कळणे अन् वळणे

By // 3 comments:
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. माझा एक स्नेही भेटला. मी लिहिलेला कुठलातरी लेख त्याच्या वाचनात आला असावा. त्या संदर्भांचे सूत्रे हाती घेऊन इकडचं-तिकडचं सांगून पार्श्वभूमी तयार करण्याच्या भानगडीत न पडता लेख आवडल्याचं आधीच सांगून औपचारिक सोपस्कारांना विराम देवून मोकळा झाला. पण तेवढ्यावर त्याचं समाधान होतंय कसलं! कदाचित त्याच्या मनात उदित झालेले प्रश्न अस्वस्थपणाच्या रेषा ओढत असतील. गडद होत जाणाऱ्या संदेहाच्या अक्षरांना शक्य तेवढे पुसून मनाची पाटी कोरी करण्याचा प्रयत्न करूनही उत्तरांचा पर्याप्त पर्याय काही हाती लागत नसेल. सगळे पर्याय पाहून पुरे झाले असावेत, म्हणून कुणाला तरी गाठायचं असेलच त्याला. केवळ योगायोगाने मी नेमका गवसलो.

तसंही माध्यमांच्या सुलभीकरणामुळे कुठल्यातरी नियतकालिकात, वर्तमानपत्रात लिहणं सध्या बऱ्यापैकी सामान्य गोष्ट झाली आहे. लिहिणाऱ्या अन् वाचणाऱ्याला त्याविषयी अप्रूप वगैरे वाटण्याचा काळ बराच मागे पडला आहे आणि वाटत असली काही थोडी नवलाई, तरी काळाची धूळ त्यावर साचत जाते, तसे त्यातले संदर्भही सावकाश धूसर होत जातात. आवडो अथवा न आवडो, लेखनकर्त्यास वाईट वाटू नये म्हणून लिहिलेलं छानच झाल्याचं कुणीतरी सांगणंही संकेतप्रिय परिपाठ आहे जणू. हे असं काहीसं म्हणणं अप्रिय असलं, तरी अतिशयोक्त आहे असेही नाही. अर्थात, उद्धृत केलेली अशी विधाने काही सावर्कालिक सत्य वगैरे नसतं. त्याला अर्थाचे अनेक पदर असू शकतात.

लिहिणाराच सापडला म्हटल्यावर त्याच्या मनातल्या बऱ्याच किंतु, परंतुना स्वल्पविराम मिळाला असावा. नमनाला घडाभर तेल वाया न घालवता सरळ मुद्द्याकडे आला अन् प्रश्नांची झड सुरू केली. मध्ये कोणतीच उसंत नाही. विराम नाही. केवळ प्रश्न अन् प्रश्न, प्रश्नांच्या मागे प्रश्न, प्रश्नांच्या पुढे प्रश्न... म्हणाला, "तुम्ही लोक कुठेना कुठे, काही काही लिहत असतात, बोलत असतात. तुमच्या या उद्योगप्रियतेने विश्वाचे विचार लागलीच बदलतील? मुक्कामाच्या ठिकाणी नेणाऱ्या वाटा माणसांना लीलया सापडतील? व्यवस्थेतील वैगुण्ये विराम घेतील? माणूसपणाच्या व्याख्यांना विस्ताराची क्षितिजे गवसतील? मूल्यांना प्रमाण मानून माणसे मांगल्याचा आरत्या ओवाळत राहतील? जी माणसे आतून एक असतात आणि बाहेरून एक दिसतात, त्यांचे मुखवटे उतरतील?” असं आणखी बरंच काही काही....

असा कुठला त्रागा होता, कोण जाणे? त्याच्याकडच्या प्रश्नांचे शेपूट काही गुंडाळलं जात नव्हतं. त्याला थांबवत म्हणालो, "अरे, थांब ना जरा, थोडी उसंत तर घे! आणि मी काही तू विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न देता पळून वगैरे जात नाही. तसंही तुझ्या प्रश्नांची उत्तरे काही मला एका दमात नाही देता येणार. माणूस म्हणून ही माझी मर्यादा आहे."

आणखीही काही सांगायचं होतं मला, पण तेवढीही संधी न देता शब्दांचे कासरे हाती घेऊन त्याने वाक्यांना आपल्याकडे वळते केलं. म्हणाला, "माहिती आहेत मर्यादा माणसांच्या मलाही. मीही काही वेगळा नाही कुणी, पण माणूस एवढं संकुचित अन् स्वार्थपरायण कसा होऊ शकतो? स्वतःची सुखे अबाधित ठेवण्यासाठी इतरांना समस्यांच्या तोंडी देताना थोडीही विधिनिषेधाची चाड वाटतच नसेल का त्यांना? कुणाचं काही झालं तरी यांना काहीच खंत वाटत नसेलच का?"

या प्रश्नांमध्ये असणारा तिरकस भाव म्हणा अथवा कुठल्याशा कारणांनी त्याच्या अंतरी अधिवासाला आलेली अवस्थता असेल. माहीत नाही, नेमकं काय घडलं ते. पण तो काही वावगं बोलत होता असंही नाही. हे जग आहे तसंच असणार आहे आणि त्यात इंचभरही फरक पडणार नाही, असं कुणी म्हणत असेल तर त्यात वावगं काही नाही. कोणा विचारवंताच्या प्रज्ञेतून प्रसवलेल्या अशा विधानात अतिरंजितपणा आहे असंही नाही. हाही यास अपवाद कसा असेल? कुठल्या कारणांनी त्याचे विचार विचलित झाले त्यालाच माहीत, सांगणं अवघड आहे. पण संदर्भांचं कुठलं तरी सूत्र सुटत होतं एवढं मात्र नक्की. नियतीने पदरी टाकलेल्या वाटांनी मुकाटपणे चालणारा हा माणूस. हाच रस्ता माझ्यासाठी का म्हणून, याने कधी दैवाला दोष दिला नाही आणि मलाच एवढ्या यातायात का घडतात, म्हणून देवाला कधी बोल लावला नाही. मनाने खूप चांगला वगैरे. पण त्याच्या आसपास विहार करणाऱ्यांचे स्वार्थपरायण व्यवहार पाहून माणूसपणाच्या व्याख्यांवरचा याचा विश्वास दोलायमान झाला असावा कदाचित. असा काहीसा विचार तो करत असेल तर त्याचंही काय चुकलं? काहीच नाही. जगण्यातलं सहजपण संपून सवंगपणा सोबत करीत असेल अन् त्या बळावर सत्तेची वसने परिधान करण्याची कांक्षा प्रबळ होत जाते, तेव्हा माणूस आपला वकूब विसरतो. लाथाड्या कोणाला लाखमोलाच्या वाटू लागल्या की, मूल्ये पराभूत झालेली असतात, हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नसते.

वर्तनाचे सैलावलेले प्रवाह कुठे नाहीत? सगळीकडेच ते दुथडी भरून वाहातायेत. मिंधेपणाला मानाच्या महावस्त्रांनी मंडित करून मढवलेल्या मोठेपणाची मखरे मांडली जात असतील तर मूल्यांचे अर्थ मागे पडतात. आपणच आपल्या आरत्या ओवाळून घेतल्या जात असतील अन् अशा आक्रसलेल्या आयुष्याला ललामभूत मानणे घडत असेल तर उरतेच काय शिल्लक? एकीकडे मूल्यांच्या मुशीत मढवलेल्या जगण्याला माणूसपणाचे व्यवच्छेदक लक्षण मानणारे, संकेतांचा सन्मान करणारे अन् संस्कारांची साधना करणारे आहोत, हे कंठशोष करून सांगायचे. संस्कृतीचा इतिहास मांडायचा अन् भूगोल खोदून काढायचा. आपल्या अंगभूत सामर्थ्याने महत्ता मिळवलेल्या माणसांच्या कार्याचं, विचारांचं अनुकरण कसे करतो आहोत, हे दाखवायचं अन् दुसरीकडे सारीपटावर सोंगट्या स्वार्थाची सूत्रे वापरून स्वतःकडे सरकवत राहायच्या, या विचारसंगतीला कसं समजून घ्यावं?

मूल्यप्रणित जगण्याला प्रमाण मानणारी माणसे माणूसपणाची पर्याप्त परिभाषा असते. सद्विचारांच्या संकेतांना पायी तुडवताना काडीमात्रही खंत कुणास वाटत नसेल, तर अशी माणसे माणूसकुलाचे वैभव कसे असू शकतील? तिकडे ध्रुवांवरचा बर्फ वेगाने वितळतो आहे, म्हणून काळजीने काळजाचे कोपरे कंपित होत असल्याचे अन् विश्व विनाशाच्या वाटेने वळते होत असल्याचे सांगायचे. पण इकडे माणसांची मने त्याहीपेक्षा अधिक वेगाने गोठत आहेत, त्याच्या कुणी वार्ता करतच नाही. विवक्षित वाटा विसरणाऱ्या अशा विचारधारेला नीतिसंकेतांच्या कोणत्या कक्षेत अधिष्ठित करता येईल? मला काय त्याचं, असं वाटणं आता नवलाईचं नाही राहिलं. कोरडेपण जगण्याला वेढून असेल, तर ओलाव्याचं अप्रूप उरतंच किती? कोडगेपण विचारांचे सगळेच कोपरे धरून बसले असेल, तर बंधमुक्त करणाऱ्या कोऱ्या वाटा गवसणे अवघडच. गोष्टी विश्वाच्या कल्याणाच्या करायच्या अन् प्रगतीच्या परगण्याकडे पळणाऱ्या वाटा आपल्या दाराकडून वळत्या करायच्या, याला कोणाचं कल्याण म्हणायचं? माणूस गोष्टी विश्व उजळण्याच्या करतोय; पण विचारविश्वात अंधारच दाटला असेल, तर कोणत्या क्षितिजाकडून कवडशांचं दान मागावं?

निष्ठा शब्दाचा कोशातला अर्थ केवळ अक्षरांपुरता उरला आहे की काय, कोणास ठाऊक? पण सुमारांच्या चरणी अस्मिता समर्पित करण्याची चढाओढ लागावी, यापेक्षा विचारांचे अधिक अध:पतन कोणते असू शकते? मूल्ये मोठी की माणूस, हा भाग थोडा वेगळा ठेवूयात. मूल्यप्रणित वर्तनाला प्रमाण मानणारी माणसे मोठीच असतात, याबाबत निदान माझ्या मनात तरी संदेह नाही. पण सांप्रतकाळी मोठेपणाच्या परिभाषांचे अर्थ परिमित झाले आहेत. मूठभर महात्म्य मिरवणाऱ्या कुण्या स्वयंघोषित सत्ताधीशाच्या कृपाकटाक्षासाठी धडपडणारा कळप पाहिला की, माणूस असण्याचे अर्थ नव्याने शोधण्याची आवश्यकता असल्याचे प्रतीत होते. तत्त्वांसाठी समर्पितभावाने वर्तनारी माणसे केवळ इतिहासाच्या पानापुरती उरली आहेत की काय एवढा संदेह निर्माण व्हावा, अशी परिस्थिती आसपास असणे माणूसपण पराभूत होण्याचे सुतोवाच असते, नाही का? 

सांगण्यासाठी आदर्श अवघ्या विश्वाचे; पण प्रत्यक्ष आचरणात आणायची वेळ आली की, मुखवटे परिधान करून कसलेल्या अभिनेत्याने केलेल्या अभिनयापेक्षा अधिक सुंदर अभिनय करायचा. कुणीतरी भिरकावलेले चारदोन तुकडे वेचायचे अन् त्याला प्रसाद मानून त्याच्या प्रासादाभोवती प्रदक्षिणा करीत भक्तिभाव प्रकट करीत राहायचा. अशा अवनत अस्तित्वाला आदर्शांच्या कोणत्या आकारात कोंबता येईल? स्वतःभोवती प्रदक्षिणा करणाऱ्यांना संकेतांचे संदर्भ अन् स्वातंत्र्याची क्षितिजे कशी आकळतील? बंधनांना बांधिलकी मानणाऱ्या मूढांना स्वातंत्र्याचे अर्थ अवगत असणं अवघड असतं. स्वातंत्र्याचे संदर्भ मुक्तीच्या मार्गात असतात. शृंखला खळाखळा तुटण्यात असतात. हे एकदा आकळले की, स्वातंत्र्याच्या परिभाषा नव्याने नाही कराव्या लागत. सुमारांची सद्दी सुरू झाली की, स्वत्व अन् सत्त्व परिस्थिती परिवर्तनाच्या अपेक्षेने सत्याच्या वाटेकडे पाहण्याशिवाय आणखी काय करू शकतात? माझ्या स्नेह्याने मला विचारलेल्या प्रश्नांचे प्रयोजन यापेक्षा वेगळे कुठे होते? सगळीकडून अंधारून आलेलं असतांना उजेडाचा कवडसाही आशादायी वाटतो, नाही का?

धावण्याच्या स्पर्धा आयुष्याचे अनिवार्य अंग असण्याच्या काळात असाही फारसा वेळ आहे कुणाकडे? थ्रीजी-फोरजीच्या युगात अन् कॉपीपेस्टफॉरवर्डच्या जगात प्रत्येकाला पुढच्या रकान्यात अक्षरे, चित्रे, चित्रफिती, ध्वनिफिती असं काहीना काही कोरायचंय. रोज मिळणाऱ्या एक-दीड जीबी डाटाने माणसे आंतरजालाचे धागे घेऊन स्वतःच विणलेल्या जाळ्यात कोळ्यासारखे प्रदक्षिणा करतायेत. मूठभर वर्तुळाला विश्व समजण्याचा प्रमाद करीत आहेत. संवेदना करप्ट होत आहेत. विचार करपत आहेत. चिंतनाच्या वाटेने वळते होण्यास माणसाजवळ वेळ नाही आणि असला तर त्यात स्वारस्य नाही. संवेदना जाग्या असणाऱ्या कोणी ओरडून सांगितलं की, हा सगळा प्रकार मर्यादांच्या कुंपणात असणे मानवकुलाची आवश्यकता आहे. पण आसपास कोलाहलाच एवढा आहे की, गलक्यात असे आवाज काही कानी पडत नाहीत. संवेदनांचा संसार संकुचित झालेल्या जगात सभोवती सुखांचा संभार घेऊन सजण्याची स्वप्ने पाहणाऱ्या डोळ्यांना समस्या, उपेक्षा, वंचना दिसतील कशा? मन मारून जगणं अगतिकता असेलही. पण मनाभोवती भिंती उभ्या केल्या असतील अन् विचारांच्या विश्वात खंदक कोरून घेतले असतील, तर आसपास असणाऱ्या असहाय आवाजांना अर्थ उरतोच किती? आतला आवाज साद देत असूनही प्रतिसाद देता येत नाही, ते अगतिकांच्या आयुष्याचे अर्थ कसे समजून घेतील?

फारसे काही करू शकत नाहीत, ते शब्दांचे साकव उभे करून विश्वाचे वर्तनव्यवहार मार्गी लावू पाहतात. असा एक प्रवाद समोर येतो. आकांक्षांच्या झुल्यावर झुलणारी स्वप्नाळू माणसे यापेक्षा आणखी काय करू शकतात, असं कोणाला वाटून जातं. कोणी याला वांझोटा आशावाद वगैरे असं काहीसं म्हणतो. कोणाला काय वाटावं, कोणी काय म्हणावं, याचं स्वातंत्र्य असतंच की सगळ्यांना. म्हणून कोणी कोपायचं कारण नाही. आसपास अंधार अधिक गडद होत असताना पणतीचा पसाभर प्रकाश परिस्थितीच्या पदरी आमूलाग्र परिवर्तनाचे दान पेरू शकत नसेलही; पण आपल्या ओंजळभर उजेडाने कोपऱ्यातल्या अंधाराशी संघर्ष करू शकतो. हे काय कमी असते. कदाचित येवढ्याने आशेचे कवडसे तर कायम राहतील ना! उत्तरे शोधणारे चेहरे त्या मिणमिणत्या प्रकाशात सापडतीलच असे नाही; पण आपली सावली सोबत असल्याचे समाधान अंतरी असेल ना! स्वार्थाने कुरूप झालेल्या चेहऱ्यांना प्रकाश असाही पेलवत नाही. मुखवटे घेऊन विहार करणाऱ्यांना सत्प्रेरीत प्रेरणांचा प्रसाद परवडत नाही, म्हणून आसपास झगमग उभी करून व्यवधानांकडे लक्ष वेधले जावू नये याची काळजी घेत अंधाराचाही उत्सव करत असतात. झगमगाटाला पाहून दिपणारे डोळे विचारांपासून विचलित होतात, वाटा विसरतात अन् हेच नेमकं हवं असतं कृत्रिम प्रकाशाचे लख्ख दिवे उभे करणाऱ्यांना. ढोंगीपणा ज्यांच्या जगण्यात खच्चून भरला आहे, त्यांना कसली आलीयेत विधिनिषेधाची वलये? त्यांचं वर्तुळ त्यांच्यापासून सुरू होतं अन् स्वार्थाला सन्मान समजणाऱ्या दुसऱ्या वर्तुळात विसर्जित होतं.

यशप्राप्तीची आयती सूत्रे आयुष्यात नसतात, कृतीतून ती गवसतात. कर्तेपणाचा त्याग करता आला की, सहजपणाचे एकेक अर्थ सापडतात. विचारांत सम्यक कृतीची प्रयोजने पेरता येतात, त्यांना मर्यादांची वर्तुळे सीमांकित नाही करू शकत. विचारांना अभिनिवेशांनी विलेपित केलं की, जगण्यातून सहजपण संपतं. बेगडी चमक प्रिय वाटायला लागली की, प्रतिष्ठेच्या परिभाषाही बदलतात. साध्याशा कृतीचे अन्वयार्थ हरवतात, तेव्हा समर्पणशील वर्तनाची व्याख्या संकुचित होते. स्वनामधन्यतेची लेबले चिटकवून घेतली की, 'निरपेक्ष' शब्दाचा अंगभूत आशय हरवतो अन् तो केवळ कोशापुरता उरतो. सहजपणाला स्वयंघोषित प्रतिष्ठेचे टॅग लागले की नितळ, निखळ, निर्व्याज जगण्याचं मूल्य सीमांकित होतं. माणसाकडे असणारं मन त्याची श्रीमंती आहे अन् त्याच्या असण्यात अधिवास करणारी माणुसकी मानवकुलाची दौलत आहे, याचा विसर पडला की, जगणं रुक्ष अन् आयुष्य ओसाड होत असतं.

अर्थात, हे कुणाला कळतच नाही असं नाही. पण वळणं होत नाही. कळण्यातले अन् वळण्यातले अंतर आकळले अन् त्यांचे अर्थ अवगत झाले की, माणसांच्या असण्याला आणखी कोणत्या मखरांत मंडित करण्याची आवश्यकता नाही राहत. सौंदर्याचा संभार सांभाळणारा मोर पिसारा फुलवून आपल्या वैभवाचं प्रदर्शन नाही मांडत. आनंदाची अभिव्यक्ती असते ती. अंतरी निनादणाऱ्या स्पंदनांना भरलेल्या आभाळाच्या साक्षीने दिलेला प्रतिसाद असतो तो. त्यात कुठलेच अभिनिवेश नसतात. ते उमलणं स्वभाविकपणाचे साज लेवून येतं. ती काही कवायत नसते. असलंच काही त्यात तर सहजपण सामावलेलं असतं. माणसांना असं सहज जगता नाही का येणार? माहीत नाही. पण त्याला मोर अन् त्याच्या मनाला मोरपीस बनता आलं की, आपल्या असण्याचे कितीतरी सूर सहजपणाचे साज लेवून सजतील. जगण्याचे सूर सापडले की, कोलाहालातल्या कर्कशपणातही गाणं शोधता येईल, नाही का?
••

अग्निकुंड

By // 2 comments:

अग्निकुंड: प्रवास एक वेदनेचा

काही गोष्टी कळत घडतात, काही नकळत. जाणतेपणाने घेतलेल्या निर्णयांना निदान विचारांचं अधिष्ठान असल्याचं तरी सांगता येतं; पण काही गोष्टी अशाही असतात, ज्यांना गृहीतही धरता येत नाही अन् अधोरेखितही करता येत नाही. जाणते-अजाणतेपणा म्हणावं, तर समर्थनासाठी तीही बाजू शिल्लक नसते. नाहीतरी सगळ्याच गोष्टी मनात आखून घेतलेल्या चौकटींमध्ये पद्धतशीरपणे बसवता कुठे येतात? त्यांचं असणं शाश्वत असतं अन् ते नाकारून पुढचे पर्याय शोधण्यात काही अर्थ असतात असेही नाही. आल्या प्रसंगांना सामोरे जाण्याशिवाय अन्य विकल्प हाती नसतात. सगळे पर्याय संपले की, सूत्रे नियतीच्या हाती सोपवण्याशिवाय उरतेच काय? तसाही माणूस किती स्वतंत्र असतो? स्वातंत्र्याच्या परिभाषा कोणी काहीही केल्या म्हणून काही, ते आहे तसे आणि हवे तसे आयुष्याच्या चौकटीत येवून सामावत नाही. प्रत्येकाच्या आयुष्याला मर्यादांच्या अशा वर्तुळांनी वेढलेलं असतं, एवढं मात्र नक्की.    

एखादी व्यक्ती आपल्याला प्रिय असते. तिच्याविषयी असणारा स्नेह आयुष्याचा अनिवार्य भाग झालेला असतो. पण प्रत्येकवेळी ती आपल्या मनात असणाऱ्या आस्थेच्या अनुबंधांना अनुसरून वागेलच असे नाही. रक्ताचे रंग घेऊन ही नाती धमन्यातून वाहत असतील, तर त्याच्या दाहकतेची धग अधिक वेदनादायी असते. आई-वडील हा द्वंद्व समास आयुष्यातल्या अनेक प्रश्नचिन्हांचे उत्तर असतो. परिस्थितीला वाचत अन् पुढ्यात वाढलेल्या प्रसंगांना वेचत ते पिल्लांना वाढवत राहतात. त्यांचं असणं आश्वस्त करणारं असतं. सवयीने म्हणा की, जीवनसूत्रांच्या जुळलेल्या साखळ्यांनी, काही म्हणा त्याने फार फरक पडतो असे नाही. ते आयुष्याचे अविभाज्य भाग झालेले असतात.

काळ काही कोणाचा सोयरा नसतो. तो त्याच्या लयीत पुढे पळत असतो. त्याच्या पळत्या पावलांचा उमटलेल्या स्पष्ट-अस्पष्ट पाऊलखुणाचा माग काढीत चालणे घडते. त्यांचे संदर्भ ओळखून जुळवून घ्यावं लागतं. पण सगळेच संदर्भ अचूक जुळतील याची शास्वती नाही देता येत. म्हणूनच अपूर्णतेतही माणूस आपलं असं काहीतरी शोधतच असतो. आयुष्यातील उमेदीची वर्षे संपली की, उताराच्या दिशेने प्रवासाला प्रारंभ होतो. थकलेल्या वाटेने घडणारा हा प्रवास आर्थिक असो, सामाजिक असो आरोग्याचा की आणखी कोणता. आपला परीघ घेऊन येतो. मर्यादांनी सीमांकित केलेल्या वर्तुळाभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणा अटळ भागधेय बनते. प्रश्न असतो फक्त पदरी पडलेल्या समस्यांना सामोरे कसे जातो आहोत याचा. कोणी प्रतिकाराची हत्यारे उपसून उभे राहतात. कोणी लढतात आयुधे हाती घेऊन. कुणी शस्त्रे म्यान करून तह स्वीकारतात, तर कुणी कोलमडतात इतकेच. पण प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्याशिवाय अन्य विकल्प हाती नसतात, हेही तेवढेच खरे.

रक्ताचे रंग घेऊन अंतरंगात अधिवास करून असलेली नाती केवळ प्रश्न नसतात, उत्तरेही त्यातच विसावलेली असतात. कधीकधी ही नाती उत्तरांचे विकल्प बनण्याऐवजी प्रश्न घेऊन येतात, तेव्हा पलायनाचा पर्याय नाही स्वीकारता येत. तसा तो स्वीकारता येतच नाही असेही नाही; पण तो काही पर्याप्त पथ नसतो. पुढ्यात प्रश्न एकच आणि एकमेव असतो- आल्या प्रसंगाला सामोरे जायचे कसे? बरं हे प्रश्नही गुंता घेऊन आलेले असतात. नाही सुटत त्यांचे पीळ सहजासहजी. माणूस आपलं असलं अन् ते कसंही असलं, तरी त्यापासून दुरावणे क्लेशदायकच असतं. जीव गुंतलेला असतो नात्यांचे अभिधान बनून आलेल्या आकृतीत. त्याचे अनुबंध टिकवण्यासाठी सुरु असतो आटापिटा. कुडीत जीव आहे, श्वासाची स्पंदने सुरु आहेत, तोपर्यंत कर्तव्यापासून विचलित नाही होता येत. ‘अग्निकुंड’ असाच एक प्रवास आहे. आपणच आपल्यापासून तुटत जाण्याचा. प्राक्तनाच्या पलटवाराने उसवण्याचा. उसवून पुन्हा सांधण्याचा. आहे ते नियतीचं दान मानून मनाला बांधण्याचा. स्वतःला सावरण्याचा. परिस्थितीने केलेला पसारा आवरण्याचा अन् या सगळ्यात गुंतलेल्या धाग्यांना समजून घेण्याचा.

म्हटलं तर केवळ सत्तावीस दिवसांचा हा प्रवास. काळाच्या अफाट पसाऱ्यात एवढ्या दिवसांचे अस्तित्व तरी किती? मोजलेच तर नगण्य असलेले हे दिवस. पण एकेक दिवस युगाचे प्रश्न घेऊन समोर उभे राहत असतील तर... काय नाही या दिवसांच्या वर्तुळात सामावलेलं? माणूस म्हणून असणाऱ्या मर्यादा आहेत. मर्यादांना थेट भिडून परिस्थितीला वाकवण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत. आपणच आपल्याला शोधणं आहे, तसंच आपल्यापासून हरवणंही आहे. विखरत जाणं आहे. उसवत जाणं आहे. आयुष्याच्या वाटेने चालताना सोबत आलेले विकार आहेत, तसेच चांगुलपणाचे परिमाणेही आहेत. त्याग आहे, समर्पण आहे, राग आहे, मनात दडलेले अहं आहेत, तसे अहंकारही आहेत. क्रोधाचा अग्नी आहे, तसा ममतेचा स्पर्शही आहे. सहन करणे आहे, तसे कर्तव्यपरायण वागणेही आहे. नाहीतरी माणसाला एकच एक रेषेत नाही मोजता येत. त्याचं जगणं एकरेषीय कधीच नसतं. अनेक अडनीड वळणं घेऊन ते पळत असतं पुढे. वेड्यावाकड्या वाटांचा हा प्रवास आपणच आपल्याला तपासून घेत समाधानाचे किनारे गाठण्यासाठीची घालमेल असतो.

माणूस कोणताही असो, आपला अथवा परका. त्याच्या जगण्याची भाषिते समजून घेण्यासाठी भावनांचा ओलावा घेऊन वाहत आलेले ओंजळभर ओथंबलेपण अंतर्यामी असले की, समजतं माणूस असा आणि असाच का? सगळीच उत्तरे काही सुगमपणाचे साज चढवून आलेले नसतात. त्यांचे काही गुंते घेऊन येणे जेवढे स्वाभाविक, तेवढे प्रश्नांच्या आवर्तात भिरभिरणेसुद्धा. ‘अग्निकुंड’ अशा काही प्रश्नांचा शोध आहे. आपणच आपल्याला लेखण्याचा, जोखण्याचा, पाहण्याचा, तपासण्याचा. प्रामाणिक प्रयास आहे, आपणच आपल्याला सिद्ध करण्याचा. कधी ठरवून आलेल्या, कधी आगंतुकपणे येवून विसावलेल्या प्रश्नांचा हात धरून चालत आलेल्या किंतु-परंतुचा शोध आहे. उत्तरांच्या शोधात भडकलेल्या वणव्यांची धग सोसावी लागली आहे. तीनशे पानांमध्ये पसरलेला हा परिस्थितीनिर्मित वणवा असंख्य प्रश्नांच्या वर्तुळाभोवतीचे परिभ्रमण आहे. स्नेहाच्या संदर्भांपासून सुटत असताना स्वतःला सावरण्याचा प्रवासही आहे.

आई शब्दाभोवती ममतेचे एक वलय असतं. वात्सल्याचा अनवरत वाहणारा झरा असतो तो. ममता, माया या शब्दांचे अर्थ तिच्या असण्यात सामावलेले असतात. या नावासोबत एक विशिष्ट प्रतिमा मनात तयार होत असते. तिला विखंडीत रुपात अनुभवणे आघात असतो मनःपटलावर अंकित झालेल्या प्रतिमांचा. आईच्या  ममतेचे अध्याय साहित्यिकांचा कृतीतून वाहत आपल्यापर्यंत पोहचलेले असतात. ती ममतेचे महन्मंगल स्तोत्र असल्याचे मनावर प्रतिबिंबित झालेलं असतं. जगातली एकमेव व्यक्ती तिच्यारूपाने आपल्यावर ममतेची पखरण करीत असल्याचे वाटते. पण प्रतिमांना तडे जातात, तेव्हा आपलाच आपल्यावरून विश्वास विचलित होऊ लागतो. आखून दिलेल्या चौकटीत सगळ्या गोष्टी मोजून मापून बसवता येतातच असंही नाही. अर्थात, याला नियम वगैरे मानलं तर त्यालाही अपवाद असू शकतात. अपवाद समोर येतो, तेव्हा आपण विचलित होतो. काय हे, असं कुठे असतं का? म्हणून स्वतःच स्वतःला विचारत राहतो. विश्वास नाही करता येत सहजी; पण अविश्वास करता येईल असंही नसतं. जगण्यात केवळ चांगुलपण अधिवास करून असतं असं नाही. गुणांची शिखरे असली, तरी दोषांचे पहाडही असतात. मर्यादित अर्थाने का असेना, हे मान्य करावे लागते. आई लेकरांसाठी काय असते? असा प्रश्न विचारण्यापेक्षा काय नसते, असं म्हणणं अधिक संयुक्तिक वाटतं. कुणाला ती दुधावरची साय वाटते, कुणाला वासरांची गाय वाटते. आणखी कोणाला काय. पण बहुदा ती वाईट नसतेच, ही धारणा विचारविश्वात असल्याने तिला तडा जाणे अधिक वेदनादायी असते.

ममतेचे, वात्सल्याचे आखीव अर्थ आपला अंगभूत आशय हरवून बसतात. मनात साकळलेल्या प्रतिमा विखंडीत होतात, तेव्हा काय घडते, याची कहाणी लेखिका डॉ. नयनचंद्र सरस्वते कोणतेही किंतु न ठेवता या कादंबरीतून सांगतात. वडिलांवर निरतिशय प्रेम करणारी मुलं. आईच्या त्रासाने कण्हत म्हणा की, त्रागा करून; शेवटच्या श्वासापर्यंत तिच्यावर प्रेम करतात. तिचा हट्टी, एकांगी, हेकेखोर स्वभाव संवेदनशील मनाने समजून घेतात. आहे त्या विसंगतीत संगती शोधत राहतात. जाणून घेतात तिच्या अशा असण्याची कारणे. पदरी पडलेले पवित्र करण्याशिवाय विकल्प नसतात. कारण ती काही त्यांची शत्रू नसते. कदाचित परिस्थितीच्या आघाताने हे तुटलेपण तिच्या जगण्याचं अनिवार्य अंग झाले असेल. कदाचित नियतीने पदरी बांधलेल्या धाग्यांचे पीळ उलगडता न आल्याने आलेलं एकांगीपण असेल. काहीही असले तरी धमन्यांमधून वाहणाऱ्या या नात्याचे अनुबंध वाऱ्यावर कसे सोडून देता येतील? आहे ते नियतीचे भोग म्हणून का असेना, प्रमाण मानून घेत तिच्याप्रती असणाऱ्या समर्पण भावनेने सेवेत स्वतःला समर्पित करून देतात.

हम करे सो कायदा, या तत्वज्ञानाने जगणारी आई. दहा वर्षात सात ऑपरेशन्स अन् आरोग्याचा जटिल गुंता. असं असूनही पथ्य पाळणे तिच्या विचारांच्या कक्षेत नाही. मी खास आहे, म्हणून आकर्षणाचा केंद्रबिंदू मीच, ही तिच्या जगण्याची धारणा. स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचं आजारपण तिच्या हाती लागलेलं हुकमी अस्त्र. यजमान मनोरुग्ण. उच्चशिक्षण घेत असताना स्किझोफ्रेनिया झालेला. लग्नानंतर सोळाव्या दिवशी तिला हे सगळं समजलं. कोण्याही सामान्य स्त्रीसारखीच तीही या गोष्टीचा त्रागा करीत माहेरी निघून जाते. नंतर काय वाटते कोणास ठावूक, पण परत येते. संसार सुरु होतो. उदरनिर्वाहसाठी परंपरागत भिक्षुकी सुरु केली. संसार मार्गी लागतो. पण आपली फसवणूक झाल्याचं तिला कधीच विसरता आलं नाही. त्यातूनच बेमुर्वत वागणं घडलं असावं. ती स्वतः जळत राहिली; पण इतरांनाही जाळत राहिली. तिच्या मीपणाच्या वर्तुळात स्वतःच्या लेकरांनाही प्रवेश नाही. अपवाद केवळ नवऱ्याचा. त्यांच्या सुखांच्या पूर्तीसाठी दोन मुले तिच्या हाती लागलेला हक्काचा पर्याय. तिच्या दृष्टीने सुख म्हणजे भौतिक गरजा पूर्ण करणं. अशा वागण्याने आजाराला कारण मिळते म्हणून सांगितले की, तिचा पारा चढतो. मुलांना आपली काहीच किंमत नसल्याचे तिला वाटायला लागते. त्यातून भांडणं उभी राहतात अन् त्याचा शेवट आत्महत्येची धमकी देण्यात. तिच्या मानसशास्त्राच्या परिभाषा तिच्यापुरत्या ठरलेल्या. शास्त्राच्या सगळ्या निकषांना फाट्यावर मारणारे तर्क तिच्या विचारांचा विसावा.

सून गौरी आणि आई दोन ध्रुवांवर दोनही उभ्या. सुनेने केवळ अन् केवळ माझीच सेवा करावी, तीही अत्यंत विनम्रपणे चेहऱ्यावरच्या रेषा बदलू न देता. ही तिची इच्छा. थोडे कमीअधिक झाले की, नवीन वाद कोणत्याही आवतनाशिवाय आपल्या पावलांनी चालत अंगणी येणार. त्यातही आपलंच कसं खरं आहे, हे पटवून देण्याचं कसब तिला अवगत. लेखिका म्हणतात, ‘गौरी कसायाच्या दारात स्वतःहून माप ओलांडून आलेली गाय अन् मयूर वंशाचा दिवा असला, तरी त्याला कुठे वेगळी वागणूक होती. कामांचा भार उचलून तो कधी मोठा झाला कळलेच नाही. आईची ऑपरेशन्स, पोटासाठी करावी लागणारी नोकरी, घर उभं करण्यासाठी भिक्षुकी या चक्रात गरगरत राहिला. कर्ज फेडू लागला. वयाच्या विसाव्या वर्षापासून तिसाव्या वर्षापर्यंत फक्त आईची दुखणी निस्तरू लागला. बाबा मानसिक त्रासात पिचत होते. मातोश्री राजेशाही जगत होत्या. मुलं माझ्या शब्दाबाहेर नाहीत. सगळं करतात म्हणून मिरवत होती. खरंतर गरज म्हणून वापरत होती.’ 

आपल्याला काही वेदना झाल्या, तर कुठलीही आई देवाकडे पदर पसरून मागेल, ‘देवा माझ्या लेकरांना अशा वेदना कधी देऊ नकोस.’ पण आईचं सगळंच वागणं विसंगत. आजारपणात डॉक्टरांनी सांगितलेलं पथ्य पाळायला लेक सांगते तेव्हा आई म्हणते, ‘तुला काय जातंय बोलायला, तुला भोगावं लागेल तेव्हा कळेल.’ लेखिका लिहतात, ‘मातोश्रीने मला आशीर्वाद दिला. आशीर्वाद फळस्वरूप मानून मी आयसीयूतून बाहेर आले.’ आजारपणातून आईने बाहेर यावं, म्हणून जीव तोडून लेकरं प्रयत्न करतात अन् ती माउली पदरी शापाचं दान टाकते. आशीर्वाद समजून त्याचाही लेखिका स्वीकार करते. नवऱ्याच्या निधनानंतर आपले लाड, हट्ट हक्काने पुरवून घेण्यासाठी मुलासमोर सतत कण्हणारी आई; तो पाठमोरा होताच अगदी काहीच झालं नाही अशी होते. हसत, खिदळत घराबाहेर बसलेली असते. हे पाहून लेखिकेच्या मनात संताप येतो. फोन करून भावाला ही गोष्ट सांगते. खरंतर त्यालाही हे माहीत आहे; पण त्यानेही आता विचार करणं सोडून दिलं आहे. दोघा भावंडांची ही हतबलता मनात एक अस्वस्थपण कोरत जाते.

आईच्या स्वभावाविषयी लेखिका लिहितात, ‘एक नक्की, आईमध्ये एकाच वेळेस दोन-तीन व्यक्तिमत्त्व होती. तिच्यामध्ये निरागस मूल होतं, स्वतःच्या फायद्यापुढं काहीच न दिसणारं ते मूल होतं. फायदे मिळविण्यासाठी ते मूल कधी लाडात येतं, कधी आमिष दाखवतं तर कधी रागवतं, चिडतं. आई तशीच वागत असे. दुसरं व्यक्तिमत्त्व कारस्थानी बाईचं होतं. राजकारण करणारी, नात्यांचा वापर करणारी महाकारस्थानी बाई. तर तिसरं व्यक्तिमत्त्व एका कमकुवत मनाच्या माणसाचं होतं. आपलं कमकुवतपण लपवण्यासाठी, आपलं व्यक्तिमत्त्व परिपूर्ण करण्यासाठी दुसऱ्या माणसाचा कमकुवत माणसं आधार घेतात. पण तो आधार घेणं समोरच्या माणसाच्या गळ्याचा फास होऊन जातं, हे कमकुवत जिवाला कळत नाही. कळलं तरी त्यांच्यापुढे पर्याय नसावा कदाचित...’

आईभोवती ह्या कादंबरीचं कथानक फिरत असलं तरी त्या अनुषंगाने येणारी इतर पात्रे, परिस्थिती, घटना तेवढ्याच समर्थपणे आकारास आल्या आहेत. आईला तिच्या गुणदोषासह मांडताना तिची अगतिकता लेखिका अधोरेखित करतात. भलेही तिच्या वर्तनाला विपर्यासाची, विसंगतीची वर्तुळे वेढून असतीलही. पण मनाच्या प्रतलावरून वाहणाऱ्या वात्सल्याच्या प्रवाहांना संवेदनशील विचारांनी समजून घेताना, तिच्या अशा वागण्यातल्या विसंगतीचे अर्थ उलगडत जातात. परिस्थितीवश तिच्या वागण्यात विसंगती दिसत असली, तरी मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात काही वेदना विसावलेल्या होत्या, हे लेखिका वाचकांच्या समोर आणतात. केवळ विसंगतीला ओळखून आईला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे काही अवघड नाही; पण त्यामागची संगती लावून, तिला आहे तशी स्वीकारण्यात आतूनच काहीतरी उमलून यावे लागते.

अस्वस्थ कोलाहल अंतर्यामी घेऊन घडणारा सत्तावीस दिवसाचा हा प्रवास. प्रत्येक दिवस दाहकता घेऊन येणारा. त्यातील चढउतार, अवघड वळणे, होकार-नकार घेऊन आलेले क्षण, हतबुद्ध करणारे प्रसंग. हाती येता येता सुटत जाणे. आपणच आपल्यापासून तुटत जाणे. तरीही जुळत जाण्याची आस अंतर्यामी अनवरत नांदती राहणे. सगळाच प्रवास दमछाक करणारा. अखेर ते अग्निकुंड आपल्या आत असणारी धग घेऊन विसावले. आयुष्यभर जपलेल्या धगधगत्या निखाऱ्यांच्या प्रकाशात आई निश्चलपणे विसावलेली. तिच्या चेहऱ्यावर विलसत असलेली शांती एक प्रयासाची सांगता अधोरेखित करीत होती. असण्यापासून नसण्यापर्यंतच्या प्रवासाचे एक आवर्तन पूर्ण झालेलं असतं. जाणीवेपासून नेणीवपर्यंतच्या प्रवासाची सांगता झालेली असते. देहाला अन् देहासोबत वेढून बसलेल्या विकारांना विराम मिळतो. विरामाच्या एका बिंदूतून उगम पावणाऱ्या शक्यतांच्या अगणित रेषा मागे उरतात. तिचं असणं जेवढं सत्य, तेवढंच तिचं जावूनही उरणं शाश्वत.

हाती लागलेले उमेदीचे कवडसे, तर कधी पदरी पडलेला अपेक्षाभंगाच्या अंधाराचा पाठशिवणीचा खेळ सुरु असतो. नियतीच्या हाताचे बाहुले बनून परिस्थिती खेळवत राहते सगळ्यांना. दवाखान्याच्या वाढत्या खर्चाचा वर्धिष्णू आलेख. परिस्थितीने सर्व बाजूंनी केलेली कोंडी. उमेदीचे तुकडे वेचण्यासाठी केलेली यातायात. सगळंच दमछाक करणारं. मनात साचलेल्या वेदनांशी दोन हात करत आईचे श्वास अबाधित राखण्यासाठी केलेल्या प्रयासांची कहाणी संवेदनांचे काठ धरून वाहत राहते. ओंजळीत पकडून ठेवलेल्या काळाच्या वाळूचे एकेक कण हातातून निसटत राहतात. खरंतर त्याचीच ही कहाणी. सोबतीला असणाऱ्यांचे आश्वस्त करणारे अनुबंध. स्नेह्यांचे सहृदय सहकार्य जगण्यात उमेद जागवत राहते. पण काळ काही कोणाच्या आज्ञेने चालत नसतो किंवा कोणाच्या कांक्षेने विराम घेत नसतो. त्याला फक्त चालणं ठावूक असतं. त्याच्या पावलांना परतीचे रस्ते नसतात. निघून जातो तो तसाच पुढे, कोणाची फिकीर न करता. जातांना आई नावाची आठवण म्हणा, वेदना म्हणा, दुःख म्हणा, काहीही म्हणा सोबत ठेवून जातो. संपलेलं असतं सगळं. एका एककल्ली जगण्याची सांगता होते. पण त्यासोबत अनेक आठवणींचा पुन्हा जन्म होतो. व्यक्ती निघून जाते, पण तिच्या भल्याबुऱ्या आठवणी मनातून काही निरोप घेत नाहीत. त्या आठवणींचे कढ घेऊन वाहणारी ही कहाणी. वेदनेची अक्षरे वेचून काळाच्या तुकड्यावर त्यांचे अध्याय लेखांकित करण्यात डॉ. नयनचंद्र सरस्वते यशस्वी झाल्यात, असे म्हटल्यास अतिशयोक्त होणार नाही.
••