प्रतिवादाच्या परिभाषा

By
विश्वाचे व्यवहार कोणत्या एकाच एक गोष्टीवर सुरु आहेत? उत्तर फक्त एकच पर्यायात यायला हवं आणि तेही कोणत्याही किंतुशिवाय. असा काहीसा प्रश्न तुम्हांला कुणी विचारला तर एकतर तुम्ही त्याच्या ठीकठाक असण्याची खातरजमा कराल किंवा मनातल्या मनात त्याच्या मेंदूचं माप घ्याल. 

अर्थात, असं काहीसं वाटणंही स्वाभाविकच. विचारणाऱ्यास तत्काळ वेड्यात काढण्याची अनायासे चालून आलेली संधी काहीजण अजिबात वाया जाऊ देणार नाहीत. काही सहानुभूतीच्या ओंजळी भरून पाहतील. पण खरं हे आहे की, कोणती तरी एकच एक गोष्ट व्यवहार सुरळीत करण्यासाठी कारण असते असं नाही आणि ते संभव सुद्धा नाही. 

व्यवस्था नावाचं वर्तुळ व्यापक असतं. त्यात अनेक शक्यता नांदत्या असतात. वेगवेगळे विकल्प विहार करत असतात अन् त्यासोबत विचारही वाहते असतात. जगणं समृद्ध करणाऱ्या प्रत्येक प्रयत्नांना विवक्षित वाटेने वळवण्याचे सामर्थ्य विचारांमध्ये अन् विचारांना विशिष्ट मार्गाने वळते करण्याचा वकूब असतो भावनांमध्ये. विचारांना शुष्कपणाचा शाप आहे. पण भावनांना ओलाव्याचा स्पर्श लाभलेला असतो. 

विचार अन् भावना सतत एकत्र नांदत्या असतीलच असं नाही. भावनांचं सख्य मांगल्याशी असतं अन् विचारांचा स्नेह सौंदर्याशी असतो. सुंदरतेला सहजतेचा स्पर्श झाला की ते खुलतं. विचारांना नितळपण घेऊन वाहता आलं की, शुद्धतेच्या सहाणेवर घासून नाही पाहावे लागत. भावनांना निकषांच्या चौकटीत नाही तपासून पाहावं लागत. संवेदना हेच त्यांचं सदन असतं. ओंजळभर ओलावा घेऊन भावनांना वाहता आलं अन् वाहता वाहता शुद्ध होता आलं की, निखळ निर्व्याज असण्याचे एकेक अर्थ आकळत जातात. परिमाणांच्या पट्ट्यां लावून नाही मोजता येत त्याची परिणामकारकता. सौंदर्य पाहणाऱ्याच्या नजरेत असतं. नितळ नजरेला निखळ दिसतं. मोजता येतं ते मर्यादांच्या कुंपणात बंदिस्त झालेलं असतं. विस्तारला मर्यादांचे बांध पडले की, सहजतेचे सूर सुटतात अन् मागे उरतो केवळ कल्लोळ. आवाज तर असतो, पण त्यातला आनंद हरवलेला. 

अफाट, अथांग, अमर्याद असण्याचे अर्थ केवळ कोशात असून उपयोग नसतो. त्यांना आयुष्यात आणता आलं की, जगण्याचे संदर्भ बदलतात अन् अतिशयोक्तीचे किनारे धरून ते पुढे सरकू लागले की, अर्थ हरवतात. विचारांच्या वाटेने वळत्या झालेल्या पावलांना विस्ताराच्या परिभाषा पाठ असतात. त्या अवगत करण्यासाठी कवायत करण्याची आवश्यकता नसते. विस्ताराचे स्वप्न डोळ्यात घेऊन आपणच क्षितिज होऊ पाहणाऱ्या वर्तुळाभोवती मर्यादांची कुंपणे कोरता आली, तरी सगळीच वर्तुळे काही सीमांकित नाही करता येत. विचार हे असं एक वर्तुळ आहे, ज्याचा परीघ परिभाषेभोवती प्रदक्षिणा नाही करत. त्याचं भ्रमण नव्या व्याख्या लेखांकित करतं. विचारांच्या वर्तुळात विहार करणाऱ्याला संगतीचे अर्थ अवगत असतात अन् वैगुण्यांसोबत विसावलेले विसंगतीचे विश्वही. 

वैचारिक चर्चेच्या वर्तुळातून बाहेर पडणे. उगीच आगपाखड करून एखाद्याच्या माथी खापर फोडणे, फार अवघड असतं असं नाही. पण याचा अर्थ आपणही अर्धाच विचार करतो आहोत, असा नाही का होत? विचारांचा प्रतिवाद विचारांनी होणे, हे आपल्या वैचारिक प्रगल्भतेचे परिमाण असते अन् आपल्या प्रज्ञेचा परिणत असण्याचा परिपाक. प्रवाद असतात, वादही असतात, वितंडवादही करता येतो; पण आसपास संवादही नांदता असतो, नाही का? विचारांमध्ये भिन्नता अवश्य असावी. वादही असावेत, पण ते विसंगतीला आवतन देणारे नसावेत अन् प्रवादाचे प्रवाह बनू नयेत. 

प्रतिवादाच्या परिभाषा पर्याप्त परीघ घेऊन प्रदक्षिणा न करता स्वतःभोवती परिवलन करीत असतील, तर विचारांना त्यांचं आभाळ गवसेल कसं? वाद-संवाद, खंडन-मंडन निकोपपणे करता येणे अवघड नसते. फक्त नजरेला थोडं दूरचं क्षितिज बघता यायला हवं. मुद्द्यांना मुद्देसूद मार्गाने मांडता येणे, नेता येणे संतुलितपणाचे व्यवच्छेदक लक्षण असते. केवळ आणि केवळ माझीच मते ग्राह्य आणि संग्राह्य असं नसतं. मीपणाच्या वर्तुळातून बाहेर पडता आलं की, विचारांचा विस्तार समजतो. पण विस्ताराच्या व्याख्या विस्मरणात गेल्या की, उजेडाचे कवडसे अंधाराच्या गर्तेत हरवतात. 

प्रश्न कुठून कसे निर्माण व्हावेत, याच्या काही सुनिश्चित व्याख्या नसतात. ते का निर्माण झालेत, याची उत्तरे असतीलच असेही नाही. कुठल्याशा अभिनिवेशातून निर्मित प्रश्न विचारांचे परीघ सीमांकित करतात. प्रदक्षिणा असतात त्या संकुचित वर्तुळांभोवती घडणाऱ्या. खरंतर प्रवादांचाही प्रतिवाद करता येतो. फक्त वादप्रवादांच्या पाठीमागे असणाऱ्या विचारांची वलये तेवढी समजून घेता यावीत. विचार परिवर्तनीय असतात. वाहत्या विचारांना नितळपण लाभते. पाणी साचले की कुजते. विचार तुंबले की दूषित होतात, म्हणून त्यांचं वाहत राहणं महत्त्वाचं. विचारांची वर्तुळे विस्तारत जातात तसे अभिनिवेशाचे अर्थ आकळत जातात. विचार विस्ताराचे विश्व विसरतात, तेव्हा अभिनिवेशाना अनकालीय अर्थ प्राप्त होतात. नाही का?
चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment