वाहण्याचे अर्थ हरवतात तेव्हा...

By // No comments:
काळ काहींच्या आस्थेचा विषय असतो. काहींच्या प्रेरणेचा असतो. काहींचा परिशीलनाचा, तर काहींचा अभिनिवेशाचा. कोणासाठी तो काय असावा, कसा असावा, हे काही कुणाला नाही सांगता येत. अनुमानाचं पान टाकून त्याला पाहता येईल, पण हा विकल्प पर्याप्त उत्तर देणारा असेलच असं नाही. कल्पनेचे किनारे धरून घडणारा प्रवास प्रत्येकवेळी पर्याप्त असतोच असं नाही. वास्तव अन् कल्पना यात अंतराय असतं. तर्काचे तीर धरून पुढे सरकता आलं की, वाहण्याची प्रयोजने नाही शोधावी लागत. असं काही असलं तरी तो स्वीकारावा कसा, हे मात्र निर्धारित करता येतं. खरंतर त्याच्या अफाट पसाऱ्यातून आपला कोरभर तुकडा ज्याचा त्यालाच शोधावा लागतो. त्याकडे पाहण्यासाठी कमावलेली नजर असायला लागते. नुसते डोळे असून नाही भागत. डोळ्यांना दिसतं ते सगळंच सत्य नसतं. दृष्टीला सापडतं ते सगळंच वास्तव असतं असंही नाही. या दोहोंदरम्यान घडणाऱ्या प्रवासात वेधक अन् वेचक असं काही हाती लागतं तेच वास्तव.

कालपटवर कोरलेली अक्षरे कुणी काळजीपूर्वक वाचतात. समजून घेतात त्यांचे दृश्यअदृश्य अनुबंध अन् त्यांचा हात धरून आलेले अर्थ. वेचतात आयुष्य अर्थपूर्ण करणारा आशय त्यातून कोणी. तर काही पुढ्यात पडलेल्या काळाच्या तुकड्यांना प्रसाद समजून स्वीकारतात. पण या आहे तसं स्वीकारामागे क्षणिक समाधानाचे संदर्भ असले, तरी नकळत एक पाऊल प्रमादाच्या परगण्याकडे पडतंय हे काहीजण सोयीस्करपणे विसरतात. एक खरंय की प्रसाद आला की, श्रद्धा आगंतुकपणाची पावले घेऊन चालत येतात. त्यांचे सोहळे होऊ लागतात अन् सोहळे सजायला लागले की, प्रतिसादाचे प्रतिध्वनी हरवतात. प्रयत्न आपली पाऊलवाट विसरतात अन् श्रद्धेच्या परिघाभोवती भ्रमण करायला लागतात.

भक्ती, श्रद्धा डोळस असतील तर प्रमादांचं परिमार्जन करता येतं, पण केवळ अनुकरणाने कोणी त्याचा अंगीकार करत असेल तर प्रयत्नांची प्रयोजने संपतात. काहींना काळाच्या अमर्याद अवकाशातून गवसतातही अस्मितेचे काही धागे. काहींना सापडतो त्याच्या अफाट पसाऱ्यातून माणूस नावाच्या अस्तित्वाचा अर्थ. तर कोणास आणखी काही. कोणी काय पाहावं अन् कोणी काय शोधावं हा पदरी पडलेल्या प्रयोजनांचा भाग. त्यांच्या पूर्तीचा प्रवास त्याचं प्राक्तन असतं अन् ते त्यानेच लेखांकित करायचं असतं.

पण काळाची समीकरणे एवढी साधीही नसतात, जितका त्यास आपण समजतो. कधी त्याचा गुंता जटिल होत जातो. कधी उलगडत जातात एकेक पदर. त्याला शोधतांना लागतं काही ओंजळभर हाती. तरीही बरंच काही निसटतं. लागलाच एखादा तुकडा हाती की, अनुमानांच्या पात्रातून वाहत राहतो तो. शोधू पाहतो कुणी त्यातून आपला उन्नत, उर्ज्वस्वल वगैरे वारसा. गवसलाच एखादा संदर्भ की, तर्काचे किनारे धरून वाहू लागतो त्याचा प्रवाह. काहींना सापडतात त्यात आपले अहं. काहींना आपल्या अस्मिता.

काहींना अवकाळी श्रेष्ठतेचा साक्षात्कार वगैरे होतो अन् पूर्वी कधीतरी प्राप्त केलेल्या प्रगतीचे पंख लावून अभिनिवेशांचा आसमंतात प्रवास सुरू होतो. अस्मिता वगैरे नावाच्या गोंडस झुली टाकून तो सजवला जातो. पडद्याआड पडलेला माणूस आणला जातो समोर. त्याच्या महात्म्याचे, कर्तृत्वाचे अध्याय अधोरेखित केले जातात. आवळले जातात एकेक सूर काळाच्या कोशात विसावलेल्या समृद्धीचे. प्रगतीच्या परिभाषा नव्याने पाहून घेतल्या जातात. त्या पारखून घेण्याऐवजी पाहिले जातात केवळ सोयीचे संदर्भ. कधीकाळी हे आपल्याकडे असल्याचे सांगताना वास्तव-अवास्तव अभिनिवेशाला अस्मितेच्या वर्तुळात स्थानापन्न केले जाते. परिशीलन बाजूला पडते अन् उरतो प्रसिद्धीपरायण उथळपणा.

