समस्या

By // No comments:
समस्या असा एक शब्द, ज्याभोवती इच्छा असो अथवा नसो, सगळ्यांनाच प्रदक्षिणा करायला लागतात. वांच्छित, अवांच्छित असल्या सोईस्कर कप्प्यांत नाही ढकलून देता येत त्यांना. समस्या इकडच्या असतात, तिकडच्या असतात, आतल्या असतात, बाहेरच्या असतात तशा अधल्या-मधल्याही असतात, प्रवाहातल्या असतात, तशाच किनाऱ्यावरच्याही असतात, कधी उथळ असतात, कधी अथांग असतात अथवा अन्य काही असू शकतात. पण त्या असतातच असतात. त्यांना काही कुणी आवतन देऊन आपल्या अंगणी आणलेलं नसतं. आगंतुक असतात त्या. अभ्यागताची पावले घेऊन चालत येतात त्या. त्यांना टाळायचे, नसतील टाळता येत तर त्यापासून पळायचे विकल्प नसतात. म्हणून की काय संदेहाची अनेक वर्तुळे त्यांच्याभोवती कोरलेली असतात. 

समस्यांचा गुंत्यात माणूस गुरफटला की, त्याभोवती प्रदक्षिणा घडणे क्रमप्राप्त. एका अस्वस्थ वणवणचा आरंभ असतो तो, तसा विरामही त्यातच सामावलेला असतो. काही शेवट कडवटपणा कोरून जातात, तसे काही गोडवाही ठेवून जातात स्मृतीच्या पानांवर. याचा अर्थ सगळेच शेवट गोडवा घेऊन येतात असं नाही. समस्यांच्या महाकाय बुरुजांच्याआडून डोकावणारा एखादा हलकासा मुक्तीचा कवडसा दिसला तरी केवढं आश्वस्त वाटतं. आस्थेचा चतकोर तुकडा हाती घेऊन चौकटी पार करण्याचा माणूस प्रयत्न करतो, पण हेही काही सहज नसतं.

आपली समस्या हीच असते की, आपली समस्या नेमकी काय आहे, हेच आपल्याला उमगत नाही बऱ्याचदा. तसाही माणूस केवळ वलयांकित नसतो, तर समस्यांकितही असतो. जीवनयापन करताना समस्या समोर उभ्या ठाकल्या नाहीत, असा कुणी माणूस इहतली अधिवासास असेल असं वाटत नाही. समस्या वैयक्तिक असतात, सामूहिक असतात. त्या लहान असतात, मोठया असतात. सहज सुटणाऱ्या असतात, कधी जटिल गुंते घेऊन अमरवेलीसारख्या आयुष्याला बिलगून बसतात. जगण्याला वेढून घेतात त्या, हेही सत्यच.

समस्या कुठे नसतात? त्या सार्वकालिक असतात. त्यांची उत्तरे शोधावी लागतात. नसतील सहज हाती लागत, तर अन्य विकल्प पडताळून पाहावे लागतात. कुठल्यातरी पर्यायात त्यांचे उत्तर सापडते. समस्या सोडवणारी आयती सूत्रे नसतात. समीकरणे अवघड असली, म्हणून आयुष्याच्या पानांवर मांडलेली गणिते अशीच सोडून देता नाही येत. चुका घडत राहिल्या, तरी उत्तर हाती लागेपर्यंत आकडेमोड करावी लागते. सुटतो कधी एखादा हातचा, म्हणून प्रयत्न नको सुटायला. पुस्तकातील गणित नाही आवडत बऱ्याच जणांना. ते नाकारण्याचा पर्याय हाती असतो, पण जीवनग्रंथावर कोरलेल्या गणिताला उत्तरांच्या विरामापर्यंत पोहचवावे लागते. संख्याना अर्थ द्यावा लागतो. नवे सवंगडी, जुने सोबती, थोडी अनुभूती, थोडं आकलन सोबत घेऊन उत्तरांचा धांडोळा घ्यावा लागतो. सहकार्याचे हात शोधावे लागतात. माणसे मदतीचे हात बनून आले तर तीही माणसे असल्याने प्रमाद घडतीलही त्यांच्याकडून. म्हणून प्रमाद काही पूर्णविराम नसतो. काही शक्यता गृहीत धरून खेळावे लागतात एकेक खेळ. फेकावे लागतात आयुष्याच्या सारीपटावर काही फासे. चालव्या लागतात ज्ञात-अज्ञात वाटांच्या चाली. साधावा लागतो संवाद, कधी स्नेह्यांशी, कधी स्वतःशी, तर कधी सुखांशी.

संवाद आशेचे कवडसे शोधणारा विकल्प असतो. त्यांचा माग काढत चालत राहिले की, सापडते पावलापुरती वाट. संवाद आपणच आपल्याशी केलेला असेल, आपल्यांशी साधलेला असेल अथवा अन्य सूत्रांच्या माळेत ओवलेला असेल. संवादाचा शब्द सोबतीला असला की, असणे शब्दाला आशय गवसतो. प्रश्नांपासून पलायनाचे पथ सुलभ अन् प्रशस्त वाटत असले, तरी त्यांच्यावर मान्यतेची मोहर नाही ठोकता येत. आस्थेची मुळे विस्तारता आली की, ओलावा सापडतो. विश्वास, मग तो आपणच आपल्यावर केलेला असला काय अथवा व्यवस्थेवर असला काय. तो असला की, संदेह नाही राहत. काही किंतु राहू नयेत म्हणून त्या योग्यतेची उंची संपादित करायला लागते. आश्वासन दिली घेतली जातात, त्यात विश्वास असला की, अविश्वास आसपास फिरकतही नाही. हाती घेतलेले एखादे काम वाकुल्या दाखवते, तेव्हा दोष नेमका कुणाचा, हे आपणच शोधायला लागतं. केवळ कुठल्यातरी निमित्ताला कारण करून दोषांपासून विलग नाही होता येत. दोषरहित कुणी नसतो, पण दोषसहित स्वीकारांसाठी स्वतः सरळ असायला लागतं. संदेहाच्या ससेमिऱ्यापासून सुटका हवी, तर स्वच्छ असणं आवश्यक असतं.

