वावरातल्या रेघोट्या

By

संवेदनशील सर्जनाचे अंकुर: ‘वावरातल्या रेघोट्या’

कवितेला सुनिश्चित परिभाषेच्या चौकटीत कोंबणे अवघड. तिच्या निकषांच्या व्याख्या काही असल्या, तरी मर्यादांच्या कुंपणाना नाकारून व्यक्त होते, ती कविता वगैरे असं कुणी म्हणत असेल, तर त्यात विस्मयचकित होण्यासारखे नाही. मनात उदित होणाऱ्या विचारांना व्यक्त होण्याची वाट हवी असते. ती कोणत्या वळणाने निघावी, याची काही निर्धारित परिमाणे नसतात. अभिव्यक्तीसाठी विकल्प अनेक असतात. कोणी कोणते बंध निवडावेत, हा वैयक्तिक आकलनाचा भाग. माध्यमे हाती असल्याने व्यक्त होण्यात बाधा ठरणारी मर्यादांची कुंपणे तशीही कधीच ध्वस्त झाली आहेत.

कवितेच्या परगण्यात विहार करणाऱ्यांची संख्या मोजणे अवघड. यातील आशयघन अभिव्यक्तीचे धनी किती? या प्रश्नाच्या उत्तराजवळ थोडं अडखळायला होतं. जगण्याप्रती आसक्ती अन् आयुष्याप्रती आस्था असली की, अनुभूती केवळ कवायत नाही राहत. प्रतिभास्फूरित स्पंदनांचे अंकुर संवेदनांच्या मातीत रुजायला प्रयोजने शोधावी लागतातच असं नाही. शब्दांचे हात धरून भावनांच्या वाटेने ती चालत राहतात. शब्दांची नक्षत्रे वेचता यावीत, म्हणून आसपास आधी वाचावा लागतो. सजग आकलन अनुभूतीचे किनारे धरून वाहते, तेव्हा आसपासचे परगणे सर्जनाचे सोहळे साजरे करीत बहरास येतात. शब्दांचे ऋतू संवेदनांना भावनांचे सदन आंदण देतात. शब्दांच्या सहवासात रमणारे संदीप धावडे हे नाव माध्यमांच्या विश्वात विहार करणाऱ्यांना ‘वावरकार’ म्हणून अवगत आहे. शब्दांशी सख्य साधणाऱ्या या साधकाने अनुभूतीच्या प्रतलावरून वाहताना संवेदनांच्या प्रस्तरावर ओढलेल्या सर्जनाच्या रेघोट्यांचा हा संग्रह. ‘वावरातल्या रेघोट्या.’

शब्दांच्या साधनेत रमलेला हा कवी कविता जगतो. आपला आसपास समजून घेताना येथला निसर्ग, शेती-माती, शेतकरी, गुरंवासरं, गाव, गावातली माणसे वाचत राहतो. त्यांच्या ललाटी नियतीने लिहिलेल्या अभिलेखांचे अर्थ शोधू पाहतो. परिस्थितीचे चिंतन करतो. व्यवस्थेने निर्माण केलेले गुंते समजून घेतो. संवेदनांचे किनारे धरून वाहताना वेदनांचे अन्वयार्थ लावतो. मनाच्या प्रतलावरून वहाणाऱ्या कवितांचे शब्द सामान्यांच्या आकांक्षाना मुखरित करतात. अभिव्यक्तीच्या वाटेने प्रवास घडताना आसपास शब्दांत साकळून भावनांच्या कोंदणात अधिष्ठित करतो. मनात निनादणाऱ्या संवेदनांना शब्दांकित करताना अवघा आसपासच कविता व्हावा, निसर्गाच्या रंगाना भावनांचे रंग लाभावेत, ही अपेक्षा व्यक्त करताना म्हणतो,
वावरतील...
एखाद्या झाडाचा पेन करून,
धुऱ्यासकट आडतासाचा समास,
थोडा बाजूला सारत,
लिहावं म्हटलं एखादं
हिर्व काव्य...!
(पृ. ०८)

कवी आणि कविता हे नातं कधी व्यक्त, तर कधी अव्यक्त अर्थाचे पदर हाती धरून विचारांच्या झुल्यावर झुलत राहते. हा झोका सतत झुलता ठेवता येणं अधिक जोखमीचं काम. पण एखादं काम आवडीने केलं जात असेल, तर त्यात आस्थेची डूब सहज दिसते. कवीच्या अंतर्यामी निनादणारी भावनांची स्पंदने त्यांच्या शब्दकळा समृद्ध करायला कारण ठरली आहेत. लिहित्या हातांना शब्दांशी सोयरिक करता यावी. त्यांच्या सहवासात विहार करताना केवळ कोरड्या सहानुभूतीचे निःश्वास नकोत, तर अनुभूतीचे आयाम लाभावेत. शब्दांना अंतरीचा ओलावा लाभावा. भावनांनी भिजलेल्या शब्दांना आकांक्षांचं आभाळ लाभावं, ही अपेक्षा व्यक्त करताना म्हणतो,
ताकदीने मले अस्सं लियता याले पायजे,
पाऊस लियल्यावर ढग जमाले पायजे...!
(पृ. ४८)

