ते पिंपळपान जतन करून ठेवता यावं

By // 1 comment:
इहतली वसती करून असलेल्या जिवांच्या काही मर्यादा असतात. माणूसही त्याला अपवाद नसतो. त्या का असतात, याची कारणे सांगता येतात अन् उत्तरेही शोधता येतात. आकांक्षांच्या अक्षाभोवती विहार करणाऱ्यांना ती अवगत असतात. नियतीने म्हणा की निसर्गाने, प्रत्येकाच्या पदरी कुवत पेरून इहतली जीवनयापन करण्याची व्यवस्था केलेली असते. याचा अर्थ सगळ्यांना सगळीच कौशल्ये अवगत असतील असं नाही. एका मापात नाही बसवता येत सगळ्यांना. प्रत्येकाचा पैस वेगळा अन् पद्धतीही निराळ्या. आपला वकूब ओळखता आला की, आपण कोण या प्रश्नाचे उत्तर गवसते. 

सगळ्यांकडे सगळंच असतं असं नाही आणि काहीच नसतं असंसुद्धा नाही. प्रत्येकाचे परीघ ठरलेले अन् त्याभोवतीच्या प्रदक्षिणाही. देवाने, दैवानेच ते निर्माण करावेत असं काही नसतं. कधी आपणच आसपास कुंपणे आखून घेतो. माणसाला हे माहीत नाही, असं अजिबात नाही. पण म्हणतात ना, कळतं पण वळत नाही. खरंतर हे न वळणंच अधिक अवघड गणित आहे. काही कळण्यासाठी वळावं लागतं. कधी दोन पावले इकडे, तर कधी चार पावले तिकडे सरकावं लागतं. पण कधीकधी या पावलांच्या अंतरात अहं आडवे येतात अन् प्रवास अवघड होतो. अनुभवातून सुज्ञपण आलं असेल तर अहं अडगळीत टाकता येतात. पण अज्ञानातून आलेलें शहाणपण आसपास नांदते असेल तर ते माणसाला स्वस्थ नाही बसू देत, हेच खरे. 

व्यवस्थानिर्मित वर्तुळात वर्षानुवर्षे गरगरत राहतात माणसे. दिवसमहिनेवर्षे येतात अन् जातात. येणंजाणं त्यांचा परिपाठ असतो. तो काही प्राप्त परिस्थितीचा परिपाक नसतो. परिस्थिती जगणं कसं असावं, याचा वस्तुपाठ असते. तिचे कंगोरे कळले की, आपणच आपल्याला कळतो. परिस्थितीच्या पदरी प्रसन्नतेचा परिमल पेरता आला की, आनंदाची अभिधाने अधोरेखित नाही करावी लागत. त्यासाठी उसनं अवसान आणावं नाही लागत. सहजपणाचे साज लेऊन आलेलं असतं ते. अधोरेखित होणाऱ्या प्रत्येक रेषेत आमोद असतो. फक्त त्या रेषांची वलये तेवढी समजून घेता यायला हवीत. पिंपळाच्या पानावरच्या रेषा काही केवळ गुंता नसतो. तो आकार असतो पानाच्या पसाऱ्यात प्राण भरणारा. आयुष्य यापेक्षा वेगळं कुठे असतं? फक्त ते पिंपळपान त्याच्या रेषांसह जतन करून ठेवता यायला हवं. 

