Gulab | गुलाब

By // 4 comments:
एखाद्याचं नामकरण कोणत्या विचारांनी केलेलं असतं, त्यांनाच माहिती. नाव गुलाब असणं आणि त्याच्या देखणेपणाची कोणतीही लक्षणे त्यात शोधूनही न सापडणं, याला विपर्यास शब्दाशिवाय आणखी काय म्हणता येईल? माहीत नाही. असंच काहीसं गुलाबबाबत घडलं. गुलाबचा ‘गुल्या’ झाला आणि तीच त्याच्या नावाची अमीट ओळख झाली. हा संक्षेप कुणी केला, केव्हा आणि कसा केला, कुणास ठाऊक. काळाच्या वाहत्या प्रवाहात गावात अनेक गोष्टी घडल्या आणि बिघडल्याही. बदलांच्या वाटांनी नव्या गोष्टी आल्या. त्यांच्या आवेगात टिकाव धरू न शकल्याने जुन्या गोष्टी शेवाळावरून घसरून पडावे, तशा निसटल्या. बदलला नाही तो ‘गुल्या’ शब्द. तसंही नावात काय असतं म्हणा! तसंच गुल्या नावाचं. ‘गुलाब’ बनून तो मोहरला फक्त कागदपत्रांवर. सामान्यांच्या संवादात ‘गुल्या’ म्हणूनच फुलत राहिला, बहरत राहिला.

गावातलं हे एक अचाट पात्र. जगण्याच्या अनेक आयामांना आपल्यात अलगद सामावून घेणारं. कोणी नमुना म्हटले, कोणी वल्ली म्हटले, काहीही म्हटले, तरी त्यात सहज विरघळून जाणारा. सुमार उंचीचा. जेमतेम अंगकाठी असणारा. गोरा आणि काळा या दोन बिंदूना जोडणाऱ्या रेषेने एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे सरळ पुढे चालत गेलो आणि मध्यावर थोडं इकडे तिकडे सरकून थांबलो की, तो विरामाचा बिंदू ज्या रंगखुणेने निर्देशित करता येईल, तोच याच्या देहाचा रंग. काळा म्हणता येत नाही आणि गोरा नाही, म्हणून या दोघांच्या मध्यावर उभं राहून देहाला चिकटलेल्या रंगाच्या छटा शोधणेच संयुक्तिक.

नियतीने निर्धारित करून दिलेलं ओंजळभर वर्तुळ आपल्या जगण्याचं परिमाण मानून हाती लागलेल्या परिघात स्वतःला शोधणारा. जगण्याच्या स्पर्धेत वाट्यास आलेली भूमिका गेल्या पन्नास वर्षापासून प्रामाणिकपणे पार पाडतो आहे, कोणत्याही मुखवट्यांच्याशिवाय.

किमान सौंदर्याने परिभाषित कोणतीही लक्षणे दूरदूर शोधूनही याच्या व्यक्तित्वात दिसणे अवघड. डोक्यावर स्वैर वाढलेल्या केसांना शक्य तितक्या तेलाच्या सानिध्यात राहण्याचा सराव झालेला. डोळे बोलके असू शकतात, या विचारांनाच तिलांजली देणारे. त्यांच्या वर्णनासाठी काही परिभाषा असू शकते, याचा गंधही नसलेले. लालसर रंगाचा साज लेऊन सतत सजलेले. त्यावर दाट भुवयांनी आक्रमकपणा आणलेला. दातांनी कधीकाळी परिधान केलेली शुभ्रपणाची झूल टाकून बरीच वर्षे झालीत. पानतंबाखूच्या सततच्या राबत्याने मूळच्या अस्तित्वाला तिलांजली देऊन त्यांनी त्यागाचा इतिहास लेखांकित केला आहे. त्यातल्या काहींनी अवकाळी मरण पत्करून आत्महत्या करून घेतलेली. कपड्यांमुळे देह सजवून सुंदर दिसता येते, याच्याशी यत्किंचितही देणंघेणं नसलेला. आहेत ते पर्याप्त समजणारा आणि मिळतील ते परिधान करून त्यातून आनंद शोधणारा. कपडे कोणतेही असोत, गळ्यात मात्र रुमालाने सतत विळखा घातलेला.

हंगामात चार पैसे हाती आले की, खास तयार करून घेतलेले चामड्याचे जोडे हौसेने काही दिवस पायात दिसतात. पावसाळ्यात प्लास्टिकचे जोडे त्यांची जागा घेतात, एवढाच काय तो बदल. पायातले जोडे करकरीत क्वचितच दिसत. वापरून वापरून अखेरचा श्वास घेईपर्यंत दुरुस्तीच्या शस्त्रक्रिया करून त्यांचे आयुष्य वाढवत न्यायचे. पायात पादत्राणे असलेच पाहिजेत असा आग्रह कधीच नव्हता आणि आजही नाहीच. अनवाणी भटकण्याचा रियाज झालेला. लहानपणापासून कधी चप्पल, बूट नावाच्या प्रकाराशी प्रगाढ परिचय नसल्याने, त्यांच्याशिवाय वावरण्याचा पायांना सराव झालेला. वस्तूंची उपयुक्तता हीच मुळात याच्यासाठी सापेक्ष संज्ञा होती.

या सगळ्या संचितासह व्यवहारातून कमावलेल्या शहाणपणातून आलेले अनुभवसिद्ध बोलणे, ही याची खासियत आणि तीच श्रीमंती. कोणीतरी आवर्जून अधोरेखित करावे, असं काहीही नसलेला. बाराही महिने गावात उपलब्ध असणारा. शेतात काम असलं तर तेथे; नसलं की कुठल्यातरी घराच्या ओसरीवर माणसांच्या गर्दीत गप्पा छाटत बसेल. नसलाच यापैकी कोठे, तर मारुतीच्या पारावर हमखास चकाट्या पिटतांना आढळणारी ही वल्ली. बोलण्यासाठी सोबतीला समवयस्कच असले पाहिजेत, असा अजिबात आग्रह नसलेला. मोठ्यांच्या सोबत गप्पा करतांना हा जेवढा समरस होतो, तेवढ्याच तन्मयतेने पोरासोरांशी संवाद साधताना रंगतो.

