Palak | पालक

By // No comments:
माझ्या शाळेतील एका विद्यार्थ्याच्या पालकाचा फोन आला. म्हणाले, “सर, आमचा चिरंजीव आम्ही सांगितलेलं काहीही ऐकत नाही हो! त्याला जरा तुमच्या पद्धतीने समजावून सांगा ना काही, दहावीचं वर्ष आहे त्याचं, तो असाच वागत राहिला तर कसं होईल त्याचं? आम्हाला तर काहीही सूचत नाहीये, काय करावं म्हणजे याला काही कळेल. आपल्याच तंत्राने वागतो. जरा काही सांगितलं की याचा नन्नाचा पाढा सुरु. बरे, एवढं करून तो थांबेल तर शपथ, मनातला सारा राग आदळ-आपट करून कशावरतरी काढणे नित्याचेच झाले आहे. थोडं कठोर होऊन काही बोललो की, याचं आम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करणं सुरु. एकदा तर घर सोडून जायचीच धमकी दिली. आम्ही अवाक होऊन नुसतेच त्याच्याकडे पाहत राहिलो. एक शब्द सुचेना काय बोलावे, आमचं बोलणंच खुंटलं. केवळ हताशपणे त्याच्याकडे पाहण्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाहीत. खूप चिंता वाटते हो त्याची! सर, तुम्हीच काहीतरी करा ना! झाला काही उपयोग तर ठीक, नाहीतर आलिया भोगाशी म्हणत पदरी पडले ते पवित्र करावेच लागेल, जग बाबा तुझ्या मर्जीप्रमाणे!” हे सगळं सांगताना त्यांचा कंठ दाटून आला. स्वर चिंता बनून थरथरायला लागले. त्यांच्याशी बोललो थोडं. समजावलं. बघतो काय करायचं ते, म्हणून आश्वस्त केलं. फोन ठेवला.

असे प्रसंग शिक्षकीपेशात काम करणाऱ्यांसाठी नवीन नाहीत. अधून-मधून पालकांकडून आपल्या पाल्यांविषयी अशा तक्रारी होतच असतात. त्यावर यथासंभव, यथासमय मार्ग काढण्याचा, उपाय शोधण्याचा प्रयत्न शिक्षक करीत असतात. तक्रारी नव्या नसल्या तरी परीक्षा- त्यातही दहावी, बारावीतील वर्गाच्या असल्या की, यांचं प्रमाण अधिक होतं. परीक्षा कोणतीही असू द्या; परीक्षा म्हटल्या की, पालक जरा जास्तच जागरूक होतात. त्यातही बोर्डाच्या परीक्षांभोवती एक अनावश्यक वलय समाजात निर्माण झालेलं असल्याने त्या उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणं, हेच आपल्या मुलाच्या जगण्याचं सार्थक वगैरे असल्याचे वाटायला लागते आणि अपेक्षांचे भले मोठे गाठोडे त्याच्या डोक्यावर चढविले जाते. त्याची आवड-निवड, क्षमता या गोष्टींना पद्धतशीर फाटा दिला जातो. त्यांच्यासमोर प्रेमळ पित्याऐवजी बाप नावाचा ‘रिंगमास्तर’ उभा राहतो. अपेक्षांच्या फटक्यांनी तो परीक्षा नावाच्या पिंजऱ्यात गरगर फिरवत त्यांच्याकडून कसरती करून घेतो. या कसरती कधीकधी क्षमतेच्या पलीकडे होतात आणि परिणाम समोर येतो, बंडखोरी. विरोधाचे सूर तीव्र व्हायला लागतात आणि एक दिवस या जाचक बंधनांना झुगारून देत आपलं स्वत्व शोधण्यासाठी पावले बंडाच्या वाटेने चालती होतात. आपले इगो गोंजारत राहिल्याने नात्यातले रेशीमबंध ताणले जातात. प्रेमाचे पीळ सैलावतात. कधी हे धागे तुटतात.

पालक आणि मुलं यांचं वर्तन कसं असावं, याविषयी मतभिन्नता असू शकते. काही प्रवाद असू शकतात. दोन पिढ्यांमधील विचारांचे अंतर वर्तनात विसंगती निर्माण करते. यालाच कोणी जनरेशन गॅप वगैरे म्हणतात. वागण्याच्या भिन्न पद्धती; स्वतःच ठरवून घेतलेल्या दिशा बदलायला तयार नसतात. आपल्याच विचाराने जगण्याच्या पद्धतींना वास्तव समजलं गेल्याने वैचारिक अंतर वाढतच जाते. दोघेही आपापल्या मतांवर ठाम असल्याचा हा परिपाक असतो. एका बाजूने नियंत्रणाचे ताणलेले दोर, तर दुसरीकडे बंधमुक्त होण्याची स्वाभाविक ओढ. यातून नात्यातील संवाद हरवत जाऊन संशयाचे धुके निर्माण होते. दुरावा वाढत जातो. खटके उडायला लागतात.

पालक, मग तो कोणताही असो; आपल्या अपत्याच्या उज्ज्वल भविष्याबाबत चिंतीत असतो. तेवढ्या प्रमाणात त्याच्या जडण-घडणविषयी चिंतन घडत असते का? मुलांच्या शैक्षणिक कारकिर्दीविषयी जागरूक असू नये, असेही नाही. यासंदर्भात सजग असणे वेगळे आणि संवेदनशील असणे आणखी त्याहून वेगळे. आपल्या अपत्यांना आपली संपदा समजण्याचा प्रमाद पालकांकडून घडतो, तेव्हा समोरील प्रश्नांची उत्तरे अधिक जटील होत असतात. अशावेळी पालकांनी मुलांना थोडं समजून घ्यायला काय हरकत असावी? माणसाच्या जीवनक्रमातील वाढीची किशोरावस्था मुळात वादळी अवस्था. स्वाभाविकच पौगंडावस्थेतील मुलांचं एक वेगळं भावविश्व या अडनिड्या वयात तयार होतं. या वयात देहात एक उर्जस्वल, सळसळते चैतन्य निसर्गतः निर्माण होत असते. या चैतन्याच्या खळाळत्या प्रवाहांना विधायक दिशेने वळते करणे आवश्यक असते. सकारात्मक विचारांचे पाथेय सोबतीला घेऊन वळत्या केलेल्या वाटांनी व्यक्तित्वाचा विकास सहज, सोपा वगैरे होत असतो.

