अंधार

By // No comments:
अंधार खेळत राहतो
उजेडाच्या तुकड्यांशी अन्
अस्तित्व विरलेल्या आकृत्या
सलगी करत राहतात उगीच
हरवलेल्या सावल्यांशी

पोकळीच्या गर्भात आस्थेचा कोंब
रुजण्याची धडपड करीत राहतो
सर्जनाची स्वप्ने पाहताना
आवरणात दडलेल्या आकांक्षा
सोलत राहतात स्वतःच स्वतःला
जगण्यावर घट्ट चिकटलेले
एकेक पापुद्रे उलगडताना
अपेक्षांचे अंश रुजत जातात
वेदनांच्या अनेक कळा घेऊन

भविष्याच्या धूसर पटलावर
कोरली जातात अनंत स्वप्ने
ज्यात मी असतो, माझे असतात;
पण आपले क्वचित दिसतात

चौकटींना गहिरे रंग भरताना
काहीतरी निसटतेच
माझा मी माझ्यापुरता उरतो
काळाच्या कपाळावरील
प्राक्तनाचे अध्याय शोधत

***

Kshitij | क्षितिज

By // 3 comments:

धुक्याआडचं क्षितिज

“अरे किती फिरशील आणखी, असा इकडे-तिकडे कल्पनेचे तीर धरून! नेहमीच नसत्या गोष्टींच्या लाटांवर का तरंगत असतोस? जरा वास्तवातही जगायला शिक. वास्तवाचं भान असणारं जगणं काही अवघड नसतं रे! आपण फक्त आपलं आखून दिलेल्या चाकोरीत चालावं अन् पायाखालच्या वाटा आपल्या म्हणीत मुकाट्याने सरकत राहावं पुढे. चारचौघांसारखं जगावं शहाण्या माणसाने. ना कुठले प्रश्न, ना कुठल्या चिंता. प्रश्नच नसले अन् त्यांच्यासोबत चालत येणाऱ्या चिंता नसल्या की, मग कसल्या आल्यायेत समस्या आणि समस्याच नसल्या की, गुंत्याचा प्रश्नच नसतो, नाही का?”

“झालं तुझं बोलून? आता मी बोलू का थोडं? हे पहा, तुझं म्हणणं कदाचित स्वतःभोवती आखून घेतलेल्या कुंपणाच्या जगाचा विचार केला, तर वाटेल किती चांगलं वगैरे आहे म्हणून. पण मला एक सांग, मखरात मंडित करून सजवलेल्या विचारांना विस्तार असतो? त्यांना पलीकडील क्षितिजे सारखी खुणावत असतात...? नाही ना! मग तिथंच कुजायचं असेल, तर कशाला आपली ओळख माणूस म्हणून करून द्यायची? सांगायचं ना, निसर्गचक्राचा हात धरून इहतली अवतारकार्य धारण करून आलेल्या आणि अस्तित्वाच्या कोणत्याही खुणा मागे कोरून न जाता जसे आले, तसे गेलेल्या अनेक जिवांसारखा मीही एक जीव. अनेकातील एक, अनेकांसारखा. ना कुठल्या आकांक्षा, ना कुठली स्वप्ने. समोर पसरलेल्या वाटांवर सरपटत मूठभर भविष्याच्या दिशेने सरकणारा.”

“ओ साहेब, पुरे! तुझं सगळं ज्ञान, तत्वज्ञान माहितीयेय मला. तुझं हे असलं काही चौकटींच्या पलीकडलं बडबडणं माझ्या मेंदूला पेलवणं जरा अवघडचं...! पण एक सांगतो, स्वप्ने आवाक्यात असली की, जगणं सोप्पं होतं.”

“हो, होत असेलही. पण सोपं असलं, म्हणून समाधानी असेलच असे नाही.”

“सोड रे, ते सगळं! समाधान, डिव्होशन, गगनाला गवसणी वगैरे घालणाऱ्या आकांक्षा या गोष्टी वेगळ्या आणि वेगळ्या लोकांसाठी असतात. ते येड्यागबाड्याचं काम नसतं काही. स्वप्ने बघायचीच असतील, तर ‘स्व’ कसा सुरक्षित ठेवता येईल, याची बघ! तीच माणसांची प्राथमिक गरज आहे.”

हे असले संवाद काही नवीन नाहीत. मला, त्याला आणि आम्हांला ओळखणाऱ्यांनाही. याचा नेहमीच सुरक्षित पवित्रा. सामना जिंकण्यासाठी खेळायचा नसतोच याला कधी. तो वाचवता आला म्हणजे झालं. खेळलो हेच मोठं समाधान. एवढाच याचा विचार. कवचात कसं सुरक्षित राहता येईल याचा आधी विचार करणारा. कासव एकवेळ त्याच्या सुरक्षाकवचातून बाहेर काय चालले आहे, डोकावून बघेल. पण याचं कवचाच्या बाहेर पडणं... अजिबातच नाही. याचं एक नित्याच काम. न मागता सल्ला देण्याचं सत्कर्म करीत राहणं. सत्कर्म हाही शब्द त्याचाच. सर सलामत... असणं याच्या दृष्टीने आयुष्यातलं एक मोठ्ठं काम. सल्ला मोफत वाटण्यात याला कोण आनंद! अर्थात, हे काम काही त्याच्यासाठी अवघड नाही आणि आमच्याकरिता नवं नाही. याला असे सल्ले देण्यासाठीच नियतीने म्हणा अथवा निसर्गाने, काही म्हटले तरी फार फरक पडत नाही, जन्माला घातले असावं असं वाटतं. याला कारण हा कधी चौकटींच्या पलीकडे आणखी एक जग असतं आणि त्यात आपल्यासारखेच, पण ‘स्व’ संभाळत स्वतंत्र विचार करणारे जीव विहार करीत असतात, याचा हा चुकूनही विचार करत नाही.

“हे बघ, सुरक्षित तर किडेमुंग्याही असतात. त्यांच्या जगाची आणि जगण्याची कोण दखल घेतो का? गरजेपुरती घेतही असतील, पण बहुदा नाहीच. पण माणसांच्या जगण्याच्या लहानसहान पैलूंनाही दुर्लक्षित नाही करता येत. तुझं काय आहे सांगू का? तुझं जग सुरु होतं तुझ्यापासून आणि जावून संपतं तुझ्या खोप्यापर्यंत. आपल्याला अवगत असणाऱ्या वर्तुळापेक्षा आणखीही एक मोठे वर्तुळ आहे, त्यालाही त्याचा परीघ आहे, याचा तू कधी विचार करायला तयार नाहीस आणि या पलीकडच्या जगात स्वतःच विहार करायला लागतो, या साध्यासरळ जाणिवेपासून कोसो दूर असणारा तू.”

“असेल, मग काय? या अफाट जगाचा विचार करणे खरंच गरजेचं असतं का? आणि एवढ्या जगाचा विचार करायला मी कोणी असामान्य कोटीतला, अद्वितीय, अलौकिक वगैरे कर्तृत्त्व असणारा नाही की, कोणी मोठी आसामी नाही. समजा असलंच यातलं थोडं काही, तर त्यातून आपल्या गरजा तेवढ्या निवडाव्यात. बाकी गोष्टींशी काही देणंघेणं असण्याचं कारणच काय आपल्याला? आणि असलं तरी त्यानी काय फार मोठी उलथापालथ घडणार आहे माझ्यासारख्यांकडून?”