गाव आणि गावातील माणसे हा अवलोकनाचा विषय घेऊन कोणी धांडोळा घेण्याचा प्रयत्न केलाच, तर त्याच्या यादीत गुल्याचा समावेश आवर्जून शीर्षस्थानी करावाच लागेल. ध्यानीमनी नसताना हा कधी कोठे प्रकटेल आणि आपल्या अघळपघळ शब्दांच्या पारायणाला प्रारंभ करेल सांगणे अवघड. याच्या बोलत्या शब्दांना विषयाचे बंधन कधीच नसते. माहीत असणाऱ्या विषयांवर हा बोलतोच; पण गंधवार्ता नसणाऱ्या विषयांवरही तितक्याच ठामपणे व्यक्त होतो. बोलणं पसरट असलं, तरी त्यातून आपलंपण पाझरत असतं. बोलण्यासाठी कुणाची ओळख असायलाच हवी असेही काही नाही. बोलणं माणसांमधील संवाद असतो, मग संवादासाठी ओळख असणं आवश्यक आहे का? हा याचा बिनतोड युक्तिवाद आणि त्याच्यापुरता खराही. शिष्टाचार वगैरे तुम्हां सुशिक्षित लोकांच्या जगाच्या चौकटींमध्ये बसवता येतील, आम्हाला त्याचं काय? माणूस माणसाशी बोलतो, ती त्याची गरज असते आणि गरजेला शिष्टचारांशी काय देणेघेणे, असे समजणारा आणि कोणाला समजत असलं, तरी समजावून सांगणारा.

परंपरेच्या, प्रघातनीतीच्या चौकटींना समजून जगणारा; प्रसंगी लाथ मारून त्यांना ध्वस्त करण्याची ताकद अंगी बाणणारा. आवश्यकतेनुसार त्यांचा सोयिस्कर अर्थ लावून वर्तणारा. अभ्यास, वाचन, लेखन या परगण्यापासून कोसो दूर वास्तव्यास असणारा. अभ्यास, वाचन, लेखन वगैरे जीवनाचा अलंकार असेल, तर तो तुमच्यासाठी, आमच्यासारख्या अडाण्यांना त्याचं काय, असं डोळे मिचकावून सांगणारा. आहे तेच पर्याप्त मानून आनंदात जगणारा. मिळाले ते खूप आहे मग, नाही त्याच्या पाठीमागे का धावावे? या जीवनविषयक स्वनिर्मित तत्वज्ञानाचा अंगीकार करून निरासक्तवृत्तीने वर्तणारा. दोन मुले, एक मुलगी, बायको आणि आई हा याच्या प्रापंचिक विश्वाचा परीघ आणि मर्यादाही. वडिलार्जित कमावून ठेवलेली पाचसहा बिघे जमीन उदरभरणाच्या प्रश्नांचे स्वाभिमानी उत्तर.

काही माणसांची ओळख काळासही धूसर करता येत नाही. त्यांनी स्मृतींच्या पटलावर ती पक्की गोंदवून ठेवलेली असते. पसाभर पोटाला पडणारे भुकेचे प्रश्न सोडवत माणसे कुठल्यातरी परगण्यात वणवण करीत राहतात. हाती लागलेल्या तुकड्याला घट्ट पकडून विसावतात. कालोपघात विस्मरणाच्या वाटेने सरकत जातात. पण सहवासाच्या स्मृती सहजी सुटत नसतात. आमच्या पांढरपेशा जगण्याच्या चौकटींनी सीमांकित केलेल्या परगण्यात विसावलेले ‘गुलाब’ हे एक नाव. आपले म्हटले तर महत्त्वाचे आणि नाहीच म्हटले, तर त्यावाचून जगण्यात खूप मोठी उलथापालथ घडेल, असे काहीही नसलेले.

काही दिवसापूर्वी नातेवाईकांकडील लग्नकार्यासाठी गावात गेलो. हा गडी नेहमीप्रमाणे पारावर सवंगड्यांसोबत चकाट्या पिटत बसलेला. गल्लीच्या वळणावर गाडी सावकाश केली. मला गावात येताना पाहिले आणि तेथूनच ओरडला, “ओ मास्तर, उना का रे भो! तू भीड घर, उनूच मी.”

जसंकाही याचीच भेट घेण्यासाठी मी आलोय या अविर्भावात ओरडून मलाच सांगत होता. चालत्या गाडीवरून मान वळवून होकार देत पुढे निघालो. अंगणात गाडी उभी करून ओसरीवर विसावलो तेव्हाशी स्वारी दारासमोर हजर.

नेहमीप्रमाणे कोणत्याही प्रतिसादाची प्रतीक्षा न करता बोलायला प्रारंभ केला. “आरे, बरा उनारे तू! आते बरा टाईम भेटना तुले येवाले. तुम्ही नवकऱ्यासले लागी काय ग्यात आनी गावशीव समदं इसरी ग्यात. तुमले थोडं काही वाटाले पाहिजेल.”

त्याला थांबवत म्हणालो, “हुई गे तुनं ग्यान सांगणं? जरासा धीर धरशी का समदं आतेच सांगस. ज्या कामसाठे येयेल शे, ते तरी करू दे.”

“खरं रे भो! ते जावू दे. कोणताबी कारणसाठे आसोत तुम्ही गावमा येतस, भेटतस तेच गह्यरं शे. ह्या लगीननी धांदल पार पडू दे, मग बोलूत काय ते.”

बोलताबोलता काहीतरी काम असल्याचे आठवले म्हणून “मी भेटस थोडा टाईमकन मांडोमा टायीना ठिकाणे.” म्हणीत निघूनही गेला.

काही माणसं मनाचं नितळपण सोबत घेऊन जन्माला आलेली असतात. त्यातलाच हा एक. लहानपणातील न आठवणाऱ्या स्मृतींची काही वर्षे वगळली, तर ही सोबत चाळीस-बेचाळीस वर्ष अनवरत वाहते आहे, एखाद्या झऱ्यासारखी. ना त्याचे प्रवाह कधी आटले, ना कधी त्यात गढूळपणा आला. निखळ मैत्रीचे हे झरे गढूळ होणे संभवच नाही, कारण व्यवहार या मैत्रीचा धागा नव्हताच. सारे स्नेहाच्या सूत्राने सांधलेले, बांधलेले. उपजीविकेच्या उत्तरांचा शोध घेणाऱ्या वाटेने आमची पाऊले वेगवेगळ्या दिशांना निघून गेली. हा आहे तिथेच राहिला, आपली माती, आपली माणसे सांभाळत.

