सत्य

By // No comments:
सत्य या शब्दाशी आपण सगळेच अवगत आहोत. प्रत्येकाची कारणं वेगळी असतील इतकंच. आपल्या राजमुद्रेवर 'सत्यमेव जयते' लिहिलेलं आपण नित्य पाहतो, वाचतो. पण नेमकं हेच वाक्य का निवडलं असेल? कदाचित सत्यान्वेशी विचारच जगण्याचे सम्यक सूत्र असल्याचे निवडकर्त्यांना अभिप्रेत असेल का? मग, ज्यांच्या राजमुद्रेवरच सत्याचा साक्षात्कार प्रतित होतो, तेथे असत्याला आश्रय कसा असू शकतो? असा प्रश्न कुणाच्या मनात कधी आला असेल का? माहीत नाही. पण माणसांच्या जगण्याचे प्रवाह नीतिसंमत मार्गाने वाहते राहावेत, अशी अपेक्षा सर्वकाळी अन् सर्वस्थळी राहिली आहे हेही तेवढंच खरं. पण खरं हेही आहे की, माणसे सुविचारांनी सुधारतीलच असे नाही. शपथ घेताना सत्याची कास सोडणार नाही, म्हणून माणूस माणसाला आश्वस्त करतो. पण सार्वजनिक समाधान, सौख्य स्थापित करण्यासाठी एखादी निर्णायक भूमिका घ्यायची वेळ आली की, पलायनाचे पथ का शोधत राहतो?

सत्याचा महिमा विशद करण्यासाठी आपण राजा हरिश्चंद्रला पिढ्यानपिढ्या वेठीस धरत आलो आहोत. निद्रेत राज्य स्वामींच्या पदरी टाकणारा सत्यप्रिय राजा म्हणून आम्हाला किती कौतुक या कृतीचं. या कथेमागे असणारं वास्तव काय किंवा कल्पित काय असेल ते असो. सगळंच नाही, पण निदान जागेपणी यातलं थोडं तरी आपण करायला का कचरतो? करता येणं थोडं अवघड असलं तरी असंभव नक्कीच नाही. सर्वसंग परित्याग करून विजनवासाच्या वाटा जवळ कराव्यात असं नाही म्हणायचं. मोहापासून थोडं वेगळं होता आलं तरी पुरेसं. कुणी मूल्यांचा महिमा विशद करून सांगितला म्हणून काही सगळेच नीतिसंकेत काळजावर कायमचे कोरले जात नसतात. काही सुटतात काही निसटतात. माणसाकडून सगळंच काही निर्धारित निकषांत सामावेल तेच अन् तेवढंच घडेल अशी अपेक्षा करणंच मुळात अप्रस्तुत आहे. अर्थात, अशा निकषांच्या मोजपट्ट्या लावून आयुष्याचे सम्यक अर्थ आकळत नसतात.

तसंही साऱ्यांनाच एका मापात कसं मोजता येईल? व्यवस्थेच्या वर्तुळात सगळेच काही सारख्या विचारांनी वर्तत नसतात. तशी अपेक्षा करणेही रास्त नाही. कुठल्याही काळी, स्थळी ठाम भूमिका घेऊन वर्तनाऱ्यांची संख्या तशीही फार वाखाणण्याजोगी नसते. खरंतर वानवाच असते त्यांची. अर्थात, हे विधानही तसे ढोबळ अनुमानांचं अपत्य म्हणूयात. सत्य कोणत्याही समूहाची सार्वकालिक आवश्यकता असते. त्यापासून पलायनाचे पर्याय नसतात. त्याच्या प्रतिष्ठापणेसाठी पर्याप्त प्रयास हा एक प्रशस्त पथ असतो. पण सगळ्यांनाच हा प्रवास पेलवतो असंही नाही. बहुदा सापेक्ष असतं ते सत्य, असं म्हणणं वावगं ठरू नये. कारण एकासाठी असणारं सत्य दुसऱ्यासाठीही तसेच असेलच कशावरून? वास्तव अन् कल्पितात अंतराय असतं. ते समजून घेता आले की सत्याचे अंगभूत अर्थ गवसतात.

