साहित्यातून समाजमनाची आंदोलने स्पंदित होत असतात. सभोवताली घडणाऱ्या घटितांचे सूर संवेदनशील मनावर अंकित होऊन भावभावनांचे तरंग निनादत राहतात. आतला तळ ढवळून निघतांना उचंबळणाऱ्या विचारांच्या लाटा शब्दांचा साकव करीत किनारा गाठतात. अनुभूतीच्या आसमंतात निनादणारी ही स्पंदने अक्षरवाटेने टिपण्याचा प्रयत्न साहित्यिक करीत असतो. म्हणूनच की काय साहित्यास समाजमनाचा आरसा म्हणत असावेत. आपल्या आतल्या अनुभवांना आकार देणारा लिहिता हात अक्षरशिल्प तयार करीत राहतो. आपले कसब पणास लाऊन कलाकृती निर्मितीचा प्रयास करीत राहतो. लिहित्या हातांना अनुभवाचा तळ गाठता आला की कलाकृती जन्म घेते. साहित्यिकाचा साहित्यनिर्मितीचा वैयक्तिक अनुभव सार्वत्रिकतेचा परीसस्पर्श लेवून प्रकटत असतो. त्याला नवे आयाम देण्याचे काम सर्जनशील साहित्यिक नेहमीच करीत असतो. अशा प्रयत्नाचं फलित त्याचं लेखन असतं. असंच सहजपणाचं लेणं लाभलेलं; खान्देशच्या मातीतून उगवलेलं आणि रुजून वाढलेलं एक नाव बी. एन. चौधरी. अक्षरांचा अक्षय वारसा दिमतीला घेऊन साहित्यगंगेच्या पात्रातून जीवनानुभूती बनून वाहणारी बी. एन. चौधरी यांची कविता वाचकाच्या मनास संमोहित करते. ती तिच्यातील अंगभूत सामर्थ्यामुळे.
कविता कविमनाचा भावोत्कट उद्गार असते. संवेदानांतून निर्मित भावसंपन्नता ज्याला आपल्या अंतर्यामी रुजवता येते, त्याची लेखणी सौंदर्याचा साज लेऊन प्रकटते. रसिक प्रेमाची श्रीमंती हीच आपली दौलत मानणाऱ्या बी. एन. चौधरींनी खान्देशातील साहित्यविश्वात आपला परगणा तयार केला आहे. साहित्याचा केंद्रबिंदू माणूस असावा असे म्हणतात. केवळ माणसांची सुखं-दुःख तेवढी साहित्यातून मांडून शब्दांच्या खेळाने साहित्यप्रभू बनता येत नाही. त्यासाठी शब्दांवर प्रभुत्व संपादन करावे लागते. समाजातील समकालीन समस्यांचे बंध समजून घ्यावे लागतात. त्यासाठी स्वतःला तपासून पाहावे लागते. या विचारांची जाणीव बी. एन. चौधरींनी अंतर्यामी जतन करून ठेवली आहे. साहित्यातून माणूसपण शोधणारा हा माणूस. माणसाच्या परित्राणाची सुक्ते गाण्यात आनंद मानत असला, तरी माणसांच्या जगात आणि जगण्यात काही उणीवा आहेतच, त्या सहजी निरोप घेत नसतात, याचेही भान बाळगून आहे.
