Badal | बदल

By // No comments:
काफ्का या जर्मन विचारवंताचं एक वाक्य वाचनात आलं. ‘जर तुम्हाला जगातून वाईट माणसं संपावीत असं वाटत असेल तर, आज स्वतःला बदलून बघा; तुम्हाला लक्षात येईल की, उद्याच एक वाईट व्यक्ती या जगातून कमी झाली असेल.’ खरंतर किती साधासाच विचार त्यांनी व्यक्त केला आहे. काय अवघड आहे, त्यांच्या या विधानातील अपेक्षेप्रमाणे आपल्यात बदल घडवून आणायला? पण कधीकधी साध्याशाच गोष्टी आचरणात आणायला अतिशय अवघड असतात. यातही आणखी अवघडातील अवघड बाब म्हणजे, स्वतःला बदलणे अथवा बदलवून घेणे.

बदल निसर्गाचा सहजभाव आहे. लाखो वर्षापासून निसर्ग बदलतो आहे. हे बदल कधी लक्षणीय असतील, कधी सावध पावलांनी घडणारे असतील; पण ते घडतच राहतील, ते टाळता येत नाहीत. इहतलावर जीवनयापन करणाऱ्यांना बदलांशी सुसंगत वर्तावेच लागते. बदलांशी जुळवून घेत आपल्याला जगण्याच्या चौकटीत फिट्ट बसवून घ्यावे लागते. बदल नाकारणाऱ्याचे जगणं अवघड होत जाते, हे सर्वश्रुत आहे. कालोपघात टिकून राहण्यासाठी स्वतःला बदलाच्या दिशेने वळवून घ्यावेच लागते. परिस्थितीजन्य बदलाशी जुळवून घेत नाहीत, ते प्रगतीच्या पथावरून चालताना मागे राहतात, हेही तितकेच सत्य आहे. तसं पाहिलं तर माणूसही स्वतःला बदलून घेत प्राप्त परिस्थतीत कालसुसंगत परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करीतच असतो. पण तो बदलतो म्हणजे त्याच्यातले नेमके काय बदलते? तो की त्याचा स्वभाव, की त्याचे वर्तन?

बदल घडणे काळाची अनिवार्यता असेल, तर आपण किती बदललो आहोत, या प्रश्नाचे उत्तर स्वतःच स्वतःला विचारून पाहिल्यास आपण स्वतःपुरता एक समज करून घेत असतो की, आम्हीतर बदललो आहोत, त्यात आणखी काय बदलून घ्यायचे राहिले आहे? बदलून घ्यायचे म्हणजे नेमके कोणते बदल घडवून आणावेत आणि स्वीकारावेत? असाही प्रश्न नकळत आपल्यासमोर उभा राहतो. परिस्थितीसापेक्ष वर्तताना जीवनाचा कायापालट करणारे विधायक ते स्वीकारून; आपल्यातल्या वैगुण्याना विसरणे आणि त्यांच्या जागी वर्धिष्णू विकासाचे स्वप्न अंतर्यामी रुजवणाऱ्या विचारांची प्रतिष्ठापना करणे म्हणजे बदल, असे म्हणणे विसंगत ठरू नये. अर्थात, असे बदल घडून येण्यासाठी काळाला आणखी काही पावले पुढे जायला लागते. तेव्हा कुठे बदलांच्या पाऊलखुणा माणसांच्या जगण्यात दिसतात.

आपल्या वर्तनात, जगण्यात बदल घडला हे पाहायचे तर तो कोठे आणि कसा पाहावा? असा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात बऱ्याचदा डोकावून जातो. आपल्यात घडलेल्या बदलांना पाहायचेच असेल, तर समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर पाहा. त्याच्या डोळ्यात पाहा. आपली प्रतिमा तेथे बदललेली दिसली आणि ती नितळ, निखळ, निर्मळ वगैरे अशी वाटायला लागली की, समजावे आपण सगळेच नाहीत, निदान काहीतरी थोडे बदललो आहोत; पण बहुदा हे पाहणेही अपवादच असते, कारण आपण आपल्या स्वतःपुरते एक वर्तुळ आपल्याभोवती आखून घेतलेले असते. तेथे घडणाऱ्या थोड्याशा हालचालींना परिवर्तन समजण्याचा प्रमाद आपणाकडून घडतो आणि त्यालाच बदल, परिवर्तन वगैरे गोंडस नावांनी संबोधित करून घेतो. आपल्या व्यक्तित्वात कितीतरी सकारात्मक परिवर्तन घडले आहे, असे वाटायला लागते. आपणच आपल्याला वेगळे वाटायला लागतो आणि या मृगजळी आनंदात विसावतो.

बदल, परिवर्तन या शब्दांना त्यांच्यापुरता सुसंगत, कालसंगत, परिस्थितीसापेक्ष अर्थ असतो. त्या अर्थाच्या संबोधांना काही जाणीवचे, काही नेणिवेचे आणखीही इतर पदर असतात. त्यातून त्यांचे अर्थ प्रवाहित होत असतात. या प्रवाहांना सकारात्मक दिशेकडील वळणाकडे वळविता आले, तर जीवनाचे अंगण समृद्ध होते. जगताना संपन्न विचारांचे बहरलेले मळे आम्हांस फुलविता यायला हवेत. ही किमया ज्याला साधली, त्याच्या जीवनाचा वसंत सर्वांगाने बहरून येतो. नानाविध रंगांची उधळण करीत बहरलेला जीवनाचा ऋतू त्याचे जगणे गंधित करतो. हे गंधभारीत जगणं संपन्नतेचे नवे आयाम आपल्या आसपास उभे करते. परिवर्तन जीवनाच्या एकाच एक अंगाने कधीच घडत नसते, ते सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक अशा अनेक बाजूंनी घडत असते. आपण त्या त्या वेळी  कोणत्या परगण्यात उभे आहोत, कोणत्या क्षेत्राचे पथ आक्रमित आहोत, कोणत्या ठिकाणी विसावतो आहोत, यावर आपले बदलणे घडत असते.

आपल्या जगण्याशी निगडित अगदी एकचएक बाजू बदलून व्यक्तित्व परिणत वगैरे झालं आहे, असं सहसा घडत नसतं. समग्र बदलणे अवघड असले, तरी बदलांना थोडातरी सार्वत्रिकतेचा स्पर्श घडणे आवश्यक असते. कालचक्र आपल्याच गतीने चालणार आहे, हे सत्य. पण त्याच्या गतीच्या, प्रगतीच्या काही खुणा आपल्या परिवर्तनात दिसतात का, हे पाहणे घडून येणे आवश्यक असते. परिवर्तनाचे पथ निर्माण करण्यासाठी व्यवधान बनणारे आपल्या समोरील प्रश्न आपणास समजायला हवेत. या प्रश्नांची उत्तरे ज्याला कळतात त्याच्या जीवनाच्या जगण्याच्या वाटा कितीही अवघड असल्यातरी त्यावरून चालण्यासाठी एक अनामिक बळ प्राप्त होते. आशावादी नेत्रात एक नवी चमक निर्माण होऊन, मनात काहीतरी नवे करण्याची उमेद जागी होते. म्हणूनच काल आपण काय होतो, आज काय करीत आहोत आणि उद्या काय करणार आहोत, हे कळणेही स्वतःला बदलून घेण्यासाठी तितकेच महत्त्वाचे ठरते.

माणसांची इहलोकीची यात्रा शेकडो वर्षापासून अनवरत सुरु आहे. खरंतर या वाटचालीतील काहीच वर्षे आपल्या वाट्याला येतात. विश्वाच्या विस्तीर्ण कालपटावरून आपल्या आयुष्याकडे पाहिल्यास या अफाट पसाऱ्यात फक्त बिंदूमात्र अस्तित्वच आपल्या वाट्याचे असल्याचे आपणास दिसते. एवढं नाममात्र अस्तित्व असूनही आपणच आपला अभिमान वगैरे करावा, असे किती क्षण नियतीने आपल्या ललाटी अंकित केलेले असतात? आणि असलेच तर अगदी फार थोडेच; पण एवढं कळत असूनही आपण हे सहज मान्य करतो का? बहुदा नाहीच. कारण कणभर काम करून मणभर श्रेय घ्यायची आपल्या मनाची आसक्ती काही केल्या कमी होत नाही. स्वतःभोवती नवनवी मखरे मांडून आपण त्यांची आरास करतो. त्याला नानारंगांनी रंगवून आरती करवून घेण्यात धन्यता मानतो. स्वमान्य आणि स्वधन्य होण्यात असे कोणते शहाणपण सामावले आहे?

माणूस म्हणून कोण कसा असतो, हे सांगणे तसे अवघड असते. आणि माणूस जसा दिसतो तसाच असतो अथवा असावा, असेही काही नाही. माणूस आणि परिसर समजून घेताना, प्रारंभी आपल्या पूर्वग्रहदूषित विचारांत आणि नजरेत बदल घडणे आवश्यक असते. आपल्या नजरेचा थोडासा कोन बदलून पाहिले म्हणजे कळते, आपल्या आसपास अशी कितीतरी विचारी माणसे असतील, जे आपल्याभोवती कोणतीही आरास न करता, कोणत्याही मखरात न बसता आणि प्रसिद्धीचा कोणताही मळवट ललाटी न भरता आपापलं काम प्रामाणिकपणे करीत असतील. परिस्थितीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलून; समाजाला विधायक दिशेने नेण्यासाठी प्रयत्नरत असतील. अशी माणसंच समाजाचं खरं संचित असतात. समाजाला विधायकतेच्या शिखरांवर नेणारे पथ निर्मिणारे माणसं समाजाच्या सार्वत्रिक जगण्याचे, असण्याचे सुंदर स्वप्न असतात. आम्ही बदललो आहोत म्हणून प्रचाराचे कोणतेही ढोल न बडविता, समोरील परिस्थितीजन्य बदलांना अंगिकारून परिवर्तनाच्या गंगेचा प्रवाह सर्वसामान्यांच्या दारी पोहचवण्याचे कार्य अहर्निश करीत असतात. इतरांचं जगणं सुंदर व्हावं म्हणून आपल्याकडील सारंकाही पणाला लावण्याची तयारी असणारेच, बदलांचे खरे हिरो असतात. तेच समाजाचे खरे आयडॉल असतात.

कणभर सुखासाठी मणभर कष्ट उपसायची मानसिकता सोबत घेऊन माणसं उभी राहतात. जगण्याचे संघर्ष समजून घेत परिस्थितीशी दोन हात करतात. प्रसंगी थोडी परिस्थितीसापेक्ष लवचिकता दाखवितात. पण आपण बदलत्या काळाकडून किती आणि कसे बदल स्वीकारले? हा प्रश्न स्वतःला विचारायला सोयिस्कर विसरतात. बदलायचं म्हणजे नेमकं काय करायला हवं? काय केल्याने बदल घडून येतील? असे प्रश्न स्वाभाविकपणे मनात उदित होतात. तशी आपण बहुतेक सारी साधीसुधी, सरळमार्गी माणसं, माणूसपणाच्या साऱ्या मर्यादा आणि त्रुटी असणारी, तरीही मनात एक चांगुलपणाचा स्पर्श असणारी. प्रत्येकात स्नेह शोधणारे. जिकडे स्नेह असेल तिकडे नवे नाते निर्माण करणारे. तरल नात्यांचा गंध सोबतीला घेऊन जीवनाचे सायासप्रयास आनंदाने स्वीकारणारे. एवढं सारं संचित नियतीने  आपणाकडे दिलेले असताना; मुळात बदलून घेण्यासाठी या व्यतिरिक्त आणखी काही असण्याची आवश्यकता आहे, असे वाटत नाही. फक्त आमच्या विचारांवर आमची ठाम श्रद्धा असली तरी पुरेसे असते.

आपल्या अंतःकरणात भक्ती धारण करून जगण्याची वाट चालत जीवनाची सुंदरता शोधताना इतरांच्या चेहऱ्यावर समाधानाचे प्रसन्न हास्य कसे निर्माण करता येईल, हा विचार करून वर्तणारी माणसं मनाची मंदिरे होतात. त्यांची मने आभाळाचे विस्तीर्ण पट होतात. त्यांच्या मनात आकांक्षांची असंख्य नक्षत्रे उदित होतात. आपल्या तेजाने तळपताना ते दिसतात. आपल्या आसपासच्या आसमंतातल्या अंधाराला दूर सारणारे दिवे होतात, त्या दिव्यांचा पसरलेला प्रसन्न प्रकाश म्हणजे बदल. जगातला सारा अंधार आपणास दूर करता येणार नाही; पण ओंजळभर उजेड एक अंधारा कोपरा उजळवू शकतो. तो कोपरा उजळण्याआधी मनाचा गाभारा भारावलेपण सोबत घेऊन भरून यायला नको का? अशा भारावलेपणाने ओथंबून झरणारे मन म्हणजे बदल. बदल घडवून आणण्याची पहिली अट असते, आपल्यातील अहंकाराचा त्याग घडणे. ज्यांच्या मनातील अहंकार गळून पडला आहे, ती माणसे सत्य, सुंदर आणि मांगल्याचे पथ निर्माण करू शकतात. जीवन विरक्तीत नसते, ते आसक्तीत असते. आसक्तीला सकारात्मक परिवर्तनाच्या पैलूंनी मंडित केले, तर बदलांसाठी अन्य दुसऱ्या कोणत्या क्षितिजाकडे पाहण्याची आवश्यकता उरत नाही.

माणसांची मने विकारांची घरे असतात, हे नाकारून पुढेही जाता येत नाही. विकारांवर विवेकाने विजय संपादित करणे, म्हणजे बदल. जगाच्या विस्तीर्ण पटावर स्वतःच स्वतःला तपासून पाहिलेतर अद्यापही आपणास कितीतरी बदलायचे बाकी असल्याचे राहिलेले दिसेल. जगात अज्ञान आहे, अन्याय आहे, अविचार आहे, तसा अविवेकही आहेच. हे सारंसारं दिसत असूनही आपणास हे बदलण्यासाठी काही करता यायला नको का? आपण म्हणतो माझ्या एकट्याने असा कोणता बदल सामाजिक परिस्थितीत घडून येणार आहे? पण सगळेच असा विचार करून वर्तायला लागले, तर परिस्थतीत बदल घडतीलच कसे?

कोणताही देश सोने, चांदी, डॉलरनी मोठा होत नसतो. मोठेपण आपल्या अंतर्यामी घेऊन समर्पण भावनेने वर्तणाऱ्या माणसांमुळे देश मोठा होत असतो. देशाचं, देशातील माणसाचं मोठेपण आणखी मोठे करू पाहणारा सत्प्रेरित विचार अंगिकारून संवेदनशील मनाने वर्तणारी माणसंच देशाची अनमोल संपत्ती असतात, अशी माणसंच देशाचं भविष्य आकारास आणत असतात. माणसे देशाला घडवतात; पण माणसांना घडवण्यासाठी व्यवस्था उभी करावी लागते. सत्प्रेरित विचारांचे परगणे निर्माण करावे लागतात. जाणीवपूर्वक त्यांचे संवर्धन करावे लागते. येथे पोहोचणारे रस्ते तयार करावे लागतात. या प्रदेशांमध्ये प्रवास करणारे पथिक परिवर्तनाचे प्रेषित ठरतात.

खरंतर आपण बदललो काय किंवा नाही बदललो काय; त्याच्याने असे काय घडणार आहे, असे म्हणून बदलांना नाकारून माणसांचे जगणे प्रगल्भ, परिणत वगैरे होत नसते. नियतीने जगण्याची कोणतीही सुखं ओंजळीत ओतलेली नसताना, आपल्या दैन्याला आपली श्रीमंती मानून जगणारी आणि सश्रद्ध अंतःकरणाने आपले प्राक्तन बदलवू पाहणारी अतिशय साधी माणसं आपल्या छोट्याशा फाटक्या संसाराला सांभाळीत; सृष्टीचा संभार सुंदर करण्यासाठी समोर सरसावतात, उभी राहतात; तेव्हा त्यांचं जगणं सुंदराचा सोहळा होतो. सहजपणाच्या गंधाने माखलेला त्यांचा वर्तमान उज्ज्वल भविष्याची नांदी ठरतो.

जगात नानाविध वृत्तीप्रवृत्ती धारण करून वावरणारी, वागणारी असंख्य माणसं आहेत. त्यातील सारेच सद्गुणांचे सोहळे साजरे करणारे आणि विश्वाला सुंदर करू पाहणाऱ्या विचारांचा अंगिकार करणारे असतील, असेही नसते. समाजात चार माणसे वाईट असले, म्हणून सगळा समाजच काही तसा नसतो. वाईट माणसांना बदलवणे कदाचित अवघड असेलही; पण अशक्यही नाही. या माणसांमध्ये बदल घडतील तेव्हा घडतील; पण आपण आपल्यापुरते आज बदलून घेतले तर... जगातील एक वाईट माणूस कमी झालेला असेल, हे काफ्काचे म्हणणे खरे नाही का? याकरिता बदलांच्या पथावर पुढे पडणारे पहिले पाऊल माझे असेल, असे आपणास का वाटू नये? परिवर्तनाचा प्रारंभ प्रगतीच्या दिशेने जाणाऱ्या पथावरून चालण्यासाठी उचललेल्या पहिल्या पावलापासून होतो. हेही खरे नाही का?   

Naati | नाती

By // 4 comments:
एप्रिल महिन्यातला एक शनिवार, अर्धाच दिवस शाळा असल्याने घरी जरा लवकरच आलो. म्हणजे शाळेत किंवा मधल्या रिकाम्या वेळात चहाच्या दुकानावर थांबून इकडच्या तिकडच्या विषयावर चकाट्या पिटण्याची कामे नसल्याने (निदान त्या दिवसापुरते तरी) घराच्या उंबऱ्याला पाय लवकर लागले, एवढेच. नाहीतरी शाळेच्या वार्षिक परीक्षा संपल्याने उत्तरपत्रिका तपासताना चकाट्या हाणण्यात, हसण्यात आणि कोट्या करण्यात दिवस कसा आनंदाने निरोप घेतो, ते कळतही नाही. (यालाच म्हणतात सुख!) म्हणूनच की काय असेल, आम्हा शिक्षकांविषयी बरेच जण सहजपणे बोलून जातात, ‘तुमचं काय बुवा, नुसती मज्जा! सुट्या तुमच्या पाचवीलाच पुजलेल्या असतात. नशीबवान आहात.’ इत्यादी इत्यादी. मजा या शब्दाचा अर्थ अर्थातच सोयिस्कर असाच असतो; पण मजा म्हणजे नेमकं काय असतं? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळायचे आहे. (पसंद अपनी अपनी, असे असावे) तर असे मज्जेत दिवस पुढे-पुढे पळतायेत अन् आम्ही त्यांच्यासोबत. (असतं एकेकाचं नशीब, नाही का!)

तर सांगायचा मुद्दा असा की, घरी आलो. विसावलो थोडा निवांत. शेजारीच चिरंजीवांचा मोबाईल, लॅपटॉप, संगणक इत्यादी विज्ञानप्रणीत साधनांसोबत सुखसंवाद चाललेला. शेजारीच दोन पुस्तके इकडे, तीन वह्या तिकडे आणि लेखन साहित्य भलतीकडे, असा पसारा पसरलेला. (स्वच्छता अभियानाचा आमच्यापुरता पराभव!) संगणकाच्या कीबोर्डावर त्याची बोटं आदळतायेत. स्क्रीनवरची दृष्ये झपाट्याने बदलत आहेत. सोबतच मोबाईलवर काय अपडेट्स येतायेत याकडेही लक्ष. यालाच कदाचित अष्टावधानी वगैरे, असं काहीतरी म्हणत असावेत. बसलो त्याच्याशेजारी येऊन थोडा. काय करतायेत चिरंजीव म्हणून विचारले, तर नेहमीचं ठरलेलं उत्तर, ‘प्रोग्रामिंगचं, प्रोजेक्टचं काम चाललं आहे.’ (प्रोग्रामिंग, प्रोजेक्ट नावाचे भारदस्त शब्द ऐकून अंतःकरण कसं भरून येतं, कारण आमच्याकाळी असं काहीच नव्हतं ना! म्हणून.) आता एवढे भारदस्त शब्द अंगावर फेकून मारल्यावर संगणकाशी अपरिचित, अल्पपरिचित माणूस दचकेलच ना! तरीही हिम्मत करून विचारावं पुढचं काहीतरी की, याचं ठरलेलं किंवा आधीच ठरवून घेतलेलं उत्तर, ‘अहो पप्पा, आम्हा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आणि तेही संगणकशाखेच्या, यांच्याशिवाय कसे चालेल? हेच तर आमचं शिकणं.’ हो, नाहीच चालणार, म्हणून आपणच आपली समजूत काढावी. नाहीतरी आपलं संगणकाचं ज्ञान म्हणजे त्यांच्यासाठी ज्युनियर केजी वर्गात असण्याएवढंच असतं.

माझं संपादित केलेलं असेल नसेल तेवढे ज्ञान आठवून त्याच्याकडे कुतूहलमिश्रित नजरेने पाहत राहिलो. त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीतील वाटचालीविषयी एक अनामिक आनंद (पापा कहते है बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा! वगैरे प्रकारातलं.) आणि उज्ज्वल भविष्याची एक सुखसंवेदना (ही आपणच आपली तयार करून घ्यावी, कारण अज्ञानातले सुख मोठे असते.) माझ्या मनात. त्याला अर्थात याच्याशी बहुदा देणंघेणं नसावं. तो त्याच्या आभासी जगात पुन्हा लीलया संचार करण्यात रममाण. मला तर भारी कौतुक वाटते, या पिढीतील मुलामुलींचे, केवढी एकाग्रता असते यांच्यात. एकाचवेळी अनेक कामांमध्ये कशी काय यांची ब्रह्मानंदी टाळी लागते कोण जाणे! शेजारी आईबाबा बसले आहेत, त्यांच्याशी बोलावं थोडंसं, असंच इकडचं तिकडचं. सांगावं त्यांना मनातलं काही साठवलेलं. असतील कुठली स्वप्ने डोळ्यात गोठवलेली. असतील भिरभिरत कुठली पाखरे मनात, तर द्यावं त्यांना संवादाचं मुक्त आकाश विहारायला. करावी थोडी चिवचिव अर्थासह अथवा अर्थहीन, संदर्भासह किंवा संदर्भांशिवाय; पण नाहीच हे शक्य, कारण संगणक आणि मोबाईल माझा सखा-सोबती, हे यांच्या जगण्याचं चिरंजीव तत्वज्ञान. स्क्रीनवरचं जग हेच आपलं जग, अशी स्वतःची समजूत करून घेतलेली. व्हर्च्युअल जगात विहार करताना अॅक्च्युअल जगाचा विसर पडत चाललाय, त्यालातरी कोण काय करणार. काळाचा महिमा म्हणून पाहत राहून त्यातच आनंद शोधावा, हेच बरं. शब्दाविना संवादाचं बऱ्याचदा एकमार्गी आणि भावनांचा ओलावा नसणारं शुष्क जग त्यांच्या मनात विज्ञानतंत्रज्ञानानेनिर्मित साधनांनी कधीच तयार केलेलं आहे.

संवाद माणसांची सार्वकालिक गरज; पण तोच हळूहळू हरवत चाललाय की काय, अशी शंका येण्याइतपत बदल माणसांच्या वागण्यात घडून आले आहेत. काही वर्षापूर्वीच्या आमच्या पिढीचं जगणंच समाजाच्या संवादाशी जुळलेलं असायचं. आभासी साधनं सोबतीला नसल्याने माणसांशी अखंड संवाद सुरु असायचा. समवयस्कांतील संवाद कळत न कळत मनांना समाजपरायणतेच्या दिशेने नेत असत. धावणं, पळणं, खेळणं सगळंच कुठल्यातरी संवादांना सोबत घेऊन असायचं. उन्हाळ्यात शेतात फारशी काही कामं नसल्याने दुपारच्या निवांतवेळी घरातील मोठी माणसं सोप्यात, ओट्यावर, अंगणातील झाडाखाली डुलकी घेत पडलेली असायची. मुलांना उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने मस्ती करायला मुक्त अंगण मिळालेलं असायचं. खेळातील गोंधळ शिखरावर पोहचायचा. दंगामस्तीने त्यांची झोपमोड झाली की, पाठीत दोन धपाटे दणकून बसायचे. घातलेल्या गोंधळाचे हे पारितोषिक असायचे. घरात गर्दी होऊन आईला घरकाम करणं अवघड झालं की, हातात झाडू घेऊन मारण्यासाठी पाठीमागे धावणं, नसेल झाडू आसपास, तर खेटर हातात घेऊन फेकून मारणं, यात कोणालाही वावगं वाटत नसायचं. यामुळे कोलाहल फारतर थोडा पुढच्या जागी सरकायचा एवढंच. मार खाऊनही आमचे पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. कोलाहलाला सुमारच नसायचा. आपल्यापरीने तोही संवादाच असायचा. त्यात भांडणं, समजावणं, राग येणं, राग आला म्हणून पुन्हा समजावणं सुरु असायचं.

घरं पोराबाळांनी गजबजलेली असायची. काकाची, मामाची, मावशीची, आत्याची सगळीचं भावंड सुटीची एकत्र आलेली असायची. घराला त्यांच्या धिंगाण्याने चैतन्य लाभायचं, घरपण यायचं. संसाराचा हा मांडवभर पसरलेला वेल पाहून आजीच्या डोळ्यांमध्ये अनामिक सुखाची झाक दिसायची. आजोबांच्या सुरकुत्या पडलेल्या हाताचा पाठीवर होणारा स्पर्श संवादांना गहिरा रंग द्यायचा. घरातील मोठी ताई कुठल्या ना कुठल्या कारणाने आईबाबांना सांगेन, म्हणून धमकावत रहायची. पण बाबांचा मार पडल्यावर तिचं समजावणं, मायेने बोलणं वात्सल्याचा पोत घेऊन प्रकाटायचं. वहिनीच्या प्रेमळशब्दांना आणि ममतेने माखलेल्या प्रासादिक सहवासाला सगळ्या प्रेमळ नात्यांचा ओलावा आलेला असायचा. पण दुर्दैवाने नात्यातला हा ओलावा ओसरत चालला आहे. त्यातील ओथंबलेपण आटत चालले आहे. नितळ स्नेहाचे संदर्भ बदलत आहेत. भरलेल्या घरातलं गोकुळ हरवत चाललं आहे.

गावातल्या माणसं-बायांना काका, मामा, मावशी, आत्या बनवून निर्माण केलेली, मानलेली नाती प्रत्यक्षातल्या नात्याहून अधिक काहीतरी असायची. अडीनडीला कोणताही अभिनिवेश न धरता धावून यायची. या नात्यातील स्नेहाची परिभाषा भलेही करता येत नसेल; पण त्यांचा सहवास अनुभवताना नाती काय असतात आणि कशी सांभाळायची असतात, ते समजायचे. नाती कोणतीही असू द्यात, ती रक्ताची असोत, नाहीतर मैत्रीची; त्यांना स्नेहनिर्मित भावनिक ओलाव्याचा स्पर्श असायला लागतो. त्यांचं स्वतःचं अंगभूत मोल असतं. ती लादून कधीच निर्माण करता येत नाहीत. रक्ताची नाती निसर्गदत्त असल्याने भलेही ती निवडता येत नसतील, पण प्रेमाची नाती सहवासातून निर्माण होतात. त्यांचा रंगच वेगळा असतो. कारण त्यात एक जास्तीचा रंग मिसळलेला असतो- अंतरंगाचा. मैत्रीच्या नात्यातील गहिरे रंग असणारा कृष्ण-सुदामा हा शब्द नुसताच मैत्रीवाचक अर्थाचा द्वंद्व समास नसतो. तो मैत्रीची परिभाषा करण्यापुरता सीमित राहत नाही. परिस्थितीचे सारे संदर्भ सोडून मैत्रीच्या धाग्यांनी बांधलेलं, हे नातं संवादाची परिसीमा ठरतं.

नात्यांची अशी घट्ट वीण असणारी उदाहरणे आजही आहेत, नाही असे नाही. त्यांचे रेशीमबंधही तसेच बांधलेले आहेत. पण हे सगळं दुर्मिळ होत चाललं आहे. स्वार्थपूरित जगण्यातील बदलणाऱ्या विचाराने त्यांनाही नवे आयाम दिले आहेत. विज्ञानाने जग सुखी झालं का? या प्रश्नाचं उत्तर काहीही असो; पण काळाने माणसांना बदलांच्या वाटेने वेगळ्या वळणावर आणून उभे केले आहे. जगण्याचे संदर्भ बदललेत, तशा माणसांच्या नात्यातील प्रवासाच्या वाटाही बदलत आहेत. नात्यांचे पीळ सैल होत चालले आहेत. एकीकडे प्रगतीतून नव्यानव्या साधनांशी मैत्री होत आहे, पण निर्व्याज सहवासाचे सहज सुख कळत-नकळत हरवत आहे. नाती जपण्यासाठी केविलवाणी धडपड चालली आहे. दुरावणारी नाती सांभाळण्यासाठी माणसं धडपड करताना आणि ती तुटली म्हणून कासावीस होताना दिसत आहेत. आपापसातला संघर्ष नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतोय. प्रसंगी चार पावले मागे येत नाती सांभाळीत माणसे टिकवून ठेवण्याचा काळ खूपच मागे राहिला आहे. माणसं भौतिक सुखांवर स्वार होऊन पुढे निघून आली आहेत.

अधूनमधून नात्यातील दुराव्यातून घडणाऱ्या अघटित घटनांच्या वार्ता आपण ऐकतो. नात्यांमधील स्नेह अचानक संपून अविचाराने घडणारे वर्तनही पाहतो. पतीपत्नी हे एक तरल नातं. या नात्याचा पोतच वेगळा. मनातील चौकटींच्या बिंदूना प्रेमाने जोडणारे. सहवासातून निर्माण होणारा विश्वास, हा त्याचा पाया; पण कोणत्यातरी अवचितक्षणी त्यात संशय येतो आणि संशयाने या नात्यांच्या चौकटी दुभांगतात. वर्षानुवर्षे एकत्र राहणारी मने दुरावतात. इगो मोठे होत जातात आणि जुळलेली नाती तुटतात. पतीपत्नीच नाही, तर या नात्यांचे हात धरून आलेली दोन घरातील इतर नातीही डहाळीवरून वेगळ्या केलेल्या फुलाप्रमाणे कोमेजून जातात. तर कधी शरीरात रक्त बनून वाहणारं आईबाप नावाचं नातं वैयक्तिक स्वार्थापायी कोणाला ओझं वाटायला लागतं. मग हे थकलेलं ओझं देवाला आणि दैवाला दोष देत कुठल्यातरी वृद्धाश्रमाच्या आश्रयाला जाऊन, डोळ्यातून आसवं ढाळीत विसावतं. तेही नसेल नशिबात, तर वाट्यास आलेला देह विसर्जित करता येत नाही, म्हणून रस्त्यावर हात पसरून याचना करीत वणवण भटकत असते, परिस्थितीच्या धक्क्यांना धडाका देत. समाजात हे चित्र दिसतं तेव्हा सहृदय माणसाचा नाते संकल्पनेवरील विश्वास उडायला लागतो. आईबाप नावाचं नातं धारण करणारं अनुभवाचं अफाट आकाश अशावेळी रितं-रितं वाटायला लागतं. आईबाबांना परमदैवत म्हणणारी आणि श्रावणबाळाची गोष्ट सांगणारी संस्कृती हीच का, म्हणून संवेदनशील मनात संदेह निर्माण होतो. ‘भूता परस्परे पडो मैत्र जिवांचे’ म्हणणारी, प्राणीमात्रांवर प्रेम करून त्यांच्याशी आस्थेचे नाते निर्माण करायला सांगणारी संस्कृती अशावेळी पराभूत होऊन शरणागतासारखी उभी असलेली दिसते. नाती कोणतीही असू द्यात, ती जाणीवपूर्वक जपावी लागतात. त्यांना टिकवण्यासाठी स्वतःचं मोठेपण विसरून समर्पित करायला लागते. समर्पणाशिवाय स्नेहाचा ओलावा निर्माण होत नाही. या ओलाव्याने बहरलेले नात्यांचे झाड कायम हिरवंगार असावं, म्हणून ओलाव्याच्या शोधात त्याची मुळं खोलवर जातील, तेव्हाच परिस्थितीच्या वादळवाऱ्याशी संघर्ष करीत टिकून राहील.