देशोदेशी नांदत्या विविध विचारधारांनी सत्याचा नेहमीच आग्रह धरला आहे. ते जीवनाचं प्रयोजन वगैरे असल्याचे सगळ्याच शास्त्रांनी विदित केले आहे. पण याचा अर्थ सगळ्यांनीच ते अंगीकारले आहे, असा होत नाही. प्रसंगी त्याचा अपलापही झाला आहे. सत्य कुठलंही असूद्या माणसे त्याचा अर्थ बऱ्याचदा सोयीस्करपणे लावतात अन् त्याचा स्वीकार स्वतःच्या सवडीने करत असल्याचे दिसेल. अर्थात हा माणूस स्वभाव आहे. स्वार्थापासून त्याला विलग नाही होता येत. त्याच्या मनी अधिवास करणारे विकारच सत्याच्या परिभाषा बदलतात, असं म्हणणं वावगं ठरू नये, नाही का?

'सत्य असत्याशी मन केले ग्वाही, नाही मानले परमता.' असं म्हणायलाही आपल्याकडे स्वतःचं मत असायला लागतं. ते संत तुकारामांकडे होते म्हणूनच ते हे लोकांना सांगू शकले. पण दुर्दैव असे की, कोरभर स्वार्थासाठी माणसे सोयिस्कर भूमिका घेतात. त्यांना समर्थनाची लेबले लावतात. बोंबलून बोंडे विकण्याची कला अवगत असलेले विसंगतीला विचार म्हणून बुद्धिभ्रम करत राहतात. माणसे अशा भ्रमाभोवती भोवऱ्यासारखे फिरत राहतात. भोवऱ्याला गती असते, पण ती काही अंगभूत नसते. कोणीतरी त्याचा वेग निर्धारित केलेला असतो. स्वहित साध्य करण्याच्या प्रयत्नात सामूहिक हिताला तिलांजली दिली जात असेल, तर प्रश्न अधिक गहिरे होत जातात. हे खरं वगैरे असलं, तरी एक प्रश्न उरतोच तो म्हणजे, सत्य सापेक्ष संज्ञा आहे अन् तिचा अक्ष किंचित स्वार्थाकडे झुकलेला असतो. त्याचा सुयोग्य तोल सावरता आला की, ते झळाळून येते अन्यथा अश्वत्थाम्याची अस्वस्थ वणवण घेऊन मुक्तीच्या शोधात भटकत राहते. त्याला हा अभिशापच असावा बहुतेक, नाही का?
-चंद्रकांत चव्हाण
••

अहं

By // 1 comment:
'इगो' ही मोठी समस्या असते. आपल्याकडेही ते असावेत (?) फक्त दिसत नसावेत किंवा नाहीत एवढेच. काहीना खरेच काही दिसत नाही. त्यांनी ती नजर कमावलेलीच नसते. ते कसब आत्मसात करण्याची कला अवगत नसते अशा लोकांना. तर काहीना दिसले तरी जाणवत नाहीत अन् जाणवले तरी मन हे मान्य करेलच असंही नाही. काहीना सोयीच्या गोष्टी सोयीस्कर करण्याचं कसब साधलेलं असतं. काहीना बरंच काही जमतं, काहीना काहीच नाही. सगळ्यांना सगळंच जमतं असं नाही. म्हणून ते काही कुचकामी ठरत नाहीत. 

मी आणि मी, केवळ मी, ही मानसिकता त्यागल्याशिवाय समस्यांचे निराकरण अशक्य. 'मी'पणाच्या वर्तुळाभोवती कोणी प्रदक्षिणा करत त्या गतीला प्रगती समजत असतील, तर ती अधोगती असते, हे सांगायलाच नको. पण प्रश्न असा आहे की, ही अहंमन्य मानसिकता बदलायला अजून तरी औषध उपलब्ध नाही. अशावेळी मूल्ये, संस्कार वगैरे गोष्टी गौण ठरतात. 