काळाचे किनारे धरून पुढे पळत राहावं लागतं श्वास घेऊन येथे आलेल्यांना. फार काळ एकाच बिंदूवर थांबूनही चालेल कसे? आयुष्य तर पुढेच पळतंय त्यासोबत धावणं आहेच. याला कोणी प्राक्तन म्हणो अथवा परिस्थिती. काही म्हटलं म्हणून त्यात खूप मोठं अंतराय येतं असं नाही. पण माणसे उगीचच त्रागा करीत रक्त आटवत राहतात. आटापिटा अखंड सुरू असतो. अर्थात, यालाच जीवन ऐसे नाव आहे. आयुष्य हा शब्द आटापिटा असाही लिहता येतो. यातायात, धावाधाव कोणाला टळली? त्याशिवाय का जगण्याचे अर्थ कळतील. धावणं. धडपडणं. पडणं. पडून पुन्हा उभं राहणं; अनवरत फिरणारं हे चक्र. काळाची चाकं पायाला बांधून धावतात सगळेच, आपलं असं काहीतरी शोधत. कुणाची चाके कधी परिस्थितीच्या कर्दमात रुततात, कुणाची निसटतात इतकेच. अर्थात, सगळ्यांच्या हाती मोरपिसे लागत नसतात. हे काहीतरी काय हे कळलं की, त्याला आपल्या अवतारकार्याचे अर्थ लागले. पण नाही होत असं अन् इतकं सहजही नसतं ते.

काही म्हणतात, कशासाठी हवंय हे सगळं? का म्हणून मृगजळमागे धावावं? सुखाच्या व्याख्या कोणाच्या उंचीने कशाला मापाव्या? आपली मर्यादा आपण आपल्याभोवती कोरून घ्यावी. कोणी म्हणेल आयुष्याला काही आयाम असतात. काही कोपरे काही कंगोरे असतात. त्याला अंगभूत अर्थ असतात. त्यांचा शोध घेण्यालाच तर जीवन म्हणतात. पण जीवन काही योगायोग नसतो. तो कर्मणी प्रयोग असतो. सगळेच प्रयोग सफल होतील असं नाही. आयुष्य आस्था असते, भक्ती असते, साधना असते. तप असतं ते आपणच आपल्याला आपादमस्तक तपासून पाहण्यासाठी. साध्य अन् साधने यांच्यात काही अनुबंध असतात. त्यांचे अर्थ कळले की, आयुष्याला विशिष्ट अर्थ प्राप्त होतात. पण अर्थाशिवाय पाठांतराची सवय अंगवळणी पडली असेल तर? केवळ सूर कानी येतील. जगण्याचा सूर नाही सापडणार, नाही का? 

सोपस्कार उरले की, आशय सुटतो आणि अर्थ हरवतो. अर्थ हरवले की, विवक्षित वाटांनी विचारांना वळवणे अवघड होते. गतानुगतिक वाटांवरील प्रवास वेगाच्या व्याख्या बदलण्याची शक्यता कशी नाकारता येईल? वेगाची परिमाणे बदलली की, प्रगतीच्या परिभाषाही बदलतात. अवगत आहे तेवढं अन् तेच पर्याप्त वाटायला लागलं की, विस्ताराचे अर्थ विसंगत वाटतात. अफाट, अथांग, अमर्याद असण्याचे संदर्भ हरवतात, तेव्हा मर्यादांच्या चौकटीत स्वप्ने ओतण्याचे प्रयत्न मौलिक वाटू लागतात. पायाखालच्या परिचयाच्या वाटाच तेवढ्या आपल्या वाटू लागतात. दूरवर दिसणारी क्षितिजे परकी दिसतात. चाकोरीतील जगणं प्रमाण होत जातं अन् विचार पोरके.

मिळवलेल्या, मिळालेल्या मूठभर यशाची, ओंजळभर अस्तित्वाची भुरळ पडते आपल्याला. मखरे प्रिय वाटायला लागतात. आरत्या ओवाळून घेत महानतेचे मळवट भरून घ्यावेसे वाटतात. पण कधी विचार करतो का, आपल्या असण्याने अशी कोणती भर घातली जाणार आहे, जगाच्या अफाट पसाऱ्यात अन् नसण्याने कोणती पोकळी निर्माण होणार आहे? वास्तव हे आहे की, कुणावाचून कुणाचं कणभरही काही अडत नाही. तुम्ही असलात काय आणि नसलात काय म्हणून जगाचे वर्तनव्यापार बदलत नसतात. 

