस्थता, अगतिकता घेऊन कवी व्यक्त होतो. गाव, समाज, तेथील माणसे, त्यांचे जगण्याचे प्रश्न, आयुष्यातले गुंते, समस्यांशी त्यांच्या लेखणीचं सख्य आहे. काळ बदलला, त्याची परिमाणे बदलली. पण समस्यांचे समर्पक पर्याय हाती का लागत नसतील? कवीला पडलेला हा प्रश्न आपल्या जगण्याच्या चौकटींच्या मर्यादा अधोरेखित करतो, नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••