आत्मभान

By // No comments:
व्यवस्था काळाचे किनारे धरून वाहत असते. कितीतरी गोष्टी प्रवाहाच्या संगतीने किनाऱ्यांचा हात धरून पुढे निघून गेलेल्या असतात. व्यवस्थेची अंगभूत परिमाणे असतात. निर्धारित निकष असतात. वर्तनाची वर्तुळे असतात. त्याभोवतीच्या प्रदक्षिणा असतात. मर्यादांची कुंपणे असतात. नियंत्रणाचे बांध असतात. उभे केलेले बंधनांचे बुलंद बुरुज असतात. या सगळ्यां संभाराला सांभाळत अपेक्षा नावाचं अस्त्र हाती घेऊन ती अनेकांची आयुष्ये नियंत्रित करीत असते. व्यवस्थेने चौकटी आखून दिलेल्या असतात. काही आखून घेतलेल्या असतात. तिने कोरलेली वर्तुळे पार करणे अवघड असले, तरी असंभव नक्कीच नसते. वर्तुळांचा थोडा अदमास घेता आला, बुरुजांची उंची आकळली, कुंपणांच्या मर्यादा कळल्या की, बदलांची स्वप्ने पूर्णत्वास नेता येतात. परिस्थिती सार्वकालिक स्थिर कधीच नसते. परिवर्तनाची पावले घेऊन चालत असते ती. त्या पदरवास प्रतिसाद तेवढा देता यायला हवा.

इहतली नांदणारी माणसे काळाच्या सुत्रांशी करकचून बांधलेली असतात. काळाचा कुठलाच तुकडा असा नसतो, ज्यात सर्वकाही मनाजोगत्या चौकटीत कोंबता येतं. इथून-तेथून कुठेही शोधा, माणसे सर्वकाळी, सर्वस्थळी सारखीच. असलाच तर थोडा इकडचा-तिकडचा फरक. एक हातचा किंवा एक वजा, एवढंच काय ते त्यांच्या असण्यात अंतर. बाकी भावनांच्या प्रतलावरून वाहणे सारखे. काही दुथडी भरून वाहतात, काही हंगामी, काही अनवरत, तर काही साचतात, इतकेच काय ते त्यांचे वेगळेपण. बाकी देशप्रदेशसंस्कृतीपर्यावरण वगैरे सोयीसाठी केलेले कप्पे. तसंही काळ काही समान उंचीची परिमाणे हाती घेऊन माणसे घडवत नसतो. तेथेही डावीकडे-उजवीकडे, अलीकडे-पलीकडे, अधे-मधे विहार करणारे असतात.

कुणीतरी निर्धारित केलेल्या वर्तनप्रणालीच्या प्रमाण वर्तुळाच्या मर्यादांना आशीर्वाद मानून जीवनयापन करणे स्वयंप्रज्ञ वृत्तीने वर्तनाऱ्यासाठी काही सुगम नसते. व्यवस्थेने प्रमाणित केलेल्या चौकटीत स्वतःला त्या मापाचं बनवून ठाकून-ठोकून बसवून घेता आलं की, बरेच प्रश्न आपसूक सुटतात. व्यवस्थाच ते सोडवण्याचा प्रयत्न करते, असे म्हणतात. पण या म्हणण्याला प्रासंगिक समाधानापलीकडे कोणते अथांग अर्थ आहेत, असे वाटत नाही. व्यवस्थेच्या तंत्राने चालणे घडले की, आयुष्याला सुसंगत अर्थ देण्यासाठी आत्मसात केलेले आपले मंत्र प्रभावहीन होतात, हेही कसं नाकारता येईल? आपल्या पारतंत्र्याचं प्रमाण आणि व्यवस्था नामक वर्तुळाच्या सर्वंकष असण्याचं प्रतीक असतं ते. त्यांच्या स्वीकारात क्षणिक समाधान अन् सीमित मान असला, तरी सन्मानाची कांक्षा करणे अशा चौकटीत जीवनयापन करताना अवास्तव ठरते.

स्वतः निर्धारित केलेल्या मार्गाने प्रवास करताना अनेक व्यवधाने वाटेवर सवंगड्यासारखी भेटतात. त्यांच्याशी सख्य साधून खेळता आलं की, आयुष्याचे एकेक अन्वयार्थ आकळू लागतात. जीवन काही आखून घेतलेल्या सरळ रेषेवरचा प्रवास नसतो. अनेक अवघड, अनघड वळणे नियतीच आपल्यासोबत दत्तक देत असते. सगळंच काही मनाजोगतं होणार नाही, याचं भान असणारी माणसे स्वतः संपादित केलेल्या कौशल्यांचा विनियोग करतात. आयुष्य सुसह्य करणारी सूत्रे सहज नसली, तरी असाध्य असतात असंही नाही. फक्त त्यांच्यापर्यंत पोहचता यायला हवं. त्याकरिता त्याची परिमाणे अन् प्राप्तीची प्रमाणेही प्रसंगी अवगत असावी लागतात. तसेही स्वयं साधनेतून स्वीकारलेल्या विचारांना प्रमाण मानून वर्तनाऱ्याची आसपास वानवा असणे नवीन नाही अन् व्यवस्थेने कोरलेल्या विचारांना प्रमाण मानून वागणाऱ्यांची कमतरता नसणेही नवे नाही.

तरल भावना, सरल संवेदना, सोज्वळ वर्तन, सात्विक विचार, विचारांना असलेले मूल्यांचे भान, जगण्याला नैतिक अधिष्ठान, कार्याप्रती अढळ निष्ठा, वृत्तीतील प्रांजळपण या गुणांचा समुच्चय एकाच एक व्यक्तीच्या ठायी असू शकतो का? माहीत नाही. कदाचित असेल किंवा नसेलही. सांगणे अवघड असले, तरी असं कुणी असणे नक्कीच अशक्य नाही. संभवत: या सगळ्या गुणांचं एकाच एका व्यक्तीठायी असणं कठीण असेलही; पण दुर्मीळ नक्कीच नाही.