घरातला एकटाच म्हणून सगळ्यांनी याला स्वप्नासारखा सांभाळला. साधी शिंक आली तरी औषध-गोळ्या घेऊन याच्या दिमतीला उभा राहणारा परिवार. याने काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला की, हे आपलं काम नाही. का उगीच या वाटेने जातो. झेपत नाही, तर कशाला खोल डोहात सूर मारायचा. हे किंवा असेच काहीसे अमृततुल्य विचार कानांवर आदळणार. या नन्नाच्या पाढयांनी याच्या विचारविश्वाचा परीघ कधी मोठा झालाच नाही. इतरांचे विचार याच्या जीवनवृक्षावर बांडगुळसारखे वाढू लागले. स्वप्ने पाहता येतात आणि जगताही येतात, याचं भानच कधी आलं नाही. कधीतरी मस्त मजेत जगावं. अगदी मनाला येईल तस्सं. असतील काही जगण्याचे गुंते इकडे-तिकडे गुरफटलेले ते समजून घ्यावेत. आलं त्यांना उकलता, तर घ्यावेत सोडवून आणि नाहीच जमलं, तर जावं सहज विसरून. हे कधी जमलंच नाही याला. मुक्तीचे पंख कधी याच्या देहावर वाढलेच नाहीत. आकाश पंखावर घ्यावं, असं कधी वाटलंच नाही. नवी अनोळखी क्षितिजे बघून यावीत, हा विचार चुकुनही कधी मनाला शिवला नाही याच्या. याचं एकच स्वप्न नशिबाने मस्त सुख लाभलं आहे, तर घ्या त्याच्यात लोळून.

“खरं सांगू का तुला! तुझ्या मनाला बरं वाटावं म्हणून तोंडदेखले चांगलं बोलायला हवं, या भ्रमात मी कधीच नसतो. तुला हेही माहितीयेय की, हा असं काही बोलणार नाही आणि करणार तर नाहीच नाही. मग कशाला शब्दांचे बुडबुडे उडवतोयेस? आपल्या विचारधारा दोन ध्रुवांवरच्या. त्यांचे बिंदू जुळणे अवघड आहे. आमची आणि तुझी स्वप्ने कधी जुळलीच नाहीत. कारण तुझी स्वप्ने फक्त तुझीच आहेत. ती तुझ्यापासून सुरु होऊन तुझ्याजवळ संपतात. आमची स्वप्ने आमच्यापासून सुरु होऊन इतरांपाशी संपतात. जगातलं जे काही भलं-बुरं, योग्य-अयोग्य असेल त्याला सामोरं जावं. आलं पुढ्यात ते आनंदाने स्वीकारावं एवढं साधंसरळ गणित आमचं.”

“मग, आमची स्वप्ने काय स्वप्ने नाहीत?”

“आहेत ना! पण त्यांना ना विस्तार, ना क्षितिजे. पसाभर, मूठभर अस्तित्वाला आपलं म्हणणारी तुझी क्षितिजे. त्यात कसले आलेत वादळे, कसल्या आल्यात लाटा? अथांग, अफाट, अमर्याद शब्दांना जागा नसणाऱ्या तुझ्या चौकटी. नियतीने तुला हवं ते सगळं दिलंच, पण नको तेही अधिकचं दिलं. आणि एक सांगू, सगळंसगळं दिलं; पण स्वप्ने द्यायला विसरली.”

“असं कसं असेल, स्वप्ने सगळ्यांनाच असतात, मग मी कसा अपवाद असेल? हां एक मात्र खरंय, तुम्ही अपवाद समजत असाल, तर त्याला काही इलाज नाही.”

“कदाचित तसंही असेल! असेल तुझं एखादं स्वप्न कुठलंतरी, पण ते पूर्ण करावं कसं, याबाबत तू कधी गांभीर्याने विचार केल्याचे निदान मला तरी स्मरत नाही. अर्थात, या मर्यादा तू मान्य करणार नाहीच, हे काही वेगळं सांगायला नको. असतील तुझी काही स्वप्ने, पण ती खरंच स्वप्ने आहेत का? हेही तपासून पहा एकदा. जगात स्वप्न न पाहणारी माणसे स्वप्नातही शोधून सापडणार नाहीत. पण तुला मात्र अपवाद करता येईल. नव्हे तू स्वतःच आपल्याला अपवाद करून घेतला आहे.”

“म्हणून अपवाद काही नियम नसतो होत.”

