Chaukatitil Vartulat | चौकटीतील वर्तुळात

By // 9 comments:
शाळेला दिवाळीच्या सुट्या असल्याने गावी गेलो. घरी थोडं थांबून निघालो पाराकडे. गावातल्या घरी आलो की पाराकडे फिरून यायची माझी सवय तशी जुनीच. गावात आपलं सहजच फिरून आलं की कळतंय कोण आलं, कोण गेलं. सोबत आणखी इतर गोष्टीही कळतात. गावातली माणसं आपलीच असली, तरी यानिमित्ताने त्यांच्यासोबत घडणाऱ्या संवादाचे चार शब्द मनास नवी ऊर्जा देऊन जातात. कोणाचं सुख, कोणाचं दुःख, कोणा घरातली लग्नकार्ये, शेतशिवार, गुरंवासरं, देव, धर्म, परंपरा, नवससायास, यात्रा-जत्रा, परिसर काय काय विषय कळत-नकळत कळतात. ओळखीच्या माणसांचे आपलेपणातून प्रकटणारे शब्द भूतकाळ जागा करतात. स्मृतींचे आभाळ सोबत घेत मन पंख पसरून पिंगा घालत राहते. गावात नसतील सगळीच नाती रक्ताची. पण मानलेली, निर्माण केलेली आणि जाणीवपूर्वक जोपासलेली ही नाती आपलेपणाच्या रेशमी धाग्यांची वीण घट्ट करत राहतात. नात्यांचा गोफ विणला जातो. गावात फिरताना घडणाऱ्या अशा भटक्या संवादाला गगनभरल्या आठवणींचे कोंदण लाभते. भूत, वर्तमान आणि भविष्य येथे येऊन विसावतात. अशावेळी संवादाचे शब्द नुसते शब्द न राहता मन आणि भावनांना सांधणारे साकव होतात.

आजही गल्लीतून पाराकडे चालत निघालो होतो. पाठीमागून आवाज आला. “मास्तर! वो मास्तर!” मागे वळून पाहिले लहानपणापासून संगतीने राहणारा मित्र आवाज देत होता. आमचं शिक्षण पूर्ण झालं. लहानपणही संपलं. तसं पोटापाण्याच्या प्रश्नांना सोबत घेऊन कोण कुठे, कोण कुठे गेलं. विसावले तेथेच आपलं लहान-मोठं घरटं तयार केलं आणि रमले तिकडेच. सुट्या, सणावाराच्या निमित्ताने गावी जाणे घडते तेव्हा भेटतात सगळे. काही जणं राहिले गावाकडेच. हा सध्या गावातच बऱ्यापैकी शेती करतो. शालेय शिक्षणाच्या पुढे या गड्याची मजल गेलीच नाही. शाळा याच्या जीवनातला सगळ्यात अप्रिय अध्याय. जितक्या सहजपणे शाळा टाळता येईल तितकी टाळणारा; पण शेत-शिवारात तितका सहज रमणारा हा जीव. शाळेत शिक्षणातले शिकवलेले प्रयोग सोडून बाकी सगळे प्रयोग करणारा. शाळेच्या गणितातल्या शून्यात आपली शैक्षणिक प्रगती शोधणारा; पण शेतात मात्र शून्यातून विश्व उभं करू पाहणारा हा हिकमती गडी. “काय रे! काय करतोयेस असा इकडे? आणि आज शेतात नाही गेलास?” माझे प्रश्नांचे वाढणारे शेपूट पकडून मला थांबवत म्हणाला, “गुरुजी, सुट्या काय तुम्ही लोकांनीच घ्यायच्या असा काही नियम सरकारने केला काय? आम्ही शेतकऱ्याने घेऊ नये असे ठरवले की काय तुम्ही!” म्हणून हसत राहिला. “वो साहेब, तसं नाही. पण जेव्हा बघावं तेव्हा तुझा देह शेतातल्या झोपडीत पहुडलेला असतो. शेत-शिवार हेच तुझं जगणं. तेथे तू रमलेला. शेतात कामं करताना तुझी ब्रह्मानंदी टाळी लागलेली असते. असलंच काही महत्त्वाचं काम तरच तुला गावाचा रस्ता दिसतो, म्हणून म्हणालो.” माझं बोलणं तो ऐकत राहिला. पुढे काय बोलावे म्हणून मनातल्या मनात वाक्यांची, शब्दांची जुळवाजुळव करीत राहिला.

एक मोठा पॉझ घेऊन शून्यात हरवल्यासारखं म्हणाला, “आता शेतात काय राहिलंय! होतं नव्हतं ते निसर्गाने एक फटक्यात संपवलं. उरल्या कोरड्या वेदना आणि हरवलेल्या संवेदना. आज उगीचंच वाटतं शाळेत असताना दिलं असतं शिकण्याकडे लक्ष अन् मेहनत घेऊन केला असता थोडा अभ्यास तुझ्यासोबत तर... ते जाऊ दे! ते काही आता शक्य नाही. पण एवढं सगळं करूनही शेतात टिकून राहण्याचा मोह निर्माण करणारं काही दिसायला तर हवं. अरे, जेथे शेत-शिवारासोबत जगण्याचे रस्ते सापडत होते. जीवनाची उमेद जागत होती. डोळ्यात स्वप्ने रुजत होती, तीच सगळी करपली बघ. मग शेतात राहून तरी काय करू? मातीची कोरडी ढेकळे पाहत बसू का? त्यापेक्षा गावात, माणसांत थांबून जिवाला होणाऱ्या जखमांचा थोडातरी विसर पडतो. राहतो आता गावात दुःखाच्या कहाण्या ऐकत. येथे प्रत्येकाचं जगणं सारखंच. कोणी शेट नाही आणि कोणी सावकार नाही. सगळेच भणंग बसतो असे पारावर एकत्र येऊन एकमेकांच्या दुःखावर फुंकर घालत. आमचं दुखणं ऐकून या पारावरच्या मंदिरातला मारुतीही कंटाळला असेल. कदाचित त्याला आपण ब्रम्हचारी असल्याचा आनंदच होत असेल. नको संसार आणि नको ते रोजचं मरणं. त्यापेक्षा असाच राहिलो तेच बरं म्हणून सुखावत असेल बिचारा. कसल्या कसल्या गोष्टींना सांभाळणार आहोत. सगळं आभाळच फाटलंय कुठं कुठं टाका घालायचा. म्हणतात ना, रोज मरे त्याला कोण रडे. आमचं मरणं रोजचंच आहे.” आपण काय बोलतोय आणि असे का, याची कदाचित त्याला जाणीव झाली असावी, म्हणून तो शांत बसला. मलाही पुढे काय बोलावे काही सुचेना.

याच्याशी बोलून आपण उगीचंच जखमेवरची खपली काढली असे वाटायला लागले. म्हणून मनात दाटून आलेला अपराधभाव चेहऱ्यावर दिसू न देता विषयाला दुसऱ्या रस्त्याने वळवले. इकडच्या-तिकडच्या गोष्टींवर बोलत राहिलो, ऐकत राहिलो. पश्चिम क्षितिजावरून सायंकाळ धरतीवर उतरायला लागली. रानात चरायला गेलेली गुरंढोरं परतायला लागली. त्यांच्या हंबरण्याने वातावरणात एक आतूर थरथर उभी राहिली. गोठ्याकडे परतणाऱ्या गायीवासरांच्या पायांनी उडालेल्या धुळीने मरगळलेल्या परिसरात उत्साह संचारला. सूर्य मावळतीच्या वाटेने निघून अंधार हलक्या पावलांनी दबकत दबकत गावाकडे चालत आला. दिवेलागणीला घरी आलो. तशी आई ओरडलीच, “आल्या आल्या गेलास ना गावात उंडारायला. लहानपणाच्या सवयी अजून काही जात नाहीयेत तुझ्या.” तिचं बोलणं मधेच थांबवत म्हणालो, “अगं, उगचं बरं वाटतं मनाला गावात गेलो की. म्हणून आलो थोडा फिरून. कळतं काही नवंजुनं. भेटतात मित्र. त्यांच्याशी बोललो की, मनात लपलेलं आठवणींचं गाव जागं होतं.” माझ्या बोलण्याचा अर्थ नीट न समजल्याने माझ्याकडे विस्मयाने बघत आई म्हणाली, “असं कोड्यात काय बोलतोस? मला काय समजतं अडाणी बाईला तुमचं हे असं बोलणं! आणि गाव काय जागं होईल? सगळेच झोपलेत. केला घात पाण्यापावसानं आणि देवानंही. हाती नाही नाना (पैसा) आणि तोंड किलावना (केविलवाणे) अशी परिस्थिती झाली आहे सगळ्यांची. काय करतील माणसे? आहेत बिचारी अशीच पडलेली. आहेत तेथेच रखडलेली. जातील कुठे? जगतायेत कशीतरी रडत कुढत.” आईच्या शब्दांतून गावातील माणसांच्या जगण्याचं दुःख वेदना बनून निथळत होतं.

आमचं बोलणं सुरु असताना लहान भाऊ शेतातून परत आला. केव्हा आलास म्हणून विचारले. मोरीकडे जाऊन हातपाय धुवून आला आणि शेजारी येऊन बसला. शेतात काय कामं सुरु आहेत म्हणून विचारलं. कापूस काढून गहू पेरण्याची तयारी सुरु असल्याचं म्हणाला. बोलता बोलता विषय कापसावर येऊन पोहचला. सहज म्हणून त्याला विचारले, “कापूस किती आला रे या वर्षी? काही ठोक रकम जमते का नाही. की परत आपलं तसंच गेल्या सालसारखं. हाती भोपळा!” समोरील भिंतीकडे हात दाखवत म्हणाला, “मोज त्या भिंतीवरच्या ओढलेल्या रेघोट्या. जेवढ्या आहेत तेवढा विकला. भाव काय म्हणून विचारत असशील तर आपलं तसंच पहिले पाढे जशेच्या तसे.” आमच्याकडे व्यापाऱ्याला कापूस विकताना एक तोल चाळीस किलोचा करून मोजला जातो. याप्रमाणे एकेक रेघ ओढत पाचपाच रेषांचा एक गट करून पाच रेघा म्हणजे दोन क्विंटल, असं साधं गणित घेऊन शेतकरी आपला कापूस बहुदा घरीच विकतो. दोन पैसे व्यापाऱ्याने कमी दिले म्हणून मनाला काही वाटून नाही घेत, कारण फेडरेशनमध्ये जाऊन कापूस विकण्याचा त्याचा अनुभव त्याला बरंच काही शिकवून गेलेला असतो. त्या शहाणपणातून आलेला त्याचा स्वतःचा एक अनुभव असतो. कापूस खरेदी केंद्रावरील सोपस्कार पार पाडून जीव टांगणीला लावण्यापेक्षा येथेच थोड्या मोलभावात मेलेलं चांगलं, असं त्याला वाटतं. भिंतीवर ओढलेल्या रेषा मोजून म्हणालो, “बस, एवढाच! काय प्रकार आहे हा? जरा लक्ष द्यारे शेताकडे. अरे, याच शेतात एकेकाळी शे-सव्वाशे मण कापूस घेत होतो आपण. आणि आत्ता हे चित्र.” घरात मी मोठा असल्याने मोठेपणाचा फायदा घेत अधिकारवाणीने लागलो उपदेश करायला. तो, आई, आणखी एक लहान भाऊ माझं म्हणणं ऐकत होते. जरा नीट लक्ष द्या. हे असंच सुरु राहिलं तर कसं करणार आहात पुढे? ही काही लक्षणं नाहीत खऱ्या शेतकऱ्याची वगैरे वगैरे काही सांगत राहिलो.

माझं बोलणं ऐकून आई म्हणाली, “भाऊ, जी दयस तिलेच कयस, बाकी काय गोंडा घोयस. तुमचं नोकरी करणं आणि आमचं शेती करणं कसं सारखं असेल रे! आम्हाला काय हौस आहे का कमी पिकवायची. देवच (तिला निसर्ग म्हणायचे असते) साथ देत नाही. तुमची ही बायजाबाई (लाईट) तर तासनतास बघायला मिळत नाही आम्हाला. मिळते सात-आठ तास, तिच्यात काय होते. हे सगळं कमी का काय म्हणून आमच्या घरात पिकं आली की, लागले तुमचे भाव खाली उतरायला. कसं होईल मग.” शेतात राबण्याच्या तिच्या उभ्या हयातीतील अनेक उन्हाळ्या-पावसाळ्यांचा सारा अनुभव सोबत घेऊन ती बोलत राहिली. मनातली सल शब्द बनून प्रकटत होती. कोणी काही बोललं नाही. थोडावेळ लांबलेली शांतता. त्या शांततेला छेद देत मीच बोललो, “शेती करायची पद्धत बदला. एकच एक पीक घेताच कशाला? वापरा ना शेती करण्याचं नवं तंत्र. आधुनिक पद्धतीची शेती करा ना! फळं, फुलं, भाजीपाला अशी काहीतरी. सोबतीला कोंबड्या, शेळ्या, गायीम्हशी पाळा. काय ऊस आणि कापूस एकचएक घेऊन बसलात!” माझ्याकडे मिश्कील नजरेने पाहत लहान भाऊ म्हणतो, “आपल्या शेतातील पपई पाहिलीस ना! अरे, ढोर मेहनत करून राबराब राबून पिकवली. आलीही बदाबदा, पण भाव काय? दोन रुपये किलो. याआधी गंगाफळं लावली, त्यांचंही असंच. लाईट वेळेवर नसायची पिकाला पाणी द्यायचे वांधे. गेलं सगळं करपून. कांदा लावला गोण्या भरून भरून पडला. आज भाव मिळेल, उद्या मिळेल वाट पाहून कंटाळलो, सडून फेकण्यापेक्षा विकला मिळेल त्या मोलभावात. आज तुम्ही तोच कांदा काय भावाने घेता आहात? भाऊ, कितीही केलं, मरमर मरलो तरी शेतकऱ्याचं मरणं ठरलेलं. कधी देवानं मारायचं, कधी माणसांनं! शेवटी मरतो शेतकरीच ना!”

माझ्याकडे पाहत मधला भाऊ म्हणाला, “आम्हालाही वाटतं सगळं कसं व्यवस्थित करावं. पण प्रयोग करायला आहेच अशी किती जमीन आपल्याकडे? या चार तुकड्यात काय प्रयोग करायचे? हे प्रयोगाचे खेळ करायला पुरेशी जमीन तर हाती असायला हवी ना! की नुसता जुगारच खेळायचा? ज्यांच्याकडे कुठे असेल, ते करतात काय काय प्रयोग. पण म्हणून आम्ही काहीच करीत नाहीत का? आम्ही आपलं सगळं व्यवस्थित करावं; पण परिस्थितीच साथ देत नाही. सगळीकडून मार खातोय. तुम्ही रोज पेपरात वाचतात ना अमक्या-तमक्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे. ते काय सगळे वेडे होते का मरणारे? अरे, बापजाद्यांपासून शेतकरी आहेत ते! त्यांना काय शेती शिकवणार तुमचं शिक्षण? सगळे रस्ते बंद झाले की, माणसं काय करतील मग. जगणं ओझं झालं की जातो तो जिवानिशी, मागे राहिलेल्यांच्या जिवाला घोर. त्यांचं जगणं त्यांनाच शाप वाटायला लागतो. तीस-चाळीस हजारासाठी बँक, पतपेढ्या जप्त्या आणतात यांच्या घरावर. शेतातल्या पाण्याच्या मोटारीचं वीजबिल थकलं म्हणून कनेक्शन कापलं जातं. सावकारकडून काही कर्ज घेतलं असेल तर गावात फिरताना तोंड लपवत फिरतो. असा चारचौघात अपमान. घर चालवणं मुश्कील. पैसा हाती यायचं नावं घेत नाही. घरसंसार, लेकरंबाळं यांचा मोह त्याला नसतो? त्याला काय सुखी संसाराची स्वप्ने पाहता येत नसतात का? पण परिस्थितीच चहूबाजूने अशी भक्कम घेरते की, गुंत्यातून कितीही सुटायचा प्रयत्न केला तरी नाही सुटत. जगणं कोंडी करतं. नाही काही मार्ग सापडत, मग संपतं सगळचं.” बोलता बोलता तो थांबला.

मी काही बोलायची आवश्यकताच नव्हती. पुस्तकी शिक्षणातून कमावलेलं माझं लेखी शहाणपण वाचलेल्या थेअरीमधे अडकलेले. ते सांगून समोरील प्रश्न थोडीच सुटणार होते. प्रॅक्टिकल जगून हाती आलेल्या निष्कर्षावर हे सगळे बोलत होते. उक्ती आणि कृती यात अंतर असतं. माणूस तरी काय करणार. राजाने छळलं, पावसाने झोडपलं आणि नवऱ्याने मारलं तर दाद कोणाकडे मागणार? व्यवस्थेने निर्माण केलेल्या चौकटीत आपलं एक वर्तुळ आखून त्याच्या परिघात ही माणसं फिरत आहेत. हा परिघ हीच त्यांची नियती झाली आहे. चौकटीतल्या सीमांकित वर्तुळात साकारणारी जीवनाची आकृती यांचे प्राक्तन बनले आहे. कारण नसता यांचा धीर खचू नये म्हणून म्हणालो, “असू द्या, आज नाही निदान येणाऱ्या पुढच्या हंगामात परिस्थिती पालटेल.” माझं वाक्य पूर्ण करीत आई म्हणाली, “उकिरड्यालाही देव पावतो एक दिवस. फिटतील अंधाराचेही पांग. दुःखाचे दिवस काही कायमच मुक्कामाला राहत नाहीत घरी. अरे, आम्हाला तरी एवढं दिसतंय. बाकीच्यांचं काय? ज्याला काहीच नाही. देवच त्यांचा आधार बनेल. येईल सुख दारी फिरून एकदा पुन्हा. आमचं आणि तुमचं सुख जरी वेगळं असलं तरी सुख ते सुखच.”

बोलता बोलता बराच उशीर झाला. उशिरा जेवणं आमच्या खेड्यातील घरांच्या वहिवाटीत नाही बसत. अंधारायच्या आधी जेवणारे हे सगळे. तसाही रोजच अंधार सोबतीला घेऊन जगतायेत. लाईट नाही म्हणून चिमणी, कंदिल लावून आहे त्या उजेडात जेवण करणं घडतं. आम्हा शहरी माणसांना कॅण्डललाईट जेवणाचं केवढं अप्रूप. त्यासाठी वेगळे पैसे मोजून हॉटेलमध्ये मेणबत्या पेटवून त्यांच्या मंद प्रकाशात जेवायला बसतो आम्ही. यांच्यासाठी रोजचंच कंदीललाईट जेवण, तेही सक्तीचं. त्यात कसल्या आल्यात एक्सायटिंग वगैरे अशा फिलिंग्ज आणि कसला आलाय रोमॅन्टिक मूड. ही कौतुकं आमची, शहरी सुखात रमणाऱ्यांची. आईसोबत जेवायला बसलो. शेजारी दोघं भाऊ बसले. आई भाजी-भाकरी वाढत होती. स्वतःच्या हाताने भाकरीचा काला मोडून देत होती. अजूनही लहानपणातल्या मला सांभाळत होती. कितीतरी दिवसातून चुलीवर तयार केलेल्या आईच्या हातच्या भाजी-भाकारीचे साधेसे, पण आपली एक खास चव असणारं जेवण करीत होतो. दोन घास जास्तच जेवलो.

जेवण उरकून ओसरीवर पसरलेल्या वळकटीवर पडलो. इकडचं-तिकडचं बोलणं सुरु होतं. भावकीतले, शेजारचे काही मित्र येऊन बसले. गप्पांना पुन्हा रंग यायला लागला. लाईटने नेहमीप्रमाणे डोळे मिटले. कंदील, चिमण्या पेटल्या. कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात हलणाऱ्या सावल्या पाहत बराच वेळ बोलणं सुरु होतं. एकेक जुन्या आठवणींना जाग येत होती. एव्हाना बाहेर ओसरीवर वळकटी पसरून, गल्लीत खाटा टाकून पडलेली, थकलेली माणसं निद्रेच्या कुशीत शिरली. निबिड अंधाराची चादर गावाने आपल्या अंगावर ओढून घेतलेली. दिवसभराच्या श्रमाने थकलेल्या जिवांच्या डोळ्यात झोप उतरायला लागली. उद्या शेतात कामं असल्याने लवकर झोपावं म्हणून गप्पांमधून एकेक करत मंडळी निरोप घेऊन घरी निघाली. माझ्याही डोळ्यात झोप यायला लागली. वळकटीवर अंग टाकून पडलो. अंधारासोबत सगळीकडे शांतता पसरलेली. रातकिड्यांच्या आवाजाची पट्टी वाढलेली. अकरा-बारा वाजले तरी गावातील मंदिरात भजन सुरुच. भजनांचा सूर चांगलाच लागलेला. आपलं दुःख विसरून भक्तिरसात लीन झालेली माणसं सुरांमध्ये तल्लीन झालेली. संगीताचं, सुरांचं कुठलही शास्त्रोक्त ज्ञान नसलं तरी मनापासून गात होती. तेवढाच त्यांच्या जिवाला विरंगुळा वाटत असेल. सश्रद्ध अंतःकरणातून निर्माण झालेल्या विश्वासाचे पाथेय सोबत घेऊन ही माणसं आपल्या जगण्याचा अंधारा कोपरा उजळवू पाहत होती. पडल्यापडल्या भजनातील शब्द कानावर येत होते, ‘विठू माउली, तू माउली जगाची.’ उगीच मनाला वाटले, खरंच यांची ही माउली यांना सांभाळेल का?