स्वभावातील निर्व्याजपणाला माणूसपणाची चौकट असली अन् या संचिताच्या बेरजेत अथांग आस्था सामावलेली असली की, त्यातून येणारा आत्मविश्वास स्वाभाविकपणाचे किनारे धरून वाहत राहतो. सद्गुण शब्द मुळात सापेक्ष आहे. तो जगण्यात पर्याप्त प्रमाणात असला की, माणूस म्हणून असणाऱ्या आपल्या अस्तित्वाचे काही आयाम अधोरेखित करतो. त्याचं असणं आवश्यकता असली, तरी त्याचं आधिक्य सद्गुणविकृती म्हणून संदेहाच्या परिप्रेक्षात अधिष्ठित केलं जातं. तसाही सद्गुण शब्दाचा प्रवासच निसरड्या वाटेवरून चालणारा. थोडा इकडे-तिकडे झाला की, तोल ढळणार हे विधिलिखित. तो जेवढा वैयक्तिक, तेवढा सार्वजनिकही. जितका सुलभ, सुगम तेवढा अवघडसुद्धा.

सद्गुणांचं संचित ओंजळीत असलं की, साहजिकच माणसाला मिरवण्याचा अधिकार प्राप्त होतो. अन्यथा मिरवणूक तर कशाचीही काढता येते. गुढ्या प्रांजळपणाच्या उभ्या राहतात. पताका वाऱ्यावर भिरभिरत राहिल्या, लोभस रंगांची उधळण करीत राहिल्या, तरी त्यांना कोणी उभं नाही करत. त्या लटकवलेल्या असतात, कुणाच्या तरी कल्पनेने अन् मनाने मानलेल्या मर्जीने. स्वातंत्र्याचे मोल जाणून घेण्यासाठी स्वतंत्र असण्याची आस अंतरी वाहती असायला लागते. स्वातंत्र्य शब्दाचे अंगभूत आयाम आकळले की, पारतंत्र्यातील मिंध्या सुखाचे एकेक अर्थ उलगडायला लागतात. केवळ निरर्थक वटवट करून विचारांचा प्रवर्तक होता येत नसतं. त्यासाठी गात्या गळ्यातला सूर अन् बोलत्या आवाजाचा शब्द होता यावं. अंगीकृत कार्यात कृतीची प्रयोजने पेरता आली की, कर्तृत्त्वाचा परिमल परिसरात पसरत राहतो, पहाटेच्या प्रसन्न प्रहरी परसदारी बहरून आलेल्या प्राजक्ताच्या परिमलासारखा. विचारधारा नितळ असल्या की, स्व शब्दाला अर्थ गवसतो. परिणत शब्दातील आनंद शोधता आला की, आयुष्याला अर्थ लाभतात. हे लक्षात घेता, माणसाकडे असणारं आत्मभानच आदरणीय असते, असे विधान केल्यास अतिशयोक्त नाही होणार, नाही का?
**

समस्या

By // No comments:

समस्या असा एक शब्द, ज्याभोवती इच्छा असो अथवा नसो, सगळ्यांनाच प्रदक्षिणा करायला लागतात. वांच्छित, अवांच्छित असल्या सोईस्कर कप्प्यांत नाही ढकलून देता येत त्यांना. समस्या इकडच्या असतात, तिकडच्या असतात, आतल्या असतात, बाहेरच्या असतात तशा अधल्या-मधल्याही असतात, प्रवाहातल्या असतात, तशाच किनाऱ्यावरच्याही असतात, कधी उथळ असतात, कधी अथांग असतात अथवा अन्य काही असू शकतात. पण त्या असतातच असतात. त्यांना काही कुणी आवतन देऊन आपल्या अंगणी आणलेलं नसतं. आगंतुक असतात त्या. अभ्यागताची पावले घेऊन चालत येतात त्या. त्यांना टाळायचे, नसतील टाळता येत तर त्यापासून पळायचे विकल्प नसतात. म्हणून की काय संदेहाची अनेक वर्तुळे त्यांच्याभोवती कोरलेली असतात. समस्यांचा गुंत्यात माणूस गुरफटला की, त्याभोवती प्रदक्षिणा घडणे क्रमप्राप्त. एका अस्वस्थ वणवणचा आरंभ असतो तो, तसा विरामही त्यातच सामावलेला असतो. काही शेवट कडवटपणा कोरून जातात, तसे काही गोडवाही ठेवून जातात स्मृतीच्या पानांवर. याचा अर्थ सगळेच शेवट गोडवा घेऊन येतात असं नाही. समस्यांच्या महाकाय बुरुजांच्याआडून डोकावणारा एखादा हलकासा मुक्तीचा कवडसा दिसला, तरी केवढं आश्वस्त वाटतं. आस्थेचा चतकोर तुकडा हाती घेऊन चौकटी पार करण्याचा माणूस प्रयत्न करतो, पण हेही काही सहज नसतं.

आपली समस्या हीच असते की, आपली समस्या नेमकी काय आहे, हेच आपल्याला उमगत नाही बऱ्याचदा. तसाही माणूस केवळ वलयांकित नसतो, तर समस्यांकितही असतो. जीवनयापन करताना समस्या समोर उभ्या ठाकल्या नाहीत, असा कुणी माणूस इहतली अधिवासास असेल असं वाटत नाही. समस्या वैयक्तिक असतात, सामूहिक असतात. त्या लहान असतात, मोठया असतात. सहज सुटणाऱ्या असतात, कधी जटिल गुंते घेऊन अमरवेलीसारख्या आयुष्याला बिलगून बसतात. जगण्याला वेढून घेतात त्या, हेही सत्यच.

समस्या कुठे नसतात? त्या सार्वकालिक असतात. त्यांची उत्तरे शोधावी लागतात. नसतील सहज हाती लागत, तर अन्य विकल्प पडताळून पाहावे लागतात. कुठल्यातरी पर्यायात त्यांचे उत्तर सापडते. समस्या सोडवणारी आयती सूत्रे नसतात. समीकरणे अवघड असली, म्हणून आयुष्याच्या पानांवर मांडलेली गणिते अशीच सोडून देता नाही येत. चुका घडत राहिल्या, तरी उत्तर हाती लागेपर्यंत आकडेमोड करावी लागते. सुटतो कधी एखादा हातचा, म्हणून प्रयत्न नको सुटायला. पुस्तकातील गणित नाही आवडत बऱ्याच जणांना. ते नाकारण्याचा पर्याय हाती असतो, पण जीवनग्रंथावर कोरलेल्या गणिताला उत्तरांच्या विरामापर्यंत पोहचवावे लागते. संख्याना अर्थ द्यावा लागतो. नवे सवंगडी, जुने सोबती, थोडी अनुभूती, थोडं आकलन सोबत घेऊन उत्तरांचा धांडोळा घ्यावा लागतो. सहकार्याचे हात शोधावे लागतात. माणसे मदतीचे हात बनून आले तरी तीही माणसे असल्याने प्रमाद घडतीलही त्यांच्याकडून. म्हणून प्रमाद काही पूर्णविराम नसतो. काही शक्यता गृहीत धरून खेळावे लागतात एकेक खेळ. फेकावे लागतात आयुष्याच्या सारीपाटावर काही फासे. चालव्या लागतात ज्ञात-अज्ञात वाटांच्या चाली. साधावा लागतो संवाद, कधी स्नेह्यांशी, कधी स्वतःशी, तर कधी सुखांशी.

संवाद आशेचे कवडसे शोधणारा विकल्प असतो. त्यांचा माग काढत चालत राहिले की, सापडते पावलापुरती वाट. संवाद आपणच आपल्याशी केलेला असेल, आपल्यांशी साधलेला असेल अथवा अन्य सूत्रांच्या माळेत ओवलेला असेल. संवादाचा शब्द सोबतीला असला की, असणे शब्दाला आशय गवसतो. प्रश्नांपासून पलायनाचे पथ सुलभ अन् प्रशस्त वाटत असले, तरी त्यांच्यावर मान्यतेची मोहर नाही ठोकता येत. आस्थेची मुळे विस्तारता आली की, ओलावा सापडतो. विश्वास, मग तो आपणच आपल्यावर केलेला असला काय अथवा व्यवस्थेवर असला काय. तो असला की, संदेह नाही राहत. काही किंतु राहू नयेत म्हणून त्या योग्यतेची उंची संपादित करायला लागते. आश्वासन दिली घेतली जातात, त्यात विश्वास असला की, अविश्वास आसपास फिरकतही नाही. हाती घेतलेले एखादे काम वाकुल्या दाखवते, तेव्हा दोष नेमका कुणाचा, हे आपणच शोधायला लागतं. केवळ कुठल्यातरी निमित्ताला कारण करून दोषांपासून विलग नाही होता येत. दोषरहित कुणी नसतो, पण दोषसहित स्वीकारांसाठी स्वतः सरळ असायला लागतं. संदेहाच्या ससेमिऱ्यापासून सुटका हवी, तर स्वच्छ असणं आवश्यक असतं.

कुठल्याशा कामात त्रुटी असणे काही लाजिरवाणे नसते, पण दोष दुर्लक्षित होणे विश्वासाची उंची कमी करणारे असते. निवड आपलीच असते, आपण कोणता विकल्प निवडायचा. सगळ्याच समस्यांना हलक्याने घेऊन चालत नाही. कारण काही कारणे कारणासह येतात, काही विनाकारण. त्यांचे निराकरण करणे, हेच विचारांचे प्रयोजन असायला लागते. समजा तरीही काही किंतु राहिलेच असतील शिल्लक, तर संवादातून उत्तरे गवसतील. चर्चा, मते, विचार यांची बेरीज म्हणजे उत्तर असते, नाही का?

व्यक्त आणि अव्यक्त यात केवळ एका मात्रेचे अंतर आहे अन् ते पार करता येतं त्यांना स्पष्टीकरणे द्यायची आवश्यकता नसते. संदर्भ समजले की, स्पष्टीकरणाचे अर्थ उलगडत जातात. फक्त त्यांची उकल करण्याचं कौशल्य अवगत करण्याइतकं व्यापकपण अंतरी नांदते असायला लागते. कधी कधी भूमिका उत्तम असते, हेतू उदात्त असतो, विचार खूप चांगला असतो; पण व्यवस्थेने आखून दिलेली अथवा आपण भोवती कोरून घेतलेली एक चौकटही आसपास नांदती असते. तिच्या मर्यादा पार करता येणे जमले की, विचार वाहते राहतात. वाहते राहण्यासाठी पुढच्या वळणाकडे सरकत राहावे लागते. विचलित होऊन उपलब्ध विकल्प हाती नाही लागत. कार्याप्रती समर्पण सात्विकतेच्या परिभाषा लेखांकित करते. समस्येचे सम्यक आकलन नसेल घडत, तर प्रश्नांकडे पाहण्याचे ठिकाण बदलून पाहावे लागते. बदललेले ठिकाण कोन बदलते अन् बदललेला कोन पाहण्याचा दृष्टिकोनही बदलवतो. फक्त त्याकडे पाहताना डोळ्यात नितळपण असावं. विचारांत निर्व्याजपण राहावं आणि आचरणात निखळपण नांदतं असावं. अंतर्यामी आस्थेचा ओलावा वाहता असला की, उगवून येण्याचे अर्थ आपोआप आकळतात.

समस्यांपासून सुटका करण्यासाठी अंतरावर उभं राहून नाही चालत; त्यांच्या अंतरंगात पोहचावं लागतं. नदीच्या पात्राची खोली अनुभवल्याशिवाय कशी कळेल? पाण्याचा अंदाज येण्यासाठी पात्रात उडी घ्यावी लागते. नसेल तरंगता येत, तर पेलून धरणारी साधने घेऊन त्याचा अदमास घ्यावा लागतो. किनाऱ्यावर उभं राहून प्रवाहाचे गोडवे गायलेत, म्हणून पाणी मधुर होत नसते. त्यात तो गोडवा अंगभूत असतो. का, किती, केव्हा, कसे? हे प्रश्नही असेच असतात. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांच्या अथांग पात्रात उडी घ्यावीच लागते, नाही का?
••

असंच का?

