मानव समूहाचा इतिहास अनेक क्रिया प्रतिक्रियांतून प्रकटणारे जीवनाचे संगीत आहे. जगणे सुखावह व्हावे, ही अपेक्षा काल जशी माणसाच्या मनात होती. तशी ती आजही कायम आहे. म्हणूनच सुखाच्या दिशेने जाणाऱ्या अनेक अज्ञात परगण्याचा धांडोळा माणसाने घेतला. त्याच्या जगण्याला नवे आयाम देणाऱ्या सुखसाधनांचा शोध लावला. हे शोध घेताना त्याची भावनिक आंदोलनांने कशी असतील, त्यालाच माहिती. पण अनेक अवघड प्रयासांनी ईप्सित साध्य होताना त्याच्या मनी विलसणारा आनंद काहीतरी अतुलनीय मिळवल्याच्या भाव घेऊन जीवनी प्रकटला असेल, तेव्हा त्याला क्षणभर गगनही थिटे वाटले असेल. अगदी लहानसा शोधही त्याच्यासाठी अद्वितीय वगैरे असे काहीतरी असेल. त्याच्या आकांक्षांच्या पूर्तीचा आनंद चैतन्य बनून जगण्यातून प्रवाहित होत राहिला असेल किंवा आणखी काही घडले असेल.
नक्की काय, ते सांगता येणे अवघड आहे. माणसाने आतापर्यंत हजारो गोष्टी शोधल्या आहेत. त्याचं प्रासंगिक महत्त्व असेल, नसेल. पण या शोधमालेतील सगळ्यात महत्त्वाचा शोध कोणता? असा प्रश्न कोणाला विचारल्यास उत्तराबाबत मतमतांतरे असू शकतात. पण या शोधयात्रेत एक गोष्ट अशीही आहे, जी शोधल्यानंतर कदाचित शोधकर्ता स्वतःशीच हसला असेल. तेथे दिसणाऱ्या प्रतिमेला पाहत क्षणभर सुखावून तिच्या प्रेमात पडला असेल. त्याला त्याच्याच प्रेमात पडायला कारण ठरणारा शोध होता, आरसा. आता कुणी म्हणेल, काय हा अगोचरपणा. आरसा काय महान वगैरे शोध आहे का? आणि या शोधाने माणसांच्या जगण्याला असे कोणते नवे आयाम दिले आहेत, ज्यामुळे त्याच्या जगण्यात क्रांतिकारी परिवर्तन घडून आले.
होय, असं भव्यदिव्य, नेत्रदीपक वगैरे काहीही माणसांच्या जीवनात, या शोधामुळे भलेही घडले नसेल; पण एक नक्कीच घडलं, माणूस स्वतःच्याच प्रेमात पडून अधिकाधिक आत्मरत, आत्ममग्न होत गेला. दर्पणात दिसणाऱ्या आपल्याच प्रतिमेला आकारबद्ध करण्यासाठी धडपड करू लागला. आरसा कधी, कोणी, कसा शोधला, काय माहिती; पण आरशाने माणसाच्या जगण्याला सौंदर्याच्या परिभाषित विचारांनी मंडित केले. माणूस म्हणून जगणं कळायला लागल्यापासून इहतलावरील माणसं सौंदर्यानुरक्त होतीच; पण आरशाने त्यांना सौंदर्यसाधना करण्यास उद्युक्त केले. यातून सौंदर्याचे शास्त्र परिभाषित झाले. याचा अर्थ असा नाही की, माणसाला आरसा हाती येण्याआधी सौंदर्याची जाण नव्हती, भान नव्हते. हे सगळं होतं; पण त्याच्या सौंदर्यदृष्टीला व्यापकपणाचं प्रांगण मिळालं, ते आरशामुळे. आरसा आल्याने स्वतःकडे आणि इतरांकडेही बघण्याच्या त्याच्या सौंदर्यविषयक पैलूना बदलांचा परीसस्पर्श घडला. स्वजाणिवांचा जागर मनात रुजून घट्ट होत राहिला.