Sakha-Soyara | सखा-सोयरा

By // 15 comments:
गेल्या आठवड्यात गावी गेलो. म्हणजे आवश्यक होतं म्हणून जाणं घडलं. अन्यथा स्वतःभोवती तयार करून घेतलेल्या शहरी सुखांच्या कोशातून बाहेर पडून गावी जाणं कठीणच. कारण मध्यमवर्गीय मानसिकतेने घडत गेलेल्या आत्मकेंद्रित विचारांची झूल मनावर पांघरून घेतली असल्याने, ती उतरवणे अवघड. कोण उगीच चाकोरीत चालणाऱ्या दैनंदिन क्रमात व्यत्यय आणून गावाकडे जातो? पण कधीकधी कामंच अशी काही निघतात की अनिच्छेने का असेना, शहरी सुखांची पांघरलेली घोंगडी काढून आपल्या अस्तित्वाच्या मुळांशी जुळावंच लागतं. अर्थात याचा अर्थ असाही नसतो की, आपल्या मातीच्या ओलाव्याला आपण विसरलेलो असतो. फक्त सुखासीन जगण्याची सवय करून घेतल्याने गावाकडील गैरसोयीत जाऊन राहावंसं वाटत नाही एवढंच. म्हणूनच एखाददोन दिवसाचंही गावी राहणं जीवावर येतं. पण हेही सत्य आहे की, गैरसोयीपासून कितीही लांब राहण्याचा प्रयत्न केला, तरी गाव मनाच्या मातीत रूजलेलं असतं. वरकरणी गावाचा सहवास कितीही टाळत असलो, तरी मन तेथील निळ्याभोर आभाळात घिरट्या घेत असतं.

अनेकातला एक मीही. उपजीविकेच्या वाटेने गावातून बाहेर पडून शहरात येऊन विसावलो. देहाला आणि मनाला शहरी सुविधांचा सराव झालेला. झालेला म्हणण्यापेक्षा करून घेतलेला. ती सुखं मनाला कायमची बिलगलेली. जीवनाच्या क्रमसंगत मार्गावरून चालताना जीवनयापनाच्या दिशा बदलल्या; मन मात्र हे बदल मानायला बहुदा तयार नसते. ते कोणती ना कोणती निमित्ते शोधून गावच्या आसमंतात विहरत असते.

मुलांच्या शैक्षणिक कामाकरिता काही कागदपत्रांची आवश्यकता असल्याने आणि ते मूळ गावीच मिळणार असल्याने जाणे घडले. शासकीय नियमांचे हे एक चांगले आहे, तुम्ही देशात कुठेही वास्तव्याला असला तरी शेतीच्या, जातीच्या दाखल्यांच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मूळगावी जाणे घडते. निदान नियमांच्या निमित्ताने का असेना, गावाकडे जाणाऱ्या वाटेने पावले वळती होतात. आपण गावी जाणं कितीही टाळत असलो, तरी तेथे जाण्यात एक अमोघ आनंद असतो. गावाकडील घर, परिवार, गुरंवासरं, शेतशिवार, तेथील गजबज मनाला अनामिक समाधान देत असते.

माझं गाव- ज्याचं नाव फक्त तेथील रहिवाश्यांना आणि त्यांच्या नातेसंबंध असणाऱ्यांना ठावूक. इतरांना माहीत असण्यासारखं गावाचं कोणतंही लक्षणीय महात्म्य नाही आणि उदंड कर्तृत्वही नाही. म्हणून जाणीवपूर्वक कोणी लक्षात ठेवण्याचं संयुक्तिक प्रयोजनही नाही. सरकार दरबारी एक गाव म्हणून असेलली नोंद हीच काय त्याची सार्वत्रिक ओळख. असे असले तरी त्याच्या सहवासाच्या खुणा मनपटलावर कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत. तशा त्या प्रत्येकाच्या मनात असतातच. मनाच्या गाभाऱ्यात असणारी आपल्या गावाची ओळख ज्याची त्याला मोठीच वाटत असते, तसंच आम्हालाही. इतरांसाठी नसेलही; पण आमच्यापुरता आमच्या गावाचा इतिहासही मोठा आणि भूगोलही समृद्ध.

तीन-चारशे उंबरे अंगावर घेऊन गाव आपल्याच तोऱ्यात उभे आहे. कधीपासून कोणास माहीत. कोणी त्याला वसवले, त्याचे त्यालाच माहीत. पण काळ्यामातीच्या जमिनीचा कसदारपणा आणि जवळूनच वाहणाऱ्या तापी नदीच्या पाण्याची विपुलता सोबतीला घेऊन गावात नांदणारी माणसं आपापल्या अस्मिता घेऊन स्वतःपुरता का असेना इतिहास घडवत होती, जगाच्या दैनंदिन व्यवहारात त्याचं काहीही योगदान नसलं आणि त्याला तिळमात्र महत्त्व नसलं तरी. पूर्व-पश्चिमबाजूने वाढीसाठी मर्यादांच्या सीमांचा पायबंद पडला आणि दक्षिण दिशेने विस्तारला निसर्गाने पुरेशी जागाच दिली नसल्याने उत्तर बाजूला पाय पसरत गावाने स्वतःला वाढवत ठेवले आहे. नदीच्या खोऱ्यांच्या सोबतीने उभ्या असणाऱ्या विस्तीर्ण टेकडीच्या पसरट अंगावर हसत, खेळत वाढते आहे, शेकडो वर्षापासून.

दक्षिणबाजूने गावाचा विस्तार जेथे थांबतो, त्याच्या अलीकडे दोनतीन घरे सोडून मावळतीकडे घरंगळत नदीच्या रस्त्याला जाऊन मिळणारी पायवाट गाव आणि नदी यांना जोडण्याचं साधन. या वाटेने सरळ खाली उतरून रस्त्याने लागतांना नदीच्या खोऱ्यांच्या परिघातील परीसरादरम्यान पसरलेलं बरचसं सपाट मैदान आहे. गावाच्या दुसऱ्या अंगाने पश्चिमबाजूला कवेत घेत वळसा घेऊन नदीकडे येणारा मोठा रस्ता याच ठिकाणी येऊन मिळतो; पण या रस्त्याचा उपयोग बैलगाड्यांच्या येण्याजाण्यासाठी. माणसे पायवाटेचाच वापर अधिक करीत असायची, अजूनही करतात. ही पायवाट उतरून, बऱ्याचदा घसरून, पावसाळ्यात तर हमखास- डावीकडे एक लहानसे वळण घेत पुढे मोकळ्या जागी जाऊन मिळते, त्या ठिकाणी पहिली भेट होते पिंपळाच्या झाडाशी. तेथून सरळ पुढे काही पावलांच्या अंतरावर उभं आहे वडाचं मोठं जुनं झाड. पलीकडे खोऱ्यात जागा मिळाली तेथे वेडीवाकडी वाढलेली बाभळीची झाडं आणि माळावरील मोकळ्या जागा बघून दूरदूर विखुरलेली निंबाची पाचसहा झाडं. या जागेला लाभलेला हा निसर्गदत्त परीघ. जणू कुशल कलाकाराने कोरलेलं शिल्प. हा परिसर आमच्या मनाची श्रीमंती. आमच्या लहानपणाला कुबेराचं वैभव देणारी दौलत. या जागेने मला, माझ्यासारख्या अनेकांना, आमच्या पिढीला घडवलं. खेळवलं. वाढवलं. आमचं लहानपण सगळ्याबाजूने समृद्ध, संपन्न केलं. जगण्याचं आकाश आणि अवकाश व्यापक केलं. झाडांसोबत परिसरातील मातीत आठवणींची अनेक रोपं अजूनही रुजली आहेत.

थोडा निवांत वेळ हाती असल्याने घराबाहेर पडलो. पावलं नकळत नदीच्या वाटेने वळती झाली. चालताना उगीचंच लहानपणातल्या पावलांचे ठसे वाटेवरच्या मातीत उमटल्याचा भास होत राहिला. मनातील आठवणीचं मोहरलेपण सोबत घेऊन नदीच्या रस्त्याने चालती झालेली पावले माळावर उतरली. समोर दिसणाऱ्या परिसरावर नजर भिरभिरली; पण नजरेच्या नजाऱ्यातून काहीतरी निसटल्यासारखे जाणवत होते. दिसणाऱ्या दृश्यात काहीतरी कमी असल्याचे वाटत होते. त्याकडे एकदा आणि मनात साकोळलेल्या परिसराच्या प्रतिमांकडे एकदा आलटून, पालटून पाहत होतो. आठवणीतल्या वाटा आणि परिसर तसाच प्रसन्न, प्रफुल्लीत आणि टवटवीत. पण नजरेच्या वर्तुळात दिसणारा परिसर भग्न उदासपण घेऊन उभा असलेला, कोणीतरी भिरकावून दिलेल्या कचऱ्यासारखा. अंगावर अवकळा घेऊन केविलवाणा उभा असलेला. कुपोषित मुलासारखा, सगळीच रया गेलेला. निंब, बाभळीची झाडं हिरमुसलेल्या चेहऱ्याने पांगलेली. पिंपळ पोरक्या पोरासारखा अवघडून उभा. वड तपस्व्यासारखा ध्यानस्थ बसलेला; पण त्याच्या जगण्यातील श्रीमंती आता हरवली आहे. आपला भूतकाळ आठवीत हरवलेलं चैतन्य शोधत आहे. परिसराने जगण्यातील श्रीमंती शेवटचा डाव खेळून जुगाऱ्यासारखी उधळून दिलेली. सगळीकडे खुरटं गवत वाढलेलं. रानवनस्पतींनी आपापल्या जागा हेरून धरलेल्या. त्या असण्यापेक्षा असण्याचीच अधिक अडचण. त्यांच्या अतिक्रमणाने परिसर आपलं अंगभूत वैभव हरवून बसलेला.

कधीकाळी माणसांच्या राबत्यात रमलेला हा परिसर सळसळते चैतन्य घेऊन नांदायचा. दिवसभर आनंदाचे तराणे गात राहायचा. गावातील लहानमोठी माणसे या ना त्या निमित्ताने येथे येऊन जुळत रहायची. आम्हां मुलांसाठी हे वड आणि पिंपळ परिसरासह आंदणच दिलेले. आपलं पोरगं इतकावेळ कुठे पसार झालं आहे, म्हणून त्याला पाहत, शोधत फिरणाऱ्या आईबापाचा शोध येथेच येऊन संपायचा. पोरगं गावात अन्य कुठे नसलं म्हणजे हमखास येथे हुंदडत असायचं. अंगाखांद्यावर उड्या मारणाऱ्या पोरांना वड प्रेमळ आजोबासारखा मिरवत राहायचा. त्याच्या पारंब्यांच्या जटा पार जमिनीपर्यंत पसरलेल्या; अगदी लहानसं पोरगंही त्या पकडून वर चढायचा. वडाच्या आश्रयाने गावाकडील मातीतले खेळ रंगात यायचे. सकाळ आणि संध्याकाळ विलक्षण चैतन्य घेऊन यायची. परिसराच्या क्षितिजावर उतरून मुलांसोबत आनंदरंगांची मुक्त उधळण करीत राहायची.

सुटीच्या दिवशी दुपारच्या वेळी सूरपारंब्यांचा सूर लागलेला असायचा. पोरं माकडांसारखी या फांदीवरून त्या फांदीवर सरसर सरकत रहायची. वडाच्या सानिध्यात विटीदांडूचा खेळ टिपेला पोहचलेला असायचा. सगळा गलका चाललेला. खेळात महारत असणारे मैदानात उतरायचे, लहानग्यांना फारशी संधी नसायची. तेव्हा एकतर त्यांनी आपल्या खेळाची वेगळी चूल मांडायची, नाहीतर वडाच्या फांद्यांवर बसून खेळणाऱ्यांना पाहण्याचा आनंद घेत राहायचा. शाळेत जायची वेळ झाली तरी पावलं काही येथून निघत नसत. पण आईबापाच्या आणि मास्तरच्या माराच्या धाकाने हळूहळू मुलं पांगायाची. शाळेत जाऊन बसायची, मन मात्र वडाच्या अवतीभोवती भटकत राहायचे.

माळावर चरून दुपारच्या निवांत वेळी गावातली गुरंवासरं वडाच्या सावलीत विसावलेली असायची. डोळे मिटून शांतपणे रवंथ करीत बसलेली, जणू एखादा तत्वचिंतक चिंतनसाधना करीत असल्यासारखे. वड त्यांच्यावर ममतेची सावली धरायचा. दुपारची आळसावलेली मरगळ झटकीत सायंकाळी पश्चिमेला उन्हं कलताना परिसर पुन्हा जागा होऊन गजबजायचा, तो थेट चांदणं आकाशात उतरेपर्यंत. चांदण्याच्या शीतल प्रकाशात कबड्डीचा खेळ उशिरापर्यंत सुरु असायचा. धर, पकड, सोडू नको, आउट अशा आरोळ्यांनी निनादत राहायचा.

गावात पाण्यासाठी नळांची सोय नसल्याने नदीवरून पखाली भरून पाणी रेड्याच्या पाठीवरून घरी आणायचे. ज्यांच्याकडे पखालींची सोय नसायची ते घागरी, हंडे भरून पाणी वाहून आणायचे. भरलेल्या घागरी डोक्यावरून उतरवून थोडा विसावा घेण्यासाठी वडाखाली थांबायचे. नदीकडून आणलेल्या पाण्याच्या ओझ्याने थकलेल्या रेड्याचीही पावलं या परिसरात येऊन हमखास मंदावयाची. तो वडाच्या सावलीत थांबायचा. हातातला कासरा सोडून त्याचा मालक; असला हाती वेळ थोडा, तर तेवढ्या वेळात खिशातून पानतंबाखूची चंची काढून वडाच्या पायथ्याशी टेकायचा. नदीवरून पाणी भरायला जाणारी आणि येणारी माणसे वडाच्या बुंध्याशी बसून पानतंबाखूची देवघेव करीत बोलत असायचे. विडी काढून आनंदाचे झुरके मारले जायचे. तेवढ्या वेळात शेती, पीकपाण्याच्या, हंगामाच्या गप्पा रंगायच्या. गावातल्या सासुरवाशिणी पाण्यासाठी, धुणं धुण्यासाठी नदीवर जातांना-येताना डोक्यावरील ओझं उतरवून वडाच्या सावलीत आपल्या माहेरच्या आठवणींची मुळं शोधत राहायच्या. थोडं थांबून एकमेकींचे सुख-दुःख सांगत मन हलकं करून घ्यायच्या. सुना, लेकीबाळी आपल्या सत्यवानाला सुरक्षित ठेवण्याची प्रार्थना करीत वटसावित्रीच्या सणाला वडास प्रेमाच्या धाग्यांनी बांधून ठेवीत. त्याच्याकडे मोठ्या भक्तिभावाने आपल्या यजमानासाठी दीर्घ आयुष्य मागत. तोही आस्थेने आपल्या लेकीबाळींचे सौभाग्य सुरक्षित सांभाळण्याची जबाबदारी घ्यायचा. सुताचे ते धागे बरेच दिवस आपल्या देहावर अभिमानाने मिरवत असायचा.

धार्मिक आस्था बाळगणाऱ्या गावातल्या माणसांसाठी वड नेहमीच आस्थेचा विषय असायचा. परिसरात मंडप टाकून पारायणाचा जागर घडायचा. मंत्रजागराने परिसर दुमदुमत राहायचा. धूप-अगरबत्त्यांच्या सरमिसळ गंधाने दरवळत राहायचा. ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा जे काही असतील, त्या ग्रंथांच्या वाचनाचे सूर वातावरणात मंगलनाद निर्माण करीत राहायचे. माणसे आस्थेने ऐकत असायची. भागवतातील कथेला रंगत चढलेली असायची. बायाबापड्या वाती वळत मोठ्या भक्तीभावाने कथा ऐकत बसलेल्या. अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने वयस्कांच्या थकलेल्या देहात अनामिक ऊर्जा संचारायची. सुरकुतलेल्या चेहऱ्यावर तेज यायचे. पारायणाच्या मधल्या वेळेत जेवणखाणं करून माणसं परत यायची. फावल्या वेळात गप्पांचे फड रंगायचे. गतकाळाच्या स्मृती जाग्या व्हायच्या. एकत्र जमलेली पोक्त माणसे आठवणीत रमलेली असायची. स्मृतीच्या पोतडीत पडलेल्या आठवणी एकेक करून काढल्या जायच्या. आम्ही मुलं त्यांचं बोलणं कान देऊन ऐकत असयाचो. एकीकडे बहरलेला भक्तीचा मळा, तर दुसरीकडे आठवणींचा रंगलेला सोहळा. भूतकाळाच्या उबदार शालीत झोपलेल्या आठवणींना जाग यायची. स्मृतिकोशातल्या मातीत रूजलेल्या विचारांच्या रोपट्यांना पालवी फुटून चैतन्याचा वसंत बहरत राहायचा.

नदीच्या पात्रापासून वड तसा बराच दूर. पण नदीला मोठा पूर आला की, पाणी परिसरातील खोऱ्यातून उड्या मारत उनाड मुलाप्रमाणे मुक्त उधळत राहायचे. मग गावातली माणसे चौकशी करीत रहायची. पुराचे पाणी कुठपर्यंत आले, म्हणून प्रश्न विचारायचे. वडाजवळ पाणी पोहचले का? पारंब्या पाण्यात कुठपर्यंत बुडाल्या? या प्रश्नांच्या उत्तरांवरून पुराचे प्रमाण ठरवले जायचे. वड ओलांडून पाणी पिंपळापर्यंत पोहचले की, माणसे चिंतीत व्हायची. दक्षिण-पूर्वेच्या अंगाने पुराचे पाणी गावाला धडका देत राहायचे. ते पाहून माणसांना धडकी भरायची. एव्हाना पुराच्या पाण्याने आसपासच्या शेतातील पिकं बुडून संपलेली असायची. पिकं गेली तर जाऊ दे, निदान शेतंतरी वाहून जाऊ नयेत, म्हणून शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लागलेला असायचा. पाणी कमी होऊ दे, म्हणून देवाकडे धावा केला जायचा. मग गावातली माणसे पुराच्या पाण्याची पूजा करून नदीची ओटी भरायचे. पाणी कमी होण्याची वाट पाहत असायचे. कधीकाळी महापूर येवून गेल्याचे वयस्कर मंडळी सांगायची. म्हणायचे, ‘तेव्हा सगळा वड पाण्यात बुडाला होता. त्याचा शेंडा तेवढा दिसायचा.’ टेकडीच्या डोक्यावर असणाऱ्या घरांच्या भिंतीपर्यंत पाणी कसे पोहचले, वगैरे वगैरे काही काही सांगत रहायची. जुनीजाणती माणसं म्हणायची, ‘हं! हा काय पूर आहे? आम्ही केवढा मोठ्ठा पूर पाहिला आहे! एवढ्या पाण्याने काही होत नाही!’ म्हणून बाकीच्यांना धीर देत रहायची. त्यांच्या जुन्या गोष्टी ऐकून वड गालातल्या गालात हसत असल्यासारखा वाटायचा.

या वडाशी सगळ्या गावाचं जगणं जुळलेलं. कोणत्यातरी निमित्ताने माणसं वडाच्या कुशीत क्षण-दोनक्षण विसावयाची, जिवंतपणी आणि अखेरच्या यात्रेच्या वेळीसुद्धा. अंत्ययात्रा नदीकडे जातांना गावाला वळसा घालून येणाऱ्या लांबच्या रस्त्याने चालत यायची. खांदेकरी थकलेले असायचे. नदीकडे जातांना वडाच्या झाडाखाली विसाव्यासाठी थोडे थांबायचे. वडासोबत वाढलेला देह त्याच्या पायाशी अखेरचा विसावा घ्यायचा. पिठाचा नैवद्य ठेऊन; कुठूनतरी कोणी एक दगड आणायचा, म्हणे तो जीव असतो. तो सोबत घेऊन तिरडी उचलली जायची. चैतन्य विसर्जित झालेला निष्प्राण देह खांद्यावर घेऊन माणसे चालती व्हायची. वड जणू डबडबलेल्या अंतःकरणाने त्याला अखेरचा निरोप द्यायचा. वडाखाली खेळणाऱ्या आम्हा मुलांचं खेळणं अशावेळी थोडं पुढे पांगायचं. ठेवलेल्या नैवेद्याला स्पर्श करायचा कोणाला धीर होत नसायचा. पण नदीकडील माळावर चरण्यासाठी, पाण्यासाठी जाणाऱ्या गुरांवासरांच्या वावराने तो भिरकावला जायचा. क्षणभर दुःखी झालेला वड आणि शेजारचा परिसर दुःख गिळून पूर्वपदावर यायचा. आनंदाचे झुले परत हलायला लागायचे. मुलं खेळण्यात दंग व्हायची. आस्थेचे नवे गीत बनून परिसर पुन्हा जिवंत झाल्यासारखा वाटायचा.

मुलंमाणसांनाच नाही तर पोपट, कावळे, चिमण्यांच्या संसाराला वडाने आपल्या अंगाखांद्यावर आश्रय दिला. त्यांचे चिमणसंसार त्यावर बहरले. या बहरणाऱ्या संसारातल्या पिलांना पाहण्याचा मोह आम्हा मुलांना पडायचा. वडाच्या ढोलीत पोपटांनी केलेल्या घरात उत्सुकतेने डोकावून पाहिले जायचे. खोप्यातल्या पोपटाच्या पिलांना हाती अलगद धरून बाहेर काढून पाहत राहायचे, त्यांना गोंजारायचे. कावळे मात्र हुशार त्यांची घरं वडाच्या शेंड्यांना धरून असायची. तेथपर्यंत पोहोचायची आमची हिंमत होत नसायची. पक्षांच्या पिलांना उगीचंच त्रास देणारी मुलं एखाद्या जाणत्या माणसाला दिसली की, हमखास रागवायचे. पिलं पुन्हा घरट्यात ठेवली जायची. रोज त्या घरट्यात डोकावून पाहण्याची अनिवार इच्छा असायची. काही बघूनही घ्यायचे. पिलं वाढत राहायची आणि एक दिवस खोपा रिकामा व्हायचा. पिलं आकाशी झेप घेऊन निघून जायची. आम्ही मात्र तेथेच रमलेलो असायचो.

दिवस-रात्रीचा पाठशिवणीचा खेळ सुरु असायचा. ठरल्यावेळी ऋतू बदलायचा. ऋतुमानानुसार वड आपल्या पानांची वस्त्रे बदलवत राहायचा. उन्हाळ्यात कोरडीठाक पडलेली त्याची अंगकांती पावसाच्या पाण्याने चिंब भिजून सुस्नात लावण्यवतीच्या रूपाशी स्पर्धा करताना दिसायची. हिवाळ्यात माळावर खेळणारी मुलं उड्या मारण्यात थंडी विसरायची. पाण्याला गेलेली माणसे ओली होऊन कुडकुडत नदीवरून हंडे, घागरी घेऊन यायची. शेत राखायला आलेली आणि थंडीने कुडकुडणारी माणसं शेकोटी पेटवून अंग शेकत गप्पा झाडीत बसलेली असायची. त्यांच्या शेजारी अंग शेकीत थोडी टेकायची. खेळात लक्ष नसलेली मुलं कोवळे ऊन अंगावर घेत वडाच्या कडेवर जाऊन बसायची. शाळा चुकवून मास्तराच्या माराच्या धाकाने येथेच लपून बसायची. वडाच्या संगतीने मुलांचं वर्षभर खेळणं, वाढणं सुरु असायचं. हा वड सगळ्या पोरांना आपला वाटायचा. हे आपलेपण परिसराशी जुळलेल्या नात्याच्या धाग्यांची वीण घट्ट करीत राहायचे. आस्थेवाईकपणाचा अनमोल ठेवा घेऊन जीवनऊर्जा घेत कितीतरी पिढ्या आपल्या पंखांनी येथूनच आकांक्षांच्या आकाशात उडल्या, आपलं क्षितिज शोधण्यासाठी. वडपिंपळ अन् तेथला परिसर तसाच मागे ठेवून.

काळ बदलला. विज्ञानतंत्रज्ञानाची साधने हाती घेऊन विद्यमान पिढ्याही बदलत आहेत. त्यांच्या जगण्याची दिशा आणि प्रयोजनेही बदलली. जागतिकीकरणाच्या सुधारणेचे वारे गावापर्यंत पोहचले. सुविधांनी गावात संचार करायला सुरवात केली. गावात, घरात टीव्ही आल्या. मुलं त्याभोवती गर्दी करू लागली. पडद्यावरच्या आभासी रंगीत जगामुळे बाहेरच्या जगाचे रंग फिके वाटू लागले आहेत. मुलं हल्ली मनमुराद खेळत नाहीत. गावमातीतले साधेसेच, पण आनंदाची पखरण करणारे खेळ इतिहासजमा होऊन मोबाईलवरील खेळ आवडू लागले. टचस्क्रीनने स्मार्ट झालेल्या फोनचा स्पर्श त्यांना सुखद वाटतो. रानातला पिकांचा गंध, झाडाफुलापानांचा, मातीचा, नदीच्या पाण्याचा स्पर्श त्यांना सुखावत नाही. मोबाईलच्या माध्यमातून जगाच्या टचमध्ये असणारी पिढी परिसराच्याच टचमध्ये नाही. निसर्गाच्या मुक्त वातावरणाचा स्पर्श त्यांना पुलकित करीत नाही. विज्ञानाने जग हातात सामावण्याएवढे लहान केले; पण सहजपणाने जगण्याचे प्रवाह अवगुंठित होत आहेत. अनेक बाजूंनी माणसं रिती होत आहेत. रितेपणातून आलेले मनाचे कोतेपण वाढत आहे.

गावांगावात थोड्याफार फरकाने असेच घडत आहे. माळावरील मोकळ्या जागेत हुंदडणारी पावलं थांबली, थबकली. त्यांची जागा घेऊन रानगवत, रानवनस्पतींनी आपले पाय परिसरात पसरवले. त्यांच्या पावलांचा पसारा वाढला. त्या पसाऱ्यात परिसराची रया पार हरवली आहे. एक बकाल उदासपण त्यावर पसरलेलं आहे. कधीकाळी माणसांच्या सहवासाने फुललेला परिसर शापित जगणं घेऊन उभा आहे. आपलं गतवैभव परत येईल या आशेवर, कोण्या उद्धारकर्त्या प्रेषिताची वाट पाहत. पण तो येईल का? माहीत नाही. आणि आला तरी फार काही करू शकेल असे वाटत नाही, कारण येथील प्रेत्येक माणूस स्वतःलाच महात्मा समजून वागतो आहे. इतरांचे महात्म्य दुर्लक्षित करून जगणं म्हणजे स्वातंत्र्य असे समीकरण होऊ पाहत आहे. स्वातंत्र्याचा सोयिस्कर अर्थ लावून वागणं घडत आहे. चांगलं, वाईट काहीही ऐकून घ्यायची तयारी नाहीये. मी जसं वागतोय, तेच आणि तेवढंच आदर्शवर्तन असल्याचा समज दृढ होतोय. जगण्यातले साधेपण विसर्जित करून स्वार्थात परमार्थाचे प्रतिबिंब पाहिले जाते, तेव्हा माणसाची प्रतिमा धूसर होत जाते. स्वाभाविक जगणं विसरलेली माणसं मनाने संकुचित होत जातात. माणसे खुजी झाली म्हणजे बदलसुद्धा थिटे होतात, नाही का?

Aswasth Chitre | अस्वस्थ चित्रे

By // 12 comments:
१. सन. २०१५,
सीरियात राहणाऱ्या आयलान कुर्दीच्या मृत्यूने जगभरातील संवेदनशील माणसांची मने गलबलून आली. समुद्रकिनाऱ्यावर निपचित पडलेल्या लहानग्याच्या देहाचं चित्र ज्यांनी पाहिलं, त्या प्रत्येक मनात कालवाकालव झाली. ज्या वयात मुलांनी हसावं, खेळावं त्या वयात मुठभर देह सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला पालकांसोबत विस्थापित व्हावं लागलं. नियतीने पाश घट्ट आवळले. क्षणात होत्याचे नव्हते झाले. जीवनाचं रुजलेलं रोपटं उखडून फेकलं गेलं. सगळ्याबाजूनेच परिस्थितीच बेईमान झाली. स्वकीयांच्या सहवासाचे सगळे पाश सोडून ओंजळभर सुखाच्या शोधासाठी आशेच्या मृगजळामागे धावणे नियतीने निर्धारित केले. जीवनाचे गाठोडे घेऊन दिशाहीन वणवण करणे नशिबी आले. ज्या भूमीत जीवनवृक्षाच्या अस्तित्वाची मूळं रुजली होती तेथील आस्थेचा ओलावा संपला. सहज, साधं, सरळ जगणं शक्य नसल्याने अन्य वाटांनी प्रवास करीत जीवनाची नवी पहाट शोधणे आवश्यक ठरले. जीवनाचा नम्रपणे शोध घेत सरळ मार्गाने वर्तणारी माणसे कलहप्रिय माणसांच्या जगात वेडी ठरतात. त्यातील हेही एक कुटुंब. प्रयत्न करूनही आपलेपणाचा स्नेह हाती लागण्याचा संभव नसल्याने समस्यांच्या सागरात ढकलून सुखाचा किनारा गाठण्याच्या प्रयत्नात नियतीने सगळा खेळ संपवला. डोळ्यात साठवलेला आणि मनात गोठवलेला आशेचा कवडसा परिस्थितीच्या निबिड अंधारात हरवला. सोबत आयलानची आई आणि भाऊही गेले. वडील वाचले, पण त्यांच्याकडे जगण्याची आसक्ती निर्माण करेल असे काहीच शिल्लक नाही. जगातला कोणताही देश आता त्यांना नकोय.

२. सन. १९९३,
सुदानमध्ये दुष्काळ पडला. माणसं हाडांचे सापळे झाले आहेत. उपासमार आणि त्या मार्गाने चालत येणारे भूकबळी जगण्याचे विधिलिखित बनले आहे. एकीकडे जगाचे व्यवहार सुनियोजित सुरु असताना; त्याच जगाच्या दुसऱ्या बाजूला रोजचं जगणं उध्वस्त झालं आहे. माणसे जगण्याच्या संघर्षात तुटत आहेत. परिस्थितीच्या पहाडाला धडका देऊन गलितगात्र झाली आहेत. संघर्ष करूनही हाती काहीच लागत नसल्याने सभोवताली भकासपण दाटून आले आहे. केविन कार्टर नावाचा छायाचित्रकार दुष्काळाचे चित्रण करण्यासाठी तेथे गेला. एक दिवस धान्य घेऊन गाडी आली. प्रत्येकाने मिळाले ते घेतले. केविन काही चित्रे कॅमेऱ्यात बंदिस्त करून थोडा निवांत बसला. अचानक त्याचं लक्ष एका दृश्याकडे गेले. एक मुलगी- तिच्या देह हाडांचा सापळा झालेला. कशीतरी खुरडत खुरडत ती चालते आहे. चालण्याएवढेही त्राण तिच्या देहात उरलेले नाही. खाली पडलेले धान्याचे दाणे कसेतरी वेचते आहे. तेवढ्यात एक गिधाड तिच्या मागे येऊन थांबते. त्याचे लक्ष त्या मुलीच्या खंगलेल्या देहाकडे लागलेले. गिधाडाच्या डोळ्यात सावज सापडल्याचा आनंद. केव्हा एकदा त्या देहातील चैतन्य संपते, याची त्या गिधाडाला प्रतीक्षा. केविन ते दृश्य कॅमेऱ्यात टिपतो. तो प्रसंग कॅमेऱ्यात कैद करून कायमचा साठवला जातो. १९९४ मध्ये न्यूयॉर्क टाईम्समधून ते प्रकाशित झाले. चित्र पाहून संवेदनशील मनं हादरली. त्या मुलीचे काय झाले असेल, या प्रश्नाने अस्वस्थ झाली. छायाचित्रणासाठी असलेल्या पुलित्झर पारितोषिकाने केविनला सन्मानित करण्यात आले. कोणत्याही छायाचित्रकारासाठी असलेले सन्मानाचे स्वप्न स्वतःहून केविनकडे चालून आले. आपल्याकडे काम करण्यासाठी मागेल तो पगार व पद द्यायला नामांकित नियतकालिकं तयार होती. मान-मरातब सारेकाही मिळाले. पण केविन मात्र विमनस्क, विषण्ण होता. त्याच्या डोळ्यासमोरून दुष्काळाची भेसूर दृश्ये हलायला तयार नव्हती. जगाचं भीषण वास्तव पाहून मनातील संवेदना सुन्न झाल्या. अगतिक माणसांसमोर परिस्थितीने निर्माण केलेले प्रश्न त्याला विचलित करीत होते. समस्यांनी दुभंगलेल्या जगासाठी मी काहीही करू शकत नाही, ही खंत मनातून निघत नव्हती. तो अस्वस्थ झाला. माणसांचे असे जग त्याला नको होते. समोर दिसणारे हाडांचे सापळे, भूकबळी, असहाय उपासमार काहीही केल्या विसरू शकत नव्हता. जग स्वतःच्या सुखाच्या वर्तुळातून बाहेर यायला तयार नव्हते. प्रश्नाचे उत्तर सापडत नव्हते. अखेर एक दिवस त्याने आत्महत्या करून आपल्यापुरते या प्रश्नाचे उत्तर शोधले.

३. सन. १९६९,
व्हिएतनाम आणि अमेरिका संघर्षकाळातील हे एक चित्र. युद्धात सारे नीतिसंकेत गुंडाळून ठेवण्याचा माणूस जातीचा इतिहास तसा खूपच जुना आहे. काहीही किंमत मोजून विजय आपल्याला मिळावा म्हणून अनेकदा अविचाराने वागणे घडत आले आहे. हे माहीत असूनही परत त्याच मार्गाने वर्तण्याचा हा परिपाक. अमेरिकेने नापाम बॉम्बचा (पेट्रोलमध्ये अन्य रसायने- जसे रबर, अल्युमिनियमची भुकटी वगैरे मिसळून तयार करण्यात येतो. पेट्रोलच्या प्रत्येक थेंबाची ज्वलनशीलता वाढून अधिक विनाशकारी ठरतो.) वापर केल्याने माणसांचं जगणं होरपळून निघाले. बॉम्बहल्ल्याने  उडालेल्या आगीच्या लोळांपासून स्वतःला सुरक्षित राखण्यासाठी जीवाच्या आकांताने लहान लहान मुलेमुली रस्त्यावरून पळत आहेत, आपला ओंजळभर जीव वाचावा म्हणून. त्यांच्या भेदरलेल्या डोळ्यात मूर्तिमंत मृत्यू दिसतो आहे. जगण्याचे पाश सहज सुटत नाहीत. पण जगणंच जाळायला निघालेल्या उन्मत्त मानसिकतेला ते सहसा नजरेस येत नाही, कारण डोळ्यांवर स्वार्थपूरित विचारांची पट्टी घट्ट बांधून घेतल्यावर समोरचे काही दिसण्याची शक्यता नसतेच. दिसत असतात फक्त फायद्याची गणिते आणि त्यांच्या पूर्ततेसाठी सारासार विवेक विसरून घडणारं वर्तन. नापाम बॉम्ब्स काय करू शकतात याचं हे भयावह चित्र. ही मुले जणू याचंच प्रतीक बनली.

माणसांच्या जगण्याची ही काही अस्वस्थ चित्रे.

संबंधित घटनांच्या काळात काही वर्षांचे अंतर असले, त्या वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आणि त्यांच्या मागे असणारे संदर्भ वेगळे असले तरी वेदनांचा चेहरा मात्र सारखाच. सहृदय माणसांचे हृदय पिळवटून टाकणारा.

विद्यमान विश्वाने विकासाची नवी क्षितिजे निर्माण केली, प्रगतीचे नवे आयाम उभे केले म्हणून आम्ही माणसांनी आपलेच कौतुक करून घेण्यात कोणतीही कसर राहू दिली नाही. मानवजातीच्या कल्याणाच्या वार्ता जग करीत आहे. विज्ञाननिर्मित शोधांनी निर्माण केलेली सुखं सोबत घेऊन समृद्धीची गंगा दाराशी येऊन थांबली आहे आणि तिच्या प्रवाहाने जगण्याच्या प्रांगणात संपन्नता आणली आहे. माणसांसमोर आता कोणतेही जटील प्रश्न जणू शिल्लक राहिलेच नाहीत, अशा आविर्भावात वागणे घडत आहे. माणसे सुखाने जीवनयापन करीत असून त्यांच्या समोरील समस्यांचा गुंता बहुतेक सुटला आहे, असे आभासी चित्र उभे केले जात आहे. वास्तव काय आहे, हे लक्षात यायला आवश्यक असणारे सहजस्फूर्त शहाणपण आपल्याकडे आहे का? असा प्रश्न विचारायची कोणालाच गरज नसल्यासारखे वागणे घडत आहे.

जगाचं वास्तव दिसतं तसं कधीच नसतं. तेथेही विसंगतीच्या, भेदाभेदाच्या असंख्य लहान-मोठ्या, दृश्य-अदृश्य भिंती उभ्या असतात. महासत्ता, विकसित, विकसनशील, अविकसित अशा परगण्यात जगाला विभागून प्रत्येकाला आपआपला फायदा लाटायची घाई झाली आहे. स्वार्थाकरिता कोणी कितीही कुलंगड्या केल्या तरी काही बिघडत नाही, या विचारांवर विश्वास ठेवून वर्तणाऱ्याची वानवा नाही. यातही विशेष असा की, प्रत्येक देश-प्रदेशाच्या वाट्याला येणाऱ्या फायद्याची आणि न्यायाची परिभाषा बदलत असते. तिच्यात प्रसंगानुरूप परिवर्तन घडत असते. सत्तेच्या सारीपाटावर सोंगट्या सरकवल्या जातात. लहान-मोठे प्यादे हाती घेऊन वजिराला कोंडीत पकडून राजाला शह देण्यासाठी खेळ खेळले जातात. आपापले अहं सांभाळण्यासाठी अतर्क्य, असंभव, अवास्तव गोष्टी घडवून आणल्या जातात. फायद्याचे गणित जुळत असते तोपर्यंत विस्तवाशीही खेळले जाते. गरज संपली की, त्याचं सोयिस्कर विसर्जन केलं जातं. स्वार्थाच्या गणिताच्या उत्तरासाठी आपण म्हणू तसे आणि तेच उत्तर देणारी सूत्रे वापरली जातात. नसतील तर तशी तयार करून घेतली जातात. निसटलेच काही हातचे तर पुन्हा नवा खेळ नव्या पटावर मांडला जातो; फायद्याची गणिते नजरेसमोर ठेऊन.

माणसांच्या जगण्याला मोहरलेपण देणारे, माणसाची प्रतिष्ठा राखणारे भेदरहित जग आकारास आणण्याची वार्ता करायची. त्यासाठी एकीकडे त्याला आश्वस्त करायचे आणि दुसरीकडे विसंगतीने नटलेलं आणि रक्तलांच्छित खेळाने रंगलेलं जग सोबतीला आहे ते आहेच. त्याचे विसकटलेले रंग अजूनही माणसांना बदलता आलेले नाहीत. स्वार्थाच्या कलहात सामान्य माणसांचे जगणे उसवत आहे. अविचाराने घडलेल्या कृतीतून विचारांचे प्रवाह अवगुंठित होत आहेत. स्वार्थपरायण विचारांच्या विकृतीने जग फाटतेय, याची जाणीव असून नसल्यासारखे वागणे घडत आहे. सत्तेसाठी, स्वार्थासाठी विधिनिषेधशून्य खेळ खेळत राहायचे आणि सामान्य माणसांनी अशा जगण्याला आपलं नशीब म्हणून स्वीकारायचे, आला दिवस असंख्य प्रश्नांच्या आवर्तात भिरभिरत राहायचे, हे जगण्याचे प्राक्तन होऊ पाहत आहे. नियतीने नशिबी लादलेले भोग घेऊन माणसे धूसर क्षितिजावर दिसणारा सुखाचा एक पुसटसा कवडसा जीवनाच्या प्रांगणात आणण्यासाठी अस्वस्थ वणवण करीत आहेत. जीवनाच्या विसकटलेल्या वाटांनी फाटक्या नशिबाला सांधण्यासाठी चालत आहेत. आज नसेल निदान उद्यातरी नियती कूस बदलून आनंदाचे ऋतू जीवनी आणेल, या आशेवर जगण्यासाठी किमान आवश्यक गरजांची पूर्तता करू शकणाऱ्या प्रदेशाकडे नेणाऱ्या वाटांचा शोध घेत आहेत.

जग कसे आहे, कसे असावे, याबाबत जाणकारांचे मत काही असो, जगाच्या व्यवहाराचे पीळ कसेही असोत. मुत्सद्यांच्या मुद्देसूद विचारांमध्ये जगाचे चित्र काही असो. विचारवंतांच्या विवक्षित विचारांमध्ये जगाची प्रतिमा कशीही आकाराला येवो. सामान्यांच्या आकलनापलीकडील या गोष्टी असतात. कोण चूक, कोण बरोबर, या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घ्यायला त्यांना नियती उसंतच देत नसते. जगण्याच्या अगणित अवघड प्रश्नांच्या भोवऱ्यात ते भिरभिरत असतात. त्यांचं जगणंचं वावटळीत सापडलेल्या पाचोळ्यासारखे. असंख्य प्रश्न घेऊन गरगर फिरणारे. त्यांच्या गरजा समृद्धीची बेटे निर्माण करण्याच्या कधीच नसतात. प्रगतीच्या पंखांवर स्वार होऊन आकाशात मुक्त विहरायच्या नसतात. जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांच्या पर्यायांशी त्या निगडित असतात. भाकरीचा शोध त्याच्यासाठी गहन प्रश्न असतो. भुकेने निर्माण केलेल्या वर्तुळाशी त्याचं जगणं करकचून बांधलेलं असतं. जेव्हा त्याच्याकडून भाकरीच हिरावून घेतली जाते, तेव्हा समस्यांचा गुंता वाढत जातो. व्यवहारातील साधेसेच प्रश्न अवघड होतात आणि हाती असलेले उत्तरांचे पर्याय विफल ठरतात. माणसे परिस्थितीने विकल होतात, तेव्हा मनाच्या मातीत गाडून टाकलेला वणवा वेगाने उसळून बाहेर येतो. त्याला कोणी क्रांती नावाने संबोधतात, कोणी परिस्थिती परिवर्तनाचा प्रयोग म्हणतात. अन्यायाविरोधात, सर्वंकष सत्तेच्या अत्याचाराविरोधात, अविचाराविरोधात एल्गार घडतो. संथ लयीत चालणाऱ्या जीवनप्रवाहात वादळे उठतात. प्राप्त परिस्थितीविरोधात संघर्ष घडतो. अशा संघर्षांचे मोल शेवटी सामान्यांनाच चुकवावे लागते. माणूस म्हणून माणसाला मिळणारा सन्मान नाकारला जातो, तेव्हा सन्मानाने जगण्यासाठी हाती शस्त्रे धारण केली जातात. सत्तेच्या सिंहासनाच्या ठिकऱ्या केल्या जातात. राजा, राजपाट बदलूनही स्वस्थता जीवनी यायला तयार नसते, तेव्हा सुखाच्या लहान-मोठ्या तुकड्यांचा शोध घेत माणसांना अन्य क्षितिजे गाठावी लागतात.

अनियंत्रित सत्ताधीशांच्या, अविवेकी आक्रमकांच्या अनन्वित अत्याचारांनी सर्वस्व हरवून बसलेली माणसे दुभंगलेले जगणं सोबत घेऊन रोजचं मरण अनुभवत आस्थेचा ओलावा आणण्यासाठी चालत असतात. जगण्याची छोटीशी आस बांधून समस्यांच्या वावटळीत हरवलेली स्वप्ने शोधत राहतात. डोळ्यांनी दिसणारे आणि सुखांची अनवरत रिमझिम बरसात करणारे जग फक्त काही लोकांसाठीच का? या विचाराने विचलित होतात. एकीकडे मूठभर लोकांसाठी सगळंच असणं आणि दुसरीकडे काहीच नसणं, हा जगाचा खरा चेहरा असू शकत नाही, याची जाणीव घडून येते. आपण उपेक्षित का? नियतीने आपल्याच ललाटी हे भोग का लिहिले असावेत? या विचाराने अस्वस्थ होतात. वेगवेगळे प्रासंगिक मुखवटे धारण करून कष्टकऱ्यांच्या जगण्याचा चेहरा आपल्या फायद्यानुसार बदलणाऱ्या स्वार्थपरायण माणसांनी निर्माण केलेली व्यवस्था याचे कारण असल्याचे जाणवते, तेव्हा परिस्थितीने गांजलेली माणसे दांभिकांनी धारण केलेला बेगडी मुखवटा उतरवण्यासाठी रणक्षेत्री उतरतात. आपलं अस्तित्व आणि अस्मिता शोधण्यासाठी संघर्षाची अस्त्रे, शस्त्रे हाती घेत परिस्थिती परिवर्तनाकरिता सर्वस्व उधळण्याची तयारी ठेऊन दोन हात करीत उभे ठाकतात.

कलहाने फाटलेले आणि संघर्षाने विटलेले जग सोबत घेऊन माणूस किती काळ सुखाच्या शोधात जगणार आहे? अस्तित्वाचा हरवलेला ओलावा शोधण्यासाठी सैरभैर झालेलं, स्वतःची ओळख हरवलेल्या चेहऱ्याचं जगणं आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांच्या हाती देणार आहोत का? माणूस म्हणून प्रत्येकाला आपलं स्वयंभू अस्तित्व असणारं जगणं देण्यासाठी काहीच न करणारं जग देणार आहोत का? ज्याच्याकडे स्वतःचे निर्णय घेण्याइतपत प्रज्ञा आहे, असा कोणीही माणूस अविचाराने दुभंगलेल्या आणि संवेदनांनी उसवलेल्या जगास आपले म्हणणार नाही. प्रत्येकास त्याच्या वकुबाप्रमाणे जगण्यालायक अंगण मिळावे, म्हणून आधी आपणास इतरांचा सन्मान करता यायला हवा. माणूस म्हणून इतरांना दिली जाणारी प्रतिष्ठा साहजिकच आपणासही सन्मानाच्या परिघापर्यंत पोहचविते. जगाच्या वर्तनाचे प्रवाह सगळेच वाईट असतात किंवा सगळेच चांगले असतील, असे कधीही नसते. चांगले आणि वाईट यांच्या संयोगाने घडणारे व्यामिश्र वेगळेपण हाती घेऊन अनुकूल ते आणि तेवढेच आचरणात आणणे, यातच माणूसपणाचे सौख्य सामावले आहे. वेगवेगळ्या विचारधारांचा तौलनिक मागोवा घेत; चांगले ते स्वीकारणारे व्यापकपण विचारांच्या विश्वात रुजणे म्हणूनच आवश्यक असते.

माणूस जातीचा इहतलावरील जीवनाचा इतिहास संघर्षगाथा आहे. जगण्याचे असंख्य प्रश्न सोबत घेऊन सहस्त्रावधी वर्षापासून तो चालतो आहे, सुखाचे ओअॅसिस शोधत. आहे ते जगणं समृद्ध करून आणखी काही हवे वाटल्याने वेगवेगळ्या विचारधारांचे परिशीलन करीत तो वर्ततो आहे. असंख्य प्रश्नांच्या गुंत्यातून आपणास हवे ते शोधत राहिला आहे. मुक्त असण्याची उपजत ओढ घेऊन जगत आला आहे. तरीही राज्य, राजसिंहासन, धर्म, जात, वंश, कधी आणखी काही, असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या सहज जगण्याला सीमित करीत राहिले आहेत. जोपर्यंत फक्त माणूस म्हणून माणूस जगत होता, तोपर्यंत त्याला माणूस म्हणणे संयुक्तिक वाटत असे; पण माणूसपणाच्या मर्यादांना ओलांडून आपले अहं सुखावण्यासाठी त्याने इतरांच्या स्वातंत्र्याचा संकोच केला, तेव्हा त्याच्या जगातून आधी माणुसकी हरवली आणि त्यामागे विचारांचे उसवलेपण आले. स्वाभाविक जगण्याला तिलांजली दिली गेली. सहज प्रेरणांनी प्रेरित जगण्याच्या प्रवाहांना पायबंद पडला. स्वातंत्र्याचा संकोच होत गेला. वेगवेगळ्या प्रासंगिक अपेक्षांच्या चौकटीत बंदिस्त होताना माणसांचं जगणं अधिक जटील होत आहे. प्रश्नांच्या गुंत्यात गुरफटलेली माणसे ओंजळभर सुखाच्या शोधात धावत आहेत.

वैयक्तिक स्वार्थ साधणारे सारे विधिनिषेध विसरून स्वार्थाच्या वर्तुळांची भक्कम तटबंदी करून आपले परगणे सुरक्षित करीत आहेत. माणसांसमोरील सगळ्या प्रश्नांचे मूळ अविचाराने घडणाऱ्या कृतीत असते. तसेच आपण वागतो आहोत, ते आणि तेवढेच योग्य आहे, असे समजण्यातही असते. ज्याला माणूस म्हणून जगण्याची प्रयोजने समजतात त्याला जगावे कसे, हे प्रश्न सहसा पडत नाहीत. पण हल्ली विचारांचं व्यापकपण सोबतीला घेऊन वर्तणाऱ्याची वानवा नजरेत भरण्याइतपत जाणवत आहे. समाजाच्या संवेदनांचे प्रवाह संकुचित होणे सांस्कृतिक तेजोभंग असतो. सांस्कृतिक पडझड माणसांना नवी नाही. माणसाच्या इतिहासाचे ते अविभाज्य अंग आहे. पडझडीनंतर उठून पुन्हा उभं राहण्यात संस्कृतीचे सामर्थ्य सामावलेले असते. पुनर्निर्माणाची ताकद गमावलेली माणसे विकासगामी पथ निर्माण करण्याची क्षमता हरवून बसतात. ज्याला परंपरांचे पायबंद पडतात ते आनंदाचे नवे प्रदेश निर्माण करू शकत नाहीत. संवेदनांचे विस्मरण घडलेला समाज माणसांच्या मनात आकाशगामी आकांक्षांचे दिवे प्रदीप्त करू शकत नाही. विचारांचे तेजस्वीपण हरवलेली पराभूत मानसिकता आस्थेचा कवडसा शोधायला निघालेल्या माणसांच्या पायाखालच्या अंधारल्या वाटा उजळू शकत नाही.

एक मरे दुजा त्याचा शोक वाहे, नकळत तोही पुढेच जात आहे, असे म्हणतात. आरंभ, स्थिती, लय क्रमाने प्रत्येक जिवाची जीवनयात्रा सुरु असते. देहासह नांदणारे चैतन्य एक दिवस संपते. शिल्लक काहीही उरत नाही. उरल्याच तर स्मृती; तेही संबंधितांचे कार्य त्या रुतब्याचे असेल तर, अन्यथा अनेक जीव जसे जन्माला आले आणि गेले त्यातला हाही एक. पण एखाद्याच्या जाण्याने अनेकांच्या पापण्यांच्या कडा ओलावतात. त्यांच्या जाण्याने अनामिक अस्वस्थता निर्माण होते. ओळखीचे कोणी असेल तर माणसे हळहळतातच; पण जगात अशीही काही माणसे असतात, ज्यांना आयुष्यात आपण कधीही पाहिले नसते. ना त्यांचा देश ठाऊक असतो, ना त्यांचे नाव-गाव ठावूक असते, तरीही त्यांचे अनपेक्षितपणे जाणे समोर येते आणि माणसे अस्वस्थ होतात. त्यांच्यातील माणूसपणाला देश, प्रदेश, धर्म, पंथ, जातीची कुंपणे नाही बंदिस्त करू शकत. ज्याच्याजवळ मनाचं नितळपण शिल्लक आहे आणि संवेदनांनी गहिवरणारी मन नावाची अमूर्त; पण सहवेदना बनून प्रकटणारी भावना आहे, त्यातून प्रकटणारी स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणून डोळ्यांमध्ये आसवांचे दोन थेंब आहेत अशी माणसे अस्वस्थ होतात, हे अस्वस्थपण माणसातील माणूसपण शिल्लक असल्याचे द्योतक असते.

Shodh | शोध

By // 6 comments:
माणूस इहलोकी जन्माला येतो तो नियतीने दिलेलं गाठोडं सोबत घेऊन. नियतीने रेखांकित केलेल्या जीवनरेषेवरून त्याचा जगण्याचा प्रवास घडत असतो. ही रेषा सरळसोट असेलंच असे नाही. बऱ्याचदा ती वेगवेगळी वळणं घेऊन पुढे सरकत असते. माणसं चालत राहतात परिस्थितीने नेमलेल्या मार्गावरून काहीतरी शोधत. जे त्याला खुणावत असते आपल्याकडे येण्यासाठी. त्यातून लागते हाती काही, काही निसटते. सुटले ते मिळवण्याकरिता सुरु होतो पुन्हा शोध. माणसं धडपड, धावाधाव करीत राहतात. ज्याचा शोध घेत होते ते हाती लागल्याने सुखावतात. शोधूनही हवं ते न मिळाल्याने निराश होतात. मार्ग अवरुद्ध होत जातात. आलेल्या अपयशाशी दोन हात करीत उभं राहण्याची उमेद अशी सहज टाकता नाही येत, म्हणून परिस्थितीशी धडका देत राहतात. प्रश्नांचा गुंता वाढत जातो. त्यांचे पीळ सैल करीत, गाठी-निरगाठी सोडत माणसांची शोधयात्रा सुरु असते. कोणास काय हवे, ज्याचे त्याला माहीत; पण हे शोधणंच माणसांच्या जगण्याला विश्वास देत असते. हा विश्वास जीवनात लहानसहान गोष्टीतून मिळणारा आनंद निर्माण करण्यासाठी प्रेरित करीत राहतो.

माणसांचं जगणं हीच एक शोधयात्रा आहे. त्याच्या आदिम अवस्थेपासून ती सुरु आहे. निसर्गाच्या सानिध्यात टिकून राहावं कसं, या प्रश्नाचा शोध त्याच्या जीवनाच्या शोधयात्रेचा प्रारंभ होता. निसर्गाचा न्यायच कठोर असल्याने तेथे पुनर्विचार नाही. चुकांना क्षमा नसते. एक चूक आयुष्याचा शोध संपण्याचे कारण ठरू शकते, म्हणूनच सुखमंडित जगण्यासाठी अनुकूल पर्यायांचा शोध घेणं त्याची आवश्यकता होती. उपजीविकेची प्रगत साधने हाती नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न नित्याचाच होता. भाकर कमावण्याचे तंत्र अवगत नसल्याने जिवंत राहण्याकरिता शिकारीमागे धावाधाव करणे गरजेचे होते. एवढे करूनही हाती काही लागले नाही की, हताश होण्याशिवाय काही उरत नसे. अशावेळी भुकेचा प्रश्न सोडवण्यासाठी अन्य पर्याय तपासून पाहण्याची गरज निर्माण झाली असेल. कालांतराने काही विकल्प हाती लागत गेले. जीवन स्थिरचित्त होण्याच्या दिशेने निघाले. निसर्गाच्या सानिध्यात विहरताना अनेक गोष्टी दिसत गेल्या, त्यांची चिकित्सा होत गेली. जगण्याला अनुकूल असणाऱ्या गोष्टी स्वीकारल्या गेल्या. धरतीतून अंकुरित होणारी रोपटी भाकरीच्या शोधाचे उत्तर असू शकते याची जाणीव झाली. शेतीचा शोध लागून भाकरी हाती आल्याने आपणाकडे आणखी काही असावे असे वाटायला लागले. जिज्ञासा, कुतूहल उपजतच असल्याने स्थिरचित्त झालेल्या मनात अन्य गरजांचा शोध घेण्याची आकांक्षा निर्माण झाली. जीवनाच्या विकासक्रमातील प्रगतीचे एकेक टप्पे प्रासंगिक गरजपूर्तीच्या उत्तरांचा शोध होता. माणूस तंत्रज्ञान निर्माण करणारा जीव असल्याने ज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान, कला, साहित्य आदी क्षेत्रात त्याच्या प्रज्ञेचा प्रकाश पडायला लागला. वास्तव्याच्या ठिकाणी भिंतींवर कोरलेल्या साध्याशा रेषेपासून नाना रंगांनी मंडित जगण्याच्या आविष्कारांपर्यंत घेतलेली झेप त्याच्या सामाजीकरणाच्या वाटेवरील सहज प्रेरणांचा शोध होता.

माणूस आज ज्या स्थानी येऊन पोहचला आहे, तेथपर्यंतचा प्रवास त्याच्या प्रामाणिक परिश्रमांची शोधगाथा आहे, त्याच्या आकाशगामी आकांक्षांचे फलित आहे. अश्मयुगापासून अण्वस्त्रयुगापर्यंत पोहचण्यामागे माणसांची शोधवृत्तीच महत्त्वाचे कारण ठरली आहे. मनात उदित होणाऱ्या अनेक प्रश्नांनी त्याच्या प्रवासाला दिशा दिली. प्रश्नांकित समस्या त्याला अपरिचित परगण्याच्या शोध घेण्यास प्रेरित करीत राहिल्या. मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांनी समुद्रतळापासून सूर्यबिंबापर्यंत अज्ञात प्रदेशांचा शोध घेण्यास उद्युक्त केले. विश्वाचे गूढ त्याच्या भटकंतीच्या आयुष्यापासून सोबत होतेच. ते जाणून घेण्याच्या इच्छेतून अनेक घटनांचे अन्वयार्थ लावीत तो अज्ञाताचा शोध घेत राहिला. आपण इहतली आहोत, तसेच विश्वात अन्यत्र कुणीतरी जीव अस्तित्वात असतील का? या प्रश्नाच्या शोधासाठी विज्ञानतंत्रज्ञानाचे पंख लेऊन अवकाशात भराऱ्या घेतो आहे. मनी विलसणारे कुतूहल त्याच्या शोधदृष्टीचा परीघ विस्तारत नेण्याचे कारण आहे. धरतीवर जीवनयापन घडताना अनेक जीवजातीसोबत वावरतो आहे. जीवनयात्रा घडते कशी, या प्रश्नाचा धांडोळा घेतो आहे. कितीतरी गोष्टी शोधूनही मनाला स्वस्थता लाभत नसल्याने त्याला आणखी काही हवे आहे. हवं ते मिळणे त्याच्यासाठी सुखाचा शोध आहे. सुख माणसांची सार्वकालिक गरज आहे. पण सुख म्हणजे काय? याचाच शोध अद्याप लागायचा आहे. कुणाला सत्तेचं सुख हवं आहे, कुणाला संपत्तीत सुख गवसतं, कुणाला पदांमध्ये प्रतिष्ठा दिसते. कुणाला आणखी काही हवं आहे. हे काहीतरी मिळणं महत्त्वाचं वाटल्याने, ते मिळवण्याकरिता सगळेच पर्याय तपासून पाहतो आहे.

माणूस समाजशील प्राणी असल्याचे म्हणतो. समाजाचं जगणं संपन्न होण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असते. सर्वांच्या सहकार्याचा परिणाम समाजजीवनाचा विकास असतो. माणूस समाजाचा घटक असल्याने त्याच्या मनात उदित होणाऱ्या भावभावनांना सत्प्रेरित विचारांच्या कोंदणात अधिष्ठित करण्याची गरज सामाजिक जाणिवांचा शोध होता. सहकार्य भावनेतून घडणारा माणसाचा प्रवास उन्नतीकडे घडतो, उदात्त विचारांची प्रतिष्ठापना करण्यास कारण होतो. सर्वांचे वर्तन नीतिसंमत असावे म्हणून जगण्याच्या चौकटींना मर्यादांची कुंपणे घातली. बंधनांच्या शृंखलांनी स्वतःला सीमित करून घेतले. शोध माणसाची सार्वकालिक आवश्यकता आहे. तिचा कधी शेवट होत नाही. एका शोधाचा शेवट दुसऱ्याचा आरंभ असतो. आहे त्यापेक्षा आपल्याकडे अधिक काही असावे, असे वाटण्याच्या भावनेचा तो परिपाक असतो. सार्वजनिक व्यवहारात वर्तताना जबाबदारीचे विकेंद्रीकरण घडणे आवश्यक असते. पण सगळ्याच गोष्टी काही सामाजिक मर्यादांच्या चौकटींमध्ये अधिष्ठित करता येत नाहीत. बऱ्याच बाबी वैयक्तिक सुखांच्या वर्तुळांना वलयांकित करतात. तोही त्याच्यापुरता शोधच असतो. हव्यासापायी कुणी पदाचा, प्रतिष्ठेचा, पैशाचा शोध घेतात. मर्यादांची बंधने विसरून वर्ततात. जवापाडे सुख हाती लागावे, म्हणून पर्वताएवढ्या दुःखाला सामोरे जातात. वैयक्तिक सुख हव्यासात बदलत नसेल तर सकारात्मक अर्थाने तो आनंदाचा शोध असतो. हव्यासाचा अतिरेक विसंगतीचे कारण ठरते. माणसांच्या स्वकेंद्रित, स्वार्थलोलुप जगण्याचा त्याग घडणे समाजाची आवश्यकता असते. म्हणूनच सद्विचारांच्या वाटांनी माणसांची पावले वळती करून जगण्याला दिशा मिळावी असे वाटणे हा सत्प्रेरित विचारांचा शोध असतो.

शोध सगळेच चांगले असतील असे नाही. प्रबोधनयुगातील बदलत्या विचारधारांनी माणसांच्या जीवनात क्रांती घडवली. पण सोबत स्वार्थलोलुप विचारही मोठे झाले. स्वार्थपरायण विचारधारांनी सर्वसामान्यांचे जिणे दुःसह केले. समाजाच्या रचनेच्या चौकटी बंदिस्त केल्या. विषमतेने, अन्यायाने, अत्याचाराने कळस गाठला, तेव्हा अन्यायग्रस्त समूह क्रांतीचा उद्घोष करीत माणसाच्या मुक्तीगाथा लेखांकित करता झाला. माणसांच्या सामाजिक सुखांसाठी घेतलेल्या शोधाचा परिणाम या क्रांती होत्या. साम्राज्यवाद, वसाहतवाद सामाजिक अभिसरणातील व्यवधाने होती. त्यांचा शेवट करणाऱ्या मार्गाचा शोध व्यवस्थापरिवर्तनाच्या मार्गावरील विसावा होता. परिस्थिती परिवर्तनासाठी कुणी हाती शस्त्रे घेतली, कुणी शास्त्रे, कुणी लेखण्या. माणसे आपापल्या मार्गांनी परिवर्तनाचा शोध घेत होती. कोलंबसला सागरी मार्गाने भारताकडे यायचे होते. जुजबी माहितीच्या आधारावर सफर करणे त्याच्यासाठी जसा शोध होता, तसा जगासाठीही काहीतरी मिळवण्यासाठीचा शोधच होता. जगाचा अंधार दूर सारण्याची किमया करू शकणारा अणू विभाजनाचा प्रयोग जगात कायमचा अंधार निर्माण करू शकतो, हे ज्ञात असूनही त्याचा शोध घेण्याची इच्छा सामरिकदृष्ट्या सक्षम बनू पाहणाऱ्या लालसेचा शोध होता. पाण्यात माशासारखे सूर मारण्याचे स्वप्न पाणबुड्या आणि जहाजांच्या शोधाचे कारण होते. डोक्यावरील निळ्याशार आभाळाची विशाल पोकळी विहरण्यासाठी माणसांना खुणावत होती. पक्षांचे पंख घेऊन आपण विहार करू शकतो का, या प्रश्नाचे उत्तर विमानांचा शोध आहे. कुणीतरी युरी गागारीन अवकाशात जाऊन परत येतो. तेथे आणखी काही आहे का, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मार्ग मोकळा होतो. न्यूटनच्या अंगावर पडणारे सफरचंद गुरुत्वाकर्षणाचा शोध ठरते. एडिसनचा दिवा जगातला अंधारा कोपरा उजळवणारा शोध ठरतो. चाकाच्या शोधाने जगाला गती दिली. प्रगतीवर पंखांवर स्वार झालेले विद्यमान विश्व जीवनाच्या नव्या प्रेरणांचा शोध घेत आहे. ग्लोबलायझेशनच्या चक्रावर आरूढ होऊन प्रवासास निघालेल्या जगाच्या सीमा लहान होत आहेत. बदलत जाणाऱ्या संदर्भांना आपल्यात सामावून जग नव्या अर्थकारणाचा, राजकारणाचा, समाजकारणाचा शोध घेऊ पाहतेय.

गौतम बुद्धांची तपःसाधना जीवनातील शाश्वत सत्यांचा शोध होता. गांधीजींचे सत्याचे प्रयोग स्वतःच स्वतःचा घेतलेला शोध ठरला. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक महाराष्ट्रीय अस्मितांचा शोध म्हटला गेला. विश्व स्वधर्म पाहो अशी आकांक्षा करणाऱ्या ज्ञानदेवांनी विश्वमानवाच्या कल्याणाचा शोध घेण्याचा विचार अनेक मनात रुजवला. बुडती हे जण देखवे ना डोळा म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांच्या हृदयातले दुःख व्यवस्थापरिवर्तनाचा प्रयोग होता. वंचितांच्या वेदनादायी जीवनात प्रज्ञेचा प्रकाश निर्माण करण्यासाठी त्यांच्या अंतरंगातला दीप प्रज्वलित करून माणूस म्हणून जगण्याची अस्मिता देणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संवेदनशील विचार वर्णव्यवस्थेच्या, जातीपातीच्या शृंखलातून मुक्तीचा शोध होता. अडाणी, अशिक्षितांना आत्मभान देऊन माणूसपणाची जाणीव निर्माण करू पाहणारा महात्मा फुल्यांचा कर्मयोग समतेवर आधारित व्यवस्था निर्मितीचा प्रयोग ठरला. कुष्ठरोग्यांच्या आयुष्याच्या उजाड झालेल्या बागेत आत्मविश्वासाची रोपटी लावून त्यांच्या जीवनातला हरवलेला वसंत फुलवण्यासाठी उभं राहिलेलं आनंदवन बाबा आमटेंच्या सहृदय विचारांच्या निर्मितीचा शोध आहे. एकेका शोधासाठी स्वतःला वर्षानुवर्षे प्रयोगशाळेत गाडून घेणारा वैज्ञानिक, रात्रंदिवस आभाळाकडे टक लावून पाहत बसणाऱ्या खगोलशास्त्रज्ञाच्या मनात लुकलुकणाऱ्या असंख्य प्रश्नांच्या चांदण्या शोधाचे तारे बनून चमकतात, तेव्हा कोणत्यातरी ग्रहाचे स्थान नवे नाव धारण करून माहितीच्या जगात वास्तव्यास येते.

सर्वांभूती समन्वय साधणाऱ्या सत्यान्वेषी विचारांचा शोध माणुसकीच्या परित्राणासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयासांचा परिपाक असतो. या मार्गाने चालण्यासाठी माणसांना प्रेरित करणारा विचार सहजभावनेने जगण्याचा आविष्कार असतो. समाजाच्या जगण्याला दिशा मिळावी या अपेक्षेने विचारांचे पाथेय सोबत घेऊन चांगुलपण शोधण्यासाठी निघालेल्या माणसांच्या शोधयात्रेचे फलित जगण्याला आलेला मोहोर होतो. काहीतरी करू पाहणाऱ्या जिद्दीची ती लोभसवाणी रूपे असतात. माणूस लाखो वर्षापासून जगात भटकतो आहे. त्याच्या भटकंतीला निर्णायक दिशा देण्याचे काम शोधदृष्टीने केले. सृष्टीतील नवलाई शोधण्याची दृष्टी देणारी शोधयात्रा त्याच्या जगण्याचा परिघ व्यापक करीत आहे. विश्वातील अनेक गोष्टी माणसाने शोधल्या; पण एक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेच, त्याला स्वतःचा शोध लागला आहे का? तो चंद्रावर जाऊन आला. मंगळावर जाण्याचे मनसुबे रचतो आहे; पण स्वतःच्या मनापर्यंत पोहचून आपण आपलाच शोध घेतला का? आपल्या जगण्यात असणारी अनेक वैगुण्ये अजूनही आहेत तशीच आहेत, याची जाणीव त्याला आहे का? लालसा, स्वार्थ जगण्यातून निरोप का घेत नाही? माणसांचं मन विकारांचे माहेर आहे असे म्हणतात. तो विकारांनी घडला आहे, हे माहीत असूनही विकारांचा शेवट करणाऱ्या मार्गाचा शोध अद्याप का घेता आला नसेल? समाजात अनेक दूरिते आजही आहेत. त्यांचा शेवट करण्याच्या उपायांचा शोध कधी होणार आहे? विश्व समजून घेतले, पण माणूस अजून समजायचा आहे. त्याच्या मनात काय आहे याचा शोध घ्यायचे तंत्र अवगत व्हायचे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, नाही का?

Vaat | वाट

By // 2 comments:
काही लाख वर्षापूर्वी कुठल्याशा भूप्रदेशावर जगण्याच्या स्वाभाविक गरजपूर्तीसाठी चालते झालेले माणसाचे एक पाऊल इहतलावरील वाटांच्या निर्मितीचे कारण ठरले. वाटेचे वयही माणसांच्या धरतीवरील वास्तव्याइतकेच. नियतीने निर्धारित केलेल्या मार्गाने निघणाऱ्या माणसांच्या पावलांनी केलेल्या प्रवासाचा प्रारंभ वाटांच्या निर्मितीचे कारण आहे. वाटा माणसाच्या जगण्याला निर्णायक दिशा देण्याचे कारण ठरल्या. नजरेत साठलेल्या क्षितिजांपर्यंत पोहचण्यासाठी पायाखालच्या जमिनीच्या तुकड्याने दाखवलेल्या दिशेने माणसे मार्गस्थ झाली. चालत्या पावलांना घडणारी वाटांची सोबत केवळ नव्या प्रदेशात नेणारा रस्ता नसतात, तर मनात उदित होणाऱ्या आकांक्षांना मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचवण्याच्या माध्यम असतात.

खरंतर वाट हा एक लहानसाच शब्द, पण अर्थाच्या अनेक आयामांना सोबत करणारा. मनोविश्वात साकारणाऱ्या प्रतिमांना प्रत्यक्षात आणण्यासाठी माणसांना दूरवरच्या प्रदेशात नेण्यास कारण वाटाच असतात आणि आपल्यांना जवळ आणणाऱ्यासुद्धा. शेकडो वर्षापासून वाटेची संगत करीत माणूस जीवनप्रवासाची अडनीड वळणे पार करीत चालतो आहे. वाटा केवळ वळत्या पावलांना दिशा देण्याचे साधन नसतात, तर जगण्याच्या प्रयोजनांना मोहरलेपण देणाऱ्याही असतात. अज्ञात प्रदेशांना जोडणाऱ्या अनभिज्ञ वाटेवरचा प्रवास माणसांच्या तात्कालिक गरजांचा शोध असतो. अर्थपूर्ण जगण्याची इच्छा माणसाच्या मनात कायमच वसतीला असते. अशाच कोणत्यातरी आकांक्षांच्या पूर्तीकरिता परिस्थितीने निर्धारित केलेल्या वाटा निवडून माणसांना वर्तावे लागते. ‘पोटासाठी दाही दिशा का हिंडविशी आम्हा जगदीशा’, असे म्हणतात. कणभर सुखासाठी मणभर कष्ट उपासित माणसे हवे असणारे काहीतरी शोधत राहतात. उपजीविकेसाठी देशांतर घडून आपले परगणे सोडून माणसे ज्ञात-अज्ञात प्रदेशात पोहचतात, ते कोणत्यातरी वाटांची सोबत करीतच. कदाचित गरजेतून हे घडत असेलही; पण चालत्या वाटा अपेक्षांचे नवे क्षितिज त्याच्या हातात देत असतात. आकांक्षेच्या गगनात माणसे सुखाचे सदन शोधण्यासाठी निघतात. निवडलेल्या मार्गावरच्या प्रवासात अपेक्षिलेले काही हाती लागणे आनंदप्राप्तीचे अभिधान असते.

भटकंती माणसाच्या आदिम अवस्थेपासून स्वाभाविक प्रवृत्ती असल्याने चालणे घडतच आले आहे. आफ्रिकेतल्या कुठल्याशा प्रदेशात जन्माला आलेला माणूस नावाचा जीव पायाखालच्या जमिनीच्या तुकड्याची सोबत करीत उपजीविकेच्या मार्गाने मार्गस्थ झाला. त्याच्या चालत्या पावलांनी खंड व्यापले. पोहचला तेथे काहीकाळ स्थिरावला. थांबूनही अपेक्षित असे काही हाती न लागल्याने काहींच्या प्रवासाच्या दिशा पुढच्या क्षितिजाकडे वळत्या झाल्या. कालसंगत मार्गाने वर्तताना यथावकाश प्रगती घडत गेली आणि भटकंतीला विसावा मिळाला. अपेक्षांच्या गगनाला निवाऱ्यासाठी सदन मिळाले. प्रगतीचे पंख लेऊन जगणं सुखावह झालं. जगण्याची अस्वस्थ वणवण सोबत घेऊन चालणाऱ्या वाटाही स्थिरावल्या. तरीही कधी प्रासंगिक कारणांनी, कधी आवश्यक गरजांच्या पूर्तीकरिता प्रवास घडतोच आहे. ज्ञात, अज्ञात वाटा जगण्याची सोबत करीत आहेत. पायाखालच्या चुकलेल्या वाटांमुळे अनेकांच्या जीवनाची वाट लागली आणि योग्य मार्ग सापडल्याने अनेकांचं जगणंही वाटी लागलं, ते वाटांमुळेच. म्हणूनच असेल की काय वाटेचं वर्चस्व माणसांच्या जगण्यात आजही कायम आहे.

अंगावरील पाऊलखुणा मिरवीत नागमोडी वळणे घेत पळणाऱ्या पाऊलवाटेपासून चकचकीत देहकांती धारण करून धावणाऱ्या महामार्गांपर्यंत प्रत्येक वाटेचं अंगभूत सौंदर्य असतं. या वैभवाचा साज चढवून त्या चालत असतात. वेड्यावाकड्या वळणांची सोबत करीत धरतीवर सांडलेल्या क्षितिजाला कवेत घेण्यासाठी पळत असतात. ‘पाणंद’ नाव धारण करून माणसांच्या वसतीतून हलकेच बाहेर पडणाऱ्या पाऊलवाटेचा डौलच न्यारा. आपल्या शिडशिडीत अंगकांतीला मिरवीत ती चालत राहते. हिरवाई अंगावर पांघरून डोलणाऱ्या पिकांची सोबत करीत झोकदार वळणे घेत अलगद पुढे सरकणाऱ्या वाटा कधीकधी अलवार बनतात. नवथर मुलीसारख्या लचकत, मुरडत चालतात. नुकत्याच येऊन गेलेल्या पावसाच्या सरींनी भिजलेल्या वाटा सचैल स्नान करून आनंदतात, सुस्नात लावण्यावतीसारख्या. आपणच आपलं भिजून चिंब झालेलं रूप पाहून आपल्यावरच अनुरक्त होतात. वाटेच्या दोन्ही हातांना धरून चालणाऱ्या शेतातून तारुण्याचा मुग्ध साज चढलेल्या पिकांचा सरमिसळ गंध रानावनाच्या मनात आमोद निर्माण करीत असतो. लुसलुसणाऱ्या गवताच्या गालिच्यावरून अंथरलेल्या वाटांचा हिरवा रंग मनात साकोळलेल्या रंगांना गहिरेपणाची डूब देत राहतो. रिमझिमणाऱ्या पावसाने ओलावून निसरड्या वाटा आरस्पानी सौंदर्याने नटतात. मातीला मुलायमपणाचा स्पर्श घडून पावलांना बिलगणारे लोण्याचे गोळे गंधगार संवेदना बनून प्रकटतात.

बैलगाडीच्या चाकोऱ्या अंगावर गोंदून घेत वाट विस्तारत जाते. धावणाऱ्या चाकांचा आणि बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा नाद आनंदाचं गाणं बनून वळणं घेत पळणाऱ्या वाटेला तरल भावनांचे सूर देतो. पावसात चिखल बनून लदबदलेल्या वाटा अंगावर ऊन झेलीत शुष्क होत जातात आणि उन्हाळ्यात कोरड्याठाक होतात. त्यावरील देखणे हिरवेपण हळूहळू हरवत जाते. एक उदासपण सोबत घेऊन आळसावलेल्या अंगाने पहुडलेल्या असतात. कोण्या चालत्या पावलांच्या आवाजाने जाग येऊन अंगावरील धूळ झटकीत आपला हरवलेला आनंद शोधीत राहतात. गावातून माळावर चरण्यासाठी जाणाऱ्या गुरावासरांच्या पावलांच्या नक्षीचे गोंदण करून सजतात. कोण्या सौंदर्यवतीने दर्पणासमोर उभं राहून स्वतःला न्याहाळीत आपणच आपल्याशी खुदकन हसावे तशा. सूर्य मावळतीकडे जातांना घरच्या ओढीने परतणाऱ्या गुराढोरांच्या पावलांनी उडणारा वाटेवरील धुळीचा गुलाल पश्चिम क्षितिजावर पडदा धरतो. आकाश कवेत घेण्याकरिता उंच उडण्याचं स्वप्न पाहणाऱ्या धुळीचा नकळत आनंदोत्सव होतो.

वाटा लहानशा कोटरात सुरक्षित आणून पोहोचवणाऱ्या, तशा मनी विलसणाऱ्या हिरव्या स्वप्नांना अंकुरित करण्यासाठी शेत-मळ्यात नेऊन सोडणाऱ्याही असतात. रोजच्या राबत्याने सरावाच्या झाल्याने अचूकपणे घरी आणणाऱ्या. जगण्याच्या रोजच्या व्यवहारांना सोबत करीत चालणाऱ्या, म्हणून अति परिचयात अवज्ञा होऊन गृहीत धरल्या जाणाऱ्या. कधी स्मृतीच्या कोशात कोरून घेऊन आकाराला येणाऱ्या. कधी विस्मरण घडवणाऱ्याही. उपजीविकेच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वाटा माणसांना सोबत घेऊन अनोळखी प्रदेशात नेऊन सोडतात. ओळखीच्या कोण्या मदतीची प्रासंगिक सोबत करीत मुक्कामाचं ठिकाण गाठतात. कधी पांथस्थाला भरकटत ठेवण्यात आनंदाणाऱ्या, कधी चालत्या मार्गावरच्या त्याच वर्तुळावर आणून पुन्हा उभे करणाऱ्या. अशावेळी चुकलेला वाटसरू मनातल्या मनात चरफडून स्वतःला दोष देण्याशिवाय काही करू शकत नाही. चालत्या वाटा अनपेक्षितपणे एखाद्या निबिड जंगलात हरवतात. त्यांची सोबत करीत चालणारा कोणी त्या जाळ्यात फसतो आणि केव्हा एकदा यातून बाहेर पडेन असे वाटायला लागते. एकेक क्षण युगाएवढा होत जातो. अशावेळी मनाला कासावीस करणाऱ्या वाटा नकोशा होतात.

एकटे चालताना नीरस वाटणाऱ्या वाटा प्रियजनांची सोबत असताना हव्याहव्याशा होतात. कोण्या सासुरवाशिणीला माहेरच्या वाटेची हुरहूर लागते. सणवाराला घ्यायला येणाऱ्या भावाच्या वाटेकडे तिचे डोळे लागलेले असतात. माहेरची वाट तिच्या हळव्या मनात ममतेचे मोरपीस बनून बसते. निरोप घेऊन दूरदेशी जाणाऱ्या लेकराला गावाच्या वेशीवर सोडायला आलेल्या मातेच्या नेत्रातून झरणाऱ्या पाण्यासोबत हेलावतात. आषाढी-कार्तिकीला विठ्ठलाच्या ओढीने पंढरीला निघालेल्या वारकऱ्यांसह भक्तिरंगात रंगतात. गावात शिकायची व्यवस्था नसल्याने शेजारच्या गावातील शाळेकडे शिकण्यासाठी नेणारी वाट आयुष्याला वळण देणारी असते. अनुभवांची शिदोरी हाती देताना जीवनाचे शिक्षण देणारी गुरु होते. खोड्या करीत, हसत-खेळत शाळेत जाणारी मुले पाहून तिलाही कधीकधी लहानपण देगा देवा म्हणण्याचा मोह होत असेल. वनराईने बहरलेल्या वाटांवरून येणाऱ्या रानगंधाची सोबत चालणाऱ्या पांथस्थाच्या मनाला संमोहित करीत राहते. माळावरून चालत जाणाऱ्या वाटा हिरव्यापिवळ्या गवतपात्यांशी हितगुज करीत राहतात. कधी वाळवंटात पसरलेल्या वाळूच्या पसाऱ्यातून पळत राहतात. कधी रखरखत्या उन्हात झाडांच्या गर्दीतून सावली बनून येतात. कधी चढण बनून दमछाक करणाऱ्या, तर कधी उतरण बनून घरंगळत खाली जाणाऱ्या. कधी काट्याकुट्यांचे टोकं बनून रक्ताळलेल्या जखमा देणाऱ्या. कधी डोंगर सुळक्यावरील दगडधोंडे आणून अडथळे बनणाऱ्या. उन्हाच्या तापात भाजून काढणाऱ्या, कधी हिवाळ्यातील वाऱ्याचा थंडगार स्पर्श बनून चालणाऱ्यांच्या मनात उमेद निर्माण करणाऱ्या, कधी झाडावेलींवरून पडलेल्या पानाफुलांच्या पायघड्या अंथरून स्वागत करीत राहणाऱ्या असतात.

चोरांच्या वाटा चोरांना ठाऊक असतात, असे म्हणतात. माणसांच्या राबत्यापासून काहीशा अलग राहणाऱ्या. कोणाच्या पदचिन्हांचे ठसे जेथे सहसा उमटत नाहीत, कदाचित जगण्याच्या दैनंदिन व्यवहाराच्या गणिताची उत्तरे त्या दिशेने मिळण्याची शक्यता नसल्यामुळे अलिप्त असणाऱ्या, म्हणूनच शर्विलकांना सुरक्षेचे कवच पुरवणाऱ्या. तर दुसरीकडे माणसांच्या सततच्या गजबजाटाने गोंधळलेल्या. कुठल्याशा निमित्ताने हजारो पावलांना आपल्या अंगाखांद्यावर घेऊन गोंधळगीत गाणाऱ्या. स्वरांचा साज चढवून जगण्याला आनंदाचे सूर देणाऱ्या. डोंगराच्या उंच सुळक्यावर उभारलेल्या मंदिरात भक्तिभावाने ओढून नेणाऱ्या. डोंगरदऱ्यांमधून झोकदार घाटवळणे घेत जीव मुठीत घेऊन चालायला लावणाऱ्या. रोजच्या व्यापातून क्षणभर विसावा शोधणाऱ्या पावलांना आपल्या सहवासात रमवण्यासाठी पर्यटनस्थळे बनून हसणाऱ्या. निसर्गाच्या नवनवोन्मेषशाली आविष्कारांनी नटून नितळ सौंदर्याची पखरण करीत डोंगरदऱ्यांच्या कुशीत हलकेच शिरणाऱ्या. झाडाफुलापानांच्या देखणेपणावर लुब्ध करणाऱ्या वाटा मोहात पाडतात. जगण्याचे गीत गात वाहणाऱ्या वाऱ्यासोबत शिळ घालीत राहतात.