By // No comments:
एखादा कोणी असाच का वागतो? या प्रश्नाचे उत्तर शोधणे अवघड आहे. गवताच्या गंजीत सुई शोधण्याचा प्रकार म्हणा हवं तर याला. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणून काही गोष्टी कोणी काळाच्या ओटीत टाकून देतो. कुणी फारसे महत्त्व नाही देत अशा काही गोष्टींना. काहींना काहीच कर्तव्य नसते काही गोष्टींशी. पण काहींना कारण नसताना खोदकाम करायची सवय जडलेली असते. कुदळ हाती घेऊन तयारच असतात ते. अर्थात, अशा वागण्यातून त्यांच्या हाती काय लागते, त्यांनाच माहीत. पण दिसलं कुठे थोडं काही न्यून की, कर आणखी गाजावाजा, असा स्वभावच असतो काहींचा. हे चूक की बरोबर, याच्याशी काही एक देणे-घेणे नसते त्यांना. छिद्रान्वेषीवृत्ती एकदा का विचारांचा भाग बनली की, विस्तीर्ण आभाळाच्या निळाईतही व्यंग दिसतं, झुळझुळ वाहत्या पाण्याचा नादही कर्कश वाटतो, वाऱ्याचा आल्हाददायक गारवाही झोंबतो अन् पक्षांचा गाता गळाही कुरूप वाटतो. एखाद्याला नकाराचं लेबल लावायचं ठरवलं की, किमतीचे टॅग क्षुल्लक वाटायला लागतात, हेच खरं. अशा संकुचित मानसिकतेने वागणाऱ्यांच्या हाती कुठल्या आंतरिक समाधानाचे स्रोत लागतात, त्यांनाच ठाऊक. थोडक्यात, आपलं तेवढं खरं, बाकी सगळं बेगडी वगैरे ठरवणारी मानसिकता म्हणता येईल अशा वागण्याला.

कुणाच्या वागण्याच्यापद्धतीवरून एखादा माणूस पूर्णपणे आकळतोच असं नाही. खरंतर माणूस समोर दिसतो, तसा असेलच असं नाही आणि असेल तसा वागेलच, याची शाश्वती नाही. तो वाटतो तितका प्रत्येकवेळी निर्व्याज, नितळ, निखळ वगैरे असेलच असं नाही आणि असायलाच हवा, असंही नसतं काही. तो माणसांच्या घोळक्यात सतत वावरत असेल, म्हणून लोकप्रिय आणि माणसांना टाळत असेल तर आत्मकेंद्रित, असं तर नसतंच नसतं. त्याचं तसं वागणं कदाचित प्रासंगिकतेचा परिपाक असू शकतो अथवा तसं असणं परिस्थितीनिर्मित असू शकतं. काहींना सगळ्याच गोष्टीत चार हात अंतर राखून राहण्यात आवडतं. काही मर्यादांची कुंपणे कोरून घेतात भोवती. काहींना आपली वर्तुळे सुरक्षित वाटतात. काही पलीकडे जाऊन डोकावून येतात. तर काही मर्यादांची सूत्रेच नव्याने शोधून आणतात. आपल्या आकलनाच्या पलीकडले विश्व आपल्या आनंदासाठी नाही अशी समजूत करून घेतलेली असते काहींनी. कुणाला माणसांचा राबता आसपास असण्यात आनंद गवसतो, तर कोणाला माणसांच्या गजबटाला टाळून. एखादा माणसांच्या कोलाहलापासून पळायला लागला की, त्यावर माणूसघाणा असल्याची मोहर ठोकून आपण मोकळे होतो. अर्थात, असे मत तयार करताना आपण इतर बाजूंचा फारसा विचार करत नाहीत. तो अमका-तमका तसाच आहे. त्याला माणसांच्या मतांची पर्वा नाही. माणूस टाळून माणूस समजू पाहतोय तो. कसं शक्य आहे? असं कुणी वागतं का? उगीचच स्वतःला ग्रेट वगैरे प्रकारातला समजतो. माज करण्याइतकं असं काय आहे त्याच्याकडे? परिस्थितीने एवढा पोळला गेला, तरी त्याचा उन्माद काही तसूभरही कमी होत नाही, वगैरे वगैरे.

निकषांच्या लहानमोठ्या मोजपट्ट्या घेऊन काही तयारच असतात, केव्हा याच्याभोवती आपल्या मापाच्या दोऱ्या गुंडाळतो म्हणून. आपल्या खुजेपणाच्या पट्ट्या लावून कोणी कोणाची तरी उंची काढू पाहतो. समजा तुमच्या विचारांच्या परिघात तो नसेलही सामावत, म्हणून त्याचं असणं तसंच असतं, असं कोणी सांगितलं? तुमच्या स्वयंघोषित परिमाणात तो सामावयालाच हवा का? ज्यास तुम्ही शिष्टपणा संबोधतात, तो त्याच्या व्यक्तित्वाचा भाग असू शकत नाही का? किंवा ज्यास तुम्ही तुसडेपणा म्हणून अधोरेखित करतात, दीडशहाणा असणं म्हणतात, त्याला कुणी सुरक्षित अंतर समजत असेल, तर त्यात वावगं काय आहे? काहीच नाही. सदासर्वकाळ माणसांच्या कोलाहलात माणसांनी आपले आवाज मिसळून बोलावं, वागावं असं काही असायलाच हवं असं नाही. मान्य की, माणूस समाजशील, समूहप्रिय वगैरे प्राणी आहे. आसपास कोणी असणं त्याची भावनिक गरज आहे, म्हणून तो हे सगळं काही काळ टाळून जीवनयापन करू शकत नाही का? समजा तो तसा काहीसा असला, तरी समूहातील सगळेच प्राणी समूहाच्या मानसिकतेचे तंतोतंत निर्वहन करतात, असं कुठे आहे? सामूहिक आणि वैयक्तिक मानसिकतेत अंतराय असतं, हे मान्य करायला संदेह असायलाच हवा का?

काहींना एकांत प्रिय वाटत असेल, काहींना लोकांत आपला वाटत असेल, तर निवडीचे स्वातंत्र्य त्याचेच असते, नाही का? त्याच्यापुरती विशिष्ट विचारधारा निवडून तो वर्तत असेल, तर त्यात वाईट ते काय? तुमच्या विचारांची चाके लावून त्याने पळायला हवं का? माणसांच्या गर्दीत राहणारे सगळेच दर्दी अन् गर्दी टाळून आपणच आपल्याला शोधणारे कोलाहलाची सर्दी झालेले असतात, असं कुणी सांगितलं? कुणी कुठे राहावं, कसं असावं, कसं नसावं, हा सगळा वैयक्तिक निवडीचा भाग. आपल्याच कोशात वास्तव्य करणं अन् आपणच घालून घेतलेल्या मर्यादांच्या कुंपणाभोवती प्रदक्षिणा करणं, ही काही त्याच्या व्यक्तित्वाची पूर्ण व्याख्या नाही होऊ शकत. तसंही माणसांच्या गर्दीत राहून माणूसपण कळतेच असे नाही. गर्दीचा भाग बनून स्वार्थ शोधणाऱ्या बगळ्यांपेक्षा कुठल्यातरी एकांतस्थळी विहरणाऱ्या पाखरांचा पैस अधिक असू शकत नाही का? स्वार्थाच्या परिघाभोवती फेऱ्या करण्यापेक्षा आकाशाला पंखावर घेण्यासाठी केलेल्या प्रदक्षिणाचे मोल अधिक असते, नाही का?

तसेही माणसांत राहून विकारांपासून विलग होता येत नसेल, तर आपण अलग होऊन आपल्या वर्तुळात विहार करणे अधिक श्रेयस्कर असते. गर्दीत हरवलेला चेहरा शोधण्यापेक्षा, आहे तो चेहरा आणखी देखणा करणे अधिक चांगले नसते का? आपलीच आपण आरास मांडून मखरात मंडित होण्यापेक्षा आस्थेच्या मुक्त रंगात माखणे अधिक मोहात पाडणारे असते. स्वार्थपुरीत विचारांना सामाजिकतेच्या धाग्यांनी विणलेल्या रंगीबेरंगी झुलींखाली झाकून मिरवत राहण्यापेक्षा, आहे ते आणि आहे तसे असणे अधिक देखणे असते नाही?

तुम्ही कोण? हा प्रश्न महत्त्वाचा नाही, तुम्ही कसे? ते अधिक मोलाचे असते. एखाद्याची किंमत कुणी कशी करावी, याची काही सुनिश्चित परिमाणे नसतात. असतात ते स्वनिर्मित निष्कर्ष. निष्कर्ष काही माणूस आंतर्बाह्य समजण्याचे प्रमाण नसते. असतं ते केवळ अमूर्त एकक, ज्याला जर-तरचा अध्याहृत अर्थ तेवढा असतो. तसेही सजीवांच्या वर्तनव्यवहारांचे कोणतेच निष्कर्ष अंतिम नसतात. ते परिवर्तनीय असतात. निर्णयाप्रत पोहचण्यासाठी प्रयोग करावे लागतात. काही अनुमान अधोरेखित करावे लागतात. प्रत्येकवेळी ते वेगळे असू शकतात. मग माणूस तरी यास अपवाद कसा? अपवाद आले की, प्रवाद पसरतात. प्रवाद संवादाचे सेतू बनले की, अनुमानांना अर्थ गवसतो. संवादाचे किनारे सुटले की, वितंडवाद उभे राहतात अन् वादाचे प्रवाह दुथडी भरून वाहतात. परिवर्तनप्रिय विचार सौहार्दाच्या गगनात आपलं सदन उभं करतो, हे खरं असलं, तरी परिवर्तनाचा प्रवास म्हणजे काही प्राक्तन नसतं, परिस्थितीने पेरलेला प्रयत्नांचा परिपाक असतो तो, नाही का?
••

काळ

By // 2 comments:
स्मृतींचे किनारे धरून वाहणारा सगळाच भूतकाळ रम्य नसतो अन् शक्यतांच्या वाटांनी चालत येणारा भविष्यकाळही काही सगळाच सुंदर असतो असे नाही. भूतवर्तमानभविष्याच्या परिभाषेत काळाचा कुठलातरी तुकडा कोंडला, म्हणून तो काही कातळावर कोरलेल्या देखण्या शिल्पकृतीसारखा आखीव रेखीव होत नसतो? तो निराकार आहे. त्याला समजून घेण्याचा, आकार देण्याचा प्रयास माणूस करत आला आहे, हेही कालातीत सत्य. काळाचे तुकडे वेचण्याचे त्याचे प्रयास पुढे जावून संपतील असे नाही. स्मृतीच्या कोशात विहरणारे विचार काळाच्या बऱ्या-वाईट प्रतिमा मनाच्या प्रतलावर कोरतात. आकलनाच्या एकेक बिंदूना जोडत माणसं त्याचे चित्र तयार करीत राहतात. आकांक्षांचे रंग त्याच्या रित्या चौकटीत भरून त्याला देखणं करू पाहतात.

विशाल प्रस्तरावरून कोसळणाऱ्या प्रपातासारखा असतो काळ. प्रवाहाचं कोसळणं पाहताना कितीही देखणं वगैरे वाटत असलं, तरी प्रचंड आवेगाने कोसळणाऱ्या जलौघात काही कोणी उभं नाही राहत. कोसळणं, शतखंडित होणं, विखरून वाहणं त्याचं भागधेय असतं म्हणा हवं तर. काळ काही वस्तू नाही, नकोय म्हणून घेतली हाती की, दिली भिरकावून. लहान लेकराने खेळणी हाती घेऊन निरखत राहावे. कुतूहल असेपर्यंत खेळत राहावे अन् जिज्ञासा संपली की, जावे विसरून. इतकं सहजही नसतं त्याचं असणं. खरंतर तोच खेळत राहतो माणसांशी. त्याचे खेळ कधी, कुठे अन् कसे असतील, हे त्यालाही ठावूक असतं की नाही, त्यालाच माहीत. तो दाखवता येत नसला, तरी त्याच्या असण्याला नाकारता नाही येत. काळ कालातीत वगैरे आहे, असं म्हटलं जातं. अर्थात, तेही कालसंगतच आहे. आहे तसा अन् पदरी पडला तसा, त्याला स्वीकारण्याशिवाय विकल्पच असतो कुठे माणसाकडे.