विश्वाच्या अफाट पसाऱ्यात माणसाचे अस्तित्व तसे नगण्यच. एक बुद्धीचा अपवाद वगळला तर त्याचाकडे असं काय आहे, ज्यावर त्याने नाझ करावा? हे खरं असलं तरी त्याच्याकडे असणाऱ्या बुद्धिसामर्थ्याने प्रेषितालाही विस्मयचकित करणारे काम त्याने इहतली केले आहे. पण तो प्रेषित काही बनू शकला नाही. ही त्याच्या जगण्याची मर्यादा आहे. जीवनयापनाचं हे वास्तव स्वीकारून जीवनकलहातील प्रवासाच्या दिशा त्यालाच शोधाव्या लागतात. समकालीन जगण्याचे वास्तव शोधतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे जगाचे सगळ्याच अंगाने सपाटीकरण होत आहे. सोबतच स्वार्थाचा परिघही समृद्ध होत आहे. म्हणूनच की काय जगण्याचा गुंताही बऱ्यापैकी वाढला आहे. आसपास सगळीकडे स्वार्थपरायण विचारांची वर्तुळे भक्कम होतांना या वर्तुळांच्या बाहेर असेही काही घटक आहेत, जे देहाने माणसं आहेत; पण नियतीच्या आघाताने जनावरांप्रमाणे जगत आहेत. खरंतर हे वास्तव माणसाला माहीत नाही असे नाही. सगळं काही माहीत असूनही आसक्तीपरायण विचारांनी वर्तताना ते सोयिस्करपणे विस्मृतीच्या कोशात टाकले जाते आहे. समाजातून एक मोठा प्रवाह अशा उपेक्षेचा नेहमीच धनी राहिला आहे. ही उपेक्षा कधी संस्कृतीने, कधी परंपरेने, कधी रूढीने त्यांच्या जगण्यात निर्माण केली आहे. जगण्याच्या वर्तुळात गरगर फिरताना ही अभावग्रस्तता समाजाच्या अभ्येद्य चौकटींनी त्याला स्वीकारायला भाग पाडले आहे. व्यवस्थानिर्मित वर्तुळाच्या परिघावर उभं राहून आत्मशोधाच्या वाटा शोधणारं असंच एक नाव म्हणजे ‘स्त्री’, अनेक कथा आणि व्यथा घेऊन प्रकटणारं. कधी उपेक्षित, कधी अपेक्षित, तर कधी विस्मयचकित करणारं. या वलयांच्या वर्तुळावर उभं राहून कवी तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
स्त्रीच्या सामर्थ्याचे संस्कृतीने सदासर्वदा गोडवे गायले आहेत. तिच्यातील सामर्थ्याचा सत्कारही केला; पण तिच्यातील ‘स्त्रीच्या’ ललाटी सतत दुय्यमत्वाचे अभिलेख लेखांकित केले आहेत. विश्वातील अनेक अज्ञात परगण्यांचा शोध घेऊन माणसाने त्यांना मौलिकता प्रदान केली. पण जिच्या अस्तित्वाने त्याच्या जीवनात स्वर्ग अवतीर्ण होऊ शकतो, तिला मात्र तो सोयिस्कर विसरला. नारी, ललना, कामिनी, सौदामिनी अशा गोंडस नावांच्या देव्हाऱ्यात तिला अधिष्ठित केले. ‘यत्र नार्यस्तु पूजन्ते तत्र रमन्ते देवता’ म्हणून तिच्या सामर्थ्याला देवतेच्या पातळीवर नेऊन तिचा देव्हारा कायम केला. त्या देव्हाऱ्याला सजवले. ‘तुज भयचकित होऊन नमावे रमणी’ असे म्हणून तिच्या साहसाला आदरयुक्त भयाचे रूप देऊन शक्तीच्या रुपात पाहिले. ‘न मातुः परम दैवतम्’ म्हणीत तिला देवतास्वरूप लेखून पूजनीय केले. त्याचवेळी दुसऱ्याबाजूने ‘न स्त्री स्वातन्त्र्यम् अर्हति’ म्हणून बंधनांच्या शृंखलांनी पाशबद्धही केलं. बंधनांचे पाश अधिकाधिक करकचून घट्ट करताना ती परवश कशी राहील, याची काळजी तो घेत राहिला. जीवनाच्या कोणत्याही स्थितीत ती असली, तरी तिला पिता, पती, पुत्र या पुरुषी नात्यांनी बद्ध करून पुरुषाशिवाय तुझ्या जीवनाला गतीच नाही अन् त्यावाचून प्रगतीही नाही, हा विचार तिच्या मनात रुजवत नेला. तिला नटवून, सजवून, मढवून कौतुक करायचं आणि दुसरीकडे पायातली वाहण पायातच बरी, म्हणून ठोकरत राहायचं काम केलं आहे.
