व्यवधाने

By // No comments:
जगावेगळी जिद्द, अनुपम संघर्ष, अथक प्रयास, असीम साहस, अतुलनीय धैर्य वगैरे कौतुकाचे शब्द अमर्याद इच्छाशक्तीपुढे थिटे असतात, याबाबत संदेह असण्याचं सयुक्तिक कारण नाही. कुणी दुर्दम्य आशावाद वगैरे असं काही म्हणतात, तेव्हा कोणत्याही परिस्थितीत आपलं स्वत्व अन् सत्व आबाधित ठेवण्याची आस अधोरेखित करत असतात. सायास-प्रयास शब्द माणसांना नवे नाहीत. ते आहेत म्हणून आयुष्य समृद्ध करणाऱ्या धडपडीला काही अर्थ आहे.

जगणं कुरूप करणारी अनेक व्यवधाने आसपास नांदती असतात. शोधली तर फार प्रयास नाही करायला लागत. नजरेचा कोन थोडा इकडेतिकडे कलता केला तरी ती दिसतील. मुबलक सापडतील. अर्थात, ती असली म्हणून आयुष्य देखणं करणाऱ्या गोष्टी नाहीतच असं नाही. त्या आहेत. आणि अनेक आहेत. फक्त त्या बघण्याइतकी नजर आपल्याकडे असायला हवी. नसली तर कमावता यायला हवी. असतात अगणित गोमट्या गोष्टी आसपास फक्त वाचाव्या अन् वेचाव्या लागतात इतकंच. त्या हाती लागण्याची काही आयती सूत्रे नसतात. ती शोधावी लागतात. नसतील गवसत, तर स्वतःच तयार करावी लागतात. सापडली की संवर्धित करून ठेवाव्या लागतात.

धडपड किती असावी, याला प्रसंगनिर्मित मर्यादांचे बांध असू शकतात. पण ध्येयप्रेरित माणसे या साऱ्यांची तमा न करता लक्ष्याच्या दिशेने मार्गस्थ होतात तोच क्षण खरा. बाकी क्षणाला लागून क्षण येतो अन् पुढच्या क्षणी भूतकाळाच्या कुशीत जाऊन विसावतो. फक्त विसावण्याआधी तो वेचता यायला हवा. अर्थात, सगळ्यांनाच हे कौशल्य अवगत असतं असं नाही. सगळ्यांना सगळं यावं असंही नसतं. प्रगतीच्या पथावरून प्रवास सगळ्यांनाच करता येतो. त्याकरिता परिवर्तनाचे पडसाद वाचण्याइतकी नजर अन् बदलाचे संदर्भ वेचण्याइतकं विचारांनी विचक्षण असणं आवश्यक असतं. 

विचार सगळेच करतात, पण त्यांना खोली किती जणांना देता येते? मनात आकारास आलेल्या विचारास कृतीच्या वाटेने वळते करणे सगळ्यांच जमतं असं नाही. याचा अर्थ सामान्यांनी असाधारण असं काही न करता साधारण मार्गाने चालत राहावं असा नाही होत. एखाद्या यंत्रातला लहानसा स्क्रू विचलित झाला तरी यंत्राची धडधड थांबवू शकतो. आकाराने तो नगण्य असला तरी अस्तित्वाने तसा असेलच असं नाही.

कधी कळत, कधी नकळत काही हाती लागतंही. असं काही फार सायासाशिवाय मिळालं की, कुणी त्यावर दैव, नशीब वगैरे लेबले चिटकवून कर्तृत्त्वाचे अनामिक धनी निर्माण करतो. असं कुणी काही नियतीच्या हाती सोडून देत असेल, तर तो स्वप्ने वेचून आणण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा अधिक्षेप नाही का ठरत? क्षणभर मान्य करूया, नशीब वगैरे सारखा काही भाग असू शकतो. मग केलेल्या प्रयत्नांचं काय? उपसलेल्या कष्टाचं काय? परिश्रमांच्या ललाटी प्राक्तनाचं गोंदणच करायचं म्हटलं, तर प्रयासांना अर्थ उरतोच किती? अशावेळी कुणी प्रयत्ने वाळूचे कण... वगैरे म्हणत असेल तर त्याला कितीसा अर्थ उरतो. माणसांचा इतिहास प्रयत्नांच्या वाटेने प्रवास करणारा आहे, याचं विस्मरण होणं कर्तृत्वाशी प्रतारणा नाही का होत? कुणी नियतीचा परिपाक अन् प्राक्तनाचा प्रसाद म्हणून प्रयत्नांच्या ललाटी दुय्यमत्वाचे अभिलेख लेखांकित करत असेल, तर त्याचे पडसाद भूगोलावर पडतात एवढं नक्की.

