कविता समजून घेताना ... भाग: तीन

By // No comments:

दगडी खांबांचे आकाश
 
दगडी खांबांच्या आकाशाखाली
पडाव पडला आहे
बिऱ्हाडाभोवती दगडांच्या गराड्यात
कोंबड्या दाणे टिपताहेत
अर्धवट आकारातल्या दगडमूर्तींसोबत
उघडीवाघडी मुले खेळतायेत
जुनेऱ्यातल्या बाया
अजिंठ्यातल्या मग्न शिल्पांसारख्या
दगडावर टकटक करताहेत
माणसांच्या अंगावरील घाम
पाषाणमूर्तीच्या अंगात जिरतो आहे

या अंगाने त्या अंगाने पहात
माणसे दगडात जीव ओतताहेत
बोटे फुटताहेत, रक्ताळताहेत
मूर्ती आकाराला येताहेत
माणसांशी सुखदुःखाचे बोलताहेत
वेदनेचे मोल जाणून घेण्यासाठी
ऊनवाऱ्यात तिष्ठत उभ्या आहेत
दगडांच्या चुलीवर भूक खादखदते आहे
रस्त्याकडेला दगडधोंड्यासोबत
दगडी खांबांच्या आकाशाखाली
एक संस्कृती नांदते आहे

बाया, लेकरे अन दगड मूर्तीचा
लवाजमा घेऊन ते जातील
दगडी खांबांचे नवे आकाश त्यांना दिसेल
तिथे ते पडाव टाकतील
दगडधोंड्यांसोबत जतन करून ठेवलेली
परंपरा तिथेही पेरतील
तिच्यात चैतन्य ओततील, थकलेभागले
दगडी खांबांच्या आकाशाखाली झोपी जातील

- पांडुरंग सुतार, पाचोरा
••   
    
इहतली नांदणाऱ्या सकल सुखांच्या केंद्रस्थानी माणूस असावा. सुखांचे प्रवाह त्याच्या दिशेने वाहत राहावेत. नसले तर वळते करता यायला हवेत. परिस्थितीचे घाट बांधून त्यांना थांबवता यायला हवे. अशी अपेक्षा वंचितांच्या मनी अधिवास करून असेल, तर त्यात काही वावगे नाही. शेवटी माणूस महत्त्वाचा. पण असं चित्र सार्वकालिक कधी होतं? सार्वत्रिक तर नव्हतंच. हे असं सगळं घडवणं असंभव नसलं, तरी अवघड होत आहे, एवढं मात्र नक्की. कारण प्रत्येकाने आपल्याभोवती संकल्पित सुखांची कुंपणे घालून घेतली आहेत. मर्यादांचे बांध पडलेल्या वर्तुळातील संचाराला माणूस सुख म्हणतो आहे. माणूस काळाचा निर्माता नसला, तरी परिस्थितीचा उद्गगाता अवश्य असतो. परिस्थितीने केलेले आघात त्याचं माणूस म्हणून असणंनसणं अधोरेखित करीत असतात. आहे रे आणि नाही रे, हा कलह इहतली सुखनैव नांदतो आहे, शतकांपासून आणि त्याने माणसांच्या आयुष्यातून निरोप घेणे अवघड आहे. समतेचे स्वप्न पाहणाऱ्या जाणत्यांनी विषमतेच्या वाटा बुजण्याचे अनेक प्रयत्न करूनही हाती फार काही लागत नाहीये.

आभाळाच्या अफाट छताखाली किती माणसे आणि किती पिढ्यांचे आयुष्य अभावात सरले, कोणास माहीत. जगाने श्रीमंत माणसांच्या नावांची यादी देण्याची सोय करून घेतली आहे; पण गरीब कोण, याची व्याख्या अद्याप काही करता आलेली नाही. हरवलेल्या क्षितिजांचा शोध घेत टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण करणारी माणसे अजूनतरी स्वातंत्र्य शब्दाचा अर्थ समजू शकली नाहीत. अखंड कष्ट उपसित आपल्या ओंजळभर अस्तित्वाला अधोरेखित करीत जगण्याला नवे आयाम देण्याचा प्रयत्न करीत आहेत. छिन्नी-हातोडा-फावडा हाती घेऊन आला दिवस भाकरीचा शोध घेत आहेत. समजा या औजारांऐवजी त्यांच्या हातात हत्यारे आली तर... जगाचा इतिहास काही वेगळा आकारास येईल? माहीत नाही, पण धरती शेषाच्या फण्यावर नाही, तर कष्टकऱ्यांच्या हातावर तरलेली आहे, हे अण्णाभाऊ साठेंचं विधान श्रमिकांच्या अपार कष्टाला अधोरेखित करते. ज्यांच्या नावाची नोंद कुठल्याही सातबाऱ्यावर नाही. ज्यांना नमुना आठ काय आहे, माहीत नाही. अशांचे जगणे रोजच संघर्ष असतो, नियतीने केलेल्या अन्यायाविरोधात झगडा असतो तो. तसाच आपणच आपल्याशीही.

भाकरीच्या शोधात बाहेर पडलेलं बिऱ्हाड अफाट आभाळाच्या सावलीखाली कुठेतरी विसावलेलं. आसपास पडलेले दगड. हे दगड यांच्या जगण्याला आश्वस्त करणारे. नियतीने पदरी घातलेल्या आयुष्याचा अस्ताव्यस्त पसारा. चरणाऱ्या कोंबड्या आणि अर्धवट आकाराला आलेल्या मूर्तींसोबत खेळणारी उघडीवागडी पोरं. अंगावरील जुनेऱ्यासोबत दगड कोरणाऱ्या बाया आणि पाषाणमूर्ती घडवताना घामाघूम झालेली माणसे. श्रम करूनही हाती शून्य आणि आणि सोबतीला अनेक अनुत्तरित प्रश्न. अभावाचाच प्रभाव असणारं जिणं. असं का घडावं? या प्रश्नाचा शोध घेण्यात झालेली दमछाक. सुखाचं चांदणं का हाती लागत नसेल? याची मनाला सलणारी खंत घेऊन एक वंचना येथे नांदते आहे.

दगडाला आकार देणाऱ्या माणसांना देव घडवता आला, पण माणसाच्या मनातल्या दगडाला काही कोरता आलं नाही. दगडाने नव्या आकारात स्वतःला मढवून घेतलं, पण माणसांनी स्वतःला सजवून घेण्यासाठी तयार केलेली मखरे काही बदलली नाहीत. भौतिक प्रगतीच्या परिघात सुखांचा शोध घेणाऱ्यांना भुकेचा परीघ काही समजला नाही. फॅशन बदलली म्हणून घरातील कपड्यांच्या संखेत भर पडते. सुखांचा राबता आपल्याकडे असावा म्हणून मनात अधिवास करून असलेली असोसी. आजच्या गोष्टी उद्या कालबाह्य होतात, म्हणून नव्याचा सोस काही सुटत नाही. नवेही काही चिरंजीव नसते. हे माहीत असूनही सगळेच प्रवाह सुखाच्या उताराने वाहते ठेवण्यात माणसे धन्यता मानत आहेत. आर्थिक प्रगतीचे आलेख आकाशाच्या दिशेने पाहत निघाले आहेत, पण अखंड कष्ट करूनही बायकोच्या, मुलांच्या अंगावर एक नवा कपडा देण्याइतपतही एखाद्याची कमाई नसावी, याला कोणत्या समानतेच्या चौकटींच्या साच्यात बसवता येईल?

माणसे दगडात देव शोधतायेत. दगडाला देवत्व देणारे हात दगडाच्या उडणाऱ्या टवक्यांनी घायाळ होतायेत, पण विषमतेच्या प्रतलावर उभ्या असणाऱ्या व्यवस्थेचा टवका काही त्याला काढता येत नाही. यांच्या श्रमातून कोणाचा तरी देव आस्था बनून आकाराला येणार आहे. दगडाला देवत्व देता येतं, पण तोच देव माणसाला माणुसकी का शिकवू शकला नसेल? त्याला समानतेच्या पातळीवर का आणू शकला नसेल? खरंतर देवाला टीचभर पोटाचा प्रश्न सोडवणं काय अवघड आहे? प्रश्न आस्थेचा असेलही. देव असला नसला, म्हणून प्रश्न काही बदलत नाहीत. संस्कारांच्या श्रीमंतीसाठी माणसाने देव घडवला, पण माणूस माणसाला घडवायला कमी पडला. संस्कृतीचा प्रवाह हजारो वर्षाचं संचित जमा करून वाहतो आहे. अधिक परिणत होण्याच्या दिशेने. विश्वात काय काय असेल नसेल, माहीत नाही. पण पोटात खड्डा पाडणारी भूक मात्र अनवरत सोबत करते आहे आणि तिचा शोध घेण्यासाठी घडणारी वणवणही. भाकरीचा परीघ शोधण्यासाठी वणवण करणारी वंचितांची एक संस्कृती इहतली सतत नांदते आहे, कष्टाच्या गाथा रचित. नेमका प्रश्न येथेच उभा राहतो. काहींकडे सगळंच असावं, काहींकडे काहीच नसावं, असं का? संस्कृती काही भाकरीपेक्षा मोठी नसते. भाकरीचा परीघ विश्वव्यापी आहे आणि तोच आपल्यात एक संस्कृती घेऊन नांदतो आहे.

