काळ

By
स्मृतींचे किनारे धरून वाहणारा सगळाच भूतकाळ रम्य नसतो अन् शक्यतांच्या वाटांनी चालत येणारा भविष्यकाळही काही सगळाच सुंदर असतो असे नाही. भूतवर्तमानभविष्याच्या परिभाषेत काळाचा कुठलातरी तुकडा कोंडला, म्हणून तो काही कातळावर कोरलेल्या देखण्या शिल्पकृतीसारखा आखीव रेखीव होत नसतो? तो निराकार आहे. त्याला समजून घेण्याचा, आकार देण्याचा प्रयास माणूस करत आला आहे, हेही कालातीत सत्य. काळाचे तुकडे वेचण्याचे त्याचे प्रयास पुढे जावून संपतील असे नाही. स्मृतीच्या कोशात विहरणारे विचार काळाच्या बऱ्या-वाईट प्रतिमा मनाच्या प्रतलावर कोरतात. आकलनाच्या एकेक बिंदूना जोडत माणसं त्याचे चित्र तयार करीत राहतात. आकांक्षांचे रंग त्याच्या रित्या चौकटीत भरून त्याला देखणं करू पाहतात.

विशाल प्रस्तरावरून कोसळणाऱ्या प्रपातासारखा असतो काळ. प्रवाहाचं कोसळणं पाहताना कितीही देखणं वगैरे वाटत असलं, तरी प्रचंड आवेगाने कोसळणाऱ्या जलौघात काही कोणी उभं नाही राहत. कोसळणं, शतखंडित होणं, विखरून वाहणं त्याचं भागधेय असतं म्हणा हवं तर. काळ काही वस्तू नाही, नकोय म्हणून घेतली हाती की, दिली भिरकावून. लहान लेकराने खेळणी हाती घेऊन निरखत राहावे. कुतूहल असेपर्यंत खेळत राहावे अन् जिज्ञासा संपली की, जावे विसरून. इतकं सहजही नसतं त्याचं असणं. खरंतर तोच खेळत राहतो माणसांशी. त्याचे खेळ कधी, कुठे अन् कसे असतील, हे त्यालाही ठावूक असतं की नाही, त्यालाच माहीत. तो दाखवता येत नसला, तरी त्याच्या असण्याला नाकारता नाही येत. काळ कालातीत वगैरे आहे, असं म्हटलं जातं. अर्थात, तेही कालसंगतच आहे. आहे तसा अन् पदरी पडला तसा, त्याला स्वीकारण्याशिवाय विकल्पच असतो कुठे माणसाकडे.

भूतकाळ स्मृतीची वाकळ पांघरून कुठेतरी अंधाराच्या कुशीत पहुडलेला असतो. अपेक्षांची भरजरी वसने परिधान करून भविष्य शक्यतांच्या पटलाआड दडलेलं असतं. क्षणपळांची सोबत करीत आपल्याच धुंदीत पुढे निघण्याच्या घाईत असणारा वर्तमान हाती लागतो न लागतो, तोच निसटतो. त्याचा प्रवासच निसरड्या वाटांवरचा. आहे तेवढा तुकडा हाती घेऊन तोल सांभाळत त्याच्या सोबत चालता आलं, त्याला आयुष्याचा ताल कळतो. पण वास्तव तर हेही आहे की, कळणे आणि वळणे यात काही पावलांचं अंतर असतं. ते अपेक्षानुरूप पार करता आलं की, आयुष्याचे अर्थ उलगडू लागतात. खरं तर हा वर्तमानच अज्ञाताच्या पटलाआड दडलेल्या कहाण्या शोधण्यास प्रेरित करीत राहतो. भविष्याच्या गगनात चमकणारी आकांक्षेची अगणित नक्षत्रे खुडून आणण्यासाठी खुणावत राहतो. पर्वत पायथ्याशी टेकलेल्या क्षितिजावर विलसणाऱ्या रंगांचे विभ्रम मनाला संमोहित करीत राहतात, त्यांच्या प्रतिमा अंतरी कोरत राहतो.