साध्य आणि साधने यात एक अनामिक अनुबंध असतो. तो समजला की, साधनशुचिता शब्दाचा अर्थ उलगडतो. अर्थात, अर्थाचे बोध घडण्यासाठी अंतर्यामी विलसणाऱ्या भावनांचे पदर उलगडता यायला हवेत. त्याआधी भावनांच्या प्रतलावरून पुढे प्रवास करता यायला हवा. लक्ष समोर दिसत असेल आणि ते संपादित करायची अंतरी आस असेल, तर तिथं पोहचण्यासाठी पावलं स्वतःलाच उचलावी लागतात. तो काही सहज घडून येणारा प्रवास नसतो. त्यासाठी आपणच आपल्या अंतरंगात डोकावून बघायला लागतं. तेथे नितळपण नांदते राखायला लागते. 

अंतर्यामी कोरलेल्या क्षितिजापर्यंत पोहचण्याचा प्रवास मनाच्या आज्ञेने घडतो. त्यासाठी पुढे पडणाऱ्या पावलांना विचारांचे अधिष्ठान असायला लागते. मनातलं चांदणं अंधाराच्या सोबतीपासून सुरक्षित राखायला लागतं. तेव्हा चालण्याचा अर्थ समजतो. सुरक्षेची वसने परिधान करून निघालेल्यांच्या मार्गात कसलं आलंय साहस! 

साहसाचे अर्थ शब्दांच्या कोशात पाहून कळत नसतात. ते कृतीत कोरावे लागतात. पाण्यात उतरल्याशिवाय पाण्याची खोली प्रत्ययास नाही येत. तीरावर उभं राहून नदीचं सौंदर्य डोळ्यांना दिसेल. मनाला मोहित करेल. पण त्याचं अथांग असणं कसं आकळेल? प्रशस्त मार्गांवरून पळणाऱ्या पावलांना चालण्याचा आनंद मिळेलही, पण नव्या वाटा निर्मितीचं श्रेय त्यांच्या असण्याला कसे देता येईल? मळलेले मार्ग टाळून नव्या वाटा तयार करण्याचं वेड आतूनच उमलून यावं लागतं, हेच खरं असं म्हटलं तर ते अतिशयोक्त ठरू नये, नाही का? 
- चंद्रकांत चव्हाण
••

वेदनांची मुळाक्षरे

By // No comments:
आयुष्य आणि त्याला वेढून असणाऱ्या वेदनांचे अर्थ शोधताना स्वतःस खरवडून काढता यायला हवं. अर्थात, हे सगळ्यांना साध्य होतच असं नाही. ज्यांना संभव आहे त्यांच्यासाठीही ते आपण समजतो इतकं सहज, सुगम, सुघड नसतं. वेदना कुठलीही असो, तिचे अर्थ अनुभवल्याशिवाय कसे आकळतील? त्यांची ठसठस टोचल्याशिवाय समजत नसते. जखम झाल्याशिवाय घावांची खोली कळत नाही. 

सुखांची संकल्पित शिल्पे मनःपटलावर कोरता येतात, पण त्याच्या आकृत्या साकारणे सहजपणाने पदरी पडणारे समाधान नसते. सुखांचे परगणे स्वतःच तयार करायला लागतात. त्याच्या विस्ताराच्या सीमा कोरून घ्याव्या लागतात. त्यातही काही न्यून राहतेच. सुखाच्या अनवरत वर्षावाचा संग घडणं अवघडच. सुख शब्दाचा अर्थ समजण्यासाठी नजर कमवायला लागते. प्राप्त परिस्थितीकडे समत्वदर्शी दृष्टीने बघण्यासाठी नजर गवसली की, सुखांचे अर्थ नव्याने उलगडतात. त्यांच्या व्याख्या शोधण्यासाठी अन्य क्षितिजांच्या आश्रयाला जावं नाही लागत. 

आयुष्यात अधिवासास आलेले सुख-दुःखाचे लहान मोठे कण वेचता आले की, अंगणी समाधानाच्या एकेक चांदण्या उमलत राहतात. फक्त मनातला चंद्र प्रकाशत राहायला हवा. हे एकदा जमलं की, आयुष्यातील सुखांचे अर्थ अन् त्यांना असणारे अनेक ज्ञातअज्ञात कंगोरे कळतात. चांदण्याच्या कवेत सामावलेल्या प्रकाशाचे संदर्भ समजले की, समाधानाच्या परिभाषाही अधोरेखित होत राहतात. 