वाटांना केवळ भूगोलच नसतो. त्यांच्यासोबत इतिहाससुद्धा डौलाने चालत असतो. मावळ खोऱ्यात मुक्त संचार करणाऱ्या मावळ्यांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या सह्याद्रीच्या वाटा आश्वस्त करीत अस्मिता देत राहिल्या. तशा शत्रूला चकवा देताना मदतीलाही धावून आल्या. सह्याद्रीच्या कडेकपारीतून पळणाऱ्या अनेक वाटा-आडवाटांनी महाराजांच्या राज्याच्या रक्षणकर्त्यांचे रक्षण केले. कधी घाटात कोंडी करून गनिमाला ठोकून काढणाऱ्या झाल्या, कधी शत्रूच्या सैन्याची दाणादाण उडवून पळता भुई थोडी करत्या झाल्या. जगाचा भूगोल ज्ञात असणाऱ्यांनी पृथ्वीगोल पालथा घातला. त्यांच्या पावलांना सोबत करीत वाटा विस्तारत गेल्या अन् इतिहास ग्रंथात लेखांकित घटनांच्या साक्षीदारही झाल्या. कधीकाळी युरोपला आशिया खंडाकडे आणणारा खुष्कीचा मार्ग अवरुद्ध करून आटोमन तुर्कांनी युरोपियनांचे श्वास कोंडले. त्यांची चहूबाजूंनी आर्थिक कोंडी झाली. त्यातून मुक्त होण्यासाठी अन्य पर्यायी मार्ग शोधणे गरजेचे होते. विकल्प हाती लागावेत म्हणून वणवण करणाऱ्यांच्या शोधयात्रेला कारण वाटाच झाल्या.

बिकट वाट वहिवाट नसावी, असे म्हणतात. माणसांच्या जगण्याच्या वाटा सुगम असाव्यात, अशी अपेक्षा सार्वकालिक असते. पण त्या कधीही सहजसाध्य नसतात. सहज नसल्याने त्यांचे अप्रूप अधिक असते, म्हणूनच अज्ञात प्रदेशांची माणसांच्या मनावर मोहिनी पडत आली आहे. ध्येयानुरक्त मनातील साहस अवघड वाटा निवडण्यास वेड्यापिरांना प्रेरित करीत राहते. ध्यासपंथे चालणाऱ्या अशाच काही ध्येयवेड्यांना निबिड अरण्यात नेऊन सोडणाऱ्या वाटा कुठल्यातरी धाडसाच्या कधीकाळी साक्षीदार झाल्या आहेत. नायजर, नाईल, कांगोच्या खोऱ्यातील गूढरम्य प्रदेशात काय असेल? या प्रश्नाच्या शोधापायी माणसे अशा प्रदेशांच्या वाटांकडे वळली, त्या दिशेने पोहोचवणाऱ्या वाटांना कुणीतरी मंगोपार्क, सर सॅम्युएल, कॅप्टन स्पेक, स्टॅन्ले आपल्या मानतो. कुतूहल बनून खुणावणाऱ्या वाटा मनात घर करतात. आपल्या स्वप्नपूर्तीच्या फुलांना वेचण्यास त्या वाटांवरून ते निघतात आणि जगाला अज्ञात प्रदेशात यायला मार्ग मिळतात. साम्राज्यवादी, वसाहतवादी राष्ट्रांना कुणालातरी ज्ञात झालेल्या मार्गाने आणून सोडण्याचे काम वाटांनी केले. नवे प्रदेश, नव्या वाटा ज्ञात झाल्याने अनेक देशांचे अर्थकारण, राजकारण बदललं. वसाहतवादी राष्ट्रांनी केलेल्या शोषणामुळे अनेक देशांची व्यवस्थाही बिघडली. वास्को द गामाच्या हाती भारताच्या भूमीकडे येणारा मार्ग लागला त्याचे नशीब पालटले. अपेक्षित प्रदेशात पोहचण्याचे पर्याय हाती आल्याने युरोपचे दुर्दैवाचे दशावतारही संपले. मिशन बनून काही वाटा नव्याने ज्ञात प्रदेशांकडे धर्मप्रसारासाठी चालत्या झाल्या. काही व्यापाराच्या निमित्ताने फिरणाऱ्यांच्या आर्थिक गणितांना बरकत देणाऱ्या ठरल्या. उपजीविकेच्या मार्गाने मार्गस्थ होणाऱ्यांच्या वाटा विजीगिषू इच्छाशक्तीचे प्रतीके झाल्या. प्रेषित मुहम्मद पैगंबर साहेबांचे मक्केहून मदीनेला स्थलांतर घडवणाऱ्या वाटांनी कालगणनेला नवे परिमाण दिले.

ज्ञात झालेल्या वाटांनी चालताना माणसे नवे समृद्ध परगणे प्राप्त करण्याची स्वप्ने पाहू लागली. चालणाऱ्या पावलांनी जगण्यात भरभराट आणली, तसाच भकासपणाही आणला. खेड्यापाड्यातील अवकाश आपल्यात सामावणाऱ्या पाऊलवाटा शहराकडे वळत्या झाल्या आणि शहरांना बकालपणा देऊन गेल्या. जगाच्या युद्धनीतीला दिशा देणाऱ्या वाटा इतिहासाला निर्णायक वळण देणाऱ्या ठरल्या. दिल्लीहून राजधानी देवगिरीला आणणाऱ्या मुहम्मद तुघलकच्या वेडेपणाने विस्मयचकित झाल्या. कदम कदम बढाये जा म्हणीत भारताची भूमी परकियांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी निघालेल्या आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना चैतन्य देत राहिल्या. फौजांना इम्फाळ, कोहिमापर्यंत आणून आशेचा बंध बांधणाऱ्या, तशाच नजरेच्या टप्प्यात असणाऱ्या लक्षाला दूर नेणाऱ्याही वाटाच होत्या. महात्मा गांधींच्या पावलांना सोबत करणाऱ्या वाटांनी साबरमती ते दांडी पदयात्रा बनून इतिहास घडवला.

उत्तर वायव्येकडून आर्यांना आणून सप्तसिंधूच्या प्रदेशात स्थिरावणाऱ्या आणि तेथून गंगेच्या खोऱ्यात पोहचवून आर्यसंस्कृतीची बीजे रोवण्यास कारण वाटाच. परकीय आक्रमकांच्या घोड्यांच्या टापांनी हादरलेल्या वाटांनी सोबत नवे प्रश्न आणले. त्यांच्या आगमनाने ढवळून निघालेले येथील समाजजीवनाचे संदर्भ बदलले. समाजाचं जगणं अनेक प्रश्नचिन्हे घेऊन पर्यायी उत्तरांच्या शोधार्थ अन्य वाटांकडे वळते झाले. गझनीच्या सुलतान महंमदास भारतातील संपत्तीचा मोह पडला. त्याच्या धनलोलूप मनीषा पूर्ण करणाऱ्या वाटा लुटीच्या वाटा झाल्या. शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका अनुभवणाऱ्या वाटा अफाट साहसाची थरारकथा झाल्या. महाराजांची सुटका केवळ सहीसलामत आपल्या प्रदेशात पोहचण्याचा प्रयत्न नव्हता, तर प्रदेशातल्या वाटांच्या सखोल अभ्यासाचा परिपाक होता. भूगोलाला समजून इतिहास घडवण्याचा यशस्वी प्रयत्न होता. सर्वंकष सत्तेच्या डोळ्यात धूळ फेकून केलेल्या ऐतिहासिक पलायनाचा पराक्रम होता. कराल पादशाही सत्तेने सक्तीने जमा करून सुरतेत साठवलेले आणि गोठवलेले धन स्वराज्यात पोहोचवणाऱ्या वाटा धाडसाच्या साहसकथा ठरल्या. धरतीवरील अनेक वाटा ऐतिहासिक घडामोडींच्या साक्षीदार झाल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पन्हाळगड ते विशालगड वाटेचा अवघड प्रवास एका धाडसाची चित्तरकथा होती. घोडखिंडीत नाकाबंदी करीत सिद्दी जौहरच्या पाठलाग करत्या वाटा थांबवणाऱ्या बाजीप्रभूंना वाटांचं महत्त्व ज्ञात होतं. कडेकपारींचा हात धरीत कोंडाण्यावर चढून पराक्रम गाजविणाऱ्या तानाजी मालुसरेंचे धाडस स्वतःच स्वतः शोधलेल्या वाटेने केलेला धाडसी प्रवास होता.  

वाटा माणसांच्या जीवनातील सर्वच क्षेत्रांना व्यापणाऱ्या ठरल्या आहेत. जगण्याचा अविभाज्य भाग बनून आयुष्यात आल्याने त्यांची सोबत टाळून वर्तने अवघड आहे. वाटा तात्कालिक भावभावनांचा आविष्कार असतात. कधी आनंदाने ओसंडून वाहतात, तर कधी दुखः बनून चैतन्य विसरतात. काळास आपल्या उदरात घेऊन पुढे चालणाऱ्या अनेक वाटा कधी पराक्रमी वीरांच्या मिरवणुका बनून गर्दीने फुलल्या. कधी कालपटावर आपली नाममुद्रा अंकित करणाऱ्या व्यक्तीच्या जाण्याने अश्रू ढाळीत दुःखाच्या साक्षीदार झाल्या. कधी पानिपतच्या पराभवाने खचल्या. कधी गनिमाला चहूबाजूने कोंडीत पकडून मिळालेल्या विजयाच्या उत्सव झाल्या. दुष्काळाच्या ससेहोलपटीमुळे गाव सोडून निर्वासित झालेल्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याने गहिवरल्या. चाऱ्यासाठी रानोमाळ हिंडणाऱ्या गुराढोरांच्या वणवणने अस्वस्थ झाल्या. कधी कथा, कादंबरीतून माणसांच्या जगण्याच्या अनुभवांची अक्षरे बनून सोबत करीत राहिल्या. कधी कविता तर कधी गीतांचा आवाज बनून गुणगुणत राहिल्या.

कालोपघात वाटांचा कायापालट झाला. पाउलवाट, गाडीवाट, रस्ता, हमरस्ता, महामार्ग अशी रूपं धारण करून बदलत राहिल्या. त्यावरून चालणारी माणसंही बदलली. पायी चालणारी, बैलगाडी घेऊन प्रवास करणारी माणसे नवी वाहने घेऊन धावायला लागली. धूळमातीने माखलेल्या साध्याशाच वाटेवरील अवकळा झाकून खडीमातीने टणकपणा आणला. डांबर-सिमेंटने त्यांना मढविले. आपलं बदलणारं रूपं पाहून त्या मोहरल्या. त्यांनाही वेग आला. लक्षाच्या दिशेने त्याही आवेगाने धावू लागल्या, पण हा वेगच अनेकांच्या जीवावर उठला. याच वाटांनी अनेकांच्या जीवनाचा भीषण अवकाळी अंत पाहिला. अनेकांना कायमचं जायबंदी बनवलं. भान विसरून बेभान धावणाऱ्याच्या गाफिलपणाला कदापि क्षमा नसते. सुरक्षा हाच जीवनाचा मंत्र असतो, असे म्हणीत प्रबोधनाचे फलक खांद्यावर घेऊन प्रवास करणाऱ्यांना सावध करीत आहेत. तरीही आणखी काहीतरी हवं असणारं शोधत त्या पुढेच पळत आहेत. चालणाऱ्याचे भाग्य चालते, असे म्हणतात. चालणाऱ्या अनेकांचे भाग्य अशाच कोणत्यातरी वाटेने उजळवून टाकलेलं असतं. माणूस इहतली असेपर्यत चालत राहणार आहे आणि त्याला अशाच कोणत्यातरी वाटेची सोबत असणार आहे. कारण चालण्याला अंत नसतो, तसाच वाटेलासुद्धा.

Aathavaninchya Hindolyavar | आठवणींच्या हिंदोळ्यावर

By // 8 comments:
रविवारची निवांत पावसाळी दुपार. पुस्तकाचं वाचन सुरु. बाहेर पावसाची हलकीशी रिमझिम. वातावरणात एक प्रसन्न गारवा. वाचनाची ब्रह्मानंदी टाळी लागलेली. मन पुस्तकातील मजकुरात गुंफलेलं. मोबाईलची रिंग वाजली. पुस्तकावरून लक्ष विचलित झालं. मोबाईलच्या स्क्रीनवर फक्त क्रमांक दिसतोय. नंबर सेव्ह नसल्याने काही अंदाज येणं शक्य नव्हतं. थोड्याशा नाराजीने कॉल रीसिव्ह केला. पलीकडून आवाज, ‘चंद्या, आहेस कोणत्या जगात? तुझ्या अस्तित्वाचे काही पुरावे आहेत का कुठे शिल्लक?’ क्षणाभराचीही उसंत न घेता समोरचा आवाज बरसत होता. त्या विधानांनी थोडा सरकलोच; पण तसे शब्दातून जाणवू न देता म्हणालो, ‘अरे, कोण तू? आणि असा सुसाट काय सुटतोयेस? जरा श्वास घे! आधी मला सांग, कोण बोलातोयेस?’ पलीकडून पुन्हा रिमझिम सुरु, ‘अरे बेशरम माणसा, माणसांना एवढ्या सहज विसरण्याची कला कधी अवगत केलीस रे? निदान सोबत शिकलेल्या, राहिलेल्या माणसांचे आवाज तरी आठवणीत राहू दे ना थोडे! की स्मृतीला तेवढेही कष्ट करायची सवय राहू दिली नाहीयेस!’ एव्हाना स्मृतीत साठलेल्या आवाजांना आठवत संगती लावण्याचा प्रयत्न करू लागलो. काहीच आठवेना म्हणून म्हणालो, ‘नाही आठवत काही, तूच सांग ना! कोण बोलातोयेस?’ ‘मी संज्या...! आठवले का काही?’ पलीकडून त्याचा परत प्रश्न.

खरंतर शिकताना शाळेपासून महाविद्यालयापर्यंत संजय नावाचे चारपाच मित्र सोबत होते. यातील हा नेमका कोणता संज्या असावा? काहीच संदर्भ लागेना. शेवटी त्यानेच सांगायला सुरवात केली. ओळखीच्या क्षणांना संजीवनी मिळाली. संगती लागली. बीएडच्या वर्गात हा सोबत होता. त्याला काय आठवले कोणास ठावूक मित्रांकडून नंबर मिळवून बऱ्याच दिवसांनी फोन केला. राहिला बोलत. पुढची वीस-पंचवीस मिनिटे अखंड. मनात साठलेल्या आठवणींचे आभाळ ओथंबून झरू लागले. बाहेरच्या पावसाला सोबत करीत आठवणींच्या वर्षावात भिजत राहिलो. शिकतानाच्या बऱ्या-वाईट, हसऱ्या, हळव्या आठवणी भारावलेपण घेऊन रिमझिम बरसत राहिल्या. बऱ्याच कालावधीनंतर मैत्रीच्या संवादाला शब्दांचं कोंदण लाभल्याने आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून झुलत राहिलो. स्मृतींच्या गंधगार स्पर्शाने पुलकित होत राहिलो. काय आणि किती बोलावे असे झालेले. मनात साठलेल्या आठवणींच्या गंधकोशी एकेक उघडत राहिल्या, त्यांनी मनावर गारुड घातले. आनंदाचे इंद्रधनुष्य मनाच्या क्षितिजावर उमटून आले. त्याच्या रंगात रंगत राहिलो. मोबाईलवरील संवाद संपला, मन मात्र आठवणींच्या हिंदोळ्यावर अद्यापही झुलतच होते. स्मृतींची सोबत करीत एक वेडावलेपण दिमतीला घेऊन मन काळाच्या पडद्याआड डोकावत राहिले. तेथे दिसणाऱ्या प्रतिमांना साकोळून चालत राहिले आठवणींच्या गावाकडे.

‘आठवणी’ एक छोटासाच, पण आपल्या आत अर्थाच्या अनेक संदर्भांना सामावून घेणारा शब्द. त्यात जगण्यातील आश्वस्तपण जसे सामावले आहे, तसे आनंदाचे सोहळेही साठले आहेत. त्यांचा तळ गाठण्याचा प्रयत्न करावा तेवढ्या आणखी खोल जाणाऱ्या समुद्राच्या तळासारख्या. इहतलावर जीवनयापन घडताना इच्छा असो, नसो स्वतःला अनेक रंगांनी रंगवून घ्यावे लागते. त्याच्या नानाविध छटांनी मढवून घ्यावे लागते. अशा रंगांनी मंडित स्मृतींचे इंद्रधनुष्य जीवनाचे रंग घेऊन प्रकटते. त्याने दिलेल्या रंगातून माणूस आपल्या जीवनाचा रंग शोधत राहतो. मोरपीस बनून आठवणी मनावरून फिरत राहतात; कधी सुखाचे तलम स्पर्श, तर कधी कटू प्रसंगांचे नकोसे आघात बनून. त्यांची अनवरत सोबत घडत असते. सुख-दुःखाची सरमिसळ घेऊन मनाचं आसमंत आपलं अफाटपण सोबतीला घेत काळ्या-पांढऱ्या ढगांनी भरून येते. कधी नुसतेच अंधारून टाकणारे, तर कधी धो-धो कोसळणारे.

स्मृतींच्या वर्षावात भिजत आठवणींचे झाड आपल्या अस्तित्वाच्या मुळांनी आस्थेचा ओलावा शोधत परिस्थितीच्या वादळवाऱ्याशी संघर्ष करीत उभे असते. वसंतातला बहर अंगावर फुलताना पाहून आनंदते, कधी निष्पर्ण डहाळ्यांवर आशेचे नवे कोंब अंकुरित होण्याच्या प्रतीक्षेत उन्हाची सोबत करीत आस लावून बसते. उत्क्रांतीच्या विकासक्रमात माणूस किती विकसित झाला, हा प्रश्न बाजूला सारून आठवणींच्या लहान-लहान रोपट्यांना मन उत्क्रांत करीत राहते. आठवणींचा बहरलेला मळा माणसांच्या मनाची श्रीमंती असते. त्यांची सोबत जगणं संपन्न करीत राहते. परिस्थितीने माणूस एकवेळ भणंग असेल; पण आठवणींच्या जगाचे सारेच कुबेर असतात. त्या परगण्यात सारेच सावकार असतात. येथे राव-रंक असा भेद नाहीच. सोबत करणाऱ्या आठवणी कोणत्या, कशा असतील हे ज्याचे त्यालाच माहीत. त्या जशा असतील तशा स्वीकारून तो जगण्याच्या वाटेने चालत राहतो. वाटा जीवनाचा प्रवास घडवतात. माणसांच्या जगण्याच्या अनेक प्रश्नांची उत्तरे आठवणीत सामावलेली असतात. काहींसाठी त्या आनंदयात्रा असतात, तर काहींसाठी संघर्षयात्रा. मनाला आठवणींचे कोंदण लाभलेलं असतं. त्यातील एकेक स्मृती चांदण्या बनून चमकत असतात. आठवणीनी माणसाचं जगणं श्रीमंत केलेलं असतं.

आयुष्याच्या प्रवासाची अवघड वळणं पार करीत एखाद्या वळणावर उभे राहून वळून पाहताना बऱ्यावाईट आठवणी उगीच रित्या मनात गर्दी करतात. यातील भलेही सगळ्याच काही सुखावह नसतील; पण त्यांची सोबत घडताना उगीचंच आपण आपल्यापुरते वेगळे असल्याचा भास होतो. सोबत करणारी प्रत्येक आठवण जगण्यावरील श्रद्धा वाढवत जाते. पाडगावकरांच्या ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या ओळींना आपलेपणाचा ओलावा लाभतो. नियतीने नमूद केलेल्या वाटेवरून चालताना गतकाळ बनून विस्मरणाच्या कोशात शिरलेल्या आठवणींना आशेचे अंकुर येऊन आपलेपण आणि आस्था निर्माण होत जाते. विज्ञानतंत्रज्ञानानेमंडित जगात माणसांच्या जीवनाचे आयाम बदलले. भौतिक जगणं समृद्ध झालं. जगणं समृद्ध करणाऱ्या आठवणी हाच सुखाचा प्रवास असल्याचे अनेकांना वाटते. बदलणाऱ्या काळाच्या प्रवाहांनी अनेकांच्या जगण्यात संपन्नता आणली असेलही; पण त्यापासून थोडे दूर जाऊन आपण आपल्याला एकदातरी पाहावेसे वाटते का? स्वतःच स्वतःला तपासून घेणे घडते का?

जीवन प्रवासातील काही पाने उलटून शोधताना लहानपणातील माझा मी कुठेतरी संकोचून उभा असलेला दिसतो. परिस्थितीशरण जगणं आपलं म्हणणारा आणि त्यातही आपलं लहानसं जग शोधणारा. परिस्थितीने भलेही अनुकूल दान पदरी घातले नसेल, सुखाच्या रंगांची उधळण जगण्यात झाली नसेल; पण स्वतःला तपासून पाहताना नियतीने रेखांकित केलेल्या जगण्यातील आठवणींची श्रीमंती आज खूप मोठी वाटायला लागते. मनःपटलावर आजही त्या आठवणींची सुखद गोंदणनक्षी साकारते. काळाच्या गणिताची समीकरणं सोडवत जातांना उत्तराच्या छोट्याशा ठिपक्याजवळ येऊन पोहचल्यावर माझा मी दिसतो; अगदी बिंदूमात्र, तरीही आपल्या केंद्रस्थानी असंख्य रेषा सामाऊन घेणारा. त्या लहानशा बिंदूला सिंधू होण्याचे स्वप्न देणाऱ्या अनेक गोष्टी समोर उभ्या राहतात. लहानसं का असेना, पण जगण्याला मोठं करणारं गाव आठवणीत चैतन्य घेऊन आजही उभं आहे. भलेतर माझ्या गावाला कुठलाही देदीप्यमान वारसा नसेल, कोणीही लिहिलेला गौरवशाली इतिहास नसेल. जमिनीच्या ज्या लहानशा तुकड्यावर ते वसले, तोच त्याचा भूगोल. गावाचा इतिहास कोणी घडवला नसेल; पण गावाने आमच्या जगण्याचा इतिहास घडवला. स्वतःचा भूगोल उभा करण्याइतपत सक्षम बनवले. आजही मनाचा एक हळवा कोपरा गावाच्या आठवणीनी गच्च भरलेला आहे. गाव, गावातील माणसे, त्यांचं जगणं, त्यांच्या जीवनातील संघर्ष, लहानमोठ्या संघर्षांनी पराभूत केलेली, कधी त्याच्याशी दोन हात करून विजयी झालेली माणसं, त्यांचे साधेपण, बेरकीपण, सण-उत्सव, जीवनविषयक आस्था, जगण्याला उद्दिष्ट देऊन आश्वस्त करणारी शेतं, गुरं-वासरं, शाळा, मित्र सारंसारं आपापला छोटासा कोपरा सांभाळून मनाच्या गाभाऱ्यात वसतीला आलेलं आहे. कुठल्याशा हळव्या क्षणांनी मनात रुजलेल्या आठवणींच्या झाडाच्या फांद्या थरथरतात. काळाचा वारा झुळूक बनून वाहतो, आठवणींचा गंध सोबतीला घेऊन येतो आणि आठवणींच्या गावास घेऊन जातो.

विद्यमानकाळाने कोणाला जे काही दिले असेल, नसेल. त्याची समीकरणे सोडवण्यात न गुंतता आपली वाट निवडून चालत राहावे लागते. स्मृतीच्या कोशात विसावलेल्या आठवणींवर साचलेली धूळ वर्तमानातला एखादा क्षण फुंकर घालून उडवून जातो. उडलेली माती गावाच्या मातीशी असणाऱ्या नात्यांची जाणीव करून देते. वाढत्या वयाचे देहाला आणि जगण्याला पडणारे बंध विसरून मन स्मृतीकोशात विसावलेल्या क्षणांना सोबत घेऊन येते. काळाचा पडदा दूर करीत एकेक क्षण आठवणींचा देह धारण करून समोर उभे राहतात. वारा प्यालेल्या वासरासारखे उनाड मन मित्रांसोबत हुंदडत राहते. शाळा नावाचा अप्रिय प्रकार टाळून उन्हा-पावसाची तमा न करता रानोमाळ चिंचा, बोरे, कैऱ्या जमा करीत फिरणारे, शेतातून टरबूजं, काकड्या, शेंगा चोरून खाण्यात आनंद शोधणारे, माळावर विटीदांडूच्या खेळात रमणारे, नदीच्या पाण्यात पोहण्यासाठी पालकांची नजर चुकवून पळणारे, कधी आगाऊपणाची परिसीमा घडून मार खाणारे आणि तेवढ्यापुरते रडून घेऊन पुन्हा घराबाहेर पडून रात्री उशिरापर्यंत लपाछपी खेळणारे क्षण मनःपटलावर आकृत्या कोरीत जागे होतात. जीवनाच्या झाडावर आठवणींचे एकेक कोंब अंकुरित होऊ लागतात. गावात भलेही तेव्हा विजेच्या दिव्यांचा प्रकाश नसेल; पण त्या अंधारातही आपल्या आस्थेचा काजवा हाती घेऊन समाधान शोधणारे क्षण आठवणींचा नितळ प्रकाश घेऊन मनाचं आसमंत उजळून टाकतात.

आठवणींच्या काजव्यांना सोबत घेत दिसामासांनी मोठे होत गेलो. मनाचे आकाश विस्तारत गेले. शाळेच्या आणि जीवनाच्या एकेक परीक्षा देतांना आयुष्याचे एकेक वर्ष कमी होत गेलं; पण सरणाऱ्या त्या वर्षांनी आठवणींचा एकेक अनमोल ठेवा मनाच्या खजिन्यात जमा होत गेला. ते पाथेय सोबत घेऊन जीवनाचा नम्र शोध घेण्याइतपत मन त्यांनी घडवलं. मनाचा एका कोपऱ्यात शाळा आजही विसावलेली आहे. भलेही त्या शाळेला चकचकीतपणाचा स्पर्श नसला घडेल, सर्व सुविधांनीयुक्त असल्याचे भाग्य नसेल लाभले; पण मातीच्या घरांमध्ये असणाऱ्या शाळेने मातीशी असणारी नाळ कधी तुटू दिली नाही. दहावीच्या परीक्षा तेव्हा आमच्यापुरते एक थ्रील होते. आजच्यासारखी परीक्षाकेंद्रे स्थानिक नसायची. कुठेतरी नेमून दिलेल्या परीक्षाकेंद्रावर जाऊन परीक्षा द्याव्या लागत. आमचे परीक्षाकेंद्र शेजारच्या गावाला. तराफ्यावर बसून तुडुंब भरलेली नदी पार करीत परीक्षेचे पेपर द्यायला जावे लागे. तराफ्यावर बसून नदी पार करण्याऐवजी अंगावरील कपडे सोबतच्या मित्रांच्या हाती कोंबून पोहत पैलतीर पार करण्याचा आनंद परीक्षेच्या पेपरचे दिव्य पार करण्यापेक्षा मोठा असायचा. पेपरसाठी असा अवघड प्रवास करून जाण्याचे चिरंजीव क्षण आमच्या गावातील पुढच्या पिढ्यांसाठी इतिहास झाले आहेत. परीक्षेसाठी दुसऱ्या गावी जाण्याचे भारावलेपण केवळ आठवणीतूनच उरले आहे.

शिक्षणाचे मोल फारसे माहीत नसणाऱ्या आणि तेवढे गांभीर्य नसणाऱ्या परिसरातून शिक्षणाच्या वाटेने शहराच्या रस्त्याला लागलो. अकरावीला तालुक्याच्या गावी असणाऱ्या कॉलेजला प्रवेश घेतला. महाविद्यालयातील शहरी मुलामुलींसमोर पहिल्यांदा उभं राहताना वाटणारा कमीपणा आजही आठवतो. त्यांचं छानछोकीचं राहणं, बोलणं पाहून मनात कॉम्प्लेक्स निर्माण झाला. त्यांच्यासमोर अगदी बावळट वाटत होतो. शाळा शिकताना शिलाईतून उसवलेले अन् फाटले म्हणून ठिगळ लागलेले कपडे वापरण्यात कधी कमीपणा वाटला नाही. कारण आसपास सगळेच तसे असायचे. फुलपँट परिधान करण्याचं सौख्य आयुष्यात पहिल्यांदा अकरावीत असताना लाभलं. गावाहून ये-जा करीत शिक्षण घडत होतं. खेड्यातून शिकणाऱ्या आमच्या पिढीला घडवण्यात कोणाचे योगदान काय असेल, नसेल ते असो; पण आमचा शैक्षणिक प्रवास घडला तो एस.टी. महामंडळाच्या बसेसने. बसच्या पासची सवलत घेऊन खेड्यात वाढणारी आमची पिढी घडली, असे म्हटले तर ते अतिशयोक्त ठरू नये. आजही वाटते, या बसेस नसत्या तर आम्ही सगळे एवढे शिकलो असतो का? कारण जगण्यावर पैसे खर्च करायचाच प्रश्न मोठा होता, तेथे शिक्षणावर खर्च करायचा विचारही करणे अवघड होते. एस.टी.च्या सवलतीच्या पासेसने आम्हाला शिक्षणाच्या इयत्ताच पास केल्या नाहीत, तर जगण्याच्या परीक्षेत पास होण्यासही पात्र बनवले.

तेव्हाचा सिनेमा आठवणीत अजूनही विसावलेला आहे. थिएटरमध्ये पिक्चर पाहणे एकमेव पर्याय असायचा. आजच्यासारखे टीव्ही, डिश, व्हीसीडी, मोबाईल, इन्टरनेट वगैरे काही साधनं नव्हते. तिकीट घेण्यासाठी रांगा लागलेल्या असायच्या. त्या गर्दीत मुसंडी मारून शिरण्यात केवढे साहस वाटायचे. गर्दीत अंगाचा चोळामोळा करून हाती लागलेली तिकिटे आनंदप्राप्तीचे टोक असायचे. सिनेमा पाहताना त्यातील संवादांना पडणाऱ्या टाळ्या आणि शिट्या, गाण्यांवर थिएटरात चाललेला सामुहिक नर्तनाचा प्रयोग आजूबाजूचे भान विसरायला लावायचा. आवडत्या गाण्यासाठी खिशातून हाती लागणारी वीसपंचवीस पैशाची नाणी पडद्याकडे सहज भिरकावली जायची. कोणीतरी आधीच तो सिनेमा पाहिला असला की त्याची रनिंग कॉमेंटरी सुरु असायची. पुढच्या सीनविषयी आधीच त्याच्याकडून सांगितल्या जाणाऱ्या आणि नकोशा वाटणाऱ्या प्रतिक्रियासह सिनेमा पाहण्यातही एक वेगळाच आनंद असायचा, तो आजच्या मल्टिप्लेक्समधील आधुनिक सुविधांमध्ये कसा मिळेल! कॉलेजमध्ये न जाण्याची अनेक कारणं असायची, त्यात ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’, हे एक असायचे. या पहिल्या शोची गोडी काही अवीट असायची. रिलीज होऊन वर्षभराने एखादा सिनेमा लागला असला तरी नुकताच रिलीज झाल्याच्या आनंदात तो पाहिला जायचा.

अमिताभ, जितेंद्र, राजेश खन्ना यांचे सिनेमे पाहण्याची कारणं भिन्न असली तरी हेच हिरो आपणास आवडतात, यावर बऱ्याच जणांचे एकमत असायचे. रेखा, रीना रॉय, माधुरी दीक्षित सौंदर्याच्या परिभाषा होत्या. सिनेमा आनंदासाठी पाहणे हाच एकमेव हेतू असायचा. त्याची कलात्मक, समीक्षणात्मक बाजू कोणती आणि तसे सिनेमे कोणते, हे कोणाच्या गावीही नसायचे. आवडते सिनेमे पाचसहा वेळा पाहणारे अनेक वेडेपीर आमच्याकाळी सहज सापडायचे. सिनेमे पाहण्यासाठी हजार पर्याय शोधले जायचे. कॉलेजला दांडी मारणे घडायचे; पण कॉलेजात विद्यार्थी संख्याच मर्यादित असल्याकारणाने आगाऊपणा करणाऱ्या टोळक्याकडे काही प्राध्यापकांचे खास लक्ष असायचे. त्यांच्या नजरेतून निसटून दांडी मारणे, आगाऊपणा करणे फार मोठा पराक्रम वाटायचा. बाईक्स, मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप ही व्यवधाने नसल्याने जगणं सहजपणाचं असायचं. चुकून एखाद्या दिवशी वर्गातील कोण्या मुलीने वही मागणे त्या दिवसापुरता कुंडलीतील आनंदयोग असायचा. कट्ट्यावर बसून फेसबुकचा संवाद नसायचा. सारंकाही ‘फेस टू फेस’ असायचं. त्यात एक आपलेपण असायचं. थंडीच्या दिवसात कॉलेजच्या पटांगणात शेकोट्या पेटवून चकाट्या हाणत बसण्याचा आनंद महागडे स्वेटर, ब्लेझर्स, शाली अंगावर परिधान करून कट्ट्यावर गप्पा करीत बसणाऱ्या आजच्या पिढ्यांना कसा मिळेल, निसर्गदत्त मिळणारे सहज सुख यांच्या ललाटी नाहीये! वाट्याला आलेला प्रत्येक क्षण जीवनासाठी काहीतरी देऊन जात होता. समृद्धीचे दान पदरी टाकून जात होता.

दिवस, महिने, वर्षाची सोबत करीत काळ पुढे सरकत राहतो. आपल्या अस्तित्वाच्या काही खुणा मनात कोरून जातो. जीवन आपल्या वाटांनी माणसांना पुढे नेत राहते. उपजीविकेच्या क्रमसंगत मार्गाने प्रवास घडतो. कोण कुठे, कोण कुठे स्थिरावतो. त्या जगाच्या आठवणी मनात कोरत राहतो. जुन्यावर परिस्थितीची धूळ साचत जाते. कुठल्याशा निमित्ताने आठवणींच्या झाडाची पाने थरथरतात आणि आपलं मोहरलेपण आठवत राहतात. आठवणींचे एक गाव प्रत्येकाच्या मनात गजबजलेले असते. त्याच्या बऱ्यावाईट स्मृती असतात. त्या टाळता नाही येत. त्यांची संगत करीत नियतीने निर्धारित केलेल्या पथावरून पावले चालत असतात. कोणत्यातरी अवचित क्षणी गगनभरल्या आठवणींचे थवे मनाच्या गर्द झाडीत शिरतात. आठवणींचे गगन सोबत घेऊन माणूस त्याचं सदन उभं करीत असतो. स्मृतींची एकेक शिळा रचित त्याचा महाल उभा राहतो. त्याचं जग आणि जगणं संपन्न होत राहतं. निवांतपणाची सोबत करीत कधीतरी भावनांचे, विचारांचे थवे जागे होतात आणि आठवणींनी बहरलेल्या झाडावर जाऊन विसावतात. मंतरलेल्या क्षणांची सोबत घडत राहते. एकेक पाकळ्या उमलत जातात. आनंदाचं लेणं बनून आठवणींचं फूल जीवनाच्या वेलीवर उमलते. आपल्या अंगभूत सौंदर्याने आणि गंधाने आसपासचा आसमंत गंधित करीत राहते. स्मृतींची सप्तरंगी इंद्रधनुष्ये मनावर कमान धरतात. विचारांच्या वेली मांडवभर पसरून वाढत राहतात. ऊन-सावली, पावसाचा खेळ सुरु असतो. आठवणीच्या झाडाला सचैल स्नान घालीत जगलेले क्षण रिमझिम बनून बरसत राहतात, चिंब भिजवत राहतात. पहाटेच्या प्रसन्न प्रहरी फुललेल्या फुलांचा गंध साकोळून वाऱ्यासोबत वाहत राहतात. कधी पाण्याचा ओहाळ बनून झुळझुळतात. कधी आकाशात चमकणाऱ्या चांदण्यांशी गुजगोष्टी करीत राहतात. झाडावेलींच्या पानांवर जलबिंदू बनून मोत्यासारख्या चमकत राहतात. त्या कशाही असल्या तरी त्यांची सोबत घडत राहते. असतील तशा स्वीकारून माणसांची जीवनयात्रा अनवरत सुरु असते. आठवणींच्या बहरलेल्या झाडावर क्षण, दोन क्षण स्मृतींचे पक्षी येऊन विसावतात. चिवचिव करीत जीवनाचे गाणे गात राहतात.

Sanvedanshilata | संवेदनशीलता

By // 6 comments:
प्रेमास विरोध केला म्हणून मुलीने आईच्या डोक्यात मुसळ घालून हत्या केली. महाविद्यालयात शिकत असणाऱ्या बहिणीने तंग कपडे परिधान केले म्हणून भावाने मारहाण करून बहिणीचा जीव घेतला. काही दिवसापूर्वीच्या वर्तमानपत्रातील या बातम्या. यातील एक घटना जळगाव जिल्ह्यातील दुसरी कोल्हापूरकडील. राज्याच्या दोन दिशांना घडलेल्या. ‘रोज मरे त्यास कोण रडे’ म्हणून वाचून काही विसरलेही असतील. काही क्षणभर अवाक झाले असतील. काहींनी या घटनांचं विश्लेषण केलं असेल. समाज नैतिक जाणिवा विसरून संवेदनाहीन होत चाललायं म्हणून व्यवस्थेला दोष दिला असेल. काहींच्या मनात प्रश्न निर्माण झाले असतील. कोणी काहीच का करू शकत नाही म्हणून कदाचित काहीजण अस्वस्थही झाले असतील. असं काही घडल्यावर समाज क्षणभर अस्वस्थ होतो, हळहळतो आणि ‘आलिया भोगाशी’ म्हणीत मुकाट्याने नियतीने नेमून दिलेल्या मार्गाने मार्गस्थ होतो. पोटाची खळगी भरण्याचे प्रश्नच मोठे असल्याने त्यावर विस्मरणाची धूळ साचत जाते. रोजच्या जगण्याचे गुंते सोडण्यात माणसे गुंततात. प्रश्न तसेच मागे उरतात. संवेदनशील माणसे विचार करतात. इतक्या टोकापर्यंत जाऊन माणसं संवेदना कशा काय हरवून बसतात, याची कारणं शोधू लागतात. खरंतर या घटनातील मुलंमुली अवघ्या सोळा ते एकोणावीस वयोगटातील. ज्या वयात जगण्याचा आनंद घ्यावा. त्या वयात असा अविचार घडावा, याला काय म्हणावं? माणूस म्हणून जगताना संवेदना एवढ्या बोथट कशा काय होत असतील?

माणूस समाजशील प्राणी असल्याचं कुठेतरी लिहिलेलं वाचतो. तसाच तो भावनाशील असल्याचेही म्हणतो. म्हणूनच तो विचारांचं प्रतीक आहे, तसा विकारांचे प्रतिबिंबही आहे, हे दुर्लक्षून चालत नाही. विचारांपेक्षा विकार प्रबळ होतात, तेव्हा जगण्याचे प्रश्न अधिक जटील होत जातात. सारासारविवेकाने विचारविश्वातून काढता पाय घेतला की, अप्रिय घटना सामाजिक वैगुण्य बनून प्रकटतात अन् माणसं जगण्यातील सहजपण हरवून बसतात आणि अविचाराने वर्तायला लागतात. अशा घटनांचं वास्तव नाकारून चालत नाही. माणूस समाजाचाच घटक असल्याने याचं उत्तरदायित्व शेवटी समाजाच्या व्यवहारातच शोधायला लागतं. माणसाच्या इहलोकीच्या प्रवासाच्या यात्रेचे संचित त्याने आत्मसात केलेले संस्कार असतात. ती त्याच्या जगण्याची श्रीमंती असते. संस्कारांनी निर्मिलेली वाट चालणारा समाज भरकटतो, दिशाहीन होतो, तेव्हा जगण्याच्या पद्धतींना मुळापासून तपासून पाहावे लागते. मनात निर्माण होणाऱ्या आसक्तीपरायण विचारांमुळे माणसं हल्ली सहज जगणं विसरत चालली आहेत. आदिम अवस्थेपासून त्याच्या जडण-घडणीचा प्रवास काही लाख वर्षाची खडतर तपस्या आहे. उत्क्रांतीच्या क्रमसंगत मार्गावरून चालताना इहतलावरील सर्वाधिक विचार करणारा प्राणी म्हणून तो घडला. म्हणूनच तो अधिकाधिक उन्नत, परिणत व्हावा हीच अपेक्षा त्याच्या उत्क्रांतीच्या वाटेने होणाऱ्या प्रवासाला आहे. एखाद्या घटनेने माणूसपणावरील विश्वासच उठून जावा असे काहीतरी घडते. माणूस कितीही विकसित झाला, तरी जीवशास्त्राच्या परिभाषेत तो प्राणीच असल्याचे अशावेळी प्रकर्षाने जाणवते. विचारांनी वर्तला तर तो प्रेषित होतो आणि विकारांनी वागला तर पशू.

विज्ञानतंत्रज्ञानाची आयुधे हाती घेऊन विश्वात अन्य ठिकाणी कोणी जीव अस्तित्वात आहेत काय, याचा शोध घेण्याचा प्रयत्न माणूस  करतोय; पण जेथे आहे तोच अजून पूर्णतः समजला नाहीये. त्याच्या वागण्याचे मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय विश्लेषण विद्वान करीत असूनही त्यांच्या निष्कर्षांना पद्धतशीर चकवा देणारा माणूस ओळखता आलेला नाही. याचा अर्थ समाजातील सगळीच माणसे वाईट असतात असा नाही. प्रगतीची नवनवी क्षितिजे संपादित करत असतांना अशा काही घटना घडल्या की, संवेदनशीलता हरवत चालल्याचे जाणवते. माणूस भावभावनांचे सरोवर आहे. विकारांच्या अनेक लाटा त्यात उसळतात. पण संयमाचे बांध घालून त्याच्या जीवनतटांना सुरक्षित राखायला लागते. यासाठी अंतर्यामी असणाऱ्या संवेदनशीलतेचे स्फूल्लिंग जपावे लागते, आतल्या माणूसपणाच्या जाणिवेसह. समाज नावाची व्यवस्था उभी करून त्याच्या विसंगत वर्तनाला बांध घालण्याचा प्रयत्न यासाठीच माणूस करतो आहे. कधी नव्हे इतके माणूसपणाचे आकाश अंधारून आलेले आहे, अविचारांनी मनात गर्दी केली आहे. अंधारल्या वाटांनी प्रवास घडतांना आस्थेचा कवडसा अंतर्यामी जाणीवपूर्वक जपायला लागतो. मनातील भावनांना माणूसपणाच्या कोंदणात अधिष्ठित करणे जगण्याची अनिवार्यता असते. माणसांच्या जगण्याचा गुंता मोकळा करून सहजपणाने जगणं घडायला हवं. ज्याला जगण्याचे प्रयोजन कळते, त्याला जगावं कसं, हे प्रश्न पडत नाहीत. जगणं समजलं की, मोठे होण्यासाठी देव्हारे तयार करण्याची गरजच नसते. स्वतःभोवती उभ्या केलेल्या वर्तुळांना जग समजून वागणारा माणूस समरसून जगण्याचे सौख्य हरवत चालला आहे. जगण्याला जीवनयोग न समजता स्पर्धेचे रणांगण समजून प्रवास घडतोय. प्रत्येकालाच पुढे निघायची घाई झाली आहे. जगात रहायचीही स्पर्धा झाली आहे. स्पर्धा जगण्याचे तत्वज्ञान बनते, तेव्हा जीवनातून संवेदना काढता पाय घेतात. मी मागे पडेन या भीतीने सारेच दिशाहीन मार्गाने धावत आहेत. आयुष्याच्या कॅनव्हासवर पद, पैसा, प्रतिष्ठा नावाचे रंग भरण्यातच जगण्याचं सौख्य सामावाल्याचा भ्रम मनात निर्माण झाला आहे. त्यांचा शोध घेताघेता आयुष्याचा कॅनव्हास बेरंग होत चाललाय याची जाणीवच उरली नाही.