स्त्री नावाच्या सामर्थ्याचा शोध अनेकांनी घेण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या जगण्यातलं गुंतागुंतीचं वास्तव काही अद्याप बदललेलं नाही, हेही सत्यच. स्त्री नावाच्या परिघाभोवती असणाऱ्या अर्थाची वलये शोधण्याचा प्रयत्न बी. एन. चौधरींची कविता करते. आई, बहीण, कन्या, पत्नी, प्रेयसी अशा नात्यांच्या विणीचे धागे घेऊन स्त्रीमनाची स्पंदने कवी या कवितांतून मुखरित करतो. समाजाने आखलेल्या वर्तुळात जगणारी स्त्री समजून घेण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न म्हणूनच स्पृहणीय वाटतो. स्त्री वेगवेगळ्या नात्यांच्या रेशीमधाग्यांचे गोफ विणीत आयुष्यात प्रवेशित होत असते. ही नाती कधी रक्ताचे रंग घेऊन जन्मतात, तर कधी स्नेहाचे रंग भरून अंतरंग पुलकित करतात. अशा नात्यांची उकल करण्याचा प्रयत्न बी. एन. चौधरी या कवितांतून करतात. असे असले तरी तिला समजून घेताना एकीकडे विस्मय, आदर आणि दुसरीकडे तिच्यातील बाईपणास दुय्यम समजणारी समाजाची मानसिकता या सीमारेषांवर थबकतात असे वाटते. अनुभवातून प्रत्ययास आलेल्या वाटेवरून ते आणखी चार पावले पुढे चालते झाले असते, तर स्त्री प्रतिमेचे काही अस्पर्शित आयाम या कवितेतून प्रकटले असते आणि स्त्रीविषयक जाणिवेच्या प्रतिमा आणखी गडद झाल्या असत्या, असे म्हणण्यास पर्यवाय आहे.
पुरूषांइतकंच स्त्रीचं अस्तित्व इहतली पुरातन असूनही केवळ तिचं देहाने वेगळं असणं पुरुषाला अस्वस्थ करीत राहिलं आहे. तिच्याठायी असणारी सर्जनशक्ती तिच्या सामर्थ्याचं द्योतक ठरली आहे. म्हणूनच पुरुष शेकडो वर्षापासून स्वतःला असुरक्षित समजत आला असावा. सर्जनाची शक्ती जशी तिच्याकडे होती, तशीच शेतीच्या माध्यमातून नवांकुरणाच्या निरीक्षणातून केलेल्या प्रयोगांना वास्तवात आणण्याची कल्पकताही होती. म्हणूनच माता आणि मातीची शक्ती त्याला अचंबित करीत राहिली असावी. विश्वाचा नियंता, निर्माता कुणी असेल तो असो; पण या विश्वाला कवेत घेण्याचं अफाट सामर्थ्य तिच्याठायी असल्याने तिच्या व्यक्तित्वाभोवती जसे गूढ राहिले आहे, तसे शक्तिरूप सामर्थ्यपण रुजून राहिले आहे. हे सांगताना कवी म्हणतो,
तिच्यात आहे,
तेज... शक्ती सामर्थ्याचं
आणि धैर्य... विश्वाला कवेत घेण्याचं.
