Anastha | अनास्था

By // No comments:
गेल्या आठवड्यात आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सहल अजिंठा, वेरूळ इत्यादी ठिकाणी नेली. मुलं तशी लहान-लहान होती. त्यांना स्थळांच्या दर्शनापेक्षा आपण सहलीस जातोय याचाच अधिक आनंद. अर्थात ज्या गोष्टी त्यांना आवडतात त्यांच्याशीच देणंघेणं. आणखी बाकीचं काय? हा प्रश्न मनात येणंही शक्य नाही. वयानुरूप तसं आवश्यकही नाही किंवा तशी अपेक्षा करणेही संयुक्तिक नाही. पण तरीही ओघओघाने काही गोष्टी घडतात. त्या तशा लहानसहान असतात; पण कधीकधी कळत-नकळत खूप मोठा विचार मांडून जातात. तो ठरवून प्रकटत नसतो. सहजरीत्या समोर येतो. आपण जाणीवपूर्वक थोडं लक्ष केंद्रित की, त्या लहानशा घटनेत खूप मोठा आशय सामावलेला असल्याचे दिसते.

घडलं असं की, सहलीतील विद्यार्थी विद्यार्थिनी प्रवास करून पोहचले वेरूळला. लेण्या पाहत राहिले. चेहऱ्यावर एक भारावलेपण सोबत घेऊन विहरत राहिले. शिल्पाकृती पाहून काहींच्या मुखातून आश्चर्यदग्ध उद्गार उमटले. त्यातील काही मुले लेण्यांच्या अवतीभोवती खेळत राहिले. पळत राहिले. काहींनी भिंतीना, स्तंभांना, मूर्तींना हात लाऊन पाहिले. हळुवार हात फिरवीत आपल्या मनात जागा करून देत साठवत राहिले. काहींनी इतिहासाच्या पुस्तकातील धड्यात दिलेले चित्र याच शिल्पाचे आहे का, म्हणून खातरजमा करून घेतली. काहींनी आपल्याकडील माहितीच्या आधारे आपलं मत मांडून पाहिलं. आणि ते सारं मनात कोंडून पुढच्या प्रवासाने देवगिरी किल्ल्यावर पोहचले. किल्ल्याचे विशाल रूप पाहताना मनाचे आसमंतही व्यापक होत गेलं. किल्ल्याच्या पायऱ्या चढून जाताना आजूबाजूच्या गोष्टी पाहत गेले. निरखीत गेले. सगळे एका वेगळ्या भारावलेल्या भावविश्वात येऊन उभे राहिले.

किल्ला पाहण्यात सारे रमले. मात्र, त्यातील एक मुलगा किल्ल्याचे भग्न अवशेष वेगळ्या विचारातून निरखून बघत होता. किल्ल्याच्या ढासळलेल्या चिऱ्यांकडे आपलंच काहीतरी उध्वस्त झाल्यासारखे पाहत होता. कदाचित किल्ल्याच्या गतकाळाच्या वैभवाला कल्पनेने पाहणं सुरु असावं. त्याशी तुलना करून पाहताना आजची अवस्था पाहून मनातून खंतावत होता. त्याच्याकडे सहजच लक्ष गेलं. बोलायचं म्हणून विचारलं, “कायरे बाळा, सगळी पोरं किल्ला पाहतायेत. तू काय या ढासळलेल्या चिऱ्यांशी संवाद करतोय का?” मुलाने क्षणभर अवकाश घेऊन मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मलाच प्रतिप्रश्न केला. म्हणाला, “सर, या किल्ल्याची अवस्था अशी का झाली असावी, कोणी केले असेल हे?” प्रश्न साधासाच होता; पण मीही विचारात पडलो. या पोराला उत्तर काय सांगावे? मी काय सांगितले म्हणजे याचे समाधान होईल. नीट समजेल. खरंतर माझीच वाचा बंद व्हायची वेळ आली होती. शिक्षकही कधीकधी निरुत्तर होतो. हा अनुभवाला ‘याचि देहा याचि डोळा’ घेत होतो.

किल्ल्याची अशी अवस्था का झाली असावी? त्या मुलाने विचारलेला प्रश्न एकच होता; पण उत्तरे कितीतरी होती. यातील कोणते उत्तर अचूक असेल? मीही विचार करतोय, नेमकी काय कारणं असतील या सगळ्यामागे? ती काहीही असोत; पण माझ्यापुरतं या प्रश्नाचं उत्तर एकाच शब्दात सांगता येईल ‘अनास्था’. सगळ्याच प्रश्नांची उत्तरे आपणास मिळतातच, असे नाही. ती मिळवीत म्हणून शोधण्यासाठी थोडीशी वणवण करावी लागते. त्या प्रश्नाविषयी आस्था असावी लागते. आस्था असेल तर निदान त्या प्रश्नांचा विचार तरी करता येतो. मात्र आपणास काहीच देणंघेणं नाही, जे होईल ते होवो. इतक्या निर्विकारपणे वागलो, तर प्रश्नांचं गांभीर्य संपते. आपल्या वर्तनाचा सार्वजनिक अनास्था एक मोठा दोष आहे. आपल्या सामाजिक जीवनात वास्तव्य करून आहे. हेच काहीही न घडण्यामागचे मुख्य कारण आहे. मला काय त्याचं? या विचाराने आपण बहुदा वर्ततो. अशा वर्तनाचे परिणाम आपल्या सार्वजनिक जीवनातून याप्रकारे दृगोचर होत राहतात. क्षणभर विचार करूया, देवगिरीचा किल्ला माझ्या मालकीचा असता तर..., कैलास मंदिर माझ्या मालकीचे असल्याची सातबाराच्या उताऱ्यात नोंद असती तर..., या वास्तूंना अशी अवकळा आली असती का?

खरंतर ‘आपले’ हा शब्द जेव्हा आपण सर्वांसाठी वापरला जातो, तेव्हा त्याला व्यापकपणाचे अवकाश प्राप्त होते. व्यापकपणाला आपलेपणाच्या अंगणात अधिष्ठित का करीत नाहीत? कदाचित यासाठी अनेक कारणे असतील. सांगता येतीलही. त्यातील कोणत्यातरी एका कारणासाठी निदान काही अंशी आपण जबाबदार असू शकतो. पण हे लक्षात कोण घेतो? आपण काहीही करायचे नाही. कोणीतरी हे करतील, म्हणून वाट पाहत राहणे हेच आपले कर्तव्य असल्यासारखे वागतो. या वास्तूंच्या संरक्षणाची जबाबदारी सरळसरळ सरकारवर ढकलायची अन् व्यवस्थेच्या नावाने बोटं मोडायची. याला काय म्हणावं? या वास्तूंना संरक्षित केले असल्याचे फलक पुरातत्व खात्याने वास्तूंच्यासमोर लावलेले असतात. ते वाचूनही आपण निरक्षर असल्यासारखे वागतो. अशावेळी मनातून एक प्रश्न उभा राहतो. आपण शिकलो, पदवी मिळवली. पदवीच्या कागदांना दाखवून नोकरी, उपजीविकेचे साधन किंवा तत्सम काहीतरी मिळविले. आपण शिकल्याचा पुरावा पदवीच्या कागदाने दिला. मात्र, आपण खऱ्याअर्थाने परिपूर्ण शिक्षित झाल्याची हमी आपणास त्यासोबत मिळालीच नाही.

