गेल्या काहीवर्षापासून मनात वसतीला असलेलं स्वप्न पूर्ण होण्याच्या समीप आलं. मनाच्या गाभाऱ्यात जतन करून ठेवलेल्या संवेदनांना समाधानाचे पंख लाभत होते. चाकोरीतल्या वाटा धरून चालणाऱ्या घराच्या अस्तित्वाची मुळे अनपेक्षित आघातांनी अनेकदा हादरली, पण अंतर्यामी अधिवास करून असणाऱ्या आस्थेने त्यांना हात धरून सांभाळले. आल्या प्रसंगांना तोड देत कुटुंबातील माणसे आपलेपण टिकवून होती. मातीशी जुळलेली मने मातीतून आपलेपण शोधत राहिली. आपला वकूब तपासत, परिस्थितीने पुढ्यात आणून ठेवलेल्या प्रत्येक वळणाला पार करण्यासाठी प्रयत्न करीत राहिले.
शेतकरी म्हणून ओळख देताना समोरच्याच्या नजरेत घरचा वकूब प्रश्नचिन्ह बनून अधोरेखित होत असे. सगेसोयरे आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करायला कधी विसरत नसत. वाट्यास आलेली जमीन ओलिताखाली आली की, आपले दिवस पालटतील. दूरदूर धावणारे सुखाचे चांदणे अंगणी विसावेल, घराला मोहरलेपण येईल, या आशेने सगळेच नियतीशी झगडत होते. आकांक्षांच्या आकाशात आपला ओंजळभर आशियाना उभा करीत होते. एक स्वप्न कधीचं बीज बनून मनाच्या मातीत पडलं होतं... वावरात विहीर असावी, पाण्याने झुळझुळ वाहत गाणी म्हणावीत, पिकांनी बहरलेलं, हिरवाईने नटलेलं शेत नजरेला दिसावं...
नियतीने पदरी टाकलेलं ओंजळभर समाधान आपलं मानीत घर मर्यादांच्या चौकटी सोबत घेऊन जगत होतं. सुखांची रेलचेल नव्हती; पण होतं तेही काही कमी नव्हतं. साऱ्यांना सारेच नसेल; पण हवं ते थोडंतरी मिळत असे. एकत्रपणाचा पसारा पदरात घेऊन घरात आनंद नांदत होता. आला दिवस समाधानाचं वर्तुळ कोरून जात होता. घर चतकोरभर आनंदाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करीत सुखाचे कवडसे शोधत होते. संसार समाधानाची चाकोरी धरून सावकाश सरकत होता. असणारं पुरेसं असलं, तरी त्याला मर्यादांच्या कुंपणाने बंदिस्त केलेलं होतं. याहून आणखी काही घरात हवं होतं. आकांक्षांचं धूसर क्षितिज खुणावत होतं.
आजोबांनी वाढत्या वयाला शरण जाऊन एके दिवशी डोळे मिटले आणि धावत्या गाड्याला खीळ बसली. माणसांच्या मनातील अहं जागे झाले. मनाच्या मातीत गाडून ठेवलेले स्वार्थाचे कोंब अंकुरित होऊन वर आले. वाटेहिस्से कोणाला चुकलेत? ते झाले. होणारच होते. पण नुसते जमिनीचे नाही, तर जगण्याच्या आखून घेतलेल्या मर्यादांच्या चौकटींचीही शकले झाली. प्रत्येकाला आपापला तुकडा प्रिय वाटू लागला. घराचं अंगण दुभंगलं. माणसांच्या मनातलं आपलेपण स्वार्थाच्या उताराने वाहू लागलं. अभंगपणाला आस्थेचा ओलावा सांभाळू शकला नाही. वाट्याला आलेल्या जमिनीचा तुकडा घेऊन जिजाबाई जिद्दीने उभी राहिली. जगणं तोलामोलाचं व्हावं म्हणून धडपडत राहिली.
कपाळावरचं कुंकू अभंग असावं, आयुष्य अभेद्य असावं. कोणत्याही संसारी बाईच्या डोळ्यात हे स्वप्न साकोळून साचलेलं असतं. पण तेच दुभंगलं. पदरी पडलं म्हणून पवित्र मानायचा प्रसंग आला, तर काय करावं? दारूच्या व्यसनात बुडालेला नवरा जगण्याला नालायक असला, तरी त्याच्या पुरुषी वागण्याला परंपरांनी अभय दिलेलं. त्याने मारझोड करावी आणि शब्दही न बोलता हिने सहन करावं. पंचपक्वानांनी भरलेली ताटे समोर नव्हती, दोन वेळची भाकरी मुखी पडत होती. पण जगण्याला सन्मान होताच कुठे? सगळेच चमकधमकचे धनी.