भूतकाळ कधीच हातून निसटून स्मृतीच्या कोंदणात अधिष्ठित झालेला. भविष्य अपेक्षांच्या धुक्यात विहार करीत शक्यतांच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करीत असते. वर्तमान तेवढा आकांक्षेची ओझी वाहत राहतो. भूतकाळ रम्य आठवणींचा गोतावळा जमा करून मनात नांदता असतो. भविष्य सुखांची संकल्पित स्वप्ने पाहत कुठल्यातरी क्षितिजावर स्मितहास्य करीत साद घालत असतो. आहे ते असे आहे, हे सांगणारा वर्तमानच सत्य, बाकी सगळे सायास-प्रयास आपणच आपल्याला उलगडण्याचे. वर्तमान कसा असावा अथवा नसावा, याच्या काही सुनिश्चित परिभाषा नसतात. संगतीचे-विसंगतीचे किनारे धरून तो सरकत राहतो. त्याचं असणं-नसणं प्रत्येकवेळी ठरवता येतंच असंही नाही. असं असलं तरी त्याला अपेक्षांच्या कोंदणात कोंडून ठेवता येतं; पण हेही निमिषमात्र अन् निमित्तमात्र. काळाला आकांक्षांनुरूप आकार देणे अवघड. त्याला निर्धारित करणारी परिमाणे नसली, तरी परिणाम देता येतात. त्याच्या असण्याला अपेक्षित आयाम देता आले की, आयुष्याचे एकेक अर्थ आकळायला लागतात.

वर्तमानाला फक्त प्रयासांच्या परिभाषा अवगत असतात. प्रयत्नांच्या वाटेवर पडलेल्या पावलांच्या पदरवास तो प्रतिसाद देतो. असं असलं तरी सगळ्यांनाच त्याला साद घालणे जमते असे नाही. काळाचे हात धरून चालणे जमले, तरी जुळवून घेणे जमेलच याची शाश्वती नसते. कळत-नकळत काहीतरी घडतं-बिघडतं अन् मांडलेला खेळ मोडतो. विसकटत जातात त्याची एकेक पाने अन् भरकटत राहतात डहाळीवरून निखळलेल्या पानासारखे दिशाहीन, वारा नेईल तिकडे. प्रमादाच्या पथावर पडलेली पावले पराभवाचं शल्य अंतरी गोंदवून जातात. यशापयशामागे प्रासंगिक प्रमाद निमित्त ठरत असले, तरी पराभवाचे अध्याय लेखांकित करायला ते एकच कारण पुरेसे असते असंही नाही. निमित्ते म्हणा किंवा प्रासंगिकता म्हणा, परिस्थिती म्हणा अथवा आणखी काही; ती काहीही असू शकतात, नाही असे नाही. ती एकेकटी चालत आलेली असतील अथवा आपणच आवतन देवून आणलेली. ती नियतीने निर्धारित केलेली असतील, निसर्गनिर्मित असतील अथवा आणखी काही. त्यांचे असणे-नसणे परिस्थितीचा परिपाक असू शकतो.

वर्तमान कसा असावा अथवा नसावा, हे निश्चित करण्यासाठी पदरी पडलेल्या काळाच्या तुकड्याचे अन्वयार्थ लावण्याइतकं सुज्ञपण अंतरी धारण करता यायला हवं. ते आलं की, काळाची गणिते सोडवण्यासाठी आवश्यक असणारी परिमाणे गवसतात. पण याचा अर्थ असाही नाही की, उत्तरांपर्यंत पोहचण्यासाठी वापरलेली सगळीच सूत्रे समोर मांडलेल्या समीकरणांची उकल करतात. गुंते सोडवणाऱ्या अर्थांची उकल करण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रयत्नपूर्वक अवगत करायला लागतात. ती अभ्यासाने आकळतात. सरावाने सख्य साधता येतं त्याच्याशी. परिशीलनाने त्यांच्यासह प्रकट होता येतं. अभ्यास शोध असतो, आपणच आपला घेतलेला. तपास असतो कळत-नकळत केलेल्या गफलतींचा, धांडोळा असतो घडलेल्या प्रमादांचा, मागोवा असतो आपणाकडून झालेल्या मूर्खपणाचा. चिंतन असते ते, आकांक्षांच्या गगनात विहार करणारी पाखरे परागंदा होऊ नयेत म्हणून कराव्या लागणाऱ्या प्रयासांचे. चिंता असते मर्यादांचे अर्थ हरवू नयेत याची. पथ असतो मुक्कामाच्या ठिकाणांपर्यंत पोहचण्याचा.