वास्तूंवर काहीतरी लिहून त्यांचं विद्रुपीकरण करणारे बहुसंख्य साक्षरच आहेत. वास्तूंच्या भिंती, बुरुज, शिल्पे, चित्रे काहीही बघा; येथे येऊन कोणीतरी प्रेमवीर आपली नाममुद्रा कोणातरी तिच्या नावासह अंकित करतो. सोबतीने गळ्यात गळे घालून फोटो काढून जातो. यातील काहींना तिच्यासमोर आपलं प्रेम व्यक्त करण्याची हिंमत होत नाही. मग हे डेअरिंग वास्तूंवर करून पाहतो. तिच्या पश्चात तिचं नाव येथे कोरून ठेवतो. आपण कोणी ऐतिहासिक व्यक्तित्व असल्याचे स्वतःला समजून घेतो. लोकांना आपल्या अशा वागण्याची जराही खंत वाटत नसावी का? अहोरात्र खपून या वास्तू ज्यांनी उभ्या केल्या, त्यांनी कधी आपली नावं तेथे कोरली नाहीत. त्यांना आपल्या नावापेक्षा वास्तूचं नाव मोठं व्हावं असं वाटत असेल. ते खरेही आहे, कारण या वास्तू निर्मिणाऱ्यानी आपली नावे काही तिथे लिहिलेली दिसत नाहीत. 

वास्तू पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेमवीरांच्या नावांच्या जोड्या जणूकाही विश्वातील अजरामर व्यक्तित्वे आहेत, या विचारातून वास्तूंवर लेखांकित होतात. गणितातील सूत्रे आधुनिक रूपं धारण करून; कोणीतरी X + कोणीतरी Y = Love असे प्रकटत असतात. वास्तूंवर कोरलेली अशी अलौकिक कारागिरी अनेकदा आपण पाहतो. पण काहीच करू शकत नाहीत, कारण आपली सार्वजनिक अगतिकता. अशावेळी समोर प्रश्न उभा राहतो करावे काय? आपण एकटे काही करू शकत नाहीत. हे थांबवू शकत नाहीत, हेही सत्य आहे. निदान आपल्यापुरते आपण संवेदनशील राहिलो, तर हा प्रश्न सर्वांशाने नाही; आपल्यापुरता तरी सुटेल. अनेकातील एकेक स्वतःपुरते बदलले तरी खूप काही झाले. असं काही लिहिलेलं पाहून मी माझ्या सहकारी शिक्षकांना बऱ्याचदा उपहासाने म्हणतो, प्रश्नपत्रिकेतील जोड्या जुळवा प्रश्नच आपण काढून घ्यायला हवा; म्हणजे जुडलेल्या जोड्यांची उत्तरे वास्तूंच्या भिंतींवरून आपणास पाहायला लागणार नाहीत.

वास्तूंच्या भव्यतेचे गुणगान करायचे. त्यामागील इतिहासाचे पोवाडे गायचे आणि आपल्याच हाताने वास्तूंच्या सौंदर्याला बाधित करायचे. केवढी ही आपल्या वर्तनप्रवाहातील विसंगती. केवढे अंतर आहे आपल्या उक्ती आणि कृतीत. प्रवासात खाण्यासाठी नेलेल्या पदार्थातील उरलेले तेथेच टाकून आपण मोकळे होतो. कॅरीबॅग झेंडे बनून वाऱ्यासोबत आपल्या नावाचे निशाण फडकवत राहतात. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फुटबॉल बनून लाथाडत राहतात. पावलोपावली कचरा लोळण घेत आसपास घुटमळत असतो. पर्यटकांच्या झुंडी हसतखेळत येत-जात असतात. वास्तूचं शापित जगणं असह्य होत राहते. तिचे दुर्दैवाचे दशावतार काही केल्या कमी होत नाहीत. याविषयी काही उत्साही विश्लेषक आपली मते आग्रहाने मांडतात. म्हणतात, या वास्तू परदेशात असत्या तर अशा जतन केल्या गेल्या असत्या. तशा सांभाळल्या गेल्या असत्या. संरक्षित वारसा म्हणून गतकाळाचे वैभव सोबत घेऊन डौलाने उजळीत राहिल्या असत्या. आपल्याकडे अशा गोष्टींविषयी आस्थाच नाही. आपण असेच आहोत वगैरे तत्वज्ञानपर, चिंतनपर बरेच काही काही विवेचन करीत असतात. पण ही माणसं बोलताना एक विसरतात की, कायदे तेथेही आहेत आणि येथेही आहेत. प्रश्न आहे आपल्या सकारात्मक, संवेदनशील मानसिकतेचा. कायद्याने सगळेच प्रश्न सुटत नसतात. कायद्याने शिक्षा जरूर होते; पण माणसाची मानसिकता कायद्याच्या शिक्षेने नाहीतर प्रगमनशील, परिणत विचारांनीच बदलत असते. याकरिता बदलांना स्वीकारून स्वतः बदलणारे आणि बदल घडवणारी माणसं मोठ्या संख्यने समोर येणे आवश्यक आहे. विधायक बदल अंगीकारणारे व्यक्तित्वे जागोजागी उभे राहिल्याशिवाय परिस्थितीत परिवर्तन घडणे अवघड असते.

उदाहरणच सांगायचे झाले तर आपल्या एसटी महामंडळाच्या बसेस आणि खाजगी मालकीच्या बसेसची तुलना करून पाहा. आपल्या रेल्वेचे लावण्य पाहा. सार्वजनिक कचरापेट्या करून टाकल्या आहेत आपण त्यांना. रेल्वेत बसून प्रवास करणारा हा माणूस विमानात बसून प्रवासाला निघतो, तेव्हा त्याच्या वर्तनात असा अनपेक्षित बदल कसा काय होतो? विमानतळावर तो कचरा का टाकत नाही? बसस्थानकात आला की पचापचा का थुंकतो, भिंती रंगवतो. हे घडतं, कारण आपली मानसिकता. खरंतर माणूस बदलण्याआधी त्याची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. आपल्यासाठी सार्वजनिक सुविधा केलेल्या असतात. त्यांची आपण किती काळजी घेतो? पाणपोईवर पाणी पिण्यासाठी ग्लास असतो, तोसुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो. दवाखान्यात लिहावे लागते, शांतता राखा. सार्वजनिक ठिकाणी लिहिलेलं असतं थुंकू नका. माणसं त्यावरच थुंकतात. रस्त्यावरून रोजच प्रवास करावा लागतो. रस्त्यावर आपण खरंच संपूर्ण सुरक्षित प्रवास करतो का? रस्त्यांवरील बेशिस्त वाहतूक पाहिली म्हणजे आपण वाहतुकीच्या नियमांचे किती काटेकोर निर्वहन करतो, हे कोणालाही सहज कळेल. त्याकरिता दाखले, उदाहरणे द्यायची आवश्यकता नाही. हा सार्वजनिक गोंधळ पाहिल्यावर आपण भारतीय असल्याचा अभिमान आपणास वाटल्याशिवाय राहत नाही. रस्त्यांवर यातायातदर्शक दिवे असतात. लालरंगाचा दिवा समोर दिसत असतो तरीही तो ओलांडून जाणे हाच पुरुषार्थ आहे, असे काहींना वाटत असते. आपण सुपरहिरो असल्याचे फिलिंग होत असते. आपण नियम मोडतो आहोत, याचे कोणालाच सोयरसुतकही नसते. नुसता नियमच मोडत नाहीतर रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्याचा जीव अनपेक्षितपणे धोक्यात टाकतो आहोत, हेही भान नसते. कसं बदलावं या परिस्थितीला? अवघड आहे... पण अशक्य नाही. उशिरा का होईना बदल होतील. याकरिता आपणच आपले मार्गदर्शक व्हावे लागेल. आपले सार्वजनिक वर्तनप्रवाह विधायक विचारांच्या दिशेने वळते करावे लागतील.

