अभिनिवेश

By // 1 comment:
समाज नावाच्या विस्तीर्ण वर्तुळात विहार करताना माणूस म्हणून प्रत्येकाच्या असण्याचे काही अर्थ असतात. काही पैलू, काही कोपरे असतात अन् काही कंगोरेसुद्धा. त्यातून त्याची प्रतिमा आकारास येत असते. काहीना संकल्पनेप्रमाणे आयुष्याला आकार देता येतो. काहींच्या आकृत्या अर्धवट राहतात. अखंड सायास-प्रयास करूनही हाती काही लागत नाही. एक मोठं शून्य नियतीने कपाळी कोरलेलं असतं. त्याभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणा अटळ भागधेयच असतं त्यांचं. ना आयुष्याचे अर्थ हाती लागतात, ना जगण्याचे संदर्भ. संगतीची सूत्रे शोधायला जावं तर विसंगतीच्या वाटांकडे पावले वळती होतात.

आहे ते पर्याप्त मानून जीवनाचा विनम्र शोध घेता आला की, आनंदाचे वाहते ओहळ शोधायला नाही लागत. सोस सोबत असला की, आहे तेही अपर्याप्त वाटतं. आसपास एक अस्वस्थता दाटत राहते. मग सुरू होते कवायत भाग्याचे साचे बदलता यावेत म्हणून. कदाचित आपल्याकडे आहे त्यापेक्षा अधिक दाखवायची हौस असते म्हणून होत असेल असे कदाचित. समजा तसं असेल तर त्यातून असं कोणतं संचित गवसत असेल की, ज्यामुळे त्याच्या आयुष्याचे अर्थ अन् जगण्याचे संदर्भ बदलून जातील? मनाला क्षणभर मिळणाऱ्या बेगडी समाधानाशिवाय यातून हाती फारसं काहीही पडत नाही खरंतर. हे कळत नाही असं नाही. पण वळत नाही हेच खरं. आपल्याकडे नाही ते दाखवण्याच्या खटाटोपात कोण कोणतं टोक गाठेल, हे सांगणं अवघड. 

प्रदर्शनीय भूमिकेतून अभिनिवेश आकाराला येतात अन् आयुष्याचे एकेक अर्थ बदलू लागतात. ते कुठून, कसे जन्माला येतील याची काही सुनियोजित सूत्रे नसतात. त्यांचे आयते साचेही नसतात. अभिनिवेश कोणतेही असूद्या, त्यांना विस्तार दिसत असला तरी खोली नसते. खरंतर या वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. वैयक्तिक असतील अथवा सामूहिक त्यांना देशप्रदेशाच्या सीमा असतीलच असे नाही. त्यांचा अधिवास सर्वत्र असू शकतो. कधी ते आगंतुकपणे चालत येतात. कधी त्यांना आवतन देऊन बोलावलेलं असतं. त्यांच्या असण्याला समर्थनाचे टॅग लावता येतात. त्यांना विषयाच्या मर्यादा नसतात. ते कोणत्या कारणांनी प्रबळ ठरतील याचे आडाखे नाही बांधता येत. त्यांच्या वैयक्तिक असण्यात माज असतोच, पण सामूहिक असण्याला उन्माद चढतो. वंशीय, धर्मीय अभिनिवेशांनी विश्वात खूप मोठे कलह घडवले आहेत.

माणसाला संघर्ष काही नवे नाहीत. पण प्रत्येकवेळी त्यामागे समर्थनाची नवी प्रयोजने पेरली जातात. हे काही आज घडतंय असंही नाही. जग नावाच्या पसाऱ्यात सामावलेल्या सगळ्याच प्रदेशात यावर खूप मोठं मंथन घडलं आहे. चर्चेच्या माध्यमातून समाज ढवळून निघाला आहे. ब्रुनोला जिवंत जाळलं गेलंय, सॉक्रेटिसला विषाचा प्याला घ्यावा लागला. सॉक्रेटिसला शिष्यांच्या मदतीने पलायनाचे पर्याय उपलब्ध होते, पण त्याने सत्याच्या प्रतिष्ठापनेसाठी त्या पथावरून घडणारा प्रवास नाकारला. मी पलायन करणे म्हणजे सत्याचा मार्ग नाकारून स्वार्थासाठी संकुचित होणे असा होतो अन् हे मला मान्य नाही म्हणण्याइतकं प्रगल्भपण त्याच्याकडे होतं.

वाद कुठे नाहीत? वादांना निर्विवादपणे सामोरे जाता यावे. ते विचारांच्या कक्षेत विहार करणारे असावेत. विचारांनी विचारांचे दिवे प्रज्वलित करावेत. त्याच्या प्रकाशात आयुष्य वाचावे. जगणं वेचावे, कृतीत विचार पेरावेत. यासारखा चांगला विचार आणखी कोणता असू शकतो? आपले विचार रास्त असतील, तर कोणीतरी स्वीकारेलच. नसतील कोणाला मान्य, तो नाकारेल. ते स्वीकारावेत असा आग्रह नको अन् नाकारलेत म्हणून आकस नको. 