संग्रहातील कविता अंतर्यामी अधिवास करणाऱ्या अस्वस्थपणाला घेऊन विचारांच्या विश्वात विहार करीत राहते. बदलता आसपास, मूल्यांचा प्रचंड वेगाने अवनतीकडे होणारा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करते. स्वतःला मर्यादांच्या कुंपणात बंदिस्त न करता, आपला मार्ग निवडून आसपास घडणाऱ्या घटितांचे चिंतन करत चालत राहते. व्यवस्थेतील बेगडी जगणं प्रकर्षाने अधोरेखित करणारी ही कविता संवेदनशील मनाचा आविष्कार ठरते. उक्ती आणि कृतीतली विसंगती व्यक्त करताना कवी व्यवस्थेतील व्यंग परखडपणे समोर आणतो. कवी म्हणतो,
प्रेक्षागृहातील
तमाम
कंटोलचा कटोरा हातात घेणारे भारतीय बापं
आणि
खिचडीसाठी म्हणून रांगेची सवय झालेले त्यांचे
भारतीय मुलं...
दोन्ही हातांनी टाळ्यांचा कडकडाट करतात
बीपीएल रेखेतून येणारा
मला हा श्रीमंत प्रतिसाद...
तेव्हाच
बापूंचा मृतदेह माझ्या नि
श्रोत्यांच्या मध्ये आडवा
गावाकडे पाय करून
निपचित पहुडला असतो
पोस्टमॉर्टमच्या प्रतीक्षेत
हे राम...
(पृ. ५२)

व्यवस्थेतील व्यत्यास आणि वर्तनातील विसंगती माणसांना अविचारी बनवत असल्याची खंत प्रत्ययकारी शब्दांतून व्यक्त करताना कवी भवताल सुटत जाण्याची वेदना समर्पक शब्दांनी अधोरेखित करतो. जीवनसन्मुख विचारांनी जगण्याला श्रीमंती मिळते, पण माणूस स्वतःच सपाटीकरणाच्या कामाला लागला असेल तर... त्याला काही इलाज नसतो. व्यवस्थेतील हे दुभंगलेपण कोणताही सांधा जुळू देत नसल्याचे ही कविता सूचन करते.
मृगाने दडी मारावी तसा गूळ झाला आहे
आशेचा धागा अधर सैल झाला आहे
मतलबी तापमान एवढे वाढले
की राहल्या साहल्या ओलाव्याचे
होत आहे बाष्पीभवन
(पृ. ५९)

संदीप धावडेंची कविता माणसांभोवती फिरते. त्यांच्या जगण्यावर, वागण्यावर, आचार-विचारांवर बोलते, तशी व्यवस्थेने निर्मिलेल्या वैगुण्यांवरही बोट ठेवते. जगण्यातल्या समस्यांना अधोरेखित करते. श्रद्धा, परंपरांना समजून घेते. माणूस म्हणून माणसांच्या आशा-निराशांच्या विश्वात विहार करते. इहतली लाभणाऱ्या सुखांच्या केंद्रस्थानी माणूस आहे, नव्हे तो असावाच म्हणून आग्रही होते. जीवनाची अनेक रुपे समर्थपणे मांडते. अनुभवांना अधोरेखित करत दिलेलं शब्दांचं कोंदण आशयाला प्रभावी आणि प्रवाही बनवते. साधे, सोपे शब्द अन् त्यातून उकलत जाणारा आयुष्याचा आशय अन् जगण्याच्या अर्थाचा सुंदर संगम या कवितेतून प्रत्ययास येतो. माणूस परिस्थितीचा निर्माता नसला, तरी परिवर्तनाचा प्रेषित होऊ शकतो, या विचाराने संदीप धावडेंची लेखणी माणसाच्या मनाचा तळ शोधू पाहते. ते म्हणतात,
चाल नेम धर...
बाबू...! या खेपीनं तुले
छाती मोठी करा लागते
या कुरुक्षेत्रावर आज
तुले अर्जुनच व्हा लागते
(पृ. ११)

समाज सगळ्याच बाजूने आक्रसत आहे. विश्व आकलनाच्या आवाक्यात आलं पण माणूस काही माणसाला अजूनही आकळला नाही. इमान बेईमानांच्या हाताचे सावज होण्याचे सावट असतांना, ही चिंता अधिक गहिरी होते. इच्छाशक्ती प्रबळ असली की, युयुत्सू विचाराशी सामना करताना काळालाही क्षणभर विचार करावा लागतो. काळाशी धडक देण्याइतपत काळीज ज्यांना मोठं करता येतं, त्यांना कसलं आलंय भय. कवी म्हणतो,
अजाबात नाही
ठोकर्र लागून मी मरणार नाही,
खूप ठोकरा लागल्यात,
अंगठा आता पोलादी झालाय...!
(पृ. १११)

