Manasa Manasa | माणसा माणसा

By
‘माणसा माणसा कधी होशील रे माणूस?’ कवयित्री बहिणाबाईनी आपल्या कवितेतून हा प्रश्न विचारून काही दशके लोटली आहेत. पण अद्याप या प्रश्नाचे उत्तर काही माणसाला मिळालेय, असं वाटत नाही. कारण ज्याला हा प्रश्न विचारला त्याला ‘माणूसपण’ म्हणजे काय, हे पूर्णतः कळलेले आहे असे म्हणवत नाही. कळले असते तर माणूसपणाची आठवण करून द्यायची आवश्यकताच राहिली नसती. माणूस दिसतो इतका सहज, साधा, सोपा नसतोच. त्याच्याकडे सामाजिक संस्कारांची श्रीमंती किती, हे समजून घेण्यासाठी कोणत्यातरी निकषांच्या मोजपट्ट्या वापरून तो मोजता येत नाही. समजून घेण्याचा प्रयत्न केला, तरी तो पूर्णतः समजून घेता येईलच असे नाही. माणूस निसर्गाची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे, असे म्हणताना कितीही चांगले वाटत असले, तरी तो तसा असेलच याची खात्री देणे अवघड आहे. म्हणूनच कदाचित माणसाला ओळखताना काहीतरी निसटतेच. त्याला समजून घेताना वर्तनाची संगती नीटशी न लागल्यानेच ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’, असे म्हणून या प्रश्नाला त्याच्या तदानुषंगिक वर्तनव्यवहारावर सोडून दिले जाते. तसेही माणसे जशी दिसतात तशीच असली पाहिजेत, असेही काही नसते. म्हणूनच तो कसा असेल, हे सांगणे अवघड असते. 

माणूस ओळखण्यात काहीतरी त्रुटी राहतातच. त्या स्वीकारून वर्तनाचे व्यवहार ठरवावे लागतात, करावे लागतात. माणूस कसा असावा, कसा नसावा अशा काही चौकटी तयार करून त्याच्या जगण्याला नियंत्रित करण्याचे प्रयत्न घडत राहिले आहेत. त्यातून माणूसपणाची सर्वमान्य नसेल; पण सुलभ व्याख्या करण्याचा प्रयत्न झाला. समाजमान्य विचारांच्या चौकटींत काही माणसे स्वतःला घडवत असतात, काही माणूस म्हणून घडवले जातात. काही चौकटींमध्ये चपखल बसू शकत नाहीत. त्यांचं जगणं त्यांच्यापुरती शोधयात्रा ठरते. विधायक वाटांची निर्मिती करून वर्तणारे समाजात वेगळे ठरतात. मळलेल्या वाटांनी प्रवास नाकारणाऱ्यांना नवी क्षितिजे खुणावत असतात. परंपरांचे बंदिस्त वर्तुळ त्यांच्या विचारांना मान्य नसते. समाजमान्य चौकटींच्या व्याख्येत स्वारस्य नसते, त्यांच्या वर्तनसंगतीवर विशिष्ट मतांचे लेबले लावली जातात. गर्दीत वेगळेपण जपणारे वेडे ठरतात. मी कोण? हा प्रश्न ज्यांच्या मनात निर्माण होतो त्यांना जगावे कसे, हे प्रश्न सहसा पडत नाहीत. मळलेल्या वाटांनी चालत जाणाऱ्यांना मुक्कामाचे कोणतेही नवे प्रदेश शोधता येत नाहीत. समाजनिर्मित विचारच ग्राह्य आहेत, असे समजून चालणाऱ्यांच्या जगण्यावर समाज आपल्या मान्यतेची मोहोर अंकित करीत असतो. माणसांसाठी समाजच सारं काही असतो, असे मानणाऱ्यांना व्यवस्थाच आपल्या साच्याच्या आकारानुसार घडवीत असते. व्यवस्थेचे घटक होऊन ते जगतात.