आयुष्याकडे बघायचे प्रत्येकाचे काही प्रयोजने असतात. काही प्राथमिकता असतात. त्यांची परीक्षा ज्याची त्यानेच घ्यावी. तपासून पाहावं स्वतःच स्वतःला. धांडोळा घ्यावा आपणच आपला. आयुष्याचे अर्थ शोधताना कधीतरी अनपेक्षित काही समोर येतं अन् आपणच आपल्याला खरवडून काढायला भाग पडतं. पृष्ठभागावर साचलेले धुळीचे थर थोडे बाजूला सारता आले की, दृश्य प्रतिमाने अधिक ठळक होतात, नाही का? 

हे असं काही असतंच आसपास. म्हटलं कुणी असं तर वास्तव अन् नाहीच मानायचं ठरवलं तर अवास्तवसुद्धा. स्वीकाराचा ना आग्रह, ना नकाराचे दुःख. ना कोणता उपदेश. ना कोणता सल्ला, ना कसलं मार्गदर्शन. असं काहीसं जगण्यात रुजवता आलं की, आयुष्य फार काही अवघड गणित नाही राहत. पण वास्तव हेही आहे की, सगळीच गणिते सुघड नसतात आणि सगळीच काही अवघड. असली अवघड म्हणून सोडवायची नसतात का? उत्तरांच्या बिंदूवर पोहचण्यासाठी मधल्या पायऱ्या गाळून नाही टाकता येत. हवं असणारं आपलं काही सहजपणे सापडतं, काही सुटतं, काही निसटतं. म्हणून अंतरी अधिवास करून असलेल्या आशेच्या व्याख्या आणि आस्थेचे अर्थ थोडेच बदलतात. तसंही हवं ते आणि आहे ते, सदासर्वकाळ एकाच ठिकाणी मुक्कामाला कसे असेल?
- चंद्रकांत चव्हाण
••

प्रतिवादाच्या परिभाषा

By // No comments:
विश्वाचे व्यवहार कोणत्या एकाच एक गोष्टीवर सुरु आहेत? उत्तर फक्त एकच पर्यायात यायला हवं आणि तेही कोणत्याही किंतुशिवाय. असा काहीसा प्रश्न तुम्हांला कुणी विचारला तर एकतर तुम्ही त्याच्या ठीकठाक असण्याची खातरजमा कराल किंवा मनातल्या मनात त्याच्या मेंदूचं माप घ्याल. 

अर्थात, असं काहीसं वाटणंही स्वाभाविकच. विचारणाऱ्यास तत्काळ वेड्यात काढण्याची अनायासे चालून आलेली संधी काहीजण अजिबात वाया जाऊ देणार नाहीत. काही सहानुभूतीच्या ओंजळी भरून पाहतील. पण खरं हे आहे की, कोणती तरी एकच एक गोष्ट व्यवहार सुरळीत करण्यासाठी कारण असते असं नाही आणि ते संभव सुद्धा नाही. 

व्यवस्था नावाचं वर्तुळ व्यापक असतं. त्यात अनेक शक्यता नांदत्या असतात. वेगवेगळे विकल्प विहार करत असतात अन् त्यासोबत विचारही वाहते असतात. जगणं समृद्ध करणाऱ्या प्रत्येक प्रयत्नांना विवक्षित वाटेने वळवण्याचे सामर्थ्य विचारांमध्ये अन् विचारांना विशिष्ट मार्गाने वळते करण्याचा वकूब असतो भावनांमध्ये. विचारांना शुष्कपणाचा शाप आहे. पण भावनांना ओलाव्याचा स्पर्श लाभलेला असतो. 

विचार अन् भावना सतत एकत्र नांदत्या असतीलच असं नाही. भावनांचं सख्य मांगल्याशी असतं अन् विचारांचा स्नेह सौंदर्याशी असतो. सुंदरतेला सहजतेचा स्पर्श झाला की ते खुलतं. विचारांना नितळपण घेऊन वाहता आलं की, शुद्धतेच्या सहाणेवर घासून नाही पाहावे लागत. भावनांना निकषांच्या चौकटीत नाही तपासून पाहावं लागत. संवेदना हेच त्यांचं सदन असतं. ओंजळभर ओलावा घेऊन भावनांना वाहता आलं अन् वाहता वाहता शुद्ध होता आलं की, निखळ निर्व्याज असण्याचे एकेक अर्थ आकळत जातात. परिमाणांच्या पट्ट्यां लावून नाही मोजता येत त्याची परिणामकारकता. सौंदर्य पाहणाऱ्याच्या नजरेत असतं. नितळ नजरेला निखळ दिसतं. मोजता येतं ते मर्यादांच्या कुंपणात बंदिस्त झालेलं असतं. विस्तारला मर्यादांचे बांध पडले की, सहजतेचे सूर सुटतात अन् मागे उरतो केवळ कल्लोळ. आवाज तर असतो, पण त्यातला आनंद हरवलेला. 

