अपवाद

By // 4 comments:
प्रगतीच्या परिभाषा गुणवत्तेच्या परिमाणांनी पाहता यायला हव्यात. अर्थात, आपल्याला अवगत असणाऱ्या कौशल्यांचं सार्थ आकलन असल्याशिवाय आपली पात्रता आकळत नाही. आपण कोण, हे कळायलाही पात्रता असायला लागते. पात्रता पर्याप्त पर्यायांमध्ये पहावी लागते. पर्यायांचं सम्यक आकलन होण्यास आपला आसपास आधी आकळणे आवश्यक असतं. त्याचे अर्थ अवगत करून घ्यावे लागतात. आसपासचं नांदतेपण समजून घेण्यासाठी अंतरीचा ओलावा वाहता असावा लागतो. तो साकळता यावा म्हणून ओंजळी रित्या असाव्या लागतात. पण विचारातच करंटेपणा कोरला असेल, तर ओंजळी कशा भराव्या? आव आणून साव नाही होता येत. लोकांना सावरण्याइतका संयम अन् सोज्वळ विचार अंतरी नांदते असल्याशिवाय व्यवस्थेने कोरलेल्या चौकटी सुंदर नाही करता येत. 

आपण कोण? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अख्खी हयात वेचण्याची अन् सगळं आयुष्य वाचण्याची तयारी असायला लागते. असं असलं म्हणून त्याची सगळी उत्तरे हाती लागतीलच असंही नाही. प्रामाणिकपणाचं पाथेय पदरी पडलेलं असेल, तर बेईमानीच्या बेगडी सुखांची चमक फिकी पडते. पणती पावलापुरता प्रकाश पेरते हे खरेच; ती अवघ्या अंधाराचा वेध नाही घेऊ शकत, हेही वास्तवच. पण सत्य तर हेही आहे की, आस्थेचा कोरभर उजेड अंतरी नांदता असला की, पणतीने पेरलेला ओंजळभर प्रकाश पावलांना आश्वस्त करतो. परिस्थितीचं सम्यक आकलन नेणिवेच्या अंधाऱ्या कोपऱ्यात आशेचे कवडसे कोरते. अंधाराच्या पटलावर काजव्याचं चमचमणं देखणं वगैरे दिसत असलं, तरी त्याला सगळा आसमंत नाही उजळून टाकता येत. ती त्याची मर्यादा आहे. एवढं कळणंही आपला वकूब ओळखण्यासाठी पर्याप्त असतं. विस्तवाने पेरलेल्या प्रकाशाची प्रखरता पाहून कळत असली, तरी त्याची धग उमजण्यासाठी निखारे अनुभवायला लागतात. अवतीभवती नांदणारे परिस्थितीचे वणवे संवेदनशील मनांना नाही विसरता येत. व्यवधानांकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष करणं जगण्यात सामावलेली विसंगती असते. परिस्थितीने पेटवले वणवे वळवण्याचा वकूब असला की, विसंगतीतूनही संगतीची सुसंगत सूत्रे शोधता येतात. 

प्राक्तन वगैरे गोष्टी असतील अथवा नसतील, पण प्रयत्न असतात. त्याचे पथ धरून पावलांना प्रवास करता आला की, परिमित पर्यायांत प्रमुदित राहता येतं. लाचारीचा रंग जगण्यावर चढला की, इंद्रधनुष्याचे रंग विस्मरणात जातात अन् माखून घेतलेला रंग अधिक गहिरा होत जातो. मुखवटे देखणे वाटायला लागले की, चेहरे विस्मरणात जातात. मन गढूळलं की जगण्यातलं नितळपण निरोप घेतं. विलोभनीय विभ्रमांनी संमोहित करणाऱ्या निसर्गातील रंगांचं अप्रूप उरत नाही. कारण लाचारीचा रंग एकदाका आयुष्यावर लागला की, विचारांचं रंगात न्हाऊन निघणं थांबतं. जगणं समृद्ध करू पाहणारी विचारविलसिते परिघ हरवतात अन् विकारांची वर्तुळे भक्कम होत राहतात. विचारांनी विस्मरणाचा रंग धारण केला की, मेंदू बधिर होतो अन् मन सैरभैर. मनगट खड्गाचं धारदार पातं पेलण्याऐवजी पुढ्यात पसरवण्यात धन्यता मानतं. लक्तरांना प्रावरणे समजून मिरवणारे एक विसरतात की, याचक बनून पुढ्यात पसरवलेल्या हातांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेले हात अधिक देखणे असतात, भलेही त्यावर मातीचे थर चढले असतील. विचारांनी लाचारीची वसने परिधान केली की, विवेक आपलं विश्व हरवतो. अविवेकाच्या इमल्यांना सांभाळणाऱ्यांच्या महाली आत्मसन्मान गहाण पडला की, आयुष्याचे अर्थपूर्ण असणे उसवते. आशाळभूतपणे कुणाच्या पुढ्यात उभं असलेलं अधोमुख वदन आपल्याला कणा असल्याचे आठवू देत नाही.

याचा अर्थ असाही नाही की, परिस्थितीचं सम्यक आकलन असणारी आणि स्थिती-गतीचं रास्त भान असणारी माणसं नसतात. ती सर्वकाळी, सर्वस्थळी असतात, फक्त त्यांना पाहता यायला हवं. नसतील सहज दिसत, तर शोधता यायला हवं. शोधूनही नसतील सापडत, तर आपणच त्याचा विकल्प व्हावं. व्यवस्थेचे ताणेबाणे झेलून आपला बाणा जपणारी माणसं शोधण्यासाठी कणा सलामत असणारी माणसे आसपास असायला लागतात, भलेही ती नगण्य असतील. ती संख्येने अधिक होत नाहीत, तोपर्यंत प्रयासांच्या परिभाषांना पूर्णविराम नाही देता येत. 

अविचारांच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा घडतच राहतात. हे भ्रमण अज्ञानाने असेल किंवा अगतिकतेमुळे. कारणे काही असोत, त्याभोवती प्रदक्षिणा करणाऱ्यांची वानवा कधीच नसते अन् संख्याही दुर्लक्षिण्यासारखी. हे अप्रिय पण सत्य आहे. विश्वाच्या वर्तुळात वसलेल्या कोणत्याही परगण्यात वर्तनव्यवहारांबाबत प्रवाद शोधलेच तर अगणित गवसतील, वादही विपुल असतात. हे असं काही असलं तरी अपवादही असतातच. वाद, विसंवाद वितंडवाद असणं जेवढं स्वाभाविक, तसं अपवाद असणंही सहज आहे. अपवाद संवाद सकारात्मक दिशेने सरकण्याचं सम्यक कारण असू शकतात. ते आहेत म्हणून प्रयासांच्या परिभाषा परत परत पेरता येतात. आशेचे अंकुर अगत्याने जोपासता येतात. पेरलेलं उगवतं, पण सोबत तणकटही दणकून येतं. अविचारांचं तण वेळीच वेगळं करावं लागतं अन्यथा पिकाच्या आयुष्याचे अर्थ हरवतात अन् उरतात निरर्थक अवशेष, जे कुठलेच अन्वयार्थ शेष राहू देत नाहीत. विकल्पांचं तण वेगळं करण्यासाठी विचार जागे असायला लागतात. विचारविश्व समृद्ध करण्यासाठी संवेदनांचे किनारे धरून वाहता यायला हवं. प्रवाहासोबत वाहणारे अगणित असतात. प्रवाहाच्या विरोधात पोहणारेही असतात; पण प्रवाहांना अपेक्षित दिशेने वळते करणे सगळ्यांनाच अवगत असतं असं नाही. जगण्यात सत्त्व असलं की, स्वत्वाचे अन्वयार्थ आकळतात. स्वत्व सोबत असणारी संवेदनशील मने तत्त्वांची प्रयोजने अधोरेखित करतात, भले ते अपवाद असतील. अपवाद प्रवादांना पर्याय देण्यास पर्याप्त असतात, नाही का?
•• 

नदीष्ट

By // 2 comments:
संवेदनांचे किनारे धरून वाहणारी स्मृतीची सुमने: नदीष्ट

‘नदी’ या एका शब्दात इहतली नांदणाऱ्या जिवांच्या आयुष्याचे सगळे अर्थ सामावलेले आहेत. संस्कृतीचे संदर्भ साकळले आहेत. परंपरांचं संचित साठलेलं आहे. नदीचा प्रवाह केवळ पाणी घेऊन वाहत नसतो. इहतली अधिवास करणाऱ्या जिवांच्या अस्तित्वाचे प्रश्नही त्यासोबत सरकत असतात. तिच्या असण्यात त्यांच्या अस्तित्वाचे अंश विसावले असतात. तिच्या असण्यासोबत त्यांचं नांदणं असतं. किती वर्षे झाली असतील, किती ऋतू आले अन् गेले असतील, परिवर्तनाचे किती तुकडे तिच्या अथांगपणात सामावले असतील, काळाचे किती विभ्रम पाहिले असतील तिने, माहीत नाही. पण सगळं सगळं सोबत घेऊन ती वाहत राहते पुढे, आपलं असं काही शोधत. तिच्या अफाट, अमर्याद असण्याला समजून घेताना हातून काहीतरी निसटतेच. अर्थात, ही माणसांची मर्यादा आहे अन् तिच्या अथांग असण्याचं तात्पर्य. माणसाच्या जगण्याचा इतिहास तिच्या भूगोलात सामावलेला आहे.

किनारे धरून वाहणारा प्रवाह केवळ पाणी नसतं. प्रदेशाची संस्कृती आणि तेथे अधिवास करणाऱ्या लोकांच्या सुसंस्कृतपणाला घेऊन ते वाहतं. तिच्या परगण्यात नांदणाऱ्या माणसांच्या इच्छा आकांक्षा, अहं, अगतिकता अशा किती गोष्टी तिच्या ओंजळभर पाण्यात साकळलेल्या असतात. तिच्या सानिध्यात आपणच आपल्याला नव्याने गवसतो, तर तिच्या कोपाने अनेकांची आयुष्ये करपून जातात. तिच्या वाहत्या पाण्यासोबत पुढे सरकता आलं की, गती-प्रगतीचे अर्थ आवाक्यात येतात. तिचं असणं-नसणं म्हणूनच अनेक संदर्भांचं उगमस्थान असतं, असं म्हटल्यास असंयुक्तिक ठरू नये. लेखकही याच नजरेने नदीकडे पाहतो. नदीचं उसवत जाणं अन् माणसाचं विखरत जाणं अधोरेखित करतांना कादंबरीच्या आरंभी लेखक लिहितो, 'आपण नदीपासून दुरावत गेलो की, आपलं उदात्तपणही हिरावून गेलं. माणसाच्या जगण्यातला निसर्गदत्त आणि निसर्गरूप विचार एवढीच सरळसोट असलेली संस्कृतीची व्याख्या आपण सोयीनुसार बदलून टाकली आणि संस्कृतीच्या नावाखाली वाटेल ते लादण्यास सुरवात केली. विकास या शब्दाखाली सारेच निभावून नेण्याचा प्रयत्न केला.' 

'नदीष्ट' ही मनोज बोरगावकर यांची कादंबरी केवळ नदीचे किनारे पकडून अन् प्रवाहाचे हात धरून जगणाऱ्या लेखकाच्या मनातील संवेदनांचा प्रवास नसून तिच्या आसपास नांदणाऱ्या घटितांचा शोध आहे. माणसातील माणूस शोधण्याचा अन् त्याच्या अंतरी जाग्या असलेल्या माणूसपणाचा धांडोळा आहे. वाहत्या प्रवाहाइतकेच हे नितळ, निखळ हृद्गत आहे.

नदी केवळ पात्र धरून पुढे सरकणारा पाण्याचा प्रवाह नसतो. वाहत्या प्रवाहासोबत एक संस्कृती अखंड नांदती असते. म्हणूनच की काय, जगात उदयाचली आलेल्या संस्कृती तिच्या विस्तारासोबत विसावल्या, बहरल्या. काळ काही कोणाचा सोयरा नसतो. तो बदलांच्या वाटेने पुढे पळत असतो. काळ बदलला तशी त्याची प्रयोजने बदलली अन् माणसांच्या जगण्याची परिमाणेपण. प्रासंगिकतेचे प्रवाह प्रतिमाने बदलास कारण असतीलही. ते असू नयेत असे नाही. पण नितळपणाने विचारातून विसर्जन केलं की व्यापक असण्याचे अर्थ अवगुंठीत होतात. स्वार्थाच्या परीघांचा विस्तार वाढला तसा ‘नदी’ शब्दाच्या अर्थाचे पात्र संकुचित होत गेले. हे असं गाभ्यातून सुटत जाणं अन् तुटत जाणं कोण्याही संवेदनशील विचारांच्या धन्याला विचलित करण्याशिवाय कसं राहील? लेखकही यास अपवाद नाही, म्हणूनच त्यांना नदीचा गाभा मानिनीच्या गर्भाशयासारखा वाटतो. सर्जनाचा साक्षात्कार वाटतो.

अंतरी नांदणारा पर्याप्तपणा माणसे काळाच्या पटलाआड टाकून आलीत. प्रगतीच्या परिभाषा पुन्हा अधोरेखित झाल्या अन् गतीच्या व्याख्या स्वार्थाच्या सीमांकित परिघाभोवती प्रदक्षिणा करायला लागल्या. माणसातलं माणूसपण आटत जाणाऱ्या प्रवाहासोबत संकुचित होत गेलं. हे हरवलेलं माणूसपण शोधण्याचा प्रयास ‘नदीष्ट’ करते. गोदावरीच्या प्रवाहासोबत वाहणाऱ्या माणसांच्या कहाण्या संवेदनांचा अखंड प्रवाह आहे. लेखक केवळ विरंगुळा म्हणून नदीवर रमलेला नाही, तर तिच्यासोबत आस्थेच्या अनुबंधांनी बांधला गेला आहे. नदीसोबत या ना त्या कारणाने जुळलेल्या माणसांच्या मनाची मनोगते म्हणूनच सहृदयपणे समजून घेतो. त्यांच्या अंतरी अधिवास करणाऱ्या आस्थांचा शोध घेतो. त्यांच्या आयुष्याचे एकेक पदर पकडू पाहतो. नदीच्या परिसरात लेखकाला भेटलेली ही माणसे कोणी तालेवार नाहीत, तर आपलं सामान्यपण सहजपणे सांभाळणारी आहेत. त्यांच्या जगण्याला वेढून असणाऱ्या सुख-दुःखांचा लेखक धांडोळा घेऊ पाहतो. वंचनेच्या विश्वात वास्तव्याला असणारी ही माणसे नियतीचे आघात सहन करीत आपलं माणूसपण अबाधित ठेऊन आहेत. त्यांच्या कातर मनाच्या कंगोऱ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न नदीष्ट आहे. व्यवस्थेने ज्याचं माणूसपण नाकारलं, परिस्थितीने ज्यांच्या जगण्यावर प्रश्नचिन्ह अंकित केलं, नियतीच्या आघाताने अभागी ठरवलं, ती माणसे अंतरीच्या ओलाव्याने समजून घेतो. त्यांच्याशी आपलेपणाने संवाद करतो. संवादातून उलगडत गेलेली एकेक माणसे शब्दांकित करतो. शब्दांना संवेदनांचा साज चढवून त्यांच्या श्रद्धा, आस्था अन् त्यांच्या अंतरी अधिवास करणारं माणूसपण शोधतो. नियतीने त्यांच्या ललाटी लेखांकित केलेले अभिलेख समजू पाहतो. त्यांच्या असण्या-नसण्याचे अन्वयार्थ लावतो. उलगडत गेलेल्या लोकांच्या कहाण्या सांगतो.

गोदावरीचे काठ धरून जगणारी ही माणसे तिच्या पात्रासोबत अनवरत वाहती आहेत. तिच्या ओंजळभर पाण्यात आपल्या आयुष्याचे अर्थ शोधत आहेत. दादाराव, सकिनाबी, भिकाजी, कालुभैय्या अन् त्याची प्रेयसी, पुरभाजी बामनवाड, पुजारी, सगुणा, मालाडी, प्रसाद, पार्वती, इरबा ही आणि आणखी काही पात्रं कादंबरीच्या कथनाचे किनारे धरून वाचकासोबत वाहतात. या प्रत्येकाची जातकुळी वेगळी आणि कहाणी आगळी आहे. वेदनांच्या वाटेवरून घडणारा त्यांचा प्रवास, हा एक त्यांच्यात समान धागा आहे. कदाचित हाच धागा या सगळ्यांना एका सूत्रात बांधायला कारण ठरला असावा. इहतली नांदणाऱ्या जिवांच्या जगण्याला वर्तमान असतो, तसा प्रत्येकाचा आयुष्याला भूतकाळ वेढून असतो. उपेक्षेच्या, वंचनेच्या वर्तुळात विहार करणाऱ्या या सगळ्यांचं जगणं समजून घेण्याचा प्रयत्न लेखक करतो, तसा त्यांचा भूत-वर्तमान जाणून घेण्याचाही.

नदी आणि लेखकात एक अनामिक अनुबंध आहे. दहा वर्षे गोदावरीच्या अंगाखांद्यावर विहरणारं हे नातं आपलेपणाचे आयाम निर्देशित करते. लेखक केवळ ‘मी’ भोवती प्रदक्षिणा नाही करत. व्यक्तीत समष्टी पाहण्याचा त्यांचा प्रयास आहे. उगमाकडून संगमाकडे धावणाऱ्या पाण्याची ओढ कादंबरीच्या कथनाला आहे. शांत जलाशयात भिरकावलेल्या दगडाने एक तरंग उभा राहावा. त्यांचा विस्तार वाढत जावा. किनाऱ्याकडे सरकताना त्याने आणखी परीघ कवेत घ्यावा. एकाला दुसऱ्या वर्तुळाने पकडण्यासाठी पळावे, त्यानेही किनारा गाठावा, तसे एकेक तरंग कथानकाच्या अथांग आशयात आपल्याला सोबत करतात. संयत प्रवाहाने कोणताही आवेश न आणता शांतपणे सरकत राहावे पुढे, आणखी पुढे... अगदी असंच कादंबरीचं कथानक सावकाश सरकत राहतं. पाण्याने गढूळ असावं; पण वाहता वाहता नितळ व्हावं, तशी ही माणसे सुरवातीला थोडी अपारदर्शी वाटत असली, तरी त्यांचा तळ ढवळल्यानंतर निवळत जातात.

कथानकाचे किनारे धरून वाहणारी ही माणसे कधी नियतीच्या, तर कधी परिस्थितीच्या आवर्तात भिरभिरत राहतात. आपणच आपला धांडोळा घेत राहतात. कुठल्यातरी कारणांनी गोदावरीच्या किनाऱ्यावर विसावतात अन् आपणच आपल्याला नव्याने गवसतात. ही सगळी माणसे लेखकाने त्यांच्या अंतरीचे कंगोरे कोरून शब्दांनी सांधली आहेत. संवेदनांनी बांधली आहेत. त्यांच्याशी माणुसकीच्या नात्याने मर्मबंधाच्या गाठी जुळल्या आहेत. कादंबरीतल्या लहानमोठ्या घटना, प्रसंग वाचकाला अंतर्मुख करतात. आपणच आपलं माणूसपण शोधण्यास प्रेरित करतात. माणसांकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन नकळत अंतरी रुजवून जातात.

लेखकाला पोहण्याचे पाढे शिकवणारे दादाराव नदीवर पोहताना केवळ किनारे पार करण्याचे साहस बांधत नाहीत, तर माणुसकीच्या प्रवाहावरून विहार करायला प्रेरित करतात. गोदावरीच्या पाण्यात पोहण्याचा दादारावांचा नित्य परिपाठ. लहानपणीच आई मातीच्या कुशीत विसावली अन् गोदावरीच्या रूपाने दादारावांनी आपला विसावा शोधला. देह देणाऱ्या आईचा वत्सल सहवास दीर्घकाळ नाही लाभला. पण गोदामाईच्या सानिध्यात मातेच्या ममतेला शोधत राहिला. दादारावच्या आईच्या मरणाच्या प्रसंगाने वाचकाचं अंतर्याम गलबलून येतं. आई देवाघरी निघून गेलेली. मागे तान्हं लेकरू. आईच्या दुधासाठी रड रड रडतं. बायजाबाई लेकराला आईचं दूध पाजायला सांगते. कलेवराला आंघोळ घालून लेकराला आईच्या कुशीत दिलं. आईचा पान्हा झरू लागला. आईचीच माया ती. मेल्यावरही लेकरासाठी तिच्या वात्सल्याचे प्रवाह वाहत राहतात. आईचं दूध पिण्याचा हा प्रसंग वाचतो, तेव्हा वाचकाची विचारधारा वेदनेने विचलित होते. मनाचा तळ ढवळून निघतो. नकळत एक अस्वस्थपण अंतर्यामी साकळून येतं.

नियतीने पदरी घातलेल्या फाटक्या आयुष्याची भीक मागून उत्तरे शोधणारी सकीनाबी. रेल्वेस्थानकच तिचं घर. तेच तिचं जगणं अन् तीच तिची श्रीमंती. तिची आणि लेखकाची अधूनमधून कधीतरी भेट होते. पण या भेटीतून आपलेपणा अव्याहत वाहत राहतो. त्याला ‘माटीमिले’ म्हणत असली, तरी त्या बोलण्यातून आपलेपण ओथंबून असते. त्यांच्यातली एवढी ओळख कदाचित माणूसपण जपायला पर्याप्त असावी. गळ्यात सोन्याची चैन ठेवून वेळी अवेळी स्टेशनकडे येत जाऊ नकोस, गुंड वाईट आहेत. ते तुझ्या जिवाचं बरंवाईटही करतील म्हणून ती मातेच्या ममतेने समजवून सांगते. लोकांसमोर हात पसरून जगणारी सकीनाबी; पण पैशांच्या मोहाने तिला कधी जखडून नाही ठेवलं. मिळालं ते आपलं म्हणून जगणारी ही बाई रेल्वेखाली येऊन मरते. लेखकाला आस्थेने माटीमिले म्हणणारी सकीनाबी मातीत मिसळते. मागे उरतात तिच्या असण्याच्या आठवणी आणि नसण्याची खंत.

नदीच्या सानिध्यात जगणारा अन् आपल्या ओंजळभर आयुष्याची प्रयोजने तिच्या पात्रात शोधणारा पुरभाजी झिंगाभोई बामनवाड लेखकाला नदीच्या किनारी गवसलेला जिवंत मनाचा अन् संवेदनशील विचारांच्या डोहात अधिवास करणारा माणूस. नदीची अथपासून इतिपर्यंत माहिती असणारा. नदीच्या अस्पर्शित वाळूची महती कथन करणारा. गाळात रुतून बसलेली प्रेते वर काढणारा हिमती अन् हिकमती माणूस. पण एका अघटित घटनेने तो कोलमडतो. कुठल्यातरी संध्याकाळी एक तरुण स्त्री नदीवर नवस फेडण्यासाठी येते. परिसरातील गुंड चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अतिप्रसंग करतात. हे सगळं बामनवाड पाहतो, पण जिवाच्या भीतीने त्यांचा प्रतिकार करु शकत नाही. ही अपरिहार्य अगतिकता त्याच्या अंतरी वेदना बनून अधिवास करते. तो स्वतःला या प्रमादाचा धनी समजतो. मनाच्या डोहात परत परत डोकावून पाहतो. ही हतबलता का, म्हणून अस्वस्थ होतो. बरेच दिवस दृष्टीस न पडलेला बामनवाड एक दिवस लेखकाला दिसतो. नदीवर न येण्याचं कारण तो त्याला विचारतो. बामनवाड म्हणतो, ‘त्या दिवशी त्या बाईच्या डोळ्यासमोर नदीचं पाणी कमजोर वाटलं!' मासेमारी बामनवाडच्या उपजीविकेचं साधन. संपूर्ण कुटूंबाच्या उदरभरणाच्या प्रश्नाचे उत्तर. त्याच्या भाकरीचे सगळे विकल्प नदीच्या पाण्याशी निगडीत असूनही दोन महिने तो नदीकडे फिरकतही नाही. कदाचित या अघटित घटनेचे प्रायश्चित्त तो घेत असावा. त्यांचं असं संवेदशील असणं वाचकांना अंतर्मुख करणारं आहे. 

सगुणा नियतीच्या आवर्तात अखंड भिरभिरत राहते. तिची करूण कहाणी संवेदनशील मनाचे किनारे कोरत राहते. नियतीने पदरी घातलेल्या शरीराला सोबत घेऊन आपल्यातील माणूसपण शोधणारी सगुणा तृतीयपंथी. समाज नावाच्या प्रस्थापित व्यवस्थेकडून तिरस्कृत केलेली अन् माणसांनी नाकारलेली. पहिल्यांदा नदीवर आणि पुन्हा रेल्वेच्या प्रवासात नायकाला भेटते. पुढे नदीकाठी यांच्या भेटी होत राहतात. भेटीदरम्यानच्या संवादात तिच्या आयुष्यातले सगळे दृश्य-अदृश्य तळकोपरे लेखकाला उगडून दाखवते. सुरवातीला सगुणा ट्रेनमधे दिसते, तेव्हा लेखक तिच्याकडे तुच्छतेने बघतो. नंतर पुन्हा तिची लेखकाची भेट होते. तेव्हा ती मनातली सल बोलून दाखवते. आपल्याला टाळणाऱ्या, अंतरावरून वळणाऱ्या लेखकाला सगुणा प्रश्न विचारते, 'नजर चुरानेवाले तुम... और हिजडे हम... वा रे व्वा... सच्ची बता, आँख में आँख डाल के देखनेवाला हिजडा की, नजर चुरानेवाला?' खरंतर तिचा हा प्रश्न केवळ लेखकासाठी नाही, तर व्यवस्थेच्या आसनावर अधिष्ठित झालेल्या सगळ्यांच्या संवेदनांना आहे. अंतरी अधिवास करणाऱ्या भळभळत्या जखमांच्या वेदना घेऊन सगुणा लेखकाशी संवाद करताना व्यवस्थेच्या चौकटीत आपलं अस्तित्व नेमकं काय याचा शोध घेत राहते.

नियतीने नाकारलेल्या अन् परिस्थितीने झिडकारलेल्या ट्रान्सजेंडर समूहाच्या जगण्याच्या धांडोळा लेखकाने घेतला आहे. त्यांच्या जगण्यातल्या वेदना टिपतो. त्यांच्या असण्याचे अन्वयार्थ शोधतो. लेखकाने या उपेक्षित समूहाची भाषाशैली समजून घेतली आहे, तशी त्यांची जीवनशैलीही उमजून घेतली आहे. त्यांच्या व्यथा, वेदनाचं प्रखर वास्तव कादंबरीत अधोरेखित केलंय. त्यांच्या दीक्षा देण्याच्या विधीपासून मृत्यूपश्चात केल्या जाणाऱ्या विधीपर्यंतचा वृतांत मनाचा तळ ढवळून काढतो.

आयुष्य परिस्थितीने मांडलेला खेळ असतो का? माहीत नाही, पण माणूस नियतीच्या हातचे बाहुले बनून राहतो एवढं नक्की. कोणाच्या वाट्याला काय यावे, हे देवाला अन् दैवालाही कथन नाही करता येत. कदाचित उद्या उदयाचली येणारा सूर्य प्रकाशाचं दान पदरी टाकून जाईल, या आशेने माणूस आज मावळणाऱ्या सूर्याला वंदन करतो. नियतीने ललाटी कोरलेली वणवण सोबत घेऊन आस्थेचे कवडसे वेचत असतो. नदीचे किनारे धरून आयुष्य शोधणारा भिकाजी अश्वत्थाम्याची अस्वस्थ वणवण घेऊन भटकणारं शापदग्ध जगणं जगतो आहे. सरळ मार्गाने वाहणारा, पण नियतीच्या एका आघाताने प्रवाहपतित होतो. मद्याच्या अंमलात आपलं असणं हरवतो. अनवधानाने त्याच्याकडून प्रमाद घडतो. त्याचं आयुष्य ध्वस्त होतं. मांजर समजून दारूच्या नशेत आपल्या तान्ह्या मुलीला भिंतीवर आपटणाऱ्या भिकाजीच्या मनात असणारा मांजरीविषयीचा भयगंड कारण ठरतं. अर्थात, त्याचं पुरेपूर प्रायश्चित्त तो घेतो. पंधरा वर्षाची शिक्षा भोगून आल्यानंतरही घराकडे न वळता आसपासच्या आसमंतात आपलं आयुष्य ढकलत राहतो. भीक मागून जगतो. आरंभी भिकाजीविषयी वाचकाच्या मनात तिरस्कार भावना प्रबळ होते. प्रमाद घडल्यानंतर भिकाजीचं बदललेलं जगणं, त्याचं आतून तुटत जाणं, विखरून मनाने तुकडे तुकडे होणं अन्  विसकटलेल्या आयुष्यात अधिवासाला आलेली अबोलवृत्ती वाचकाला अस्वस्थ करते. त्याच्या आयुष्याची वाहणारी भळभळती जखम कधीच भरून निघत नाही. त्याची ही अगतिकता वाचकांच्या मनात त्यांच्याविषयी कणव निर्माण करते.

माकडं आणि माणूस यांच्यातला संबंध अधोरेखित करणारा प्रसंग कादंबरीत प्रत्ययकारीपणे लेखांकित केला आहे. लेखकाला वनाधिकाऱ्याने सांगितलेली गोष्ट आठवते. 'माकडं जेव्हा फांद्या हलवून झाडावरची फळं खाली पाडतात, तेव्हा त्या त्यांच्या माकडचेष्टा नसतात, तर जंगलातल्या इतर प्राण्यांना देखील रानमेवा मिळावा, ही त्यांची धारणा असते.’ खरंतर प्राण्यांची ही एक प्रकारची सामाजिक बांधिलकीच असते. पण पुढे दुसरा एक प्रसंग येतो. ‘एप्रिल महिन्यात चिंचेच्या झाडाला चिंचा नसतात. झाडावर माकडे असतात. हरणांचा कळप आशाळभूतपणे चिंचेच्या झाडाखाली पोहोचतो. माकडं पुन्हा चिंचा खाली टाकतील या आशेने बघत राहतो. पण यावेळी तसं होत नाही. दोनतीन हुप्पे झाडावरून खाली येतात अन् हरणांच्या छोट्या पाडसाच्या तंगडीला धरून झाडावर नेतात. पाडसाचा केविलवाणा आवाज तेवढा कानी येत राहतो. पुढच्या चारदोन मिनिटात झाडावरून रक्ताची टपोर धार खाली पडायला लागते... माकडांनी त्याचा फडशा पाडलेला असतो.’ माकडं काय नि माणसं काय, यांना जोडणारा एक समान धागा असतो, तो म्हणजे त्यांच्यात वसतीला असणारं पशुत्व. खरंतर माणूस काही याहून फारसा वेगळा नसतो. परोपकारांचा मोबदला तो पुरेपूर वसूल करतो. स्वतःचं अस्तित्व टिकण्यासाठी हिंसा करतो अन् समर्थनदेखील, हे वास्तव अधोरेखित करतो.

प्रथमपुरुषी निवेदन शैली घेऊन कथनाचे काठ धरून पुढे सरकणारी ही कादंबरी आत्मकथनात्मक आहे, असं वाटत असलं तरी लेखक स्वतःकडे नायकत्व घेण्याचा मोह टाळतो. कादंबरीचा प्रवाह धरून वाहणारी पात्रंच कादंबरीचं नायकत्व सांभाळतात, असं म्हणणं अतिशयोक्त होणार नाही. कथनाच्या ओघात वाहत येणारे हिंदी, उर्दू शब्द कादंबरीच्या पदरी भाषिक श्रीमंतीचं दान टाकतात. संस्कृतीचं पात्र धरून सरकणारे संकेत सोबतीला घेऊन लेखक एक वेगळा परिणाम साधतो. परंपरेने टिकवून ठेवलेल्या लोकधारणा, मिथकांचा समयोचित वापर कादंबरीला अधिक प्रवाही ठेवतो.

‘नदीष्ट’ कादंबरी विश्वातल्या कोणत्याही परगण्यात घडू शकते. नदीचं नाव आणखी दुसरं कोणतं घेतलं, तरी त्याची समान संगती लावता येते. वाड्.मय प्रकाराच्या प्रकटीकरणाच्या निकषांच्या चौकटीत नदीष्टला कोंबता येईलही. तिच्या यशापयशाच्या परिभाषा सांगता येतील, गुणदोषांचे निर्देश करता येतील, परिणामांची परिमाणे पाहून तिची पात्रता पाहता येईलही. पण निकष अन् त्यातून प्रसवलेले अभिनिवेश साहित्यातल्या अनुभूतीला सीमांकित कसे करू शकतील? अभिनिवेशमुक्त साहित्याला देशप्रदेशाच्या, निकषांच्या सीमा अवगुंठीत नाही करू शकत हेच खरे. हे नदीष्ट कादंबरीबाबत नक्कीच सांगता येईल.

कादंबरीचा विस्तार सीमित ठेवायचा असेल किंवा आणखी काही प्रयोजने असतील, म्हणून कालूभैय्या, त्याची प्रेयसी, पुजारी आणि आणखी काही पात्रांचं अस्तित्व विस्ताराच्या सीमांकित वर्तुळात अधिष्ठित केल्याचं वाटतं. त्यांच्या विस्तारला आणखी वाव होता, असं म्हणणं वावगं ठरू नये. सांगण्यातील संवेदनशीलता, प्रसंगातील गांभीर्य, काळाचं समयोचित भान अन् वास्तवाचा विसर न पडणारी मनोज बोरगावकरांची लेखणी कादंबरीला अंगभूत उंची प्रदान करते.

निसर्गाचे वेगवेगळे विभ्रम त्यातल्या लहानमोठ्या छटासह लेखकाने रंगवले आहेत. नदी अन् निसर्गाने लेखकाचं जगणं अधिक समृद्ध केलंय. कोणताही लेखक केवळ सहानुभूती घेऊन नाही लिहित, तर अनुभूतीच्या पात्रातून वाहतो, तेव्हा पुढे पळणाऱ्या प्रवाहाचे अर्थ आकळतात. लेखक माणसांच्या मनाच्या डोहात भावनांचा ठाव घेऊ पाहतो. त्यांचा आयुष्याकडे आस्थेने पाहतो. जगण्याकडे बघण्याचा लेखकाचा दृष्टीकोन समृद्ध आहे, याचं प्रत्यंतर कादंबरी वाचतांना प्रकर्षाने येतं. मनाचे किनारे कोरत सरकणारी ही कादंबरी नदी, नदीची कोमल-कठोर रूपं नेमक्या शब्दांत टिपते. माणूस आणि नदी यांच्यातल्या नात्याचे अनुबंध अधोरेखित करत पुढे सरकत राहते. नदी आणि माणूस यांच्या आदिम नात्यातला नितळ प्रवास ‘नदीष्ट’ आहे. कादंबरीच्या शेवटी लेखकाला फकीर भेटतो अन् कादंबरीचा वाहता प्रवाह थांबतो. लेखकासाठी लेखनाला पूर्णविराम मिळाला असेलही. पण वाचकाच्या अंतर्यामी जाग्या असणाऱ्या संवेदनांचे किनारे कोरत मनाच्या प्रतलावरून ती बराचवेळ वाहत राहते. कादंबरीची पाने मिटली जातात; पण मनाचं पान मात्र दडलेल्या अक्षरांचा शोध घेत राहतं, हे म्हणणं अतिशयोक्त वाटत असलं तरी अनुभूती मात्र यापेक्षा वेगळी नसते, हेही तेवढेच खरे.

कादंबरी: नदीष्ट
लेखकः मनोज बोरगावकर
मुखपृष्ठ: नयन बाराहाते, नांदेड
प्रकाशकः ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
पृष्ठ संख्या: १६८ किंमत: ₹.२००

अर्थ

By // 2 comments:
आयुष्याचे अर्थ शोधता शोधता कित्येक शतकाचं अंतर पार करून माणूस विद्यमान वळणावर विसावला आहे. याचा अर्थ हा प्रवास मुक्कामी पोहचला आहे असा नाही. प्रवासाचा आरंभ माणसाला अनुमानाने आकळला असेलही, पण अंताबाबत तो केवळ भाकितच करू शकतो. अफाट पसाऱ्यातल्या त्याच्या प्रवासाला मोजलंच तर महिने, हप्ते, दिवसांची संख्या लक्षणीय असेल हे निर्विवाद. तास, मिनिटे, सेकंदाच्या हिशोबात तर डोळे विस्फारून पाहण्याइतके अंक मोठे असतील. हे सगळं सगळं खरं असलं, तरी संख्यात्मक उंची म्हणजे आयुष्याच्या यशाची परिमाणे नसतात. नियतीने म्हणा अथवा निसर्गाने; तुमच्या पदरी पेरलेले भलबुरे क्षणच खरे. बाकी सगळी समर्थनाची धडपड असते. वाढत्या वयाला घेऊन आयुष्य पुढे पळत असतं. जगण्याने पुढ्यात मांडलेले प्रसंग निरोप घेत नाहीत अन् नियती वगैरे असं काही मानत असलं कोणी, तर पदरी पडलेले प्राक्तन काही केल्या संगत सोडत नाही. 

वय जसे वाढत जाते, तसे आयुष्यात घ्याव्या लागणाऱ्या निर्णयांना वाचलेलं विश्व अन् वेचलेले अनुभव परिपक्वतेकडे नेत असतात. याबाबत संदेह असण्याचं कारण असेल असं वाटत नाही. इहतली जीवनयापन करताना झेललेले उन्हाळे, पावसाळे आयुष्याच्या वाटेवरून घडणाऱ्या प्रवासाच्या कहाण्या कथन करत असतात. कहाण्या सांगता येतात. खुलवताही येतात. गुंतवून ठेवता येतं त्यात. म्हणून सगळेच गुंते सुटतात असं नाही. व्यवस्थेने तयार केलेल्या साच्यात किती लोकांना जगता येतं? साचे सर्ववेळी सम्यक असतीलच याची शाश्वती देता येते का? जर-तरच्या अगणित शक्यता त्यात असतातच ना! त्या कुठे नाहीत. इहतली अधिवास करणाऱ्या सगळ्याच जिवांचं आयुष्यच जर-तरच्या शक्यतांभोवती प्रदक्षिणा करत असतं. शक्यतांची कुंपणे पार करण्यासाठी पात्रतेचे काही पूल पार करता यायला लागतात. नेमक्या वाटा निवडता निकडीचे असते. त्या निवडणे काही निसर्गदत्त देणगी नसते. प्रयत्नसाध्य परिस्थितीचा परिपाक असतो तो.

आयुष्याचे अन्वयार्थ आकळणे एवढं सोप्पं नसतं. समजलं म्हणता म्हणता हाती लागतं त्यापेक्षा अधिक निसटून जातं. अंतरी अधिवास करून असलेल्या ओंजळभर मोहरलेपणाला चिमूटभर सौख्याचे क्षण गंधभारित करत असतात. ऋतू येतात अन् जातात. त्यांना कोणी आवतन देत नाही अन् थांबवूही शकत नाही. ते कुणाच्या आज्ञा प्रमाण मानून पळत नाहीत. तो नियतीने निर्धारित केलेला मार्ग नसतो, तर निसर्गाने आखून दिलेला पथ असतो. निसर्ग हस्तक्षेपाशिवाय विचलित नाही होत. ते त्याचं प्राक्तन नसतं, तर परिपाठ असतो. ऋतूंचं चक्र नियत मार्गाने क्रमन करत राहतं. आयुष्याचाही ऋतू असतो. कधी एकेक पान डहाळीवरून विसर्जित करणारा असेल, तर कधी बहरलेला. एक आहे अन् दुसरा नाही, असं सहसा होत नाही. त्यांच्या प्रदक्षिणा सुरू असतात अनवरत. प्रत्येकाच्या अंगणी अधिवास असतो त्यांचा. सौख्याचा सुमनांनी सजलेले ताटवे सदाकाळ संगत करीत नसतात. ऋतू कूस बदलून नव्या वळणावर विसावताना पाठीमागे आपल्या अस्तित्वाच्या काही खुणा कोरून जातात. त्यांचा माग काढत माणूस पळत राहतो. काळाने गोंदलेल्या आकृत्यांचे अर्थ आकळायला आपल्या अस्तित्वाचे आयाम आधी अवगत करून घ्यायला लागतात. आयुष्य समजून घेण्याच्या प्रयत्नांना दिलेलं नाव आहे ते. पण सत्य तर हेही आहे की, प्रत्येक प्रयत्न सफल व्हावेत असं नसतं. तसे ते होत नसतातही. कधी प्रमाद, तर कधी परिस्थिती प्रयत्नांच्या परिभाषा लेखांकित करीत असते. प्रमादांची पावले घेऊन अंगणी चालत आलेल्या दुःखाला समजून घेता येतं. एक मानसिक तयारी असते त्यासाठी करून घेतलेली. पण परिस्थितीच पराभव ललाटी गोंदवून जात असेल तर? 

दोष कुणाचा, यश कुणाचं, हे अवश्य शोधता येतं. पण प्रत्येकवेळी पराक्रमाची परिभाषा अन् पराभवाची कारणमीमांसा करता येतेच असंही नाही. मी आज पराभूत झालोय, अगदी परिपूर्ण. असं कधी उगीच वाटतं. ते वाटू नये असं नाही. ती भावावस्था आहे मनाची. त्यामागे कारणे कोणती असतील ती असोत. त्यांचा धांदोळा घेता येतो. आयुष्याच्या वाटेने चालताना समाधानाचे अंश हाती लागतात, तर कधी वंचना, अपमान, अभाव सहन करावा लागतो. म्हणून प्रयत्नांच्या व्याख्या बदलत नसतात. यशाची सूत्रे समजून घेत आयुष्याची जटिल समीकरणे तेवढी योग्यवेळी सोडवता यायला हवी. 

आयुष्याच्या अध्यायांचा अर्थ आकळणे अवघड असलं, तरी अशक्य नसतं. माणसाला यश मिळवता येतं अन् अपयश पचवता येतं एवढं नक्की. अगदीच सरसकट असं म्हणता येत नसलं, तरी उभं राहायची उमेद टाकून नाही देता येत. गलितगात्र, हतबुद्ध वगैरे असले कोणी तर ते अपवाद. यशाची आयती सूत्रे नसतात. ती स्वतःची स्वतःच तयार करायला लागतात. यश कसं आणि कोणत्या मार्गाने संपादित करावं अन् अपयशाचं धनी होताना स्वतःला कसं सावरावं, हा मनावर कोरलेल्या संस्कारांचा परिपाक असतो. यशाने कोणी हुरळून जातात. काही अपयशाने खचून. पण परिस्थिती पाहून उभं राहता येतं, त्यांना आयुष्याचा तोल अन् ताल सांभाळता येतो. यशोपथ पादाक्रांत करण्याचे पर्याय वेगवेगळे असू शकतात. कोणी वळणाची वाट निवडतो, कुणी वळणाला वळसा घालून वळतो. कुणी आधीच बांधलेल्या पायऱ्यांचा वापर करतो. कुणी घातलेल्या पायघड्यांवरून प्रवास करून सिंहासने मिळवू पाहतो. पण अशा यशाला अंगभूत आवाज असेलच असं नाही. सहकार्याच्या कुबड्या अन् वशिल्यांच्या शिड्या न वापरता, स्वतःची पात्रता सिद्ध करून संपादित केलेल्या यशाचा रंग वेगळा असतो. तो अंतरंगातून आलेला असतो. स्वप्रज्ञेला प्रमाण मानून पुढे निघता येतं अन् झालाच पराभव तर तो पचवण्याची प्रचंड कुवत असते, त्यांना यशापयशाच्या परिभाषा अवगत असतात. नसल्या तर शिकून घेता येतात. 

अपयशाला सामोरे जाण्याची अंतर्यामी तयारी असायला लागते अन् यशप्राप्तीनंतर संयम राखायचा वकुबही. आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्हे अंकित होतात, तेव्हा चिन्हांचे अर्थ शोधावे लागतात. आयुष्य मानापमानाचा अनवरत चालणारा खेळ आहे. इच्छा असो अथवा नसो तो खेळावाच लागतो. कधी कळत, कधी नकळत. कधी जिंकण्यासाठी, कधी जिंकून हरण्यासाठीही सुरक्षेची चौकट लाभलेली घरे उधळून द्यावी लागतात. कारण विजयापेक्षा काही पराभव अधिक देखणे असतात, फक्त त्यांना सत्प्रेरीत विचारांची किनार असावी. 

आयुष्याच्या पटावर अंथरलेल्या काळ्यापांढऱ्या चौकटीच्या घरातील सोंगट्या तेवढ्या योग्यवेळी अन् योग्यस्थळी विचारपूर्वक सरकवता यायला हव्या. खेळातला प्रत्येक विजय हा अंतिम नसतो अन् प्रत्येक पराभव प्रयत्नांचा शेवट नसतो. पराभूत होऊन जिंकता येतं, तसं जिंकून हरताही येतं. तो काळाने गोंदलेल्या रेषांचा परिपाक असतो. मानाचा तोरा मिरवताना मनी मोद मावत नसेल, तर अपमानाच्या क्षणांना विस्मृतीच्या अंधाऱ्या पटलाआड दडवून ठेवताना आपलं म्हणता यायला हवं. अवमान विसरण्याइतका काही कोणी कोडगा नसतो अन् कर्तव्यांपासून विचलित होण्याइतका बेफिकीरही. असलेच कुणी तर अपवाद असतील. आपण घेतलेल्या सगळ्याच भूमिका प्रत्येकवेळी अगदीच रास्त असतील असं नाही. मग त्या यश संपादनाच्या असोत अथवा अपयश पेलण्याच्या. आकांक्षांच्या गगनात सदन असलं की, आपल्या पंखांवर विश्वास असल्याशिवाय निवाऱ्याची चौकट गाठता नाही येत. अपेक्षा असणं अवास्तव नसतं. असं म्हणतात की, संधी आयुष्यात क्वचित साद घालत असते. असेल किंवा नसेलही असं. पण ज्यांना संधी शोधता येते, ते त्यांची संख्या नाही मोजत. कारण संधी त्यांनाच असते, जे तिच्या नूपुरांचा नाद ऐकून प्रतिसादाचे प्रतिध्वनी बनतात, नाही का?
••