समाजनिर्मित विचारांच्या मार्गावरून चालताना मर्यादांचे उल्लंघन माणसांकडून घडू नये म्हणून देव, धर्म, वंश, पंथ अशा चौकटी उभ्या केल्या जातात. मर्यादांचे बांध घालून माणसाच्या जगण्याला संयमित, नियंत्रित केले जाते. चौकटींना स्वेच्छेने स्वीकारणारे जगण्याचे प्रयोजन समाजनिर्मित बंधानांच्या वर्तुळात शोधू लागतात. देव, धर्म त्याच्या जगण्याचे आधार ठरतात. वैयक्तिक समाधान मिळवण्यापुरते हे सीमित असेल तर काही प्रश्न नसतो. पण आधार जेव्हा विशिष्ट अभिनिवेश धारण करून प्रकटतात, तेव्हा प्रश्नांचा गुंता अधिक वाढत जातो. देवधर्मादी गोष्टींना वैयक्तिक मर्यादांची कुंपणे असतील, तर कोणाची काही हरकत असण्याचा प्रश्न नसतो. पण कोणत्यातरी निमित्ताने इतरांवर थोपवण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा ते माणूसपणाच्या अफाट आभाळाला बाधित करतात. कोणत्यातरी विशिष्ट वर्तुळातील विचार अंगिकरून घडत जाणारी जीवनप्रणालीच वास्तव असल्याचे वाटायला लागते. प्रगतीचे पंख लेऊन विहार करणाऱ्या विचारांना परिस्थितीचा पायबंद घातला जातो. टोकाचा एकेरी विचार आपला वाटायला लागतो. एकांगी विचारांनी वर्तताना पहिला बळी जातो, तो सहिष्णुतेचा.

माणसांच्या शेकडो वर्षाच्या वाटचालीच्या मार्गावरील आश्वस्त करणारा विसावा म्हणजे चिंतनातून, अनुभवाच्या संकलनातून त्याने संपादित केलेले सकारात्मक विचार. असा विचार करणारी माणसं उमेदेपणाने मान्य करतात की, आपल्या मतापेक्षा आणखी काही इतर मते असतात. त्यांनाही काही अर्थ असतो. आपण जसे आहोत तसे इतरही समूह, विचारधारा इहतली आहेत. त्यांचेही काही विचार असू शकतात. जीवनविषयक काही प्रणाल्या असू शकतात. मतप्रवाह असू शकतात. काही जीवनश्रद्धा असतात. हे वेगळेपण मान्य असणाऱ्यांकडून भिन्न विचारधारांच्या एकत्रीकरणातून विधायक प्रवाह निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. या प्रवाहाने नीतिमत्तेच्या तीरांना धरून वाहत राहावे. समाजमान्य नैतिकतेच्या परिभाषेत आपलं अवकाश शोधावं अन् सद्विचारांचा जागर घडत राहावा. समाजाची अशी अपेक्षा असते. विधायक अपेक्षांना केंद्रस्थानी ठेऊन जगणे म्हणजे माणूसपण, असा विचार दृढ होत जातो. विचारांचं व्यापकपण सोबत घेऊन जगणारी माणसं ‘खरं ते माझं’ म्हणत घडत असतात, वाढत असतात. त्यांच्या असण्याने जगण्याला अक्षय आशय प्राप्त होतो. व्यापकपणाचे लेणे घेऊन येणाऱ्या विचारांना वैयक्तिक स्वार्थातून संकुचितपणाचे कुंपण घातले जाते, तेव्हा ‘माझं तेच खरं’ असे म्हणणारा विचार रुजत जातो, वाढत जातो. इहतली प्रेमाचे परगणे बहरत जाण्याऐवजी विद्वेषाचे वणवेच वाढत जातात.

‘कळते पण वळत नाही’, ही केवळ भाषिक प्रवाहाला समृद्ध करणारी अक्षररचना राहायला नको. जसे कळते, तसेच वळण जगण्याला दिल्यास परिसरात प्रसन्नतेचा परिमल निर्माण होतो. स्वार्थाची आरती करणाऱ्या जगात सहजपणाचा गंध हरवतो. जे आपल्याकडचे नाहीत, आपल्या मतांशी सहमत नाहीत, ते कुठेच असण्याच्या पात्रतेचे नाहीत, असा विचार प्रबळ होत जाणे मूल्यप्रेरित विचारांवरचा आघात असतो. विरोधाला विचारांनी नाही, तर शस्त्रांची संपवण्याची मानसिकता दृढ होत आहे. जीवनाच्या आकाशात अविचारांचे मळभ दाटत आहे. कोणतातरी विशिष्ट देव, धर्म, वंश हाच जगण्याचा सम्यक मार्ग आहे, अन्य मार्गांनी वर्तणे, ते विचार आचरणात आणणे अयोग्यच, असा संकुचित विचार वाढतो आहे. विद्वेषाचे वणवे निर्माण करणारे हात पुढे येत आहेत. आपली विचारधारा हीच जगण्याची सर्वश्रेष्ठ प्रणाली आहे, असे वाटू लागल्यावर इतरांच्या स्वातंत्र्याचा संकोच होणे अटळ ठरते. संकुचित विचार नाकरणाऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी निसंकोचपणे शस्त्रे हाती धरली जातात. माणसं किड्यामुंग्यांसारखी संपवली जातात.

आपल्या विचारांनाच श्रद्धा समजणारी माणसं विवेक हरवून बसतात. त्याच्या दृष्टीने आपणच खरे आहोत आणि आपली विचारप्रणालीच वास्तव जीवनपद्धती आहे. आपली जीवनपद्धतीच श्रेष्ठ आहे असे वाटायला लागल्यावर वर्तनात विसंगत उन्माद वाढत जातो. उन्मादी हात माणसांचेच असले, तरी ते आपल्या विचारांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्याना संपवण्यासाठीच असतात, असे वाटायला लागते. पाशवी हात पेशावरच्या शाळेतच उगारले जातात असे नाही, तर अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य धारण करून जीवनपद्धतीतील विसंगतीवर भाष्य करू पाहणाऱ्या, जगण्यातील व्यंग चित्रित करणाऱ्या जीवनचरित्रांनाही रक्तरंजित करीत असतात. शिक्षणाच्या वाटेने शतका-शतकांचा वैचारिक अंधार दूर करू पाहणाऱ्या मानिनीचा देह संपवण्यासाठी हाती शस्त्र धारण करून उभे राहतात. कोणत्यातरी रस्त्यावर बॉम्ब बनून निरपराध्यांच्या जीवनाचा संहार घडवीत असतात. अविवेकी विचारांना देशकालपरिस्थितीच्या कोणत्याही सीमा अवरुद्ध नाही करू शकत. अविचारांने वर्तणारे कोणत्याही देशप्रदेशांच्या सीमांवर सहज दिसतील. त्याकरिता एखाद्या विशिष्ट परगण्यात जाऊन शोधण्याची आवश्यकता नाही.

विज्ञानतंत्रज्ञानाने मंडित जगाचा प्रवास कसा असावा? या प्रश्नाचे उत्तर माणसांना एव्हाना मिळायला हवे होते. पण विज्ञानतंत्रज्ञानाचा जीवनातील वापरच हल्ली प्रश्नांकित होत चालला आहे. विज्ञानांतून माणसाच्या जगात भौतिक सुखांची निर्मिती करू पाहणारे आहेत. तसे विनाशाचे वणवे निर्माण करणारे अविचारीसुद्धा आहेत. ‘माणसाचे हात उभारण्यासाठी असतात, उगारण्यासाठी नसतात.’ हा विचार पुस्तकांत बंदिस्त होत चालला आहे. माणसाने सन्मानाने जगावे. इतरांनाही तसेच जगू द्यावे, हा विचार मूल्यांच्या पाठापुरता सीमित राहिला आहे. अन्याय, अत्याचार, उपेक्षा वाईट असतात. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात अन्याय घडू नये. कुठे घडत असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी अविचारांचा संग स्वीकारणे योग्य आहे का? आपण जे करतोय, ते योग्य आहे का? हा प्रश्न अशा विचारांनी वर्तणाऱ्याच्या मनात उदित होत नसेल का? मान्य करू या, तुमच्यावर व्यवस्थेकडून अन्याय घडला असेल. त्याच्या निराकरणासाठी आहेत ना अन्य न्यायसंमत मार्ग. त्या मार्गाने तो मिळवून पहा. कदाचित त्यासाठी उशीर होईल, पण फलित चिरंतन असेल. अन्यायाला वाचा फोडण्याचा मार्ग निरपराध्यांच्या जगात त्याहून भीषण अन्याय घडवून आणणे, असा असू शकत नाही.