अफाट, अथांग, अमर्याद असण्याचे अर्थ केवळ कोशात असून उपयोग नसतो. त्यांना आयुष्यात आणता आलं की, जगण्याचे संदर्भ बदलतात अन् अतिशयोक्तीचे किनारे धरून ते पुढे सरकू लागले की, अर्थ हरवतात. विचारांच्या वाटेने वळत्या झालेल्या पावलांना विस्ताराच्या परिभाषा पाठ असतात. त्या अवगत करण्यासाठी कवायत करण्याची आवश्यकता नसते. विस्ताराचे स्वप्न डोळ्यात घेऊन आपणच क्षितिज होऊ पाहणाऱ्या वर्तुळाभोवती मर्यादांची कुंपणे कोरता आली, तरी सगळीच वर्तुळे काही सीमांकित नाही करता येत. विचार हे असं एक वर्तुळ आहे, ज्याचा परीघ परिभाषेभोवती प्रदक्षिणा नाही करत. त्याचं भ्रमण नव्या व्याख्या लेखांकित करतं. विचारांच्या वर्तुळात विहार करणाऱ्याला संगतीचे अर्थ अवगत असतात अन् वैगुण्यांसोबत विसावलेले विसंगतीचे विश्वही. 

वैचारिक चर्चेच्या वर्तुळातून बाहेर पडणे. उगीच आगपाखड करून एखाद्याच्या माथी खापर फोडणे, फार अवघड असतं असं नाही. पण याचा अर्थ आपणही अर्धाच विचार करतो आहोत, असा नाही का होत? विचारांचा प्रतिवाद विचारांनी होणे, हे आपल्या वैचारिक प्रगल्भतेचे परिमाण असते अन् आपल्या प्रज्ञेचा परिणत असण्याचा परिपाक. प्रवाद असतात, वादही असतात, वितंडवादही करता येतो; पण आसपास संवादही नांदता असतो, नाही का? विचारांमध्ये भिन्नता अवश्य असावी. वादही असावेत, पण ते विसंगतीला आवतन देणारे नसावेत अन् प्रवादाचे प्रवाह बनू नयेत. 

प्रतिवादाच्या परिभाषा पर्याप्त परीघ घेऊन प्रदक्षिणा न करता स्वतःभोवती परिवलन करीत असतील, तर विचारांना त्यांचं आभाळ गवसेल कसं? वाद-संवाद, खंडन-मंडन निकोपपणे करता येणे अवघड नसते. फक्त नजरेला थोडं दूरचं क्षितिज बघता यायला हवं. मुद्द्यांना मुद्देसूद मार्गाने मांडता येणे, नेता येणे संतुलितपणाचे व्यवच्छेदक लक्षण असते. केवळ आणि केवळ माझीच मते ग्राह्य आणि संग्राह्य असं नसतं. मीपणाच्या वर्तुळातून बाहेर पडता आलं की, विचारांचा विस्तार समजतो. पण विस्ताराच्या व्याख्या विस्मरणात गेल्या की, उजेडाचे कवडसे अंधाराच्या गर्तेत हरवतात. 

प्रश्न कुठून कसे निर्माण व्हावेत, याच्या काही सुनिश्चित व्याख्या नसतात. ते का निर्माण झालेत, याची उत्तरे असतीलच असेही नाही. कुठल्याशा अभिनिवेशातून निर्मित प्रश्न विचारांचे परीघ सीमांकित करतात. प्रदक्षिणा असतात त्या संकुचित वर्तुळांभोवती घडणाऱ्या. खरंतर प्रवादांचाही प्रतिवाद करता येतो. फक्त वादप्रवादांच्या पाठीमागे असणाऱ्या विचारांची वलये तेवढी समजून घेता यावीत. विचार परिवर्तनीय असतात. वाहत्या विचारांना नितळपण लाभते. पाणी साचले की कुजते. विचार तुंबले की दूषित होतात, म्हणून त्यांचं वाहत राहणं महत्त्वाचं. विचारांची वर्तुळे विस्तारत जातात तसे अभिनिवेशाचे अर्थ आकळत जातात. विचार विस्ताराचे विश्व विसरतात, तेव्हा अभिनिवेशाना अनकालीय अर्थ प्राप्त होतात. नाही का?
चंद्रकांत चव्हाण
••