सोबतचे सवंगडी देहाने गावापासून दूर गेले, तरी मनाने अजूनही गावमातीच्या गंधात आपल्या अस्तित्वाच्या खुणा शोधत आहेत. नव्या पिढीला कदाचित या सगळ्या गोष्टींचे काही वाटत नसेल; पण आधीच्या पिढ्यांची समस्या अशी आहे की, ठरवूनही त्यांना आठवणीतून गाव, गावातील माणसे विसरता येत नाहीत. मनावर गोंदलेले गाव धूसर होणे अशक्य. परिस्थितीने भलेही त्यावर विस्मरणाचा पडदा टाकला असला, तरी स्मृतींचे कवडसे त्या पटलास पालटून आपल्या अस्तित्वाचा एक धागा शोधतातच.

वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षापासून मैत्रीचे साकव सांधले गेले. आजही आम्हां मित्रांची सोबत अक्षुण्ण आहे. आमच्यात ना कोणी कृष्ण, ना कोणी सुदामा. परिस्थितीने साऱ्यांनाच एका वर्तुळाच्या परिघावर आणून उभं केलेलं. लहान मोठेपणाच्या कोणत्याही संकेतांनी बद्ध न होणारे. व्यवस्थेने आखून दिलेल्या मर्यादांच्या चौकटींमध्ये न सामावणारे, म्हणून आजही मैत्रीचा परीघ व्यापून उरणारे. या परिघाचे अनभिषिक्त सम्राट. जगणंही त्याच तोऱ्यातलं. हा तोरा अहंचा कधीच नव्हता. त्यात परिसरातील संस्कारांचा परिमल सामावलेला आहे. जेवढ्या सहजतेने रोपट्याचं झाडं होतं, वारा जेवढ्या सहजतेने वाहतो, पाणी जितके स्वाभाविकपणे प्रवाहित असते, तेवढ्याच सहजतेने आम्ही सारे वाढत होतो, खेळत होतो, भांडत होतो. फरक फक्त अभ्यासलेल्या अक्षरांच्या ओळखीने निर्माण केलेल्या अवकाशात होता. आमच्यात वेगळेपणाची रेषा अंकित करून अंतर निर्देशित करणारा एकच घटक होता, तो म्हणजे शाळा. शाळा नावाचा प्रकार याला कधीच आपला वाटला नाही आणि त्या वाटेने चालण्याचे याने कधी कष्टही घेतले नाहीत. त्याच्यासाठी जगातली सगळ्यात वाईट गोष्ट एकच, ती म्हणजे शाळेत जाऊन शिकणे. दगड, विटा, मातीने बांधलेल्या चार भिंतीना प्रमाण मानणाऱ्या व्यवस्थेच्या चौकटीत हा कधीच बंदिस्त झाला नाही. गाव, शिवार, शेत, गुरं-वासरं, नदी, झाडे, पाने-फुले, परिसर हीच याची शाळा. येथे तो रंगला आणि रमलाही.

आयुष्य काळाची चाके लावून खूप पुढे निघून आले, तेव्हा कुठे याला शाळा आणि शिकणे या गोष्टींचे मोल कळले. पण आता त्याला इलाज नव्हता. मायबापच्या हातून वेळीच रट्टे बसले नसते, तर आमचं जगणं आहे एवढ्या मोलाचं कदापि झालं नसतं. पण गुल्या या सगळ्याला अपवाद होता. याला शाळेत ढकलण्यासाठी कितीतरी मार पडला; पण हा काही तिकडे सरकलाच नाही. शाळेकडे जाणारे रस्ते स्वतःच्या हाताने बंद करून रानावनाच्या वाटेने पळत राहिला. रखडत का असेनात आम्ही शाळेच्या वाटेने चालत राहिलो. हे चालणे भविष्यातील ओंजळभर सुखाची नांदी ठरले.

सगळ्यांना शाळेत पळायची घाई झालेली असायची हा नेमका तेव्हाच कोणतीतरी वस्तू घेऊन अंगणात हजर. कुठूनकुठून आणलेल्या किती आणि कोणत्या वस्तू त्याच्या हाती असतील सांगणे असंभव. कधी गुंजा, सागरगोटे. कधी चिंचा, कैऱ्या, शेंगा. कधी रिकाम्या आगपेटीत कोंडून आणलेला भिंगोटा. कधी कुठल्याश्या झाडाच्या ढोलीतून काढून आणलेलं पोपटाचं पिल्लू, कधी सशाची पिल्ले. याच्याकडे काय आणि कोणत्या वस्तू असतील, हे ब्रह्मदेवालाही सांगणे अवघड. फाटक्या पॅण्टचे खिशे कुठल्या न कुठल्या वस्तूंनी भरून ओसंडत राहायचे. नसेलच यापैकी काही तर आगपेटीच्या कव्हरची चित्रे असायचीच असायची. त्याच याचा नोटा. पॅण्टच्या खिशात पत्त्यांचा कॅट हमखास सापडायचाच. हा सगळा ऐवज जमा करून याचं भटकंतीला असणं काही नवीन नसायचं. शाळेतला अभ्यास पूर्ण केल्यावर शिक्षकांनी दिलेले गुण, प्रगतिपत्रकावरील गुण पाहून आम्ही जेवढ्या आनंदाने एकमेकांना दाखवायचो, त्यापेक्षा अधिक उत्साहाने आणि काहीतरी अलौकिक हाती लागल्याच्या आनंदात आणलेल्या वस्तू हा आम्हांला दाखवायचा, तेव्हा याच्या बारक्या डोळ्यांमध्ये अनामिक आनंदाची चमक असायची. त्या वस्तूंकडे पाहताना लवलवत्या पापण्या अशाकाही हालचाल करायच्या की, कोहिनूर हाती लागला आहे.

त्याच्याकडील वस्तू पाहून मोह अनावर व्हायचा. त्याची अट एकच असायची, ती म्हणजे सोबत यायची. चिंचा, बोरांचा मोह टाळता यायचा नाही, तेव्हा शाळा फाट्यावर मारून दप्तराच्या पिशवीसह शेताकडे पलायन घडायचे. शाळेचं नाव सांगून सगळी फौज गाभुळलेल्या चिंचेच्या झाडाच्या अंगाखांद्यावर उड्या मारत राहायची. कधी कैऱ्यांच्या मोसमात झाडावर दगडांचा मारा सुरु असायचा. घरच्यांना मुलं शाळेत गेले की नाही कळायचं नाही; पण कधी कुण्या पोराचे वडील, चुलते, भाऊ शेतशिवारात असायचे. नकळत त्यांच्या नजरेस पडायचो. पोरगं शाळेच्या वेळेत येथे काय करतंय, म्हणून त्यांना प्रश्न पडायचा. मग फारशी विचारपूस न करता तेथेच येथेच्छ धुलाई व्हायची. ते बिचारं सापडायचं; पण बाकीचे तेथून सुसाट पसार व्हायचे. ‘संकट समयी कामास येतो तोच खरा मित्र’ या शाळेत शिकवलेल्या सुविचाराचा विचारच करायला अवधी नसायचा. एकच अर्थ योग्य वाटायचा, तो म्हणजे या साऱ्या अनर्थापासून आपली सहीसलामत सुटका व्हावी.

मार खाण्याच्या धाकाने सायंकाळपर्यंत भटकंती घडत रहायची. दिवेलागणीला भीतभीतच घरी परतायचे, आठवतील तेवढ्या देवांचा धावा करीत, साकडे घालीत. आमच्या कर्तृत्वाच्या गाथा आधीच घरच्यांपर्यंत पोहचलेल्या असायच्या. अचाट साहसाचे पोवाडे ऐकवलेले असायचे. पोटभर मार खाऊन भाकरीकडे वळावे लागे. आगाऊपणामुळे आईने कितीतरी वेळा सरपणाच्या लाकडाने बदडून काढले आहे याची गणतीच नाही. अर्थात, असा मार पडणे फार काही मोठी गोष्ट नसायची. दिवसभर केलेल्या अफाट कामांचं एवढंतरी प्रायश्चित्त असायलाच हवं ना!

आजच्यासारखी मनोरंजनाची आभासी साधने हाती नसल्याचा तो काळ. गावात अजून टीव्ही यायचे होते. व्हिडीओ, डीव्हीडी वगैरे प्रकारही असू शकतात याची कुणाला वार्ताही नव्हती. चित्रपट प्रचलित साधन असले, तरी ही चैन परवडणारी नसायची आणि ते सहज उपलब्ध होणे शक्य नसल्याने त्याविषयी प्रासंगिक प्रेम आणि आसक्ती वगळता गावात, पंचक्रोशीत येणारे तमाशे प्रचंड आकर्षणाचा विषय असणे स्वाभाविक होते. तमाशांसाठी दोनतीन कोस पायी चालत जाण्याची झिंग काही वेगळी असायची.

गुल्या आणि तमाशा यांचे नाते मर्मबंधातील ठेव होती. आसपासच्या कोणत्याही गावात तमाशा असला आणि याला माहीत नाही, असे कधीच घडले नाही. तमाशा पाहण्यास जायचा याचा बेत आधीच विगतवार तयार असे. शेतातून संध्याकाळी लवकर परतून, जेवण आटोपून अंगावर गोधडी गुंडाळून हा तयारच असायचा. शक्य असतील तितक्या मित्रांना जमा करायचे. कधी घरच्यांची मनधरणी करून, कधी त्यांच्या हातावर तुरी देवून पसार व्हायचे. निघतांना आठवणीने आगपेटी खिशात टाकायची. सिगारेटचे पाकीट, बिड्यांचे बंडल कोणाला दिसणार नाही असे कोंबायचे आणि पळायचे.

रस्त्याने बैलगाडीने कोणी जात असलं की, हा त्याच्याशी गप्पा करीत पायी चालत राहायचा. खिशातून हळूच एक बिडी काढायचा शिलगावून झुरका मारीत कायकाय बोलून गाडीवानाच्या मनावर गारुड घालायचा. त्याच्या मागे मुकाट्याने चालत राहण्याच्या सूचना आधीच देऊन ठेवलेल्या असायच्या. गाडीवान बिडीकाडीचा शौकीन असला की, त्यालाही एक बिडी द्यायची आणि आपलंसं करायचं. एकदाका गप्पांच्या गळाला लागला की, गाडीत बसण्यासाठी जागा मिळवायची. जागा मिळाली की, हा गालातल्या गालात हसत राहायचा. कसा गटवला, या अविर्भावात आमच्याकडे विजयी वीराच्या मुद्रेने पाहत. हे कौशल्य गुल्याने कोठून आत्मसात केलं होतं कुणास ठावूक, पण आमच्या पायी प्रवासास विराम देणारे हे अमोघ अस्त्र त्याच्याकडे होते.

हिवाळ्याच्या दिवसात जत्रेला जाताना रस्त्याने शेकोट्या पेटवत, येतील आणि आठवतील ती गाणी भसाड्या आवाजात गात, हसत-खिदळत अनवाणी पायांनी पळायचे. कोणी मोठे सोबतीला असतील, ते बिड्यांचे झुरके ओढत चालायचे. मोठेपणाची झूल अंगावरून काढून थट्टामस्करी करीत आमच्यातले एक होऊन जात असत, तेव्हा स्वभावाने कद्रू असणारा हा माणूस आज कसा काय मोकळा-ढाकळा बोलतोय, याचं नवल वाटायचे. तमाशाला अशा आवेशात जाण्यात एक वेगळा आनंद असायचा.

गावातल्या मंदिरात नियमित होणारी भजने, कधीतरी प्रासंगिक निमित्ताने होणारी कीर्तने आणि अधून-मधून होणाऱ्या पारायणांत लोकांचा जीव घटकादोनघटका रमायचा. नसलं यातलं काहीच की, ओसरीवरील कंदिलाच्या थरथरत्या प्रकाशात  रंगणाऱ्या गप्पा दिवसभराचा शिणवटा घालवत असत. शेतातून थकून भागून आलेले जीव अंगणात खाटा टाकून विसावलेले असायचे. आम्हां लहान्यांच्या जगाला याच्याशी काही देणेघेणे नसायचे. सूर्याने दिवसाचा निरोप घेऊन पावले वळती केली की अंधार हळूहळू शिवारावर पसरायला लागायचा. चरायला नेलेली गुरं गोठ्यात बांधून गुल्या जेवण उरकायचा आणि गल्लीत घिरट्या घालत विशिष्ट शीळ वाजवत एकेकला सूचित करायचा. घरात चुलीजवळ आमच्यापैकी कुणी जेवण करीत असले की, त्याच्या शिटीच्या आवाज ऐकून अस्वस्थ चलबिचल सुरु व्हायची. कसेतरी जेवण संपवायचे आणि मोठ्यांची नजर चुकवून हळूच बाहेर पसार व्हायचे.

मग सुरु व्हायचा लपाछपीचा खेळ. अंधार गडद होत जायचा, तशी खेळाची रंगत वाढत जायची. अंधारात कोण कोणत्या कोनाड्यात लपेल सांगता यायचं नाही. कशाचीही भीती नसायची. मुलांच्या खेळण्याचा गल्लीभर दंगा उठायचा. अंगणात टाकलेल्या खाटांवर थकलेभागले जीव झोपलेले असायचे. पकडापकडीच्या धावपळीत उडी मारण्याच्या प्रयत्नात कोणीतरी धडपडायचा आणि नेमका आराम करणाऱ्या माणसाच्या अंगावर पडायचा. झोपलेल्या माणसाची झोपमोड व्हायची आणि मग येथेच्छ उद्धार व्हायचा. चुकून कोणी हाती लागलं की, दोन धपाटे पाठीत पडायचे. घरी सांगण्याच्या भीतीने तेवढ्यापुरत्या विनवण्या केल्या की सुटका व्हायची. आकाशातील चंद्र जमिनीवर खेळणाऱ्या चांदण्यांकडे कौतुकाने पाहत राहायचा. मंदिरात भजनांचे सूर टिपेला लागलेले असायचे आणि अंधाराची चादर अंगावर ओढून निपचित पडलेल्या परिसरात रातकिड्यांचे कर्कश सुरात गाणे सुरु व्हायचे. सगळीकडे सामसूम झाली तरी पोरगं घरी परतत नाही, म्हणून कुणाच्या तरी घरून त्याला शोधत यायचे. अस्सल शिव्या देत राहायचे. सगळे चोरासारखे आहे तेथेच गुमान थांबायचे. नाईलाजाने खेळ थांबायचा.

सकाळी जाग यायची ती गलबल्याने. गोठ्यात माणसे झाडलोट करीत, कोणी गायीम्हशींच्या धारा काढीत राहायचे. गावातून नेमाने प्रभात फेरी करणारे चारपाच जण हरिनामाचा गजर करीत, टाळ मृदुंग वाजवत निघालेले असायचे. कोंबड्याला भल्या पहाटेच जाग येऊन ओरडत राहायचा. साऱ्यांना जागे करायचा. झाडावर पक्षांची किलबिल वाढत जायची. काही आकाशाच्या विस्तीर्ण पटलावर मुक्तपणे विहार करीत नक्षी कोरत राहायचे. पूर्वेकडून सूर्य हळूच डोकावत एकेक पाऊल चालत यायचा. शेतात कामासाठी जाण्याच्या नियोजनात कुणी लागलेलं असायचं. सगळ्यांची काहीनाकाही लगबग चाललेली असायची. हिवाळ्याचे दिवस असले की, जागोजागी शेकोट्या पेटलेल्या असायच्या. त्यांच्याभोवती अंग शेकत कुणी कुडकुडत बसलेलं असायचं. म्हातारे-कोतारे थरथरत्या शब्दांची सोबत करीत आपल्या तरुणपणाला उगीचच आठवत भूतकाळात रमलेले. आठवणींच्या पोतडीतून एकेक गोष्टी बोचऱ्या थंडीचा हात धरून हलकेच बाहेर यायच्या.

गुल्या गोठ्यात गुरावासरांचा चारापाणी करून, गायीम्हशींच्या धारा काढून, डेअरीवर दूध पोचते करून यायचा. येताना गवत-काड्या, गुरांवासरांनी न खाल्लेला चाऱ्याचा भारा शेकोटीजवळ आणून टाकायचा आणि म्हणायचा, “ल्यारे भो, मनी सासू. शिलगावा तिले बठ्ठी.”

अंगावरील गोधडी नीट गुंडाळत शेकोटीभोवती दाटीवाटीने बसलेल्यांच्या वर्तुळात शिरायचा. पाय मोकळे सोडून आचेवर हात धरून थंडीला दूर करीत मूठ-मूठ कचरा टाकत राहायचा. बराच वेळ अंग शेकत बसलेली माणसे शेतात कामाला जायचे असल्याने अनिच्छेने उठायचे. याला बहुदा गुरं चरायला नेण्याचंच काम असल्याने वेळ असायचा. शेताकडे जाणारी माणसे निघून जायची. आम्हांला शाळेत जायची तयारी करायची असायची. हा मात्र एकेकाला हात धरून आग्रहाने बसवून ठेवायचा. घरचे ओरडण्याच्या भीतीने कुणीतरी पळायचा आणि एकेक करून सगळे निघायचे. विझत जाणाऱ्या शेकोटीच्या राखेत काडीने रेघोट्या ओढीत हा एकटा बसलेला असायचा बराच वेळ, दिवसभरातील काय काय नियोजनाचे आडाखे आखीत, त्यालाच ठावूक.

पावसाळा मात्र मजेत जायचा. पाऊस झडीचा असला की, शाळेला दांडी मारण्याची संधी अनायासे चालून यायची. थोडी उघडीप पडली की, गोठ्यातील गुरंवासरं दाव्यावरून सोडून चरायला न्यावे लागायचे. अर्थात, याचा आनंदच असायचा. काम काही विशेष नसायचे. सोबतीला आलेल्या आमच्यापेक्षा लहान्यांना चरणाऱ्या गुरांवर लक्ष द्यायला सांगून सगळे माळावर जमायचे. विटीदांडूचा खेळ रंगत जायचा. कधी सूरपारंब्याचा खेळ बहरत यायचा. गुल्या या खेळांतलं माहीर नाव. त्याच्या पासंगालाही कुणी पुरत नसे. पावसात बाहेर पडणे शक्य नसले की, कुणाच्या घरी ओसरीवर, कधी गुरांच्या गोठ्यात चौसरचा खेळ मांडला जायचा. चौकटींची घरे सारवलेल्या जमिनीवरच कोळश्याच्या रेघोट्यांनी आखली जात. कवड्या असल्यातर ठीक, नाहीतर चिंचेच्या बिया फोडून दोन भाग केले जात. कधी भोवरे हाती यायचे. आपला भोवरा किती वेळपर्यंत फिरतो, हे दाखवण्याची चढाओढ लागायची. भोवऱ्याची आर सहाणेवर घासूनघासून टोकदार केली जाई. सुताच्या दोऱ्यांची बारीक जाळी विणली जायची. जाळी करण्यासाठी सुताच्या लडी चोरण्याचा आनंद वेगळाच असायचा. पोळ्याच्या निमित्ताने बैलांना नवे दोर, कासरे, गाडीची जोतं, कधी औतासाठी लागणारे दोरखंड घरीच विणले जात, म्हणून बाजारातून सुताच्या लडी आणलेल्या असत. कोणालाही कळणार नाही याची दक्षता घेत त्यातून काही लडी चोरून घेत असू. त्यातही वेगवेगळ्या रंगाच्या धाग्यांना जमा करून घेण्यात अधिक स्वारस्य असायचे.