वैयक्तिक म्हणा अथवा समूहात प्रत्येकाचा काही तरी सहयोग असतो, तो लहानमोठा असू शकतो. अशावेळीच माणसांचे पैलू आकळतात. सगळेच काही बिनीचे शिलेदार नाही बनू शकत आणि वाटतात ते तसे असतीलच असंही नाही. हिताचे निर्णय समन्वयातून व्हावेत. नसतील होत, तर सहविचारातून आकारास यावेत. आत्मकेंद्री मानसिकतेपुढे सगळेच परीघ लहान होतात. येणारे येतात, जाणारे जातात. हा क्रम काही टळत नाही किंवा त्याला वळसा घालून पुढे निघता येत नाही. जाणारे गेले की, राहिलेले पुढच्या जागी येतात एवढंच.

तसंही आपलं माणूस म्हणून वर्तन काळाच्या कोणत्या तुकड्यात खूप चांगलं वगैरे होतं? अर्थात, सर्वकाळी वाईट होतं असंही नाही. माणूस चांगला, वाईट कधीच नसतो. तो काळाचं अपत्य आहे. त्या त्या वेळचे वर्तन व्यवहार ते ठरवत असतात, मग काळ कोणताही असो. चांगलेपणाची परिभाषा करावी तरी कशी? माणसे सत्प्रेरीत विचाराने एकत्र येऊन, अहं त्यागून धवल, मंगल असं काही करू इच्छितात. अशा वर्तन व्यवहारांना चांगलं म्हणता येईल? कदाचित! पण चांगुलपणालाही काही कंगोरे असतात. ते कोण कोणत्या कोनात त्याकडे पाहतो आहे यावर अवलंबून असतं नाही का?

सगळ्या गोष्टींचे प्रवाह एकाच संगमावर येऊन थांबतात, ते म्हणजे माणुसकी. दुर्दैवाने हे संगमतीर्थ गढूळ झालं आहे एवढंच. फक्त ती तुरटी शोधावी लागेल, जी पाण्याला निवळेल. अंजन डोळ्यात घातले जाते. त्याने दृष्टी नितळ होते म्हणे. पण नुसते डोळे असून काय उपयोग. डोळे सगळ्यांना असतात, दृष्टी थोड्याना. डोळ्यांचे विकार बरे करता येतात, पण विचारांची वानवा असल्याने दृष्टीत आलेल्या दोषाचं काय? माणसांच्या असण्यात आदिम अवस्थेपासून तो सोबत करतो आहे. तो दूर करणारं औषध अद्याप सापडलं नाही. खरतर ते शोधायची आवश्यकता नाही. ते ज्याचं त्याने आणायचं असतं. ते कुणाला कुठे मिळेल सांगणं अवघड आहे. सत्य हेही आहे की, कोणी डोळस झापडबंद पट्ट्या परिधान केलेल्यांच्या जगात आला की, त्याला ते वेड्यात काढतात. कदाचित डोळसांच्या ललाटी नियतीने वंचनेचा शाप कोरलेला असतो. कुणी अविचाराने घडणाऱ्या कृतीला समर्थनाचे टॅग लावून तिचं नसलेलं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा विचार, संस्कार वगैरे पोरके होतात.