“मान्य आहे, सगळ्याच अपवादांना नियम नाही बनवता येत. असं म्हणतात की, स्वप्ने ही वीरांची दौलत असते. भिकाऱ्याची स्वप्ने खजिन्यात बंदिस्त असतात. वीरांना स्वप्नांची कमी नसते. देशाच्या सीमेवर टक्क डोळ्यांनी पहारा देणाऱ्या डोळ्यात सुरक्षा स्वप्न बनून जागी असते. त्याच्या स्वप्नात देश वसतो. समाजसेवेचं व्रत अंगीकारणाऱ्याला सेवेत स्वप्ने सामावलेली दिसतात. एखाद्या प्रयोगशाळेत वर्षानुवर्ष स्वतःला गाडून घेणाऱ्या संशोधकाला स्वप्नांचा अर्थ केलेल्या प्रयोगात गवसतो. आईबापाला मुलांच्या यशाची स्वप्ने आपली वाटतात. प्रेमात आकंठ नाहणाऱ्यांची स्वप्ने हेच सदन असतं. आकांक्षांच्या गगनात विहार करणाऱ्यांना समर्पणाच्या तारका स्वप्ने बनून लुकलुकताना दिसतात. कोलंबसने भारताच्या भूमीवर पाय ठेवण्याचे स्वप्न पाहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य सर्वांचं व्हावं, हे स्वप्न पाहिलं. बाबासाहेबांच्या स्वप्नात वंचितांच्या वेदनामुक्तीच्या वाटा साकळल्या होत्या. गांधीजींच्या जीवनयात्रेत सामान्यांना अस्मिता देण्याचं स्वप्न साठलेलं होतं. भगवान बुद्धांच्या नेत्रात अहिंसा स्वप्न बनून अधिवास करीत होती. ज्ञानेश्वरांच्या पसायदानात जगाच्या कल्याणाच्या वार्ता स्वप्ने पाहत होत्या.”

“केवढी मोठी ही माणसे! आपण यांच्या पासंगाला तरी पुरणार आहोत का? काय उदाहरणे कुठे द्यावीत, याचं काही भान आहे की, नाही तुझ्याकडे? यांना हे सगळं जमलं, कारण ही सगळी माणसे अलौकिक कोटीतील होती.”

“पण ही सगळी माणसेच होती ना! माणूस म्हणून त्यांच्याही काही मर्यादा होत्या, असतील; म्हणून त्यांनी स्वप्ने पाहायचं नाही टाकून दिलं. आपल्या स्वप्नांच्या पूर्तीकरिता त्यांनी जिवाचं रान केलं. स्वप्नांच्या मागे वेड्यासारखी धावली. का धावली? तर धावणं आम्हाला शिकवावं म्हणून. आम्हाला हे पेलवणारं नाही, प्रयत्न करूनही शक्य होत नाही, हे कळलं. मग आम्ही सोपा मार्ग शोधून काढला. ह्या माणसांच्या वेगळेपणाला नाही अंगीकारता येत ना, मग माणसांना शक्य नाही ते देव करतो म्हणून चौकटींच्या कुंपणापलीकडे असणाऱ्या सगळ्या अलौकिक कर्तृत्वाच्या धन्यांना देवत्वाच्या पातळीवर आणून उभं केलं. एखाद्या कर्मयोग्याला असं उभं करता आलं की, आमची जबाबदारी संपते आणि माणूस म्हणून आमचं अस्तित्वही अबाधित. कारण देवालाच हे शक्य आहे. माणूस तर काय बिचारा पराधीन आहे पुत्र जगी.... नाही का?”

“तू काहीही म्हण. त्यानी फार काही फरक पडत नाही. अशी अलौकिक माणसे जगाच्या गोंधळात असे किती असतात? फार थोडी आणि हे थोडं असणं अपवाद वगैरे असतं.”