आयुष्यातून हरवलेलं सुखाचं ओंजळभर चांदणं शोधण्यासाठी वणवण करणारी माणसे आज येथे असतील, उद्या आणखी कोठे असतील, पण भाकरीचा प्रश्न सगळीकडेच सोबत असेल. दगडाला देवपण देणाऱ्यांना माणसातल्या देवत्वाचा अंश शोधण्यासाठी आणखी दुसरे आकाश शोधावे लागेल. सगळा लवाजमा घेऊन भटक्यांचे संसार आणखी कुठल्या तरी आभाळाचा तुकडा शोधत निघतील. आपल्या परंपरा तेथे पेरतीलही. तिचे अंकुर तेथल्या मातीत रुजतील का? त्यांचं भविष्य कोणत्या मातीतून उगवेल? माहीत नाही. पण अशाच कुठल्यातरी दगडी खांबाच्या आकाशाखाली एक निद्रा चैतन्याचे मळे फुलवण्याचे स्वप्न पाहत असेल. स्वप्ने सुंदर असतीलही, पण वास्तवाचं कुरूपपण कसे विसरता येईल.         

काळाचे पेच अधिक गुंतागुंतीचे होत आहेत. नव्या समस्या, नवे प्रश्न समोर येतायेत. आयुष्याचा परीघ रोजच आक्रसतो आहे. आसपास वास्तव्य करणाऱ्या फाटक्या माणसांच्या मनात असुरक्षितता अधिवास करून आहे. माणूस माणसापासून सुटतो आहे, मनातून तुटतो आहे. परिस्थितीशरण अगतिकता अधिक वेदनादायी ठरते आहे. माणूस माणसाला विस्मृतीच्या कोशात ढकलून ‘स्व’साठीच जगू लागतो आणि अशा जगण्याला प्रमाण मानतो, तेव्हा माणुसकी शब्दावरचा विश्वास उठायला लागतो. माणसे नुसत्या चेहऱ्यानेच नाही, तर विचारांनीही हरवत आहेत. जगण्यात एक उपरेपण येत आहे. हे उपरेपण माणसांच्या माणूस म्हणून असणाऱ्या स्थानाला धक्का देत आहे. माणसे विस्थापित होत आहेत. विस्थापन प्राक्तन होत आहे. समस्यांच्या जंजाळातून मुक्त होण्याच्या वाटा शोधतांना माणसे संभ्रमित होत आहेत. संयमाचे बांध फुटत आहेत. व्यवस्थेत एक साचलेपण आले आहे. जुन्या-नव्याचा संघर्ष माणसाला काही नवा नाही. नव्याच्या पाठीमागे धावणे टाळता येत नाही. जुने टाकता येत नाही आणि नवे अंगीकारता. या निवडीच्या संभ्रमात बहुतेकांचा अभिमन्यू होणे अटळ होते आहे. नवा अवकाश आकारास येतो आहे. मृगजळी सुखांचे विभ्रम दिसू लागले आहेत. जगण्याचे नवे साचे घडवले जातायेत.

कवीला आसपास पाहता न्याहाळता यावच, पण वाचताही यायला हवा. तो समजून घेता यायला हवा. सामान्यांच्या संवेदनांशी सोयरिक सांगणारी अभिव्यक्ती असली की, अभिनिवेशाचे साज चढवून शब्दांना सजवायला लागत नाही. ही कविता अंतरावर उभी राहून स्वतःला अन् आसपासच्या आसमंताला निरखत, संवेदनशील भावनांचे तीर धरून वहात राहते. संस्कृती एक प्रवाह असतो अनवरत वाहणारा. त्याला अनाहत राखायची आवश्यकता सार्वकालिक आहे. श्रमसंस्कृतीने येथील मातीला सत्व दिले आणि मातीने माणसांना स्वत्व. काळाच्या प्रवाहात स्वत्व विसरलेली माणसे सत्व कसे टिकवतील, हा प्रश्न अधिक जटील होतो आहे. श्रमाला संस्कृती मानणारे दगडधोंड्यांसोबत परंपरा पेरतील, हा आशावाद या कवितेत जागता आहे. अन् तोच आधाराचा खांब आकाशाला अथांगपण देणारा आहे. म्हणूनच माणसांच्या अफाट असण्याला, अमर्याद असण्याला अस्थिरतेचा अभिशाप नसावा, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना... भाग: दोन

By // 1 comment:
बापाला शहरात करमत नाही


आभाळानं भरगच्च कोसळल्यावर
पिकानं तरारून यावं
तसा भरभरून येतो बाप
मुलानं शहरात बांधलेल्या
टुमदार बंगल्यात शिरताना

हयातभर राबूनही बांधता आल्या नाहीत
मातीच्या चार भिंती
आणि चार वर्षात बांधलं पोरानं
टोलेजंग घर
जीव हरखून जातो त्याचा

पीक कर्जासाठी शंभरदा फिरवणा-या बँका
दहा लाख देतात दोन दिवसात
घर बांधायला
ऐकून अचंबीत होतो बाप
व्याज खाणं हे पाप आहे
हे पक्क बसलेल्या त्याच्या डोक्यात
शिरत नाही बँकांचं कौटिल्यीय अर्थशास्त्र

शेण-माती तुडवून तुटकी झालेली वहाण
कोठे काढावी ?
या यक्ष प्रश्नासह तो प्रवेशतो
चकचकीत संगमरवरी बैठकीत

पोराच्या इस्टेटीत हक्क मागणारा बाप
जन्माला आला नाही अद्याप
कदाचित म्हणूनच
तो बसतो सोफासेटच्या मऊशार कोप-यात
सर्वांग चोरून

संध्याकाळी...
रंगीत युनिफ़ॉर्मला साजेसे बूट घालून
स्कूलबसने ऐटीत परतणा-या नातवांना
तो सांगू शकत नाही
फाटक्या चड्डीत, अनवाणी पायानं
पोराला शाळेत पाठवताना खाल्लेल्या खस्ता
आणि झालेली जीवाची घालमेल
रात्री तो पाहू शकत नाही
टीव्हीच्या पडद्यावर तारुण्याचा धुडगूस
अनवांटेड सेव्हन्टी टू सारख्या जाहिराती
आणि अनैतिक संबंधाचं उदात्तीकरण करणा-या मालिका

मग 'बेसिनमध्ये थुंकू नका'
ही समज आठवत, खोकल्याची उबळ दाबत
तो गुदमरत राहतो पहाटेपर्येंत
डनलफच्या गादीवर
मात्र पिकाच्या वाढीसाठी टिपूसभर पाण्याला
तरसणारा बाप धुडकावून लावतो
संडासमध्ये भरपूर पाणी वापरण्याची सूचना

सकाळी फुरके मारून चहा पिताना
सुटत नाही त्याच्या नजरेतून
नातवांनी दाबलेलं उपरोधिक हसू
सुनेच्या कपाळावरील आठ्या
आणि पोरानं लोकलाजेस्तव
चेह-यावर आणलेलं
बाप-प्रेमाचं उसनं अवसान

मग सुरु होते त्याची लगबग परतण्याची

बाप आता थांबणारच नाही
अशी खात्री झाल्यावर
पोरगा आग्रहाने म्हणतो-
'आला आहात तर थांबा दोन दिवस आरामात'
तो मिस्किलपणे हसतो आणि म्हणतो
बेटा, मला खेडयात रहायची सवय
शहरात मला करमत नाही