सहलीतील विद्यार्थ्यांना आम्ही जेवणासाठी बसवलं. साऱ्यांनी जेवणाचे डबे उघडले. जेवणापूर्वी त्यांना सक्त सूचना दिल्या. आपल्याकडील राहिलेले उष्टे पदार्थ, प्लास्टिकच्या पिशव्या, कागद जे काही टाकण्यासारखे असेल, ते जेवणानंतर सगळं उचलून कचरापेटीत टाका. काही विद्यार्थ्यांनी सूचनांचे पालन केले. बाकीच्यांनी आम्ही जणू त्या गावाचे नाहीतच, असं समजून राहिलेले पदार्थ, कागद दिले तसेच भिरकावून. ते पाहून मी त्या मुलांना रागावलो. आपापल्या टाकलेल्या वस्तू उचला म्हणून परत-परत सूचना दिल्या. कुणीही फारसे गांभीर्याने घेतलेच नाही. सोबतचे अन्य शिक्षकही रागावले. त्याच त्या सूचना सांगायला लागले; पण परिणाम शून्य. शेवटी स्वतः उठलो. त्यांनी टाकलेले पदार्थ, कागद इत्यादी वस्तू उचलू लागलो. पण पोरांना त्याच्याशी काही देणंघेणंच नव्हतं. छानपैकी माझ्याकडे पाहतायेत. कोणालाही साधी खंतही वाटत नव्हती की, हा कचरा आपणच टाकला आहे. म्हणून तो आपणासच उचलावा लागणार आहे.

अस्ताव्यस्त टाकून दिलेला कचरा मी वेचतो आहे, हे पाहून दोन विद्यार्थी आले माझ्याकडे. माझ्यासोबत तेही लागले कचरा वेचायला. त्यातील एकाने मी गोळा केलेला कचरा एका पिशवीत नीट कोंबला आणि कचरापेटीत नेऊन टाकला. मी अवाक होऊन समोरच्या परिस्थितीकडे पाहत होतो. मनात विचारांचा कालवा सुरु. आम्ही शाळेत मुलांना नेमकं शिकवतो काय? आम्ही कोणती गुणवत्ता घडवतो आहोत? प्रगतिपत्रकातील कागदी गुणवत्ता की, समाजपरायण विचारांविषयी आस्था असणारी गुणवत्ता? कागदी गुणवत्ता वाढेल कशी, याची काळजी करणारे सारेच आहेत. जीवनाची गुणवत्ता वाढेल कशी, याची काळजी करणारे नसावेत का? कोठारी आयोग सांगतो, शाळेच्या भिंतीच्या आत उद्याचं उज्ज्वल भविष्य घडत आहे. हेच ते उज्ज्वल भविष्य का? जे संवेदनशीलता हरवून बसले आहे. संवेदनशीलता फक्त शाळेतच शिकवावी लागते का? घरच्यांची यासंदर्भात काहीच जबाबदारी नाही का? कुटुंबाने, समाजाने दिलेले संस्कार शाळेतील धड्यांमधून मिळणाऱ्या संस्कारांपेक्षा मोठे असतात. हे आपण विसरत आहोत का? दोनशे विद्यार्थ्यांमधून केवळ दोघांनीच पुढे यावं. बाकीच्यांनी आजूबाजूला कचरा टाकून पाहत राहावे. यांचे हे संस्कार वर्तनाच्या कोणत्या प्रगतिपत्रकात बसवावेत?

माझ्या सोबतच्या काही शिक्षकांनी हे सगळं पाहिलं. त्यांना मी म्हणलो, “सर, हीच आपली यशस्वी शिक्षणप्रणाली बरं का! जी माणसाला श्रम करायला लाजवते.” त्यांच्यातील एक शिक्षक म्हणाले, “सर एवढं काही वाईट वाटून घेऊ नका हो! शेवटी आपण भारतीय आहोत.” त्यांच्या बोलण्यातील उपहास थोडावेळ बाजूला ठेवला, तरी एक सत्य शिल्लक राहतेच. आपण आपल्या घरी कसे वागतो. घराचा परिसर नीटनेटका राहावा म्हणून सगळंकाही करतो. पण सार्वजनिक ठिकाणी गेलो की, आपण असे का वागतो? याला संस्कारांचा भाग म्हटला तरी हा प्रश्न एवढं म्हणून सुटत नाही, कारण संस्कार सर्वत्र असतात. महत्वाचे आहे, ते कुठे आणि कसे होतात. संस्कारांची अक्षरे मनावर कशी गिरवली जातात. आपण उज्ज्वल वारशाच्या वार्ता करीत असतो. तो तसा आहेही; पण विद्यमान वर्तनाला, परिस्थितीला नाव कोणतं द्यावं? असे पढतपंडित शाळांमधून घडणार असतील, तर इतिहासकालीन वास्तूचं एकवेळ राहू द्या; पण देश नावाच्या वास्तूचं काय? अशा वर्तनाने वर्तणारे ती भक्कम कशी करू शकतील? या वास्तूला संरक्षित करण्यासाठी त्याग, समर्पण भावनेतून निर्मित संस्कार मनावर कोरावे लागतात. असे कोरीव संस्कार आचरणातून आणावे लागतात. सार्वत्रिक पातळीवर घडवावे लागतात. याकरिता प्रगल्भ विचार करणारी माणूस नावाची शिल्पे घडवावी लागतील. ती घडविणारे शेकडो हात परत एकदा वर्षानुवर्षे काम करीत ठेवावे लागतील.  

Shala, Shikshak ani Shikshan | शाळा, शिक्षक आणि शिक्षण

By // No comments:
‘शाळा’ असा एक शब्द जो बहुतेकांच्या जीवनाशी कोणत्यातरी निमित्ताने जुळलेला असतो. शिकणारा असेल तर शाळेशी त्याच्या शैक्षणिक जगण्याचा थेट सबंध असतो. नसेल शिकलेला, तर मनात आपण शिकलो नाहीत याची खंत असते. निमित्त काहीही असो, माणसाच्या सुजाण होण्याच्या वाटा शाळेशी जुळलेल्या असतात. शाळा शब्दासोबत केवळ अभ्यास, परीक्षा, पुस्तके, शिक्षक आणि शिकणे एवढंच चित्र नजरेत उभं राहत नाही. एक विशिष्ट प्रतिमा शाळा नाव धारण करून मनाच्या कॅनव्हॉसवर प्रकटते. इमारत, क्रीडांगण, भौतिकसुविधांसोबत शाळेचा आसमंत चैतन्याचा गंधाने भरलेला असतो. मुलांच्या रूपाने चैतन्याचे प्रवाह प्रवाहित होत राहतात. या उत्साहाला आपल्यात सामाऊन घेणारा परिसर जगण्याचं समृद्धपण सोबत घेऊन उभा राहतो. शाळा आणि शिक्षक हे परस्परांना पूरक शब्द. यांच्या साहचर्यातून जगण्याचं आभाळ समृद्ध करणारी व्यवस्था उभी राहते. शाळा शब्दांमध्ये जगणं आकाराला आणण्याचं सामर्थ्य एकवटलेलं आहे. व्यक्तित्व घडविण्यासाठी माणूस जे काही करीत आला, त्यातील जीवनाच्या जडणघडणीची एक वाट शाळेकडे जाते. सक्षम व्यक्तित्वे घडविण्यासाठी शाळा नावाचे स्त्रोत माणसांनी निर्माण केले. त्यास नवे आयाम दिले. सद्विचारांचे मळे येथे फुलत राहावेत अशी अपेक्षा व्यक्त होत राहिली. काळाचे अनेक आघात झेलत ही व्यवस्था वाढत राहिली. माणसाचं अस्तित्व तिच्यात सामावलं गेलं. शिकण्यासोबत शाळेतून उमलणं, फुलणं, बहरणंही घडत राहावं म्हणून प्रयत्न होत राहिले.

माणसाला जाणीवपूर्वक घडावे लागते. जीवनप्रवाहाला विधायक दिशेने नेण्यासाठी मार्ग आखावे लागतात. त्याच्या जडणघडणीचे नीतिसंमत प्रवाह निर्माण करावे लागतात. प्रवाहांचं उगमस्थान शाळेतून शोधले गेले. माणसांना शिकविण्याचं शाळा एक साधन आहे, भलेही ते एकमेव नसेल. विश्वाच्या अफाट, अमर्याद नभांगणाखाली माणूस स्वतःही शिकू शकतो, ती स्वयंसाधना असते. पण जीवनाचं समृद्ध आभाळ पेलण्यासाठी माणसाचं मनही आभाळाएवढं करणारे संस्कार जाणीवपूर्वक करावे लागतात. म्हणूनच शाळा विचारांनी समृद्ध करणारी संस्कारकेंद्रे ठरतात. समाजाला परिवर्तनाच्या वाटेने नेण्यासाठी प्रेरित करणारी व्यवस्था म्हणून शाळेकडे पाहिलं जातं. नुसते पाहून अंतर्यामी परिवर्तनाची प्रेरणा रुजत नसते. बीज रुजण्यासाठी भूमीची मशागत करावी लागते. मगचच रोपटी तरारून वर येतात. त्यांचं यथासांग जतनसंवर्धन करावं लागतं. माणसाव्यतिरिक्त अन्य जिवांना औपचारिक शिक्षण देण्याची आवश्यकता नसते. त्यांच्या गरजा देहधर्माशी निगडित असतात; पण माणसांना मनालाही घडवावं लागतं. म्हणून जडणघडणीच्या वाटा शाळा नावाच्या संस्कारकेंद्राकडे जाणीवपूर्वक वळत्या कराव्या लागतात. म्हणूनच शिकण्याइतकं माणसाला काहीही प्रिय नसावं. त्याच्या मनी वसणाऱ्या कुतूहल, जिज्ञासापूर्तीसाठी निश्चित दिशा असावी लागते. ती दिशा शिक्षणातून, शाळेतून माणसाला गवसते.

शाळा काही माणसाला नवी नाही. प्राचीनकाळापासून ती माणसासोबत आहे. गुरुकुलापासून ग्लोबलस्कूलपर्यंत वेगवेगळ्या काळी वेगवेगळी नावं धारण करून माणसांना सोबत करीत आहे. या शेकडो वर्षाच्या प्रवासात शाळा उभी करताना नेमके काय मिळविले, काय मिळवायचे राहिले याचे हिशोब जुळवायचे आहेत. आमच्यावेळी शाळा अशा नव्हत्या, अशा असायच्या, असे अनेक अभिप्राय शाळेविषयी ऐकत असतो. शाळा आज नवे साज लेऊन उभ्या आहेत. पण या देखणेपणातून आत्मा हरवत चाललाय अशी शंका मनात निर्माण होण्याइतकी परिस्थिती पालटली आहे. शाळा, शिक्षक आणि शिक्षण यांच्याविषयी समाजातून विशिष्टप्रसंगी नकारात्मक प्रतिक्रिया उमटतात, तेव्हा प्रकर्षाने अधोरेखित होते की, शिक्षणातून काहीतरी हरवत चाललं आहे. शिक्षणातून काहीतरी मिळवायचे राहिल्याची खंत समाजाच्या विचारात असणे आपल्या शिक्षणव्यवस्थेचे अपयश आहे. शिक्षणाचं अभियान उभं करून शिक्षणाला सार्वत्रिक करण्याचा प्रशासनाने प्रयत्न सुरु आहे. शिक्षणाची गंगोत्री खेडोपाडी, वाड्यावस्त्यांवर पोहचवण्याचा प्रयत्न होतोय; पण तिचं तीर्थरूप जल तेथल्या भूमीत झिरपत आहे का? त्याच्या प्राशनाने ज्ञानासक्त मने घडत आहेत का? असे काही प्रश्न अद्यापही सोबतीला आहेत.

युनोस्कोच्या एका अहवालात शाळाबाह्य मुलांच्या संख्येत भारताचा जगात चौथा क्रमांक असल्याचे काही दिवसापूर्वी वाचनात आले. एवढ्या संख्येने मुलं शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहत असतील किंवा परिस्थितीमुळे फेकली जात असतील, तर समाजव्यवस्थेत संपन्न विचारांचे मळे बहरतील कसे? व्यवस्थेचे संतुलन घडेल कसे? सर्वशिक्षा अभियान आणून प्रत्येक घरापर्यंत शिक्षणाच्या गंगेचा प्रवाह पोहचविण्याचा प्रयत्न होऊनही त्यात भिजण्याऐवजी कोरडाठाक राहण्यात कोणतं शहाणपण सामावलं आहे. भारतासारख्या खंडतुल्य राष्ट्रात एखादी योजना कार्यान्वित करताना असंख्य प्रश्न, अनंत अडचणी उभ्या राहतात. भारत संघराज्य म्हणून एक असला, तरी येथे समाजव्यवस्थेत अनेक सामाजिक, आर्थिक, वर्गीय, जातीय पदर आहेत. अनेक धाग्यांचा विणलेला गोफ भारत असेलही; पण या सुट्यासुट्या धाग्यांचे अनेक पीळ असतात. त्यांच्या स्वतंत्र अस्मिता असतात. कधी टोकदार प्रश्न असतात. मतमतांतराच्या ठिणग्या असतात. अशावेळी त्यांना एकत्र बांधून ठेवण्यात बरीच ऊर्जा खर्ची पडते. नको त्यागोष्टींकडे लक्ष वळवावे लागते. विकासाचे पथ चालताना दुसऱ्याच वाटांची सोबत घडते.

शिक्षणाचे महत्त्व विद्यमानकाळी समाजाला बऱ्यापैकी समजले असले, तरी शिक्षणाविषयी असणारी अक्षम्य उदासिनताही दुर्लक्षित करण्याजोगी नाही. जगण्याचे प्रश्नच एवढे कठीण आहेत की, त्यांच्याशी भिडताना अनेक आवश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. घरातले सगळे हात राबल्याशिवाय हातातोंडाची गाठ पडणे शक्य होत नाही, तेथे शिक्षणाचं रोपटं जगेलच कसं? जगण्याचे प्रश्न मोठे होत असतांना अन्य प्रश्न दुय्यम होत जातात. पंधरावीस वर्षापूर्वीचा भारत आणि आजच्या भारताच्या स्थितीत प्रचंड स्थित्यंतर झाले आहे. जीवनात संपन्नता आलेली आहे. तरीही जगण्याच्या प्रश्नांना रोज सामोरे जाणाऱ्यांची संख्या आपल्याकडे काही कमी नाही. रोजच समस्यांना सामोरे जावे लागत असेल, तर माणसं कोणत्या गोष्टींना प्राथमिकता देतील? भाकरीच्या प्रश्नासमोर सगळेच प्रश्न लहान वाटायला लागतात.

शाळा आणि शिक्षणात आतापर्यंत अनेक बदल घडून आलेत. बदलांना कार्यान्वित करताना शाळा प्रयोगशाळा झाल्या. अपेक्षित निष्कर्ष हाती येण्यासाठी प्रयोग करावे लागतात हे मान्य; पण प्रयोगाचे परिणामही तपासून पाहावे लागतात. त्यानुसार निर्णय घ्यावे लागतात. तरीही एक सत्य नाकारून चालणार नाही, ते म्हणजे याच शाळांनी देशाच्या पिढ्या घडविल्या. भले येथे सुविधांची वानवा असेल. शिकण्या, शिकवण्याविषयी आस्था असायची. येथे वावरणारे मास्तर नावाचं विद्यापीठ संस्कारपीठ वाटायचं. हातांवर छम छम बसणाऱ्या छडीमुळेच विद्या घम घम येते, असं समजलं जात असे. गुरुजी साधेच होते. त्यांच्या साधेपणातून प्रकटलेले विचार जीवनसौंदर्य बनून मनःपटलावर अंकित होत राहायचे. असे ‘डिव्होटेड’ गुरुजी तेव्हा जागोजागी भेटत असल्याचे जुनी पिढी सांगते. विद्यमानकाळीही असे अनेक अध्यापक आहेत. अपवाद वगळल्यास अध्यापनाचे व्रत अंगिकारून प्रामाणिकपणे जगणारे खूप आहेत. मागच्या पिढ्यांचा गुरुशिष्य नात्यातील इमोशनल टच आजच्या गुरुशिष्य नात्याला नाही.  या नात्यातील ओलावा हरवत चालला आहे. माणसं कालोपघात एकेकटी होत चालली आहेत. समूहापासून सुटी होत आहेत. अशा जगण्यालाच सन्मान समजायला लागली आहेत.

आम्हा काही शिक्षकांमध्ये बोलणं सुरु होतं. विषय शाळा, शिक्षण आणि शिक्षकांकडे वळला. मनातील खंत व्यक्त करीत एक शिक्षक म्हणाले, “आपल्या शाळांची अवस्था पाहून वाटते, अजूनही आम्ही अंधारयुगात वावरतो आहोत. अशा शाळांना शाळा का म्हणावे, असा प्रश्न पडतो? यांना शाळा म्हणण्याऐवजी खरेतर कोंडवाडे म्हणणे अधिक योग्य वाटते.” तोच धागा पकडत दुसऱ्या शिक्षक म्हणाले, “सर, काही शाळा अशा असतीलही. शिकणाऱ्या मुलांचं भविष्य ज्यांच्या हाती आहे ते शाळेत कमी आणि अन्य ठिकाणीच जास्त रमलेले असतील, तेथे आणखी काय होणार आहे? ही माणसं कधी राजकारणाच्या फडात रंगतात. कधी अर्थकारणात रमतात. कधी कृषिकारणाला हातभार लावताना राबतात. पण शाळेतील अध्यापनाच्या प्रांगणात किती वेळ संचार करतात. असं वागताना यांच्या मनात काहीच वेदना होत नसतील का? इतरांना नैतिकतेचे पाठ शिकवून समर्थ बनवणारी, ही माणसं स्वतःच नैतिकतेचे पाठ विसरले असतील का?”

आपलं मत कळकळीने व्यक्त करणाऱ्या या शिक्षकाची खंत खरी असेलही. पण सगळेच शिक्षक, शाळा अशा असतात असे नाही. काही अपवाद असतात. अशा चारदोन शाळा, शिक्षक असतीलही. ते असणे म्हणजे सगळी शिक्षण व्यवस्था कुजली आहे. सगळा प्रवासच अंधारयात्रा झाला आहे, असे नाही. पलीकडे उजेडाचेही एक जग उभं आहे. तेथे सदसदविवेकाच्या मिणमिणत्या का असेनात, पणत्या पेटल्या आहेत. काही पावलं धडपडत का होईनात, पण जीवनाचा शोध घेत प्रकाशाच्या दिशेने निघाली आहेत. कदाचित काहींना योग्य वाट न सापडल्याने चुकून काही पावलं आडवाटेने निघत असतीलही. पण ती वाट काही सगळेच चालत नाहीत. 

हे सगळं खरं असलं तरी कधीकधी निराशेचे मळभ काही काळासाठी विचारांच्या आभाळात दाटून यावेत असंही घडतंय. गेल्या पंधरावीस वर्षात शिक्षणातून विधायक विचारांना रुजवण्याचे प्रयत्न झालेत. आपण बरेच पुढे सरकलो असलो तरी मंझील अभी बहोत दूर है, अशीच परिस्थिती दिसते आहे. समाजव्यवस्थेच्या तळाशी असणाऱ्या वर्गातील मुलामुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण, विशिष्ट चौकटींमध्ये बंदिस्त झालेले शाळा, शिक्षक आणि शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवताना कौशल्यसंपादनातील समस्या; असे अनेक लहानमोठे प्रश्न आहेत, अडचणी आहेत. सरकारी शाळांमध्ये शिकणारी मुले कोणत्या वर्गाची आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे, ते खाजगी शाळांमध्ये विसावतात. ज्यांच्याकडे नाहीच काही, ते येतात सरकारी शाळांच्या आश्रयाला. या शाळांचा दर्जा उंचावणार नसेल, तर सामान्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवावे कसे अन् शिकावे कसे?

शिक्षणाच्या गुणवत्तेचा दर्जा उंचावण्याचे आव्हान समोर उभे आहे. देशाचा उच्चशिक्षणाचा आलेख अद्यापही अठरा-एकोणावीस टक्क्यांवर रेंगाळतो आहे. उच्चशिक्षणाचा सोपान चढणे सामान्यांना दमछाक करणारे ठरतेय. तेथे पोहचले त्यांचे ठीक आहे असे समजलो, तरी राहिलेल्या बाकीच्यांचे काय? हा प्रश्न उरतोच. परीक्षांच्या निकालानंतर गुणवंतांच्या गुणवत्तेला गौरवान्वित करणारे गौरवसोहळे पार पडतात. पण संधी मिळाली नाही म्हणून मागे पडलेल्या गुणवंतांचे काय? या प्रश्नाचं उत्तर अजूनही आपल्याला सापडत नाहीये. ‘माणसाला जगण्यासाठी सक्षम बनविते ते शिक्षण’, असे म्हणतात. शिक्षणातून या कसोटीस पात्र ठरणारी गुणवंतांची मांदियाळी अजूनही उभी राहत नसेल तर दोष नेमका कुणाचा? शिक्षकांचा, शिक्षणव्यवस्थेचा की धोरणांचा? कुठलीही गोष्ट फारशी गांभीर्याने न घेण्याची आपली मानसिकता आणि सामाजिक, राजकीय अनास्था शैक्षणिक विकासास मारक ठरते. पदव्यांचा टिळा ललाटी लावून हजारो सुशिक्षित बेरोजगार रोजगाराच्या शोधार्थ अश्वत्थाम्याची अस्वस्थ वणवण सोबत घेऊन हिंडत आहेत. पदवी मिळवणाऱ्या शंभरातील वीस-पंचवीस जणच आवश्यक कौशल्य संपादन करून रोजगारास पात्र असल्याचे सांगतात, याचाच अर्थ पंचाहत्तर टक्के अपात्र ठरतात. म्हणजे यांना घडविणाऱ्या शाळाही इतकेच टक्के अपात्र आहेत का?

शाळांच्या परीक्षेच्या निकालांचा उंचावलेला आलेख म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता नाही. शाळेचा शंभर टक्के निकाल म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण असा अर्थ होत नाही. गुणवत्ता संपादण्याचे शिक्षण एक साधन आहे, ते साध्य नाही. आपल्याकडे दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून दोन्ही हातांचा वापर होतो का? असा प्रश्न महात्मा गांधींनी शिक्षणव्यवस्थेविषयी कधीकाळी विचारला होता. समस्यांशी संघर्ष करून स्वतःला आणि सोबतच समाजाला आकार देणारे सक्षम हात आमचं शिक्षण घडवीत आहे का? सांगणे अवघड आहे. समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन प्रत्येकाचा वेगळा असतो. सक्षम हातांसोबत प्रगल्भ मनेही शिक्षणातून, शाळेतून घडत राहण्यात शिक्षणाचे यश असते. समृद्ध मने घडविणारा शिक्षक कुशल शिल्पकार असतो. सुंदर शिल्पे घडविण्याचे उत्तरदायित्व त्यालाच पार पडायचं आहे. भलेही प्रवासात अनंत अडचणी, असंख्य प्रश्न उभे राहतील. एखादी कलाकृती  तयार करण्यासाठी अवधी लागतो. झाड लावल्यानंतर लागलीच फलप्राप्ती होत नाही. मधुर फळांसाठी प्रतीक्षा करावी लागते. त्याआधी रोपट्याची काळजी घेऊन त्याचं अवकाश मिळवून द्यावं लागतं. आपला अवकाश घेऊन उभी राहणारी झाडं निकोप फळे देतात. झाडांच्या निकोप वाढीत माळ्याची मशागत उभी असते. शिक्षकही कुशल माळी असतो. झाड जोमाने वाढावे म्हणून माळी तण काढून त्याला सुरक्षित करतो. आम्हा शिक्षकांनाही विद्यार्थ्यांच्या मनातील विकल्पाचं तण वेळीच उपटून काढायला लागेल. तेव्हाच आम्ही लावलेली रोपटी शाळा नावाच्या उद्यानातून जोमाने वाढतील, वाढताना बहरतील, नाही का?