“अपवाद वगैरे विसर रे! अपवाद काय सोयीसाठी तयार करता येतात. स्वप्ने पाहणारे अनेक असतात, पण पूर्ण करणारे किती असतात? सांगणं अवघड असतं. म्हणून हा अपवाद वगैरे प्रकारचा समर्थनाचा मार्ग प्रशस्त होतो. समाज नावाच्या व्यवस्थेचं गणित कोणत्याही सूत्राने सोडवलं तरी उत्तर बरोबरच यायला हवं, म्हणून पर्यायांच्या पायऱ्या पार करणाऱ्यांच्या बेरजांची स्वप्ने समाजाची व्हायला हवीत. पण समाजाची स्वप्नेच चुकत असतील तर... अनेकांच्या आकांक्षांचे दिवे अकाली विझतात. सावली बनून आश्वस्त करणारी झाडे अविचारांच्या वणव्यात करपतात. आसपास अंधाराचं सावट गडद होत असेल, तर पाहणाऱ्या डोळ्यातील ज्योती काजळतात.”

“जगण्यातील उजेड हरवणं मलातरी कुठे मान्य आहे! उजेड साऱ्या जगात पोहचवता येणार नाही, हे माहीत असूनही मी का उगीच वाती पेटवत राहायचं? आहे तो दिवा तेवत ठेवायचा. त्याचा उजेडाला आपली दौलत समजायचं आणि एवढं समाधान अंतरी नांदते राहिले की, जगायला आणखी काय लागते?”

“मला माहिती आहे, तू आहेस तसाच राहणार आणि मी कधी नाही सुधारणार. पण हेही लक्षात घे की, जग माणसाचं आहे. ते माणसांसाठी असावं आणि माणसांनी त्याच्या कल्याणाच्या वार्ता कराव्यात. अमंगलाचा परिहार करून मांगल्याच्या प्रतिष्ठापनेची स्वप्ने पहावीत. त्याला आणखी सुंदर करण्यासाठी माणसांनी पुढे यावं. एवढं जरी घडलं तरी हरवलेल्या, सुटलेल्या, निसटलेल्या अनेक गोष्टी पूर्णत्वाच्या दिशेने मार्गस्थ होतील.”

“हो, पण असे प्रशस्त पथ कोण आखणार आहे? माहीत नसलेल्या दिशांनी वाटा शोधत जाणं एवढं काही सोपं काम नसतं. नसेल आपल्याला हे सगळं करणं शक्य, तर चाकोरीतला रस्ता काय वाईट असतो.”

“स्वप्ने पाहण्याचा अधिकार सगळ्यांना असला, तरी पूर्ण करण्याची जबाबदारीही त्याचीच असते. निर्लेप, निर्व्याज, नितळ, निरामय विचारांनी विलसणारं जग हे एक सुंदर स्वप्न आहे. असं जग नुसतं आपल्या आसपास अनाहतपणे नांदते राहणे आवश्यक नसून, ते तसे टिकवून ठेवण्याचं उत्तरदायित्वही माझंच आहे, याची जाणीव आत कायम धगधगत राहायला हवी. अशी स्वप्नं किती जण पाहत असतील? माहीत नाही. पण ती पहायची की नाही, हे ज्याचं त्यानेच ठरवावे. अपेक्षा एकच असते, स्वप्ने फक्त जागेपणी पाहता यायला हवीत.”

“झालं तुझं तत्वज्ञानाचं अत्तर लावून? हे सगळं पुस्तकात छापायला आणि व्याख्यानात फेकायला चांगलं असतं. प्रत्यक्षात दिसतं तितकं सोप्पं नसतं.”

“मला माहिती होतं, तू असा काही बिनबुडाचा युक्तिवाद करशील. कारण तुझे वाद आणि युक्तीवादही असेच असतात. तुझ्या वर्तुळांना व्यापणारे आणि परिसराचा परीघ हरवलेले. ज्यांना विस्ताराची स्वप्ने नाहीत, ते काय क्षितिजे शोधतील?”

आकाश हरवलेलं हे पाखरू आज कुठे थोडे पंख पसरून झेप घ्यायच्या तयारीत होतं. त्याच्यासमोर उभं केलेलं क्षितिज पाहत वेडावत होतं. तेव्हाशी मोबाईलवर संदेश आला. कोटरात परतायची आज्ञा अक्षरांचे पंख लावून आली. मोठ्या प्रयासाने पसरलेले पंख परत दुमडून खोप्याकडे निघला, सोबत कोणती स्वप्नं घेऊन माहीत नाही.
 
(चित्र गूगलवरून साभार )