कुठल्याशा कामात त्रुटी असणे काही लाजिरवाणे नसते, पण दोष दुर्लक्षित होणे विश्वासाची उंची कमी करणारे असते. निवड आपलीच असते, आपण कोणता विकल्प निवडायचा. सगळ्याच समस्यांना हलक्याने घेऊन चालत नाही. कारण काही कारणे कारणासह येतात, काही विनाकारण. त्यांचे निराकरण करणे, हेच विचारांचे प्रयोजन असायला लागते. समजा तरीही काही किंतु राहिलेच असतील शिल्लक, तर संवादातून उत्तरे गवसतील. चर्चा, मते, विचार यांची बेरीज म्हणजे उत्तर असते, नाही का?

व्यक्त आणि अव्यक्त यात केवळ एका मात्रेचे अंतर आहे अन् ते पार करता येतं त्यांना स्पष्टीकरणे द्यायची आवश्यकता नसते. संदर्भ समजले की, स्पष्टीकरणाचे अर्थ उलगडत जातात. फक्त त्यांची उकल करण्याचं कौशल्य अवगत करण्याइतकं व्यापकपण अंतरी नांदते असायला लागते. कधी कधी भूमिका उत्तम असते, हेतू उदात्त असतो, विचार खूप चांगला असतो; पण व्यवस्थेने आखून दिलेली अथवा आपण भोवती कोरून घेतलेली एक चौकटही आसपास नांदती असते. तिच्या मर्यादा पार करता येणे जमले की, विचार वाहते राहतात. वाहते राहण्यासाठी पुढच्या वळणाकडे सरकत राहावे लागते. विचलित होऊन उपलब्ध विकल्प हाती नाही लागत. कार्याप्रती समर्पण सात्विकतेच्या परिभाषा लेखांकित करते. समस्येचे सम्यक आकलन नसेल घडत, तर प्रश्नांकडे पाहण्याचे ठिकाण बदलून पाहावे लागते. बदललेले ठिकाण कोन बदलते अन् बदललेला कोन पाहण्याचा दृष्टिकोनही बदलवतो. फक्त त्याकडे पाहताना डोळ्यात नितळपण असावं. विचारांत निर्व्याजपण राहावं आणि आचरणात निखळपण नांदतं असावं. अंतर्यामी आस्थेचा ओलावा वाहता असला की, उगवून येण्याचे अर्थ आपोआप आकळतात.

समस्यांपासून सुटका करण्यासाठी अंतरावर उभं राहून नाही चालत; त्यांच्या अंतरंगात पोहचावं लागतं. नदीच्या पात्राची खोली अनुभवल्याशिवाय कशी कळेल? पाण्याचा अंदाज येण्यासाठी पात्रात उडी घ्यावी लागते. नसेल तरंगता येत, तर पेलून धरणारी साधने घेऊन त्याचा अदमास घ्यावा लागतो. किनाऱ्यावर उभं राहून प्रवाहाचे गोडवे गायलेत, म्हणून पाणी मधुर होत नसते. त्यात तो गोडवा अंगभूत असतो. का, किती, केव्हा, कसे? हे प्रश्नही असेच असतात. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांच्या अथांग पात्रात उडी घ्यावीच लागते, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

राज्या

By // No comments:
जगात असंख्य सुखं ओसंडून वाहत आहेत. पण ती काही सगळ्यांच्या आयुष्याचे किनारे धरून सरकत नाहीत. सुखांच्या परिभाषाही संकुचित ठराव्यात एवढ्या सुविधांनी एकीकडे जगणं सजलेलं, तर दुसरीकडे वैशाख वणवा. काहींकडे सगळंच असावं; पण काहींकडे काहीच नसावं, हा वर्तन विपर्यास नाही का? अविश्रांत कष्ट करूनही काहींच्या ओंजळी रित्याच का राहत असतील? जगणं उजळून टाकणारा हिरा शोधायला निघावं, तर लाख प्रयत्न करूनही हाती केवळ काचेचे तुकडेच यावेत. एखाद्याच्या वाट्याला सतत वेदनांचे वेद का? वंचनाच आयुष्याचं अंग का बनावी? काही प्रश्नांची उत्तरे नाही लागतं हाती, हेच खरे. त्यातील हे काही असावेत. 

आयुष्य योग आहे की, योगायोग? योग असेल तर तो सगळ्यांनाच साधता येतो असं नाही अन् योगायोग असेल तर सगळ्यांच्या कुंडलीत नसतो. मग यशाचं गमक नेमकं असतं तरी काय? काहींच्या जगण्यात केवळ भोगच का? प्रामाणिक प्रयत्न करूनही काही म्हणता, काहीच कसं हाती लागत नाही. कोणत्या काळातल्या कर्मांचे भोग म्हणावेत याला? आयुष्यात अधिवास करून असलेल्या अगणित प्रश्नांचे संदर्भांसह स्पष्टीकरण करणे प्रत्येकवेळी संभव होत नाही, हेच खरे. माणूस म्हणून त्याच्या विस्ताराची ही मर्यादा. अर्थात, हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा, विचारांचा भाग. परिस्थितीच्या बुलंद बुरुजांवर माथा आपटूनही ओंजळी रिकाम्याच राहतात, तेव्हा बऱ्याच गोष्टी देवाच्या हाती अन् दैवाच्या भरोशावर सोपवून देण्याशिवाय सामान्य वकूब असणारा माणूस आणखी करूही काय शकतो?

सगळे सायास प्रयास करूनही उपेक्षेचे धनी होणं आपल्यातील न्यून असतं की, नियतीने ललाटी कोरलेले अभिलेख? न्यून असेल तर नियती, दैव, वगैरेंना बोल लावणं कितपत सयुक्तिक असतं? एकदाका न्यून मान्य केलं की, आपणच आपल्याला उसवत जावं लागतं अन् टाके टाकून सांधत राहावं लागतं. पण उत्तर हरवलेले प्रश्न समोर उभे असतील, तर सामान्य माणूस दैवशरण होण्याशिवाय आणखी करूही काय शकतो? जीवन संघर्ष वगैरे असतो, हे सांगायला कितीही छान असलं, तरी अशी वाक्ये केवळ भाषणात टाळ्या ऐकण्यासाठी ठीक. वास्तवात संघर्षाला अनेक कंगोरे असतात. रक्तबंबाळ करणारे टोकं असतात. त्यांनी केलेल्या जखमांनी वेदना होतात, तेव्हा संघर्ष शब्दाचा अर्थ समजतो. वातानुकूलित यंत्रांनी देहाभोवती लपेटलेल्या गारव्यात; जगण्याशी भिडण्याचे सगळेच संदर्भ समजतील असं नाही. कागदावरची स्थिती आणि रस्त्यावरच्या परिस्थितीत अंतराय असतं. विचारांचं विश्व निराळं आणि वास्तवातील जग वेगळं असतं.

‘निवड’ शब्दाचा कोशातला अर्थ आपल्या हाती शक्यतेचे अनेक पर्याय उपलब्ध करून देत असला, तरी माणसांना सगळ्याच गोष्टी काही निवडता नाही येत. समजा तसं असतं तर नियती, दैव शब्दांना कोशात कुठला तरी कोपरा धरून निष्क्रिय पडून राहावं लागलं असतं. बऱ्याच गोष्टी आयुष्यात निवडता येतात, नाही असं नाही; पण सगळ्याच नाही. काही गोष्टींसाठी विकल्प नसतो. त्या असतात हे आणि एवढंच सत्य. समजा देव समोर उभा असता अन् इहतली पाठवताना राज्याला विचारलं असतं की, तुला तुझं अवतारकार्य धारण करण्यासाठी कोणतं कुल निवडायचं? खात्रीने सांगतो, त्याने आज वाट्याला आलेला पर्याय कधीच निवडला नसता. सगळं आयुष्य अभावाचा अध्याय असलेल्या कुलात त्याने कालापव्यय कधीच केला नसता. जन्मदत्त नाती आणि त्यासोबत वाहत येणाऱ्या गोष्टी टाळता नाही येत कुणालाच, हे मान्य. नसतील टाळता येत, पण त्यांच्या टाळक्यावर उभं राहून कर्तृत्त्वाची उंची अवश्य वाढवता येते. त्यासाठी आपल्या अंतरी अधिवास करून असलेल्या आत्मविश्वासाला आभाळाशी गुज करण्याएवढा आवाका असायला लागतो. हे सगळ्यांनाच समजतं असं नाही.

राजेंद्र नाव त्याचं. ऐश्वर्याचं निदर्शक, अधिसत्तेचं द्योतक. सुखांच्या परिभाषांचं समर्थक. पण म्हणतात ना, नावात काय असतं! नावात काही असतं तर राज्याला अवघं आयुष्य रंक बनून अस्वस्थ वणवण नसती करायला लागली. निदान चतकोर तुकड्याचा तो राजा असता. याला चिकटवलेल्या नावात राजेशाही थाट असला, तरी याचं जगणं थेट रंकांच्या गोतावळ्याशी जुळलेलं. नावात देखणेपण असलं, तरी याच्या देहावर देखणेपणाचे अंश शोधूनही सापडणं अवघड. सुमार उंची. किरकोळ अंगकाठी. डोक्यावरील केसांना कधी वळण लावण्याचं कष्ट घेतले नसल्याने त्यांचा वाऱ्यासोबत स्वैर संचार. बसलेली गालफडे. चेहऱ्यावरचा सगळाच नूर हरवलेला. ज्याच्या जगण्याचे सगळेच सूर साखळीतून सुटलेत, त्याला कसला सापडतोय नूर. नाकाला असणारी धार तेवढी याच्या कायेवर असणारी एक सरळ रेषा. बाकी कुठल्याच रेषेचा कुठल्या रेषेशी मेळ नाही. हाडांच्या सापळ्यात अडकलेल्या आकृतीला ओळखण्यासाठी दिलेलं राजेंद्र नाव वगळलं, तर काहीही सरळ नाही. नावात श्रीमंती असली, तरी दूरदूर शोधूनही याच्या जगण्यात चुकूनसुद्धा समृद्धी कधी दिसली नाही. देहाला वेढून असलेला रंग गोरं असण्याकडे कमी आणि काळा असण्याकडे अधिक कललेला. सदासर्वकाळ दुष्काळी प्रदेशात वास्तव्य असलेल्या गुरावासरांसारखं पाठपोट खपाटीला लागलेलं. पाप्याचं पितर या शब्दाचा समानार्थी शब्द म्हटलं, तर अतिशयोक्त ठरू नये असा.