संकुचित स्वार्थ सर्वस्व होतो, तेंव्हा मूल्य भिकारी होतात अन् कृतीने कफल्लक सिंहासनावर अधिष्ठित. जग वेड्यांचा बाजार नाही, पण शहण्याला बेजार करून बाजारात उभं करण्याइतकं हुशार नक्की आहे. असो, सुविचारांनी विश्व सत्वर सुधारत नसतं. असतं तसं तर एवढी वैगुण्ये विश्वात नांदताना दिसली असती का? प्रबोधनाचे लक्षावधी शब्द मिळेल जागा तेथे कोरले गेले, पण त्यातले किती अंतरी रुजले? सांगणं अवघड. रुजण्यासाठी अनुकूल पर्यावरण असावं लागतं. नसेल तर प्रयत्न करून प्राप्त करून घ्यावं लागतं. आस्थेतून अवतीर्ण आशेचा एक कवडसा वाट शोधत राहतो, हे वास्तव नाकारण्यात अर्थ नाही. विरोधच्या वावटळी येतील. समर्थनाचे सूर सजत राहतील. त्यामागे कुणाचे स्वार्थ, कुणाचे अहं उभे असतील. त्यातून कुणी समर्थन करेल कुणी विरोध. पण वास्तव हेही आहे की, विरोध केवळ विरोधासाठी नसावा. विचारांना नसावा. विपर्यसाला असावा. विकृतीला असावा. अविचाराने घडणाऱ्या कृतीला असावा. नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

पात्रता

By // No comments:
गती, प्रगती अन् अधोगती हे प्रास साधणारे शब्द. कुठल्याशा वाक्यात टाकले की, देखणे वगैरे वाटतात. पण हेच शब्द आयुष्यात आले की, त्यांचे अर्थ बदलतात. ते समजून घेण्यासाठी अन्वयार्थ लावावे लागतात. परत परत पाहावे लागतात. पारखावे लागतात. आयुष्याच्या व्याख्या ज्याने त्याने आपापल्यापरीने करून ठेवलेल्या असल्या, तरी त्या पर्याप्त असतीलच असं नाही. प्रत्येकाचे पैलू वेगळे असतात. कोण कोणत्या कोनातून त्या कोपऱ्यांकडे बघतो यावर ते ठरत असतं. नजरेस पडणारे त्याचे कंगोरे निराळे असतात. अर्थात, जगणं समजून घेण्याच्या सगळ्याच व्याख्या काही सारख्या नसतात, म्हणून त्यांचे अर्थ आपापल्या वकुबाप्रमाणे तपासून पाहू नये असंही नसतं काही. 

गतीप्रगतीच्या परिभाषा गुणवत्तेच्या परिमाणांनी पाहता यायला हव्यात. अर्थात, आपल्याला अवगत असणाऱ्या कौशल्यांचं सार्थ आकलन असल्याशिवाय आपली पात्रता आकळत नाही. आपण कोण, हे कळायलाही पात्रता असायला लागते. पात्रता पर्याप्त पर्यायांमध्ये पहावी लागते. पर्यायांचं सम्यक आकलन होण्यास आपला आसपास आधी आकळणे आवश्यक असतं. त्याचे अर्थ अवगत करून घ्यावे लागतात. आसपास समजून घेण्यासाठी नजरेला क्षितिजाचा वेध घेता यावा. डोळ्यात सामावणारे क्षितिज अन् मनात कोरलेले क्षितिज सारखे असले की, विस्ताराच्या परिभाषा परिणत होतात. परिघांची वर्तुळे मोठी होऊ लागतात.

आसपासचं नांदतेपण समजून घेण्यासाठी अंतरीचा ओलावा अनवरत वाहता असावा लागतो. तो साकळता यावा म्हणून ओंजळी रित्या असाव्या लागतात. पण विचारातच करंटेपण कोरलं असेल, तर ओंजळी कशा भराव्या? आव आणून साव नाही होता येत. आपणच आपल्याला ओळखण्याचा सराव असायला लागतो. ‘मी’ कळला त्याला ‘आपण’ शब्दाच्या परिभाषा पाठ नाही करायला लागत. लोकांना सावरण्याइतका संयम अन् सोज्वळ विचार अंतरी नांदता असल्याशिवाय व्यवस्थेने कोरलेल्या चौकटी सुंदर नाही करता येत. सौंदर्याला परिभाषा असतीलही, पण भविष्यातील परिणामांचा विचार करून त्याला परिमाणे द्यावी लागतात. 