- रावसाहेब कुवर, साक्री
••

घर, परिवार, नाती या शब्दांना आस्थेचे अनेक कंगोरे असतात. आपलेपण घेऊन नांदणाऱ्या नात्यांचे रंगच वेगळे, कारण त्यात एक जास्तीचा रंग असतो आणि तो म्हणजे अंतरंग. रक्तदत्त नाती काही ठरवून निवडता येत नाहीत. ती जन्मासोबत येतात, पण त्यांना असणारे अर्थाचे आयाम घडवता येतात. असंच एक नातं बाप आणि मुलाचं. घराला घरपण देणारं. उगवणाऱ्या दिवसासोबत नवा प्रकाश आणि मावळत्या रात्रींच्या साक्षीने चांदणं अंगणी नांदत असल्याचा आनंद देणारं. कदाचित या नात्याचे पदर धरून सुखाच्या चार चांदण्या वेचून आणता येतील, हा आश्वस्त भाव मनात जतन करणारंही. पावसाच्या पहिल्या सरींच्या स्पर्शाने मातीत दडलेल्या बिजाने हुंकार देत हलकेच डोकावून पाहावे, वाऱ्यासोबत डुलत राहावे, आकाशाशी गुजगोष्टी कराव्यात अन् एकदिवस स्वतःच आकाश व्हावे, तसे हे नाते. आस्थेच्या झोपाळ्यावर झुलत राहणारे. जमलंच तर संस्कारांच्या चाकोऱ्यातून चालत स्वतःचं असं काही शोधावं, मिळवावं आणि जगण्यात सामावलेल्या रंगांना क्षितिजभर विखरून टाकावं असं.

मुलाने भले महाल नसेल, पण स्वतःचा टुमदार बंगला उभा केला, याचं बापाला केवढं अप्रूप असतं आणि ते स्वाभाविकही आहे. आयुष्य श्रमाची साधना करण्यात अन् जगणं कष्टाची गाथा रचण्यात गेलेलं. हयातभर अभावात जगताना जीवनाचा शोध घेवूनही ओंजळीत मावेल एवढंही आभाळ मिळवू न शकणाऱ्या बापाला बंगला हा शब्द सुख या शब्दाचा समानार्थी  वाटत असेल, तर त्यात अतिशयोक्त काही नाही. परिस्थितीच्या मर्यादांनी घातलेली कुंपणे ओलांडून स्वतःचा शोध घेत गावाची वेस पार करून गेलेलं पोरगं मनात वसती करून असलेल्या संकल्पित सुखाचे महाल उभे करते झालं, यात तो हरकून जातो. ज्याला आयुष्यात रुपया पौर्णिमेच्या चंद्राएवढा वाटतो, तो मुलाच्या हाती येवून सहज विसावतो, याचंच बापाला आश्चर्य. बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या पायावर उभे राहिलेले इमारतीचे इमले, दोन दिवसात विनासायास मंजूर होणारं कर्ज, हे सगळं गणित बापाला कुतूहलजनक वाटतं. कर्जासाठी शेकडोवेळा उंबरठे झिजवूनही छदाम न देणाऱ्या बँका आणि त्यांची सूत्रे काही त्याला आकळत नाहीत. कदाचित बँकांच्या अर्थशास्त्रात याच्या जगण्याचं शास्त्र सामावू शकत नसेल.

घराच्या चकचकीत सौंदर्याच्या परिभाषेत याच्या शेणा-मातीने माखलेल्या चपला कशा सामावू शकतील? ज्याने संगमरवरी दगडापासून केलेल्या मूर्तीशिवाय आणखी काही पाहिले नाही, त्याच्यासमोर प्रश्न उभे राहतीलच ना! गोणपाटाशिवाय बसायला आणि घोंगडीशिवाय पांघरायला काही मिळालेच नाही, त्याच्यासाठी सोफासेटचा मऊ स्पर्शही अनोळखीच. नामांकित विद्यालयांत अध्ययन करणाऱ्या, रंगीत गणवेश परिधान करून स्कूलबसने परतणाऱ्या नातवांना पोराला शिकवण्यासाठी खाल्लेल्या खस्ता आणि घडलेली घालमेल कळेलच कशी? सुविधांच्या घातलेल्या पायघड्यांवर चालणारी त्यांची पावले मातीच्या मळलेल्या खुणांपासून खूप दूर निघून गेलीयेत. टीव्हीवरचं झगमग जग त्याच्या जगण्याच्या तगमगकडे आस्थेने बघण्याएवढे संवेदनशील राहिलं नाहीये. तेथे सदासर्वकाळ सुखांचे सोहळे रंगलेले. संस्कृतीने निर्धारित केलेल्या चौकटींना फाट्यावर मारून स्त्री-पुरुष नात्यातील संबंधांना स्वैर संचारासाठी स्वातंत्र्याच्या झुली टाकून दिलेलं मुक्त आकाश. कोणतीही संगती न लागणाऱ्या संबंधांच सातत्यानं होणारं उदात्तीकरण त्याच्या आकलनापलीकडील गोष्ट आहे.

