Sukh | सुख

By
काही वस्तू खरेदी करण्याच्या निमित्ताने बाजारात फिरत होतो. माझी खरेदी चाललेली. “अहो, सर!” म्हणून पाठीमागून आवाज कानी आला. आवाज ओळखीचा वाटला म्हणून मागे वळून पाहिले. माझे एक स्नेही तेथूनच हाताने थांबा म्हणून खुणावत माझ्या दिशेने येत होते. जवळ येऊन थांबत तक्रारीच्या सुरात बोलले, “अहो सर, आहात कुठे इतके दिवस? ना भेट ना दर्शन! सध्या आपले दर्शनही दुर्लभ होत चालले आहे.” मला बोलण्याची थोडीही संधी न देता पुढे बोलू लागले. म्हणाले, “हा बरोबर आहे, तुम्ही गुरुजी ना! तुम्हा गुरुजी लोकांचं एक चांगलं असतं बघा, महिना-दीडमहिना मस्तपैकी सुट्या एन्जॉय करता येतात तुम्हाला. आणि आमचं मात्र ठरलेलं बाराही महिने कार्यालयाच्या इमारती आणि त्यांच्या त्याच निर्जीव भिंती. तोच आमचा स्वर्ग. तेथेच आमचा आनंद. तेच आमचं सुख. मला तर तुम्हा गुरुजी लोकांचा हेवा वाटतो. तुमच्याकडे पाहून वाटतं, आपला मार्गाच चुकला. झालो असतो गुरुजी मस्तपैकी! (जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, हे विसरले असतील बहुदा!) कुठून रस्ता बदलला कुणास ठाऊक?”

त्यांचं बोलणं ऐकून घेतलं. सुट्या कमी आहेत की, अधिक याचं विश्लेषण करण्याच्या फंदात न पडता मुद्दामच म्हणालो, “असतं एकेकाचं नशीब, नाही का? आता राहिला प्रश्न तुम्ही सुख कशाला म्हणतात अथवा मानतात याचा, हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न असतो, नाही का?” माझं मास्तरकीचं तत्वज्ञान ऐकून त्यांच्यातलाही तत्वज्ञ जागा झाला असावा बहुतेक. म्हणाले, “अहो, तुम्हीच तर नेहमी सांगतात ना! नशीब वगैरे असं काहीही नसतं. तुमचे प्रयत्न फसले, अपयश पदरी पडलं तर दोष द्यायला कुणीतरी असावं, म्हणून नशीब नावाचा प्रकार उभा केला माणसानं. आज तुम्हीच नशिबाच्या गोष्टी करतायेत.” त्यांना थांबवत म्हणालो, “अहो साहेब, अजूनही मी माझ्या मतांवर ठाम आहे. असं म्हणायचं असतं म्हणून म्हणालो.”

ते राहू द्या, कसं काय चाललय? चेहऱ्यावरून तर मजेत दिसतायेत. म्हणजे आपल्या अंगणी सुखाचं चांदणं भरभरून वर्षाव करतंय सध्या, असं दिसतंय.” त्यांना आणखी पुढे बोलण्याची संधी न देता म्हणालो, “साहेब, आज जरा घाईत आहे हो! नंतर पुन्हा सावकाश कधीतरी बोलू या का आपण!” मी त्यांच्या तावडीतून सटकण्याचा प्रयत्न करतोय, हे माझ्या चेहऱ्यावर अजिबात दिसू न देता स्नेहार्द विनयाने पुन्हा भेटू म्हणून निरोप घेतला. राहिलेली कामे मार्गी लावून घरी आलो. हातपाय धुऊन कूलर सुरु केला. वर्तमानपत्र हाती घेतलं वाचता-वाचता डुलकी लागली. दिली मस्तपैकी ताणून. तास-दीडतास वेळ झाला असेल झोपायला. सौभाग्यवतीचा आवाज कानी आला. “अहो, जागे व्हा! उठा, सायंकाळचे पाच वाजले! ही काय झोपायची वेळ आहे?”