वास्तवाचा विसर न पडणारे अनुभव चिरंजीव असतात. तशाच मनात उदित होणाऱ्या भावभावनाही. या दोहोंचा समतोल कवितेतून साधला आहे. शब्दांनी त्याला सांधताना माणुसकीचे साकव घालण्याचा प्रयत्न कवी करतो. व्यक्त होतांना सामाजिक वैगुण्ये अधोरेखित करतो.
सांगू नोको मले पोचट योजनेचे फायदे,
रद्द कर आंदी, शेती शोषणाचे कायदे...!
(पृ. १७)

आंतरिक तगमग कवीला अस्वस्थ करीत राहते. वृत्ती अन् संवेदना जाग्या असल्या की, माणूस आणि त्याच्या वर्तनव्यवहारांचे अर्थ आकळायला लागतात. मती सजग असल्याशिवाय अन् मन टीपकागद झाल्याशिवाय असे शब्द हाती येत नसतात. वैयक्तिक स्वार्थासाठी कुलंगड्या करणाऱ्यांची आसपास काही कमी नाही. विसंगतीने भरलेल्या विश्वात व्यवधानांची वानवा नाही. खरंतर इहतली काहीही शाश्वत नसल्याचे सांगितले जाते. क्षणाला लागून क्षण येतो अन् पुढच्याच क्षणी भूतकाळाच्या कुशीत जावून विसावतो. मग कशाला ही सगळी यातायात? कुणाही सामान्य माणसाच्या मनात असा प्रश्न कल्लोळ बनून येतो. अर्थात, त्याची आयती उत्तरे नसतात. त्यांना शोधू पाहणारे विकल्प पर्याप्त प्रमाणात हाती असतीलच असे नाही. माणसाला माणूस म्हणून जगणे खरंच अवघड आहे का? खरंतर नाही. अवघ्या विश्वाच्या वार्ता करणारा माणूस आकांक्षांच्या ओंजळभर विश्वाला का समजून घेत नसेल? अंतरी विचारांचे दाटलेले काहूर मांडताना म्हणतात,
चांदण्यात कोणाला बसायचंय?
आपल्या गळ्यात ओवायचंय?
मातीवरला मी माणूस प्राणी,
मला फक्त माणूस व्हायचंय...!
(पृ. ७१)

आसपास नांदणाऱ्या वेदनांनी कवी व्यथित होतो. समाजाच्या बोथट होत जाणाऱ्या जाणिवांनी चिंतीत होतो. वंचितांच्या वेदनादायी जगण्यात सामावलेल्या दुःखांनी विकल होतो. मनात अधिवास करून असलेली सल घेऊन स्वतःला शोधत राहतो. कवडशाची सोबत करीत ओंजळभर प्रकाश साकळून अंधाऱ्या जगात आणू पाहतो.

संग्रहातील कविता आशयाचे अथांगपण घेऊन येतात. या कवितांचा पृथक पृथक विचार करायला लागतो. रचनेचे बंध, प्रकार, संगती या अनुषंगाने कविता सलग नसल्या, तरी शब्दांचे किनारे धरून वाहणाऱ्या अनुभवांची सलगता सुटत नाही. कवीने अभिव्यक्त होण्यासाठी केलेला वऱ्हाडी बोलीचा समयोचित, समर्पक वापर कवितेला भावनिक उंची प्रदान करतो. शब्दांची अचूक निवड, रचनेचे सुगठीत बंध, सहजपणा, विषयांचे वैविध्य घेऊन या संग्रहातील कविता स्वाभाविकपणे उमलत जाते. त्या जशा मुक्त आहेत, तसेच त्यांना अंगभूत नाद आहे, लय आहे. प्रतिमा आणि प्रतीकांचा समयोचित वापर कवितांना आशयाच्या अनुषंगाने उंची देतो. भाषा सहजपणाचे साज लेऊन येते. आलंकारिकता, अभिनिवेशाचे अवडंबर नसणाऱ्या संदीप धावडेंची कविता बराच काळ मनात रेंगाळत राहते.

संजय ओरके यांचे मुखपृष्ठ कवितांचा आशय नेमकेपणाने अधोरेखित करणारे. बन्सी कोठेवार यांनी रेखांकित केलेली रेखाचित्रे कवितेतील आशयाला सुंदरतेचे अधिष्ठान देणारे. संग्रह वाचकांच्या हाती सोपवताना निर्मितीच्या अंगाने देखणा करण्याचा जनशक्ती वाचक चळवळ प्रकाशनाचा प्रयत्न प्रशंसनीय.

- चंद्रकांत चव्हाण
••

वावरातल्या रेघोट्या
कवी: संदीप धावडे
प्रकाशक: जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद
प्रथम आवृत्ती: ०२ फेब्रुवारी २०१९
पृष्ठे: १७६
किंमत: २०० रूपये
••

0 comments:

Post a Comment