अनेक चौकटी असतात आसपास. काही दृश्य काही अदृश्य एवढाच काय तो फरक असतो त्यात. त्या सगळ्याच काही आपण तयार केलेल्या नसतात पण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पणे त्यावर मान्यतेची मोहर अंकित केलेली असते. चौकटी जगणं देखणं करणाऱ्या असतील तर बंधने नाही होत. पण कुंपणांचा काच होऊ लागला की, विस्ताराचे परीघ आक्रसत जातात. कुंपणे पार करणं परीक्षा असते. परीक्षेत सगळेच उत्तीर्ण होतात असं नाही. आपला आपण शोध घेण्यासाठी आयुष्याचे एकेक अध्याय अभ्यासावे लागतात, तपासून पाहावे लागतात. कालबाह्य अक्षरे काढून कालसंगत विचार कोरावे लागतात. आयुष्याला सीमांकित करणारी समीकरणे काढून नवी गणिते आणावी लागतात. सोडवावी लागतात. त्यासाठी सूत्रे शोधावी लागतात. 

आपण कोण? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अख्खी हयात वेचण्याची अन् सगळं आयुष्य वाचण्याची तयारी असायला लागते. असं असलं म्हणून त्याची सगळी उत्तरे हाती लागतीलच असंही नाही. नाहीच सापडली काही उत्तरे म्हणून विकल होऊन पलायनाचा पथ नाही धरता येत. असतील अन्य पर्याय आसपास कुठे तर तेही पडताळून पाहावे लागतात. प्रयासाने पदरी पडलेल्या समाधानाला पर्याय नसतो. प्रामाणिकपणाचं पाथेय पदरी पडलेलं असेल, तर बेईमानीच्या बेगडी सुखांची चमक फिकी पडते. 

पणती पावलापुरता प्रकाश पेरते हे खरेच. ती अवघ्या अंधाराचा वेध नाही घेऊ शकत, हेही वास्तवच. पण सत्य तर हेही आहे की, आस्थेचा कोरभर उजेड अंतरी नांदता असला की, पणतीने पेरलेला ओंजळभर प्रकाश पावलांना आश्वस्त करतो. परिस्थितीचं सम्यक आकलन नेणिवेच्या अंधाऱ्या कोपऱ्यात आशेचे कवडसे कोरते. अंधाराच्या पटलावर काजव्याचं चमचमणं देखणं वगैरे दिसत असलं, तरी त्याला सगळा आसमंत नाही उजळून टाकता येत. ती त्याची मर्यादा आहे. एवढं कळणंही आपला वकूब ओळखण्यासाठी पर्याप्त असतं. 

विस्तवाने पेरलेल्या प्रकाशाची प्रखरता पाहून कळत असली, तरी त्याची धग उमजण्यासाठी निखारे अनुभवायला लागतात. अवतीभवती नांदणारे परिस्थितीचे वणवे संवेदनशील मनांना नाही विसरता येत. व्यवधानांकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष करणं जगण्यात सामावलेली विसंगती असते. परिस्थितीने पेटवले वणवे वळवण्याचा वकूब असला की, विसंगतीतूनही संगतीची सुसंगत सूत्रे शोधता येतात. नाही का? 
- चंद्रकांत चव्हाण
••

अपवाद

By // 1 comment:
प्राक्तन वगैरे गोष्टी असतील अथवा नसतील, पण प्रयत्न असतात. एवढं नक्की. त्याचे पथ धरून पावलांना प्रवास करता आला की, परिमित पर्यायांत प्रमुदित राहता येतं. आनंदाची अभिधाने आपल्या अंतरीच असतात. योग्यवेळी ती पाहता यायला हवीत इतकंच. पण नाही लक्ष जात आपलं त्याकडे हेही तेवढंच खरं. अर्थात, हाही मुद्दा तसा सापेक्षच. हे असं काही असलं तरी वास्तव मात्र वेगळं असतं. प्रसन्नतेचा परिमल शोधायला वणवण करायची आवश्यकता नसते. आनंदाची अभिधाने आणि समाधानाची पखरण करणारे सगळे रंग आपल्याकडेच असतात. पण ते समजून घेता आले तर. 