उन्हाळा परिसरावर आळसावलेपण घेऊन यायचा. दुपारच्या रणरणत्या उन्हात झाडाच्या सावलीत, घराच्या भिंतींच्या आडोशाला पत्त्यांचा डाव मांडला जायचा. आगपेटीच्या चित्रांच्या नोटा, चिंचोके, बाभूळच्या बिया, एरंडीच्या बिया, आंब्याच्या कोया, गोट्या काय काय लावून खेळत राहायचे. कधी छापा-काटा करून साठवलेली दौलत उधळीत राहायचे. कुणीतरी एखाद्या दिवशी जिंकतच राहायचा. सगळे खिशे या वस्तूंनी भरून जायचे, मग सदरा काढून त्याच्या बोचक्यात हा ऐवज कोंबला जायचा. कुणी कंगाल झालेला असायचा; पण खेळायचा मोह काही टाळता यायचा नाही. मग भर उन्हात गोठे, गल्ल्या, उकिरडे असे काय काय ठिकाणे बिया, कोया वेचण्यासाठी शोधत राहायचे.

दुपारचे दोनतीन वाजले की, सगळे नदीकडे सुसाट सुटायचे. तेव्हा गावात नळ आलेले नसल्याने गुरावासरांना पाणी पाजण्यासाठी नदीवर न्यावं लागायचं. एकदाका नदीवर गुरं नेली की, पुढचे दोनतीन तास पोहण्याच्या नादात सगळं विसरायचे. दुथडी भरलेल्या नदीच्या तीरांना पार करण्याच्या पैजा लागायच्या. अंगावरील कपडे उतरवून नदीच्या काठावर ठेवायचे वाऱ्याने उडू नये म्हणून त्यावर दगड टाकायचे आणि पाण्यात उड्या मारायच्या. अथांग पाण्यात विहरत राहायचे. मधूनच गायी घराकडे निघायच्या. पोहताना कुणाचं लक्ष गेलं की, तसाच त्यांच्यामागे पळायचा. हाकलून परत आणायचा. म्हशी मात्र याबाबत हुशार. एकदाका पाण्यात शिरल्या की, हाकलल्याशिवाय बाहेर पडत नसत. कधीकधी काठावर ठेवलेले कपडे खायची वस्तू समजून एखादी नाठाळ गाय तोंडात धरून चघळत राहयची. तिच्याकडे कुणाचं तरी लक्ष जाईपर्यंत त्याच्या चिंध्या झालेल्या असत. अशावेळी होणारी गोची अवघड प्रश्न असे. एकवेळ सदरा असला तर निदान निभावून तरी जायचे; पण पॅण्ट बळी पडली की, सगळंचं अवघड जागेचं दुखणं होऊन बसायचं.
 
गुल्याचा आणखी एक आवडता उद्योग दिवसभर कुठेकुठे भटकत राहायचा. कुठलेतरी उकिरडे, झाडावेलींच्या जाळ्यांमध्ये डोकावत राहायचा. याला कुठून आणि कसा सुगावा लागायचा कोणास ठाऊक. नदीवर दारू तयार करण्यासाठी भट्ट्या लागलेल्या असत. चोरून-लपून कुठल्यातरी लवणात दारू पाडण्याचे काम सुरु असायचे. भट्टी लागली की, त्यादिवशी वीसपंचवीस बाटल्या भरून दारू गावात आणली जात असे. त्या कोणी घरात ठेवीत नसे. दारू विकणारे कोणत्यातरी उकिरड्यात पुरून किंवा वेलींच्या जाळ्यात लपवून ठेवत. लागली तशी आणून विकत असत. गुल्या दुपारीच ती सगळी ठिकाणे शोधून येत असे.

शाळेला सुटी असली की, हा सगळ्यांना जमा करायचा. सगळी फौज आपल्याला कोणी पाहत नसल्याची काळजी घेत बाटल्या लपवलेल्या ठिकाणी दाखल व्हायची. हा सरपटत जाळीत शिरायचा. खजिना हाती लागल्याच्या थाटात लपवून ठेवलेल्या बाटल्या दाखवायचा. उकिरड्यावरील कचरा वेगळा करून कोणी पाहत नसल्याचा अंदाज घेत बाटल्या वर काढायचा. विस्फारलेले डोळे बाटल्यांकडे कुतूहलाने बघत राहायचे. आता काय? हा प्रश्न नजरेनेच एकमेकांना विचारत खाणाखुणा व्हायच्या. विचार पक्का व्हायचा. सगळ्या बाटल्या संपवायच्या. एकही शिल्लक राहता कामा नये. सगळेच सरसावून तयार झालेले, नजर आजूबाजूला भिरभिरत रहायची. कोणी आपणास पाहत नाही ना, याची खात्री करून घ्यायचे. आमच्यातले काही रस्त्यावरून कोणी इकडे येतंय का पाहत राहायचे आणि बाकीचे शोधक नजरेने आजूबाजूला काहीतरी शोधत राहायचे. काही डोळे बाटल्यांकडे आणि काही, काहीतरी शोधत गरगर फिरत राहायचे. एव्हाना प्रत्येकाच्या हातात एकेक-दोनदोन दगड लागलेले असायचे. बाटल्या आधीच वर काढलेल्या. हात बाटल्यांच्या दिशेने वळायचे आणि एकामागे एक दगड सुटायचे. बाटल्यांचा चक्काचूर. दारू जमिनीशी समरस होऊन जीव सोडायची. मोजून फक्त दोनतीन मिनिटे, खेळ खल्लास. सगळे सुसाट पळत परत खेळण्याच्या ठिकाणी हजर. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाची कारंजी थुईथुई नाचत राहयची. मी दोन बाटल्या फोडल्या. कुणी तीन, कुणी चार असे सांगत काहीतरी मोठा पराक्रम केल्याच्या थाटात बढाई मारत राहायचे.

संध्याकाळी कुणालातरी बाटली हवी असायची. दारू विकणारा बाटल्या लपवलेल्या ठिकाणी पोहचायचा समोरील दृश्य पाहून अवाक. तल्लफ आलेला माणूस कासावीस. विकणारा नुकसान झाले म्हणून आणि अट्टल नशेबाज प्यायला मिळाली नाही, म्हणून मनसोक्त शिव्या घालत तडफडत राहायचे. गुल्या मुद्दामहून त्या ठिकाणी जायचा आणि साळसूदसारखा काय चालले आहे याचा अदमास घेत उभा राहायचा. विचारलेच तर, ‘आमनी बकरी आथी उनी कारे भो!’ म्हणून त्यांनाच विचारायचा आणि मनातल्यामनात हसत राहायचा. तेथून सगळं ऐकून अधिक मीठमिरची लावून मित्रांना सांगायचा. आपण काहीतरी अचाट आणि अफाट काम केल्याचे वाटून सगळे टाळ्या देत खिदळत राहायचे. मुलांना या प्रयोगात आनंद मिळायला लागला. सापडली संधी की, फोड बाटल्या उद्योगच सुरु झाला, तोही गुपचूप.

