सद्गुणांचं संचित

By // No comments:
अंतरी अधिवास करून असलेल्या तरल भावना, भावनांच्या वर्तुळात विहार करणाऱ्या सरल संवेदना, कृतीचे किनारे धरून वाहणारा सोज्वळपणा, नीतिसंमत संकेतांना प्रमाण मानणारा सात्विक विचार अन् त्या विचारांना असलेले मूल्यांचे भान, त्यातून जगण्याला लाभलेले नैतिक अधिष्ठान, कार्याप्रती असणारी अढळ निष्ठा, विसंगतीपासून विलग राहणाऱ्या विचारांना प्रमाण मानत जीवनाचा नम्रपणे शोध घेऊ पाहणारी नजर अन् नजरेत सामावलेलं प्रांजळपण, या आणि अशा काही आयुष्याला अर्थ प्रदान करणाऱ्या धवल गुणांचा समुच्चय कोण्या एकाच एक व्यक्तीच्या ठायी असू शकतो का? नक्की माहीत नाही. पण बहुदा नसावाच. कारण परिपूर्ण शब्दाची पूर्ण परिभाषा अद्यापपर्यंत तरी तयार झालेली नाही. आहे असं कोणाला वाटत असेल, तर त्यात काही वावगं नाही. शोध जिवांची सहजवृत्ती असली, तरी काही उत्तरे शोधणं अवघड असतं. याचा अर्थ अगदीच अशक्य असतं असं नाही. त्यांच्यापर्यंत पोहचण्याचे पर्याय सहज नसतात इतकंच. त्यातला हासुद्धा एक असावा. 

इतिहासाला निःसंदिग्धपणे प्रश्नांची उत्तरे देता यावीत म्हणून काही गोष्टी निसर्गाने जन्माला घातलेल्या असतात. अशी माणसेही त्यातील एक. ती असतात, नाही असं नाही. पण अपवाद म्हणूनच. अभावानेच ती आढळतात. बहुदा दुर्मिळच. म्हणूनच की काय सामान्यांना अशा असामान्य असणाऱ्यांचं अप्रूप वगैरे वाटत असेल का? खरंतर यातल्या एखाद्या गुणानेही सामान्यांच्या असण्याचे अर्थ अन् आयुष्याचे आयाम बदलू शकतात. एवढे गुण कुण्या एकाच व्यक्तीच्या ठायी असतील तर... पुरुषोत्तम वगैरे म्हणतात ते हेच असावं. अर्थात, असं काही होण्याचा मार्ग सगळ्यांना मोकळा असला, तरी मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत सगळ्यांना पोहचता येतंच असं नाही. म्हणून अशा असण्याचे अन्वयार्थ लावणं अवघड असतं.

प्रश्नांचा संग माणसांच्या जगण्यातून काही केल्या सुटत नाही अन् त्यांची उत्तरे शोधण्याची आस आयुष्यातून काही केल्या मिटत नाही, हेच खरं. काही उत्तरे सहज हाती लागतात. काही इकडेतिकडे धांडोळा घेतला की सापडतात. काहीं प्रश्नांची उत्तरे काळच देतो, तर काही काळाच्या उदरात सामावून नाहीसे होतात. समाजसंकेतांनी प्रमाणित केलेल्या वर्तनव्यवहारांच्या निकषांच्या मोजपट्टीत तंतोतंत सामावणारं कदाचित कुणी असेल अथवा नसेलही. संभवत: सगळ्या गुणांचं एकाच एका व्यक्तीठायी असणं कठीण असेलही. पुढ्यात पेरलेल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे काही सहज हाती लागत नसतात त्यातलं हे एक. काही उत्तरे अनुभवसिद्ध असतात. काळाची परिमाणे त्यांचे परिणाम तपासून पाहत असतात.

स्वभावातील निर्व्याजपणाला माणूसपणाची चौकट असली अन् या संचिताच्या बेरजेत आस्था सामावलेली असली की, त्यातून येणारा आत्मविश्वास स्वाभाविकपणाचे किनारे धरून वाहत राहतो. सद्गुण शब्द मुळात सापेक्ष आहे. तो जगण्यात पर्याप्त प्रमाणात असला की, माणूस म्हणून असणाऱ्या आपल्या अस्तित्वाचे काही आयाम अधोरेखित करतो. त्याचं असणं आवश्यकता असली, तरी त्याचं आधिक्य सद्गुणविकृती म्हणून संदेहाच्या परिप्रेक्षात अधिष्ठित केलं जातं. तसाही सद्गुण शब्दाचा प्रवासच निसरड्या वाटेवरून चालणारा. थोडा इकडे-तिकडे झाला की, तोल ढळणार हे विधिलिखित. तो जेवढा वैयक्तिक, तेवढा सार्वजनिकही. जितका सुगम, तेवढा अवघडसुद्धा. एकासाठी असणारा सद्गुण दुसऱ्यासाठी दुर्गुण ठरणारच नाही, असे नाही.