रंग येथून तेथून सगळीकडे सारखे असले, तरी त्यांच्या छटा वेगवेगळ्या असतात. जगण्यावर चढलेला स्वभिमानाचा रंग अन् आयुष्याला लागलेला मिंधेपणाचा रंग सारखा कसा असेल? खरं हेही आहे की, लाचारीचा रंग जगण्यावर चढला की, सगळेच रंग विस्मरणात जातात अन् माखून घेतलेला रंग अधिक गहिरा होत जातो. मुखवटे देखणे वाटायला लागले की, चेहरे विस्मरणात जातात. मन गढूळलं की, जगण्यातलं नितळपण निरोप घेतं. विलोभनीय विभ्रमांनी संमोहित करणाऱ्या निसर्गातील रंगांचं कोणतंही अप्रूप नाही उरत. मिंधेपणाचा रंग एकदाका आयुष्यावर चढला की, विचारांचं नानाविध रंगात न्हाऊन निघणं थांबतं अन् मिंधेपणाच्या माखल्या रंगांना देखणे करण्याच्या कवायतीत मूळचं सौंदर्य करपतं. जगणं समृद्ध करू पाहणारी विचारविलसिते परिघ हरवतात अन् विकारांची वर्तुळे भक्कम होत राहतात.

विचारांनी विस्मरणाचा रंग धारण केला की, मेंदू बधिर होतो अन् मन सैरभैर. अशावेळी मनगट खड्गाचं धारदार पातं पेलण्याऐवजी पुढ्यात पसरवण्यात धन्यता मानतं. याचक बनून पसरवलेल्या हातांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेले हात अधिक देखणे असतात, भलेही ते मळले असतील. विचारांनी लाचारीची वसने परिधान केली की, विवेक आपलं विश्व हरवतो आणि माणसं आपल्या अस्मिता. अविवेकाच्या वाती उजळू लागल्या की, अस्मितेचे रंग विटू लागतात. अहंपणाच्या इमल्यांना सांभाळणाऱ्यांच्या महाली आत्मसन्मान गहाण पडला की, आयुष्याचे अर्थपूर्ण असण्याचे संदर्भ साखळीतून सुटतात. सन्मानाचा कणा अन् जगण्याचा बाणा उसवतो. आशाळभूतपणे कुणाच्या पुढ्यात उभं असलेलं अधोमुख वदन आपल्याला कणा असल्याचे आठवू देत नाही.

व्यवस्थेचे ताणेबाणे झेलून आपला बाणा जपणारी माणसं शोधण्यासाठी कणा सलामत असणारी माणसे आसपास असायला लागतात, भलेही ती संख्येने नगण्य असतील. काळाच्या कोणत्याही तुकड्यात शोधून पाहिलं तरी त्यांची वानवा असलेलंच दिसेल. गढूळलेला प्रवाह पुढे सरकत नाही तोपर्यंत नितळपणाच्या परिभाषा त्याच्या ललाटी कोरता नाही येत. त्याकरिता त्याला वाहते राहावे लागते. वाहता वाहता आरस्पानी होता येतं, फक्त मार्ग तेवढा गवसत राहावा. कणा असलेली माणसे संख्येने अधिक होत नाहीत, तोपर्यंत प्रयासांच्या परिभाषांना पूर्णविराम नाही देता येत. अविचारांच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा घडतच राहतात. हे भ्रमण अज्ञानाने असेल किंवा अगतिकतेमुळे. कारणे काही असोत, त्याभोवती प्रदक्षिणा करणाऱ्यांची वानवा कधीच नसते अन् संख्याही दुर्लक्षिण्यासारखी. हे अप्रिय पण सत्य आहे. 

विश्वाच्या वर्तुळात वसलेल्या कोणत्याही परगण्यात वर्तनव्यवहारांबाबत प्रवाद शोधलेच तर अगणित गवसतील, वादही विपुल असतात. हे असं काही असलं तरी अपवादही असतातच. वाद, विसंवाद, वितंडवाद असणं जेवढं स्वाभाविक, तसं अपवाद असणंही सहज आहे. अपवाद संवाद सकारात्मक दिशेने सरकण्याचं सम्यक कारण असू शकतात. ते आहेत म्हणून प्रयासांच्या परिभाषा परत परत पेरता येतात. आशेचे अंकुर अगत्याने जोपासता येतात. 

पेरलेलं उगवतं, पण सोबत तणकटही दणकून येतं. अविचारांचं तण वेळीच वेगळं करावं लागतं अन्यथा पिकाच्या आयुष्याचे अर्थ हरवतात अन् उरतात निरर्थक अवशेष, जे उमेदीचे कुठलेच अन्वयार्थ शेष राहू देत नाहीत. विकल्पांचं तण वेगळं करण्यासाठी विचार जागे असायला लागतात. विचारविश्व समृद्ध करण्यासाठी संवेदनांचे किनारे धरून वाहता यायला हवं. प्रवाहासोबत वाहणारे अगणित असतात. प्रवाहाच्या विरोधात पोहणारेही असतात; पण प्रवाहांना अपेक्षित दिशेने वळते करणारे किती असतात? असं करणं सगळ्यांनाच अवगत असतं असं नाही. जगण्यात सत्त्व असलं की, स्वत्वाचे अन्वयार्थ आकळतात. स्वत्व सोबत असणारी संवेदनशील मने तत्त्वांची प्रयोजने अधोरेखित करतात, भले ते अपवाद असतील. अपवाद प्रवादांना पर्याय देण्यास पर्याप्त असतात, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
•• 

काळ

By // 1 comment:
स्मृतींचे किनारे धरून वाहणारा सगळाच भूतकाळ रम्य नसतो अन् शक्यतांच्या वाटांनी चालत येणारा भविष्यकाळही काही सगळाच सुंदर असतो असे नाही. भूतवर्तमानभविष्याच्या परिभाषेत काळाचा कुठलातरी तुकडा कोंडला, म्हणून तो काही कातळावर कोरलेल्या देखण्या शिल्पकृतीसारखा आखीव रेखीव होत नसतो. त्याचे काही कंगोरे असतात, काही कोपरे. त्याच्या असण्यानसण्याला काही आयाम असतात. काही अर्थ असतात, तसे अनर्थही. 

विशाल प्रस्तरावरून कोसळणाऱ्या प्रपातासारखा असतो काळ. प्रवाहाचं कोसळणं पाहताना कितीही देखणं वगैरे वाटत असलं, तरी प्रचंड आवेगाने दरीत झेपावणाऱ्या जलौघात काही कोणी उभं नाही राहत. त्याच्या गतीचे गोडवे नाही गात कोणी. एखादी गोष्ट डोळ्यांना देखणी दिसत असली तरी ती अनुभवणं प्रत्यक्षात तसं असेलच असंही नाही. कोसळणं, शतखंडित होणं, विखरून वाहणं त्याचं भागधेय असतं म्हणा हवं तर. काळ काही वस्तू नाही, नकोय म्हणून घेतली हाती की, दिली भिरकावून. इतकं सहजही नसतं त्याचं असणं. 

काळाचे खेळ सुरू असतात अनवरत. आपल्याला वाटतं आपण परिस्थितीसोबत खेळतो आहोत. खरंतर तोच खेळत राहतो माणसांशी. त्याचे खेळ कधी, कुठे अन् कसे असतील, हे त्यालाही ठावूक असतं की नाही, त्यालाच माहीत. तो दाखवता येत नसला, तरी त्याच्या असण्याला नाकारता नाही येत. मूर्त-अमूर्त वगैरेच्या परिभाषा एखादी संकल्पना समजून घेण्यासाठी असतीलही. या दोन मितींचा विचार करणे ठीकच, पण अनुभवणे ही आणखी तिसरी मिती असते. तिच्या बिंदूना सांधता येतं त्यांना शक्यतांचे अर्थ शोधावे नाही लागत.