Shikshak Din | शिक्षक दिन

By // 5 comments:
पाच सप्टेंबर कॅलेंडरच्या पानावरून ‘शिक्षक दिन’ असे नाव धारण करून अवतीर्ण होईल. नेहमीच्या रिवाजानुसार शिक्षक नावाच्या पेशाचे कौतुकसोहळे पार पडतील. शिक्षकांचे समाजव्यवस्थेतील स्थान आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील योगदान अधोरेखित केले जाईल. संस्कारांचे संवर्धन करणारा, मूल्यव्यवस्था टिकवून ठेवणारा जबाबदार घटक म्हणून तो प्रशंशेस पात्र असल्याचे सांगितले जाईल. त्याच्या कार्याचे कौतुक करताना अध्यापकीय पेशाच्या सामाजिक उत्तरदायित्वाचीही आवर्जून आठवण करून दिली जाईल. शिक्षकी पेशात लक्षणीय कार्य करणाऱ्या आचार्यांच्या कार्याची दखल घेऊन आदर्शाच्यारूपाने सन्मानित करण्यात येईल. अशा आदर्श अध्यापकांनी उभी केलेली यशाची शिखरे संपादित करण्याची उर्मी अन्यांच्या अंतर्यामी उदित व्हावी म्हणून लहानमोठ्या समारोहातून प्रेरणेच्या ज्योती प्रज्वलित केल्या जातील. आहेत त्याहून मोठ्या यशाची शिखरं उभी रहावीत म्हणून प्रयत्न करू पाहणाऱ्या संवेदनशील मनांना प्रेरित केले जाईल. त्यांच्या हाती प्रेरणेचे पाथेय देऊन मार्गस्थ केले जाईल. काहींच्या वाणीतून गुरु-शिष्य नात्यातील गोडवा गौरवगाथा बनून प्रकटेल. जीवनाला आकार देणाऱ्या अध्यापकांच्या अंतर्यामी जतन करून ठेवलेल्या स्नेहमयी स्मृती काहींच्या लेखणीतून लेखांकित होतील. सगळा दिवस शिक्षक नावाच्या संस्कारकेंद्रांना सन्मानित, गौरवान्वित करण्यात संपेल. कृतज्ञतेचा भाव अंतर्यामी साठवत सूर्य निरोप घेऊन मावळेल. रात्र धरतीवर अवतीर्ण होईल.

क्षितिजाच्या वर्तुळाला पार करीत येणारा दिवस नवी आव्हाने घेऊन उदयाचली येईल. त्याच्या पसरलेल्या प्रकाशाच्या परिघात आपल्या व्यवस्थेचे वास्तव पुन्हा समोर येईल. माणसं ते सरावाने स्वीकारायला शिकल्यामुळे त्याकडे कदाचित फारसे लक्ष दिले जाणार नाही. शिक्षणाला परिवर्तनाचे साधन वगैरे म्हणतात. परिवर्तनाची आयुधे हाती घेऊन साध्याच्या परगण्यात पोहोचण्यासाठी प्रयोग होत राहतील. शिक्षणातून जे साध्य करायचे आहे, त्यापर्यंत आपली शिक्षणव्यवस्था पोहचली आहे का? या प्रश्नांचे उत्तर कदाचित पुन्हा जुनेच पाढे म्हणताना दिसेल. शिक्षणातून परिवर्तन घडणे अपेक्षित असेल, तर शिक्षक त्या परिवर्तनाचा भाष्यकार असावा हेसुद्धा ओघानेच आले. अर्थात परिवर्तनप्रिय विचार प्रबळ आसक्ती बनून अंतकरणात रुजल्याशिवाय बदल घडणं अवघड असतं. परिवर्तनशील समाजच प्रगतीचे नवे आयाम निर्माण करू शकतो. समाजाच्या वृत्तीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षणातही परिवर्तन घडणे म्हणूनच अपेक्षित असते. माणसाचा इहलोकीचा प्रवास ईप्सितप्राप्तीसाठी असल्यास त्याच्या हाती व्यवस्थापरिवर्तनाची साधनं असणं आवश्यक असते. शिक्षण हे परिवर्तनाचे असेच एक अमोघ साधन आहे. माणसाच्या वैचारिक वाटचालीतील संचित आहे.

औपचारिक शिक्षणाच्या परिघात आत्मशोध घेत नावीन्याच्या शोधासाठी निघालेल्या वाटेवर अध्ययनार्थी, अध्यापक आणि अध्यापनात परस्पर संवादाचे सेतू बांधल्याशिवाय व्यवस्थेत अपेक्षित परिवर्तन घडत नसते, हेही वास्तवच. शाळा केवळ सिमेंट, विटा, माती वापरून उभ्या केलेल्या निर्जीव इमारती नसतात. त्यांच्यातून चैतन्याचे झरे विद्यार्थ्यांच्या रूपाने अखंड प्रवाहित होत असतात. हे सळसळते चैतन्य घडविण्याची नैतिक जबाबदारी पालक आणि समाजासोबत शिक्षकाचीही आहे, हे वास्तव कोणीही शिक्षक आणि शिक्षणप्रेमी नाकारू शकत नाही. शिक्षक म्हणून या चैतन्यदायी प्रांगणात पहिले पाऊल ठेवताना अध्यापकाच्या अंतर्यामी विद्यार्थी घडविण्याची आंतरिक उर्मी असल्याशिवाय तो अपेक्षित परिवर्तन घडवू शकणार नाही. निराकाराला आकार देऊनच साकारता येते. संस्कारांचे संचित दिमतीला घेऊन आकाराला आलेली व्यक्तित्वेच देशाची प्राक्तनरेखा स्वकर्तृत्वाने लेखांकित करीत असतात. विकसनशील, विकसित किंवा महासत्ता म्हणून एखाद्या देशाला माणसंच घडवीत असतात. शिक्षणातून विधायक विचारांचे पाथेय घेऊन घडलेली माणसं देश नावाची अस्मिता आकारास आणत असतात. अशी कुशल माणसं घडविण्याचं काम शाळा आणि शिक्षक करीत असतात.

समाजात रुजणाऱ्या विधायक विचारांच्या निर्मितीचं आणि माणसाच्या जडण-घडणीचं श्रेय शिक्षणाला द्यायचं असलं, तर स्वातंत्र्य संपादनानंतरच्या सत्तर वर्षात आपल्या शिक्षण व्यवस्थेत काय घडलं, काय बिघडलं अन् काय निसटलं, याचं परिशीलन होणं प्रगतीच्या वाटेवरचा प्रवास समजून घेण्यासाठी आवश्यक ठरते. आपली शिक्षणव्यवस्था प्रयोगशाळा झाल्याचा सूर आजही आपल्या आसपास उमटताना दिसतो. संस्कारसाधनेसाठी शिक्षण नावाचं नंदनवन प्रयत्नपूर्वक उभारावं लागतं. शासन, समाज, शिक्षक आणि शाळा ते घडवत असतात. शाळेतून केवळ पुस्तकी शिक्षण न मिळता जीवनशिक्षण मिळावे, अशी अपेक्षा समाजाकडून व्यक्त होत असेल, तर त्यात अवास्तव असे काही नाही. शाळा केवळ परीक्षा घेऊन उत्तीर्ण-अनुतीर्णतेचे ठसे कपाळी अंकित करणारे उद्योगकेंद्रे नसतात. येथे येणारी मुले उत्तीर्ण होण्यासाठीच येत असली अन् उत्तीर्णतेचा मळवट कपाळी असल्याशिवाय चालणार नसले, तरी पुस्तकी ज्ञानातून प्राप्त पदवी म्हणजे सर्वकाही असते, असेही नाही. संपादित केलेली पदवी दिलेल्या परीक्षा, सोडवलेल्या उत्तरपत्रिका, व्यवस्थेने निर्धारित करून दिलेला अभ्यासक्रम यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्याचं प्रमाण असतो. पण जीवनातील सुख-दुःख, समस्या, संकटे यात उत्तीर्ण होण्याएवढं प्रगल्भ मन क्रमिक पुस्तकांच्या पलीकडे मिळणाऱ्या अनुभवातून घडवावं लागतं. ते संवेदनशील संस्कारांतून घडत असतं.