अर्थात, आयुष्याला सामोरे जातांना सगळंच काही पर्याप्त असेल तेच अन् तेवढेच घडेल, अशी अपेक्षा कोणी ठेवत नसलं, तरी धवल असं काही पदरी पडावं, ही कामना अंतरी अधिवास करून असतेच ना! भावनांच्या प्रवाहात स्वतःला सामावून घेता आलं की, बहरण्याचे एकेक अर्थ कळत जातात. आपलेपणाचा ओलावा अंतरी अधिवास करून असला की, नात्यांचे अन्वय आकळत जातात. मनात भावनांचं गाव नांदतं असलं की, आपणच आपल्याला नव्याने उलगडत जातो. पण परिस्थितीच्या आघातांनी भोवती नांदणारे परगणेच ओसाड पडले असतील तर... परिस्थिती परिवर्तनाच्या प्रतीक्षेशिवाय माणूस करूच काय शकतो? काळ तसाही काही कोणाचा सखा नसतो. त्याचं सख्य पुढे पळणाऱ्या क्षणाशी. त्याचा हात धरून, तो धावत असतो. त्याच्याशी संवाद करता आला, ते पुढच्या वळणावर विसावतात. त्याला प्रतिसाद नाही देता आला, ते परिस्थितीच्या पटलाआड जातात. विसंवादी असणाऱ्यांवर काळच विस्मृतीच्या वाकळीं घालतो.

सगळ्याच गोष्टी काही सरळ रेषेत स्वतःहून चालत येवून आयुष्यात विसावत नसतात. आवतन घेऊन आलेल्या नसतात त्या. सांगावा नसतो कुणी पाठवलेला तो. सुखं नांदत्या पावलांनी येवून आपल्या अंगणी नाही उभी राहत. शेकडो वर्षांपासून माणूस समाधानाच्या परिभाषा शोधतो आहे. ते मिळावं म्हणून धांडोळा घेतोच आहे. पण अद्याप ते काही त्याच्या हाती लागले नाही. लागले असते हाती, तर कशाला अज्ञात परगण्यांचे किनारे धरून पळत राहिला असता? काळाची समीकरणे सोडवताना कुणाचा कुठलातरी हातचा सुटतो अन् गणित चुकतं. खरंतर काळ नावाची गोष्ट ही अशी अन् अशीच असते, म्हणून दाखवता नाही येत. त्याचं असणं-जाणवणं एक अमूर्त अनुभूती असते. त्याच्या असण्या-नसण्याचे अन्वयार्थही लावता येतात. पण हाती लागलेल्या त्याच्या तुकड्यातून आयुष्याला अर्थपूर्ण करणारी सूत्रे सगळ्यांनाच गवसत असतात असं नाही. जगण्याला वेढून बसलेल्या अन् मूर्त-अमूर्ताच्या झोक्यांवर झुलणाऱ्या तुकड्यांच्या सोबत अव्याहत झोके घेणे प्राक्तन आहे माणसाचं.