अर्थात, जिजाबाईला याच्याशी काही देणेघेणे नव्हते. पैसा तिच्या समाधानाची परिभाषा नव्हता; पण त्याच्याशिवाय जागोजागी अडणारे गाडे ढकलायचे कसे, या प्रश्नाचे उत्तर काही केल्या तिच्या हाती लागत नव्हतं. मातीत राबणे तिला नवे नव्हते. कष्टाला बरकत हवी होती. भाकरीला सन्मान हवा होता आणि तो येण्याचा एकच मार्ग होता काळ्यामातीत उभ्या केलेल्या कहाणीतून स्वतःचा वकूब वाढवणे. परंपरेच्या वाटेवर प्रवास करून हे मिळणे शक्य नव्हते. परंपरेचा प्रघात मोडून उभं राहिल्याशिवाय हाती काही लागणार नव्हते. शेतातल्या मातीला मोहरलेपण आणायचे असेल, तर विहारीशिवाय शक्य नव्हते.
विहीर खणण्यासाठी व्यवस्था लावण्यात महिने सरले होते. कितीतरी वेळा स्वप्ने सजली आणि कोमेजली होती. व्यवस्थेच्या अडथळ्यांनी पावलोपावली परीक्षा घेतली होती. एकेक साधने जुळवता जुळवता नाकी नऊ आलं होतं. त्यावर उपाय शोधत आजचा दिवस उगवला होता.
सकाळीच पूजेचं साहित्य शेतात गेलं. नारळ वाढवला अंडी फोडली आणि बोअर मशीनची धडधड सुरु झाली. त्याच्या धक्क्यांनी जमीन हादरू लागली. पातं इंचइंच जमिनीत सरकू लागलं. तसे मनात आशेचे अंकुर ताजे होऊ लागले.
बापू घरातला मोठा. कर्ता म्हणून खांद्यावर अधिक जबाबदारी. ट्यूबवेल करायला घेतली. मनात असंख्य प्रश्नांचं मळभ भरून आलेलं, पण चेहऱ्यावर तसं न दाखवता तो प्रयत्न करीत होता. अगदीच हाती नसणाऱ्या गोष्टी दैवावर सोपवून आल्या प्रसंगांशी दोन हात करीत होता. संघर्ष घराला काही नवीन नव्हता; पण आज तो मोठा जुगार खेळायला निघाला होता.
त्याच्या धावपळीकडे पाहत जिजाबाई म्हणाली, “बापू, देख भाऊ, लागनं पाणी वावरमा तं जिकनूत, नही तं शे तेवढंभी इकनं पडीन.”
तिला धीर देत तो म्हणाला, “ताई, असं काही व्हवाव नही. आपन काय कोण वाईट थोडंच करेल शे.”
घरच्यांशी धीर एकवटून बापू बोलत असला, तरी मनात शंकेची पाल चुकचुकत होतीच. नाहीच लागलं पाणी शेतात तर... मनात नुसता विचार आला, तरी आतून तुटत होता.
बापू नुकताच बीए झालेला. आतापर्यंत झालेलं शिक्षण अविरत कष्टांची कहाणी होती. त्याने मिळवलेलं यश भले कोणाच्या नजरेत भरण्याइतके मोठे नसेल, पण प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत मिळवले, त्याचे मोल काही कमी नव्हते. हे सगळं खरं असलं, तरी पुढे काय? या प्रश्नांचं उत्तर काही हाती लागत नव्हतं.
बापू परिस्थितीच्या भोवऱ्यात अडलेला. बीएड करून मास्तरकीच्या वाटेने चालण्याचं कधीचं स्वप्न होतं. पण हा सगळा जुगारच, हेही त्याला कळत होते. आसपास काय घडतंय, हे पाहत होता. पाहून स्वतःवरचा विश्वास विसकटत होता. ना कोठे ओळख, ना वशिला, ना हाती पैसा. अभ्यासात त्याच्यापेक्षा कितीतरी मागे असणारी मुलं तोऱ्यात मिरवत होती. कसली चिंता नव्हती त्यांना आणि याच्यासमोर दिसत होता फक्त अंधारलेला रस्ता. त्याला ना उमेद, ना भविष्याचे चमकणारे कवडसे.