जगणं समृद्ध करण्याच्या चौकटी स्वतःभोवती उभ्या करताना सगळंच मला हवंय, ही मानसिकता प्रबळ होत आहे. जे हवं ते नीतिसंमत मार्गाने मिळवावे लागते, याचे भानच सुटत चालले आहे. स्वतःच्या भौतिक गरजा कमी करून दैन्यदेखील विनम्रतेने स्वीकारण्याची मानसिकता विस्मृतीच्या कोशात अंग मुडपून उभी आहे. माणसापेक्षा गरजा मोठ्या झाल्या आहेत. गरजांतून निर्मित आभासी सुखांच्या मृगजळामागे माणूस धावतो आहे. ‘तुज आहे तुज पाशी’ या साध्याशाच विचाराची जाणीव विसरून वर्ततो आहे. सगळीच सुखं झटपट हवी आहेत. या हव्यासापायी ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ असे जगणे जणू अपराध आहे, या भावनेने माणूस वागायला लागला आहे. ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ म्हणणारा विचार वेडगळपणाची गोष्ट वाटतो आहे. संत-महात्म्यांचे विचार मंदिरांमधील पारायणापुरते उरले आहेत. फक्त ऐकायचे आणि आचरण करताना त्याचा सोयिस्कर विसर करायचा. सगळ्यांना सगळेचकाही हवे आहे आणि ते आताच मिळायची घाई झाली आहे. थांबणं आणि वाट पाहणं यातला प्रतीक्षेचा काळ काहीही करून पुसून काढायची घाई झाली असेल, तर संवेदनांचा विचार करतोच कोण? सुखांच्या हव्यासाला खतपाणी घातलं जातंय. चंगळवाद जगण्याचा सिम्बॉल होतोय. पुढच्या शंभर वर्षाचं जगणं दहा वर्षात जगून घ्यायची घाई झाली आहे. संथ लयीत चालणाऱ्या प्रसन्न जगण्याची आस राहिली नाही. जे हवं ते आजच हाती यावं, नसेल सहज हाती येत तर ओरबाडून घेण्याचीही तयारी आहे.

जगात पैसा वाढत चालला आहे; पण नैतिकतेचे प्रवाह आटत चालले आहेत. विधिनिषेधशून्य विचारातून अनैतिकता, त्यातून विकृती आणि त्या पावलांनी चालत येणारी व्यसनाधिनता, हे समाजाचं प्राक्तन होऊ पाहत आहे. कोटीकोटींचे भ्रष्ट्राचार घडूनही कोणाला काही वाटत नाही. दक्षिणातंत्राला संवेदनाहीन माणसांनी प्रतिष्ठेच्या प्रांगणात उभे केले आहे. चिरीमिरी शब्दाला देणे-घेणे अर्थाचा आशय प्राप्त झाला आहे. धनदांडग्यांच्या महालात निवासाला आलेल्या लक्ष्मीने गरिबाघराच्या सरस्वतीला हतबुद्ध करून टाकले आहे. महागड्या गाड्यांखाली रस्त्यावरील निरपराध माणसे तुडवली जात आहेत. बेदरकार वाहने चालवणाऱ्यांच्या समर्थनार्थ संवेदनांना तिलांजली देत उन्मत्तपणाचं समर्थन करणारी माणसं उभी राहत आहेत. आपल्या माणूसपणाच्या पाऊलखुणांचे ठसे दूरच्या क्षितिजावर सोडून आलेली बोथट मने माणुसकीची व्याख्या आपल्यापरीने करीत आहेत. धनदांडगे असणं जगण्याची नवी आयडेंटीटी होत आहे. जगण्याची नवी पात्रता ठरू पाहत आहे. पैशाला जगण्याचं परिमाण मानण्याचा प्रमाद घडतो आहे. स्वैराचाराला मिळणारे वलय समाजातील संवेदनशीलता हरवल्याचे द्योतक ठरतो आहे.

आयुष्याची वाट सहजसाध्य कधीच नसते. जीवनाचा सोपान यशापयशाच्या शिड्यांनी घडतो. यशाने हुरळून जाऊ नये आणि अपयशाने विकल होऊ नये, हा जगण्याचा सहज पाठ असतो. अपयशाने जाणते व्हावे, आयुष्याला आकार देत सहजपणाने जगण्याची प्रयोजने शोधत रहावीत; पण परिस्थितीशी संघर्ष करताना हताश झालेले जीव अविचारी कृतीने स्वतःच निर्माण केलेल्या समस्यांच्या आवर्तात सापडतात. जगण्याची गणिते चुकत जातात. उत्तरे अवघड होत जातात, तेव्हा माणसं कोणतातरी आधार शोधतात. प्रयत्नांती परमेश्वरही प्राप्त होतो, हे विसरून किंकर्तव्यमूढ होतात. गलितगात्र झालेल्या मनासाठी आधार शोधत कुणातरी स्वार्थपरायण बुवा-बाबा-मातेच्या आश्रयाला जाऊन विसावतात. जगणं उसवलेली आणि समस्यांनी दुभंगलेली माणसे त्यांच्या चरणी आपल्या निष्ठा समर्पित करतात. सारासार विवेक विसरून भोंदूंच्या भजनी लागतात. स्वयंघोषित गुरूंच्या लीला उजागर होतात. समाजाचे भावनिक शोषण करणारी ही माणसे कोणत्यातरी आरोपांनी जेरबंद झाल्यावर त्यांच्या समर्थनार्थ अंधश्रद्ध भक्तगण रस्त्यावर उतरतात. तेव्हा समाजाच्या वागण्याची कीव करावीशी वाटते. कुणातरी मानिनीची मानखंडना करणाऱ्या कलंकित बुवा-बाबाच्या मुक्ततेसाठी कुठल्यातरी अंधश्रद्ध नारी त्यानेच निर्माण केलेले आंधळ्या भक्तीचे झेंडे हाती घेऊन प्रयत्न करतात, तेव्हा समाजमन कोणत्या दिशेने चालले आहे, याची उत्तरे मिळणे दुष्कर होत जाते. कर्मकांड, अंधश्रद्धांना बरकत येणे समाजाचे वैचारिकस्वास्थ्य ठीक नसल्याचे लक्षण असते. समाजातील अविचाराची काजळी दूर करून सकळ जणांना शहाणे करू पाहणाऱ्या विवेकी माणसांची हत्या घडूनही समाजमन सुधारायला तयार नसेल, तर संवेदनांचे वाहते झरे शोधावेत कुठून?

आपण निर्धारित केलेल्या विचारधारांनी जगाचे जगणे घडावे आणि आपण ठरवू तसेच माणसांनी वर्तावे यासाठी हाती शस्त्रे घेऊन निरपराध्यांच्या जगण्याचा अध्याय संपवणाऱ्या रक्तरंजित खेळाचे पट अतिरेकी मांडत आहेत. संवेदना विसरलेल्या आत्मघातक्यांची नवी जातकुळी आकाराला येत आहे. आपल्या अनैतिक तत्वांच्या स्थापनेसाठी माणसांना किडे-मुंग्या समजून रक्तलांच्छित खेळ करणाऱ्या संघटना ही काही संवेदनशील मनांची निर्मिती नसते. या संवेदनाशून्य शिकारी टोळ्या समाजाच्या संस्कारशील मनावरील कलंक आहेत. जगाला कलह, संघर्ष काही नवा नाही. आजपर्यंत जगात जेवढी जीवितवित्तहानी युद्धांनी घडली नसेल; त्यापेक्षा अधिक हानी संवेदना विसरून कृती करणाऱ्या आणि विचारांवर धर्मांधतेची पट्टी बांधून वर्तणाऱ्या वृत्तींनी घडवली आहे. जगातले सगळेच धर्म शांततेची सूक्ते आवळताना दिसतात. असे असूनही जातीय, धर्मीय, वंशीय अभिनिवेश धारण करून वागणारे अकारण आपणच श्रेष्ठ असल्याचे समजतात, तेव्हा धर्म नाही; माणुसकीधर्म संकटात सापडतो. जर देवाचं अस्तित्व निर्गुण, निराकार असेल आणि तो अरत्र, परत्र, सर्वत्र असेल, तर जगातील अनेक परगणे द्वेषाच्या वणव्यांनी का पेटत आहेत? संवेदना विसरलेली माणसे माणुसकीपेक्षा धर्म मोठा समजतात, तेव्हा माणूसपणाचा पहिला बळी जातो. माणूसपण विसरून जग वागत असेलतर धर्म कोणासाठी असेल? माणसाशिवाय धर्म असून नसल्यासारखा नाही का? 

अश्मयुगापासून अण्वस्त्रयुगापर्यंत माणसांचा प्रवास त्याच्या विजीगिषू वृत्तीची संघर्षगाथा आहे. अपार संघर्ष करून समस्यांमधून सहीसलामत सुटण्याचे प्रयोग आहेत. नेट-इन्टरनेटच्या वेगावर आरूढ झालेल्या विद्यमान विश्वात विज्ञानाने असंख्य सोयीसुविधा निर्माण केल्या. इहलोकी प्रतिसृष्टी साकारण्याइतपत माणूस सक्षम झाला; पण त्याला नितळ, निखळ, निर्व्याज संवेदना काही निर्माण करता आल्या नाहीत. प्रगत देशातील प्रचंड प्रगती एकीकडे तर दुसरीकडे अप्रगत प्रदेशातील मागासलेपण, ही विषमता का दूर होत नाही? जगातली सगळी मानव जमात एकच असेल, तर एकीकडे पंचतारांकित जगणे आणि दुसरीकडे जगण्याच्या कलहात अनेकांच्या जीवनाच्या गाथा संपुष्टात येणे घडते. हे संवेदना हरवलेल्या आमच्या मानवकुलास दिसत नसावे का? देशाच्या विकासाच्या आपण वार्ता करतो. उद्याची महासत्ता म्हणून अभिमानाने बोलणे घडते. तेव्हा दहा-पंधरा कोटी माणसे दारिद्र्याला जीवन मानून नियतीने दिलेलं जगणं स्वीकारून कसेतरी जगत असतील, तर स्वतःला महान वगैरे म्हणवून घेणे आपलीच वंचना नाही का? विवाहसोहळ्यावर लाखो रुपये खर्च करून आपला इतमाम समाजाला दाखवण्याचा प्रयत्न काही माणसे करतात. आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढल्याच्या आभासी सुखात रममाण होतांना समारंभासाठी आलेल्यांच्या भरल्या पोटात आणखी ढकलत राहतात. त्यांच्या भोजनपात्रातील पदार्थांचा एकेक घास घेतला तरी पोट भरून शिल्लक उरेल एवढे पदार्थ दाटीवाटी करून सामावलेले असतात, तेव्हा भाकरीच्या एका तुकड्यासाठी कोणीतरी अश्राप जीव टाकलेलं उष्ट उचलून पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडत असतो. हे आमच्या समाजव्यवस्थेला दिसत नसावे का? याला कुठली संवेदनशीलता म्हणावे? आला दिवस कसातरी ढकलीत माणसे अर्धपोटी, उपाशीपोटी परिस्थितीशी दोन हात करीत आजही जगत आहेत. प्रामाणिक प्रयत्न करूनही यांच्या जगण्याच्या प्राक्तनरेखा पालटत नसतील, तर दोष आमच्या हरवलेल्या संवेदनाचा आहे. विस्कटलेल्या स्वकेंद्रित विचारांचा आहे, हे आपण कधी मान्य करणार आहोत?

लाखालाखाच्या महागड्या बाईक्स धूमस्टाईलने सुसाट उधळताना रस्त्याने पायी चालणाऱ्यांची जाणीव आपणास असते का? जाणिवांचे विस्मरण घडून जगणे माणूसपणाची व्याख्या नाही. कोटीकोटींचे बंगले बांधले तरी निद्रेसाठी सातआठ फुटाची जागाच प्रत्येकाला हवी असते. नावावर शेकडो एकर जमिनी असल्यातरी पोटासाठी लागणारी भाकर सगळीकडे सारखीच असते. मग अधिक काही असण्याचा सोस कशासाठी? माणूस वगळून धरतीवर जगणारे अन्य जीव आपल्या गरजेपुरते घेतात. त्यांनी आपल्या घरात फ्रीज नाही सांभाळले. तिजोऱ्या नाही केल्या. आधुनिक सुखसाधनांनी मंडित किंगसाईज जगणं म्हणजे माणसाच्या जीवनाची इतिकर्तव्यता असते का? विस्तीर्ण घर, अंगणात लागलेला वाहनांचा ताफा, सोबतीला विज्ञाननिर्मित सुखांची रेलचेल असणं आणि दारी विसावलेल्या सुखांनाच जगण्याचे परिमाण समजणं संवेदनशील विचारांची वंचना नाही का? जगणंच उसवलं; त्याला टाके घालूनही सांधता येत नाही, म्हणून कोणातरी शेतकरी कोलमडतो. सततच्या संकटांशी लढूनही जगण्याचा मोह पडण्यासारखे हाती काहीच न लागल्याने परिस्थितीशी धडाका देऊन थकलेला जीव जीवनयात्रा संपवतो, तेव्हा त्याच्या अकाली मरणालाही रंग चढतात. कोणाला त्याचं आकस्मिक जाणं प्रेमभंग दिसायला लागतो. कोणाला त्यात व्यसनाधीनतेचा शोध लागतो. हे माणूसपणाच्या कोणत्या संवेदानाचे रूप आहे. कोण्यातरी धनिकाने उभ्या केलेल्या पंचतारांकित महालाचे कौतुक करताना काहींच्या वैखरीला बहर येतो; पण तो उभा करण्यासाठी राबणाऱ्या हजारो हातांचे श्रम दुर्लक्षिणारी माणसे कोणती संस्कृती, कोणते परगणे आपल्या संवेदनशील विचारांनी संपन्न करीत असतात. सुंदरता उभी करणारे हात अंधारात राहणे आणि ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती आहे त्यांची नावे अजरामर होणे, हा संवेदनशीलतेचा विपर्यास आहे.

एखादा देश जाणून घ्यायचा असेल, माणसे समजून घ्यायची असतील तर तेथील रस्त्यावर उभं राहून पाहावं. ज्या माणसांमध्ये रहदारीचे साधे नियमही पाळायचीही शिस्त नसते, पात्रता नसते त्यांच्यासाठी संवेदनशीलता हा खूप दूरचा परगणा आहे. रस्त्यावर हात पसरून याचना करीत केविलवाणी फिरणारी लहान मुले आणि जगण्याची रया गेलेली, दारिद्र्याने पिचलेली, परिस्थितीने लाचार झालेली माणसे सहज दृष्टीस पडणे देशाच्या सामाजिक प्रगतीचे भविष्य कथन करीत असते. असंख्य समस्यांचे मोहोळ सोबत घेऊन उभ्या राहणाऱ्या झोपड्यांमधील शापदग्ध जगण्याला नियतीचे देणे मानून राहणाऱ्यांच्या जगाला माणसांचं जगणं म्हणावं का? देशातील उपलब्ध सोयीसुविधा देशाचा स्वभाव कथन करीत असतात. प्रचंड धूर मागे टाकीत रिक्षा पुढे दामटणारे तुमच्या देशाच्या आरोग्याबाबत किती संवेदना धारण करून वागतात, सार्वजनिक आरोग्याचा किती विचार करतात ते दिसते. कोणत्यातरी सणसोहळ्यात, उत्सवात वावरणारी माणसे रस्त्याला आपली वैयक्तिक जागीर समजून वागतात. कानठळ्या बसवणाऱ्या डीजेच्या तालावर बेधुंद होऊन कसलीही तमा न बाळगता थिरकतात. भोगवादी विचारांना जगण्याचे लेबले चिकटवून आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांमध्ये सांस्कृतिक मर्यादांचे कुंपणे पार करून तरुणाई भान विसरून झिंगताना दिसते, तेव्हा कळते देशाचे भविष्य किती उज्ज्वल आहे. समाज, सामाजिकता आणि सामाजिक दूरिते काय आहेत, याची जाणीव नसणाऱ्यांकडून संवेदनशीलतेची अपेक्षा करणे, म्हणजे खडकावरचा पाऊस आहे. कितीही बरसला तरी एकही कोंब अंकुरित होण्याची शक्यता नाही. आपण आणि आपलं सुख, हे आणि एवढंच ज्याचं विश्व आहे, त्याला संवेदना या शब्दाचा अर्थ शिकवणे अवघड आहे.

राष्ट्राचाही एक स्वभाव असतो. माणसे आपल्या वागण्यातून तो घडवत असतात. दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झालेला जपान फिनिक्स बनून झेपावला. आपलं सगळंच अस्तित्व उधळून बसलेला जर्मनी चिकाटीच्या बळावर उभा राहिला. आपल्याकडे असं घडण्यासाठी आपणही तशाच कोणत्यातरी युद्धाची वाट पाहणार आहोत का? त्यांच्याकडून वस्तू घेतो, तंत्रज्ञान घेतो मग संवेदना जागे करणारे विचार घेता नाही का येणार? इस्रायलसारख्या लहानशा देशाला शेती, पाणी क्षेत्रात जे जमलं, ते धो-धो पाऊस पडूनही आपल्या देशाला अजूनही का जमत नाही? आम्हाला असं नाही का करता येणार? याचा अर्थ आपल्याकडे विधायक काही घडतंच नाही असे नाही. संवेदनांची छोटीछोटी बेटे आजही आपल्या इतमामात उभी आहेत. समाजातील वेदानांकित जिणे पाहून व्यथित झालेली संवेदनशील माणसे आस्थेचे पाथेय हाती घेऊन दुभंगलेली मने सांधण्यासाठी आणि विझलेल्या स्वप्नांना बांधण्यासाठी मरणकळा आलेल्या दारी जात आहेत. करपलेल्या मनात आस्थेचा अंकुर फुलवून नेत्रात नवी उमेद उभी करीत आहेत. विकल मनांचा हरवलेला श्वास अभंग ठेवण्यासाठी धीर देत आहेत. जीवनाच्या निसटत्या वाटांवर चालताना जगण्याचे परगणे हरवलेल्यांना आत्मविश्वास देत आहेत; पण एवढ्या अफाट जनसागरात ती बहुदा दिसतंच नाहीत.

आमचं जगणं आमच्या संवेदनांचा प्रवास असतो, त्या आपण कधी जाग्या करणार आहोत? समाज नुसता अप्रिय घटनांनी व्यथित होऊन चालत नाही. त्यावर चिंतन करून काहीतरी करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकतो, तेव्हा काहीतरी शुभंकर घडण्याची शक्यता असते. समाजात अन्याय, अनाचार, अत्याचार घडत राहतो; न्याय मिळवून द्यावा लागतो. न्यायप्रिय मानसिकतेने जगण्यासाठी अंतर्मनात संवेदनांचा झरा जिवंत ठेवावा लागतो. जगण्याची स्वप्ने भंगतात, जगणं विस्कटतं तेव्हा माणसांचा जीवनावरील विश्वास उठत जातो. माणसांचे संयमित विचार उसवतात, माणूसपणाचे समृद्ध आभाळ अविचारांनी अंधारून येते, तेव्हा सगळा समाजच चक्रव्यूहातल्या अभिमन्यूसारखा होतो. आत शिरता येते, पण बाहेर पडणे अशक्य झालेले असते. संभ्रमात पडलेला अर्जून बनून समाज किंकर्तव्यमूढ झाला की, परिस्थिती परिवर्तनाचे सगळे पर्याय थांबतात. यासाठी जीवनगीता सांगणारा कृष्ण सोबतीला असायला लागतो. असा कृष्ण विद्यमानयुगात गवसणे दुरापास्त असल्याने, प्रत्येकाला कृष्ण बनता येत नसले, तरी त्याचे विचार स्वीकारून सारथी व्हावे लागते. कोणीतरी येऊन आमच्या भाग्योदयाचे साचे बदलून जाईल म्हणून वाट पाहत बसले की, हाती शून्यच लागते. अशावेळी महान परंपरांचा उद्घोष करीत, आम्ही किती वैभवशाली जगलो, याचे दाखले देत संस्कारांचा जागर घडवला, तरी मरणासन्न संवेदनशीलतेला संजीवनी मिळण्याची शक्यता जवळपास नसते.