जन्माला आला हाच एकमेव क्षण याच्या आयुष्यात आनंदाचा असावा. तो त्याच्यासाठी जेवढा होता, त्यापेक्षा अधिक त्याच्या आईवडिलांसाठी. कदाचित घरातील पहिला मुलगा म्हणून याचं कौतुक अधिक झालं एवढंच. अर्थात, गरिबाघरी कौतुक असून असणार काय आहे. चार लिमलेटच्या गोळ्या हाती पडणं, ही सुखाची परिसीमा अन् त्यातल्या गोडव्यासोबत जगण्यातलं माधुर्य शोधणं, ही समाधानाची व्याख्या. याच्यापेक्षा वयाने मोठी एक बहीण अन् याहून आणखी एक लहान. त्याकाळच्या मानाने परिवार बऱ्यापैकी आटोपशीर. घराचं गोकुळ करण्याची स्पर्धा असण्याच्या काळात या सुदाम्याच्या घरात राबते हात आणि खाती तोंडे कमीच राहिली हेही एक नवल. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी भाकरीभोवती विश्वाची वणवण सुरुये कित्येक शतकांपासून. यांच्या वाट्याला येणारा प्रत्येक दिवसच नाहीतर त्यातले प्रत्येक पळ वणवण घेऊन आलेले. चोच दिली तो चाराही देईल वगैरे म्हणतात. पण हा केवळ निष्क्रिय प्रारब्धवादाला प्रतिष्ठा प्राप्त करून देताना समाधान शोधण्यासाठी केलेला विचार. चोच ज्याची त्यालाच चालवावी लागते आणि चाराही ज्याचा त्याला शोधावा लागतो. पाठीला पाठ लावून जन्माला आलेले एकत्र नांदत नाहीत, तेथे इतरांचा विचार तरी कोण करतो. 

कोणाकडे शेतीवाडी असते, कुणाकडे बंगलागाडी, कुणाकडे आणखी काही. राज्याकडे असलंच काही तर अठराविश्वे दारिद्र्य. घरातील सगळ्या कोपऱ्यांमध्ये खच्चून भरलेलं. याशिवाय आणखी काही असलंच तर घरभर पसरलेलं उदासपण तेवढं सतत सोबतीला. हातातोंडाची गाठ पडणं काय असतं, या शब्दाचा अर्थ येथे अवश्य सापडायचा. कधीतरी भूतकाळाच्या कोपऱ्यात या घराने डोकावून पाहण्याचा प्रयत्न केलाच, तर आठवणींशिवाय काहीही हाती लागायची शक्यता नाही. अंधार तेवढा निष्ठावान सेवकासारखा सतत मुक्काम करून असायचा. जुने दिवस आठवताना हे घर मूक आसवं ढाळत पापण्यावरून ओघळणाऱ्या पाण्याला बांध घालू पाहते. 

परिस्थितीसमोर माणूस हतबुद्ध होतो. प्राक्तनासमोर विकल असतो. पराभवासमोर विफल. काळ केव्हा कूस बदलून नव्या वाटेने वळेल, हे त्यालाही सांगता नाही येत. वावराचा तुकडा हाती होता तोपर्यंत भाकरीच्या वर्तुळाचे अर्थ राज्याच्या परिवाराला कधी शोधायला नाही लागले. डोक्यावर छप्पर सुखाची सावली धरून होते तोपर्यंत उन्हाची दाहकता कशी असते, हे केवळ तर्काने समजून घ्यायचं प्रकरण होतं. याचा अर्थ कुबेराचं ऐश्वर्य याच्या अंगणी नांदते होतं असं नाही. पण सकाळ करपून टाकणारा अन् संध्याकाळ कुरतडणारा भाकरीचा प्रश्न समोर उभा राहणार नाही एवढी समृद्धी नक्कीच होती. आयुष्यात असणाऱ्या आनंदाचे अर्थ समजून घेण्याएवढं समाधान अंगणी नांदते होते. आर्त शब्दाचा अन्वयार्थ अजून अवगत व्हायचा होता. 

नम्र झाला भूता... वगैरे सारख्या संतवचनांचे अर्थ आकळलेले असतात, त्यांना माणूस म्हणून असणाऱ्या मर्यादांचे ज्ञान असते. विचारांचे भान सुटते, तेव्हा जगण्यातली जाण जाते. डोळ्यात सुखे अन् डोक्यात उन्माद साचला की, विचारांचं विवेकाशी असणारं सख्य विसर्जित होतं. जीवनग्रंथाच्या पानांवर लेखांकित होणारी अक्षरे पूर्णविरामाचे अर्थ शोधू लागतात. घर नावाची चौकट विस्कळीत होऊ लागली की, मर्यादांची कुंपणे आधी ध्वस्त होतात. कोसळणाऱ्या कड्यांना उंचीची परिमाणे नाही लावता येत. अधःपतनाची कारणे तेवढी सांगता येतात. असंच काहीसं घडलं राज्याच्या घराबाबत. बापाच्या व्यसनाधीनतेचा धक्का घराला बसला. पाया हादरला. कौले कोसळू लागली. म्हणतात ना, घर फिरले की, घराचे वासेही फिरतात. व्यसनांभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणा आयुष्याला ग्रहण लावायला पुरेशा असतात. जगण्याची कारणे सापडतात, त्यांना जगावं कसं हे प्रश्न पडत नाहीत. पण अवघं आयुष्यच प्रश्नचिन्ह झालं असेल तर...? 

मोह टाळून माणसाला सहसा जगता नाही येत, हे खरं असलं तरी त्याला मुठीत ठेवून आयुष्याला मोहरलेपण अवश्य आणता येतं. पण हीच गोष्ट बहुदा अवघड असते. हाती पैसा असावा, आणखी असावा, खूप असावा, ही अपेक्षा नामदेवला मोहपाशात ओढत गेली. तो गुंतत गेला. गुंता येवढा झाला की, त्याच्या गाठी, निरगाठी मोकळ्या करणं अवघड झालं. आयुष्याला आकार देणारी सूत्रे कधी याने शोधली नाहीत. जगण्याची समीकरणे सोडवण्याचा प्रयास केला नाही. सट्ट्याचे ओपन, क्लोज आकडे याचं विश्व अन् त्याभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणा जीवनभक्ती. संसाराची आसक्ती असते. काहींसाठी सक्तीही असू शकते. पण हा आकड्यांवर अनुरक्त. एकवेळ विरक्त असता तर मनाचं समाधान तरी करून घेता आलं असतं. पण याच्या आस्था आकड्यांशी अनुबंधित. अंकांची गोंदणनक्षी कोरलेला आकड्यांचा तक्ता समोर धरून दिवसभर सुरु असलेली आकडेमोड संसारात काडीमोडपर्यंत पोहचू शकते, याची तिळमात्रही जाणीव नसलेला. आपल्याकडील जिद्द, चिकाटी गणिताच्या अभ्यासासाठी उपयोगात आणली असती, तर गणितज्ज्ञ म्हणून किमान गावात तरी याची गणती झाली असती. 

कल्याण वरलीच्या आकड्यांची समीकरणे मांडतामांडता याच्या जगण्याची समीकरणे बिघडत होती. ओपन काय असेल, याचा अदमास घेत सकाळ उगवायची. क्लोज कोणता येईल, याची भाकिते करता करता रात्र अवतरायची. महिना-पंधरादिवसातून लागणारा एखाददुसरा लहानमोठा आकडा याच्या यशाची व्याख्या होती. पाय खोलात जाण्यासाठी एवढं एक कारण पुरेसं होतं. आकडे लावले जायचे शेकड्यांनी, पण लागायचे कवड्यांनी. असं असलं तरी एवढी उर्जा त्याला जगायला पुरेशी होती. लोक भाकरतुकडा खाऊन जगतात, हा आकड्यांनी मनात जागवलेल्या स्वप्नांवर जगायचा. खरंतर आपल्या विनाशाच्या वाटा आपणच प्रशस्त करण्याचा हा प्रकार. डोळ्यांना निसर्गदत्त आंधळेपण असेल, तर एकवेळ समजून घेता येतं. पण कुणी ठरवून विचारांवर पट्ट्या बांधून घेतल्या असतील तर.... त्याला कोण काय करू शकतं. 

दिवसेंदिवस अवघड होत जाणाऱ्या परिस्थितीकडे डोळेझाक करून आपल्या विनाशात मश्गुल असलेल्या नामदेवने कुठून कुठून पैसा उसना घेतला. कधी वावर अटीची खरेदी करून. कधी घर गहाण टाकून. पैसा जाण्यासाठी शेकडो पर्याय, पण येण्याच्या वाटा हरवलेल्या. व्हायचं तेच झालं. घेणेकऱ्यांचा पैशासाठी तगादा लागला. वावर गेलं. घरही चालतं झालं. ज्या वावरात वावरले त्याच्यातच रोजाने जाण्याची वेळ आली. मायेची पाखर धरली, त्या घरातच भाड्याने राहायचे दिवस आले. होत्याचे नव्हते कसे होते याची अनेक उदाहरणे आसपास असूनही माणसे सुधारत नाहीत. त्यात आणखी एकाने भर पडली. 

उपजीविका हा शब्द खूप चांगला वगैरे वाटत असला, तरी त्याच्या पोटात भूक दडलेली असते, हे वास्तव दुर्लक्षित नाही करता येत. खोट माणसात असू शकते, पोटात नसते. पैशाने सगळ्या जादू करता येतात, पण जादूने पैसा तयार करता नाही येत. गाठीला पैसा असला की, भाकरीचं मोल आठवायची आवश्यकता नसते. भूक लागली की, पैशाचे एकेक अर्थ उलगडत जातात. पोट भरण्यासाठी कपडे शिवण्याचं काम नामदेव करू लागला. उसवत जाणाऱ्या आयुष्याला टाके टाकून सांधत राहिला. जोडत राहिला एकेक ठिगळ. पण आभाळच फाटलं असेल तर कुठे कुठे शिवणार. बायको, पोरी मजुरीने दुसऱ्यांच्या शेतात काम करू लागल्या. पोटापुरता पसा पदरी पडेल एवढी व्यवस्था झाली. पण परिस्थितीने पेरलेले ताण कसे संपतील? लहानमोठ्या कारणांनी कुटुंबात कुरबुरी कायम वसतीला. कटकटींनी आयुष्याचा कोपरानकोपरा वेढून राहिला. सगळीकडून अंधारशिवाय काहीही नजरेस पडत नव्हतं. परिणाम व्हायचा तोच झाला. राज्या आधीच लाडावलेला, त्यात कलहांनी फाटलेल्या कुटुंबात कोणी कोणाचं ऐकायला वेळ नाही. वाहवत जाण्याला कारणे हवी होती, ती विनासायास उपलब्ध होती. सैल असणारं राज्याचं वागणं स्वैर झालं.

शाळेत जाण्याच्या वयात शाळा करायची सवय लागणे, आयुष्याची शाळा उठण्याचा प्रकार असतो. शिकण्यासाठी हजार कारणे शोधावी लागतात. नसेलच काही करायचं तर एक क्षुल्लक कारणही पुरेसं असतं. याच्याकडे तर शेकड्याने होती. शाळेच्या वाटेने हा निघाला, तरी वर्गाकडे कधी वळला नाही. पावले वाट वाकडी करून पत्त्यांचे अड्डे सुरु असतील तिकडे पळायची. सुरवातीला चारदोन रुपयांवर सुरु झालेला प्रयोग प्रगती करत करत शेकड्यांवर आला. कधी जिंकणं, कधी हरणं पाठशिवणीचा खेळ खेळत राहिलं. हाती लागतील तेवढे पैसे पळवत आणि असतील तेवढे उडवत गेला. कमतरता झाली की, कासावीस व्हायचा. मग ती कमी भरून काढण्यासाठी घरातील भांड्याकुंड्यांपर्यंत याचे हात पोहचले. बापाने घर, वावर डावावर लावलं, याने सगळा संसारच पणाला लावला. 

घरचे हे सगळं कसं निमूटपणे सहन करीत गेले? असा प्रश्न मनात उदित झाला असेल, तर त्याचं उत्तर याच्या एकटा असण्यात सापडेल. घराला वंशाचा दिवा लाभल्याच्या आनंदात आंधळ्या झालेल्या आईबापाच्या वागण्यात ते आहे. त्याचं वाहवत जाणं त्याचं जेवढं होतं, त्यापेक्षा त्याला वाहते ठेवण्यात मायबापाचं योगदान अधिक होतं. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. याच्या पायाच्या मापाचा पाळणा तयारच झाला नव्हता. पण हा सतत पळत राहिला, नको असलेल्या वाटांनी. राज्या पत्ते कधीपासून खेळायला लागला, नक्की नाही सांगता येणार. पण कळायला लागल्यापासून याच्या हातात पेन, पेन्सिल ऐवजी पत्त्यांचा कॅट विसावलेला. दिवसभर गल्लीतली, गावातली पोरं जमा करायची आणि खेळत राहायचं एवढाच एक उद्योग याला प्रिय. सोबत खेळणारे तेवढे बदलायचे. हा कायम असायचा. सुरवातीला आगपेट्यांची चित्रे, कधी गोट्या, कधी कवड्या असं काय काय असायचं. पण हळूहळू त्यांची जागा पैशांनी घेतली. पैसा, दोनपैसा, पाच पैशाची नाणी असायची. तेथून सुरु झालेले याचे पत्त्याचे प्रयोग जगण्याला असत्याच्या प्रयोगाकडे नेत गेले. पैसे मिळवण्यासाठी काहीतरी खोटं सांगत गेला. असंगाशी संग करत राहिला अन् निसंग होण्याच्या वळणावर येऊन विसावला. 

कोडगेपण काय असतं, हे व्यसनाधीन माणसांकडे एकदा पाहिलं कळतं. राज्या कोडगेपणा कहर होता. ही कहाणी तो सातआठ वर्षाचा असल्यापासून सुरु होते अन् गाव सोडून गेला त्या वळणावर स्वल्पविराम घेऊन विसावते. त्याच्यासोबत खेळलेले, वावरलेले अजूनही खात्रीने सांगतील, हा असेल तेथे कोडगेपणाच्या व्याख्या नव्याने लिहित असेल. टीव्ही, मोबाईल सारखी व्यवधाने आमच्या लहानपणी नसल्याने हुंदडणं हा एकमेव उद्योग. गल्लीतली सगळी पोरं अशीच कुठेतरी जमलेली असायची. राज्याला निवतं द्यायची आवश्यकता नसायची. कोणी खेळात सहभागी करून घेतलं, न घेतलं तरी हा घोळक्यात घुसेलच. आजच्यासारखं तोलून मापून अन् शरीराचे सगळे अवयव जागच्या जागी राहतील याची कटाक्षाने काळजी घेत खेळण्याचा तो काळ नव्हता. आडदांडपणा अगदी सामान्य गोष्ट. लपाछपी असो, विटीदांडू असो, अबाधबी असो की, पत्त्यांचा डाव किंवा आणखी काही. खेळ कोणताही असुद्या, खेळतांना संधी शोधून राज्याला सगळे मिळून धुण्याचा कार्यक्रम आधीच ठरलेला असायचा. त्याला कारणही तसेच असायचे. हा विनवण्या करून केविलवाणा चेहरा करून खेळात घुसायचा; पण एकदाका याने वर्तुळात प्रवेश केला की, कोणाला काय बोलेल, कुणाची कुरापत करेल सांगणं अवघड. बरं हे सगळं करताना आव असा आणायचा की, आपणासारखा गरीब जीव या धरतीवर अन्य कुणीच जन्माला आलाच नसावा. याच्या अशा असण्यामुळे भांडण झालं की, बऱ्याचदा निरपराध असलेलं कुणीतरी मार खायचं. मुलांकडून असेल अथवा घरी तक्रार गेली की, बापाकडून. मग मनात साठवून ठेवलेल्या रागाचे उट्टे असे खेळतांना कधीतरी काढले जायचे. व्याजासह सगळी वसुली व्हायची.

राज्याच्या सामुहिक धुलाईसाठी केवळ निमित्त हवं असायचं. बहुदा ते पत्ते खेळतांना हमखास मिळायचं. खेळतांना हा नेहमी काहीतरी हातचलाखी करायचा. सहसा सापडत नसायचा, पण सापडला की सुटका नाही. आम्ही मनसोक्त हात साफ करून घ्यायचो. तसा हा काडीमुडी. पण मार खाण्यात याचा आमच्यापैकी कोणीही अखेरपर्यंत हात धरू शकलं नाही. मार झेलताना आकांत एवढा मांडायचा की, आताच बेशुद्ध पडेल की काय. त्याची ही चाल सगळ्यांना माहीत असल्याने त्याचा सहसा उपयोग होत नसे, हा भाग वेगळा. पण त्याच्या घरी निरोप पोहचायचा. त्याचे वडील कधी याच्यासाठी लढवय्ये सैनिक बनून मदतीला आले नाहीत. पण माय मात्र धावतपळत यायची. तिच्यादृष्टीने हा अगदी निष्पाप जीव. कोणी कितीही सांगितलं तरी तिचा कधीच यावर विश्वास नसायचा. तिचं लेकरू तिच्यासाठी हरिश्चंद्राचा आधुनिक अवतार. तो कधीच खोटं सांगणार नाही, ही तिने जतन करून ठेवलेली अंधश्रद्धा. एकदाका आई आली की, याला आणखी चेव यायचा. ठेवणीतल्या दोनचार अस्सल शिव्या काढून हा पोबारा करायचा. पुढे बराच वेळ त्याच्या आईशी गर्दीतलं कोणीतरी भांडत राहायचं. 

राज्या मार खातोय, हा निरोप तात्काळ घरी पोहचवण्याचं पुण्यकर्म त्याच्या बहिणीच्या खात्यावर जमा व्हायचं. त्याच्यापेक्षा दीडदोन वर्षांनी लहान होती ती. आम्ही सगळे तिला आकाशवाणी केंद्र म्हणायचो. भावाच्या बाबतीत जरा कुठे खुट्ट झालं की, पुढच्या क्षणाला ही घरी आणि त्याच्या पुढच्या एकदोन मिनिटात त्याची आई भांडणात. हे असं सगळं काही असलं तरी कोणी कुणाचं शत्रुत्त्व सांभाळलं नाही. भांडणं पुन्हा पुन्हा व्हायची काही थांबली नाहीत. परत सगळे एकत्र. अवलक्षणी असल्याची सगळी लक्षणे याच्या रोमारोमात कुटून कुटून भरलेली. त्याच्या वागण्याने घरच्यांनी हात टेकले. पण हा काही सरळ वाटेला लागला नाही. वाकड्या वाटांचं आधीपासूनच अप्रूप. 

राज्याच्या वयाची अन् सोबतची मुलं शाळा नावाच्या कोंडवाड्यात कोंडली जात होती. काही आपणहून पोहचत होती. जगण्याला आकार देणारं साधन म्हणून सगळेच शाळेकडे पाहत होते. हा मात्र पत्त्यांच्या गुत्त्यात गुंतत होता. गुंता अधिक वाढत होता. मोठ्या माणसांची हिंमत होत नव्हती, तेथे हा हिकमती करून पट्टीचा खिलाडी म्हणून घडत होता. पत्ते फेकण्यापासून काटण्यापर्यंत आणि यामध्ये कराव्या लागणाऱ्या करामतीसह सगळी कौशल्य विशेष प्रावीण्यासह याने प्राप्त केली. भल्याभल्यांना याच्या चालींचा अदमास बांधता येत नव्हता. हा सगळ्यांना गुंडाळून, बांधून ठेवत होता. पण हे काही फार दिवस नाही टिकलं. खेळातल्या याच्या बेधडक चाली एव्हाना बऱ्याच जणांना समजायला लागल्या. सुरवातीला सगळे समजत होते; सालं, हे एवढंसं पोरगं कसली हिंम्मत करतंय खोट्या पत्त्यांवर पैसे असे सहज फेकायची. बऱ्याचदा याच्याकडचे पत्ते जोरदार नसूनही हा केवळ हिमतीच्या जोरावर डाव घ्यायचा. पाने पिसली जात होती. वाटली जात होती. समोर फेकली जात होती. चाली चालल्या जात होत्या. डाव दिले, घेतले जात होते आणि नकळत राज्याच्या आयुष्याचा डाव उठत होता. जिंकणाऱ्या राज्याचं राज्य ध्वस्त होत होतं. एकेक बुरुज ढासळू लागले. तसा हा शेवटचा एक डाव खेळून पुन्हा नव्याने उभं राह्यची इच्छा करून रुतत चालला. चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यू झाला याचा. व्यूहात तर शिरला; पण बाहेर पडायचे कसे, हा प्रश्न असल्याने कोंडी होत गेली. एवढा अडकला की, सगळ्या दिशांनी अंधारून यावं अन् आसपास काहीच दिसू नये. हा स्वतःच स्वतःच्या हाताने लिहिलेल्या प्राक्तनाच्या आवर्तात पाचोळ्यासारखा दिशाहीन भिरभिरत राहिला.

काळ त्याचे पत्त्ते त्याच्या सोयीने आणि सवडीने फेकत असतो. त्याच्या चाली समजून चालता येतं, त्यांना जगण्याच्या वाटा अवगत असतात. काळाच्या तुकड्यांचा कोलाज करणारे आपला कोरभर कोपरा सांभाळून असतात. त्याच्या गतीला प्रगतीच्या वाटांनी वळवणारे माणूसपणाच्या व्याख्या नव्याने लिहितात. स्वार्थाच्या वाटेने वळवण्याचा प्रयत्न करणारे एक वांझोटा आशावाद अंतरी रुजवत केवळ स्वप्ने पाहतात. बदलत्या परिस्थितीचे आवाज ऐकले असते तर राज्या आणखी काही असता का? माहीत नाही. पण एखाद्याने मुद्दामच आंधळेपण अंगिकारले असेल तर सूर्याचं प्रखर तेजही कुचकामी ठरतं. ठरवलं असतं तर राज्या निदान त्याच्या आयुष्याला लाभलेल्या चौकटींच्या तुकड्यातला राजा झाला असता. पण एखाद्याला उधळून देण्यातच आनंद गवसत असेल तर... अशावेळी जगातली सगळी तत्त्वज्ञाने वांझोट्या आदर्शवादापुरती उरतात. सगळी मूल्ये मातीमोल होतात. मातीतून उगवून मातीत मिसळताना नव्याने उगवून येण्याची उमेद माणूस म्हणून जगणं सार्थकी लावते असं म्हटलं जातं. पण स्वतःच्या आयुष्याची कोणी माती करून घेत असेल तर अवशेषांशिवाय उरतेच काय?

वाताहत शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर राज्याच्या भूतकाळात डोकावून पाहिलं तरी त्याचं प्रत्यंतर येईल. एका चुकीने आयुष्य उद्ध्वस्त नाही होत. जगण्यात अंतरायही नाही येत. हे वेळीच कळलं तर. बऱ्यावाईटांतलं अंतर माहीत असूनही कोणाला कळत नसेल तर ओंजळीत केवळ अंधारच उरतो. राज्याने अंधाराशी सख्य केलं हा दोष नेमका कुणाचा? त्याचा, त्याच्या बापाचा, आईच्या आंधळ्या पुत्रप्रेमाचा की, त्याला घडवणाऱ्या परिस्थितीचा? उत्तरे शोधायचीच तर अनेक पर्याय हाती लागतीलही. पण हा घडण्याऐवजी बिघडतच अधिक होता. याचं पुढे पडणारं प्रत्येक पाऊल वाटेवर पराभवाच्या पाऊलखुणा कोरत होतं आणि हा परास्त होण्याकडे सरकत होता. विहित कर्माला अनुसरून आयुष्य व्यतीत करण्याला गीता योग मानते. स्वाभाविकपणे केलेल्या कार्याला कौशल्य समजते. राज्या स्वतःच्या कर्माने जीवनगीतेचा शेवटचा अध्याय लिहित होता. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला केवळ एक कृष्ण भेटला अन् त्याचा उपदेशाने अर्जुनाला आयुष्याचा अध्याय आकळला. राज्याच्या आयुष्याच्या समरांगणावर चिमूटभर उपदेश करणारे अनेक भेटले, पण याला हे कधी समजलंच नाही. की याने ठरवून समजूनच नाही घेतलं. नेमकं काय असेल ते त्यालाच माहीत. 

करंटेपण कपाळावर कोरलं असेल तर कोणताच कोपरा नशिबाला उभं राहण्यासाठी नाही मिळत. विचारांवर वैगुण्यांचं धुकं धरलं असेल तर कोणतीच वाट आपली नाही राहत. आधी त्या नजरेतून निसटतात अन् नंतर जगण्यातून हरवतात. दैव सुधारण्याची संधी देताना साद देतं, पण त्यासाठी प्रतिसादाचा प्रतिध्वनी व्हावं लागतं. राज्याचे कर्मच करंटेपणा होतं की, कोण्या जन्माची झाडाझडती. नियतीने याच्या कपाळी कोरलेले अभिलेख, की याच्याकडे असणारा आंधळा उन्माद? सांगता नाही येत नक्की काय ते. काहीही असलं तरी राज्याच्या ओंजळीत उरणारी शिल्लक शून्य होती. शून्याकडून शून्याकडे त्याचा प्रवास चालला होता, एवढं अवश्य सांगता येईल. राज्या आता कुठे आहे? काय करतो आहे? आहे की नाही, काहीच माहीत नाही. असालच तर याला उपदेश करणाऱ्या लोकांच्या वाणीतून ऐकलेल्या जीवनश्लोकांचा अर्थ याला कळला असेल का? आकळला असेल तर आयुष्याचे अन्वयार्थ याला समजले असतील का? की निरर्थकाचं लेणं लेऊन तशीच अस्वस्थ वणवण सुरु असेल...?

- चंद्रकांत चव्हाण
••