सुनेच्या विभक्त कुटुंबातील सुखाच्या संकल्पना साधेपणालाच संस्कार मानणाऱ्या बापाच्या मनी रुजणं अवघड आणि पचनी पडणं अशक्य. घोंगडीवर अंग टाकून निद्रेच्या अधीन होणारी, कष्टाला प्रमाण मानणारी काया डनलफच्या गादीवर गुदमरत राहते. हंडाभर पाण्यासाठी पायपीट करणाऱ्यांच्या वेदना प्रसाधनगृहात मुबलक पाणी वापरणाऱ्यांना कळतीलच कशा? टीव्हीसेट, डिनरसेट, सोफासेटच्या जगामध्ये परफेक्ट सेट झालेल्या, पण मनाने अपसेट असणाऱ्यांचं नातं संवेदनांचा धाग्यांनी कधी विणले जात नाही. स्वतःभोवतीच प्रदक्षिणा करणाऱ्या वर्तमानाचे भविष्य काय असेल? स्वार्थाला परमार्थाची लेबले लावून त्यांचेही इव्हेंट केले जातात, तेथे त्याग, समर्पण, सेवा, सहकार्य आदि गोष्टींना जागा उरतेच किती? संकुचित विचारांना प्रमाण मानणाऱ्या अन् अशा संस्कारांचं सतत सिंचन घडलेल्या पिढ्यांनी कोणता वारसा पुढे न्यावा? बापाने मिळवलेल्या बेगडी सुखांचा की, अभावातही आपल्या ओंजळभर अस्तित्वाचा अन्वय लावत इतरांच्या वेदनांशी नातं सांगणाऱ्या आजोबांच्या साध्या जगण्याचा. वर्तुळांकित सुखात नाहणाऱ्या नातवांचं उपरोधिक हसू कदाचित अज्ञानमूलक असेलही, पण सुनेच्या कपाळावरील आढ्या आणि तिच्या प्रेमपाशात विवेक विसरणाऱ्या पोराचं उसणं अवसान परंपरेच्या कोणत्या चौकटीत अधिष्ठित करता येईल? बापासाठी या साऱ्या असह्य होत जाणाऱ्या गोष्टी. मुलाने मुलायम स्नेहाचा मुखवटा परिधान करून आणखी काही दिवस आपल्याकडे थांबण्याचा आग्रह केला, तरी माझ्यासारख्या खेड्यातल्या माणसाला शहरात करमत नसल्याचं सांगून आपल्या असण्या-नसण्याच्या गणितांचा शोध बाप घेत राहतो.

पित्याने दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी वनवासालाच अधिवास करण्यासाठी आनंदाने मार्गस्थ होणारा राम, प्रज्ञाचक्षू मातापित्याला तीर्थाटनासाठी नेणारा श्रावण, मातापितराच्या सेवेला प्राधान्यक्रम मानून विठ्ठलास तिष्ठत ठेवणारा पुंडलिक इतिहासात हरवलेत की, आम्हीच विस्मृतीच्या कृष्णविवरांमध्ये टाकून दिले? की आपणच आपले संकुचित सुखांचे साचे घडवून सांस्कृतिक वारशाची नव्याने रचना करीत आहोत?