शिक्षक म्हणून आपण या क्षेत्रात प्रवेशित होताना व्यवस्थेच्या परिघाभोवती असणारी संवेदनशीलता सोबत घेऊन आल्याशिवाय शिक्षकीपेशाचे मोल समजणे अवघड आहे. उत्क्रांत मने घडवण्याच्या जबाबदारीचं निर्वहन शिक्षकांना करायचं असल्याने, आधी त्याचं मन उत्क्रांत होणं आवश्यक आहे. आपल्या अंतर्यामी अधिवास करून असणारा आनंद आपण इतरांना तेव्हाच देऊ शकतो, जेव्हा आपल्या मनोविश्वात प्रसन्नतेचे निर्झर अनवरत प्रवाहित असतील. शिक्षकाची ओळख त्याचं निरामय चारित्र्य असतं, तसंच त्याचं परिणामकारक अध्यापनही. त्याच्या अध्यापनातून आसपासच्या आसमंतात आनंदलहर निर्माण होणं आवश्यक आहे. असा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर शिक्षकाला निर्माण करता यावा. एखादा घटक शिकविताना आधी आपणच तो धडा, ती कविता होणं आवश्यक नाही का? मुलं संस्कारांनी घडविण्याचं समाधान तेव्हाच मिळू शकते, जेव्हा एखादा धडा, कविता आणि त्यातून प्रतीत होणारा अनुभव विद्यार्थ्यांच्या हृदयात जावून विसावतो. त्याचं मन हेच अनुभवांचं सदन होतं. सुंदर शिल्प साकारण्यासाठी कुशल कलाकाराच्या सर्जनशील हाताचा स्पर्श दगडाला घडावा लागतो. संवेदनशील शिल्पकाराला ओबडधोबड दगडातील सौंदर्य तेवढे दिसते. त्यातला अनावश्यक भाग काढून तो ते साकारतो. मुलांच्या अध्ययन प्रवासातील विकल्पांचे अनावश्यक ओझे शिक्षकाला वेळीच काढता आले की, त्यांचं जीवन सौंदर्याची साधना होते. अर्थात, यासाठी शिक्षक म्हणून त्याला लाभलेल्या हाताचा परीसस्पर्श वेळीच घडायला हवा. शिक्षक एक संवेदनशील कलाकार असतो. त्याचं अध्यापन समर्पणशील कलावंताची साधना असते. गायकाला रियाज करून सुरांना धार लावावी लागते. तलवारीला पाणी असल्याशिवाय मोल नसतं. म्यान रत्नजडीत अन् तलवार गंजलेली असेल, तर तिचं मोल शून्य असतं.

परंपरांच्या चौकटी मोडीत काढून परिघाबाहेर पाऊल ठेवल्याशिवाय वेगळे साहस सहसा घडत नाही. मनात ध्येयवेडी स्वप्ने उदित झाल्याशिवाय आकांक्षांची क्षितिजे खुणावत नाहीत आणि नवे परगणेही हाती लागत नाहीत. ज्याला परंपरांचा पायबंद पडला, त्याला नवे रस्ते कसे निर्माण करता येतील? परंपरांच्या चौकटी मोडण्याचा, ओलांडण्याचा प्रयत्न करताना अडचणींचे अनेक अडथळे अनाहूतपणे उभे राहतात. ते असणारच आहेत. पलायनवाद स्वीकारणाऱ्यांच्या जीवनग्रंथात नवे अध्याय कधी लेखांकित होत नसतात. कधी परिस्थिती अनुकूल नसते, तर कधी माणसे प्रतिकूल ठरतात. रस्त्यात अनंत अडचणींचे डोंगर उभे राहतात. कधी शासनाचे, कधी व्यवस्थापनाचे प्रश्न व्यवधाने बनून अनपेक्षितपणे वाटेवर भेटतात. कधी नियम आडवे येतात. कधी कायदे वाकुल्या दाखवितात. एवढं सगळं पार करून पुढे गेलात की, ज्यांच्यासाठी हे सगळं सव्यापसव्य करतो आहोत; तेच पालथे घडे बनतात. अशावेळी करावं काय? म्हणून प्रश्न समोर उभा राहतो. प्रश्नांची उत्तरे शोधूनही हाती लागत नाहीत. प्रश्नांचा गुंता आपला अर्जून करतो. अडचणी अनंत असतात. त्यांना अंत नाही. समस्या कुठे नसतात? सगळीकडेच त्या आहेत. परिस्थिती कोणत्याही बाजूने अनुकूल नसतांना समोर आलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्नांनी निर्माण केलेल्या मार्गांवरून निघालेली ध्येयवेडी पाऊले पाहून नियतीही विस्मयचकित होते. अन् ध्येयप्रेरित जगणाऱ्यांचे वेगळेपण कालपटावर अधोरेखित करीत जाते.

शिकण्याचं, शिकविण्याचं व्यवस्थेतील हरवलेपण समोर येते, तेव्हा परिस्थितीची उदासीनता ठळकपणे अधोरेखित होते. आसपास दिसणारे उसवलेपण पाहून आपणास काही करता येणार नाही, असे वाटायला लागते. उदासिनतेचे मळभ मनाच्या आसमंतात दाटून येते. परिस्थितीच्या अंधारात आपण हरवतो. पायाखालच्या वाटा बेईमान होतात. अशा समयी अपेक्षित उत्तरांच्या शोधासाठी केलेली संयत प्रतीक्षा भोवताली दाटून आलेल्या अंधाराचे सावट दूर करते. काळ परिवर्तनशील असतो. तो सतत बदलत असतो. आताही तो बदलाच्या वाटेने नव्या क्षितिजांच्या शोधासाठी निघाला आहे. कालचक्राच्या वेगाशी सुसंगत वर्ततात, तेच संघर्षात टिकतात. शिक्षकालाही कालानुरूप बदलणं अनिवार्य आहे. विज्ञाननिर्मित सुखांनी वेढलेले जग नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करून प्रगतीच्या दिशेने प्रचंड वेगाने झेपावत आहे. शिक्षकालाही आपली झेप बदलावी लागेल. ती आणखी पल्लेदार करावी लागेल, तेव्हाच तो मुलांपर्यंत पोहचेल. तो निद्राधीन असेल, तर व्यवस्थेत त्याला आपले अवकाश कसे निर्माण करता येईल? त्याला त्याचा व्यावसायिक सन्मान मिळेलच कसा? परंपरेच्या चौकटीत फारफारतर धडे, कविता, गणिते, सूत्रे, व्याख्या शिकवून शिक्षक होता येईलही; पण विद्यार्थिप्रिय अध्यापक नाही होता येणार. शिक्षक म्हणून मिळणारा आदर चौकटींच्यापलीकडे जाऊन काहीतरी नवीन केल्याशिवाय मिळत नसतो. भोवताल बंदिस्त करणाऱ्या चौकटींचे सीमोल्लंघन केल्याशिवाय आकांक्षांचे नवे आकाश हाती लागत नसते.