वयाचा हा कालावधी मुलांच्या आयुष्यात आत्मप्रतिमा घडण्याचा, घडविण्याचा काळ असल्याचे मानसशास्त्र सांगते. या वयातील मुलांसमोर कोणतेतरी विधायक उद्दिष्ट असणे आवश्यक आहे. जीवनात जे काही चांगले आहे ते मिळवण्यासाठी तुलाच प्रयत्न करावे लागतील, याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. म्हणूनच कोणत्यातरी ध्येयप्रेरित विचारांची सोबत करीत त्याच्या मनाला स्वप्नांकित करणे महत्वाचे ठरते. त्याचा जीवनप्रवास निश्चित उद्दिष्टांकडे नेण्यासाठी काही लहानमोठ्या स्वप्नांची पेरणी मनात करावी लागते. ती तेथे जाणीवपूर्वक रुजवावी लागतात. जोपासावी लागतात. जीवनाची अखंड सोबत करणारा यश-अपयश नावाचा खेळ खेळण्यासाठी त्याला तयार करावे लागते. यशापयश जीवनाचा एक पैलू आहे, हे समजून द्यावे लागते.

आयुष्यात सदासर्वदा यशाच्या गंगेचा प्रवाहच वाहत राहील असे नाही, हे समजून सांगताना यशासाठी प्रयत्न करणं आणि ते सहज मिळत नाही, म्हणून निराश न होणं त्याला शिकवावे लागते. ‘यश’ नावाचा शब्द बोलायला, लिहायला बऱ्यापैकी लहान वाटत असला, तरी तो सहज आवाक्यात येणारा नाही. यशाची व्याख्या, परिमाणेही प्रत्येकाची वेगवेगळी असतात. आत्मविश्वास, अभिव्यक्ती, महत्वाकांक्षा, निर्णयक्षमता या साऱ्यांचा उत्कट आविष्कार म्हणजे यशसंपादन असते. सुखाचा शोध घेणं माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती असते. सुखाच्या शोधात विश्वातील सारीच माणसं फिरत असतात. त्यात काही गैरही नाही. पण तरीही एक प्रश्न शिल्लक उरतोच, सुख म्हणजे काय असतं? आपली परिस्थिती कशी आहे यावर सुख अवलंबून नसते, तर परिस्थितीकडे आपण बघतो कसे, यावर असते. नाहीतरी विश्वात अशी कोणती गोष्ट आहे, जी सहज आपल्या हाती लागते?

स्पर्धेच्या वर्तमान जगात सारेच धावाधाव करत असताना आपण पाहतो. याचा अर्थ आपणही तसेच धावत सुटावे, असा नाही आणि स्पर्धेतून दूर राहावे असंही नाही. याकरिता समाजात वर्तत असताना योग्य काय, अयोग्य काय हे कळणे महत्वाचे आहे. पण बऱ्याचदा स्वतःच्या इगोसाठी मुलांना त्यांच्याकडील क्षमता दुर्लक्षित करून आवश्यक-अनावश्यक स्पर्धेत धावण्यासाठी उभे केले जाते. त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा केल्या जातात. दुर्दैवाने त्या पूर्ण करण्यास एखादं मूल असमर्थ ठरलं की मठ्ठ, दगड, भोपळा, बावळट अशी प्रशस्तिपत्रे त्याच्या हाती देण्याचा प्रमाद पालकांकडून वैयक्तिक आकांक्षेतून घडतो. यातून पुढचे प्रॉब्लेम सुरु होतात.

अभ्यासात हुशार असलेल्या शेजारच्या कुणा पिंकी, पिंटूशी तुलना सुरु होते. ‘तो किंवा ती आयआयटीसाठी तयारी करतोय, तुला निदान इंजीनियरिंग तरी जमलंच पाहिजे. नसता आम्हाला शेजाऱ्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. समाज, नातेवाईक काय म्हणतील?’ या आणि अशाप्रकारच्या विचारांची प्रवचने झडत राहतात. ही सक्ती कशासाठी? अवाजवी अपेक्षांपेक्षा पालकांनी आपलं वर्तन थोडं ओलाव्याचं, आपुलकीचं का ठेऊ नये? मुलांना समजूतदारपणाने सजलेल्या विचारांचे मुक्त आकाश देणारे स्वातंत्र्य देण्याएवढी व्यापकता, कल्पकता पालकांच्या विचारांत, वर्तनात असायला हवी. अमृतघट आपल्याच घरी भरलेले असताना इतर ठिकाणी वणवण फिरण्यात कोणते शहाणपण सामावले आहे? बंधनांनाच संस्कार समजून त्यातच बंदिस्त करू पाहणाऱ्या वातावरणात बालपण रम्य वगैरे वाटण्याऐवजी नकोसे वाटत असेल, तर मुलांचे काय चुकले?

आपण काय करू शकतो, याची ओळख मुलांना पालकांनीच करून द्यायला हवी. त्यांच्याकडील अंगभूत क्षमतांना पाहून त्याच्या शैक्षणिक वाटचालीविषयी निर्णय घ्यायला हवा. पोरगं बऱ्यापैकी चुणचुणीत असतं. अभ्यासातही त्याला चांगलीच गती असते. त्याच्या गतीला पाहून पालकांना भविष्यातील त्याच्यासह आपल्याही प्रगतीचे स्वप्ने दिसायला लागतात. मनात घर करून वसतीला असलेला अहं सुखावतो आणि यातून लक्ष्याच्या मागे धावण्याच्या शर्यतीचा खेळ सुरु होतो. पालकांना भविष्यातील आयआयटी, आयआयएम नामक प्रतिष्ठित वाटा डोळ्यासमोर दिसायला लागतात. ह्या आणि अशा अन्य काही सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या वाटांनी चालणेच तुझ्या जीवनाचे प्राप्तव्य आहे, अन्य क्षेत्रात कोणतंही उज्ज्वल भविष्य नाहीच, सारा अंधारच आहे. मळलेल्या वाटांनी चालून सुख कधी चालून तुझ्या दारी येणार नाही. जर ते अपेक्षेप्रमाणे मिळणार नसेल तर तिकडे का जावे, म्हणून त्याच्या माथी हे चुकलेलं तत्वज्ञान हाणले जाते. जगण्याचे हेच सुयोग्य शास्त्र असल्याचे शिकविले जाते.

कोणतीही कारणं न सांगता मुलांच्या डोक्यावर वजनदार आकांक्षांचं गाठोडं दिलं जातं. त्यांची पूर्तता व्हावी म्हणून प्रसंगी आपल्याकडील साऱ्या आर्थिकक्षमता पणाला लावून झापडबंद खेळ खेळला जातो. मुलांनी कितीही सांगितले; तुम्ही सांगत असलेल्या वाटेने चालण्यात मला कोणतेही स्वारस्य नाही, मला कला शाखेत प्रवेश घ्यायचा आहे, साहित्याचा अभ्यास करायचा आहे. पण याचा काहीही परिणाम आपण निवडलेला पर्यायच योग्य आहे, असे मानणाऱ्या पालकांच्या मतपरिवर्तनात होत नाही. कोणाला क्रीडांगणावर आपलं जगणं शोधायचं असतं, कोणाला अभिनय करून स्वतःच्या क्षमतांचा शोध घ्यायचा असतो, कोणाला चित्रे काढायची असतात; तरीही काही उपयोग होण्याची शक्यता नसतेच. ‘नाही, तुझं काय ते मला सांगू नकोस, हे भिकेचे डोहाळे कधीपासून लागले तुला? काही अक्कल वापरायला शिक! ते काही नाही, मला वाटते म्हणून हे करायलाच हवे.’ पालकांच्या अशा वागण्यातून मुलांची आवड काय आहे, त्याच्याकडे क्षमता किती आणि कोणत्या आहेत; याकडे सोयिस्कर दुर्लक्ष होते.

खरंतर जन्मलेल्या प्रत्येक जिवाकडे निसर्गाने काही अंगभूत क्षमता दिलेल्या असतात. हत्तीकडे प्रचंड ताकद असते, म्हणून काही त्या ताकदीच्या बळावर तो आपला परिसर उध्वस्त करीत नाही. वाघाला तीक्ष्ण नखे निसर्गाने दिली आहेत, ते काही गवत कापण्यासाठी नाही. मोर दिसतो सुंदर, नाचतोही चांगला; पण त्याच्या पदन्यासाच्या पद्धतीत कोणतेही परिवर्तन हजारो वर्षापासून आजपर्यंत घडले नाही. कावळे, चिमण्यांनी आपल्या घरांचं डिझाईन काही बदलेलं नाही. माणसाने प्रगतीचे नवेनवे आयाम निर्माण केले. त्याच्या घराच्या इंटेरियर पासून ते जीवन जगण्याच्या डिझाईनपर्यंत सारंसारं काही बदलून घेतलं आहे, कारण त्याच्याकडे असणारी बुद्धी आणि त्यातून निर्मित विचारांची शक्ती. आपण जगतो कशासाठी, हा प्रश्न माणसांनाच पडतो. प्राण्यांना अवकाशयाने आकाशात नेण्याची स्वप्ने येत नाहीत. त्यांच्या गरजा शरीरधर्माशी निगडित असतात. माणसांच्या गरजा शरीरधर्माशी जेवढ्या निगडित असतात, त्यापेक्षा मनाशी अधिक संबधित असतात. संवेदनशील मनाला प्रश्न विचारून आपण निवडलेल्या मार्गाचे माणसाने मनःपूर्वक मनन करायला काय हरकत असावी?

माणूस जगतो कशासाठी? सांगणे अवघड आहे. त्याची कारणंही अनेक असू शकतात. प्रत्येकाची वेगळी असतात. कोणाही पालकाला हा प्रश्न विचारून पाहिला, तर त्याचं उत्तर बहुदा पोराबाळासाठी, असं हमखास येतेच येते. मग असे असेल तर निसर्गातील इतर जीवही जगतच असतात की. त्यांचंही वंशसातत्य ते टिकवून ठेवतातच. उन्हाळ्यात पिवळे पडलेले गवतही पावसाच्या पहिल्या शिडकाव्याने हिरवे होते. तेही आपली जीवसाखळी पुढे नेतच असते. मुंगीसारखा छोटासा जीवही वारुळात वाढणाऱ्या पिढीसाठी अन्न साठवतो. मधमाशी कणाकणाने मध जमा करते, ते तिच्या परिवारासाठीच. मग माणसांचं वेगळेपण असे काय? त्याच्या जगण्यात निश्चित असा विचार असतो. कोणतीतरी नवी दिशा असते. पण जीवनातील हे नावीन्य दुर्लक्षित होते, तेव्हा जगण्याच्या दिशाच बदलतात. स्वतःसाठी घर बांधताना सिमेंट, वाळू, विटा कोणत्या वापराव्यात याची काळजी घेतली जाते. अगदी भिंतीना दिल्या जाणाऱ्या रंगांच्या शेड्स कोणत्या असाव्यात याचेही काटेकोरपणे नियोजन केले जाते. एवढं सूक्ष्म नियोजन करणारी माणसे मनालाही त्याचे अंगभूत रंग असतात, त्याच्याही काही शेड्स असतात, हे कसे काय विसरतात?

प्रतिष्ठेच्या प्रतिमा तयार करून त्यांच्या गरजा बनवून घेतल्या जातात, तेव्हा त्याभोवती आवर्तने घडत राहतात. गरजांच्या मूलभूत असण्यावर लक्ष केंद्रित होते; पण मनातील मूलभूत प्रश्न तसेच अनुत्तरित राहतात आणि जीवनातील निरामय आनंदाला माणसं पारखी होतात. आरोग्य ठीक राहावे म्हणून कुठलंतरी टॉनिक घेतले जाते. मन ठीक राहावे म्हणून आपुलकीचे, आस्थेचे टॉनिक घ्यायला हवे, ते न घेता तसेच राहते. माणसांच्या मनाचंही आरोग्य असतं, हे लक्षात येतच नाही. मनाला घडवण्यासाठी आणि जीवनाला परिणत करण्यासाठी काही मूल्यांचा अंगिकार करून ती जगण्यात रुजवणे आवश्यक असते. हे रुजणे, वाढणे किती जणांच्या आयुष्यात सातत्याने घडते? या प्रश्नाचे उत्तर शोधणे अवघड आहे. मूल्यांचा अंगिकार घडणे व्यक्तिसापेक्ष संज्ञा आहे. प्रत्येकाला वाटते, आम्ही समाजाने आखून दिलेल्या चौकटींचे कधी उल्लंघन केलं नाही, आमचं वर्तन नीतिसंमत आहे. याच मार्गाने आम्ही घडलो आहोत. आम्हांला आमच्या पालकांनी त्यांच्या तंत्राने घडविले. प्रसंगी चार धपाटे घातले, म्हणून आम्ही काही त्यांच्या विरोधात बंड केले नाही. सोबत असणारा समाजच मॉरल पोलिसिंग करून आमचं सामाजिक जगणं घडवत होता. तुमच्या मानसशास्त्राला काय सांगायचं ते सांगू द्या, सगळेच प्रश्न काही मानसशास्त्रातील व्याख्यांनी सुटत नाहीत. तेथे अनुभवाचेच शास्त्र असायला लागते. वागलो मुलांशी थोडे कठोर तर बिघडले कुठे?

संस्कार अविरत चालणारी प्रक्रिया आहे. ते कुठून आणि कसे व्हावेत, याचे निश्चित नियम सांगता येत नाहीत. तरीही त्याची सुरवात कुटुंबापासून होते, असे म्हणू या. बऱ्याचदा आपण ऐकतो की, आई हे संस्कारांचं विद्यापीठ आहे, मग याच न्यायाने बापाला या विद्यापीठाचा कुलगुरू का म्हणू नये? घर सांभाळण्याची जबाबदारी आईची असेल, तर येथील गुणवत्तेचे संवर्धन करणारे निर्णय बापानेच घेणे गरजेचे नाही का? पण बहुदा निर्णय घेण्याऐवजी लादलेच जातात. एखादी गोष्ट लादून यशाचा सोपान चढता येत नाही. लादून मिळालेल्या कोणत्याही यशाचा उत्सव साजरा करता येत नाही. समोर मंदिर असेल तर हात सहज जोडले जातात, ते कुठेही नाही जुळत. हात जुळण्यासाठी अंतःकरणात श्रद्धा असायला लागते. संस्कारांचेही असेच काहीसे असते. ते लादून येतील कसे?

परिस्थिती, परिवार, समाज, शिक्षक ही आणखी काही संस्कारांची उगमस्थाने आहेत. येथून आयुष्याच्या उन्नयनाचे काही मार्ग गवसतात. शिक्षित असणं आणि सुसंस्कारित असणं या भिन्न गोष्टी आहेत. संस्कारातून घडून तसंच वागणं व्हावं, यासाठी जीवनाला जाणीवपूर्वक आकार द्यावा लागतो. संस्कारांचे धडे काही आणि वागणे काही असेल, तर जीवनाला घडणे अवघड होत जाते. कोणतीही परिस्थितीशरण अगतिकता व्यक्तित्वाला नव्या उंचीवर नेऊ शकत नाही. याची जाणीव पालक म्हणून असणे अगत्याचे असते. मूल घराचं वैभव असतं; तेवढंच देशाचं, समाजाचंही संचित असतं, हे संचित समाजात जेवढं साकारते त्यापेक्षा अधिक कुटुंबात आकार घेत असते. याकरिता व्यक्तित्वविकसनात बाधा ठरणारा जगण्यातील अनावश्यक भाग काढून टाकावा लागतो. संत्र्याची झाडं लावून सीताफळे येण्याची वाट पाहणे, हा शुद्ध वेडाचार ठरतो. समर्पण, सेवा, संवेदना, साहचर्य, सामंजस्य यासाऱ्या सामुग्रींचं उगमस्थान कुटुंबच असतं, मात्र त्यासाठी तेथे स्वातंत्र्याचा वारा सतत वाहत राहणे गरजेचे असते. इतरांची मने समजून घेणारी संवेदनशील मने येथून घडवावी लागतात.

विद्यमान पिढीच्या जगण्यात कालप्रणित ज्ञानतंत्रज्ञानातून आलेली व्यवधाने वाढत चालली आहेत. व्हर्च्युअल जग त्यांच्या हाती आहे. व्हर्च्युअल जगाशी कनेक्ट होताना अॅक्च्युअल जगाचा विसर या पिढीला पडतोय. आभासात रमणारी ही मने संवेदनशीलता हरवत चालली आहेत. फेसबुकवर कुठल्यातरी फालतू पोस्ट करणाऱ्या आणि त्यांना लाईक करणाऱ्या मुलांच्या संवेदनांचा प्रवास कुठे आणि कोणत्या दिशेला चालला आहे? स्वतःच्या सेल्फी काढून फेसबुकवर टाकून कुणीतरी लाईक करण्याची आणि कुठल्याशा थिल्लर कॉमेंटची वाट पाहणाऱ्यासमोर उत्तुंग आदर्शच नाहीत का?

वयाच्या चौदाव्या वर्षी स्वराज्याची प्रतिज्ञा करणारे शिवबा, सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या ज्ञानेश्वरांचे कर्तृत्व माहीत असूनही सोयिस्करपणे विस्मरणात चालले आहे. स्पर्धेच्या आवर्तात धावणाऱ्या पिढीच्या संवेदना बोथट होत आहेत. दुसऱ्याच्या दुःखाने भरून आलेले डोळे म्हणजे संस्कृती, असं म्हणतात. आमचे डोळे संवेदनशीलताच विसरत आहेत. आपल्या संस्कृतीने केलेल्या संस्कारांचे पाझर अवरुद्ध होत आहेत. सेवा, सहकार्य, सहानुभूती, शालीनता, शांती या मूल्यांना दुर्लक्षित करून संकुचित स्वार्थाच्या साध्यासाठी सैरभैर होणारी मुलं संस्कारांनी घडवणं पालकांसमोरील मोठी समस्या आहे. पैसा नावाच्या परिघाभोवती पळापळ करणारे पालक मुलांना आपली संपत्ती समजत असतील आणि त्यांना पॉकेटमनी दिले, म्हणजे सगळी सुखे मिळतात असे वाटत असेल तर, त्या चैतन्यदायी उर्जेच्या सळसळत्या प्रवाहांना स्वतःचे अस्तित्व उरतेच किती?

आपल्या आजूबाजूला अशीही काही माणसं आहेत, ज्यांनी यशाची आपल्यापुरती लहानमोठी व्याख्या करून घेतली आहे. ते मिळवण्यासाठी कस्तुरीमृगासारखे त्यामागे धावत आहेत. मुलांनाही नकळत हाच विकार जडत चालला आहे. गुणपत्रकावरील गुणांचे आकडे म्हणजेच गुणवत्ता आहे, असे समजणारे हे चैतन्य जगण्यातील गुणवत्ता हरवून बसले आहे. एकेका गुणासाठी जीवघेणी स्पर्धा. यासाठी काहीही करण्याची मानसिकता प्रबळ होत जाते. सारे विधिनिषेध पायतळी तुडविले जातात. अपयश पदरी पडणे म्हणजे जीवनाचे वैराण वाळवंट होणे, असे समजून वागणे घडत आहे. दुर्दैवाने अपयश आले की, सुंदर जीवनाच्या सांगतेचे अध्याय; ज्याला जीवन म्हणजे काय, हेच अजून नीट कळले नाही त्यांच्याकडून लेखांकित होत आहेत. बेभान धावण्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. आजूबाजूला एक सुंदर जग आहे. त्यात सूर्योदय आहे, सूर्यास्त आहे. कूस बदलणारे ऋतू आहेत. निसर्गाचे निरनिराळे निरामय आविष्कार आहेत, याचेही भान उरलेले नाही. हव्यासापायी कोणत्यातरी बेगडी यशाच्या काटेरी पथावरून धावत आहेत. त्यांच्या अशा धावण्याने पावलाखालची वाटच नाही, तर जगण्याची दिशाही हरवत चालली आहे.

कुटुंब नावाची संस्था विस्कळीत होत आहे. पैसा जगण्याचे साधन न राहता साध्य बनत आहे. बँकमधील अकाऊंटवर शिल्लक वाढताना पाहण्यात आनंद मिळतोय. त्यात आणखी काही अंकांची भर घालण्यासाठी धडपड चालली आहे. कुटुंबाचा कणा प्रेम, सहवास, साहचर्य असते, या गुणांनी विणलेला गोफ सैल होतो आहे. प्रेमापासून वंचित आणि अपेक्षांच्या ओझ्याने दमछाक झालेली मने वैफल्यग्रस्त होत आहेत. क्षणाच्या अविचारातून जीवनाच्या मैफलीचे सूर सुटत चालले आहेत. स्पर्धेच्या वाटेने धावणारे जगण्यातून काय गमावत आहेत, याचीही जाणीव राहिली नाही. हातात स्मार्टफोन आहे. पाठीवरील सॅकमध्ये लॅपटॉप लटकतो आहे. घराच्या भिंतीवरील टीव्हीच्या व्हर्च्युअल जगात आसक्तीच्या रंगांची अखंड उधळण सुरु आहे. भौतिक सुखांची लालसा वाढत आहे. भोगवादाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होत आहे. या आभासी विश्वाला रमणीय समजून माणसं त्यात वावरत आहेत; पण वास्तवापासून विपरीत दिशेने दूरवर चालली आहेत. हे दुरावलेपण सांधण्यासाठी थ्री जी, फोर जी कनेक्टीव्हिटीपेक्षा आपल्या जगण्यात जाण आणि भान निर्माण करून संवेदनांशी कनेक्ट करणारा विचार आणणे महत्वाचे आहे. कारण एखाद्या गोष्टीबाबत नुसती सहानुभूती असून उपयोगाची नसते, त्यासाठी अनुभूतीही असायला लागते.

Manasa Manasa | माणसा माणसा

By // No comments:
‘माणसा माणसा कधी होशील रे माणूस?’ कवयित्री बहिणाबाईनी आपल्या कवितेतून हा प्रश्न विचारून काही दशके लोटली आहेत. पण अद्याप या प्रश्नाचे उत्तर काही माणसाला मिळालेय, असं वाटत नाही. कारण ज्याला हा प्रश्न विचारला त्याला ‘माणूसपण’ म्हणजे काय, हे पूर्णतः कळलेले आहे असे म्हणवत नाही. कळले असते तर माणूसपणाची आठवण करून द्यायची आवश्यकताच राहिली नसती. माणूस दिसतो इतका सहज, साधा, सोपा नसतोच. त्याच्याकडे सामाजिक संस्कारांची श्रीमंती किती, हे समजून घेण्यासाठी कोणत्यातरी निकषांच्या मोजपट्ट्या वापरून तो मोजता येत नाही. समजून घेण्याचा प्रयत्न केला, तरी तो पूर्णतः समजून घेता येईलच असे नाही. माणूस निसर्गाची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे, असे म्हणताना कितीही चांगले वाटत असले, तरी तो तसा असेलच याची खात्री देणे अवघड आहे. म्हणूनच कदाचित माणसाला ओळखताना काहीतरी निसटतेच. त्याला समजून घेताना वर्तनाची संगती नीटशी न लागल्यानेच ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’, असे म्हणून या प्रश्नाला त्याच्या तदानुषंगिक वर्तनव्यवहारावर सोडून दिले जाते. तसेही माणसे जशी दिसतात तशीच असली पाहिजेत, असेही काही नसते. म्हणूनच तो कसा असेल, हे सांगणे अवघड असते. 

माणूस ओळखण्यात काहीतरी त्रुटी राहतातच. त्या स्वीकारून वर्तनाचे व्यवहार ठरवावे लागतात, करावे लागतात. माणूस कसा असावा, कसा नसावा अशा काही चौकटी तयार करून त्याच्या जगण्याला नियंत्रित करण्याचे प्रयत्न घडत राहिले आहेत. त्यातून माणूसपणाची सर्वमान्य नसेल; पण सुलभ व्याख्या करण्याचा प्रयत्न झाला. समाजमान्य विचारांच्या चौकटींत काही माणसे स्वतःला घडवत असतात, काही माणूस म्हणून घडवले जातात. काही चौकटींमध्ये चपखल बसू शकत नाहीत. त्यांचं जगणं त्यांच्यापुरती शोधयात्रा ठरते. विधायक वाटांची निर्मिती करून वर्तणारे समाजात वेगळे ठरतात. मळलेल्या वाटांनी प्रवास नाकारणाऱ्यांना नवी क्षितिजे खुणावत असतात. परंपरांचे बंदिस्त वर्तुळ त्यांच्या विचारांना मान्य नसते. समाजमान्य चौकटींच्या व्याख्येत स्वारस्य नसते, त्यांच्या वर्तनसंगतीवर विशिष्ट मतांचे लेबले लावली जातात. गर्दीत वेगळेपण जपणारे वेडे ठरतात. मी कोण? हा प्रश्न ज्यांच्या मनात निर्माण होतो त्यांना जगावे कसे, हे प्रश्न सहसा पडत नाहीत. मळलेल्या वाटांनी चालत जाणाऱ्यांना मुक्कामाचे कोणतेही नवे प्रदेश शोधता येत नाहीत. समाजनिर्मित विचारच ग्राह्य आहेत, असे समजून चालणाऱ्यांच्या जगण्यावर समाज आपल्या मान्यतेची मोहोर अंकित करीत असतो. माणसांसाठी समाजच सारं काही असतो, असे मानणाऱ्यांना व्यवस्थाच आपल्या साच्याच्या आकारानुसार घडवीत असते. व्यवस्थेचे घटक होऊन ते जगतात.

समाजनिर्मित विचारांच्या मार्गावरून चालताना मर्यादांचे उल्लंघन माणसांकडून घडू नये म्हणून देव, धर्म, वंश, पंथ अशा चौकटी उभ्या केल्या जातात. मर्यादांचे बांध घालून माणसाच्या जगण्याला संयमित, नियंत्रित केले जाते. चौकटींना स्वेच्छेने स्वीकारणारे जगण्याचे प्रयोजन समाजनिर्मित बंधानांच्या वर्तुळात शोधू लागतात. देव, धर्म त्याच्या जगण्याचे आधार ठरतात. वैयक्तिक समाधान मिळवण्यापुरते हे सीमित असेल तर काही प्रश्न नसतो. पण आधार जेव्हा विशिष्ट अभिनिवेश धारण करून प्रकटतात, तेव्हा प्रश्नांचा गुंता अधिक वाढत जातो. देवधर्मादी गोष्टींना वैयक्तिक मर्यादांची कुंपणे असतील, तर कोणाची काही हरकत असण्याचा प्रश्न नसतो. पण कोणत्यातरी निमित्ताने इतरांवर थोपवण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा ते माणूसपणाच्या अफाट आभाळाला बाधित करतात. कोणत्यातरी विशिष्ट वर्तुळातील विचार अंगिकरून घडत जाणारी जीवनप्रणालीच वास्तव असल्याचे वाटायला लागते. प्रगतीचे पंख लेऊन विहार करणाऱ्या विचारांना परिस्थितीचा पायबंद घातला जातो. टोकाचा एकेरी विचार आपला वाटायला लागतो. एकांगी विचारांनी वर्तताना पहिला बळी जातो, तो सहिष्णुतेचा.

माणसांच्या शेकडो वर्षाच्या वाटचालीच्या मार्गावरील आश्वस्त करणारा विसावा म्हणजे चिंतनातून, अनुभवाच्या संकलनातून त्याने संपादित केलेले सकारात्मक विचार. असा विचार करणारी माणसं उमेदेपणाने मान्य करतात की, आपल्या मतापेक्षा आणखी काही इतर मते असतात. त्यांनाही काही अर्थ असतो. आपण जसे आहोत तसे इतरही समूह, विचारधारा इहतली आहेत. त्यांचेही काही विचार असू शकतात. जीवनविषयक काही प्रणाल्या असू शकतात. मतप्रवाह असू शकतात. काही जीवनश्रद्धा असतात. हे वेगळेपण मान्य असणाऱ्यांकडून भिन्न विचारधारांच्या एकत्रीकरणातून विधायक प्रवाह निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. या प्रवाहाने नीतिमत्तेच्या तीरांना धरून वाहत राहावे. समाजमान्य नैतिकतेच्या परिभाषेत आपलं अवकाश शोधावं अन् सद्विचारांचा जागर घडत राहावा. समाजाची अशी अपेक्षा असते. विधायक अपेक्षांना केंद्रस्थानी ठेऊन जगणे म्हणजे माणूसपण, असा विचार दृढ होत जातो. विचारांचं व्यापकपण सोबत घेऊन जगणारी माणसं ‘खरं ते माझं’ म्हणत घडत असतात, वाढत असतात. त्यांच्या असण्याने जगण्याला अक्षय आशय प्राप्त होतो. व्यापकपणाचे लेणे घेऊन येणाऱ्या विचारांना वैयक्तिक स्वार्थातून संकुचितपणाचे कुंपण घातले जाते, तेव्हा ‘माझं तेच खरं’ असे म्हणणारा विचार रुजत जातो, वाढत जातो. इहतली प्रेमाचे परगणे बहरत जाण्याऐवजी विद्वेषाचे वणवेच वाढत जातात.

‘कळते पण वळत नाही’, ही केवळ भाषिक प्रवाहाला समृद्ध करणारी अक्षररचना राहायला नको. जसे कळते, तसेच वळण जगण्याला दिल्यास परिसरात प्रसन्नतेचा परिमल निर्माण होतो. स्वार्थाची आरती करणाऱ्या जगात सहजपणाचा गंध हरवतो. जे आपल्याकडचे नाहीत, आपल्या मतांशी सहमत नाहीत, ते कुठेच असण्याच्या पात्रतेचे नाहीत, असा विचार प्रबळ होत जाणे मूल्यप्रेरित विचारांवरचा आघात असतो. विरोधाला विचारांनी नाही, तर शस्त्रांची संपवण्याची मानसिकता दृढ होत आहे. जीवनाच्या आकाशात अविचारांचे मळभ दाटत आहे. कोणतातरी विशिष्ट देव, धर्म, वंश हाच जगण्याचा सम्यक मार्ग आहे, अन्य मार्गांनी वर्तणे, ते विचार आचरणात आणणे अयोग्यच, असा संकुचित विचार वाढतो आहे. विद्वेषाचे वणवे निर्माण करणारे हात पुढे येत आहेत. आपली विचारधारा हीच जगण्याची सर्वश्रेष्ठ प्रणाली आहे, असे वाटू लागल्यावर इतरांच्या स्वातंत्र्याचा संकोच होणे अटळ ठरते. संकुचित विचार नाकरणाऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी निसंकोचपणे शस्त्रे हाती धरली जातात. माणसं किड्यामुंग्यांसारखी संपवली जातात.

आपल्या विचारांनाच श्रद्धा समजणारी माणसं विवेक हरवून बसतात. त्याच्या दृष्टीने आपणच खरे आहोत आणि आपली विचारप्रणालीच वास्तव जीवनपद्धती आहे. आपली जीवनपद्धतीच श्रेष्ठ आहे असे वाटायला लागल्यावर वर्तनात विसंगत उन्माद वाढत जातो. उन्मादी हात माणसांचेच असले, तरी ते आपल्या विचारांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्याना संपवण्यासाठीच असतात, असे वाटायला लागते. पाशवी हात पेशावरच्या शाळेतच उगारले जातात असे नाही, तर अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य धारण करून जीवनपद्धतीतील विसंगतीवर भाष्य करू पाहणाऱ्या, जगण्यातील व्यंग चित्रित करणाऱ्या जीवनचरित्रांनाही रक्तरंजित करीत असतात. शिक्षणाच्या वाटेने शतका-शतकांचा वैचारिक अंधार दूर करू पाहणाऱ्या मानिनीचा देह संपवण्यासाठी हाती शस्त्र धारण करून उभे राहतात. कोणत्यातरी रस्त्यावर बॉम्ब बनून निरपराध्यांच्या जीवनाचा संहार घडवीत असतात. अविवेकी विचारांना देशकालपरिस्थितीच्या कोणत्याही सीमा अवरुद्ध नाही करू शकत. अविचारांने वर्तणारे कोणत्याही देशप्रदेशांच्या सीमांवर सहज दिसतील. त्याकरिता एखाद्या विशिष्ट परगण्यात जाऊन शोधण्याची आवश्यकता नाही.

विज्ञानतंत्रज्ञानाने मंडित जगाचा प्रवास कसा असावा? या प्रश्नाचे उत्तर माणसांना एव्हाना मिळायला हवे होते. पण विज्ञानतंत्रज्ञानाचा जीवनातील वापरच हल्ली प्रश्नांकित होत चालला आहे. विज्ञानांतून माणसाच्या जगात भौतिक सुखांची निर्मिती करू पाहणारे आहेत. तसे विनाशाचे वणवे निर्माण करणारे अविचारीसुद्धा आहेत. ‘माणसाचे हात उभारण्यासाठी असतात, उगारण्यासाठी नसतात.’ हा विचार पुस्तकांत बंदिस्त होत चालला आहे. माणसाने सन्मानाने जगावे. इतरांनाही तसेच जगू द्यावे, हा विचार मूल्यांच्या पाठापुरता सीमित राहिला आहे. अन्याय, अत्याचार, उपेक्षा वाईट असतात. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात अन्याय घडू नये. कुठे घडत असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी अविचारांचा संग स्वीकारणे योग्य आहे का? आपण जे करतोय, ते योग्य आहे का? हा प्रश्न अशा विचारांनी वर्तणाऱ्याच्या मनात उदित होत नसेल का? मान्य करू या, तुमच्यावर व्यवस्थेकडून अन्याय घडला असेल. त्याच्या निराकरणासाठी आहेत ना अन्य न्यायसंमत मार्ग. त्या मार्गाने तो मिळवून पहा. कदाचित त्यासाठी उशीर होईल, पण फलित चिरंतन असेल. अन्यायाला वाचा फोडण्याचा मार्ग निरपराध्यांच्या जगात त्याहून भीषण अन्याय घडवून आणणे, असा असू शकत नाही.

जगाच्या इतिहासाची पानं उलटून पाहिली तर रक्ताळलेल्या पावलांचे अनेक ठसे आजही दिसतील. स्वयंघोषित अस्मितांच्या संवर्धनाच्या निमित्ताने त्या-त्यावेळी संघर्ष घडले. अशा संघर्षातून रक्तलांछित अध्याय लेखांकित होताना कोणत्या तत्वांची निर्मिती घडत होती? जगण्याचे कोणते तत्वज्ञान मांडले जात होते? याचे उत्तर अद्याप मिळायचे आहे. वैयक्तिक स्वार्थ, टोकाच्या महत्त्वाकांक्षांनी घडलेल्या संघर्षातून जगातील लाखो निरपराध्यांच्या जीवनाचा अध्याय संपवला. जगात झालेल्या महायुद्धांनी जेवढी जीवित, वित्तहानी घडली नसेल, तेवढी देवधर्मवंशाच्या नावाने घडल्याचे इतिहासाच्या परिशीलनातून दिसेल. विश्वातील कोणताही धर्म, त्याचं तत्वज्ञान हिंसेचे समर्थन कधीच करीत नाही. अवघं विश्व एकाच चैतन्याचा आविष्कार असल्याचे मानले जाते. तरीही माणसे असं का वर्ततात? या प्रश्नाचे उत्तर मिळणे अवघड होत आहे. माणुसकीधर्मच महान असल्याचे दाखले जागोजागी उपलब्ध असूनही, संकुचित मनाची मूठभर स्वार्थांध माणसे हा कोणता खेळ खेळत आहेत? त्यांना कोणत्या तत्वांची प्रतिष्ठापना करायची आहे? देवधर्म ही आचरणाची, मानण्याची पद्धत असेल, तर ती जितकी सार्वत्रिक आहे, तितकीच वैयक्तिकही. स्वार्थाच्या परिघात वर्तणाऱ्यांकडून आपण अंगिकारलेल्या विचारांनाच तत्वांचे अधिष्ठान समजण्याचा प्रमाद घडतो आहे. देवधर्म जगण्यासाठी आवश्यक आहेत की नाही, हा ज्याच्या-त्याच्या आवडीचा, निवडीचा भाग झाला. मतभिन्नतेचा विषय असू शकतो. जगण्यासाठी तो आवश्यक आहे का? या प्रश्नाचे उत्तर ज्याचं त्यानेच शोधायला हवे. ज्याची जशी श्रद्धा, तसे त्याचे वर्तन असावे. इतरांनीही त्याच मार्गाचे अनुसरण करावे. तसेच त्याचे वागणेही घडावे, अशी अपेक्षा करण्यात माणूसपणाचे कोणते शहाणपण सामावले आहे?

माणूस देवधर्माशिवाय एकवेळ जगू शकेल, पण त्याच्या जगण्याचा धर्म शांततेशिवाय अर्थहीन असेल. अशा जगण्याला काही अर्थ असेल का? देवधर्म शब्दांचा आहे त्याशिवाय संयम, सौहार्द, सहिष्णूता, सहजीवन, सहअस्तित्व असा एक व्यापक अर्थ असायला काय हरकत असावी? काहीच नाही; पण देशप्रदेशाचे स्वार्थ साधताना आपापली पोळी भाजणाऱ्यांना हे समजून सांगणे अवघड आहे. माणसांच्या जगण्याचे प्रश्न काय कमी आहेत. त्यावर अद्याप सर्वसमावेशक उत्तर माणूस शोधू शकला नाही. तर देवधर्म नावाची व्याप्ती तपासताना कोणती उत्तरे त्याला मिळणार आहेत. जगण्याच्या अनेक प्रश्नांची वादळे समोर असताना एकांगी विचाराना प्रतिष्ठा प्राप्त होणे हा दुर्दैविलास आहे.

जगात अशी लाखो माणसे आहेत, ज्यांना जगण्यासाठी हातावर पोट घेऊन आला दिवस कसातरी ढकलावा लागतो. धड दोन घासही त्याच्या मुखी सन्मानाने आमची व्यवस्था देऊ शकत नसेल, तर माणूसपणाचे मखर तयार करून का मिरवून घ्यावे? विज्ञाननिर्मित समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरण्याऐवजी अज्ञानाचा अंधार अधिक गडद होत आहे. अंधश्रद्धा आहेत, अनारोग्य आहे. अनेक प्रकारच्या विसंगती जगण्यात आहेत. ही दूरिते माणसाला का दिसत नाहीत? की दिसूनही सोयिस्कर दुर्लक्ष करायची सवय करून घेतली आहे. समाजातील मूठभर माणसांच्या जीवनशैलीतील घडलेला बदल, म्हणजे समृद्धी नाही. संपन्नतेचे पथ सर्वत्र निर्माण होणे आवश्यक आहे. जगातील दुःख, दैन्य, दास्य संपवणे ही मोठी समस्या समोर असताना त्याकडे दुर्लक्ष होणं, हा काही विज्ञानविचारांनी निर्मित जगाचा चेहरा नाही.

माणूस नावाचा प्रवास संकुचिततेकडून सर्वंकषतेकडे घडणे आवश्यक असते. पर्याप्त समाधान प्राप्तीसाठी विश्वातील सारीच माणसं धडपड करीत असतात. वाटचालीचा प्रवास अधिक व्यापक उद्दिष्टांकडे असावा लागतो. कोणतीही एककेंद्री व्यवस्था जगण्याचे विस्तीर्ण आभाळ माणसाला देऊ शकत नाही. म्हणूनच राजेशाही, हुकूमशाही विचारांकडून लोकशाही विचारांकडे वाहणारा प्रवाह माणसांना अपेक्षित असतो. ‘बहुजन हिताय’ विचारांच्या दिशेने जाणारा मार्गच जीवनाचे शाश्वत दर्शन आहे. विषम विचारांनी वर्तणारे जग जीवनयात्रेतील आनंद नसतो. जगाची सार्वकालिक आवश्यकता शाश्वत शांतता हीच आहे. माणसाने माणसाला माणसासारखे वागवणे, हा सहअस्तित्वावर श्रद्धा असणाऱ्या जगाचा क्रमविकासातील कल्याणाचा मार्ग आहे.

दहशतवाद, आतंकवाद, युद्धे ही काही माणसाची गरज नाही. ‘वसुधैव कुटुंबकम्’ विचारांनी वागणे घडत राहणे आवश्यक आहे. विचार कोणताही असो, तो एकांगी असून चालत नाही. टोकाच्या विचारातून विधायक परिवर्तन घडून येण्याची शक्यता कमीच असते. विचारांना धार जरूर असावी, त्यांची तलवार होऊ नये. टोकाच्या विचारांनी जगाचे कल्याण घडले आहे, असे कधीच ऐकिवात नाही. अशा विचारांनी वर्तणारी माणसं आश्वस्त करणारं कोणतंही नवं जग निर्माण करू शकत नाहीत. समजा त्यांच्या मनासारख्या जगाचं चित्र त्यांनी तयार केलं, तरी त्यात असणाऱ्या आकृत्यांना कोणत्या रंगांनी रंगवणार आहेत? माणूस नावाचं चित्र नितळ रंगांनीच रंगवावं लागतं. हे रंग स्नेह, सौहार्द, समर्पण, सहअस्तित्वाचे असायला लागतात. या रंगाशिवाय तयार केलेले चित्र कितीही देखणे वगैरे असले, तरी त्याला जिवंतपणाचा स्पर्श नसतो. ज्यात चैतन्य नाही, त्या जगाचे स्वामित्व संपादन करून कोणी महान वगैरे झाल्याचा इतिहासात कोणताही दाखला असल्याचे पुरावे नाहीत. विचारांचा जिवंतपणा संपला, की माणसांच्या जगण्यातील चैतन्य हरवते. चैतन्य हरवलेल्या जगात माणसांचं जगणं घडतं का? या प्रश्नाचे उत्तर ज्याने-त्यानेच शोधलेले बरे, नाही का?