स्मृतीची पाने चाळताना: तीन

By
एखाद्याचं नामकरण कोणत्या विचारांनी केलेलं असतं, त्यांनाच माहिती. नाव गुलाब असणं आणि त्याच्या देखणेपणाची कोणतीही लक्षणे त्यात शोधूनही न सापडणं, याला विपर्यास शब्दाशिवाय आणखी काय म्हणता येईल? माहीत नाही. असंच काहीसं गुलाबबाबत घडलं. गुलाबचा ‘गुल्या’ झाला आणि तीच त्याच्या नावाची अमीट ओळख झाली. हा संक्षेप कुणी केला, केव्हा आणि कसा केला, कुणास ठाऊक. काळाच्या वाहत्या प्रवाहात गावात अनेक गोष्टी घडल्या आणि बिघडल्याही. बदलांच्या वाटांनी नव्या गोष्टी आल्या. त्यांच्या आवेगात टिकाव धरू न शकल्याने जुन्या गोष्टी शेवाळावरून घसरून पडावे, तशा निसटल्या. बदलला नाही तो ‘गुल्या’ शब्द. तसंही नावात काय असतं म्हणा! तसंच गुल्या नावाचं. ‘गुलाब’ बनून तो मोहरला फक्त कागदपत्रांवर. सामान्यांच्या संवादात ‘गुल्या’ म्हणूनच फुलत राहिला, बहरत राहिला.

गावातलं हे एक अचाट पात्र. जगण्याच्या अनेक आयामांना आपल्यात अलगद सामावून घेणारं. कोणी नमुना म्हटले, कोणी वल्ली म्हटले, काहीही म्हटले, तरी त्यात सहज विरघळून जाणारा. सुमार उंचीचा. जेमतेम अंगकाठी असणारा. गोरा आणि काळा या दोन बिंदूना जोडणाऱ्या रेषेने एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे सरळ पुढे चालत गेलो आणि मध्यावर थोडं इकडे तिकडे सरकून थांबलो की, तो विरामाचा बिंदू ज्या रंगखुणेने निर्देशित करता येईल, तोच याच्या देहाचा रंग. काळा म्हणता येत नाही आणि गोरा नाही, म्हणून या दोघांच्या मध्यावर उभं राहून देहाला चिकटलेल्या रंगाच्या छटा शोधणेच रास्त.  

नियतीने निर्धारित करून दिलेलं ओंजळभर वर्तुळ आपल्या जगण्याचं परिमाण मानून हाती लागलेल्या परिघात स्वतःला शोधणारा. जगण्याच्या स्पर्धेत वाट्यास आलेली भूमिका हा गेल्या पन्नास वर्षापासून प्रामाणिकपणे पार पाडतो आहे, कोणत्याही मुखवट्यांशिवाय. 

गुल्याचा एक आवडता उद्योग दिवसभर कुठेकुठे भटकत राहायचा. कुठलेतरी उकिरडे, झाडावेलींच्या जाळ्यांमध्ये डोकावत राहायचा. याला कुठून आणि कसा सुगावा लागायचा कोणास ठाऊक. नदीवर दारू तयार करण्यासाठी भट्ट्या लागलेल्या असत. चोरून-लपून कुठल्यातरी लवणात दारू पाडण्याचे काम सुरु असायचे. भट्टी लागली की, त्यादिवशी वीसपंचवीस बाटल्या भरून दारू गावात आणली जात असे. त्या कोणी घरात ठेवीत नसे. दारू विकणारे कोणत्यातरी उकिरड्यात पुरून किंवा वेलींच्या जाळ्यात लपवून ठेवत. लागली तशी आणून विकत असत. गुल्या दुपारीच ती सगळी ठिकाणे शोधून येत असे. 

शाळेला सुटी असली की, हा सगळ्यांना जमा करायचा. सगळी फौज आपल्याला कोणी पाहत नसल्याची काळजी घेत बाटल्या लपवलेल्या ठिकाणी दाखल व्हायची. हा सरपटत जाळीत शिरायचा. खजिना हाती लागल्याच्या थाटात लपवून ठेवलेल्या बाटल्या दाखवायचा. उकिरड्यावरील कचरा वेगळा करून कोणी पाहत नसल्याचा अंदाज घेत बाटल्या वर काढायचा. विस्फारलेले डोळे बाटल्यांकडे कुतूहलाने बघत राहायचे. आता काय? हा प्रश्न नजरेनेच एकमेकांना विचारत खाणाखुणा व्हायच्या. विचार पक्का व्हायचा. सगळ्या बाटल्या संपवायच्या. एकही शिल्लक राहता कामा नये. सगळेच सरसावून तयार झालेले, नजर आजूबाजूला भिरभिरत रहायची. कोणी आपणास पाहत नाही ना, याची खात्री करून घ्यायचे. आमच्यातले काही रस्त्यावरून कोणी इकडे येतंय का पाहत राहायचे आणि बाकीचे शोधक नजरेने आजूबाजूला काहीतरी शोधत राहायचे. काही डोळे बाटल्यांकडे आणि काही, काहीतरी शोधत गरगर फिरत राहायचे. एव्हाना प्रत्येकाच्या हातात एकेक-दोनदोन दगड लागलेले असायचे. बाटल्या आधीच वर काढलेल्या. हात बाटल्यांच्या दिशेने वळायचे आणि एकामागे एक दगड सुटायचे. बाटल्यांचा चक्काचूर. दारू जमिनीशी समरस होऊन जीव सोडायची. मोजून फक्त दोनतीन मिनिटे, खेळ खल्लास. सगळे सुसाट पळत परत खेळण्याच्या ठिकाणी हजर. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाची कारंजी थुईथुई नाचत राहयची. मी दोन बाटल्या फोडल्या. कुणी तीन, कुणी चार असे सांगत काहीतरी मोठा पराक्रम केल्याच्या थाटात बढाई मारत राहायचे.