विश्वाचे दैनंदिन व्यवहार जिच्या सहकार्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. तिचं असणं हेच एक व्यापक आणि परिणत जगाच्या निर्मितीचे कारण असते. म्हणूनच ती नव्याच्या आगमनाची नांदी देणारी ठरते. तिच्या सर्जनात तेज आणि शक्ती, सामर्थ्य एकवटल्याचे प्रत्यंतर आल्याने माणसाने तिला विस्मयाच्या परीघावर अधिष्ठित करून तिच्याभोवती विस्मयाचे वलय निर्माण करून ठेवले. विश्वाच्या वर्तुळाला समजून घेता येईल तेव्हा येईल, पण जगण्याच्या वर्तुळात सामर्थ्य शोधताना विश्वास ठेवता येईल असे नाव ‘स्त्रीच’ असल्याचं सांगतांना कवी म्हणतो,
जेव्हा ढासळत असेल
विश्वाची इमारत आणि
हरवत असतील प्रकाशवाटा
तेव्हा एक स्त्रीच आहे जिच्यावर
विश्वास ठेवता येईल
स्त्रीच्या ठायी असणाऱ्या सामर्थ्याच्या साक्षात्कार अनुभवलेलं कवीचं मन तिच्या अस्तित्वाच्या परिघाला शोधतांना तिच्या शक्तीरुपाला सहज मनाने सामोरे जातो. तिला समजून घेताना आपली जीवनविषयक बांधिलकी व्यक्त करतोच, पण परंपरेचा दृष्टीकोन नाकारण्याएवढे व्यापकपणही दाखवतो. परंपरेने नाकारलेल्या स्वातंत्र्याचा आणि तिच्या जगण्याचा संकोच करणारा विचार नाकारून एक व्यापकपणाचं अंगण शब्दांच्या परगण्यात शोधतो. पुरुषांना कर्तृत्वसंपन्न समजण्याच्या प्रघातालाच ही कविता छेद देते. समाजात सगळेच पुरुष काही कर्तृत्वसंपन्न नसतात, तशा सगळ्याच स्त्रिया कर्तृत्वहीन नसतात. हे वास्तव मांडतांना संधी मिळाली, तर तिच्या पराक्रमाला मर्यादांची कुंपणे अवरोध करू शकत नाहीत, हे सुचवू पाहतो.
तूच आहेस
साऱ्या दुःखाचे कारण
असं म्हणणाऱ्यांना
तू कधी कळलीच नाहीस
विश्वनिर्मात्रीच्या रुपात
तू त्यांना कधी भेटलीच नाहीस.
विश्वनिर्मितीच्या विशाल रुपात नारीला पाहण्याचं सौजन्य पुरुषांच्या जगात जवळपास असंभवच. तशा रुपात त्याला ती भेटली, तरीही तिला स्वीकारण्याएवढे व्यापकपण पुरुषी मानसिकतेत अजून यायचे आहे. परंपरेच्या पात्रातून वाहत आलेलं हे आंधळेपण पाहताना डोळे असलेल्या, पण दृष्टी नसलेल्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम कवी करतो. परिवर्तनाचा प्रत्येक कृतीशील विचार वैचारिक बदलाचे पहिले पाऊल असते. अशी परिवर्तनशील पावले उचलण्यासाठी संवेदना जाग्या असणाऱ्या मनास उद्युक्त करतो. प्रगतीच्या दिशेने उचललेली प्रत्येक पाऊले योजनेची मुळाक्षरे ठरतात. विचारांचे पाथेय सोबत घेऊन सुधारणांच्या पाऊलवाटांनी चालताना तिच्या अस्तित्वाचे उमटलेले काही ठसे कवितेच्या माध्यमातून कवी शोधू पाहतो.
स्त्री आणि अत्याचार जणू काही द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. तिच्यावरील अत्याचाराला काही हजार वर्षाचा इतिहास आहे. तो सहजी बदलणार नाही. स्व-अस्मिता शोधणारे काही आवाज बुलंद झाले, तरी अद्यापही अवहेलना सहन करणारे असंख्य आवाज आक्रंदनाच्या आवर्तात हरवले आहेत. हा इतिहास जसा नात्यातला आहे, तसा गोतावळ्यातलासुद्धा आहे. कधी नियतीने दिलेल्या नारी देहाचाही आहे. ती अबला म्हणून तो म्हणून घडतो आहे. तो शारीरिक आहे, तसा मानसिकही आहे. परंपरेने लादलेलं बंदिस्त जगणं जगणारी नारी व्यवस्थेच्या वर्तुळात अवहेलना सहन करीत राहते, जन्मण्याआधी आणि जन्मानंतरही. तिच्या जगण्यातील हे दुरित पाहून कवी म्हणतो,
कोवळ्या कळ्या
कुस्करल्या जातात
हमरस्त्यात
आणि
अवहेलना तिची
गर्भात
आणि स्त्री-पुरुष समतेचा
नारा देणाऱ्या या देशातही.