नेहमीच घडणाऱ्या या प्रकाराने त्रस्त झालेला दारू विकणारा खोड मोडण्याच्या इराद्याने तयारच होता. फक्त योग्य संधी शोधत होता. काही दिवस त्याने पाळत ठेवली. घडायचे तेच घडले. नेहमीप्रमाणे भट्टी पेटली. तयार झालेली दारू लपवण्यासाठी आली. लपवली. गुल्याला कोण आनंद.  पाहिले आणि आला पळत. आम्ही सगळे मोहिमेवर निघालो. पण यावेळी गनीम सावध होता. दारू विकणारा आधीच लपून बसलेला. आम्ही आक्रमणाच्या पवित्र्यात. हल्लाबोल करायच्या तयारीत असतांना बाहेर आला आणि धरली गुल्याची गचांडी. आमच्या हातातील अश्म अस्त्रे खालच्याखाली पडली. सगळ्यांनी धूम ठोकली. पळत जावून काही जण थोड्या अंतरावर थांबले आणि काय होतेय पाहत राहिले. हा त्याच्या तावडीत पक्का गवसला. गयावया करू लागला. दोनतीन थोबाडीत बसल्या. मार बसला त्यापेक्षा अधिक लागल्याचे हा नाटक करीत होता. भोकांड पसरून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत राहिला. हाताची पकड थोडी सैल झाली आणि संधीचा फायदा घेवून पसार झाला.

आमच्यातील कोण कुठे, कोण कुठे लपून बसलेले. थोड्यावेळाने एकेक करून सगळे खेळण्याच्या ठिकाणी जमा झाले. गुल्या तेथे पोहचला, तो सगळ्यांचा उद्धार करीतच. दारू विकणाऱ्याच्या नावाने ठणाणा बोंबलू लागला. आठवतील तेवढ्या शब्दांना षष्टी विभक्तीचे प्रत्यय लावून तोंड वाजवू लागला. एव्हाना आमच्या पराक्रमाचे पाढे घरी वाचून झाले होते. आम्हांला सुतराम कल्पना नव्हती. साळसूदसारखे घरी पोहचलो आणि अनपेक्षित सरबत्ती सुरु झाली. घरच्यांच्या हाताचा मार त्या दिवसाचा बोनस ठरला. दुसऱ्या दिवसापासून असे साहस कधी करायचे नाही यावर एकमत झाले. आणि दारू विकणाऱ्याने बाटल्या पुन्हा कधी अशा ठिकाणी लपवल्या नाहीत, विक्री करीत होता तोपर्यंत. त्याच्यासाठी आम्ही दिलेला तो धडा होता, पण आमच्यासाठीही ते शिकणेच होते.

दिसामासाने मोठे होत गेलो. उनाडपण संपत गेलं. ‘स्व’जाणीव प्रबळ होत गेली. जगण्याला मार्ग असतो, याचे भान आले. पूर्णपणे नाही; पण थोडेतरी जगणे मार्गी लागण्याच्या वाटेवर पाऊले पडू लागली. शाळेची नकोशी वाटणारी वाट आपली वाटू लागली. शाळेचा मार्ग धरणारे जीवनाच्या रस्त्यावर लागले. गुल्याने आधीच निवडून घेतलेली शेतशिवाराची वाट धरली. काळ्या मातीत तो आपला विठ्ठल शोधू लागला. संसाराच्या मांडवात स्थिरावला. पण माणसाच्या मनाचा थांग कुणाला कसा लागावा. मनाचे विभ्रम कधीकधी मनालाही कळत नसतात की काय कोण जाणे. लपवलेल्या दारूच्या बाटल्यांचा चक्काचूर करणाऱ्या गुलाबच्या हातात दारूची बाटली कशी येवून विसावली, त्याचे त्यालाही समजले नाही. जणू सूड उगवण्यासाठीच ती येवून विसावली. हा तिच्या प्रेमात आकंठ बुडाला. याच्या दिवसाची सुरवात आणि संध्याकाळचा शेवट मदिरेच्या पात्रात बुडणाऱ्या स्वाभिमानाच्या तुकड्यांनी होऊ लागला.

नशेच्या अंमलाने जीवनाचं पटल अंधारून आलं. सुखनैव चालणाऱ्या घराच्या पावलांना खीळ बसली. कधीतरी कुणाच्या तरी आग्रहाने असेल किंवा आणखी काही, हाती घेतलेला एकच प्याला याला तळीरामाच्या सोबतीला घेऊन गेला. कसं आणि काय झालं सांगणं अवघड; पण मदिरेच्या अंमलात असणाऱ्या गुलाबच्या जीवनाच्या पाकळ्या कोमेजायला लागल्या. जगण्याचा ताल बिघडला आणि जीवनाचा तोल सुटला. कधीतरी गावी गेल्यावर भेटायचा. तेवढ्याच आस्थेने बोलायचा. त्याच्या अवताराकडे पाहून काही सांगितले, थोडं समजावण्याचा प्रयत्न केला की, हसण्यावारी नेत, हेच आपलं नशीब वगैरे असल्याचे म्हणीत मनातल्या वेदनांवर उपाय म्हणून परत मदिरेच्या आश्रयाला विसावयाचा. कुठलीतरी ठसठसणारी जखम अंतर्यामी लपवून आला दिवस ढकलत राहायचा. जगणं रोजच परीक्षा घेऊ लागलेलं. याच्या व्यसनाला विराम देण्यासाठी सैरभैर घर कोणी सांगितलेल्या मार्गाने उपाय करीत राहिले. दारूला, दारू विकणाऱ्यांना शिव्याशाप देत राहिले. हा तितका अधिक डुंबत राहिला, जीवन प्रयोजनशून्य असल्यागत.