एव्हाना आपल्याही मनात एक प्रश्न उदित झाला असेल. आरसा नव्हता, तेव्हा माणूस काय आपली प्रतिमा कधी कुठे पाहतच नव्हता का? त्याला त्याच्या चेहऱ्याचं, देहाचं सौंदर्यदर्शन अगदी घडतच नव्हतं का? तसे नाही, आरशाआधीही सौंदर्य होते आणि ते पाहणारेही होते, सौंदर्याची परिभाषाही होती. पण ती दुसऱ्याच्या नजरेने पाहिलेल्या विचारातून परिभाषित होत होती. त्या परिभाषित निकषांना प्रमाण मानण्याचा प्रघात तेव्हा त्यामुळेच असेल. पण आरशाने या प्रघातनीतीचा परीघ ओलांडून स्वप्रतिमेच्या प्रांगणात प्रवेश करून, त्याची परिमाणे बदलली. आरशाआधी माणसाने त्याला स्वतःला पाहिले असेल, ते कदाचित एखाद्या शांत जलाशयातल्या पाण्यात किंवा तत्सम ठिकाणी. स्थिर पाण्यात दिसणारे आपलं प्रतिबिंब पाहून क्षणमात्र सुखावला असेल. तेथे दिसणाऱ्या प्रतिमेला निरखित राहिला असेल काही काळ. ते स्व-रुपदर्शन घडताना आपला चेहरा वाटेल तेव्हा पाहता यावा, ही भावना त्याच्या मनात जागी झाली असेल आणि या भावनेतून आत्मप्रतिमेचे अनवरत दर्शन घडविणाऱ्या अशा वस्तूचा शोध घेण्यास उद्युक्त झाला असावा.
काहीही असो, आज आरसा ही काही महान वगैरे बाब राहिली नाहीये. या शोधाचं मोलही आता कुणाला फारसे वाटत नसले, तरी आरसा न पाहणारी व्यक्ती विद्यमान विश्वात शोधूनही सापडणे अवघड आहे. लोकांच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग असलेला, हा आरसा लोकजीवनाशी एकरूप झाला आहे. माणूस परिसरावर प्रेम करण्याआधी स्वतःवर प्रेम करतो. जगाच्या प्रेमात पडण्याआधी चेहऱ्याच्या देखणेपणावर अनुरक्त होतो. त्याचं चेहऱ्यावरचं प्रेमच आरशालाही सौंदर्यमंडित करायला कारण ठरले आहे. हे सजणे केवळ स्वतःपुरते सीमित न ठेवता, आरशालाही व्यापकपणाचं आकाश दिलं गेलं. आरसा आला आणि सोबतच जुन्या संकल्पना टाळून सौंदर्याने परिभाषित नवे विचार घेऊन चेहराही आला. चेहऱ्यावर अनेक भाव आले. त्यामागे भावनाही आल्याच, सोबत माणसांचा भावनांच्या गावाचा प्रवासही चालत आला. एका छोट्याशा आरशाने माणसांच्या वर्तनाचे रंग बदलायला, दाखवायला प्रारंभ केला. आरसा आणि चेहरा हे केवळ भाषिक शब्द न राहता, अर्थांच्या लहानमोठ्या छटा धारण करून प्रकटले.
कोणाचा चेहरा कसा असेल, ही निसर्गाची किमया असते. नियतीने दिलेल्या या देणगीवर सौंदर्यसाधनेतून निर्मित सौंदर्यवर्धनाचे प्रयोग करताना माणसं दर्पणाला अन्योन्यभावाने शरण जातात. तो त्यांचा आप्त होतो. आरसा माणसांच्या जगण्यात सहजपणे सामावला, तसे त्याच्या रूपातही बदल घडत गेले. भिंतीवरील खुंटीवर लटकून बसलेल्या आराशापासून, तर कोणातरी लावण्यवतीच्या पर्समधील प्रसाधनसंभारात अलगद विसावलेल्या लहानशा आराशापर्यंत माणसांच्या रुपाला प्रतिमांचे आकार हा आरसा देत राहिला. त्याच्यातून दिसणारी प्रतिमा केवळ दृष्टीतच नाही, तर मनसृष्टीतही उमटीत राहिली. आरसा नाव धारण केलेल्या काचेच्या तुकड्याने माणसांच्या मनावर कायमच गारुड घातलं आहे.