सद्गुणांचं संचित ओंजळीत असलं की, साहजिकच माणसाला माणूस म्हणून मिरवण्याचा अधिकार प्राप्त होतो. अन्यथा मिरवणूक तर कशाचीही काढता येते. गुढ्या प्रांजळपणाच्या उभ्या राहतात.  लोभस रंगांची उधळण करीत पताका वाऱ्यावर भिरभिरत राहिल्या तरी त्यांना कोणी उभं नाही करत. त्या लटकवलेल्या असतात, कुणाच्या तरी कल्पनेने अन् मनाने मानलेल्या मर्जीने. अर्थात, यासाठी माणूस शब्दाची व्याख्या माणसाला नीट कळायला हवी. स्वभावात असणारं उमदेपण स्वाभाविक असतं, ते विकत नाही मिळत किंवा उसनंही नाही आणता येत कुठून. माणूस म्हणून स्वतःची ओळख स्वतःलाच तयार करावी लागते. ती शोधयात्रा असते आपणच आपल्याला आणण्यासाठी केलेली. 

स्वातंत्र्याचे मोल जाणून घेण्यासाठी स्वतंत्र असण्याची आस अंतरी वाहती असायला लागते. स्वातंत्र्य शब्दाचे अंगभूत आयाम आकळले की, पारतंत्र्यातील मिंध्या सुखाचे एकेक अर्थ उलगडायला लागतात. केवळ निरर्थक वटवट करून विचारांचा प्रवर्तक होता येत नसतं. त्यासाठी गात्या गळ्यातला सूर अन् बोलत्या आवाजाचा शब्द होता यावं. अंगीकृत कार्यात कृतीची प्रयोजने पेरता आली की, कर्तृत्त्वाचा परिमल परिसरात पसरत राहतो, पहाटेच्या प्रसन्न प्रहरी परसदारी बहरून आलेल्या प्राजक्ताच्या परिमलासारखा. नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••

परिमाणे: व्यवस्थेची अन् आयुष्याची

By // No comments:
जगणं देखणं अन् आयुष्य सुंदर वगैरे होण्यासाठी ज्या काही गोष्टी माणसांना तयार करायला लागतात त्यातील एक आहे व्यवस्था. मुळात ही संकल्पना खूप व्यापक वगैरे आशय आपल्यात सामावून असलेली असली, तरी मर्यादांच्या कुंपणांनीही वेढलेली आहेच. खरंतर काळाचंच ते देखणं-कुरूप वगैरे अपत्य. अनुभूतीच्या कुशीतून ती प्रसवते अन् परिस्थितीचे किनारे धरून प्रवाहित असते. तिचं असणं समजून घेता येतं, तसं नसणंही जाणून घेता येतं. असण्या-नसण्याचे अन्वयार्थ लावता येतात. तिच्या अभावाचे परिणाम पाहता येतात अन् प्रभावाची परिमाणे समजून घेता येतात. त्यांचे असणे आकळले की, आवश्यक आकारही देता येतात. तिला कोणत्या तरी रंगलेपनद्रव्यांनी सुशोभित, सुंदर वगैरे करायचं की, तिचा चेहरा आहे तसा राहू द्यायचा, हा त्या त्या प्रसंगी घेतलेल्या भल्याबुऱ्या निर्णयांचा परिपाक असतो.
 
व्यवस्था नावाच्या व्यवहारात कितीतरी गोष्टी सामावून गेलेल्या असतात. कधी प्रवाहाच्या संगतीने किनाऱ्यांचा हात धरून पुढे सरकत त्या निघून गेलेल्या असतात. काही कालोपघात नामशेष होतात. काही नव्याने येऊन मिळतात. व्यवस्थेची अंगभूत परिमाणे असतात. निर्धारित निकष असतात. त्याभोवतीच्या प्रदक्षिणा असतात. मर्यादांची कुंपणे असतात. नियंत्रणाचे बांध असतात. उभे केलेले बुलंद बुरुज असतात. या सगळ्यां संभाराला सांभाळत अपेक्षा नावाचं अस्त्र हाती घेऊन ती अनेकांची आयुष्ये नियंत्रित करीत असते. 