व्यवस्थेतील बेगडी जगणं प्रकर्षाने अधोरेखित करणारी ही कविता संवेदनशील मनाचा अविष्कार ठरते. उक्ती आणि कृतीतली विसंगती व्यक्त करताना कवी आपल्या व्यवस्थेतील व्यंग परखडपणे समोर आणतो. केवळ काही हजार वर्षाचा सांस्कृतिक समृद्ध वगैरे वारसा असून माणसांच्या जगण्यात संपन्नता येत नसते. संस्कारांची श्रीमंती अंतर्यामी असल्याशिवाय समता नांदत नसते. समतेचे सुंदर जग उभं करण्याची आस असणे आणि पर्यावरण तसे असणे यातील विरोधाभास टिपण्याचं सामर्थ्य कवीच्या शब्दांना लाभले आहे.
व्यवस्थेच्या खुंट्याशी बांधलेलं जगणं सोबत घेऊन, परिस्थितीच्या फाटलेल्या आभाळाला टाके घालण्याचा प्रयत्न स्त्री युगानुयुगे करीत आहे. पुरुषी अधिसत्ता असणाऱ्या जगात तिच्या वाट्यास येणारी अगतिकता, अवहेलना, अपमान सारंकाही सहन करून पापण्याआड पाणी लपवत, कधी गळ्यातले हुंदके गळ्यातच गिळून ती आयुष्याची लक्तरे सांधते आहे, बांधते आहे, सावरते आहे, आवरते आहे. नियतीने रेखांकित केलेली वाट निमूटपणे आक्रमित आहे. तडजोड करीत अशा वाटांनी चालणारी कितीतरी संवेदनशील मने परंपरांच्या पात्रातून वाहताना करपून गेली असतील, कोणास ठावूक. वंचनेच्या वर्तुळात आत्मसन्मान शोधणारं असंच एक नाव असतं माय. आपल्या सांस्कृतिक चौकटींमध्ये ती सोशिकतेचा अध्याय बनून राहिली आहे. बाई आणि आई या द्वंद्वाच्या कात्रीत अडकलेलं माय नावाचं नातं गप्प ओठांमध्ये मनातले कढ सांभाळून असते. तिच्या चेहऱ्याच्या सुरकुत्यांच्या आत सोशिकतेचे रामायण, महाभारत दडलेलं असतं. माय या कवितेत कवी सांगतो,
झिंगलेला बाप करी, आकांड तांडव
सोसुनिया जाच तरी, ओठ तिचे गप्प.
माय आपल्याकडे नेहमीच सहनशीलतेचा कळस राहिली आहे. पदरी पडणाऱ्या वेदनांनाही वेदाचे पावित्र्य देणारी माय म्हणूनच वर्षानुवर्षे सोशिकतेतही संसाराची सुक्ते गातेच आहे. पुरुषी अहंचे अनेक आघात झेलत प्राक्तनाशी लढत राहते. जाच-काच सोसून परिस्थितीच्या वादळवाऱ्यात उभी असते, एकाकी बुलंद बुरूजासारखी परिस्थितीच्या तोफगोळ्यांचा प्रहार झेलत. पदरी पडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला पवित्र मानण्याच्या संस्कारांचे मंत्र जपत. नात्यांचे साकव उभे करीत त्यांना आधार देत राहते. नवरा आणि लेक या परस्पर भिन्न ध्रुवांना सांभाळत, झुलत्या काठीच्या टोकावर कसरत करीत.
कारुण्यसिंधू, वात्सल्यसिंधू म्हणून तिच्यातल्या ममतेचा गौरव होत राहिला आहे. तिच्या त्यागाचे गोडवे गाताना स्वतःचा स्वार्थ साधत समायोजनाची सोयिस्कर भूमिका तिच्या जगण्यावर पुरुषाने लादली. कितीतरी युगे उलटली, पण तिच्या जगण्याचा संघर्ष काही थांबत नाही. कधी तो आतल्याआत आहे, तर कधी बाहेरच्या वर्तुळात. माणसांच्या जगात जनावराचं जगणं संस्कृतीने तिच्यावर लादले. पदरी पडलेलं दुर्दैव सोबतीला घेऊन तिने मनाची कवाडे बंद करून घेतली आहेत. तिला खुणावणारं आकांक्षांचं आकाश हरवलं. पंख असून उडण्याची उमेद मनाच्या मातीआड बंद झाली. हे अवघडलेपण कवी समर्पक शब्दात व्यक्त करतांना म्हणतो,
रस्त्यावर बेवारस उंडारणाऱ्या
आणि उभ्या पिकात घुसून नासाडी करणाऱ्या
जनावरांना
मुसक्या बांधून कोंडवाड्यात कोंडावं
काहीसं तसंच कोंडलं तिनं
तिच्या निष्पाप, निरागस
अपेक्षा स्वप्न आणि भावनांना
मनाच्या कवाडाआड
नारीचे बंदिस्त आयुष्य घडवणाऱ्या रूढी जगात सगळीकडेच आढळतात. तिच्या आकांक्षांच्या गगनाला आस्थेचे सदन सहजी मिळतच नाही. तिच्या मनी विलसणारे स्वप्नांचे इंद्रधनुष्य अन्य आकाशांमध्ये विलीन झालेले असतं. रंग हिचे असले तरी शोभा मात्र दुसऱ्याच्या प्रांगणी. तिचं आकाश तिचं कधी नसतंच. नियतीने लादलेले सुवर्णपिंजरे तिचे आयुष्य वेढतात आणि वेचतातही. वास्तवाच्या विखारी दाहकतेत तिच्या स्वप्नांचा कधीच धूर झालेला असतो. मागे उरते फक्त मन विषण्ण करणारी राख. बोरी-बाभळी कवितेत कवी म्हणतो,
त्यांची स्वप्ने अग्नितच जळाली
दोन अश्रूही कुणी ढाळले नाहीत
त्यांनाही कोमल भावना असतात
कुणाला कधीच कळले नाही.
सिमोन बव्हुआर ही फ्रेंच लेखिका म्हणते, ‘स्त्री जन्मत नाही, तिला घडवले जाते.’ आजही या विधानाच्या वास्तवात फरक पडला नाहीये. तिच्या जडण-घडणीच्या वाटा समाजातील पुरुषी मानसिकतेतून निर्मित विचारांनी निर्धारित होत असतात. तिला आपल्या अपेक्षेनुरूप घडवण्याचा प्रघात जगाला काही नवा नाही. प्रेमापोटी पोरीच्या काळजीने चिंतीत होणारा बाप तिला उपदेश करतो. सुरक्षेच्या काळजीपोटी हे रास्त वाटत असेलही; पण हीच पोरगी प्रेयसी, पत्नी नात्यांचे साकव करून नव्या विश्वात प्रवेशित होते, तेव्हा काळजीचे सूर पुरुषी मानसिकता घेऊन तिला स्वतःची संपत्ती समजायला लागतात. बापलेक नातं भावनांचे नवे आयाम घडवत असते. काळजाचा तुकडा असते ती बापाचा. तिच्या काळजीने बापाच्या काळजाचा ठोका चुकतो. जगणं कलंकित नसावं यासाठी तिच्याभोवती वर्तुळ उभे करून तिचं आकाश सीमित करतो. तिच्या वर्तनाचा परिघ समाजसंमत वर्तनाच्या चौकटीत असावा म्हणून विवंचनेत असणारा बाप ‘लक्षात ठेव पोरी’ या कवितेत तिला म्हणतो,
लक्षात ठेव पोरी
देहाचं प्रदर्शन करण्यासाठी
संस्कार कपडे टाकू नको
लाज वाटेल असं काही
करण्यासाठी चेहरा उगीच झाकू नको.
प्रणयाच्या प्रवेशद्वारावर पहिले पाऊल टाकणाऱ्या पोरीला बापाचा हा उपदेश कदाचित सांस्कृतिक संचित म्हणून ठीक असेलही, पण येथेही तिच्या अब्रूची त्याला स्त्री म्हणून अधिक चिंता वाटते. मूल्यांच्या वाटेने वर्तताना, विचार करतांना हे सगळं संयुक्तिक वाटत असले, तरी स्त्री म्हणून तिच्या स्वातंत्र्याचा संकोच येथेही होतोच आहे. नवथर यौवनाच्या पावलांनी चालणाऱ्या निसरड्या वाटांची जाणीव करून देताना येथे ‘चुकांना नसतेच कधी माफी आणि गेलेली अब्रूही परत येत नाही.’ म्हणण्यात उपदेश आणि काळजीचे सूर दिसतात, तसे समाजातील सडक्या मानसिकतेचे कलंकित अनुभवही जमेस असतात. आपल्या समाजातील विचारांच्या चौकटींची लांबी, रुंदी आणि खोली अजून वाढायची आहे. ही जाणीव व्यक्त करताना नात्यातील तरल बंध अधिक भावनिकपणे मांडण्यात कवीची लेखणी यशस्वी झाली आहे.
अवघं विश्व एक वर्तुळ
त्याचा केंद्रबिंदू तूच
असं कवी लिहतो तेव्हा स्त्रीच्या व्यक्तित्वाला अधोरेखित करणारी नुसती चपखल प्रतिमा वापरत नाही, तर व्यवस्थेच्या बिंदूत स्त्रीच्या कर्तृत्वसिंधूलाही शोधतो. तिच्या व्यक्त होण्याच्या अनेक शक्यता- ज्या व्यवस्थेने दुर्लक्षित केल्या आहेत, त्यांचा उद्गम तिच्याठायी असल्याचे सांगतो. या बिंदुला सिंधू होण्याची स्वप्ने देण्याचा आशावाद मनात रुजवण्याचा प्रयास करताना दिसतो. तिचे अफाट सामर्थ्य, अथांग मन, असीम आकांक्षा समजून घेताना वर्तुळातील तिच्या हरवलेल्या विस्तीर्ण आभाळाला कवी शोधत राहतो.
एक स्त्री म्हणून तिच्याविषयी कवीला असणारा आदर आई नात्याचा वत्सल पदर पकडून व्यक्त होतो. ‘माय: एक ओसरी’ या कवितेत मातृभक्तीचे भावोत्कट भजन बनून तो प्रकटतो. तिच्या असण्यात पांडुरंगाच्या वारीच्या पुण्याईचे संचित जमा झाले असते. तिच्या जाण्याने भक्तीचा देव्हारा भंगतो. मातेवरच्या प्रेमातून प्रकटलेले कवीचे शब्द मातृप्रेमाचे महन्मंगल सुक्ते वाटतात. तिच्या अंतरण्याने रिकाम्या झालेल्या मनाच्या देव्हाऱ्यात तिने केलेल्या संस्कारांच्या मूर्ती त्याने जपून ठेवल्या आहेत. तिच्या दाखवलेल्या वाटांचे ठसे अजूनही मनाच्या गाभाऱ्यात कायम आहेत. त्या पाऊलखुणांचा माग घेत कवी भक्तिभावाने चालत राहतो, संस्कारांचे पाथेय सोबत घेऊन. रिकाम्या ओंजळीत वात्सल्याचा निर्झर शोधत.
