Kavita | कविता

By // No comments:
हरवलेले गंध

तत्त्वांच्या ठायी असणारे सौजन्य
चौकटी नसणाऱ्या कोपऱ्यात ढकलता येतं
समर्थनाचे पलिते पेटवून
अभिसरणाच्या वार्ता करणाऱ्या
कुठल्याही आवाजाला अगदी सहज

विचारांना अभिनिवेशाचे साज चढले की
प्रतिमा पूजनीय अन् प्रतीके अस्मिता होतात
अभिमान, स्वाभिमानाच्या परिभाषित अंमलात
चौकटींनाही झिंग चढते वेगळं असण्याची
त्यांनाही अलौकिक अस्तित्व असल्याचा
अवकाळी साक्षात्कार घडतो

माणसाला धर्म अफूची गोळी
असल्याचा साक्षात्कार झाला कधीतरी
पण धर्मच मॅगझीनात येईल,
हे तरी कुठे ठाऊक होते कोणाला
अतिरेकाला बेगडी तत्त्वात स्थापित
करायचं ठरवलं की
शतकांच्या पसाऱ्यातून समर्थनाचे मुद्दे
उपसून काढता येतात सोयीचे अर्थ लावून नेमके

खरंतर भुकेचा प्रश्न समोर असणाऱ्यांचा
एकमेव धर्म भाकरी असते
पण भाकरीला लागलेल्या ग्रहणाची गणिते
आकळत नाहीत तेव्हा
संवेदनांचे गंध हरवत जातात
अन् पळत राहतात वैराण वाटांनी
चतकोर सुखांचे रंगहीन तुकडे शोधत

शांतीची सूक्ते रचणाऱ्या महात्म्यांचे विचार
विकल होऊन पंख कापलेल्या जटायूची
असहाय धडपड करीत राहतात
ढासळणाऱ्या बुरुजांना सांभाळत
अन् जखमांच्या भळभळणाऱ्या कहाण्या
मात्र तशाच उरतात

**

निसटलेली क्षितिजे

करपणाऱ्या आकांक्षांचे कोंब
ओलाव्याच्या ओढीने मुळं
मातीत रुतलेली
अंधाराच्या आवर्तात स्वप्ने
विखुरलेली अस्ताव्यस्त
उजेडाच्या प्रतीक्षेत मलूल झाल्या वाटा
आणि
क्षितिजे पावलांच्या ठशातून निसटलेली
तरीही पावलांना ओढ चौकटींनी
वेढलेल्या मुक्कामाची

**

ओंजळभर ओलावा

अस्तित्वाच्या मातीला घट्ट
बिलगून राहिलेली मुळं
खोदत गेलं की सापडतील
पण उकरलेल्या मातीने त्यांचं
असणं सैलावतं त्याचं काय?

उन्मळून टाकणाऱ्या आघातांना
झेलत झाडं उभी राहतात
आकाश डोक्यावर घेऊन
रोजच बदलत जाणाऱ्या त्याच्या
पुसटशा स्पर्शाच्या अपेक्षेने

बहरतात मातीतल्या
ओंजळभर ओलाव्याच्या गारव्याने
आस लावून बसतात आस्थेच्या
कोमल किरणांच्या वर्षावाची
प्रतीक्षा करतात चिंब भिजवून
कोंभाना जन्म देणाऱ्या धारांची

**

भग्न मनोरथ

ऋतूंचे संपलेले सोहळे अन्
विसर्जनाच्या उदास कहाण्यांची
सोबत करीत प्रत्येक पळ
पळत राहतो दिशाहीन वाटांनी
आस्थेचे चार ओले तुकडे
वेचून आणण्यासाठी

उजेडाची भकास गाणी
वारा गातोय कातर थरथर घेऊन
विटलेल्या सुरांच्या सोबतीने
हरवलेल्या आवाजाला स्नेह शब्दांचा
पण शब्दांचे नाद मात्र केविलवाणे
एकटेच अस्वस्थ वणवण करणारे

काट्यांच्या कुंपणात फुलांची
कोमल स्वप्ने गुरफटली
वणव्याच्या दाहकतेने
जन्माआधीच बीजं करपली
अंकुरांच्या अभिशापाने गळे
आवळले अगणित आकांक्षांचे

पुनर्जन्माच्या प्रतीक्षेत शिळा
पावन पावलांची आस लावून
पण पायच येथून तेथून मातीचे
स्वार्थाच्या धुळीने माखलेले अन्
सोबत जखमांच्या शापदग्ध कहाण्या

भग्न मनोरथांच्या
पिचलेल्या वर्तुळात वांझोट्या
अपेक्षांची कलेवरे जागोजागी
कुण्या प्रेषितांच्या पावलांचा कानोसा घेत
उत्थानाच्या प्रतीक्षेत

**

काळोखाच्या कुशीत

माणसं सुटी सुटी अन् आवाज विखुरलेले
दिशांच्या भकास पोकळीत विरलेली
कितीतरी भग्न स्वप्ने

मनावर विकल्पांची असंख्य पुटे चढलेली
सोबत मूकपण पांघरलेला निबिड अंधार
जगण्याचे तिढे सहजी न सुटणारे
प्रश्नांचे गहिरेपण अन् उत्तरांचे शून्यात हरवणे

निर्लेपपणावर आसक्तीचं शेवाळ
पसरलयं ऐसपैस
संवेदनांचा शुष्क व्यवहार
निरर्थकता अधोरेखित करतोय जगण्याची

सत्व आणि स्वत्व टिकवू पाहणारी
संचिते बंदिस्त प्रगतीच्या बेगडी झगमगाटात
स्वत्व विरघळत चाललंय क्षणाक्षणाने
तत्त्वांना ग्लानी कसली

गर्दीत असंख्य विकल चेहरे
ओळख विसरलेले आपल्याच शोधात
प्राक्तनाची वसने परिधान करून
अभ्युदयाच्या आकांक्षेने निघालेल्या
आकृत्या हरवत आहेत भोंगळ गजबजाटात
उरतायेत मागे काळाचे अवघड पेच

काळोखाच्या कुशीत दडलेल्या
अगणित असाहाय कहाण्या
अन् जगण्याचा आसक्तीत
मलूल हालचालींची क्षीण थरथर

**