काळाच्या अफाट पसाऱ्यातील कुठल्यातरी तुकड्यात आपल्या ओंजळभर आयुष्याचा चिमूटभर अध्याय लिहला जातो. काहींचे जीवनग्रंथ काळच आपल्या हाताने सजवतो. त्याने गोंदलेल्या खुणा कर्तृत्व बनून चमकत राहतात. काहींच्या जीवनग्रंथावर चारदोन ओळी लेखांकित होतात. काहींची पाने कोरीच राहतात. काहींच्या कहाण्या काळाच्या कुशीत हरवतात. काहीं समोर येतात अन् एक आश्वस्तपण अंतरी जागवतात. काही कवडसा बनून पावलापुरती वाट उजळत राहतात. दिवस, महिने, वर्षांची धूळ साचत जाते. विस्मृतीचा अंधार गडद होत जातो. काळ आपल्याच नादात खेळत राहतो. कुणी पथ चुकलेला पांथस्थ कधीतरी येतो. अनामिक बनून पडलेल्या ग्रंथाची काही पाने त्याच्या हाती लागतात. त्यावर जमा झालेले धुळीचे थर कुतूहल म्हणून कुणी झटकतो. कुणी कोरून ठेवलेल्या ओळी वाचतो. कुणी शोधत राहतो अक्षरांचे अर्थ. उलटत जातात एकेक पाने अन् उलगडत जातात काळाच्या कुशीत विसावलेल्या कहाण्यांचे काही अर्थ. समोर येतात काही हवे असणारे-नसणारे संदर्भ. आकळत जातात अन्वयार्थ. त्यांना असतं आठवणींचं कोंदण अन् भावनांचं गोंदण. समोरच्या पसाऱ्यात विखरून पडलेले एकेक बिंदू सांधले जातात, जुळत जातात एकेक रेषा अन् साकारते एक चित्र. कधी अर्थांची चौकट घेऊन, तर कधी चौकट हरवलेलं. हाती लागलेल्या तुकड्यातून गोळा केले जातात एकेक धागे. उपसल्या जातात तर्काच्या राशी. ढवळून काढला जातो प्रवाह. घेतले जातात गोते तळ गाठण्यासाठी. लागतं काही हाती. पण बरंच निसटून जातं. तरीही शोधत राहतात माणसे काहीना काही.

काळाची सोबत करीत पडलेल्या अज्ञात परगण्यातील रहस्यांना जिज्ञासेची लेबले लावून उपसले जातात एकेक ढिगारे. सापडतात कधी आपलेच काही अवशेष अंधाराची चादर ओढून निजलेले. जागी असणारी माणसे अंधाराला जागवतात. कवडशाच्या सोबतीनं चालत राहतात. आपलं असणं-नसणं पाहतात. परत मांडतात. तुलना करून पारखून घेतात आयुष्याला. अज्ञाताच्या कुशीत शिरून काढू पाहतात आपल्या अस्तित्वाचे अंश. शोधून पाहतात आपल्या सभ्यतेच्या संदर्भांना. धांडोळा घेतात संस्कृती नावाच्या प्रवासाचा. लावतात अर्थ संस्कार बनून वाहणाऱ्या प्रवाहाचे नव्याने. अदमास घेत राहतात. अनुमानाच्या चौकटीतून काही हाती आलेले, कधी हवे असलेले शोधत राहतात. वेचू पाहतात अंधाराच्या विस्तीर्ण पटावर चमकत पडलेली नक्षत्रे. पण तरीही अंधार असतोच आसपास नांदता. किती उपसावा त्याला? शतकांची साचलेली रहस्ये किती खोदावीत? गणती नाही करता येत सगळ्याच गोष्टींची अन् शोधताही नाही येत सगळंच विचारांच्या वर्तुळात वसतीला उतरलेलं. तरीही आस्थेची पणती हाती घेऊन वाट तुडवत राहतात माणसे. काळाच्या विवरात काय काय दडले असेल? हा प्रश्न काही त्याला स्वस्थ बसू देत नाही. किती गोष्टी अज्ञाताचा हात धरून दृष्टीआड झाल्या असतील? कोणास ठावूक?

आसपास वसतीला असलेला अंधार प्रकाशाइतकंच प्रखर सत्य. पण उजेडाची आस अंतरी असणंही वास्तवच. हे वास्तवच जगण्याची प्रेरणा असते. धुक्याची चादर ओढून निवांत पहुडलेल्या क्षितिजावर चमकणाऱ्या आकांक्षांच्या नक्षत्रांकडे पाहत माणूस चालत असतो. ती खुडून आणायची आस अंतरी नांदती असते त्याच्या. तेथे पोहोचणाऱ्या वाटा शोध असतो, आपणच आपला घेतलेला. आपल्याला नव्याने समजून घेण्यासाठी वणवण असते ती. परीक्षा असते संयमाची. लपलेल्या असतात अनेक सुप्त कांक्षा तेथे. त्या वैयक्तिक असतील अथवा अनेकांनी मनाच्या मखरात मंडित केलेल्या. कुठला तरी नाद अंतरी नांदत असतो. त्याची स्पंदने साद देत राहतात. तो संमोहित करीत राहतो.