पायाला चाके बांधून काळ पुढे पळत असतो. ते त्याचं प्राक्तन असतं. असं असलं तरी एक वास्तव त्यापासून विलग नाही करता येत, ते म्हणजे त्याचा मार्ग एकेरी असतो. त्याला फक्त पुढे पळता येतं, मागे नाही वळता येत. ही त्याची मर्यादा असली, तरी अनेक गोष्टींना सरळ-वाकडी वळणे देण्याइतपत असलेला त्याचा वकूब अद्यापपर्यंत कोणालाही नाकारता नाही आला. व्यवस्थेने काही चौकटी निर्धारित करून घेतलेल्या असतात. त्यांच्या विस्ताराच्या सीमा असतात. व्यवस्थेने कोरलेली वर्तुळे पार करणे अवघड असले, तरी असंभव नक्कीच नसते. त्यांच्या थोडा अदमास घेता आला, बुरुजांची उंची आकळली, कुंपणांच्या मर्यादा कळल्या की, बदलांची स्वप्ने पूर्णत्वास नेता येतात. परिस्थिती स्थिर कधीच नसते. परिवर्तनाची पावले घेऊन चालत असते ती. त्या पदरवास प्रतिसाद तेवढा देता यायला हवा. 

इहतली नांदणारी माणसे काळाच्या सुत्रांशी करकचून बांधलेली असतात. काळाचा कुठलाच तुकडा असा नसतो, ज्यात सर्वकाही मनाजोगत्या आकारात कोंबता येतं. इथून-तेथून कुठेही शोधा, माणसे सर्वकाळी, सर्वस्थळी सारखीच. असलाच तर थोडा इकडचा-तिकडचा काय तो तोळामासा थोडाफार फरक. एक हातचा किंवा एक वजा, एवढंच काय ते त्यांच्या असण्यात अंतर. बाकी भावनांच्या प्रतलावरून वाहणं सगळीकडे सारखं. काही दुथडी भरून वाहतात, काही हंगामी, काही अनवरत तर काही साचतात. इतकेच काय ते त्यांचे वेगळेपण. बाकी देशप्रदेशसंस्कृतीपर्यावरण वगैरे सोयीने आणि सोयीसाठी केलेले कप्पे. तसंही काळ काही समान उंचीची परिमाणे हाती घेऊन माणसे घडवत नसतो. त्यात अनेक वळणे असतात. काही वाटा असतात. उपलब्ध विकल्पांमधून योग्य पर्याय तेवढे अचूक निवडता यायला हवेत. 

कुणीतरी निर्धारित केलेल्या वर्तनप्रणालीच्या मर्यादांना आशीर्वाद मानून जीवनयापन करणे स्वयंप्रज्ञ वृत्तीने वर्तनाऱ्यासाठी सुगम नसते. व्यवस्थेने प्रमाणित केलेल्या परिमाणात स्वतःला ठाकून-ठोकून बसवून घेता आलं की, बरेच प्रश्न आपसूक सुटतात, व्यवस्थाच ते सोडवण्याचा प्रयत्न करते, असे म्हणतात. पण या म्हणण्याला प्रासंगिक समाधानापलीकडे कोणते अथांग अर्थ आहेत असे वाटत नाही. केवळ अन् केवळ व्यवस्थेच्या तंत्राने चालणे घडले की, आयुष्याला सुसंगत अर्थ देण्यासाठी आत्मसात केलेले आपले मंत्र प्रभावहीन होतात, हेही कसं नाकारता येईल? व्यवस्था सोयीसाठी असली तर समजून घेता येईल, संधी असली तर स्वीकारताही येईल; पण ती सर्वस्व होऊ लागली की, जगण्यातून सत्व हरवतं अन् सत्व हरवलेली माणसे स्वत्वाचे संदर्भ गमावून बसतात.

