सद्गुणांचं संचित

By
अंतरी अधिवास करून असलेल्या तरल भावना, भावनांच्या वर्तुळात विहार करणाऱ्या सरल संवेदना, कृतीचे किनारे धरून वाहणारा सोज्वळपणा, नीतिसंमत संकेतांना प्रमाण मानणारा सात्विक विचार अन् त्या विचारांना असलेले मूल्यांचे भान, त्यातून जगण्याला लाभलेले नैतिक अधिष्ठान, कार्याप्रती असणारी अढळ निष्ठा, विसंगतीपासून विलग राहणाऱ्या विचारांना प्रमाण मानत जीवनाचा नम्रपणे शोध घेऊ पाहणारी नजर अन् नजरेत सामावलेलं प्रांजळपण, या आणि अशा काही आयुष्याला अर्थ प्रदान करणाऱ्या धवल गुणांचा समुच्चय कोण्या एकाच एक व्यक्तीच्या ठायी असू शकतो का? नक्की माहीत नाही. पण बहुदा नसावाच. कारण परिपूर्ण शब्दाची पूर्ण परिभाषा अद्यापपर्यंत तरी तयार झालेली नाही. आहे असं कोणाला वाटत असेल, तर त्यात काही वावगं नाही. शोध जिवांची सहजवृत्ती असली, तरी काही उत्तरे शोधणं अवघड असतं. याचा अर्थ अगदीच अशक्य असतं असं नाही. त्यांच्यापर्यंत पोहचण्याचे पर्याय सहज नसतात इतकंच. त्यातला हासुद्धा एक असावा. 

इतिहासाला निःसंदिग्धपणे प्रश्नांची उत्तरे देता यावीत म्हणून काही गोष्टी निसर्गाने जन्माला घातलेल्या असतात. अशी माणसेही त्यातील एक. ती असतात, नाही असं नाही. पण अपवाद म्हणूनच. अभावानेच ती आढळतात. बहुदा दुर्मिळच. म्हणूनच की काय सामान्यांना अशा असामान्य असणाऱ्यांचं अप्रूप वगैरे वाटत असेल का? खरंतर यातल्या एखाद्या गुणानेही सामान्यांच्या असण्याचे अर्थ अन् आयुष्याचे आयाम बदलू शकतात. एवढे गुण कुण्या एकाच व्यक्तीच्या ठायी असतील तर... पुरुषोत्तम वगैरे म्हणतात ते हेच असावं. अर्थात, असं काही होण्याचा मार्ग सगळ्यांना मोकळा असला, तरी मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत सगळ्यांना पोहचता येतंच असं नाही. म्हणून अशा असण्याचे अन्वयार्थ लावणं अवघड असतं.

प्रश्नांचा संग माणसांच्या जगण्यातून काही केल्या सुटत नाही अन् त्यांची उत्तरे शोधण्याची आस आयुष्यातून काही केल्या मिटत नाही, हेच खरं. काही उत्तरे सहज हाती लागतात. काही इकडेतिकडे धांडोळा घेतला की सापडतात. काहीं प्रश्नांची उत्तरे काळच देतो, तर काही काळाच्या उदरात सामावून नाहीसे होतात. समाजसंकेतांनी प्रमाणित केलेल्या वर्तनव्यवहारांच्या निकषांच्या मोजपट्टीत तंतोतंत सामावणारं कदाचित कुणी असेल अथवा नसेलही. संभवत: सगळ्या गुणांचं एकाच एका व्यक्तीठायी असणं कठीण असेलही. पुढ्यात पेरलेल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे काही सहज हाती लागत नसतात त्यातलं हे एक. काही उत्तरे अनुभवसिद्ध असतात. काळाची परिमाणे त्यांचे परिणाम तपासून पाहत असतात.

स्वभावातील निर्व्याजपणाला माणूसपणाची चौकट असली अन् या संचिताच्या बेरजेत आस्था सामावलेली असली की, त्यातून येणारा आत्मविश्वास स्वाभाविकपणाचे किनारे धरून वाहत राहतो. सद्गुण शब्द मुळात सापेक्ष आहे. तो जगण्यात पर्याप्त प्रमाणात असला की, माणूस म्हणून असणाऱ्या आपल्या अस्तित्वाचे काही आयाम अधोरेखित करतो. त्याचं असणं आवश्यकता असली, तरी त्याचं आधिक्य सद्गुणविकृती म्हणून संदेहाच्या परिप्रेक्षात अधिष्ठित केलं जातं. तसाही सद्गुण शब्दाचा प्रवासच निसरड्या वाटेवरून चालणारा. थोडा इकडे-तिकडे झाला की, तोल ढळणार हे विधिलिखित. तो जेवढा वैयक्तिक, तेवढा सार्वजनिकही. जितका सुगम, तेवढा अवघडसुद्धा. एकासाठी असणारा सद्गुण दुसऱ्यासाठी दुर्गुण ठरणारच नाही, असे नाही.

सद्गुणांचं संचित ओंजळीत असलं की, साहजिकच माणसाला माणूस म्हणून मिरवण्याचा अधिकार प्राप्त होतो. अन्यथा मिरवणूक तर कशाचीही काढता येते. गुढ्या प्रांजळपणाच्या उभ्या राहतात.  लोभस रंगांची उधळण करीत पताका वाऱ्यावर भिरभिरत राहिल्या तरी त्यांना कोणी उभं नाही करत. त्या लटकवलेल्या असतात, कुणाच्या तरी कल्पनेने अन् मनाने मानलेल्या मर्जीने. अर्थात, यासाठी माणूस शब्दाची व्याख्या माणसाला नीट कळायला हवी. स्वभावात असणारं उमदेपण स्वाभाविक असतं, ते विकत नाही मिळत किंवा उसनंही नाही आणता येत कुठून. माणूस म्हणून स्वतःची ओळख स्वतःलाच तयार करावी लागते. ती शोधयात्रा असते आपणच आपल्याला आणण्यासाठी केलेली. 

स्वातंत्र्याचे मोल जाणून घेण्यासाठी स्वतंत्र असण्याची आस अंतरी वाहती असायला लागते. स्वातंत्र्य शब्दाचे अंगभूत आयाम आकळले की, पारतंत्र्यातील मिंध्या सुखाचे एकेक अर्थ उलगडायला लागतात. केवळ निरर्थक वटवट करून विचारांचा प्रवर्तक होता येत नसतं. त्यासाठी गात्या गळ्यातला सूर अन् बोलत्या आवाजाचा शब्द होता यावं. अंगीकृत कार्यात कृतीची प्रयोजने पेरता आली की, कर्तृत्त्वाचा परिमल परिसरात पसरत राहतो, पहाटेच्या प्रसन्न प्रहरी परसदारी बहरून आलेल्या प्राजक्ताच्या परिमलासारखा. नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment