जगात असंख्य सुखं ओसंडून वाहत आहेत. पण ते काही सगळ्यांच्या आयुष्याचे किनारे पकडून सरकत नाहीत. सुखांच्या परिभाषाही संकुचित ठराव्यात एवढ्या सुविधांनी एकीकडे जगणं सजलेलं असतं. तर दुसरीकडे वैशाखही थिटा वाटावा इतकं उजाड असणं. काहींकडे सगळंच असावं, काहींकडे काहीच नसावं, हा विपर्यास नाही का? अविश्रांत कष्ट करूनही काहींच्या ओंजळी रित्याच का राहत असतील? कष्टाच्या व्याख्या चुकत असतील का त्यांच्या? की श्रमाच्या परिणामांची परिमाणे? प्रामाणिक परिश्रम सार्वकालिक आवश्यकता असल्याचा निर्वाळा सर्वांनी एकमुखाने दिला असेल, तर परिश्रमाच्या ललाटी प्रमुदित असण्याचं भागधेय नियतीने का कोरलेलं नसावं? परिश्रम जगण्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देत असेल, तर त्याचं रास्त मोल पदरी पडायला नको का?
जगणं उजळून टाकणारा हिरा शोधायला निघावं, तर लाख प्रयत्न करूनही हाती केवळ काचेचे तुकडेच यावेत असं का? एखाद्याच्या वाट्याला सतत वेदनांचे वेद का? वंचनाच आयुष्याचं अंग का बनावी? काही प्रश्नांची उत्तरे नाही लागतं हाती, हेच खरं. काहींनी तुपाशी अन् काहींनी उपाशी असण्याला समानता कशी म्हणता येईल? अगदी व्यावहारिक स्तरावर विचार केला तर जगात सगळीच माणसे सारखी नसतात, हेही वास्तवच. पुढे पडत्या पावलांचा प्रवास सुलभ कधीच नसतो. त्यात वळणे असतात. उतार असतात, चढाव असतात. अंतरे पार केल्याशिवाय पडावाची ठिकाणे हाती लागतील तरी कशी?
आयुष्य योग आहे की, योगायोग? योग असेल तर तो सगळ्यांनाच साधता येतो असं नाही अन् योगायोग असेल तर सगळ्यांच्या कुंडलीत नसतो. मग यशाचं गमक नेमकं असतं तरी काय? काहींच्या जगण्यात केवळ भोगच का? प्रामाणिक प्रयत्न करूनही काही म्हणता, काहीच कसं हाती लागत नाही. कोणत्या कर्मांचे भोग म्हणावेत याला? काही प्रश्नांची उत्तरे नाही लागत हाती हेच खरे. कोणी देवाची मर्जी, दैवाची कृपा, नियतीचे भोग वगैरे म्हणून देवाच्या हवाली करून परिस्थिती पालटाची प्रतीक्षा करत राहतो. कुणी परिस्थितीशी झटत राहतो. कुणी अन्वय लावू पाहतो प्राप्त परीस्थितीचा. कोणी पूर्वसुकृतात अपयशाची रहस्ये दडल्याचा निर्वाळा देतो. कुणी कोणत्यावेळी काय करावं, काय समजावं हा त्यांच्या आस्थेचा भाग. या सगळ्यांच्या पलीकडेही आणखी काही असतं? या असण्यालाच श्रद्धा वगैरे म्हणत असावेत. श्रद्धेचे सुयोग्य सूर सापडले की, जगणं सजवता येतं. फक्त त्याचं गाणं करण्याइतकं सहजपण अंतरी नांदतं असायला लागतं.
आयुष्यात अधिवास करून असलेल्या अगणित प्रश्नांचे संदर्भांसह स्पष्टीकरण प्रत्येकवेळी संभव होत नाही. माणूस म्हणून त्याची ही मर्यादा. परिस्थितीच्या बुलंद बुरुजांवर माथा आपटूनही ओंजळी रिकाम्याच राहतात, तेव्हा बऱ्याच गोष्टी देवाच्या हाती अन् दैवाच्या भरोशावर सोपवून देण्याशिवाय सामान्य वकूब असणारा माणूस आणखी करूही काय शकतो? सगळे सायास प्रयास करूनही उपेक्षेचं धनी होणं आपल्यातील न्यून असतं की, नियतीने ललाटी कोरलेले अभिलेख? न्यून असेल तर नियती, दैव, वगैरेंना बोल लावणं कितपत सयुक्तिक असतं? एकदाका न्यून मान्य केलं की, आपणच आपल्याला उसवत जावं लागतं अन् टाके टाकून सांधत राहावं लागतं. पण उत्तर हरवलेले प्रश्न समोर उभे असतील, तर सामान्य माणूस दैवशरण होण्याशिवाय आणखी करूही काय शकतो?
जीवन संघर्ष वगैरे असतो, हे सांगायला कितीही छान असलं, तरी अशी वाक्ये केवळ भाषणात टाळ्या ऐकण्यासाठी ठीक. वास्तवात संघर्षाला कितीतरी कंगोरे असतात. रक्तबंबाळ करणारी टोकं असतात. त्यांनी केलेल्या जखमांनी वेदना होतात, तेव्हा संघर्ष शब्दाचा अर्थ समजतो. वातानुकूलित यंत्रांनी देहाभोवती लपेटलेल्या गारव्यात जगण्याशी भिडण्याचे सगळेच संदर्भ समजतील असं नाही. कागदावरची स्थिती आणि रस्त्यावरच्या परिस्थितीत अंतर असतं. विचारांचं विश्व निराळं आणि वास्तवातील जग वेगळं असतं. नाही का?
चंद्रकांत चव्हाण
▪