गती, प्रगती अन् अधोगती हे प्रास साधणारे शब्द. कुठल्याशा वाक्यात टाकले की, देखणे वगैरे वाटतात. पण हेच शब्द आयुष्यात आले की, त्यांचे अर्थ बदलतात. ते समजून घेण्यासाठी अन्वयार्थ लावावे लागतात. परत परत पाहावे लागतात. पारखावे लागतात. आयुष्याच्या व्याख्या ज्याने त्याने आपापल्यापरीने करून ठेवलेल्या असल्या, तरी त्या पर्याप्त असतीलच असं नाही. प्रत्येकाचे पैलू वेगळे असतात. कोण कोणत्या कोनातून त्या कोपऱ्यांकडे बघतो, यावर ते ठरत असतं. नजरेस पडणारे त्याचे कंगोरे निराळे असतात. जगणं समजून घेण्याच्या सगळ्याच व्याख्या काही सारख्या नसतात. म्हणून त्यांचे अर्थ तपासून पाहू नये असंही नसतं काही. ज्याला आयुष्याकडे डोळसपणे पाहता येतं, त्याला जगण्याची प्रयोजने शोधावी नाही लागत. नजरेचा कोन थोडा अलीकडे पलीकडे करून पाहिलं तरी प्रमुदित जगण्याची अनेक प्रयोजने अन् आनंदाची अनेक अभिधाने आपल्या आसपास गवसतील. पण त्यासाठी काय पाहावं, हे कळायला हवं.
गतीप्रगतीच्या परिभाषा गुणवत्तेच्या परिमाणांनी पाहता यायला हव्यात. अर्थात, आपल्याला अवगत असणाऱ्या कौशल्यांचं सार्थ आकलन असल्याशिवाय आपली पात्रता आकळत नाही. आपण कोण, हे कळायलाही पात्रता असायला लागते. पात्रता पर्याप्त पर्यायांमध्ये पहावी लागते. पर्यायांचं सम्यक आकलन होण्यास आपला आसपास आधी आकळणं आवश्यक असतं. त्याचे अर्थ अवगत करून घ्यावे लागतात. तो समजून घेण्यासाठी नजरेला क्षितिजाचा वेध घेता यावा. डोळ्यात सामावणारे क्षितिज अन् मनात कोरलेले क्षितिज सारखे असले की, विस्ताराच्या परिभाषा कळतात. त्यांची प्रयोजने समजली की, परिमाणे परिणत होत जातात अन् परिघांच्या सीमा विस्तीर्ण शब्दाशी सलगी करू लागतात.
आसपासचं नांदतेपण समजून घेण्यासाठी अंतरीचा ओलावा अनवरत वाहता असावा लागतो. तो साकळता यावा म्हणून ओंजळी रित्या असाव्या लागतात. पण विचारातच करंटेपण कोरलं असेल, तर ओंजळी कशा भराव्या? आव आणून साव नाही होता येत. आपणच आपल्याला ओळखण्याचा सराव असायला लागतो. ‘मी’ कळला त्याला ‘आपण’ शब्दाच्या परिभाषा पाठ नाही करायला लागत. लोकांना सावरण्याइतका संयम अन् सोज्वळ विचार अंतरी नांदता असल्याशिवाय व्यवस्थेने कोरलेल्या चौकटी सुंदर नाही करता येत. सौंदर्याला परिभाषा असतीलही, पण भविष्यातील परिणामांचा विचार करून त्याला परिमाणे द्यावी लागतात.
अनेक चौकटी असतात आसपास. काही दृश्य काही अदृश्य एवढाच काय तो फरक असतो त्यात. त्या सगळ्याच काही आपण तयार केलेल्या नसतात पण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पणे त्यावर मान्यतेची मोहर अंकित केलेली असते. चौकटी जगणं देखणं करणाऱ्या असतील तर बंधने नाही होत. पण कुंपणांचा काच होऊ लागला की, विस्ताराचे परीघ आक्रसत जातात. कुंपणे पार करणं परीक्षा असते. परीक्षेत सगळेच उत्तीर्ण होतात असं नाही. आपला आपण शोध घेण्यासाठी आयुष्याचे एकेक अध्याय अभ्यासावे लागतात, तपासून पाहावे लागतात. कालबाह्य अक्षरे काढून कालसंगत विचार कोरावे लागतात. आयुष्याला सीमांकित करणारी समीकरणे काढून नवी गणिते आणावी लागतात. सोडवावी लागतात. त्यासाठी सूत्रे शोधावी लागतात.
आपण कोण? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अख्खी हयात वेचण्याची अन् सगळं आयुष्य वाचण्याची तयारी असायला लागते. असं असलं म्हणून त्याची सगळी उत्तरे हाती लागतीलच असंही नाही. नाहीच सापडली काही उत्तरे म्हणून विकल होऊन पलायनाचा पथ नाही धरता येत. असतील अन्य पर्याय आसपास कुठे तर तेही पडताळून पाहावे लागतात. प्रयासाने पदरी पडलेल्या समाधानाला पर्याय नसतो. प्रामाणिकपणाचं पाथेय पदरी पडलेलं असेल, तर बेईमानीच्या बेगडी सुखांची चमक फिकी पडते.
पणती पावलापुरता प्रकाश पेरते हे खरेच. ती अवघ्या अंधाराचा वेध नाही घेऊ शकत, हेही वास्तवच. पण सत्य तर हेही आहे की, आस्थेचा कोरभर उजेड अंतरी नांदता असला की, पणतीने पेरलेला ओंजळभर प्रकाश पावलांना आश्वस्त करतो. परिस्थितीचं सम्यक आकलन नेणिवेच्या अंधाऱ्या कोपऱ्यात आशेचे कवडसे कोरते. अंधाराच्या पटलावर काजव्याचं चमचमणं देखणं वगैरे दिसत असलं, तरी त्याला सगळा आसमंत नाही उजळून टाकता येत. ती त्याची मर्यादा आहे. एवढं कळणंही आपला वकूब ओळखण्यासाठी पर्याप्त असतं.
विस्तवाने पेरलेल्या प्रकाशाची प्रखरता पाहून कळत असली, तरी त्याची धग उमजण्यासाठी निखारे अनुभवायला लागतात. अवतीभवती नांदणारे परिस्थितीचे वणवे संवेदनशील मनांना नाही विसरता येत. व्यवधानांकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष करणं जगण्यात सामावलेली विसंगती असते. परिस्थितीने पेटवले वणवे वळवण्याचा वकूब असला की, विसंगतीतूनही संगतीची सुसंगत सूत्रे शोधता येतात. नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••