परंपरेचे किनारे धरून वाहताना अनेक व्यवधाने वाटेवर सवंगड्यासारखी भेटतात. त्यांच्याशी सख्य साधून खेळता आलं की, आयुष्याचे एकेक अन्वयार्थ आकळू लागतात. जीवन काही आखून घेतलेल्या सरळ रेषेवरचा प्रवास नसतो. अनेक अवघड, अनघड वळणे नियतीच आपल्यासोबत दत्तक देत असते. त्यांचे अर्थ शोधत अन् आयुष्याच्या पटावर पसरलेल्या पसाऱ्याचे अन्वयार्थ लावत जगण्याचा मागोवा घ्यावा लागतो. आयुष्य सुसह्य करणारी सूत्रे सहज नसली, तरी असाध्य असतात असंही नाही. फक्त त्यांच्यापर्यंत पोहचता यायला हवं. त्याकरिता त्याची परिमाणे अन् प्राप्तीची प्रमाणेही प्रसंगी अवगत असावी लागतात, नाही का?
-चंद्रकांत चव्हाण
•  

वर्तन विपर्यास

By // No comments:
विज्ञान-तंत्रज्ञानाने मंडित जगाने वर्तमानकाळी अनेक प्रश्न माणसासमोर उभे केले आहेत. अर्थात, तुम्ही म्हणाल या विधानात नावीन्य ते काय? प्रश्न माणसांसोबत कधी नव्हते? अगदी खरंय, ते आहेतच आणि असतीलही. समजा, तसे ते नसते तर प्रगतीच्या परिभाषा ना त्याने शोधल्या असत्या, ना परिमाणे वापरून परिणाम तपासले असते. एक मात्र खरंय की, काळाच्या ओघात अन् आयुष्याच्या प्रवासात पुढ्यात पडलेल्या प्रश्नांच्या व्याख्या बदलत असतात. कुणी म्हणेल की, बदल नावाचा प्रकार न बदलणारं वास्तव आहे. बदल हीच एक गोष्ट अशी असावी की, जी बदलता नाही येत कुणाला. बदलांना वेग असतो. चेहरा नसतो. तो द्यावा लागतो. मग तो माणूस असो की, अन्य कुणी. त्यासाठी मुखवटे काढून चेहरा शोधावा लागतो. चेहरा असेल तसा सापडेलही एकवेळ, पण माणूस...? तो गवसेलच याची शाश्वती नाही देता येत.

पण तरीही एक मुद्दा शेष राहतो, तो म्हणजे माणूसपण सगळंच संपलं आहे असं सरसकट नाही म्हणता येत. पण आसपास सगळंच काही गोमटं आहे असंही नाही. हे सगळं निर्विवाद मान्य केलं, तरी एक वास्तव विसरता नाही येत की, माणूस माणसापासून सुटत अन् आपलेपणापासून तुटत चालला आहे. आसपास माणसं तर अनेक आहेत, पण गर्दीत केवळ आकृत्या दिसतात. चेहरे कधीच हरवले आहेत. 

अंतरी कोरलेल्या प्रतिमांना आकार देऊन माणूस नावाची आकृती माणूस उभी करू पाहतोय. खरं सांगायचं म्हणजे आभासी विश्वात आपलं ओंजळभर विश्व शोधू पाहतो आहे. ते हाती आहेही. पण सत्य अन् तथ्य यात अंतराय असतं, याचा विसर त्याला पडलाय. हाती लागलेल्या चतकोर विश्वाभोवती तो प्रदक्षिणा करतो आहे अन् त्यालाच प्रगती वगैरे समजतो आहे. व्हाटसअॅप, फेसबुक, इन्टरनेटने जगाशी कनेक्ट असणारी माणसं मात्र डिसकनेक्ट होत आहेत. ‘फेस टू फेस’ संवाद हरवतोय. सगळ्या जगाच्या वार्ता माहीत आहेत; पण आपल्या शेजारी कोण राहतो, हे माहीत नसणे, हा वर्तन विपर्यास नव्हे का? 

रोजच्या धावपळीत अनेक घटना घडतात. त्यातल्या सगळ्याच नाही अधोरेखित करता येत कुणाला अन् सगळ्यांचीच समर्पक उत्तरे नाही शोधता येत. खरं तर हेही आहे की, कुण्या एकाला जगाचं जगणं देखणं नाही करता येत. काळ कोणताही असो आसपास कुठेतरी, कोणावर तरी अन्याय होतच असतो. त्याचं प्रमाण कमी अधिक असलं म्हणून त्याच्या परिभाषा नाही बदलत. तो आपण पाहतो. दिसला तर घडू नये म्हणून काय करतो? स्व सुरक्षित राखणाऱ्या चौकटींनी बंदिस्त करून घेतलेलं जगणं, हे याचं उत्तर नाही. 