उठलो, चेहऱ्यावरून पाण्याचे फवारे घेतले. परत येऊन वारा घेत कूलर शेजारीच खुर्चीवर बसलो. शेजारी टेबलवर ठेवलेले पुस्तक हाती घेऊन पाने चाळू लागलो. स्वयंपाकघरातून सौभाग्यवती वाफाळलेल्या चहाचा कप घेऊन आल्या. तो हाती देत म्हणाल्या, “झाली का झोप? बरंय तुमचं. सुट्यांचं स्वानंद सुख अनुभवतायेत सध्या. तुम्हा पुरुष मंडळींचं एक बरं असतं नाही का? बायको दिमतीला असल्याने सारं कसं मनाजोगतं, अगदी आरामात चाललेलं असतं. सुटीचा खरा आनंद तो तुमचाच. आम्हा बायकांना सुटी असली काय आणि नसली काय, नुसती नावालाच सुटी. घर आणि घरकाम आमच्या पाचवीलाच पुजलेलं.” सौभाग्यवतीच्या सात्विक प्रेममयी संवादाला (की संतापाला?) आणखी पुढे दोनतीन अंकी नाट्यप्रवेश न बनू देता ‘शब्दवीण संवाद’ साधणं पसंत केलं. आता डोळ्यातली झोप बऱ्यापैकी गेली. पण या मंडळींनी स्वतःपुरती ‘सुख’ नावाची ही जी काही संकल्पना गृहीत धरली होती आणि तिचा संबंध माझ्या सुटीशी जोडला होता अथवा तसा जुळवण्याचा प्रयत्न चालवलेला होता, ती ‘सुख’ नावाची संकल्पना नेमकी काय असते, या विचाराने माझ्या डोक्यात घर केले.

‘सुख’- खरंतर फक्त दोनच अक्षरांचा शब्द. पण त्यात किती मोठ्ठं समाधान एकवटलेलं आहे, नाही का? सुखाची व्याख्या करणं जरा अवघडच, कारण कोणाला सुखाचा अर्थ कसा अभिप्रेत असेल काय सांगावं? हवी असणारी वस्तू मला मिळाली, म्हणजे ते माझ्यासाठी सुख. आणि नाहीच मिळाली ते दुःख. खरंतर अनेकांकडून जीवन सुख-दुःखाचा खेळ असल्याचे तत्वज्ञान आपण ऐकत आलेलो असतो. कुणी याला उनसावलीचा खेळ असंही म्हणतात. आलटून पालटून ते येत-जात असते. फारकाळ एकच एक स्थिती टिकत नसते. आशावाद आणि सुखानंतर दुःख येणार म्हणून गर्भित भीतीही या शब्दांतून प्रकटत असते. एका सीमित अर्थाने ते खरेही आहे. हा सुखाचा पांढरा आणि हा दुःखाचा काळा अशा दोन रंगात जीवनाची विभागणी नाहीच करता येत. खरंतर या दोन्हीच्या मिश्रणातून जो एक ‘ग्रे’ रंग तयार होतो, तोच जीवनाचा खरा रंग असतो.

‘सुख पाहता जवापाडे दुःख पर्वताएवढे’ असं तुकाराम महाराज सांगून गेले. ते खरंय. नाहीतरी आपण कणभर सुखासाठी मणभर कष्ट उपसतोच ना! संसाररथ आनंदतीर्थी चालत राहावा, म्हणून सुखाची छोटीछोटी बेटे शोधत असतो. ती मिळवण्यासाठी धडपडतो. ही यातायात सुखाच्या प्राप्तीसाठीच असते ना, मग ते क्षणभर का असे ना! तरीही सुख साऱ्यांच्याच वाट्याला येईल याची शाश्वती नसते. म्हणून माणूस प्रयत्न करायचं सोडतो थोडंच. माणसाच्या वाट्यास दुःख येतच असतं, म्हणूनच तर सुखाचं मोल मोठं आहे. शेतकरी रात्रंदिन शेतात राबराब राबतो, मरमर मरतो, कष्ट उपसतो त्या कष्टानी दिलेल्या वेदनांचं दुःख काळ्याशार भूमीतून उगवणाऱ्या इवल्याइवल्या हिरव्या कोंबांना पाहून विसरतो. कोंबांच्या नितळ हिरव्या रंगांना घेऊन सुख त्याच्या हृदयी अवतरते. दिसामासांनी बहरणाऱ्या, वाऱ्याच्या सोबतीने डुलणाऱ्या पिकांच्या तालावर मनातलं सुखही हिंदोळे घ्यायला लागतं. रणरणतं वैशाख ऊन अंगावर घेत रस्त्यावरची खडी फोडणाऱ्या मजुराच्या मनात उद्याच्या सुंदर दिवसाचं स्वप्न साठलेलं असतं. उद्याचा दिवस माझ्यासाठी सुख घेऊन येईल असा आशावाद असतो. म्हणून आजचं पर्वताएवढं दुःख तो पेलतो. नाहीतरी माणूस आशावादी जीव असल्याने उद्याच्या सुखाची सावली शोधत राहतो. आनंदाचं झाड आपल्या अंगणी लाऊन त्याच्या सावलीत विसावतो.