फुलांच्या एकेक पाकळ्या शुष्क होतांना देठापासून निखळत जाव्यात, तसं हे तुटणं आहे. जगण्याचं शून्य विस्तारत असल्याची खंत या कवितेतून मुखरित होते. खरंतर बाप घराचा आधार, आयुष्याचा कणा. घराला पेलून धरणारा खांब; पण त्यालाच परिस्थितीच्या परिवर्तनाने वाळवी लागत आहे. व्यवस्थेच्या परिघावर प्रदक्षिणा करून थकलेली त्याची पावले बदलांच्या वाटांनी चालताना अडखळत आहेत. शेतीमातीत सारी हयात व्यतीत केलेल्या एका स्वप्नाची कहाणी शोकांतिकेचे किनारे गाठते आहे. परिस्थितीने आणलेले भणंगपण अस्तित्वाच्या मुळांशी असलेली नाळ तोडत आहे. आयुष्याचेच रंग उजाड होत आहेत, तेथे नाती कोणत्या मोजपट्ट्यानी मोजता येणार आहेत. विकासाच्या वाटांनी आलेल्या प्रगतीने झगमग आणली. ही बेगडी प्रगती अटळ शोकांतिकेचे शेवटचे अंक लिहित आहे का? ज्यांच्याप्रती आतून आस्थेचा ओलावा पाझरत राहावा, कृतज्ञता प्रकटत राहावी, ते नितळ अंतर्याम आणि व्यवस्था स्वार्थात आणि संकुचित जगण्यात रुपांतरीत होत आहे.

नात्यांची घट्ट वीण असणारी उदाहरणे आजही आहेत, नाही असे नाही. पण हे सगळं दुर्मिळ होत चाललं आहे. स्वार्थपूरित जगण्यातील बदलणाऱ्या विचाराने त्यांनाही नवे आयाम दिले आहेत. विज्ञानाने जग सुखी झालं का? या प्रश्नाचं उत्तर काहीही असो; पण काळाने माणसांना बदलांच्या वाटेने वेगळ्या वळणावर आणून उभे केले आहे. जगण्याचे संदर्भ बदललेत, तशा माणसांच्या नात्यातील प्रवासाच्या वाटाही बदलत आहेत. एकीकडे प्रगतीतून नव्यानव्या साधनांशी मैत्री होत आहे, पण निर्व्याज सहवासाचे सहज सुख कळत-नकळत हरवत आहे. नाती जपण्यासाठी केविलवाणी धडपड चालली आहे. दुरावणारी नाती सांभाळण्यासाठी माणसं धडपड करताना आणि ती तुटली म्हणून कासावीस होताना दिसत आहेत.

जगण्यातले वास्तव दिमतीला घेऊन चालत राहणारी ही कविता समकालाच्या अनेक अनुबंधाना अधोरेखित करीत राहते. बदलांच्या पावलांनी ध्वस्त होत जाणाऱ्या माणसांची, त्यांच्या जगण्यातील गुंत्याची, मुळांपासून सुटत चालल्याची व्यथा व्यक्त करते. बेगडी सुखांच्या सोबत धावताना शहरांच्या गलबलाटात आलेल्या परकेपणाची आणि गावापासून पोरके करण्याची वेदना घेऊन मूल्यांच्या पडझडीबाबत खंत व्यक्त करीत राहते. नात्यांमध्ये निर्माण होणारा अंतराय, माणूसपणाच्या उसवत जाणाऱ्या धाग्यांना समजून घेताना माणूस अधिक संभ्रमित झाल्याची जाणीव व्यक्त करते. आपल्या जगण्याच्या दिशा किती धूसर होत आहेत, हे सांगते. जगण्याचे पोत विटलेले आणि पावलोपावली पेच वाढत चाललेले आहेत. जगण्याची गती वाढली, पण आयुष्याचा गुंता अधिक जटिल होत आहे. विसंगतीच्या वणव्यात आकांक्षा करपत आहेत. आसपासच्या कोलाहलात वेदनांचे आवाज हरवत आहेत. जगण्यावर पसरलेल्या कृष्णछाया अधिक निबीड होत आहेत. जागतिकीकरणाच्या गोंडस झुली पांघरून दारी चालत आलेले परिवर्तन माणसांना अगतिकीकरणाच्या सुळक्यावर उभं करीत आहे. आसपास सुखांची कृत्रिम बेटे तयार होत आहेत. दुभंगत जाणारी मने आणि ध्वस्त होत जाणारी नाती नियतीचा अभिलेख ठरू पाहत आहेत. काळाचे बरेवाईट ओरखडे संवेदनशील मनावर ओढले जातातचं. अशा बहुपेडी पेचानां ओंजळीत पकडणारी कविता म्हणूनच परिस्थितीवरील परखड भाष्य आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त होणार नाही.

चंद्रकांत चव्हाण
••