कोणत्याही कवीच्या सगळ्याच कविता सारख्याच उंचीच्या कधी नसतात. तशी अपेक्षाही नसते. त्यांना मर्यादांची अंगभूत सीमांकित चौकट असते. आपल्या मर्यादांना ओळखून बी. एन. चौधरींची कविता आपलं आकाश आणि अवकाश शब्दांतून शोधत राहते, भूतकाळाच्या स्मृतिरुपाने शेष घटनात आणि वर्तमानाच्या वर्तुळात. कवितेतून भूत-वर्तमान लेखांकित करणाऱ्या कवीच्या शब्दांची सोबत करीत चालणाऱ्या वाचकांच्या अंतर्यामी भविष्याविषयी काही सूचित करायचे राहिल्याची रुखरुख राहते. कदाचित चौधरींच्या कवितेचा पुढचा प्रवास या धाग्यांना घेऊन भविष्यातील अनुभवांपर्यंत पोहोचणारा असेल. कवीच्या शब्दांत कोणताही प्रचारकी, सुधारकी थाट नाही, तसेच व्यवस्थेत जाणवणाऱ्या न्यूनतेविषयी कटुताही नाही. कोणतेही पूर्वग्रहदूषित मत तयार करून लिहिले नसल्याने ही कविता चिंतनाच्या वाटेने पूर्वसुरींच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत चालत राहते. कवितेत जीवनाविषयी आस्था आहे, तशीच जगण्याविषयी भक्तीही आहे. नात्यांविषयी जाण आहे, तसेच परिस्थितीचे भानही आहे. कविता जेवढी जीवनसन्मुख तेवढा तिचा प्रवास माणसांपर्यंत असतो. बी. एन. चौधरींची कविता या निकषावर खरी उतरते. स्त्री जीवनातील प्रश्नांची उत्तरे ही कविता शोधू पाहते; पण अजूनही काही प्रश्नांची उत्तरे त्यांच्या हाती लागायची आहेत, असे वाटते. भूत-वर्तमानाच्या परिघाला वळसा घालत असताना कवीला स्त्रीच्या जगण्याच्या अनुभवांना भविष्याच्या कोंदणात अधिष्ठित करता येईल. तेव्हा राहिलेल्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे हाती येतील.
या कविता काहीच नात्यांपुरत्या आणि अनुभवाच्या वर्तुळात असलेल्या स्त्री जीवनापुरत्या सीमित राहिल्या आहेत असे वाटते. कारण स्त्री अजूनही पूर्ण समजून घ्यायची आहे. तिच्या व्यक्तित्वाची डूब जाणण्यासाठी तिच्या अथांग मनाचा तळ शोधावा लागणार आहे. ती उपेक्षित, वंचित, अत्याचारित, पीडित अशा अनेक वर्तुळात आक्रोश करीत आहे. परंपरेने बांधलेल्या शृंखलातून मुक्त होण्यासाठी परिस्थितीच्या बुरुजांना धडका देत आहे. उपेक्षितांचे हे अंतरंग जाणून असे आणखी काही आवाज कवीला मुखरित करता आले असते. पण तरीही आहेत त्या कविता स्त्रीच्या वेदनांना समजून घेताना न्याय देतात. प्रतिमांचा समयोचित वापर आणि आशयघन शब्दांमुळे ही कविता वाचकांच्या मनात आपला निवारा शोधते. साध्या, सुलभ शब्दांचा थाटलेला या कवितेचा संसार देखणा वाटतो, एखाद्या कुशल गृहिणीने सजवलेल्या घरासारखा.
कवी स्त्री जीवनातील जगण्याचा, तिच्या अस्तित्वाचा संघर्ष मांडत असला तरी शस्त्रे परजून, कोणतेही अभिनिवेश धारण करून रणी उतरत नाही, तर विचारांचे पलिते प्रदीप्त करून पावलापुरती प्रकाशवाट निर्माण करू इच्छितो. त्या मिणमिणत्या उजेडात स्वतःसह अनुभवांनाही लेखत, जोखत, पाहत, तपासत चालत राहतो. म्हणूनच ही कविता स्व-पासून सुरु होऊन सर्वस्वापर्यंत पोहचते असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये. स्त्रीच्या अंतरंगाचा तळ शोधतांना विचारांचे विलसिते वेचणारी ही कविता म्हणूनच कवीची न राहता वाचक-रसिकांची होते, हे वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही असे वाटते.
••