शिक्षक नावाच्या शिखराला आदर तेव्हाच प्राप्त होतो, जेव्हा त्या शिखराची उंची लोकांच्या मनातील उंचीपेक्षा काकणभर अधिक असते. शिक्षकाची अनास्था, उदासिनता, निष्क्रियता त्याच्या पेशातील आदराची सांगता करीत असते. मुलांच्या मनातील शिक्षकांप्रती असणारा आदर उगवत्या सूर्यासारखा स्वाभाविक आणि उमलणाऱ्या फुलाइतका सहज असतो. सहजपण शिक्षकाच्या कर्तृत्वातून गंधित होत असतो. रेडिमेट नोटस् चा आयता रतीब घालणाऱ्या वर्तुळात आणि क्लास नावाच्या समांतर व्यवस्थेत शिक्षकाला स्वतःचा ‘क्लास’ टिकवून ठेवावाच लागेल. तो टिकून राहावा म्हणून आपल्या अध्यापनाचा ‘क्लासही’ वरच्या दर्ज्याचा असावा लागतो. आपुलाच वाद आपणाशी, तसा आपलाच संवाद आपल्याशी घडणे आवश्यक ठरते. स्वकेंद्रितवृत्ती आपल्यातील अंतर्मुखता संपविते. पोरांनी थोर व्हावे, यासाठी थोरांना काहीकाळ पोर व्हावे लागते. एखाद्या विद्यार्थ्याला घडविणे म्हणजे आपल्या अध्यापक पेशाचे यश नाही. यशाची शिखरे लहानमोठी का असेनात; ती चालत्या वाटांवर शिक्षकांना उभी करता यायला हवी. अर्थात असे यश सहजगत्या आपल्या पदरी येणार नाही हे मान्य. माणूस परिस्थितीचा निर्माता नसतो; पण तो परिवर्तनाचा प्रेषित बनू शकतो. मुलांच्या मनात आकांक्षांचं अफाट आभाळ कोरण्यासाठी आपणच आभाळ व्हावं लागतं.

परिस्थितीला व्यवस्थेच्या वर्तुळातून शोधून वेगळं केल्याशिवाय अध्यापकाला आपल्या पेशाची डूब कळत नसते. शाळा नावाच्या व्यवस्थेत आणि अभ्यासक्रमाच्या चौकटीत बंदिस्त करून निर्धारित केलेलं शिक्षण सगळ्यांना देता येईलही. पण संस्कारांचं आणि मूल्यांचं शिक्षण चौकटींच्या सीमांमध्ये बंदिस्त करून कसे देता येईल? व्यवस्थेच्या वर्तुळात वर्तताना संयमित जगण्याचा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजवावा लागेल. सार्वकालिक मूल्यांची बिजे विद्यार्थ्यांच्या अंतर्यामी रुजवणं शिक्षकाचं काम आहे. भौतिकसुविधांच्या बेगडी समाधानात सारेच आपापली सुखे शोधत आहेत. आजूबाजूला मृगजळी मोहाचे मायावी पाश अधिक घट्ट होत आहेत. स्वार्थप्रेरित जगण्याच्या झळा माणसांची मने शुष्क करीत आहेत. अंतर्यामी अधिवास करून असलेला आपलेपणाचा ओलावा आटत चालला आहे. आपापसातल्या संवादाची परिभाषा बदलत आहे. तंत्रज्ञानाने त्याला वैश्विकतेचे परिमाण लाभले. विज्ञानतंत्रज्ञानाच्या वाटेने घडणारा संवाद व्हर्च्युअल झाला, तसा माणसाला अॅक्च्युअल जगण्याचा विसर पडत गेला. आभासी जगण्याला सुविधांच्या विश्वात प्रतिष्ठा प्राप्त झाली. फेसबुकने संवाद सुगम होत असेलही; पण त्यात ‘फेस टू फेस’ व्यक्त होण्याचे समाधान कसे गवसेल?

शिक्षणातून संपादित केलेल्या जुजबी ज्ञानावर पोट भरण्याची सोय लावता येते. ती कौशल्ये पुस्तकातील धड्यांमधून मिळतात; पण जीवनासाठी शिक्षण घेताना त्याचे स्त्रोत शोधावे लागतात. या स्त्रोतांच्या शोधाची एक वाट शिक्षकाच्या दिशेने वळणारी असावी. पोटार्थी शिक्षण आणि शिक्षक परिस्थितीत परिवर्तन कसे घडवू शकतील? माणूस उदरभरणासाठी जगतो, हे वास्तव असले तरी त्यापलीकडे काहीतरी त्याला हवं असतं. फक्त उदरभरणाचा विचार करून उचललेली कोणतीही पाऊले नवनिर्माणाची मुळाक्षरे ठरत नसतात. पोटापासून सुरु होणारे प्रश्न पोटापर्यंतच जाऊन संपतात, तेव्हा नवे काही करता येत नाही. पण पोटतिडकीने केलेली विधायक कामे अनेकांच्या पोटापाण्याचे प्रश्न सोडवू शकतात. आकांक्षांचं व्यापक आभाळ पंखावर घेण्याचं बळ वैनतेयाने घेतलेल्या डौलदार झेपेत नसतं. झेप आधी मनात उमलून यावी लागते, तेव्हा ती पंखातून प्रकटते. आकाश कवेत घेण्यासाठी मनालाही आकाशाएवढं अफाट, अमर्याद व्हावं लागतं. अमोघ कर्तृत्वाचं गगन हे समाधानाचे सदन असते. अशी कर्तृत्वसंपन्न मने विद्यमानकाळाची अनिवार्य आवश्यकता आहे.

माझा आसपास वेगवेगळ्या कारणांनी दुभंगतो आहे. जगण्याचे टाके उसवत आहेत. मीपणाचा परीघ समृद्ध होत आहे. अशा वातावरणात मी अभंग राहणे आवश्यक आहे. क्षणिक सुखांची बरसात करणऱ्या फसव्या मोहापासून अलिप्त राहून विचारांचं आणि संस्कारांचं अभंगपण शिक्षक टिकवू शकतो. याकरिता मनात उगवणारं विकल्पांचे तण वेळीच काढून टाकावे लागेल. ‘गुरुजी’ या शब्दाला आपल्या सांस्कृतिक प्रवाहात लाभलेलं अढळपण टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ‘लघूरुपाला’ व्यापकतेच्या कोंदणात अधिष्ठित करून आकांक्षांचे आकाश आंदण द्यावे लागेल. जगण्याला वैश्विक विचारांचे परिमाण द्यावे लागेल, तेव्हाच त्याला ‘गुरुपण’ येईल. शिक्षक पेशाव्यतिरिक्त अन्य काही पेशांमधील यशापयशाची चर्चा फार थोड्या नफा नुकसानापुरती सीमित असते. त्यांच्या चुकांना दुरुस्तीसाठी कदाचित अवधी मिळू शकतो. ते चुकल्यास फारतर काहींना त्याचा फटका बसेल; पण शिक्षक चुकला तर पिढी बिघडते. पिढी बिघडणे हे दुर्लक्षीण्याजोगे नुकसान नक्कीच नाही.

शिक्षकाला प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावे लागते. परिस्थती विपरीत असताना मी एकटा काय करू शकतो? असं अनेकदा मनात येईलही; पण असे एकएकटे प्रयत्नही विधायकतेचे एव्हरेस्ट उभे करू शकतात. विधायक कामे करण्यासाठी माणसानं झिजलं तरी चालेल. कारण गंजून जाण्यापेक्षा झिजून जाणे केव्हाही चांगलं. बिंदू-बिंदू जमा होऊन त्याचा सिंधू होतो. कणात असते, ते मणात दिसते. बिंदूत असते, ते सिंधूत दिसते. असे कणाकणाने, थेंबाथेंबाने जमा होणारे कर्तृत्व व्यक्तित्वालाच नाहीतर जगण्यालाही व्यापकपण देते. एखाद्या विशाल वृक्षाची उंची पाहणाऱ्याच्या अनुभवावर अवलंबून नसते. ती स्वयंभू असते. त्याची मुळे आपल्या अस्तित्वाचा ओलावा शोधत जमिनीत खोलवर जातात. धरतीला घट्ट धरून ठेवणाऱ्या मुळांमुळे तो वादळवाऱ्याशी झुंज देत उभा असतो, येणाऱ्या जाणाऱ्या पांथस्थाना शीतल गारवा देत. अखंड. अविरत. शिक्षकांना असा वृक्ष होता येणार नाही का?