भूतकाळ स्मृतीची वाकळ पांघरून कुठेतरी अंधाराच्या कुशीत पहुडलेला असतो. अपेक्षांची भरजरी वसने परिधान करून भविष्य शक्यतांच्या पटलाआड दडलेलं असतं. क्षणपळांची सोबत करीत आपल्याच धुंदीत पुढे निघण्याच्या घाईत असणारा वर्तमान हाती लागतो न लागतो, तोच निसटतो. त्याचा प्रवासच निसरड्या वाटांवरचा. आहे तेवढा तुकडा हाती घेऊन तोल सांभाळत त्याच्या सोबत चालता आलं, त्याला आयुष्याचा ताल कळतो. पण वास्तव तर हेही आहे की, कळणे आणि वळणे यात काही पावलांचं अंतर असतं. ते अपेक्षानुरूप पार करता आलं की, आयुष्याचे अर्थ उलगडू लागतात. खरं तर हा वर्तमानच अज्ञाताच्या पटलाआड दडलेल्या कहाण्या शोधण्यास प्रेरित करीत राहतो. भविष्याच्या गगनात चमकणारी आकांक्षेची अगणित नक्षत्रे खुडून आणण्यासाठी खुणावत राहतो. पर्वत पायथ्याशी टेकलेल्या क्षितिजावर विलसणाऱ्या रंगांचे विभ्रम मनाला संमोहित करीत राहतात, त्यांच्या प्रतिमा अंतरी कोरत राहतो.

भूतकाळ कधीच हातून निसटून स्मृतीच्या कोंदणात अधिष्ठित झालेला. भविष्य अपेक्षांच्या धुक्यात विहार करीत शक्यतांच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करीत असते. वर्तमान तेवढा आकांक्षेची ओझी वाहत राहतो. भूतकाळ रम्य आठवणींचा गोतावळा जमा करून मनात नांदता असतो. भविष्य सुखांची संकल्पित स्वप्ने पाहत कुठल्यातरी क्षितिजावर स्मितहास्य करीत साद घालत असतो. आहे ते असे आहे, हे सांगणारा वर्तमानच सत्य, बाकी सगळे सायास-प्रयास आपणच आपल्याला उलगडण्याचे. वर्तमान कसा असावा अथवा नसावा, याच्या काही सुनिश्चित परिभाषा नसतात. संगतीचे-विसंगतीचे किनारे धरून तो सरकत राहतो. त्याचं असणं-नसणं प्रत्येकवेळी ठरवता येतंच असंही नाही. असं असलं तरी त्याला अपेक्षांच्या कोंदणात कोंडून ठेवता येतं; पण हेही निमिषमात्र अन् निमित्तमात्र. काळाला आकांक्षांनुरूप आकार देणे अवघड. त्याला निर्धारित करणारी परिमाणे नसली, तरी परिणाम देता येतात. त्याच्या असण्याला अपेक्षित आयाम देता आले की, आयुष्याचे एकेक अर्थ आकळायला लागतात.

वर्तमानाला फक्त प्रयासांच्या परिभाषा अवगत असतात. प्रयत्नांच्या वाटेवर पडलेल्या पावलांच्या पदरवास तो प्रतिसाद देतो. असं असलं तरी सगळ्यांनाच त्याला साद घालणे जमते असे नाही. काळाचे हात धरून चालणे जमले, तरी जुळवून घेणे जमेलच याची शाश्वती नसते. कळत-नकळत काहीतरी घडतं-बिघडतं अन् मांडलेला खेळ मोडतो. विसकटत जातात त्याची एकेक पाने अन् भरकटत राहतात डहाळीवरून निखळलेल्या पानासारखे दिशाहीन, वारा नेईल तिकडे. प्रमादाच्या पथावर पडलेली पावले पराभवाचं शल्य अंतरी गोंदवून जातात. यशापयशामागे प्रासंगिक प्रमाद निमित्त ठरत असले, तरी पराभवाचे अध्याय लेखांकित करायला ते एकच कारण पुरेसे असते असंही नाही. निमित्ते म्हणा किंवा प्रासंगिकता म्हणा, परिस्थिती म्हणा अथवा आणखी काही; ती काहीही असू शकतात, नाही असे नाही. ती एकेकटी चालत आलेली असतील अथवा आपणच आवतन देवून आणलेली. ती नियतीने निर्धारित केलेली असतील, निसर्गनिर्मित असतील अथवा आणखी काही. त्यांचे असणे-नसणे परिस्थितीचा परिपाक असू शकतो.

वर्तमान कसा असावा अथवा नसावा, हे निश्चित करण्यासाठी पदरी पडलेल्या काळाच्या तुकड्याचे अन्वयार्थ लावण्याइतकं सुज्ञपण अंतरी धारण करता यायला हवं. ते आलं की, काळाची गणिते सोडवण्यासाठी आवश्यक असणारी परिमाणे गवसतात. पण याचा अर्थ असाही नाही की, उत्तरांपर्यंत पोहचण्यासाठी वापरलेली सगळीच सूत्रे समोर मांडलेल्या समीकरणांची उकल करतात. गुंते सोडवणाऱ्या अर्थांची उकल करण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रयत्नपूर्वक अवगत करायला लागतात. ती अभ्यासाने आकळतात. सरावाने सख्य साधता येतं त्याच्याशी. परिशीलनाने त्यांच्यासह प्रकट होता येतं. अभ्यास शोध असतो, आपणच आपला घेतलेला. तपास असतो कळत-नकळत केलेल्या गफलतींचा, धांडोळा असतो घडलेल्या प्रमादांचा, मागोवा असतो आपणाकडून झालेल्या मूर्खपणाचा. चिंतन असते ते, आकांक्षांच्या गगनात विहार करणारी पाखरे परागंदा होऊ नयेत म्हणून कराव्या लागणाऱ्या प्रयासांचे. चिंता असते मर्यादांचे अर्थ हरवू नयेत याची. पथ असतो मुक्कामाच्या ठिकाणांपर्यंत पोहचण्याचा.

