आयुष्यातील बराचकाळ गावमातीच्या सानिध्यात, निसर्गाच्या नितळ सहवासात व्यतित झाला. निसर्गाचे नावीन्याने नटलेले सारे आविष्कार नाना रंग धारण करून पावलोपावली रोजच भेटत राहिले. प्रत्येक ऋतूत पालटणारी त्याची नानाविध रूपं मनात साठत गेली अन् घट्ट रुजत गेली. पाऊस हळवा कोपरा धरून हृदयात विसावलाय. कधी धोधो कोसळणारा, कधी रिमझिम बरसणारा, कधी चिंब भिजवणारा पाऊस मनाला नुसताच पुलकित करीत गेला असे नाही, तर समृध्दही करीत गेला. तेथें रुजलेलं पाऊस नावाच्या आठवणींचं रोपटं वाढत्या वयासोबत नवनवे रूपं घेऊन बहरत राहिले. त्याचं रिमझिमणं, बरसणं, धोधो कोसळणं अनवरत सोबत करीत राहिले. भेटत राहिले. आनंद बनून मनाच्या आसमंताला असीम, अमर्याद करीत गेलं. म्हणूनच की काय पुस्तकातल्या कवितेतून भेटणारा पाऊस अन् ती कविताही हवी हवीशी वाटू लागली. धडा, कविता वाचताना तो आपल्यासमोर उभा असल्याचे वाटायचे. बालकवींच्या कवितेतील श्रावणमास हिरवाई घेऊन भावनांना गहिरा रंग द्यायचा. त्या घनगर्द छटा गहिऱ्या होत जायच्या. पाऊस सर्जनाचा साक्षात्कार होऊन मनात साठत राहायचा.
मधल्या सुटीनंतर दुपारची शाळा भरलेली असायची. शिक्षक वर्गात काहीतरी शिकवत असायचे. मुलं वर्गात शांतपणे बसलेली, पण डोळ्यांची भिरभिरणारी पाखरं मात्र खिडकीतून दिसणाऱ्या पश्चिमेकडील आकाशाच्या तुकड्याकडे झेपावत असायची. तेथे विहरत रहायची. आकाशाचे रंग पालटत जायचे. घननीळ रंगांची चादर त्यावर ओढली जायची. काळ्याशार रंगाने आकाश रंगायचे. इकडे आमची मने बरसणाऱ्या पाण्याने रंगायची. आमची अस्वस्थ चुळबूळ सुरु व्हायची. सरांचं लक्ष आमच्याकडे. "काय चाललंय?" म्हणून डोळ्यावरील चष्म्याच्या काचांवरून पाहत ओरडायचे. तेवढ्यापुरतं त्यांच्याकडे लक्ष. मनं मात्र आभाळाकडे केव्हाच पोहोचलेली. पुस्तकातील धडे मस्तकापर्यंत पोहोचणे अवघड होत जायचे. पुस्तकातल्या धड्यातील रंगापेक्षा बाहेरील पावसाचा रंग अधिक हवासा वाटायचा. पुस्तकातील धडे त्यांच्या तालात चालत राहायचे; पण मनात पावसाने एव्हाना चांगलाच ताल धरलेला असायचा.
आमच्यातील कोणीतरी उभं राहून सरांना सांगायचा; "सर, पाऊस जोराचा येईल असं वाटतंय! आम्ही घरी जायचय का?" सरांचाही नाईलाज असायचा. शाळा गावापासून दीडदोन मैल अंतरावर. चिखलमाती, काट्याकुट्यातून तो रस्ता रोजच पायी तुडवत जावे लागायचे. पाऊस आला की रस्त्यावरील नाले, ओढे तुडुंब भरून वाहयचे. पाणी कमी होईपर्यंत इकडची माणसं इकडे आणि तिकडची तिकडे अडकून राहयची. पाऊस येणार असला म्हणजे शाळेतून घरी जाण्याची आम्हां पोरांना अनुमती असायची. दप्तर स्थानिक राहणाऱ्या मित्रांकडे नाही तर शाळेतच टाकून घरी जाण्यासाठी सारे भन्नाट सुटायचे. रस्त्यावरून चिखल, माती, पाणी उडवत, बोंबा मारीत निघायचे. जोराचा पाऊस येऊन ओढे, नाले नेहमीच तुंबायचेत असं नाही; पण पावसामुळे शाळा नावाच्या कोंडवाड्यातून काही वेळेसाठी का असेना सुटका व्हायची. शाळा नावाच्या तुरुंगातून मुक्त करणारा पाऊस मुक्तिदाता वाटायचा. वाटायचे, हा असाच वर्षभर बरसत राहावा. पण त्याने कधीही आमचे म्हणणे ऐकले नाही.