जगाच्या इतिहासाची पानं उलटून पाहिली तर रक्ताळलेल्या पावलांचे अनेक ठसे आजही दिसतील. स्वयंघोषित अस्मितांच्या संवर्धनाच्या निमित्ताने त्या-त्यावेळी संघर्ष घडले. अशा संघर्षातून रक्तलांछित अध्याय लेखांकित होताना कोणत्या तत्वांची निर्मिती घडत होती? जगण्याचे कोणते तत्वज्ञान मांडले जात होते? याचे उत्तर अद्याप मिळायचे आहे. वैयक्तिक स्वार्थ, टोकाच्या महत्त्वाकांक्षांनी घडलेल्या संघर्षातून जगातील लाखो निरपराध्यांच्या जीवनाचा अध्याय संपवला. जगात झालेल्या महायुद्धांनी जेवढी जीवित, वित्तहानी घडली नसेल, तेवढी देवधर्मवंशाच्या नावाने घडल्याचे इतिहासाच्या परिशीलनातून दिसेल. विश्वातील कोणताही धर्म, त्याचं तत्वज्ञान हिंसेचे समर्थन कधीच करीत नाही. अवघं विश्व एकाच चैतन्याचा आविष्कार असल्याचे मानले जाते. तरीही माणसे असं का वर्ततात? या प्रश्नाचे उत्तर मिळणे अवघड होत आहे. माणुसकीधर्मच महान असल्याचे दाखले जागोजागी उपलब्ध असूनही, संकुचित मनाची मूठभर स्वार्थांध माणसे हा कोणता खेळ खेळत आहेत? त्यांना कोणत्या तत्वांची प्रतिष्ठापना करायची आहे? देवधर्म ही आचरणाची, मानण्याची पद्धत असेल, तर ती जितकी सार्वत्रिक आहे, तितकीच वैयक्तिकही. स्वार्थाच्या परिघात वर्तणाऱ्यांकडून आपण अंगिकारलेल्या विचारांनाच तत्वांचे अधिष्ठान समजण्याचा प्रमाद घडतो आहे. देवधर्म जगण्यासाठी आवश्यक आहेत की नाही, हा ज्याच्या-त्याच्या आवडीचा, निवडीचा भाग झाला. मतभिन्नतेचा विषय असू शकतो. जगण्यासाठी तो आवश्यक आहे का? या प्रश्नाचे उत्तर ज्याचं त्यानेच शोधायला हवे. ज्याची जशी श्रद्धा, तसे त्याचे वर्तन असावे. इतरांनीही त्याच मार्गाचे अनुसरण करावे. तसेच त्याचे वागणेही घडावे, अशी अपेक्षा करण्यात माणूसपणाचे कोणते शहाणपण सामावले आहे?

माणूस देवधर्माशिवाय एकवेळ जगू शकेल, पण त्याच्या जगण्याचा धर्म शांततेशिवाय अर्थहीन असेल. अशा जगण्याला काही अर्थ असेल का? देवधर्म शब्दांचा आहे त्याशिवाय संयम, सौहार्द, सहिष्णूता, सहजीवन, सहअस्तित्व असा एक व्यापक अर्थ असायला काय हरकत असावी? काहीच नाही; पण देशप्रदेशाचे स्वार्थ साधताना आपापली पोळी भाजणाऱ्यांना हे समजून सांगणे अवघड आहे. माणसांच्या जगण्याचे प्रश्न काय कमी आहेत. त्यावर अद्याप सर्वसमावेशक उत्तर माणूस शोधू शकला नाही. तर देवधर्म नावाची व्याप्ती तपासताना कोणती उत्तरे त्याला मिळणार आहेत. जगण्याच्या अनेक प्रश्नांची वादळे समोर असताना एकांगी विचाराना प्रतिष्ठा प्राप्त होणे हा दुर्दैविलास आहे.

जगात अशी लाखो माणसे आहेत, ज्यांना जगण्यासाठी हातावर पोट घेऊन आला दिवस कसातरी ढकलावा लागतो. धड दोन घासही त्याच्या मुखी सन्मानाने आमची व्यवस्था देऊ शकत नसेल, तर माणूसपणाचे मखर तयार करून का मिरवून घ्यावे? विज्ञाननिर्मित समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरण्याऐवजी अज्ञानाचा अंधार अधिक गडद होत आहे. अंधश्रद्धा आहेत, अनारोग्य आहे. अनेक प्रकारच्या विसंगती जगण्यात आहेत. ही दूरिते माणसाला का दिसत नाहीत? की दिसूनही सोयिस्कर दुर्लक्ष करायची सवय करून घेतली आहे. समाजातील मूठभर माणसांच्या जीवनशैलीतील घडलेला बदल, म्हणजे समृद्धी नाही. संपन्नतेचे पथ सर्वत्र निर्माण होणे आवश्यक आहे. जगातील दुःख, दैन्य, दास्य संपवणे ही मोठी समस्या समोर असताना त्याकडे दुर्लक्ष होणं, हा काही विज्ञानविचारांनी निर्मित जगाचा चेहरा नाही.

माणूस नावाचा प्रवास संकुचिततेकडून सर्वंकषतेकडे घडणे आवश्यक असते. पर्याप्त समाधान प्राप्तीसाठी विश्वातील सारीच माणसं धडपड करीत असतात. वाटचालीचा प्रवास अधिक व्यापक उद्दिष्टांकडे असावा लागतो. कोणतीही एककेंद्री व्यवस्था जगण्याचे विस्तीर्ण आभाळ माणसाला देऊ शकत नाही. म्हणूनच राजेशाही, हुकूमशाही विचारांकडून लोकशाही विचारांकडे वाहणारा प्रवाह माणसांना अपेक्षित असतो. ‘बहुजन हिताय’ विचारांच्या दिशेने जाणारा मार्गच जीवनाचे शाश्वत दर्शन आहे. विषम विचारांनी वर्तणारे जग जीवनयात्रेतील आनंद नसतो. जगाची सार्वकालिक आवश्यकता शाश्वत शांतता हीच आहे. माणसाने माणसाला माणसासारखे वागवणे, हा सहअस्तित्वावर श्रद्धा असणाऱ्या जगाचा क्रमविकासातील कल्याणाचा मार्ग आहे.

दहशतवाद, आतंकवाद, युद्धे ही काही माणसाची गरज नाही. ‘वसुधैव कुटुंबकम्’ विचारांनी वागणे घडत राहणे आवश्यक आहे. विचार कोणताही असो, तो एकांगी असून चालत नाही. टोकाच्या विचारातून विधायक परिवर्तन घडून येण्याची शक्यता कमीच असते. विचारांना धार जरूर असावी, त्यांची तलवार होऊ नये. टोकाच्या विचारांनी जगाचे कल्याण घडले आहे, असे कधीच ऐकिवात नाही. अशा विचारांनी वर्तणारी माणसं आश्वस्त करणारं कोणतंही नवं जग निर्माण करू शकत नाहीत. समजा त्यांच्या मनासारख्या जगाचं चित्र त्यांनी तयार केलं, तरी त्यात असणाऱ्या आकृत्यांना कोणत्या रंगांनी रंगवणार आहेत? माणूस नावाचं चित्र नितळ रंगांनीच रंगवावं लागतं. हे रंग स्नेह, सौहार्द, समर्पण, सहअस्तित्वाचे असायला लागतात. या रंगाशिवाय तयार केलेले चित्र कितीही देखणे वगैरे असले, तरी त्याला जिवंतपणाचा स्पर्श नसतो. ज्यात चैतन्य नाही, त्या जगाचे स्वामित्व संपादन करून कोणी महान वगैरे झाल्याचा इतिहासात कोणताही दाखला असल्याचे पुरावे नाहीत. विचारांचा जिवंतपणा संपला, की माणसांच्या जगण्यातील चैतन्य हरवते. चैतन्य हरवलेल्या जगात माणसांचं जगणं घडतं का? या प्रश्नाचे उत्तर ज्याने-त्यानेच शोधलेले बरे, नाही का?

0 comments:

Post a Comment