भूतकाळ स्मृतीची वाकळ पांघरून कुठेतरी अंधाराच्या कुशीत पहुडलेला असतो. अपेक्षांची भरजरी वसने परिधान करून भविष्य शक्यतांच्या पटलाआड दडलेलं असतं. क्षणपळांची सोबत करीत आपल्याच धुंदीत पुढे निघण्याच्या घाईत असणारा वर्तमान हाती लागतो न लागतो, तोच निसटतो. त्याचा प्रवासच शेवाळल्या वाटांवरचा. आहे तेवढा तुकडा हाती घेऊन तोल सांभाळत त्याच्या सोबत चालता आलं, त्याला आयुष्याचा ताल कळतो. आयुष्य सजवण्याचा उद्योग तर सारेच करतात, पण त्याला समाधानाची किनार फार थोड्यांना लावता येते. सगळ्यांनाच नाही जोडता येत धागे धागे. नाही टाकता येत योग्य टाके. काळच आयुष्याच्या पटावर कशिदाकाम करतो. त्याची नक्षी तेवढी निवडता यायला हवी. रेषा सगळीकडे सारख्याच दिसत असल्या, तरी त्यांना मनाजोगती वळणे देता येतात. वळणांचा वळसा समजला, त्याला आकाराचं अप्रूप नसतं. हव्या तशा आणि तेवढ्या आकृत्या त्याला साकारता येतात.

कोणी काळाच्या सूत्रांची प्रशंशा करतात. कोणी त्याच्या गती गोडवे गातात. कोणी त्याने केलेल्या प्रगतीचे नगारे बडवतात. कोण आणखी काही काही. कोण कशाची महती मांडो, पण वास्तवात वर्तमानच अज्ञाताच्या पटलाआड दडलेल्या कहाण्या शोधण्यास प्रेरित करीत राहतो. भविष्याच्या गगनात चमकणारी आकांक्षेची अगणित नक्षत्रे खुडून आणण्यासाठी खुणावत राहतो. त्या खुणांचे संकेत तेवढे समजून घेता यायला हवेत. ते आकळतात त्यांना आयुष्याचे अन्वयार्थ समजून घेण्यासाठी कोशांचं आकलन अन् ग्रंथांचं परिशीलन करायची गरज नसते. परिस्थिती पुढ्यात प्रसंग पेरत जाते. आयुष्याच्या पटावर तिने पेरलेले कोंब जतन करता यावेत अन् विकल्पांचं तण तेवढं वेळीच विलग करता यायला हवं. 

भूतकाळ कधीच हातून निसटून स्मृतीच्या कोंदणात अधिष्ठित झालेला असतो. भविष्य अपेक्षांच्या धुक्यात विहार करीत शक्यतांच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करीत असते. वर्तमान तेवढा आकांक्षेची ओझी वाहत राहतो. भूतकाळ रम्य आठवणींचा गोतावळा जमा करून मनात नांदता असतो. भविष्य सुखांची संकल्पित स्वप्ने पाहत कुठल्यातरी क्षितिजावर स्मितहास्य करीत साद घालत असतो. आहे ते असे आहे, हे सांगणारा वर्तमानच सत्य. बाकी सगळे सायास-प्रयास आपणच आपल्याला उलगडण्याचे. वर्तमान कसा असावा अथवा नसावा, याच्या काही सुनिश्चित परिभाषा नसतात. संगतीचे-विसंगतीचे किनारे धरून तो सरकत राहतो. त्याचं असणं-नसणं प्रत्येकवेळी ठरवता येतंच असंही नाही. असं असलं तरी त्याला अपेक्षांच्या कोंदणात कोंडून ठेवता येतं. पण हेही निमिषमात्र अन् निमित्तमात्र. काळाला आकांक्षांनुरूप आकार देणे अवघड. त्याला निर्धारित करणारी परिमाणे नसली, तरी परिणाम देता येतात. त्याच्या असण्याला अपेक्षित आयाम देता आले की, आयुष्याचे एकेक अर्थ आकळायला लागतात, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••