खरं तर माणूस हेच एक मोठ्ठे प्रश्नचिन्ह आहे. कोणता माणूस कसा असेल, कोणत्या प्रसंगी कसा वागेल, हे सांगावे कसे? येथे जीवनयापन करताना इच्छा असो अथवा नसो अनेक मुखवटे घेऊन वावरावे लागते. असलाच त्यात फरक तर काही मुखवटे प्रिय वाटतात, काही केवळ नाईलाज म्हणून स्वीकारलेले इतकेच. जगताना कोणता मुखवटा निवडावा, हा प्रश्न अनेकांना पडतो. कदाचित अनुभवातून येईलही निवडता. पण तो आपल्या चेहऱ्यावर फिट्ट बसेलच असे नाही. समजा बसलाच तर बदलावा लागणार नाही, याची खात्री काय? 

आसपासच्या अफाट पसाऱ्यात आपण नेमके कोण असतो? हे कोण असणं किती जणांना समजलेलं असतं? काही सांगतील की, आम्ही आम्हांस समजण्याची परिमाणे कुठून कशाला शोधायला हवीत, आम्ही आहोत हेच प्रमाण नाही का? आणि तसंही काही करा तुम्ही त्याचे भलेबुरे अर्थ शोधण्यासाठी दुर्बिणी तत्पर असतातच. केलेल्या, करविलेल्या कृतीचे काही ना काही अर्थ निघणार असतील तर परिणामांची पर्वा कशाला उगीच करायची? आपण आपल्या अटीशर्तींवर का जगू नये? प्रत्येकाकडे एक पट्टी असते. ती वापरून त्यांनी पर्याय पाहावेत. पटले तर स्वीकारावेत. नसतील रास्त वाटत तर अन्य विकल्पांचा धांडोळा घ्यावा. त्यांनी आधीच आखून घेतलेल्या मापात येण्यासाठी आपण कशाला धावाधाव करीत राहावी? आपण आणि आपलं असणं कुणाच्या अपेक्षांचा परिपाक नसतो. हे सगळं खरं असलं तरी एक प्रश्न शेष राहतोच, आपणास भेटणारी माणसं नेमकी कोण असतात, याची खात्री कशी करून घ्यावी? कारण समूहात वर्तताना वर्तुळे वाट्यास येतात, विकल्प नाही. समजा असलेच काही तर ते विसंगत नसतील, याची खात्री कशी देता येईल? माणूस कसा असावा? कोण असावा? जगाची वागण्याची रीत कोणती असावी? वर्तनाची तऱ्हा कशी असावी? अशा अनेक प्रश्नांच्या गुंत्यात गुरफटून समाजात वावरताना कधीतरी नकळत आपणच प्रश्न होऊन जातो, नाही का? 
- चंद्रकांत चव्हाण
••

भेटी लागी जीवा

By // 1 comment:
काही शब्द असे असतात ज्यांना कागदावर आकार तर देता येतो, पण त्यांना असणाऱ्या अर्थासह अथपासून इतिपर्यंत आचरणात आणता येईलच असं नाही. शब्दांना अक्षरांकित करून मूर्तरूप देता येतं हे खरं. त्यांच्या असण्याची एक बाजू झाली ही. पण त्यांच्या अलीकडील बाजूपेक्षा पलीकडील भागात अधिक काही असतं, हेही वास्तव कसे दुर्लक्षित करता येईल? नजरेच्या टप्प्यात येणाऱ्या सगळ्याच गोष्टी पाहिल्या जातील असं नाही आणि विचारांच्या कप्प्यात सामावणाऱ्या सगळ्याच बाबी संपूर्ण समजून घेता येतात असं नाही. पुढ्यात पडलेल्या पसाऱ्यात अधिक काही असलं म्हणून त्याकडे आवर्जून लक्ष केंद्रित केलं जाईलच असंही नाही. काही गोष्टी समजून घेण्यासाठी आपणच आपल्याला उमजून घ्यावं लागतं. आशयाचं अथांग आकाश आपल्या अंतरी घेऊन नांदणाऱ्या शब्दांना समजून घेण्यासाठी नुसती सहानुभूती असणं पर्याप्त नाही, तर अनुभूतीचे किनारे धरून वाहावं लागतं. अक्षरे ध्वनीला मूर्त करण्याचं साधन असेल, पण अर्थ देण्यासाठी अनुभूतीच्या वाती अनवरत तेवत्या असायला लागतात. कौशल्य अवगत आहे म्हणून सगळ्याच गोष्टी चिन्हांकित नाही करता येत हेच खरं. 