काळ काहींच्या आस्थेचा विषय असतो. काहींचा परिशीलनाचा, तर काहींचा अभिनिवेशाचा. काहींना अस्मितेचे धागे गवसतात त्याच्या अफाट पसाऱ्यातून. काहींना माणूस नावाच्या अस्तित्वाचा अर्थ. कोणास आणखी काही. पण त्याची समीकरणे एवढी साधीही नसतात, जितका त्यास आपण समजतो. कधी त्याचा गुंता जटिल होत जातो. कधी उलगडत जातात एकेक पदर. त्याला शोधतांना लागतं काही हाती. तरीही बरंच काही निसटतं. लागलाच एखादा तुकडा हाती की, अनुमानांच्या पात्रातून वाहत राहतो तो. शोधू पाहतो कुणी त्यातून आपला उन्नत, उर्ज्वस्वल वगैरे वारसा. गवसलाच एखादा संदर्भ की, तर्काचे किनारे धरून वाहू लागतो त्याचा प्रवाह. काहींना सापडतात त्यात आपले अहं. काहींना अवकाळी श्रेष्ठतेचा साक्षात्कार वगैरे होतो अन् पूर्वी कधीतरी प्राप्त केलेल्या प्रगतीचे पंख लावून अभिनिवेशांचा आसमंतात प्रवास सुरू होतो. अस्मिता वगैरे नावाच्या गोंडस झुली टाकून तो सजवला जातो. पडद्याआड पडलेला माणूस आणला जातो समोर. त्याच्या महात्म्याचे, कर्तृत्वाचे अध्याय अधोरेखित केले जातात. आवळले जातात एकेक सूर काळाच्या कोशात विसावलेल्या समृद्धीचे. प्रगतीच्या परिभाषा नव्याने पाहून घेतल्या जातात. कधीकाळी हे  आपल्याकडे असल्याचे सांगताना अभिनिवेशाला अस्मितेच्या वर्तुळात स्थानापन्न केले जाते. परिशीलन बाजूला पडते अन् उरतो प्रसिद्धीपरायण उथळपणा.

प्रवाहांना साचलेपण आले की, वाहण्याचे अर्थ हरवतात. साचलेपणात काहींना समृद्धीची सूत्रे सापडतात. सूत्रांचा संदर्भ सम्यक जगण्याच्या समीकरणांशी जुळवला जातो. काळाच्या कुशीत दडलेल्या यशाच्या व्याख्या नव्याने लेखांकित करून, आपणच निर्माण केलेल्या निकषांच्या निर्धारित चौकटीत अधिष्ठित केल्या जातात. अभावाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करणारा माणूस मात्र जिथे होता तिथेच राहतो. चौकटींतून मुक्तीची प्रतीक्षा करीत साद देत उभा असलेला नाही दिसत तो. निनादणाऱ्या आवाजाचे अर्थ नाही आकळत. अभ्युदयार्थ आवळले जाणारे आवाज आतच कुठेतरी अडतात. कुठला काळ असा होता की, आयुष्याचे अवघे अन्वयार्थ आकळले होते? अभाव तेव्हाही होता. आताही आहेच, पुढेही तो असणारच आहे. पण सत्य हे आहे की, प्रभावाच्या परिभाषा बेगडी अभिनिवेशात बंदिस्त झाल्या की, वास्तव दुर्लक्षित होते. हाही काळाचाच परिपाक असावा का?
••

2 comments:

  1. Sir, utkrushta asa tumhi lihta, mi Nehmi Vachto, parantu kahi shabdha hai samajnyas avgadh vattat ,tyasathi kahi avagadh shabdhana paryayi shabdh bracket madhe kivha lekh samplyavar sandarbha sathi dyavet ashi mi vinanti karto.

    ReplyDelete
    Replies
    1. अवश्य विचार करूयात. आभार!

      Delete