प्रबोधनयुगाचा प्रारंभ घडून काही शतके उलटली. निष्कर्ष, अनुमान आणि सत्याच्या कसोटीवर उतरणाऱ्या विचारांना सोबत घेऊन विज्ञानाचे दीप उजळले. पण त्याचा प्रकाश अद्याप कितीतरी उंबऱ्यांपर्यंत पोहचलाच नाही. एकीकडे वर्धिष्णू सामर्थ्याच्या, अस्मिताजागराच्या वार्ता करायच्या आणि दुसरीकडे अज्ञानाच्या अंधाऱ्या वाटांवरून चालत जाऊन कुणातरी बुवाबाबाच्या आश्रमाचा रस्ता धरायचा. त्याच्या चरणी लीन होऊन, आपले दुःख सांगून मुक्तीचा मार्ग शोधायचा, याला काय म्हणावं? अशा वर्तनाला श्रद्धा म्हणणार असाल, तर अंधश्रद्धा कोणाला म्हणाल? श्रद्धा सार्वकालिक असते. ती असावी याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. पण अंधश्रद्धेची जळमटे समोर दिसत असूनही माणसं स्वतःहून त्यात अडकत जातात, तेव्हा विज्ञान मूक बनते. जगणंच बंदिस्त करणाऱ्या बंधनांना माणसे आशीर्वाद समजतात. असे असेल तर अद्यापही आपण अज्ञानाच्या अंधाऱ्या जंगलातून बाहेर आलेलोच नाहीत, असे म्हणणेच जास्त संयुक्तिक ठरेल. वैज्ञानिकांनी अथक प्रयत्नांनी अवकाशयाने चंद्र, मंगळापर्यंत यशस्वीरीत्या पोहचवली. पण दुर्दैव, अंधश्रद्धाळू माणसांच्या मनापर्यंत विज्ञान पोहचू शकले नाही. दोष द्यावा कुणाला? अविचाराने घडणाऱ्या वर्तनाला की, अंधश्रद्धेलाच श्रद्धा समजून वागणाऱ्या मानसिकतेला.
जेथल्या मातीला तत्वज्ञानाच्या उन्नत परंपरांचा, विचारधारांचा समृद्ध वारसा आहे. कर्मयोग आचरणात आणण्यासाठी मार्गदर्शन करणारे अनेक ग्रंथ शेकडो वर्षे सोबत करूनही अंधश्रद्धा, कर्मकांड रुजतात कसे? हे न उलगडणारे कोडे आहे. यात फक्त दीन, दुबळे, वंचित, उपेक्षित, अशिक्षित, गरीबच सहभागी असतात असे नाही. भेदभाव येथे नसतोच. असते ती आंधळ्या अनुकरणाची समानता, त्या समानतेचा केंद्रबिंदू असतो कुणीतरी स्वयंघोषित बुवाबाबा आणि त्याचे दांभिक आशीर्वाद. सत्तास्थानी नियुक्त केलेला प्रतिनिधीही आपला कार्यभार मुहूर्त पाहून स्वीकारत असेल, तेथे नवीन काही घडण्याची अपेक्षा करावी तरी कशी? विज्ञानतंत्रज्ञान शिकून मिळवलेल्या ज्ञानाच्या बळावर उच्चपदस्थ झालेला कोणी एखादा आश्रमाच्या वाटेने पळत असेल, लेकरांपासून चित्रपटांपर्यंत नामकरण करण्यासाठी अक्षरांच्या संख्येची, अंकांची आकडेमोड केली जात असेल, तेथे जगण्याचे गणित हरते. तर्कशुद्ध आचरणपद्धतींचा आदर्श वस्तुपाठ ज्यांनी घालून द्यावा, तेच अंधश्रद्धेच्या वाटेने निघत असतील, तर विज्ञानप्रणित विचारांनी केलेल्या विरोधाची धार उरतेच किती?
साधेपणाला जीवनाचे सौंदर्य मानणारे अनेक संत, महंत झाले. आपापल्या काळी सुधारणावादी विचारांच्या मशाली हाती घेऊन त्यांनी समाजजीवनातील अज्ञानाच्या अंधाऱ्या वाटा उजळल्या. त्या निरासक्त संत, महंतांच्या देहावसानानंतर त्यांच्या कर्मयोगाच्या गाथा अंगिकारायच्याऐवजी त्यांनाच देवत्व प्रदान करून माणसे मोकळी झाली. मूर्ती तयार करून त्यांची प्रतिष्ठापना केली. त्यांनी सांगितलेला कर्मयोग आचरणात आणण्याऐवजी मूर्तींना मढविण्याची भक्तांमध्ये अहमहमिका लागली असेल, तर तेथे वास्तवाचा वस्तुनिष्ठपणे विचार करतोच कोण?
अज्ञानातून आलेले वैचारिक मांद्य भोंदू बाबाबुवांना आयतीच चालून आलेली संधी असते. साधीभोळी, श्रद्धाशील माणसं सहज भुलतात. दांभिकता ज्यांच्या जगण्यात खच्चून भरली आहे, ते जगाची दुःखे काय दूर करणार आहेत, याचंही भान माणसांना नसावं का? बुवाबाबांच्या भजनी लागलेलं लोकमानस हा विचार का करीत नसावं? सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांनी दांभिक, दुर्जनवृत्तीवर कठोर प्रहार केले. दंभ, अनीती, कपट, भ्रष्टआचरण असेल तेथे परमेश्वराचे अधिष्ठान कसे असेल? असा प्रश्न समाजाला विचारला. आपल्या शब्दांचीच अस्त्रे, शस्त्रे करून सद्विचारांचा प्रकाश पेरण्याचा प्रयत्न केला. ‘तुका म्हणे सोंग । दावी बाहेरील रंग । तुका म्हणे हाणोनि । त्यांचे फोडा तोंड ॥’ एवढा ओजस्वी विचार सांगणारा अभंग लिहून आणि सावधगिरीचा इशारा करूनही काहीच कसे घडत नाही, हे एक नवल आहे. ‘तीर्थी धोंडापाणी । देव रोकडा सज्जनी ॥’ म्हणणाऱ्या तुकोबांचे शब्द आमच्यापर्यंत पोहचलेच नाहीत का? की माणसे स्वतःहून पट्ट्या बांधून घेतायेत. डोळ्यांवर बांधलेल्या पट्टीने फक्त समोरील उजेड हरवतो, पण अंधश्रद्धेच्या झापडबंद पट्ट्यांनी विचारविश्वात अंधार होतो. नाही का?
••