जगण्यात आपलं असं काही हाती लागत नव्हतं. म्हाताऱ्या आजीला डोळे मिटण्याआधी नातवांना बोहल्यावर चढलेलं पाहायचं होतं. आपली इच्छा पूर्ण व्हावी, म्हणून म्हातारी आस लावून होती. तिचा आग्रह घरच्यांना मोडणं अशक्य झालं. टाळायचा प्रयत्न केला, तरी काही उपयोग नव्हता. अखेर बापूला माळा हाती घेऊन घरच्यांनी निवडलेल्या पोरीच्या गळ्यात टाकावी लागली.
बायको तशी चांगली. रंगरूपाने आणि मनानेही. घरच्या परिस्थितीला समजून कधी तक्रार न करता आनंदाने नांदत होती. डोळ्यात अनेक प्रश्नचिन्हे घेऊन उद्याची सुंदर स्वप्ने सजवत होती. तीही शेतकऱ्याची लेक. जेमतेम अकरावी शिकली. घरच्यांना जबादारीतून मोकळं व्हायची घाई झालेली. अनायासे स्थळ चालून आलं. घरची शेती होती. पोरगं शिकलेलं. आज ना उद्या लागेल चाकरीला. म्हणून संधी हातची जावू न देता घरच्यांनी बोहल्यावर उभी केली. त्यांच्यासमोर काही चालणार नव्हतेच. माहेरची वाट विसरून सासरच्या घरी सप्तपदी करून आली, डोळ्यातली स्वप्ने मनाच्या अंधाऱ्या कप्प्यात बंदिस्त करून. डोळे ओलावलेले, कडा पाणावल्या तरी वेदना शब्द बनून कधी ओठांवर नाही येवू दिल्या.
बापूला हे कळत नव्हतं, असं नाही; पण तो तरी काय करणार होता. परिस्थितीने अशा वळणावर आणून उभं केलं होतं, जिथून पर्यायी पथ संपले होते. एवढं शिकून काय उपयोग, म्हणून गावातली माणसे विचारत होती. असं होतं तर पैसे वाया घालवायला शिकला का? म्हणून ज्ञान शिकवीत होती. कुत्सितपणे बोलत होती. ज्याने कधी शाळेचे तोंड पाहिले नाही, तो याच्या शिक्षणाविषयी आपली अक्कल पाजळून जात होता.
भरायचा म्हणून बापूने बीएडचा फॉर्म कधीतरी टाकून दिला आणि विसरलाही. सत्तावन-अठ्ठावन टक्यांना विचारतो कोण? कसला नंबर लागतो अन् कसला मास्तर बनतो, म्हणून स्वतःच स्वतःची समजूत घालीत होता. जगण्याचे प्रश्न शेतातल्या कष्टानेच सुटणार होते. कोरडवाहू शेती करून घर निसर्गाच्या मर्जीने जगत होते. प्रत्येकवर्षी जुगार खेळून काहीही हाती लागत नव्हतं. प्रश्नचिन्हांच्या संगतीने राहून जगणंच प्रश्नांकित झालेलं. सन्मानाने जगायचं, तर वावरात विहीर केल्याशिवाय काहीही होणार नसल्याचे घरातील सगळ्यांनाच वाटत होतं.
बोअरिंग मशीनच्या आवाजाने अख्खं वावर हादरत असल्यागत वाटत होतं. बापूचा जीव मशीनसोबत कंप पावत होता. उगीचच काळीज कुरतडल्यासारखे वाटत होते. मनात नाना प्रश्नांचं काहूर उडालेलं. अस्वस्थपण चेहऱ्यावरून वाहत होते. दिवसभरच्या धावपळीने जीव कोमेजून वाळल्या फुलासारखा झालेला.
संध्याकाळी घरून भाजी-भाकरीचे डबे आले. काम थांबवून सगळे जण आंब्याच्या झाडाखाली तात्पुरत्या उभ्या केलेल्या पालाच्या झोपडीकडे चालते झाले. प्लास्टिकच्या डब्यात भरलेलं पाणी ओतून हातपाय धुतले. चेहऱ्यावर पाणी फिरवून ताजं तवानं वाटू लागलं. जेवणे उरकून गप्पा छाटत बसले. कुणी खिशातून तंबाखूची पुडी काढून त्यातली थोडी तळ हातावर घेऊन चुना लावला. रगडून एकजीव केली आणि तोंडात टाकली. कुणी बिडी शिलगावून धुराच्या रेषा काढीत बसले. भूतकाळाच्या उदरात लपलेल्या एकेक आठवणी रानातून वाहणाऱ्या वाऱ्यासोबत जाग्या होत राहिल्या. कामाने आंबलेलं अंग मोकळं करीत बापू शेजारीच पडलेले रिकामे पोते अंथरून जमिनीवर पडला. त्यांच्या कहाण्या ऐकत राहिला, काही न बोलता. दिवसभराच्या धावपळीने थकला असल्याने पडल्या जागी डोळा कधी लागला कळलं नाही.