स्वतःला शोधण्यासाठी चौकटीनी निर्देशित केलेल्या सीमा सोडव्या लागतात. प्रतिरोधाच्या भिंती ध्वस्त कराव्या लागतात. बंधनांचे बुलंद बुरुज पार करावे लागतात. चौकटी मोडणाऱ्यांनाही व्यवस्थेकडून जाब विचारले जातात. कोण्या एखाद्याने कुंपण ओलांडून आपलं आकाश शोधण्यासाठी घेतली भरारी, तर पंख कापण्यासाठी हात अगत्याने पुढे येतात. शोषणाविरोधात आवाज बुलंद होतो, तेव्हा तो बंद करण्याचे पर्याय का शोधले जातात? अन्याय होतो आहे, म्हणून परिस्थितीला प्रश्न विचारून पाहतो का? निदान आपणच आपल्याला तरी विचारतो का? 

इतिहास प्रश्न विचारतो का? होय, विचारतो! एकदोनदा नाही अनेकवेळा विचारतो. पण प्रत्येकवेळी ते कळतातच असं नाही. त्याची उत्तरे शोधण्यासाठी विधायक विचारांच्या पणत्या हाती घेऊन पावलापुरता प्रकाश पेरीत चालावे लागते. तो योजकतेने अन् परिश्रमाने घडवावा लागतो. आपल्याकडे शतकांचा उज्ज्वल इतिहास असेल, तर त्यापासून आपण काय शिकलो? हा प्रश्न आपणच आपल्याला कितीदा विचारतो? इतिहासाकडून काहीच न शिकणे, हा वर्तन विपर्यास नाही का? 

माणूस नावाच्या जिवाभोवती विपुल व्यवधाने आहेत. आयुष्यात अनेक गुंते आहेत. ते असतातच. त्यांना टाळून कुणालाही पुढे नाही जाता येत अथवा टाकून पळूनही नाही जाता येत. एकतर त्यांना सामोरे तरी जावे लागते, नाहीतर निराकरण तरी करावे लागते. पण, ते व्हावे कसे? हाही एक जटिल प्रश्नच आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे माणसाने शोधली, तरीही त्यातून आणखी नवे प्रश्न निर्माण होतच आहेत. राहतील. प्रश्न कधी थांबत नाहीत अन् संपतही नाहीत. माणसांच्या आयुष्यातून प्रश्न वजा केले, तर मागे काय उरेल...? हाही एक प्रश्नच, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••

सुख म्हणजे काय असतं?

By // No comments:
आजचं जग सुखी आहे का? असा प्रश्न तुम्हांला कोणी विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? काही क्षणभर विचार करतील. काही जण काही आठवतंय का म्हणून स्मृतीचे कोपरे कोरत राहतील. काही तर्काचे किनारे धरून पुढे सरकतील. काही अनुमानाचे प्रवाह धरून वाहतील. काही निष्कर्षाच्या काठावर उभे राहून पैलतीरावर दिसणाऱ्या उत्तरांच्या धूसर आकृत्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतील. काही काहीही करणार नाहीत. काही प्रश्नच बनून राहतील किंवा आणखी काही... 

खरंतर हा प्रश्नच एक यक्षप्रश्न आहे. याचं उत्तर मिळणं अश्यक्य नसलं, तरी अवघड नक्कीच आहे. कुणी म्हणेल, आजचं काय विचारता, जग कधी सुखी होतं हो? अन् कुणाला ते सुखी वगैरे असल्याचं वाटत असेल, तर सुखाच्या त्याच्या व्याख्या नेमक्या काय आहेत, हे एकदा तपासून बघायला हवं. हे असं काहीसं म्हणण्यात वावगं काहीही नाही. जगाचं असणंनसणं तात्पुरतं बाजूला राहू द्या. निदान आपलं स्वतःपुरतं जग तरी सुखाचं आहे का? बहुदा नसेलच म्हणा. कोणी सांगत असेल की, आहे ना सुखी! अगदी आकंठ आनंदात आहोत हो आम्ही. आनंदी राहण्याकरिता आवश्यक असलेलं सगळंच तर आहे आमच्याकडे. कुणी असं काहीसं सांगत असेल तर ते म्हणणं प्रत्येकवेळी पूर्ण सत्य असेलच असं नाही. कारण सत्य अन् तथ्य यात अंतर असतं. समजा असलं तसं, तरी सुखाच्या व्याख्या त्याला पूर्णपणे कळल्या नसाव्यात किंवा अंतरी नांदणाऱ्या समाधान नावाच्या अनुभूतीचे अथपासून इतिपर्यंत असणारे कंगोरे आकळलेले नसावेत.