आपण बोलण्याच्या ओघात ‘दर्पण झूठ न बोले’, असे काहीसे म्हणत असतो. एखाद्याला त्याच्या चेहऱ्यावरून पारखून; त्याच्याविषयी मत तयार करीत असतो. खोटं बोलण्याची कला अवगत नसणाऱ्याच्या चेहऱ्यावर काहीतरी लपवाछपवी असल्याचे तात्काळ कळतं. खोटं बोलणं अवघड असल्याचे, या विधानातून आपण सूचित करीत असतो. चेहरासुद्धा आरसा असल्याने तेथे माणसाला तो कसा आहे, ते पाहता येते. जगात कोण, कसे, केव्हा, कुठे खोटे बोलेल, काय सांगावे. माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी कदाचित खोटं बोलू शकतो; पण आरसा कधीच खोटं सांगत नाही. त्यातली प्रतिमा समोरची वस्तू असेल, तशीच दर्शवितो; तेच त्याचं काम. आरशातली आपली प्रतिमा पाहून माणसं संमोहित होतात. त्यात दिसणाऱ्या प्रतिमेला नटवण्याचा, खुलवण्याचा प्रयत्न करीत तिला सजवण्याच्या उद्योगाला लागतात.
दर्पणात दिसणाऱ्या आपल्या प्रतिमेने माणसं आनंदतात, मात्र चेहऱ्यावर दिसणाऱ्या लहानशा काळ्या डागाने अस्वस्थ होतात. उमटलेल्या सुरकुत्यांनी चिंतीत होतात. मग सुरु होते वाढत जाणाऱ्या वयाच्या खुणांना बुजवण्यासाठी धडपड. या धडपडीचं दृश्य प्रतिमान, म्हणजे सौंदर्यप्रसाधनांचा जीवनात होणारा अलगद प्रवेश. कधीकाळी महिलांसाठी खास असणारा सौंदर्यसाधना हा परगणा. आज मात्र या मर्यादांच्या सीमा ओलांडून पुरुषांच्या विचारातील सौंदर्याने मंडित चेहऱ्यापर्यंत सौंदर्यसाधना विषय पोहचला आहे. चेहरा तेजांकित दिसण्यासाठी कुणी रंगलेपणद्रव्यांचा वापर करण्यास उद्युक्त होतात. कुणी वाढत्या वयाच्या पाऊलखुणांचे ठसे पुसण्याचा प्रयत्न करतात. कुणी आपला देह ‘स्पा’नावाच्या सौंदर्यवर्धन स्थळांच्या स्वाधीन करून देखणं होण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या येथे वावरण्याने देहाला, चेहऱ्याला सुंदरता येत असेलही; पण या साऱ्या धडपडीत एक सत्य दुर्लक्षित होतं, वाढत्या वयास चुकवीत कसं फुलायचं?
आरशात दिसणाऱ्या प्रतिमेतील वास्तव चेहऱ्याच्या प्रतिमेतून दर्शित होते. तसे आपण पाहतोही, ते टाळता येणे असंभव असल्याचे आपणास माहीत असते, तरीही हे बदल झाकण्यासाठी माणसाने किती प्रयत्न करावेत? तारुण्याच्या वाटेने, वृद्धत्वाच्या वाटेने कुठेही गेलात, तरी चेहरा जसा निसर्गाने दिला असेल, तसा सोबत करणार आहे. हे सत्य माणूस स्वीकारायला सहजी का तयार नसतो? वाढत्या वयाचा हात धरीत; चेहऱ्यावरून डोकावून आपल्याकडे पाहत हळूच वाकुल्या दाखविणाऱ्या सुरकुत्या आपण किती लपवणार आहोत. चेहऱ्यावरील सुरकुत्यांची चिंता माणसं करतात; पण मनावर वाढत जाणाऱ्या सुरकुत्यांचं काय? त्या कोणत्या दर्पणातून आपण पाहणार आहोत? चेहऱ्यावरील डाग सौंदर्यप्रसाधनांचा वापर करून कदाचित दूर करता येतीलही; पण मनावर असणाऱ्या डागांचे काय? ते बघायचे असतील, तर आपल्या मनाचाच आरसा करावा लागेल. तेथूनच आपण आपणाला शोधावं लागेल.
आरशात दिसणारा सुंदर चेहरा हेच माणसांच्या जगण्याचं काही एकमेव प्रयोजन नाही. निसर्गाने, नियतीने दिलेला देखणा चेहरा माणसांच्या यशाचे गमक नसतो. तसे असते तर अब्राहम लिंकन सुघटीत, सुयोग्य चेहऱ्याच्या आकाराच्या कोणत्याच मोजपट्टीत फिट्ट बसत नव्हते. निसर्गाने त्यांच्या चेहऱ्याला देखणेपणाचं कोंदण दिले नसेल; पण नितळ, निर्व्याज, संवेदनशील मन दिलं. त्या मनाचा चेहरा त्यावेळी अमेरिकेत वर्षानुवर्षे कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अन्यायाच्या, गुलामगिरीच्या शृंखलांची बंधने मुक्त करायला कारण ठरला. जॉनी लिव्हर, सिद्धार्थ जाधव, भरत जाधव अभिनेत्याच्या देखण्या चेहऱ्याच्या कोणत्याही व्याख्येत चपखल नाही बसत. यांनी आपल्या चेहऱ्याचा विचार अभिनेत्यासाठी असणाऱ्या टिपिकल निकषात मोजला असता, तर लोकमनाच्या दर्पणात त्यांचा अभिनय उमटून दिसलाच नसता. कदाचित सौंदर्याच्या परिभाषेत, हे चेहरे निकषपात्र ठरत नसतील; पण यांनी आपल्यातील कमतरता ओळखून, तिलाच आपलं बलस्थान बनवलं. हेच त्यांच्या चेहऱ्याचं खरं सौंदर्य आहे.
आरसा माणसांच्या जगण्याचा भलेही अविभाज्य भाग असेल; पण जगात असे कितीतरी माणसे असतील, ज्यांच्या दृष्टीने आरशाला नगण्य स्थान असेल. मानवनिर्मित दर्पणातील दिसणाऱ्या प्रतिमेच्या प्रेमात पडण्याचा मोह यांना झाला नसेल. सौंदर्यशास्त्राची परिभाषा यांच्या प्रांगणी येऊन क्षणभर विसावली नसेल; पण निसर्गाने आयुष्यभराची सोबत म्हणून दिलेल्या चेहऱ्याला स्वीकारून, आपल्यासमोर दिसणाऱ्या परिस्थितीच्या आरशावरील धूळ दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला. भिंतीवरच्या आरशावरील धूळ स्वच्छ करायला भलेही यांना जमले नसेल; पण मनाच्या दर्पणावर साचलेली काजळी झटकून त्यात आपणच आपली प्रतिमा पाहिली. तेथे दिसणाऱ्या रुपाला आपलं सामर्थ्य करून, ही माणसं व्यवस्थापरिवर्तनाच्या दिशेने निघाली. यांच्या विचारांच्या परावर्तीत होणाऱ्या प्रकाशात काहींना आपल्या अंतर्मनाच्या संवेदनांचे दर्शन घडले. या जाणीव जागराने निरामय विचारांची प्रतिमा समाजजीवनात साकारली. त्यांच्या प्रतिमेने सुंदरतेची परिभाषा बदलली. त्या बदलणाऱ्या परिभाषेने ‘दर्पणात दिसणाऱ्या चेहऱ्याच्या सुंदरतेपेक्षा; मनाच्या आरशात दिसणाऱ्या विचारांची प्रतिमा अधिक देखणी असते.’ हा विचार रुजवला. या विचाराची प्रतिमा सोबत घेऊन जे चालले, ते परिवर्तनाचे प्रेषित ठरले. त्यांच्या पावलांनी माणसांच्या जगात माणुसकीचे नंदनवन निर्माण केले.