आनंदाच्या परिभाषा सहजपणे काळपटावर अंकित नाही करता येत. आनंद अंतरी नांदता असला की, चैतन्य चेहऱ्यावर विलसते. आयुष्यातून वाहते. जगण्यातून गवसते. ते काही उताराचे हात धरून वाहत नसते. सीमांकित असल्या तरी, आनंदाच्या संकल्पना त्यासाठी अवगत असायला लागतात. अर्थात, हेही खरंय की, कोणाला आनंद कशात, कुठे आणि कसा गवसेल हे सांगणं बऱ्यापैकी अवघड. कुण्या एकाचा आनंद दुसऱ्याच्या वेदनेची व्याख्या असू शकतो. असं असलं, तरी आनंदाची काही अभिधाने असतात. ते अवगत करून घेतले की, आयुष्याला वेढून असणाऱ्या एकेक पैलूंचे अर्थ समजू लागतात.

वेदनांची मुळाक्षरे जगण्याला आकार देत राहतात. आपणच आपल्याला नव्याने समजून घेताना आयुष्याचे एकेक पदर उलगडत राहतात. काही सुटलेलं, काही निसटलेलं, काही सापडलेलं असं सगळंच जमा करीत राहतो माणूस कुठून कुठून. अंतरी वेडी आस बांधून पळत राहतो अखेरपर्यंत. सुखांनी भरलेले घट दारी रचता यावेत म्हणून संचित वगैरे अशी काही नावे देऊन पांघरत राहतो परंपरेच्या भरजरी शाली. त्यांचं भरजरी असणं धाग्यातून उसवत असलं, तरी पुन्हा पुन्हा सांधण्याचा प्रयत्न करीत असतो. टाके घालून कोपरे जोडण्याचा प्रयत्न करीत राहतो. विस्कटलेल्या धाग्यांचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करीत मनातल्या श्रद्धांना देव्हारे उपलब्ध करून देत असतो. 

मन अन् भावनांच्या विश्वात विहार करताना विचारांशी सख्य सहजपणे साधता यावं. समाधानाच्या व्याख्या समजून घेता आल्या अन् सुखांचे अर्थ त्यांच्या कंगोऱ्यासह कळले की, आपणच आपल्याला नव्याने सापडतो. संवेदनांचे तीर धरून वाहताना माणूस आयुष्याचे किनारे कोरत राहतो नव्याने. चालत राहतो अपेक्षांचं गाठोडं डोक्यावर घेऊन. सुख-दुःखाचं पाथेय घेऊन भटकत राहतो समाधानाच्या चार चांदण्या वेचण्याच्या मिषाने. मनात विचारांची वादळे सैरभैर वाहत राहतात. भावनांच्या लाटा आदळत राहतात आयुष्याच्या किनाऱ्यांवर. प्रत्येक पळ एक अनुभूती बनून सामावतो जगण्यात. हे विखरत जाणंच जगण्याला नवे आयाम देत असतं.

काही गोष्टी संस्कृतीचे संचित असतं. आहे ते सगळेच सुंदर असतं अन् एकजात सगळंच वाईट वगैरे असतं, असं नाही. बरं अन् वाईट या बिंदूना सांधणाऱ्या संक्रमणरेषेवर असणारा विकल्प असतो तो. आहे ते अन् पदरी पडलं ते सगळंच समाजमनाचे तीर धरून वाहत येतं असंही नाही. मनावर चढलेली पुटे धुवायला थोडा अवधी द्यावा लागतो. सुरवातीस अपवाद असतात, नंतर तेच प्रघात बनतात, पुढे प्रघातनीती होते. 

माणसाचा इतिहासच वाहण्याचा आहे. वाहत्या वाटेवर वळणे असतात. वळणे ओलांडून वेग नाही धारण करता येत अथवा त्यांना वळसा घालूनही नाही पळता येत पुढे. वेगाला आवर घालण्यासाठी बांध घालावे लागतात. सुरवातीस त्यांची उंची मोठी नसते. ती सावकाश वाढवावी लागते. कारण रूढी जन्माला घालतो माणूस अन् मोडतोही माणूसच.

बदल घडतात. कधी घडून येतात. कधी घडवावे लागतात. बदल ही एकच गोष्ट अशी आहे, जी बदलवता नाही येत. संक्रमणाचं स्वप्नं पाहणाऱ्या डोळ्यांना सहकार्याच्या चिमूटभर मातीचंही मोल माहीत असतं. सहकार्याला कशाचीही उपमा देता नाही येत, फक्त त्याचे उपमेय अन् उपमान आपल्याला होता यायला हवं. पण आहे ते विसरून, मिळालं ते नाकारून कशाशी तरी तुलना करण्याचा मोह अनावर झाला की, आयुष्याचे अन्वयार्थ अधिक अवघड होतात, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••