बंगलागाडीमाडीत कुणास सुख, समाधान वगैरे गवसत असेल तर ते काही वावगं नाही. पण ते काही एक आणि केवळ एकमेव नसतं अन् तेवढ्या आणि तेवढ्यापुरतं थांबतही नसतं. त्याचा प्रवास निरंतर सुरू असतो, नावं तेवढी सातत्याने बदलत असतात. खरंतर सुख हा शब्दच मुळात सापेक्षतेची वसने परिधान करून विहार करीत असतो. कोणाच्या सुखाच्या संकल्पित संकल्पना काय असतील, हे सम्यकपणे कसं सांगता येईल? त्यांची सुनिश्चित परिमाणे असती तर दाखवता आलं असतं की, हे तुझ्या समोर जे दिसतंय ना, यालाच सुख वगैरे म्हणतात म्हणून.

सुख आणि समाधान हे शब्दच मुळात पर्याप्त समाधानाचे निदर्शक नाहीत. त्यांचं असणं अनेक किंतुना आवतन देणारं असतं अन् नसणंही बऱ्याच प्रवादांना जन्म देणारं असतं. कोणाला कशातून समाधान गवसेल, हे सांगणेही असेच अध्याहृत. कोणाला कणभर मिळून सुखाचा अर्थ गवसेल, पण कुणाच्या पदरी मणभर पडूनही सुख म्हणजे काय असतं, ते सापडणार नाही. सुख-समाधानच्या परिभाषा प्रासंगिकतेचा परिपाक असतात. म्हणूनच की काय परिस्थितीने पदरी पेरलेल्या पळांनी त्या निर्धारित होत असाव्यात. निकषांच्या निर्धारित नियमात त्यांना अधिष्ठित नाही करता येत. 

पारतंत्र्यात असताना प्रत्येकाला स्वातंत्र्य प्रिय वाटते अन् स्वातंत्र्य हाती लागलं की, त्याचे सोयिस्कर संदर्भ शोधले जातात, हेही तेवढेच खरे. स्वातंत्र्य शब्दाचे प्रत्येकाचे अर्थ वेगळे अन् अन्वय प्रत्येकासाठी निराळे असतात. व्यक्तीसाठी असणारे त्याचे निकष समूहासाठी सुयोग्य असतीलच असं नाही. काळाचा हात धरून ते चालत येतात. काळच त्याचे परिणाम अन् परिमाणेही निर्धारित करत असतो.

प्रश्न केवळ सीमित नसतात, त्यांचं असणं जेवढं वैयक्तिक, तेवढंच वैश्विकही असतं. ते कोरभर भाकरीचे असतात, तसे चतकोर सुखाचे असतात. चिमूटभर आस्थेचे असतात, तसे ओंजळभर समाधानचेही असतात. आर्थिक असतात तसे जातीय, धार्मिक, राजकीय अभिनिवेश समोर उभे करणारेही असतात. त्यांचं वाहतं असणं अनाहत आहे. अखंड मालिका सुरु असतेच त्यांची. माणूस नावाचे अस्तित्व उभे करण्यासाठी ती खंडित करावी लागते. पण ती खंडित करावी कशी? करावी कोणी? गुंतागुंत निर्माण करणारे हे प्रश्न समोर आहेतच. 

खरंतर माणूस हेच एक मोठ्ठं प्रश्नचिन्ह आहे. कोणता माणूस कसा असेल, कोणत्या प्रसंगी कसा वागेल, हे सांगावे कसे? आणि सांगावे तरी कोणी? जगाची रीत कोणती असावी? वर्तनाची तऱ्हा कशी असावी? याबाबत फारतर अपेक्षा करता येतात. सक्ती नाही करता येत कोणाला. खरं तर हेही आहे की, अशा प्रश्नांच्या गुंत्यात गुरफटून समाजात वावरताना कधीतरी नकळत आपणच प्रश्न होऊन जातो. आपली ओळख नेमकी काय? हासुद्धा आपल्यासाठी प्रश्न बनतो, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण