Anakhi Ek Nikal | आणखी एक निकाल

By // No comments:
नुकतेच बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले. त्याच्या आधी-नंतर जेईई, सीईटी परीक्षांचेही निकाल एकदाचे घोषित झाले. नेहमीप्रमाणे गुणवत्तेची शिखरे पूजली गेली. त्यांच्या गुणवत्तेचा (की गुणांचा) गौरव झाला. परीक्षेत उच्चगुण संपादित करणाऱ्या गुणवंतांना संबंधिताकडून गौरवान्वित केले गेले. त्यांच्या गुणवत्तेत योगदान (?) असणाऱ्यांचेही खास अभिनंदन केले गेले. कौतुकाच्या वर्षावात सारे चिंब भिजले. कौतुक ज्वर हळूहळू ओसरत गेला. तो ओसरल्यावर परीक्षेतील यशवंतांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात एक जाणीव प्रकर्षाने अधिक गडद होत गेली, पुढे काय? या प्रश्नाचं उत्तर काय असावं, म्हणून साऱ्यांच्या चेहऱ्यावर एक भलंमोठ्ठं प्रश्नचिन्ह अंकित झालेलं. काय करावं? कुठं जावं? कोणता अभ्यासक्रम निवडावा, कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा? असे एक ना अनेक प्रश्न. प्रश्नांच्या गुंत्यात सापडलेल्यांसाठी नेहमीप्रमाणे मदतीला काही तज्ज्ञ सल्ले, काही तज्ज्ञांचे सल्ले, काही व्याख्याने, काही सेमिनार्स बापरे! आजूबाजूला सारं कसं विचारांचं मोहळ उठलेलं. विचारांच्या मेघांनी आभाळ दाटलेलं.

सगळं जीवनचक्र भविष्याभोवती गरागर फिरतंय. ते तसं फिरायलाही हवं, कारण आजच्या प्रयत्नातून पुढच्या प्रवासाची दिशा ठरत असते. पुढे जाऊन आपल्या जीवनात येणाऱ्या आनंदप्राप्तीसाठीच सारी धडपड चालेली असते. आनंदयात्रिक बनण्यासाठी आधी आनंदाचं झाड आपल्या अंगणात लावावं लागतं. आनंदी मन हीच विद्यमानकाळाची आवश्यकता आहे. पण यातील किती आनंदाची झाडं बहरतात, फुलतात? आनंदाची ही रोपटी दहावी बारावी परीक्षेतील निकालांच्या वावटळीत उन्मळून पडतात. त्यांच्या असह्य दाहकतेत करपून तरी जातात. तसं पाहता जीवनातील आनंद, दुखाःची निर्मिती घडायला आपणच जबाबदार असतो. त्या-त्या वेळी घेतलेले बरेवाईट निर्णय आपल्या वाट्यास काय यावं, हे ठरवत असतात. यासाठी आपण कोणालातरी उगीच जबाबदार धरत असतो. अर्थात सगळ्याच ठिकाणी असे घडत नाही. काही ठिकाणी असे घडतही असेल. पण निर्णय घेण्याची जबाबदारी कोणीतरी पार पाडत असेल, तर त्यामुळे होणाऱ्या बऱ्यावाईट परिणामांचे उत्तरदायित्व त्याचेच असते, हेही नाकारता येत नाही.

काही दिवसापूर्वी माझा एक माजी विद्यार्थी शाळेत आला. शाळेत त्याचे काहीतरी काम असावे. समोरच दिसला म्हणून विचारले, “काय रे! सध्या काय करतोय? यावर्षी तू बारावीला होतास ना! निकालाचं काय?” माझं बोलणं ऐकून विचलित न होता शांतपणे म्हणाला, “त्याचे बारा वाजले सर!” मुळातच त्याचा स्वभाव सहजपणे वागण्याचा असल्याने फार काही मोठे अघटित घडलेच नाही, अशा अविर्भावात तो बोलला. मलामात्र वाटत होते, हातून काहीतरी निसटल्याची खंत याच्या मनात असावी. तसे चेहऱ्यावर जाणवू न देता म्हणाला, “आहेच यापुढे आपली आषाढी, कार्तिकीची वारी. होईल पुढे सारेकाही ठीक. वर्ष हातचं जातंय, बस्स! आणि दुसरं काही वेगळे घडण्याची शक्यता नव्हतीच. कारण आम्हाला सोबत-संगतच तशी होती. सारेच जीव जिवाची मुंबई करणारे असल्यावर ये तो होनाही था! झालं..... जे नुकसान व्हायचं होतं ते. घडलेल्या चुकांचं निराकरण मलाच करावं लागेल. दुसरं कोण करणार आहे? वाटलं थोडं वाईट; पण आता त्याला काही इलाज नाही. झालं ते घडून गेलं. अर्थात या वाईट वाटण्यात सहानुभूती वगैरे काही नव्हतं. होती फक्त अनुभूती. पण एक खरंय सर, शाळेत शिकलेलं आज आठवतेय, अनुभव हाच मोठा गुरु असतो. शिकलो अनुभवातून काय शिकायचे ते!” त्याला आणखीही बरंच काही बोलायचं असावं. मला पुढच्या तासिकेला वर्गावर जायचे असल्याने त्याला धीराचे (की उपदेशाचे!) चार शब्द ऐकवले. पुन्हा कधीतरी निवांतपणे येऊन भेट, म्हणून त्याच्याशी बोललो. आणि वर्गाकडे निघालो.

माझा हा विद्यार्थी कुशाग्र, असाधारण वगैरे बुद्धिमत्ता असणारा, उच्च गुणसंपादन करणारा कधीच नव्हता. जसे बरेच जण असतात ना! त्या बऱ्याच जणातला एक. अंगापिंडाने बऱ्यापैकी. सरासरी उंची असलेला. नाकीडोळी नीटस. शाळेच्या गणवेशातही नीटनेटके राहता येते, हे त्याच्याकडे पाहून वाटावे असा. सतत प्रसन्नचित्त. साऱ्यांना आपलासा वाटणारा. पुस्तकातील पाठांमधून शिकवलेल्या परोपकार या मूल्याला आपलं कर्तव्य मानणारा. मदतीसाठी प्रसंगी धावून जाणारा, परोपकारी गंपू. कौटुंबिक पार्श्वभूमी उत्तम. मुलावर हो, मुलावरच (त्याच्या प्रगतिपुस्तकातील गुणांवर नाही) प्रेम करणारे प्रेमळ आईबाबा. आनंदी कुटुंब. जीवनाकडे सकारात्मक, सहज नजरेने बघणारे समजूतदार पालक. परीक्षेत निकालाचा गणपती बाप्पा मोरया! झाला. होऊ दे. बचेंगे तो और भी लढेंगे, या विचाराने मुलासोबत उभे राहणारे. पोरगं नापास होऊनही त्यांच्यामुळेच आनंदाने, उमेदीने उभे आहे. चुकांची जाणीव त्याला झाली. तो सल मनात होताच; पण उभं राहण्याची जिद्द, उमेद त्याहून मोठी होती. कारण चुका घडलेल्या असतानाही आईबाबा पाठीशी उभे होते. केवढा मोठा आधार त्याच्यासोबत होता. असे आधार सर्वांनाच मिळत नसतात, हे त्या अभाग्यांच दुर्दैव.

हा मुलगा दहावीच्या वर्गात माझ्याकडे होता. सहज म्हणून भेटायला त्याचे आईबाबा शाळेत आले. म्हणाले, “सर, मुलाच्या गुणवत्तेकडे लक्ष असू द्या! पोरगं घडवा. त्याला परीक्षेत जास्त गुण नाही मिळाले तरी चालतील; पण माणूस म्हणून जगताना त्याची गुणवत्ता कमी पडायला नको.” त्यांचं हे बोलणं ऐकून मी आश्चर्यचकित झालो. आम्हांला भेटायला येणाऱ्या पालकांकडून नेहमीच मुलांच्या गुणांची चौकशी ऐकायची सवय. यांचं बोलणं जरा वेगळच वाटलं आणि मनापासून आवडलंही. सकारात्मक विचार घेऊन भेटणारी, जगणारी अशीही माणसे असतात, यावर विश्वास ठेवायला बाध्य करणारे. पण अशा विचारांना घेऊन वावरणारी माणसांची जमात हल्ली दुर्मिळ होत चालली आहे. जो-तो गुणसंख्येच्या स्पर्धेत धावतो आहे. धावण्याच्या स्पर्धा कशासाठी याचे भान किती जणांना आहे. कुणास ठाऊक? फार थोड्यांना असेल, तर बाकीच्यांचं काय?

स्पर्धा शब्द आपल्या विचारात आणि मनात एकदाचा रुजल्यावर त्याचे पर्यवसान ‘इगोत’ होते. त्याची टोके धारदार होतात, टोकदार होतात. टोकदार काट्यांच्या टोचण्याने जखमा झालेली रक्तबंबाळ मने सावरायची कशी? हा प्रश्न वाटतो तितका सहज नाही. सोपा तर त्याहून नाही. आपल्या अंतर्यामी समाधान साठलेले असेल तर अस्वस्थ उसासे उभे राहतीलच कसे? आपल्या आकांक्षाना पूर्ण करण्यासाठी स्वप्नेही मोठी पहावी लागतात. पूर्ततेसाठी आपल्याकडे क्षमताही असाव्या लागतात. वास्तवाचे भानही आपणास असावे लागते. रनिंग ट्रॅकवरून धावणाऱ्या प्रत्येकीला पी. टी. उषा नाही होता येत. मैदानावर क्रिकेट खेळणारा प्रत्येकजण काही सचिन नाही होऊ शकत. प्रत्येकाला डॉ. अब्दुल कलाम नाही होता येत. पण प्रत्येकाला माणूस निश्चित बनता येते. माणूस म्हणून जगण्यासाठी फार मोठा अलौकिक त्याग करायची आवश्यकता नाही. फक्त आपला इगो कमी करून मायेचा झरा वाहता ठेवला तरी पुरे आहे. बऱ्याचदा हे घडणे अवघड असते. पाल्यांकडून आपल्या अपेक्षांची पूर्ती घडणं बापाला आवडतेच. पण त्यांच्यातील इगोला त्याने मिळविलेले कमी गुण का नाही आवडत? ‘ये दिल मांगे मोअर’ अशीच त्यांची स्थिती असते.

परीक्षेच्या निकालांनंतर यशस्वीतांना डॉक्टर, इंजिनियर बनण्याची घाई झालेली असते. किमान तशी इच्छा तरी असते. सारे धावतील तिकडेच हेही धावतील. काही वेगळे करावे ही मानसिकताच नाही. मग हेच करायचे म्हणून घेतल्या जातात हाती लहानमोठ्या गोण्या. राहतात कुठल्यातरी शिक्षणसंकुलातील रांगेत उभे. जणूकाही येथेच आपल्या पाल्याचे उज्ज्वल भविष्य जन्माला येणार आहे. अन्यत्र कुठेच तसे असण्याची शक्यता नसल्यासारखे. गोण्याभरण्याइतके प्रवाह त्यांच्याकडे वाहत असतील तर ठीक. नाहीतर स्नेह्यांकडे उसनवारीची भिक्षांदेही आहेच. तेही शक्य नसल्यास घरदार, जमीनजुमला पणाला लागतो. आज अंधारात आहे त्या उद्याच्या भविष्यासाठी जुगार खेळला जातो. यात जिंकणारे किती आणि हरणारे किती? या प्रश्नाचं उत्तर मिळणे अवघडच.

बोर्डाच्या परीक्षेत उच्च गुणसंपादन करणाऱ्यांतील बऱ्याच जणांचे पुढे काय होते, ते नेमके कुठे असतात, यांचा मागमूसही नंतर कुठे दिसत नाही. शिकणाऱ्यातील किती डॉक्टर, इंजिनियर उच्चगुणवत्ता संपादन करून आत्मसात केलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजसेवेसाठी करतात? सन्माननीय अपवाद सोडलेतर सारेच परिघाभोवती गरागरा फिरतात. परिघाच्या वर्तुळालाच आपलं विश्व समजतात. कितीजण आपल्या व्यवसायातील खूप उंचीचे कौशल्ये संपादित करतात? हा एक यक्षप्रश्न आहे. आपल्याकडे केवळ काहीच व्यवसायांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. अद्यापही आपला समाज अन्य पर्यायाकडे प्रतिष्ठित भावनेने पाहत नाही. विज्ञानशाखा निवडलीस ना, मग ठीक आहे! आहे काहीतरी भविष्य. वाणिज्य ठीक आहे, करशील काहीतरी पोटापुरतं. पण कलाशाखा अरे, भिकेचे डोहाळे लागलेत काय तुला? काय मरायला घेतो कलाशाखा. नुसता अंधार. उजेडाचा एकतरी कवडसा तिकडे दिसतो का? ही आमची मानसिकता. कोणत्या युगात आपण वावरतोय? प्रतिष्ठेच्या बेगडी कल्पना कशासाठी हव्यात? पाश्चत्य राष्ट्रांत मानवविद्या शाखांना मिळणारी प्रतिष्ठा आपल्याकडे कशी आणणार आहोत आपण?

आपल्याकडे राजकारण आणि शिक्षण या विषयांवर खूप चर्चा होते. मत व्यक्त करणारा शिकलेला असला काय, नसला काय. कोणीही आपले मत प्रदर्शित करतो. जणू त्याचं मत म्हणजे परिस्थितीचे सखोल चिंतन असते. शिक्षणात काही रामच राहिला नसल्याचं त्यांचं म्हणणं असतं. सीमित अर्थाने हे खरं असेलही. ज्या देशाची विद्यापीठे श्रेयनामावलीत पहिल्या शे-दीडशेमध्येही नसतील, त्या देशात शैक्षणिक गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होतीलच. पण प्रश्न एवढेच आहेत कुठे. महाराष्ट्रात इंजिनियरींग अभ्यासक्रमाच्या सुमारे पंचवीस-तीस हजार जागा रिक्त राहत असतील आणि डी.टी.एड, बी.एड.ला कोणी विचारायला तयार नसेल, तर दोष नेमका कुणाचा? प्रवेश घ्यायलाच कोणी तयार नसेल, तर या महाविद्यालयातून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या गुणवत्तेचा दर्जा काय असेल, हे सांगायला कोणा भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही.

परीक्षांच्या निकालांनंतर प्रत्येकजण अपेक्षित वाटांनी आपलं भागधेय शोधण्यासाठी चालता होतो. पण साऱ्यांनाच वाटा सापडतील असे नाही. काहींना त्यांची भाग्यतीर्थे मिळतीलही. नसतील मिळणार म्हणून हताश, निराश होण्यात अर्थ नाही. एखादे अपयश म्हणजे संधीचा शेवट नसतो. अपयश हा चुकलेला रस्ता असू शकतो; त्याचा शेवट नसतो. मला भेटलेल्या या विद्यार्थ्याने कळत-नकळत हेच तत्व अंगिकारले. अपयश त्याच्या वाट्याला आले. ती वेदना त्याच्या मनात आहेच. पण मनात आशाही आहे आणि खात्रीही आहे परिस्थिती असते तशीच कायम राहत नाही. पाठीमागे समजूतदार पालक उभे असल्याने अपयशाला सामोरे जाणं त्याला अवघड गेलं नाही.

आपली मुले आपलं अस्तित्व आहेत याची जाणीव पालकांना आहे. पण परीक्षेत मिळवलेले गुण हीच खरी संपत्ती समजून ते त्यांचं मोल करायला लागतात. आपली मुलं अनमोल संपदा आहे. तिचं मोल गुणांच्या टक्केवारीत कसं होईल? समाजात वावरताना माणूस म्हणून आपल्याकडे किती गुणवत्ता आहे, हेच पाहिले जाते. तुला किती गुण मिळाले, असं दैनंदिन व्यवहारात विवक्षित वेळ निघून गेल्यानंतर कोणीच कोणाला विचारत नाही. मिळवलेले गुण समाजाला दिसावेत म्हणून काही आपण परीक्षेचे गुणपत्रक गळ्यात घालून फिरत नाहीत. परीक्षेतील गुण महत्त्वाचे आहेत, त्याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. त्यावर आपले उद्याचे भविष्य ठरते हेही सीमित अर्थाने खरंय. पण भविष्य ठरविणारा तो काही एकमेव घटक नाही. आपल्या अपत्यांच्या गुणवत्तेचं मोल करताना पालकांनी थोडं भूतकाळात डोकावून पाहावं. आपणच आपणाला प्रश्न विचारून पाहावा, आपण लहान असताना आपल्या मुलांइतकेच स्मार्ट होतो का? यांच्याइतका चुणचुणीतपणा आपल्याकडे तेव्हा होता का?

Nikal Kunacha | निकाल कुणाचा?

By // No comments:
दहावीचा निकाल झाला घोषित एकदाचा. माहितीतंत्रज्ञानाच्या युगाने एक क्लिकने गुणपत्रकाची छबी संगणकाच्या स्क्रीनवर दिसू लागली. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी केलेल्या सायासप्रयासचे दर्शन गुणनोंदींच्या रूपाने पाहणाऱ्या प्रत्येकाना घडले. निकालाच्या नभांगणात काही तारे ठळकपणे दिसले. काही लुकलुकताना पाहिले. काहींना अंधाराच्या पटलाने पार झाकोळून काढले. ज्यांचं प्रयत्नांचं, परिश्रमाचं जसं संचित होतं, तसं त्याचं रूप साकार होत गेले. हाती यशाचं फुलपाखरू लागले, त्यांच्या मनाच्या आसमंतात आनंदाची बरसात झाली. आशेच्या मशाली उजळल्या. पुढील मार्ग कोणते, कसे असावेत याचे आडाखे बांधायला काहींनी सुरवात केली. इप्सितस्थळी पोहचायचे कसे, याचे आराखडे तयार केले गेले. काहींनी परीक्षेचा निकाल लावला, तर काहींचा निकाल परीक्षेने लावला.

‘नेमेचि येतो पावसाळा’ तसा जून महिना उजळला की याचेही आगमन ठरलेले. वाटचालीच्या मार्गात अडथळे नसतील तर प्रवास सहजसाध्य होतो. नाहीतर रेंगाळतो काहीकाळ आहे तेथेच. यावेळी रेंगाळला थोडा; पण आला एकदाचा. भिजले त्याच्या वर्षावात काही. काहींच्या अंगणात वर्षाव झालाच नाही. आसुसलेली भूमी जलधारांच्या वर्षावाने भिजून तृप्ततेचा हुंकार घेते. पण पाऊसच बरसला नाही तर तापत राहणं हेच तिचं भागधेय ठरतं. गुणांच्या वर्षावाने चिंब भिजणारे मोहरले. वर्षावच झाला नाही, तेथे भिजण्याच्या प्रतीक्षेत उभी असलेली रोपटी कोमेजली, काही करपली. ही कोमेजलेली रोपटी सांभाळायची कशी, हा प्रत्येक परीक्षांच्या निकालानंतर उभा राहणारा नेहमीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक अवघड होत जातोय. ज्यांच्याकडे वादळवाऱ्याशी, उन्हापावसाशी संघर्ष करीत अस्तित्वाची मुळे पायाखालच्या मातीत घट्ट रुजवून ठेवण्याइतके बळ आहे, ते संघर्षात टिकतील. पण ज्यांच्यात एवढे त्राण नाही त्यांना आधाराच्या काढण्या द्यायच्या कशा? आजपर्यंत संयुक्तिक उत्तर हाती न आलेला हा जटील प्रश्न. अशा प्रश्नांची उत्तरे शोधायची तर त्यांच्या मुळाशी जाणं आवश्यक आहे.

परीक्षा एक तंत्रसाध्य बाब आहे. आपल्या परीक्षापद्धतीचं हे उघडं गुपित आहे. अभ्यासाचे तंत्र ज्यांना अवगत झाले, ते गुणांच्या शिड्या भरभर वर चढतात. त्यांनी संपादित केलेल्या गुणांचा चढता आलेख परिवाराला, आप्तस्वकियांना सुखद अनुभूती देणारा आनंद असतो. त्या  ‘गुणवैभवासमोर’ अंगभूत गुणवत्तेचे वैभव झाकोळले जाते. दुर्दैवाने गुणांनाच गुणवत्ता समजण्याचा प्रमाद आपल्याकडून गतानुगतिक चौकटीतूनच जग पाहण्याच्या प्रवृत्तीमुळे घडत असतो. गुणवत्तेपेक्षा गुणसंखेला वाजवीपेक्षा अधिक महत्त्व दिले गेल्याने प्रश्नांचा गुंता अधिक वाढत जातो. अधिक गुणसंपादनाच्या आग्रहामुळे (की दुराग्रह?) परीक्षेतील गुणांपलीकडे असणाऱ्या गुणवत्तेबाबत सखोल विचार, चिंतन, मनन, मंथन आपण करीतच नाहीत.

दहावीचं सगळं वर्ष आपल्या अंतर्यामीच्या आसक्तीतून निर्मित शिखरे संपादन करण्यासाठीच असतं जणू, असा सार्वत्रिक आभास आसपास निर्माण केला जातो. याकरिता स्पर्धेचे घोडामैदान आखले जाते. मैदानात धावणारे स्पर्धेचे घोडे म्हणून परीक्षार्थ्यांना उभे केले जाते. एकेका घोड्यावर बोली लावावी, तशी यांच्यावरही लावली जाते. ते नसेल, तर तसं वातावरण निर्माण केले जाते. स्पर्धेत घोडं धावलं नाही, थोडं मागे पडलं तर त्याच्या नशिबी विजनवास आलाच म्हणून समजा. घोडं धावलं बऱ्यापैकी वेगात आणि आलं पहिल्या रांगेत, तर त्यावर बोली लावणाऱ्यांना कृतकृत्य झाल्याचे समाधान. त्याचं तोंडभरून कौतुक. (कारण तोंडात अख्खा लाडू कोंबल्यावर जागाच उरते कुठे.) त्याने मिळविलेल्या यशात थोडे का असेना, आपलेही योगदान कसे महत्त्वाचे आहे, हे दाखवण्यासाठी साऱ्यांचीच धडपड सुरु. यशाच्या पाठीमागे सगळेच उभे. अपयश मात्र पोरके एकटेच. हिरमुसले होऊन दूर कुठल्यातरी कोपऱ्यात कुढत उभे. ही आमच्या जगण्याची रीत.

गावाकडच्या एका मित्राचा काहीतरी कामानिमित्त फोन आला. त्याच्या चिरंजीवाने यावर्षी दहावीची परीक्षा दिलेली. निकाल घोषित झाल्याने बोलण्याच्या ओघात मुलाच्या निकालाची सहज चौकशी केली. त्याच्या आवाजात नेहमीचा सहजपणा आज जाणवत नव्हता. मनात काहीतरी खंत असल्याचे जाणवत होते. कारण काय म्हणून विचारले, तर अगदी रागारागात तणतणतच बोलला, “अरे मास्तर, आमच्या दिवट्या चिरंजीवाने परीक्षेत लावले दिवे एकदाचे काय लावायचे ते! अरे, कार्ट्याने आणखी चारपाच टक्के गुण अधिक मिळवले असते थोडे जास्त प्रयत्न, परिश्रम करून तर याच्या काय बापाचं नुकसान झालं असतं?”

त्याच्या त्रासिक बोलण्याचा मतितार्थ आता कुठे माझ्या लक्षात आला. नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यांला अपेक्षित असलेले यश मुलाने मिळवले नसल्याने त्याचा राग हताश शब्दांतून जाणवत होता. वाटले मुलाला खूपच कमी गुण असल्यामुळे रागावला असेल. विचारु या, नेमके काय आहे म्हणून. म्हणालो, “अरे, थोडं धीरानं घे! असं रागावतो काय पोरावर! असतील कमी गुण त्याला मिळाले, म्हणून काय सगळंच संपलं? साऱ्या वाटा आजच एकदम बंद झाल्या का? काहीतरी मार्ग निघेलच की यातून. मला आधी सांग, किती गुण मिळवलेत चिरंजीवाने?” त्याच्या मनातील नाराजी जराही कमी व्हायचं नाव घेत नव्हती. नकारात्मक सुरात बोलला, “शहाऐंशी!” त्याचं बोलणं थोडं थांबलं. कदाचित रागाचा आवंढा गिळत असेल. नंतर पुढे बोलता झाला. आताही रागातच; पण संताप थोडासा कमी झालेला. म्हणाला, “हे काय गुण झालेत? अरे, याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेशासाठी किती स्वप्ने पाहिली होती आम्ही. त्या नामांकित क्लासला पाठवायचे होते. तेथे एवढ्या टक्क्यांना कोण हिंग लाऊनही विचारणार नाही. जेथे नव्वदीची रेषा पार केल्याशिवाय हल्ली प्रवेश होतच नाहीत, तेथे हे थकलेलं घोडं काय धावणार?”

आतामात्र या महोदयाची कमालच झाली! पोरानं शहाऐंशी टक्के गुण मिळवूनही हा समाधानी नाही. मग याला काय शंभर टक्केच गुण हवे होते का? आणि ते तरी कशासाठी? याचं कारण त्याने आपल्या मनाने परस्पर ठरवून टाकलेलं. चांगलं महाविद्यालय, चांगला क्लास. (या शब्दांची नेमकी चांगली व्याख्या काय असावी?) चांगलं-वाईट ठरवलं कोणी, कसे आणि केव्हा? आहेत का या प्रश्नांची उत्तरे आपल्याजवळ? माहीत नाही. पण ‘चांगलं’ या आपल्यापुरत्या सीमित, स्वानुभवनिर्मित निकषांनी प्रश्नांचा गुंता अधिक वाढवला आहे. मुलांकडून अशी अपेक्षा करणाऱ्या पालकांची संख्या आसपास काही कमी नाही. अर्थात सगळेच असे असतील, असेही म्हणण्याचे काहीच कारण नाही. दुसऱ्याबाजूने विचार करणारेही असतात. तरीही आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर का? कदाचित, मला हे करता आले नाही. तू करून दाखव. थोडक्यात, माझ्या इगोसाठी तू हे करायलाच हवं असंच यांना वाटतं. आपल्या शेजारचा गोट्या, गोल्या, पिंकी, बबलीला चांगले गुण मिळतात, तुला का नको? ते तू मिळवायचेच आहेत! तू फक्त सांग अभ्यासासाठी कोणती गोष्ट तुला हवी आहे, आत्ताच आणून देतो. पण निकालमात्र आमच्या मनाजोगताच यायला हवा. म्हणजे येथेही काहीतरी देण्याच्या मोबदल्यात अपेक्षांचा सौदा.

मग इगोपूर्तीसाठी सुरु होतो पुढचा सिलसिला. मुलांसोबत आईबाबांचाही अभ्यास, रात्रीची जागरणे. मुलाची परीक्षा आहे म्हणून कार्यालयातून काही दिवसांची सुटी. मुलांपेक्षा पालकांनाच परीक्षेचे अधिक टेन्शन. परीक्षेच्या आधी काही दिवस घरात कलम १४४ लागलेले. सर्वत्र संचारबंदी. स्टडीरूम नावाच्या सजवलेल्या खुराड्यात हा नजरकैद झालेला. बाहेर आईबाबा नावाचे सतत जागते पाहारे. टीव्ही नावाची इडियट बॉक्स (?) दहावी, बारावीचं शैक्षणिक वर्ष सुरु होताच घरातून काही काळासाठी हद्दपार. घरात निरव शांतता. वाराही आत यायला लाजवा, असं सगळं वातावरण. टेबलावर पुस्तकांच्या राशी उभ्या. त्या ढिगाआड दिसणारा थकलेला, कोमेजलेला, आंबलेला चेहरा. त्यावर चिंतेचं सावट. चेहऱ्यावरील रेषानरेषा सांगतायेत काय होईल, माझ्या परीक्षेच्या निकालाचं? सारीसारी घुसमट सुरु.

मानगुटीवर बसलेलं परीक्षेचं भूत केव्हा एकदाचं उतरतं, असं मुलांना झालेलं. डोळेही निस्तेज झालेले. ताणतणावाचा पारा वरवर सरकत जातोय. अगदी परीक्षेच्या दिवशी परीक्षाकेंद्रापर्यंत जाऊन पोहचतो. केंद्रावर परीक्षार्थ्यांपेक्षा आप्तांचीच गर्दी अधिक. परीक्षाकेंद्रावरून वारंवार सूचना दिल्या जातात. परीक्षार्थ्यांनाच आत प्रवेश आहे. आपण पालकांनी बाहेर जावे. पण यांचे पाय तेथेच घुटमळत असतात. बाहेर पडावेसेच वाटत नाही. आपल्या पाल्यावर जरा विश्वास ठेवा, त्याला काय करायचे आहे, ते चांगले ठाऊक आहे. पण यांचा विश्वासच नाही. आधीच मुलांना ताण का कमी दिलेला असतो. त्यात आणखी ही भर कशासाठी? कळतं पण वळत नाही. काय म्हणावे अशा वागण्याला. या साऱ्या ताणातून जे धीराचे ते सावरतात. थोडे अधिक हळवे, अधिक भावनाशील मनातून खचत जातात. त्यातील काही कोसळतात, कोलमडतात. यालाच आपण जीवन ऐसे म्हणावे का?

पाल्याकडून अपेक्षा बाळगण्यात गैरवाजवी काहीही नाही. वाईट असेल, तर अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादणं. अवाजवी अपेक्षा करणाऱ्यांनी आपला विद्यार्थीदशेतला काळ आठवून बघावा. आपली गुणपत्रके पाहावीत. आपल्याला किती गुण होते ते तपासा, मग आपल्या अपत्याकडून आकांक्षा बाळगा, असं कुणी यांना म्हटलं तर यांचं उत्तर ठरलेलं अहो, तो काळच वेगळा. तेव्हा एवढी स्पर्धातरी होती का? असेलही तसे, म्हणून काय चैतन्यशील मनालाच आपल्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी पणाला लावणार आहात का? त्याला काय हवं, नको ते तर जाणून घ्या. कदाचित शाळेच्या अभ्यासापेक्षा त्याला चित्रं काढणं अधिक प्रिय वाटत असेल. गावावेसे वाटेल. निसर्गाच्या सानिध्यात फिरावेसे वाटत असेल, निसर्गाचे फोटो काढावेसे वाटतील. मनाप्रमाणे आणखी काही करावसं वाटत असेल. त्याच्या मनाचा जरा विचार केला, तर त्यानी असा काय फरक पडतो? आपल्या वकुबानुसार जगायला, वागायला प्रत्येकजण समर्थ असतो. नसेल अभ्यासात अपेक्षित गती म्हणून काय झाले. प्रगतीची अन्य ठिकाणे आहेतच ना जगात. केवळ आपण म्हणतो म्हणून त्याने तेच आणि तेच करायला हवं का?

जगातील साऱ्याच यशस्वी माणसांनी परीक्षेच्या गुणवत्तायादीत स्थान मिळवले होते का? छत्रपती शिवाजी महाराजांचं अलौकिक यश परीक्षेतील कोणत्या गुणांनी मोजता येईल? ते काही राज्यशास्त्राचे पदवीधर नव्हते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांनी तत्वज्ञान विषयात पी.एच.डी. केली नव्हती. कर्मयोगी गाडगे महाराज समाजशास्त्र विषयाचे सुवर्णपदक विजेते नव्हते. लौकिक अर्थाने तंत्र असलेल्या कोणत्याही मंत्रात न अडकलेली, ही आभाळाएवढी उत्तुंग व्यक्तित्वे. त्यांनी कर्तृत्वाचे हिमालय उभे केले. मान्य आहे, साऱ्यांनाच काही छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम होता नाही येत. यांचे मोठेपण स्वयंभू होते. असं स्वयंभू अस्तित्व घडवण्यासाठी आपण आपल्या अपत्यांना किती प्रेरित करतो? गुणांचा आणि अंगभूत गुणवत्तेचा संबंध असतोच असा किती? समाजात अशी कितीतरी माणसे असतील जी परीक्षेतील गुणांच्या उंचीत कमी पडली. पण अंगभूत गुणवत्तेमुळे यशाची शिखरे, कर्तृत्वाचे डोंगर उभे केले. त्यांच्या यशाची उंची परीक्षेतील गुणसंपादनाच्या मिळवलेल्या कोणत्याही यशतंत्राने मोजता नाही आली. कधी-कधी आकाशही जागोजागी रिते असते; पण कोते कधीच नसते. असं अफाट, अमर्याद, अथांग मन आमच्याकडे का नसावं? संकुचित विचारांचा अव्हेर केल्याशिवाय व्यापकपण कळत नाही. व्यापकतेला वैयक्तिक अभिनिवेशात बंदिस्त करून हे घडणं शक्य नाही. 

परीक्षेतील गुणवत्ता संपादन करणाऱ्यांचे कौतुक होईल. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यासह वर्तमानपत्राची पानेही हसतील. गुणवंतांचे कौतुक जरूर व्हावं, याबाबत संदेहच नाही. वर्तमानपत्राच्या पुढच्या कुठल्यातरी पानावर परीक्षेतील अपयशाने खचलेल्या जिवाने देहाची सांगता केल्याची मन विदीर्ण करणारी वार्ताही असते. गुणवत्तेच्या झगमगाटात तिचं अस्तित्व कदाचित त्यावेळी जाणवणार नाही. जाणवलं तर हळहळ व्यक्त करणारे चार शब्द तेवढे ऐकायला येतील. काही संवेदनशील माणसे, शिक्षणतज्ज्ञ याबाबत चिंतन, मनन, मंथन करतील. चर्चा घडतील. उपाय सुचवले जातील. दिवस मावळेल. नवा दिवस उगवेल. साऱ्यासाऱ्या गोष्टी रात्रीच्या गर्भात साठवल्या जातील. रोजचं तेच ते धावपळीचे चक्र पुन्हा सुरु होईल. माणसं काळाच्या गतीसोबत धावतील. काहींना धावताना धाप लागेल. काही थकतील. काही थांबतील. काही कोसळतील, काही कोसळून परत उभे राहतील. चालावं, धावावं सगळ्यांना लागतंच. ते टाळता येत नाही आणि येणारही नाही. ‘कालाय तस्मै नमः’ म्हणतात हे खरंय.

Sukh | सुख

By // No comments:
काही वस्तू खरेदी करण्याच्या निमित्ताने बाजारात फिरत होतो. माझी खरेदी चाललेली. “अहो, सर!” म्हणून पाठीमागून आवाज कानी आला. आवाज ओळखीचा वाटला म्हणून मागे वळून पाहिले. माझे एक स्नेही तेथूनच हाताने थांबा म्हणून खुणावत माझ्या दिशेने येत होते. जवळ येऊन थांबत तक्रारीच्या सुरात बोलले, “अहो सर, आहात कुठे इतके दिवस? ना भेट ना दर्शन! सध्या आपले दर्शनही दुर्लभ होत चालले आहे.” मला बोलण्याची थोडीही संधी न देता पुढे बोलू लागले. म्हणाले, “हा बरोबर आहे, तुम्ही गुरुजी ना! तुम्हा गुरुजी लोकांचं एक चांगलं असतं बघा, महिना-दीडमहिना मस्तपैकी सुट्या एन्जॉय करता येतात तुम्हाला. आणि आमचं मात्र ठरलेलं बाराही महिने कार्यालयाच्या इमारती आणि त्यांच्या त्याच निर्जीव भिंती. तोच आमचा स्वर्ग. तेथेच आमचा आनंद. तेच आमचं सुख. मला तर तुम्हा गुरुजी लोकांचा हेवा वाटतो. तुमच्याकडे पाहून वाटतं, आपला मार्गाच चुकला. झालो असतो गुरुजी मस्तपैकी! (जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, हे विसरले असतील बहुदा!) कुठून रस्ता बदलला कुणास ठाऊक?”

त्यांचं बोलणं ऐकून घेतलं. सुट्या कमी आहेत की, अधिक याचं विश्लेषण करण्याच्या फंदात न पडता मुद्दामच म्हणालो, “असतं एकेकाचं नशीब, नाही का? आता राहिला प्रश्न तुम्ही सुख कशाला म्हणतात अथवा मानतात याचा, हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न असतो, नाही का?” माझं मास्तरकीचं तत्वज्ञान ऐकून त्यांच्यातलाही तत्वज्ञ जागा झाला असावा बहुतेक. म्हणाले, “अहो, तुम्हीच तर नेहमी सांगतात ना! नशीब वगैरे असं काहीही नसतं. तुमचे प्रयत्न फसले, अपयश पदरी पडलं तर दोष द्यायला कुणीतरी असावं, म्हणून नशीब नावाचा प्रकार उभा केला माणसानं. आज तुम्हीच नशिबाच्या गोष्टी करतायेत.” त्यांना थांबवत म्हणालो, “अहो साहेब, अजूनही मी माझ्या मतांवर ठाम आहे. असं म्हणायचं असतं म्हणून म्हणालो.”

ते राहू द्या, कसं काय चाललय? चेहऱ्यावरून तर मजेत दिसतायेत. म्हणजे आपल्या अंगणी सुखाचं चांदणं भरभरून वर्षाव करतंय सध्या, असं दिसतंय.” त्यांना आणखी पुढे बोलण्याची संधी न देता म्हणालो, “साहेब, आज जरा घाईत आहे हो! नंतर पुन्हा सावकाश कधीतरी बोलू या का आपण!” मी त्यांच्या तावडीतून सटकण्याचा प्रयत्न करतोय, हे माझ्या चेहऱ्यावर अजिबात दिसू न देता स्नेहार्द विनयाने पुन्हा भेटू म्हणून निरोप घेतला. राहिलेली कामे मार्गी लावून घरी आलो. हातपाय धुऊन कूलर सुरु केला. वर्तमानपत्र हाती घेतलं वाचता-वाचता डुलकी लागली. दिली मस्तपैकी ताणून. तास-दीडतास वेळ झाला असेल झोपायला. सौभाग्यवतीचा आवाज कानी आला. “अहो, जागे व्हा! उठा, सायंकाळचे पाच वाजले! ही काय झोपायची वेळ आहे?”

उठलो, चेहऱ्यावरून पाण्याचे फवारे घेतले. परत येऊन वारा घेत कूलर शेजारीच खुर्चीवर बसलो. शेजारी टेबलवर ठेवलेले पुस्तक हाती घेऊन पाने चाळू लागलो. स्वयंपाकघरातून सौभाग्यवती वाफाळलेल्या चहाचा कप घेऊन आल्या. तो हाती देत म्हणाल्या, “झाली का झोप? बरंय तुमचं. सुट्यांचं स्वानंद सुख अनुभवतायेत सध्या. तुम्हा पुरुष मंडळींचं एक बरं असतं नाही का? बायको दिमतीला असल्याने सारं कसं मनाजोगतं, अगदी आरामात चाललेलं असतं. सुटीचा खरा आनंद तो तुमचाच. आम्हा बायकांना सुटी असली काय आणि नसली काय, नुसती नावालाच सुटी. घर आणि घरकाम आमच्या पाचवीलाच पुजलेलं.” सौभाग्यवतीच्या सात्विक प्रेममयी संवादाला (की संतापाला?) आणखी पुढे दोनतीन अंकी नाट्यप्रवेश न बनू देता ‘शब्दवीण संवाद’ साधणं पसंत केलं. आता डोळ्यातली झोप बऱ्यापैकी गेली. पण या मंडळींनी स्वतःपुरती ‘सुख’ नावाची ही जी काही संकल्पना गृहीत धरली होती आणि तिचा संबंध माझ्या सुटीशी जोडला होता अथवा तसा जुळवण्याचा प्रयत्न चालवलेला होता, ती ‘सुख’ नावाची संकल्पना नेमकी काय असते, या विचाराने माझ्या डोक्यात घर केले.

‘सुख’- खरंतर फक्त दोनच अक्षरांचा शब्द. पण त्यात किती मोठ्ठं समाधान एकवटलेलं आहे, नाही का? सुखाची व्याख्या करणं जरा अवघडच, कारण कोणाला सुखाचा अर्थ कसा अभिप्रेत असेल काय सांगावं? हवी असणारी वस्तू मला मिळाली, म्हणजे ते माझ्यासाठी सुख. आणि नाहीच मिळाली ते दुःख. खरंतर अनेकांकडून जीवन सुख-दुःखाचा खेळ असल्याचे तत्वज्ञान आपण ऐकत आलेलो असतो. कुणी याला उनसावलीचा खेळ असंही म्हणतात. आलटून पालटून ते येत-जात असते. फारकाळ एकच एक स्थिती टिकत नसते. आशावाद आणि सुखानंतर दुःख येणार म्हणून गर्भित भीतीही या शब्दांतून प्रकटत असते. एका सीमित अर्थाने ते खरेही आहे. हा सुखाचा पांढरा आणि हा दुःखाचा काळा अशा दोन रंगात जीवनाची विभागणी नाहीच करता येत. खरंतर या दोन्हीच्या मिश्रणातून जो एक ‘ग्रे’ रंग तयार होतो, तोच जीवनाचा खरा रंग असतो.

‘सुख पाहता जवापाडे दुःख पर्वताएवढे’ असं तुकाराम महाराज सांगून गेले. ते खरंय. नाहीतरी आपण कणभर सुखासाठी मणभर कष्ट उपसतोच ना! संसाररथ आनंदतीर्थी चालत राहावा, म्हणून सुखाची छोटीछोटी बेटे शोधत असतो. ती मिळवण्यासाठी धडपडतो. ही यातायात सुखाच्या प्राप्तीसाठीच असते ना, मग ते क्षणभर का असे ना! तरीही सुख साऱ्यांच्याच वाट्याला येईल याची शाश्वती नसते. म्हणून माणूस प्रयत्न करायचं सोडतो थोडंच. माणसाच्या वाट्यास दुःख येतच असतं, म्हणूनच तर सुखाचं मोल मोठं आहे. शेतकरी रात्रंदिन शेतात राबराब राबतो, मरमर मरतो, कष्ट उपसतो त्या कष्टानी दिलेल्या वेदनांचं दुःख काळ्याशार भूमीतून उगवणाऱ्या इवल्याइवल्या हिरव्या कोंबांना पाहून विसरतो. कोंबांच्या नितळ हिरव्या रंगांना घेऊन सुख त्याच्या हृदयी अवतरते. दिसामासांनी बहरणाऱ्या, वाऱ्याच्या सोबतीने डुलणाऱ्या पिकांच्या तालावर मनातलं सुखही हिंदोळे घ्यायला लागतं. रणरणतं वैशाख ऊन अंगावर घेत रस्त्यावरची खडी फोडणाऱ्या मजुराच्या मनात उद्याच्या सुंदर दिवसाचं स्वप्न साठलेलं असतं. उद्याचा दिवस माझ्यासाठी सुख घेऊन येईल असा आशावाद असतो. म्हणून आजचं पर्वताएवढं दुःख तो पेलतो. नाहीतरी माणूस आशावादी जीव असल्याने उद्याच्या सुखाची सावली शोधत राहतो. आनंदाचं झाड आपल्या अंगणी लाऊन त्याच्या सावलीत विसावतो.

सुख कुणाला कुठे मिळेल, किती मिळेल, हे कसे सांगावे? लहान बाळाच्या बोबड्या बोलांमध्ये आईला ते दिसतं. आपल्या लटपटणाऱ्या पावलांना सावरत चालणं शिकताना पडू नये म्हणून घट्ट धरलेल्या आईच्या हातात बाळाला ते मिळतं. उत्तीर्ण होण्यासाठी रात्रंदिन केलेल्या अभ्यासातून हाती आलेल्या परीक्षेच्या निकालात ते असतं. ध्येयवादाने झपाटलेल्या तरुणाईला आकांक्षांच्या क्षितिजात ते दिसेल. प्रयोगशाळेत अहर्निश प्रयोगात गढलेल्या संशोधकाला परीक्षानळीतल्या द्रव्याच्या मिश्रणात ते गवसेल. समाजाची सेवा करण्याची आंतरिक उर्मी असणाऱ्या समाजसेवकास समाजसेवेत ते सापडेल. वंचितांच्या, उपेक्षितांच्या जीवनातील अंधार दूर करू पाहणाऱ्या, माणुसकी धर्म जागवू पाहणाऱ्याच्या डोळ्यात दिसणाऱ्या आशेच्या किरणात ते असेल. गोठ्यातल्या वासरासाठी हंबरणाऱ्या गाईच्या आवाजात ते असेल. रात्रीच्या शांत प्रहरी गावातील विठ्ठल मंदिरातून ऐकू येणाऱ्या भजनांच्या सुरात ते असेल. देव्हाऱ्यातल्या नंदादीपाच्या प्रकाशात ते आहे. आषाढीला पांडुरंगाच्या भेटीसाठी अनवाणी धावणाऱ्या भक्ताच्या मनात ते दिसेल.