कोणाच्या भेटीची अंतरी आस लागलेली असते. ती आकृती नजरेस पडावी म्हणून डोळे त्याच्या वाटेकडे लागलेले असतात. जीव कासावीस होत असतो. हे केवळ आपलं कुणीतरी आहे. त्यात आपण गुंतलो आहोत म्हणून होत असतं असं नाही. त्याही पलीकडे त्यात काही असतं. ही जी तगमग असते ती तिच्या अंगभूत आशयासह कशी मांडता येईल? थोड्या इकडच्या, थोड्या तिकडच्या काही शब्दांत ती लेखांकित करता येईलही. पण पूर्ण चिमटीत पकडता येईल याची खात्री देणं जरा अवघडच. ती तगमग, कासाविसी अनुभवल्याशिवाय कशी कळेल? भेटीतील हुरहूर अनुभूती असते आपणच आपल्याला समजून घेण्याची. तेथे केवळ सहानुभूती असून भागत नाही. ती आतड्यातूनच उमलून यायला लागते. गोठ्यात असणाऱ्या वासराच्या ओढीने हंबरत घराकडे धावणाऱ्या गायीच्या पावलांमधून ती पळत असते. पोटाची ओंजळभर खळगी भरण्यासाठी दूरदेशी गेलेल्या लेकरांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या आईच्या डोळ्यात ती साकळलेली असते. कोण्या मानिनीच्या स्वप्नांतील प्रदेशात ती अधिवास करून असते. कुठेतरी जीव जडलेल्या कोण्या लावण्यवतीच्या नेत्रात ती अधिवास करून असते. अभिसारिका बनून त्याच्या भेटीच्या ओढीने नजरा चुकवत, कोणी पाहत नाही याची काळजी घेत चालणाऱ्या पावलात ती लपलेली असते.  

भेटी केवळ औपचारिक सोहळे नसतात. त्यांच्यामागे अधिष्ठान असते निश्चित विचारांचे. त्या आत्मीय असतात. आपलेपणाच्या ओलाव्याने त्या आषाढ ओथंबलेल्या असतात, तशा वैशाखाचा शुष्क पसारा घेऊन पसरलेल्याही असू शकतात. भेटी आपल्यांच्या असतात. परक्यांच्या असतात. ओळखीच्यांच्या असतात तशा अनोळखीपण असतात. निर्धारित असतात तशा आकस्मिकही असतात. भेटी सहज असतात तशा सहेतूकही असतात. काही ठरलेल्या, काही ठरवलेल्या असतात. काही जीवदान देणाऱ्या असतात. काही जिवावर उठणाऱ्याही असू शकतात. 

छत्रपती शिवाजी महाराज अन् अफजलखानाच्या भेटीत अर्थाचे अनेक पदर होते. ती केवळ महाराष्ट्राचा इतिहास पुढच्या वाटेकडे वळता करणारी घटना नव्हती. महाराजांच्या आग्रा भेटीस अनेक आयाम होते. कृष्ण सुदामाची भेट मित्रप्रेमाची परिभाषा होती. हनुमानाने लंकेच्या दिशेने घेतलेली झेप केवळ सीतेचा शोध घेण्यासाठी नव्हती. नळराजाने हंसाला दमयंतीकडे पाठवण्यात भेटीचे तरल अर्थ सामावले होते. मेघदूतातल्या यक्षाच्या अंतरी असलेल्या अधीरतेत प्रेमाराधनाचे कोमल पदर कोरलेले आहेत. 

भेटी माणसांना काही नव्या नाहीत. पण प्रत्येक भेटीत नवेपण असतं. फक्त त्याची कारणे नव्याने समजून घेता यायला हवीत. ती वैयक्तिक असतील. सामाजिक असतील किंवा आणखी काही. प्रत्येक कारणामागे काही अर्थ असतात. त्यांची अर्थपूर्णता आस्थापूर्वक पाहता आली की, त्यांच्या असण्याचे एकेक पदर कळत जातात. राष्ट्रप्रमुखांच्या भेटीला रुतबा असतो. नेत्यांच्या भेटींना वलय असतं. त्या प्रतिनिधित्व करतात आपापल्या देशाचं. त्या प्रातिनिधिक असल्या तरी त्यात अनेक प्रयोजने पेरलेली असतात. अशा भेटीत सहयोग, सहकार्य, स्नेहाचे अर्थ एकवटलेले असतात. काही भेटी किंतु-परंतुची उत्तरे शोधतात. काही किंतु निर्माण करतात. 
     
भेटी सगळ्याच सार्थ असतात असं नाही. काही आत्मीय ओढ घेऊन येतात. काही टाळाव्याशा वाटतात. काही परत परत घडाव्याशा वाटतात. बऱ्याच दिवसांनी भेटणारा कोणी स्नेही संवादातून आस्थेचे कोपरे कोरत आपुलकीचे अध्याय अक्षरांकित करतो, तेव्हा काळालाही मोहोर धरतो. सासरी नांदणारी लेक भेटीला येते म्हणून परिवार तिच्या पायरवांकडे डोळे लावून असतो. तिच्या भेटीत अंतरीचा कल्लोळ आपलेपण घेऊन वाहत राहतो. तिच्या संसारातील नांदत्या सुखाच्या वार्ता कथन करून सांगते, तेव्हा भेटीचा प्रत्येक पळ समाधान बनून अंतरी साठत राहतो. भेट कोणतीही असो, ती लौकिक अर्थाने भेटच असली तरी तिच्या आत आशयाचे अनेक आयाम असतात.

पैलतीरावर लागलेले डोळे कुणाच्यातरी भेटीसाठी आठवणींनी वृद्धाश्रमात झरत राहतात. त्या झरणाऱ्या पाण्यात काळजातले किती कल्लोळ सामावलेले असतात. काळ चाकं लावून पळत राहतो पुढे. त्याच्या पळत्या वाटेवर भेटीची आस अंतरी घेऊन आयुष्याचे शुष्क ऋतू कूस बदलण्याची वाट पाहत राहतात. भेटी कशाही असूदेत, त्यात वियोग असेल, संयोग असेल अथवा योगायोग, साठत जातात त्या स्मृतीच्या कोशात. साचत जातात दिनमहिनेवर्षे बनत. काळ जसा सरकत जातो पुढे पुढे तशी साचत जाते त्यावर विस्मृतीची धूळ. कधीतरी कुठलीशी झुळूक येते अन् उडते. त्या थराखाली साचलेल्या स्मृती हलक्याच जागे होतात, डोकावून पाहतात आसपास अन् साद घालू लागतात. साचलेलं असं संचित कधी कधी अनपेक्षित भेटीला येतं आठवणींचं आभाळ घेऊन. हे आभाळ ज्यांना आकाळलं त्यांना आस्थेचे अर्थ नाही शोधायला लागत, नाही का?
-चंद्रकांत चव्हाण
••