अर्थात, आयुष्याला सामोरे जातांना सगळंच काही पर्याप्त असेल तेच अन् तेवढेच घडेल, अशी अपेक्षा कोणी ठेवत नसलं, तरी धवल असं काही पदरी पडावं, ही कामना अंतरी अधिवास करून असतेच ना! भावनांच्या प्रवाहात स्वतःला सामावून घेता आलं की, बहरण्याचे एकेक अर्थ कळत जातात. आपलेपणाचा ओलावा अंतरी अधिवास करून असला की, नात्यांचे अन्वय आकळत जातात. मनात भावनांचं गाव नांदतं असलं की, आपणच आपल्याला नव्याने उलगडत जातो. पण परिस्थितीच्या आघातांनी भोवती नांदणारे परगणेच ओसाड पडले असतील तर... परिस्थिती परिवर्तनाच्या प्रतीक्षेशिवाय माणूस करूच काय शकतो? काळ तसाही काही कोणाचा सखा नसतो. त्याचं सख्य पुढे पळणाऱ्या क्षणाशी. त्याचा हात धरून, तो धावत असतो. त्याच्याशी संवाद करता आला, ते पुढच्या वळणावर विसावतात. त्याला प्रतिसाद नाही देता आला, ते परिस्थितीच्या पटलाआड जातात. विसंवादी असणाऱ्यांवर काळच विस्मृतीच्या वाकळीं घालतो.

सगळ्याच गोष्टी काही सरळ रेषेत स्वतःहून चालत येवून आयुष्यात विसावत नसतात. आवतन घेऊन आलेल्या नसतात त्या. सांगावा नसतो कुणी पाठवलेला तो. सुखं नांदत्या पावलांनी येवून आपल्या अंगणी नाही उभी राहत. शेकडो वर्षांपासून माणूस समाधानाच्या परिभाषा शोधतो आहे. ते मिळावं म्हणून धांडोळा घेतोच आहे. पण अद्याप ते काही त्याच्या हाती लागले नाही. लागले असते हाती, तर कशाला अज्ञात परगण्यांचे किनारे धरून पळत राहिला असता? काळाची समीकरणे सोडवताना कुणाचा कुठलातरी हातचा सुटतो अन् गणित चुकतं. खरंतर काळ नावाची गोष्ट ही अशी अन् अशीच असते, म्हणून दाखवता नाही येत. त्याचं असणं-जाणवणं एक अमूर्त अनुभूती असते. त्याच्या असण्या-नसण्याचे अन्वयार्थही लावता येतात. पण हाती लागलेल्या त्याच्या तुकड्यातून आयुष्याला अर्थपूर्ण करणारी सूत्रे सगळ्यांनाच गवसत असतात असं नाही. जगण्याला वेढून बसलेल्या अन् मूर्त-अमूर्ताच्या झोक्यांवर झुलणाऱ्या तुकड्यांच्या सोबत अव्याहत झोके घेणे प्राक्तन आहे माणसाचं.

काळाच्या अफाट पसाऱ्यातील कुठल्यातरी तुकड्यात आपल्या ओंजळभर आयुष्याचा चिमूटभर अध्याय लिहला जातो. काहींचे जीवनग्रंथ काळच आपल्या हाताने सजवतो. त्याने गोंदलेल्या खुणा कर्तृत्व बनून चमकत राहतात. काहींच्या जीवनग्रंथावर चारदोन ओळी लेखांकित होतात. काहींची पाने कोरीच राहतात. काहींच्या कहाण्या काळाच्या कुशीत हरवतात. काहीं समोर येतात अन् एक आश्वस्तपण अंतरी जागवतात. काही कवडसा बनून पावलापुरती वाट उजळत राहतात. दिवस, महिने, वर्षांची धूळ साचत जाते. विस्मृतीचा अंधार गडद होत जातो. काळ आपल्याच नादात खेळत राहतो. कुणी पथ चुकलेला पांथस्थ कधीतरी येतो. अनामिक बनून पडलेल्या ग्रंथाची काही पाने त्याच्या हाती लागतात. त्यावर जमा झालेले धुळीचे थर कुतूहल म्हणून कुणी झटकतो. कुणी कोरून ठेवलेल्या ओळी वाचतो. कुणी शोधत राहतो अक्षरांचे अर्थ. उलटत जातात एकेक पाने अन् उलगडत जातात काळाच्या कुशीत विसावलेल्या कहाण्यांचे काही अर्थ. समोर येतात काही हवे असणारे-नसणारे संदर्भ. आकळत जातात अन्वयार्थ. त्यांना असतं आठवणींचं कोंदण अन् भावनांचं गोंदण. समोरच्या पसाऱ्यात विखरून पडलेले एकेक बिंदू सांधले जातात, जुळत जातात एकेक रेषा अन् साकारते एक चित्र. कधी अर्थांची चौकट घेऊन, तर कधी चौकट हरवलेलं. हाती लागलेल्या तुकड्यातून गोळा केले जातात एकेक धागे. उपसल्या जातात तर्काच्या राशी. ढवळून काढला जातो प्रवाह. घेतले जातात गोते तळ गाठण्यासाठी. लागतं काही हाती. पण बरंच निसटून जातं. तरीही शोधत राहतात माणसे काहीना काही.

