परिमाणे: व्यवस्थेची अन् आयुष्याची

By
जगणं देखणं अन् आयुष्य सुंदर वगैरे होण्यासाठी ज्या काही गोष्टी माणसांना तयार करायला लागतात त्यातील एक आहे व्यवस्था. मुळात ही संकल्पना खूप व्यापक वगैरे आशय आपल्यात सामावून असलेली असली, तरी मर्यादांच्या कुंपणांनीही वेढलेली आहेच. खरंतर काळाचंच ते देखणं-कुरूप वगैरे अपत्य. अनुभूतीच्या कुशीतून ती प्रसवते अन् परिस्थितीचे किनारे धरून प्रवाहित असते. तिचं असणं समजून घेता येतं, तसं नसणंही जाणून घेता येतं. असण्या-नसण्याचे अन्वयार्थ लावता येतात. तिच्या अभावाचे परिणाम पाहता येतात अन् प्रभावाची परिमाणे समजून घेता येतात. त्यांचे असणे आकळले की, आवश्यक आकारही देता येतात. तिला कोणत्या तरी रंगलेपनद्रव्यांनी सुशोभित, सुंदर वगैरे करायचं की, तिचा चेहरा आहे तसा राहू द्यायचा, हा त्या त्या प्रसंगी घेतलेल्या भल्याबुऱ्या निर्णयांचा परिपाक असतो.
 
व्यवस्था नावाच्या व्यवहारात कितीतरी गोष्टी सामावून गेलेल्या असतात. कधी प्रवाहाच्या संगतीने किनाऱ्यांचा हात धरून पुढे सरकत त्या निघून गेलेल्या असतात. काही कालोपघात नामशेष होतात. काही नव्याने येऊन मिळतात. व्यवस्थेची अंगभूत परिमाणे असतात. निर्धारित निकष असतात. त्याभोवतीच्या प्रदक्षिणा असतात. मर्यादांची कुंपणे असतात. नियंत्रणाचे बांध असतात. उभे केलेले बुलंद बुरुज असतात. या सगळ्यां संभाराला सांभाळत अपेक्षा नावाचं अस्त्र हाती घेऊन ती अनेकांची आयुष्ये नियंत्रित करीत असते. 

पायाला चाके बांधून काळ पुढे पळत असतो. ते त्याचं प्राक्तन असतं. असं असलं तरी एक वास्तव त्यापासून विलग नाही करता येत, ते म्हणजे त्याचा मार्ग एकेरी असतो. त्याला फक्त पुढे पळता येतं, मागे नाही वळता येत. ही त्याची मर्यादा असली, तरी अनेक गोष्टींना सरळ-वाकडी वळणे देण्याइतपत असलेला त्याचा वकूब अद्यापपर्यंत कोणालाही नाकारता नाही आला. व्यवस्थेने काही चौकटी निर्धारित करून घेतलेल्या असतात. त्यांच्या विस्ताराच्या सीमा असतात. व्यवस्थेने कोरलेली वर्तुळे पार करणे अवघड असले, तरी असंभव नक्कीच नसते. त्यांच्या थोडा अदमास घेता आला, बुरुजांची उंची आकळली, कुंपणांच्या मर्यादा कळल्या की, बदलांची स्वप्ने पूर्णत्वास नेता येतात. परिस्थिती स्थिर कधीच नसते. परिवर्तनाची पावले घेऊन चालत असते ती. त्या पदरवास प्रतिसाद तेवढा देता यायला हवा. 

इहतली नांदणारी माणसे काळाच्या सुत्रांशी करकचून बांधलेली असतात. काळाचा कुठलाच तुकडा असा नसतो, ज्यात सर्वकाही मनाजोगत्या आकारात कोंबता येतं. इथून-तेथून कुठेही शोधा, माणसे सर्वकाळी, सर्वस्थळी सारखीच. असलाच तर थोडा इकडचा-तिकडचा काय तो तोळामासा थोडाफार फरक. एक हातचा किंवा एक वजा, एवढंच काय ते त्यांच्या असण्यात अंतर. बाकी भावनांच्या प्रतलावरून वाहणं सगळीकडे सारखं. काही दुथडी भरून वाहतात, काही हंगामी, काही अनवरत तर काही साचतात. इतकेच काय ते त्यांचे वेगळेपण. बाकी देशप्रदेशसंस्कृतीपर्यावरण वगैरे सोयीने आणि सोयीसाठी केलेले कप्पे. तसंही काळ काही समान उंचीची परिमाणे हाती घेऊन माणसे घडवत नसतो. त्यात अनेक वळणे असतात. काही वाटा असतात. उपलब्ध विकल्पांमधून योग्य पर्याय तेवढे अचूक निवडता यायला हवेत. 

कुणीतरी निर्धारित केलेल्या वर्तनप्रणालीच्या मर्यादांना आशीर्वाद मानून जीवनयापन करणे स्वयंप्रज्ञ वृत्तीने वर्तनाऱ्यासाठी सुगम नसते. व्यवस्थेने प्रमाणित केलेल्या परिमाणात स्वतःला ठाकून-ठोकून बसवून घेता आलं की, बरेच प्रश्न आपसूक सुटतात, व्यवस्थाच ते सोडवण्याचा प्रयत्न करते, असे म्हणतात. पण या म्हणण्याला प्रासंगिक समाधानापलीकडे कोणते अथांग अर्थ आहेत असे वाटत नाही. केवळ अन् केवळ व्यवस्थेच्या तंत्राने चालणे घडले की, आयुष्याला सुसंगत अर्थ देण्यासाठी आत्मसात केलेले आपले मंत्र प्रभावहीन होतात, हेही कसं नाकारता येईल? व्यवस्था सोयीसाठी असली तर समजून घेता येईल, संधी असली तर स्वीकारताही येईल; पण ती सर्वस्व होऊ लागली की, जगण्यातून सत्व हरवतं अन् सत्व हरवलेली माणसे स्वत्वाचे संदर्भ गमावून बसतात.

परंपरेचे किनारे धरून वाहताना अनेक व्यवधाने वाटेवर सवंगड्यासारखी भेटतात. त्यांच्याशी सख्य साधून खेळता आलं की, आयुष्याचे एकेक अन्वयार्थ आकळू लागतात. जीवन काही आखून घेतलेल्या सरळ रेषेवरचा प्रवास नसतो. अनेक अवघड, अनघड वळणे नियतीच आपल्यासोबत दत्तक देत असते. त्यांचे अर्थ शोधत अन् आयुष्याच्या पटावर पसरलेल्या पसाऱ्याचे अन्वयार्थ लावत जगण्याचा मागोवा घ्यावा लागतो. आयुष्य सुसह्य करणारी सूत्रे सहज नसली, तरी असाध्य असतात असंही नाही. फक्त त्यांच्यापर्यंत पोहचता यायला हवं. त्याकरिता त्याची परिमाणे अन् प्राप्तीची प्रमाणेही प्रसंगी अवगत असावी लागतात, नाही का?
-चंद्रकांत चव्हाण
•  

0 comments:

Post a Comment