वाढत्या वयासोबत पाऊसही बदलत गेला. कधीकाळी कथा, कादंबरी, सिनेमातून नायक-नायिकांना चिंबचिंब भिजवणारा पाऊसच खरा पाऊस असतो, असे वाटायचे. पण तो फक्त पुस्तकांत, चित्रपटात राहिला. वास्तवात असा पाऊस आयुष्याच्या चालत्या वाटांवर कधी भेटलाच नाही. पुस्तकातून वाचताना भेटलेला, मनमुराद आनंदाची बरसात करणारा पाऊस हवाहवासा वाटायचा. पण कोसळताना, धूळधाण करताना त्याला पाहिला, अनुभवला तेव्हा तो नकोसाच वाटायला लागला. त्याचं येणं हाच जीवनातील शाश्वत आनंद आहे, असे मानणारी मने; तो संततधार लागताना त्रासायची. वैतागायची. गावातील घरांनी सिमेंटची छते आपल्या डोक्यावर तेव्हा धारण केलेली नव्हती. सगळ्यांची घरे मातीची, धाब्याची. संततधार लागल्याने सारखी गळायची. धाब्यावरून गळणाऱ्या पाण्याने वैताग यायचा. घरात अंतरावर, अंतरावर भांडी आपलं आसन मांडून स्थानापन्न व्हायची. आई ओरडायची. छतावर मुंग्यांनी केलेली घरे मातीच्या टोपल्या टाकून, बुजून गळती थांबवायला लागायची. पावसात छतावर चढून माती टाकणे जिवावर यायचे. अंधाऱ्या रात्री धोधो बरसणाऱ्या पावसात हाती कंदील घेऊन डोक्यावरील गोणपाटाच्या घोंगडीला सावरत गोठ्यातल्या गायीवासरांना, बैलांना चारा टाकायला जाताना पावसाला बिनदिक्कत शिव्यांची लाखोली वाहिली जायची. पण त्याचा काही उपयोग नसायचा. तो आपलं कोसळण्याचं काम प्रामाणिकपणे करीत राहायचा.
पावसाच्या गंधगार सहवासाच्या हिंदोळ्यावर झुलत कधी अभावात, तर कधी अविर्भावात जगलो. वाढलो. शिकलो. चार पुस्तकांची सुंदर सोबत घडली. जगण्याच्या शाश्वत वाटा परिस्थितीतून गवसल्या, तशा पुस्तकातूनही सापडल्या. काही मी शिकलो. काही परिस्थितीने शिकवले. नोकरीच्या वाटेने निघालेली पावलं गावातून बाहेर पडली. आलो शहराच्या आश्रयाला. विसावलो. उपजीविकेच्या शोधात गाव सुटला; पण गावातील आठवणी सोबतच राहिल्या. अजूनही त्या मनातलं गाव समृद्ध करीत आहेत. अशा कशा सहज सुटतील त्या! आठवणींचा पाऊस कधीतरी असा अवचित कोसळतो. स्मृतींनी साकळलेले मेघ झरायला लागतात. अंतरी कोरलेल्या ओंजळभर आभाळाच्या क्षितिजावर आठवणींच्या इंद्रधनुष्याची सप्तरंगी कमान धरून पाऊस रिमझिम बरसत राहतो. ऊनपावसाचा खेळ नव्याने सुरु होतो. मनातील गाव आणि गावातील पाऊस सोबत घेऊन शहराच्या सिमेंटच्या छतावरून ओघळत राहतो, आठवणींच्या रूपाने...
- चंद्रकांत चव्हाण
••