मुलं मोठी होत असल्याच्या जबादारीचं यत्किंचितही भान नसलेल्या कैफात जगू लागला. मुलगी वयाने वाढत जावून लग्नाला आली. याला त्याशी काही देणेघेणे नसल्यासारखा. मुलीच्या लग्नाचे सारे सोपस्कार भाऊबंदकीने पार पाडण्याचे ठरविले. अन् याला काय सुबुद्धी झाली कोणास ठावूक. स्वैर मनाला बांध घातला की, मदिरेच्या सहवासाला विटला कोण जाणे. कधीतरी हातात घट्ट पकडून ठेवलेली बाटली संतापाने फेकली. पुन्हा एकदा बाटलीच्या ठिकऱ्या उडाल्या. काचेच्या तुकड्यांच्या प्रतिमा प्रकाशात चमकू लागल्या. त्याचे रंग आजूबाजूला फाकू लागले. याच्या अंतरंगात आस्थेचे रंग जागायला लागले. इंद्रधनुष्यी जगण्याची स्वप्ने मनाच्या क्षितिजावर दिसू लागली. एक साधंसरळ जगणं अपघातानं चुकीचं वळण घेऊन विसकटलं होतं, ते पुन्हा मार्गी लागलं. स्वप्नांचे साज घेऊन सजू लागलं. संसाराच्या कोमेजलेल्या ताटव्यात प्रमुदित ‘गुलाब’ डोलू लागला. हरवलेला परिमल परिवाराच्या प्रांगणात पसरू लागला. प्रसन्नतेचे निर्झर पुन्हा प्रवाहित झाले. चकवा पडलेला प्रवासी आस्थेचा कवडसा पकडून परतीच्या प्रवासाला लागला.

गुलाब साधा जगला आणि जगतोही आहे. जगण्याचा सहजमार्ग विसरलेली पावले पुन्हा भक्तिमार्गाने वळली. भजनांच्या भक्तिरंगात स्वतःची आस्थेची डूब शोधतो आहे. गळ्यातील तुळशीची माळ आषाढीला अनामिक ओढीने विठ्ठलाच्या वाटेवर ओढून नेते आहे. पंढरीच्या वाटेने धावणारी त्याची पावले माणूसपणाचे आयाम घेऊन उभी राहिली. गाव, गावातील माणसे बदलली आहेत. घडणारे बदल चांगले की, वाईट हा भाग गौण. बदल काळाची अनिवार्यता असते. ते कसे असावेत, हे ठरविण्याचा काळालाही अधिकार नाही. ते विधायक असतील, तर त्याचं स्वागत करण्यासाठी पायघड्या घालायला संदेह नसावा. त्यांना माणूसपणाची किनार नसेल, तर नाकारणेच रास्त. पण माणसाला एवढा विचार करायला काळ बहुदा अवधी देत नसावा. साधेपणातून सहज गवसणारे सौंदर्य विसरून माणसे अवघड वाटेने वळत आहेत. जगण्याचे रंग विस्कटत आहेत. व्यसनांचा रंग जगण्यात सामावतो आहे. संकुचितपणाच्या छटा जीवनात येवून सामावल्या आहेत. कारण नसतांना मोठेपणाचे स्वनिर्मित रंग कुणी जीवनचरित्रात भरतो आहे. राजकारणाचा नवा रंग समाजकारणाचे गोंडस नाव धारण करून परिसरात स्थिरावतो आहे. विचारशून्य माणसे अगतिकांच्या परिस्थितीचा अपेक्षित फायदा उठवत मोठे होत आहेत. साधीभोळी माणसे सावज होत आहेत.

पूर्वी गावात निदान व्यसनी माणूस वयाच्या खूप पुढच्या वळणावर तरी उभा असायचा. आता ज्यांच्या वयातून अल्लडपण अजून संपलेले नाही, अशी कोवळी पालवी पानगळीच्या मोसमाला सामोरी जात आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीची फळे सोबत घेऊन उद्विग्न जगणं जगत आहेत. समाजकारणाचा साधा रंग उडत जाऊन शहकाटशहचे नवेच खेळ रंगात आले आहेत. राजकारणाच्या मृगजळी सुखांची मोहिनी मनावर पडत आहे. क्षणभंगुर सुखांचा डामडौल भुरळ घालत आहे. संमोहित माणसे आभासी सुखांच्या पाठीमागे लागत आहेत. वंचना पदरी पडून उद्ध्वस्त होत आहेत. प्रदूषणापासून दूर आहेत, ते आयुष्याचे रंग शोधून भल्या विचारांच्या सोबत उभे आहेत. साधी माणसे समाजात संख्येने फारशी राहिली नाहीत हे वास्तव असले, तरी आहेत ते ओंजळभर चांगुलपण घेऊन आपला आसपास आस्थेच्या गंधाने दरवळत राहील याची काळजी घेत आहेत. गुलाब अशाच तिकट्यावर उभा आहे. कुणा घराच्या तोरणापासून मरणापर्यंत साऱ्यांच्या मदतीला धावतो आहे. आपला भूतकाळ एक अपघात होता, हे मनाने मान्य करून वर्तमान समृद्ध करीत भविष्याची सोनेरी स्वप्ने जीवनपटावर गोंदतो आहे. हरवलेली, दुरावलेली उमद्या मनाची माणसे वेचून काही करू पाहतो आहे. लहानपणचा रम्यकाळ आठवत, तारुण्याच्या उमेदीच्या स्वप्नांच्या साज चढलेल्या आणि पुढे जाऊन दुभंगलेल्या जगण्याला विसरून नव्याने जीवनाचे गाणे सजवतो आहे.

माणसे वर्तमानात जगताना भविष्याच्या धूसर पटलावर स्वप्ने कोरत असतात. याच्या स्वप्नांना महान होण्याची आस कधी नव्हती आणि आजही नाही. साधसं जगणं सुंदर व्हावं, एवढीच अपेक्षा घेऊन हा आपलं क्षितिज शोधतो आहे. शिशिराच्या पानगळीत निष्पर्ण होऊन रिक्त झालेली झाडे वसंतात नव्याने फुलून, बहरून येतात. काही माणसे भूतकाळ मागे टाकून भविष्याच्या वाटेवर प्रवास करताना वर्तमान समृद्ध करीत बहरत राहतात. फुलांना फुलून यायला, झाडांना बहरून यायला ऋतूंची प्रतीक्षा करायला लागते. प्रतीक्षेच्या पावलांनी चालत येणारा मोहर झाडांना देखणेपण देतो. निष्पर्ण झाडांच्या शाखांवर अंकुरित झालेले कोंब हिरवाई कोरून सजतात, सवरतात इतरांना आनंद देत राहतात. गुलाब असाच बहरतो आहे, आसपासच्या परिसरात आस्थेचा पसाभर गंध पसरवत.