रात्री शेतातच निजला.
सकाळी घरी आल्यावर नेहमीप्रमाणे आईला आवाज दिला, पण कोणताही प्रतिसाद नाही आला. कोणी कोणाशी बोलत नव्हतं. काहीतरी धुसपूस झालेली.
बायको पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत चुलीवरून डेग उतरवून अंघोळीसाठी पाणी टाकत होती. का कोणास ठाऊक बापूला तिच्या नजरेला नजर देण्याचं धाडस होत नव्हतं. उगीचच अपराध्यासारखं वाटत होत. तिचे भरलेले डोळे प्रश्न विचारत होते, अजून किती सहन करायचं हे सगळं? दुसऱ्याच्या जिवावर जिणे नको वाटत होतं. त्यापेक्षा मजुरीला जाणं काय वाईट. घराण्याचं मोठेपण किती दिवस मिरवायचं?
काय बोलावं बापूला काही सुचेना. तसाच ओसरीवर जाऊन बसला. किराणा दुकानातून आणलेलं सामान काढून बाजूला टाकलेल्या वर्तमानपत्राच्या कागदाचा तुकडा उचलून हाती घेतला आणि वाचू लागला. छापलेल्या शब्दांत आस्थेचे आकार शोधू लागला. बायकोने चहाची कपबशी आणून शेजारी ठेवली. बशीत ओतून चहा प्यायला घेतला; पण तो घशातून पोटात उतरतच नव्हता. कसातरी ढकलला आणि वावरात नेण्यासाठी भाकरींची वाट पाहत बसला.
भाकरीचे गाठोडे उचलून शेताकडे निघाला. मन सैरभैर होऊन वावटळीत सापडलेल्या कचऱ्यासारखे दिशाहीन भरकटू लागले. कुणीतरी जबरदस्तीने ढकलल्यासारखे रस्त्यावरून चालत राहिला. पाय सरावाने शेताच्या वाटेने निघाले होते. सगळं सोडून द्यावं आणि निघून जावं कुठेतरी दूर, जेथे कोणीच नसेल ओळखीचं... पण तेवढं धाडस करण्याचं साहस होतंच कुठे मनाला.
शेतात काम करणाऱ्यांच्या हाती भाकरी सोपवली आणि कुणाशी काही न बोलता झाडाच्या सावलीखाली जावून पडला. डोक्यात विचारांच्या वावटळी उठलेल्या. अंत:करणाला आग लागलेली. आई... बायको... परिवार... मी नेमका कोणाचा? की कुणाचाच नाही... हो, मी माझा तरी कुठे आहे? नियतीच्या हाताचे खेळणे बनून नाचतो आहे. आणखी किती नाचवणार आहे... कोणास ठावूक? प्रश्न, प्रश्नांमागे प्रश्न. फक्त प्रश्न सोबतीला... आणि मनाला शूलासारख्या टोचणाऱ्या, घायाळ करणाऱ्या वेदना.
दुपारी पोष्टमन घरी पत्र देवून गेला. जिजाबाईला नवल वाटलं. कधी कुणाचं पत्र येत नसे. क्वचित आलंच, तर कुणी गेल्याची बातमी. तिच्या मनात धस्स झालं. कुणाचं असेल पत्र? म्हणून मनात नाना शंका. आसपास शोधून पाहिले, कोणी वाचणाराही दिसला नाही. तिने कुणाला शोधण्याचा प्रयत्नही केला नाही. आळसावलेली दुपार मरगळ येऊन पडल्यासारखी. निंबाच्या सावलीचा आधार घेवून खेळणाऱ्या दोनचार मुलांचा गलका तेवढा सुरु होता.
बांधावर वाढलेली झुडपं तोडायची होती. बापू सकाळी शेतात जाताना कुऱ्हाड सोबत न्यायला विसरला होता. शेताकडून घरी परतणाऱ्या तुकारामकडून कुऱ्हाड पाठवून देण्याचा निरोप त्याने पाठवला. जिजाबाईचं घरी बसून मन लागत नव्हतं, शेताकडे जाऊन यावं म्हणून रणरणत्या उन्हातच शेताकडे निघाली.
बापूचा डोळा लागलेला. आईच्या आवाजाने दचकून उठला. तिच्या घामेजलेल्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला, “ काय होयनं वं ताई? अशी काबं भर ऊनमा वावरमा उनी?”
हातात पत्र देऊन जिजाबाई त्याच्याकडे पाहत राहिली नुसती, काही न बोलता. पाकिटावरचे पोष्टाचे शिक्के, पाठवणाऱ्याचा पत्ता पाहून बापूच्या चेहऱ्यावरील भाव पालटत गेले. रेषा पसरट झाल्या. डोळ्यातून कुतूहल वाहू लागले. पाकीट उघडून पाहिले. बीएडला नंबर लागला होता. अंतर्यामी दडलेल्या आशेच्या कवडशाला डोकावण्यासाठी एक लहानशी फट सापडली. मनात दडून बसलेली वेडी उमेद जागी झाली.
आईकडे पाहत म्हणाला, “बीएडले नंबर लागना. अॅडमिशन लेवासाठे पत्र येयेल शे.”
जिजाबाईच्या चेहऱ्यावर आनंदाची एक अस्पष्ट रेषा हसू लागली. मनात समाधानाची लहर उमलून आली. चेहऱ्यावरच्या आनंदाच्या पडद्यामागे असणारी चिंता लपवत त्याला म्हणाली, “देवाना घर न्याय शे. देर शे, पन अंधेर नही. व्हयनं नं मनसारखं! देवच पावना भाऊ तुले. हुईन समदं चांगलं! सांग आते काय करानं?” आणि उत्तराच्या प्रतीक्षेत त्याच्याकडे पाहत राहिली.
थोड्यावेळापूर्वी प्रसन्नतेचा परिमल घेऊन फुललेला चेहरा मलूल झाला. मनात चिंतेचे मळभ साकोळून आले. नियतीने कसले खेळ जगण्यात मांडले, काही कळेना. बीएडला नंबर लागला... पण विनाअनुदानित तुकडीला. फी साडेबारा हजार... एवढे पैसे जमवणे त्याला स्वप्नातही शक्य नव्हते. आधीच ट्यूबवेल करण्यासाठी तीन-चार टक्के व्याजाने पैसे घेतलेले, तेही हजारवेळा उंबरठे झिजवून. बदल्यात डोळे झाकून सांगतील तेथे सह्या करून दिलेल्या. दैवाने एका हाताने दिलं आणि दुसऱ्या हाताने काढून घेतलं. हताशपणे कधी पत्राकडे, तर कधी डबडबलेल्या डोळ्यांनी शिवाराकडे पाहू लागला.
आईने विचारले, “काय रे काय होयनं? नंबर लागना ना! मग तोंड असं काबरं करीसन बसेल शे?”
काही न बोलता बघत राहिला तसाच आईच्या चेहऱ्याकडे थोडावेळ.
म्हणाला, “नंबर लागना; पण इतला पैसा आनाना कथाई? पह्यलेच ट्यूबवेल कराले याना-त्यानाकडे दात इचकीसन पैसा उभा करात. बँका दारमाबी उभ्या करतीत नही. गावमा सगळा सारखाच. सगासोयराभी तसाचं. कथाई आनसूत एवढा पैसा? आनी असा कसा लोके आपले पैसा देथीन. त्यासले भी संसार, पोरंसोरं काही शे का नही? सगळासले ज्यानी त्यानी पडेल शे. सगळाच अडचनमा, त्याभी काय करतीन!”
काय करावे कोणाला काही सुचेना. इकडे आड तिकडे विहीर... थोडावेळ नि:शब्द शांतता... श्वास गळ्यात अडकल्यासारखे वाटत होते. बोरिंग मशीनच्या धडधडत्या भेसूर आवाजाशिवाय आसपास काहीही ऐकू येत नव्हतं.

“तू कायजी करू नको. दखूत काय हुईन ते होवो!” जिजाबाई म्हणाली.
तिच्या मनाचा काही केल्या थांग लागत नव्हता. पदराच्या सावलीत वाढलेल्या बापूला ती समजली नाही, असं कधी झालं नाही; पण आज तिच्या अथांग हृदयातल्या लाटांची गाज काहीकेल्या कळत नव्हती.
“घर ये संध्याकायले! मी सांगस तुले समदं.” असं म्हणीत उभी राहिली आणि पाऊल वाटेने वळली.
तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बापू पाहत राहिला डबडबलेल्या डोळ्यांनी. पापण्यांवर पाण्याचा पडदा पडल्याने डोळ्यांना दिसणारी आईची प्रतिमा धूसर होत गेली. तिच्या लुगड्याचा फाटका पदर वाऱ्यावर उडत होता. बापूला काहीतरी सांगत होता... आईच्या मनातलं गूज कदाचित त्याला कळलं असेल का?
**