काळाची सोबत करीत पडलेल्या अज्ञात परगण्यातील रहस्यांना जिज्ञासेची लेबले लावून उपसले जातात एकेक ढिगारे. सापडतात कधी आपलेच काही अवशेष अंधाराची चादर ओढून निजलेले. जागी असणारी माणसे अंधाराला जागवतात. कवडशाच्या सोबतीनं चालत राहतात. आपलं असणं-नसणं पाहतात. परत मांडतात. तुलना करून पारखून घेतात आयुष्याला. अज्ञाताच्या कुशीत शिरून काढू पाहतात आपल्या अस्तित्वाचे अंश. शोधून पाहतात आपल्या सभ्यतेच्या संदर्भांना. धांडोळा घेतात संस्कृती नावाच्या प्रवासाचा. लावतात अर्थ संस्कार बनून वाहणाऱ्या प्रवाहाचे नव्याने. अदमास घेत राहतात. अनुमानाच्या चौकटीतून काही हाती आलेले, कधी हवे असलेले शोधत राहतात. वेचू पाहतात अंधाराच्या विस्तीर्ण पटावर चमकत पडलेली नक्षत्रे. पण तरीही अंधार असतोच आसपास नांदता. किती उपसावा त्याला? शतकांची साचलेली रहस्ये किती खोदावीत? गणती नाही करता येत सगळ्याच गोष्टींची अन् शोधताही नाही येत सगळंच विचारांच्या वर्तुळात वसतीला उतरलेलं. तरीही आस्थेची पणती हाती घेऊन वाट तुडवत राहतात माणसे. काळाच्या विवरात काय काय दडले असेल? हा प्रश्न काही त्याला स्वस्थ बसू देत नाही. किती गोष्टी अज्ञाताचा हात धरून दृष्टीआड झाल्या असतील? कोणास ठावूक?

आसपास वसतीला असलेला अंधार प्रकाशाइतकंच प्रखर सत्य. पण उजेडाची आस अंतरी असणंही वास्तवच. हे वास्तवच जगण्याची प्रेरणा असते. धुक्याची चादर ओढून निवांत पहुडलेल्या क्षितिजावर चमकणाऱ्या आकांक्षांच्या नक्षत्रांकडे पाहत माणूस चालत असतो. ती खुडून आणायची आस अंतरी नांदती असते त्याच्या. तेथे पोहोचणाऱ्या वाटा शोध असतो, आपणच आपला घेतलेला. आपल्याला नव्याने समजून घेण्यासाठी वणवण असते ती. परीक्षा असते संयमाची. लपलेल्या असतात अनेक सुप्त कांक्षा तेथे. त्या वैयक्तिक असतील अथवा अनेकांनी मनाच्या मखरात मंडित केलेल्या. कुठला तरी नाद अंतरी नांदत असतो. त्याची स्पंदने साद देत राहतात. तो संमोहित करीत राहतो.

काळ काहींच्या आस्थेचा विषय असतो. काहींचा परिशीलनाचा, तर काहींचा अभिनिवेशाचा. काहींना अस्मितेचे धागे गवसतात त्याच्या अफाट पसाऱ्यातून. काहींना माणूस नावाच्या अस्तित्वाचा अर्थ. कोणास आणखी काही. पण त्याची समीकरणे एवढी साधीही नसतात, जितका त्यास आपण समजतो. कधी त्याचा गुंता जटिल होत जातो. कधी उलगडत जातात एकेक पदर. त्याला शोधतांना लागतं काही हाती. तरीही बरंच काही निसटतं. लागलाच एखादा तुकडा हाती की, अनुमानांच्या पात्रातून वाहत राहतो तो. शोधू पाहतो कुणी त्यातून आपला उन्नत, उर्ज्वस्वल वगैरे वारसा. गवसलाच एखादा संदर्भ की, तर्काचे किनारे धरून वाहू लागतो त्याचा प्रवाह. काहींना सापडतात त्यात आपले अहं. काहींना अवकाळी श्रेष्ठतेचा साक्षात्कार वगैरे होतो अन् पूर्वी कधीतरी प्राप्त केलेल्या प्रगतीचे पंख लावून अभिनिवेशांचा आसमंतात प्रवास सुरू होतो. अस्मिता वगैरे नावाच्या गोंडस झुली टाकून तो सजवला जातो. पडद्याआड पडलेला माणूस आणला जातो समोर. त्याच्या महात्म्याचे, कर्तृत्वाचे अध्याय अधोरेखित केले जातात. आवळले जातात एकेक सूर काळाच्या कोशात विसावलेल्या समृद्धीचे. प्रगतीच्या परिभाषा नव्याने पाहून घेतल्या जातात. कधीकाळी हे  आपल्याकडे असल्याचे सांगताना अभिनिवेशाला अस्मितेच्या वर्तुळात स्थानापन्न केले जाते. परिशीलन बाजूला पडते अन् उरतो प्रसिद्धीपरायण उथळपणा.

प्रवाहांना साचलेपण आले की, वाहण्याचे अर्थ हरवतात. साचलेपणात काहींना समृद्धीची सूत्रे सापडतात. सूत्रांचा संदर्भ सम्यक जगण्याच्या समीकरणांशी जुळवला जातो. काळाच्या कुशीत दडलेल्या यशाच्या व्याख्या नव्याने लेखांकित करून, आपणच निर्माण केलेल्या निकषांच्या निर्धारित चौकटीत अधिष्ठित केल्या जातात. अभावाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करणारा माणूस मात्र जिथे होता तिथेच राहतो. चौकटींतून मुक्तीची प्रतीक्षा करीत साद देत उभा असलेला नाही दिसत तो. निनादणाऱ्या आवाजाचे अर्थ नाही आकळत. अभ्युदयार्थ आवळले जाणारे आवाज आतच कुठेतरी अडतात. कुठला काळ असा होता की, आयुष्याचे अवघे अन्वयार्थ आकळले होते? अभाव तेव्हाही होता. आताही आहेच, पुढेही तो असणारच आहे. पण सत्य हे आहे की, प्रभावाच्या परिभाषा बेगडी अभिनिवेशात बंदिस्त झाल्या की, वास्तव दुर्लक्षित होते. हाही काळाचाच परिपाक असावा का?
••