सुख कुणाला कुठे मिळेल, किती मिळेल, हे कसे सांगावे? लहान बाळाच्या बोबड्या बोलांमध्ये आईला ते दिसतं. आपल्या लटपटणाऱ्या पावलांना सावरत चालणं शिकताना पडू नये म्हणून घट्ट धरलेल्या आईच्या हातात बाळाला ते मिळतं. उत्तीर्ण होण्यासाठी रात्रंदिन केलेल्या अभ्यासातून हाती आलेल्या परीक्षेच्या निकालात ते असतं. ध्येयवादाने झपाटलेल्या तरुणाईला आकांक्षांच्या क्षितिजात ते दिसेल. प्रयोगशाळेत अहर्निश प्रयोगात गढलेल्या संशोधकाला परीक्षानळीतल्या द्रव्याच्या मिश्रणात ते गवसेल. समाजाची सेवा करण्याची आंतरिक उर्मी असणाऱ्या समाजसेवकास समाजसेवेत ते सापडेल. वंचितांच्या, उपेक्षितांच्या जीवनातील अंधार दूर करू पाहणाऱ्या, माणुसकी धर्म जागवू पाहणाऱ्याच्या डोळ्यात दिसणाऱ्या आशेच्या किरणात ते असेल. गोठ्यातल्या वासरासाठी हंबरणाऱ्या गाईच्या आवाजात ते असेल. रात्रीच्या शांत प्रहरी गावातील विठ्ठल मंदिरातून ऐकू येणाऱ्या भजनांच्या सुरात ते असेल. देव्हाऱ्यातल्या नंदादीपाच्या प्रकाशात ते आहे. आषाढीला पांडुरंगाच्या भेटीसाठी अनवाणी धावणाऱ्या भक्ताच्या मनात ते दिसेल.

निसर्गाच्या नानाविध  मनमोहक रमणीय आविष्कारात ते साठलेले आहे. कोकिळेच्या सुरात, नाचणाऱ्या मोराच्या पसरलेल्या पिसाऱ्यात, आकाशातून बरसणाऱ्या जलधारात, धावणाऱ्या खट्याळ वाऱ्यात, अवखळपणे वाहणाऱ्या झऱ्यात ते वाहते आहे. उंचावरून उडी घेणाऱ्या धबधब्यासोबत कोसळते आहे. आकाशावर सप्तरंगी कमान रेखणाऱ्या इंद्रधनुष्याच्या रंगांमध्ये न्हावून क्षितिजाला टेकते आहे. पौर्णिमेच्या शीतल चंद्रप्रकाशातून वाहते आहे. अमावास्येच्या रात्री लुकलुकणाऱ्या चांदण्यांतून  ते हसते. डोंगराआडून डोकावत धरतीवर येणाऱ्या सूर्योदयात, मावळतीला जाताना आकाशात केलेल्या रंगांच्या वर्षावात ते रंगते आहे. सुख कुठे नाही. अरत्र, परत्र, सर्वत्र आहे. आम्ही मात्र आहे तेथे ते शोधतो का? कदाचित नाही. म्हणूनच ‘अमृतघट भरले तुझ्या दारी का वणवण फिरशी बाजारी’ असे कवी बा.भ.बोरकर लिहिते झाले असतील का? की कवितेच्या ओळीतूनच सुख त्यांच्या हाती लागलं असेल? माहीत नाही; पण माणूस सुखाच्या शोधात फिरतच असतो. त्याला सुखाचा शोध लागतो का? या प्रश्नाचं उत्तर शेवटी ज्याचं त्याने शोधायचं असतं. मिळालं उत्तर तर त्यातच जीवनाचं खरं सुख सामावलेलं असतं, एवढं मात्र खरं.

0 comments:

Post a Comment