संध्याकाळी कुणालातरी बाटली हवी असायची. दारू विकणारा बाटल्या लपवलेल्या ठिकाणी पोहचायचा समोरील दृश्य पाहून अवाक. तल्लफ आलेला माणूस कासावीस. विकणारा नुकसान झाले म्हणून आणि अट्टल नशेबाज प्यायला मिळाली नाही म्हणून मनसोक्त शिव्या घालत तडफडत राहायचे. गुल्या मुद्दामहून त्या ठिकाणी जायचा आणि साळसूदसारखा काय चालले आहे याचा अदमास घेत उभा राहायचा. विचारलेच तर, ‘आमनी बकरी आथी उनी कारे भो!’ म्हणून त्यांनाच विचारायचा आणि मनातल्यामनात हसत राहायचा. तेथून सगळं ऐकून अधिक मीठमिरची लावून मित्रांना सांगायचा. आपण काहीतरी अचाट आणि अफाट काम केल्याचे वाटून सगळे टाळ्या देत खिदळत राहायचे. मुलांना या प्रयोगात आनंद मिळायला लागला. सापडली संधी की, फोड बाटल्या उद्योगच सुरु झाला, तोही गुपचूप. 

नेहमीच घडणाऱ्या या प्रकाराने त्रस्त झालेला दारू विकणारा खोड मोडण्याच्या इराद्याने तयारच होता. फक्त योग्य संधी शोधत होता. काही दिवस त्याने पाळत ठेवली. घडायचे तेच घडले. नेहमीप्रमाणे भट्टी पेटली. तयार झालेली दारू लपवण्यासाठी आली. लपवली. गुल्याला कोण आनंद.  पाहिलं. आला पळत. निघालो सगळे मोहिमेवर. पण यावेळी गनीम सावध होता. दारू विकणारा आधीच लपून बसलेला. आम्ही आक्रमणाच्या पवित्र्यात. हल्लाबोल करायच्या तयारीत असतांना बाहेर आला आणि धरली गुल्याची गचांडी. आमच्या हातातील अश्मअस्त्रे खालच्याखाली पडली. सगळ्यांनी धूम ठोकली. पळत जावून काही जण थोड्या अंतरावर थांबले आणि काय होतेय पाहत राहिले. हा त्याच्या तावडीत पक्का गवसला. गयावया करू लागला. दोनतीन थोबाडीत बसल्या. मार बसला त्यापेक्षा अधिक लागल्याचे हा नाटक करीत होता. भोकाड पसरून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत राहिला. हाताची पकड थोडी सैल झाली आणि संधीचा फायदा घेवून पसार झाला.

आमच्यातील कोण कुठे, कोण कुठे लपून बसलेले. थोड्यावेळाने एकेक करून सगळे खेळण्याच्या ठिकाणी जमा झाले. गुल्या तेथे पोहचला, तो सगळ्यांचा उद्धार करीतच. दारू विकणाऱ्याच्या नावाने ठणाणा बोंबलू लागला. आठवतील तेवढ्या शब्दांना षष्टी विभक्तीचे प्रत्यय लावून तोंड वाजवू लागला. एव्हाना आमच्या पराक्रमाचे पाढे घरी वाचून झाले होते. आम्हांला सुतराम कल्पना नव्हती. साळसूदसारखे घरी पोहचलो आणि अनपेक्षित सरबत्ती सुरु झाली. घरच्यांच्या हातचा मार त्या दिवसाचा बोनस ठरला. दुसऱ्या दिवसापासून असे साहस कधी करायचे नाही यावर एकमत झाले. आणि दारू विकणाऱ्याने बाटल्या पुन्हा कधी अशा ठिकाणी लपवल्या नाहीत, विक्री करीत होता तोपर्यंत. त्याच्यासाठी आम्ही दिलेला तो धडा होता, पण आमच्यासाठीही ते शिकणेच होते.
••

0 comments:

Post a Comment