निसर्गाच्या नानाविध  मनमोहक रमणीय आविष्कारात ते साठलेले आहे. कोकिळेच्या सुरात, नाचणाऱ्या मोराच्या पसरलेल्या पिसाऱ्यात, आकाशातून बरसणाऱ्या जलधारात, धावणाऱ्या खट्याळ वाऱ्यात, अवखळपणे वाहणाऱ्या झऱ्यात ते वाहते आहे. उंचावरून उडी घेणाऱ्या धबधब्यासोबत कोसळते आहे. आकाशावर सप्तरंगी कमान रेखणाऱ्या इंद्रधनुष्याच्या रंगांमध्ये न्हावून क्षितिजाला टेकते आहे. पौर्णिमेच्या शीतल चंद्रप्रकाशातून वाहते आहे. अमावास्येच्या रात्री लुकलुकणाऱ्या चांदण्यांतून  ते हसते. डोंगराआडून डोकावत धरतीवर येणाऱ्या सूर्योदयात, मावळतीला जाताना आकाशात केलेल्या रंगांच्या वर्षावात ते रंगते आहे. सुख कुठे नाही. अरत्र, परत्र, सर्वत्र आहे. आम्ही मात्र आहे तेथे ते शोधतो का? कदाचित नाही. म्हणूनच ‘अमृतघट भरले तुझ्या दारी का वणवण फिरशी बाजारी’ असे कवी बा.भ.बोरकर लिहिते झाले असतील का? की कवितेच्या ओळीतूनच सुख त्यांच्या हाती लागलं असेल? माहीत नाही; पण माणूस सुखाच्या शोधात फिरतच असतो. त्याला सुखाचा शोध लागतो का? या प्रश्नाचं उत्तर शेवटी ज्याचं त्याने शोधायचं असतं. मिळालं उत्तर तर त्यातच जीवनाचं खरं सुख सामावलेलं असतं, एवढं मात्र खरं.

Pani | पाणी

By // No comments:
तापमापीतील वरवर सरकत जाणारा पारा आणि रखरखते ऊन म्हणजे उन्हाळ्याचे तापदायक अन् मोठेच्या मोठे दिवस हे निसर्गाचे ठरलेले चक्र. निसर्ग नियमानुसार हे घडणारच. ते काही आपणास बदलता येत नाही. फारतर घरात, कार्यालयात पंख्यांच्या, ए.सी.च्या शीतल गारव्यात सुसह्य करता येईल. अर्थात त्यासाठी पुरेशी वीज उपलब्ध असली तर. मे महिन्यातील वाढते तापमान ४५.°से., ४६°से. चढण चढून उंचीशी स्पर्धा करतेय. कधी एकदाचा हा असह्य उकाडा संपून पावसाच्या धारांनी भिजतो याची माणसं वाट पाहत आहेत. जून महिना, पाऊस यांच्याशी माणसाचं नातं जुनंच आहे. देशाचं कृषीकारण पावसाशी बांधलं गेलं आहे. कृषीकारणाशी जुळलेले अर्थकारण बरसणाऱ्या जलधारांशी निगडित आहे आणि शेतकरी या सगळ्या कारणांशी जुळला आहे. नेहमीप्रमाणे तो आकाशाकडे डोळे लावून बसलाय. त्याच्या शुष्क डोळ्यात स्वप्नांचे काही ढग जमा झाले आहेत. आजचा नाही, पण निदान येणारा दिवस जीवनात गारवा आणेल. त्याचा सांगावा पाण्याने ओथंबलेले ढग घेऊन येतील, ही छोटीशी आशा मनात अंकुरतेय. तिला अपेक्षांनी कोवळी पालवी फुटू पाहतेय.

नेहमीप्रमाणे हवामानाचे, पावसाचे अंदाज वर्तवले जात आहेत. तो किती असेल, हे येणारा काळच ठरवेल. सरासरीइतका असेल की, त्यापेक्षा कमी. याचा अंदाज घेत शेतकरी पेरणीपूर्व कामे संपवण्याच्या घाईत आहे. केव्हा एकदा कामे हातावेगळी होतील याची चिंता लागली आहे. कामाच्या लगीनघाईतून ती जाणवतेय. जगण्याचा संघर्ष त्याच्यासाठी नवा नाही. दरवर्षी निसर्गासोबत तो हा खेळ खेळतो. कधी त्यात जिंकतो. कधी हरतो. जिंकला किंवा हरला, म्हणून नाही सोडता येत खेळ त्याला अर्ध्यावर. नाही सोडता येत परिस्थितीशी दोन हात करीत उभं राहण्याची उमेद. नाही तोडता येत मनातील आशेचे बंध. परिस्थितीचे धागे गुंफत तो जगण्याच्या आकांक्षांचे पट विणतोय. मनातून उमलणाऱ्या स्वप्नांचे त्यात रंग भरतोय. जीवनसंघर्षात एकेक पाऊल टाकीत स्वतःला घट्ट रुजवण्याचा प्रयत्न करतोय. इच्छाशक्तीची मुळे अस्तित्वाचा ओलावा शोधीत अपेक्षांच्या भूमीत शिरतायेत. काही अभागी परिस्थितीच्या आघाताने उन्मळून कोसळतायेत. त्याचं कोसळणं जणू विधिलिखित झालं आहे. भाग्योदयाच्या प्राक्तनरेषा बदलवून टाकणाऱ्या पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा सारेच करतायेत.

जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अनेक व्यवसायातील शेती हा एक परंपरागत मार्ग. अनेकांच्या आयुष्यांना आकार देणारा. तरीही या व्यवसायात राम राहिला नसल्याची खंत अनेकांच्या मनात आहे. अत्यंत बेभरवशाचा व्यवसाय म्हणजे शेती करणं, शेती कसणाऱ्या बहुतेकांचं असेच मत असल्याचे जाणवते. पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असणारी येथील शेती, शेतकरी नियतीच्या चक्राशी बांधले गेले आहेत. पिढ्यानपिढ्या या चक्रासोबत चाललेली फरफट थांबण्याचं नाव काही घेत नाही. ओढग्रस्त जीवनाच्या वेदनादायी यातनातून बाहेर पडण्याचा अन्य पर्याय हाती दिसत नाही. आहे त्यात, आहे तसं जगणं हेच भागधेय समजून नशिबाला दोष देत जगण्याच्या वाटा तो शोधतोय. देशातील वजनदार, सधन शेतकरी वगळले, तर शेतीचा जेमतेम एकर-दोनएकर तुकडा नावावर असणाऱ्या जवळपास साऱ्याच शेतकऱ्यांच्या जीवनाचे हे चित्र आहे. यात खूप काही प्रचंड बदल झाल्याचं कुणा शेती कसणाऱ्या आणि हाती जेमतेम शेती असणाऱ्या शेतकऱ्याच्या मुखातून अद्यापतरी ऐकिवात नाही. जगण्याचं चित्र असं विसकटलेले पाहत तो सुखाचा शोध घेतोय, पण काही हाती लागत नाहीये.

देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रगतीविषयी कुणाच्याही मनात कसलाही संदेह असण्याचं मुळीच कारण नाही. स्वातंत्र्य संपादनानंतरच्या सुरवातीच्या काळात साध्यासाध्या वस्तूंसाठी अन्य देशांकडे मदतीसाठी आशाळभूतपणे पाहणारा देश आज स्वतःची अवकाशयाने तयार करून मंगळापर्यंत पाठवतोय. देशाच्या प्रगतीच्या पाऊलखुणा पाहून इतर देशांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यांच्या विस्मयचकित नजरेत कुतुहलासोबत एक आस्थाही दिसते आहे. देशात हरितक्रांती, धवलक्रांती घडवून आमचं अस्तित्व काय आहे, हे जगाला सिध्द करून दाखविले. कधीकाळी टंचाई, चणचण अनुभवणाऱ्या देशातील धान्याची गोदामं ओसंडून वाहत आहेत. देशाचं सामर्थ्य स्वयंभू आहे. वादातीत आहे. असे असूनही येथे टोकाची विषमता, विसंगतीही नांदते आहे.

कदाचित आपणास वाटेल, काही लोकांना असतेच अशी काहीना काहीतरी न्यून शोधयची, बघायची सवय. समोरचा पांढरा स्वच्छ कापड दिसत नाही. त्यावरचा शाईचा डाग तेवढा दिसतो. तुमच्या नजरांना डागच बघायची सवय जडलीय. शंभरातल्या नव्याण्णव चांगल्या गोष्टी दुर्लक्षून एक छोटासा डागच का बघावा? बरोबर आहे तुमचं म्हणणं, कारण तो नेमका समोरच दिसतोय ना! सगळं कसं स्वच्छ, चांगलं असूनही छोट्याशा डागांकडे लक्ष वेधले जातेच ना! पण डाग दिसतो आहे, तोही न दिसावा म्हणून आपण काहीच करू शकत नाहीत का? सगळंच चांगलं आहे, हे म्हणणे वास्तव आहे का? सगळं चांगलंच असतं तर समस्या उरल्या असत्या का? परिस्थिती परिवर्तनासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांची कमी नाही. व्यवस्थेच्या तळाशी असणाऱ्यांसाठी विधायक कार्य करणाऱ्यांची आपल्याकडे वानवा कधीच नव्हती. विकासपथावरील वाटचालीसाठी केवळ चारदोन हात मदतीसाठी पुढे येऊन चालत नाही. कोण्या एकाचे एक पाऊल प्रगतीकडे उचलले जात असताना सोबत शेकडो पावले उचलली जाणे महत्त्वाचं आहे. यासाठी फार मोठा त्याग करण्याची आवश्यकता नाही. थोडे पण प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रयत्नांना सार्वत्रिककतेचे कोंदण लाभणे आवश्यक आहे.

उन्हाळ्यात नेहमीप्रमाणे साठे कमी झाल्याने गाव, वाड्या-वस्त्यांवर पाण्याचे टँकर पोहोचल्याच्या वार्ता वर्तमानपत्रातून येत राहतात. डोक्यावर हंडे घेऊन लेकीबाळी उन्हातान्हात अनवाणी पायांनी मैलोनमैल वणवण भटकंती करतात. विज्ञानतंत्रज्ञानात प्रगती घडूनही नेहमीच दिसणाऱ्या दृश्यात अजूनही फारसे बदल झालेले का दिसत नाही? देशाचा बराचसा भाग पावसाच्या पाण्याबाबत नशीबवान असूनही पाण्याच्या संवर्धनाकरिता केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबाबत असणारी उदासीनता सोडायला आपण तयार नाहीत. आकाशातून पडणारे पावसाचे पाणी डोळ्यासमोर वाहून जाताना आनंदाने पाहतो. उन्हाळ्यात प्यायला, वापरायला पाणीच नाही, म्हणून पाण्याच्या नावाने खडे फोडतो. कोणीच कसं काही करत नाही, म्हणून बोंबा मारायला मोकळे होतो. हा आपल्या उक्ती आणि कृतीतला विपर्यास नाही का? कमी पाऊसमान असणाऱ्या देशांनी पाण्यासाठी कसे नियोजन केले आहे, त्यांचा पाण्याचा वापर कसा काळजीपूर्वक आहे. याच्या रसभरीत वार्ता करतो. या देशांमधील पाणीवापराचे, अल्पशा पाण्यातूनही शेतीत घेतल्या जाणाऱ्या उत्पन्न प्रयोगांचे भरभरून कौतुक करतो. पण त्यांनी यासाठी कोणते प्रयत्न केले, हे सोयीस्करपणे दुर्लक्षित करतो. असे काहीतरी करून आपल्यालाही बदल करता येवू शकतो. याचा विचार न करता आपण काहीच का करत नाहीत? असे प्रयत्न करण्याकरिता आपल्याला कोणी थांबवलंय? पाणी वापराचे, बचतीचे उपाय इतरांना सांगायचे. पाणीप्रश्न जगासमोरील गंभीर समस्या असल्याबाबत मत प्रदर्शित करायचे आणि स्वतः पाण्याच्या बचतीबाबतीत होईल तितके निष्काळजीपणे वागायचे. अगदी लहान गोष्टीही दुर्लक्षित करायचे. याला संवेदनशीलता कसे म्हणावे? आपल्या अशा वर्तनाला सार्वजनिक प्रश्नांविषयीची आस्था म्हणायचे का?

आपण काही करण्याआधी साऱ्या गोष्टींची जबाबदारी व्यवस्थेवर ढकलून द्यायची. जे काही करायचे ते सरकार करेल, ही मानसिकता घेऊन वागणारा समाज नवे काहीही करू शकत नाही. पाण्याच्या उपलब्धतेसाठी नियोजने केली जातात. प्रकल्प आखले जातात. आराखडे तयार होतात. ते तयार होऊन कॅलेंडरची पानामागून पाने उलटत जातात. वर्षे सरतात. सरणाऱ्या वर्षांनी माणसांच्या पिढ्याही बदलतात. प्रकल्पासाठी केलेली आर्थिक गणिते विस्कटतात; पण प्रकल्प जन्माला येऊनही बाळसे धरत नाहीत. त्यांचं सरपटणं चालूच असते. कारण आपल्याकडे असणारा तत्परता गुणाचा अभाव. बेफिकीरपणे वागणे आमच्या अंगवळणी भिनले आहे. शेतीसाठी सिंचनाची कमाल मर्यादा गाठायला कमी पडत असू, तर दोष नेमका द्यायचा कुणाला? आपणच आपल्याला की, आपण निर्माण केलेल्या व्यवस्थेला? दोष कुणाचाही असो, त्याचे निराकरण करता येते. व्यवस्थाही बदलता येते. यासाठी आवश्यकता असते आपले विचार सकारात्मक आहेत का, हे तपासून पहायची. गरज भासल्यास मुळापासून बदलण्याची. बदललेल्या विचारातून विधायक कामे उभी करायची. भले ती कोणा एकाला शक्य होत नसतील, तर अनेकांनी मिळून एक विचाराने काहीतरी विधायक घडवायची. असे विधायक परिवर्तन घडविण्यासाठीही आपल्या अंगात पाणी असावे लागते, नाही का?