प्रवाहांना साचलेपण आले की, वाहण्याचे अर्थ हरवतात. साचलेपणात काहींना समृद्धीची सूत्रे सापडतात. कशी, ती त्यांनाच माहीत. पण सूत्रांचा संदर्भ जगण्याच्या समीकरणांशी लाख खटपटी करून जुळवला जातो. काळाच्या कुशीत दडलेल्या यशाच्या व्याख्या नव्याने लेखांकित करून, आपणच निर्माण केलेल्या निकषांच्या निर्धारित चौकटीत अधिष्ठित केल्या जातात. उत्थानाच्या वार्ता होत राहतात. अभ्युदयाच्या गोष्टी सांगितल्या जातात. कल्याणाच्या कहाण्या कथन केल्या जातात

अभावाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करणारा माणूस मात्र काल जिथे होता आजही तिथेच राहतो. त्याला गतीच्या व्याख्या शिकवल्या जातात, मात्र प्रगतीच्या परिभाषा नाही सांगितल्या जात. चौकटींतून मुक्तीची प्रतीक्षा करीत साद देत उभा असलेला नाही दिसत तो. निनादणाऱ्या आवाजाचे अर्थ नाही आकळत. अभ्युदयार्थ आवळले जाणारे आवाज आतल्या आतच कुठेतरी अडतात. कुठला काळ असा होता की, आयुष्याचे अवघे अन्वयार्थ आकळले होते? अभाव तेव्हाही होता. आताही आहेच, पुढेही तो असणारच आहे. पण सत्य हे आहे की, प्रभावाच्या परिभाषा बेगडी अभिनिवेशात बंदिस्त झाल्या की, वास्तव दुर्लक्षित होते. कदाचित हाही काळाचाच परिपाक असावा, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

अंधार असतोच आसपास

By // No comments:
काळ अथांग, अफाट, अमर्याद वगैरे असल्याचा सगळ्यांनी एकमुखाने निर्वाळा दिला आहे. तो तसा असल्याचे सगळेच सांगतात अन् पुढे सरावाने म्हणा किंवा अनुभवाने आपणही हीच विधाने संवादाच्या ओघात पुढे ओढत राहतो. अर्थात यात काही वावगं आहे असं नाही. आणि अवास्तव आहे असंसुद्धा नाही. काळाची अगणित गणिते असतात. त्याची त्याने तयार केलेली समीकरणे असतात अन् स्वतःची सूत्रे असतात. सगळ्यांनाच ती समजतात असं नाही. पदरी पडलेल्या प्रश्नांची ज्याला जमलं तसं उत्तरे प्रत्येकजण शोधत असतो. पुढ्यात पेरलेली समीकरणे सोडवू पाहतो. काळाच्या अफाट पसाऱ्यातील कुठल्यातरी कोरभर तुकड्यात आपल्या ओंजळभर आयुष्याचा चिमूटभर अध्याय लिहला जातो. त्यावर कोरलेल्या चार अक्षरांची कोणी आवर्जून दखल घ्यावी, असं काही त्यात असेलच असंही नाही.

अक्षरांना अर्थपूर्ण आशय असतो, तो काही आपणहून अक्षरांकित नाही होत, त्याला काळाच्या कपाळी कोरावं लागतं. नुसती अक्षरे कुठेतरी खरवडून साफल्याच्या परिभाषा अधोरेखित नाही होत. अक्षरांना काहीएक आकार असला तरी त्यांना अर्थ द्यावे लागतात.

काहींचे जीवनग्रंथ काळच आपल्या हाताने सजवतो. त्याने गोंदलेल्या खुणा कर्तृत्व बनून चमकत राहतात. काहींच्या जीवनग्रंथावर चारदोन ओळी लेखांकित होतात. काहींची पाने कोरीच राहतात. काहींच्या कहाण्या काळाच्या कुशीत हरवतात. काहीं समोर येतात अन् एक आश्वस्तपण अंतरी जागवतात. काही कवडसा बनून पावलापुरती वाट उजळत राहतात.

काळ आपल्याच नादात पळत राहतो. खेळ त्याचेच असतात अन् नियमही त्यानेच तयार केलेले. खेळत राहतो तो फक्त. क्षणपळांची सोबत करीत तो पुढे पळत असतो अनवरत. त्याचा हात धरून चालता येतं, त्यांना प्रवासाचे अर्थ अन् प्रगतीची परिमाणे अवगत असतात. पुढे पडणाऱ्या पावलांना पायबंद पडले की, प्रवासाची प्रयोजने संपतात. मुक्कामाची ठिकाणे हरवली की, पावले केवळ दिशाहीन वणवण करीत राहतात. जगण्यावर दिवस, महिने, वर्षांची धूळ साचत जाते. विस्मृतीचा अंधार गडद होत जातो. ओंजळभर अस्तित्व असलेल्या कुण्या अनामिक आयुष्याचा कोरभर अध्याय काळाच्या अफाट विवरात सामावून गेलेला असतो.  

कुणी पथ चुकलेला पांथस्थ कधीतरी येतो. अनामिक बनून पडलेल्या ग्रंथाची काही पाने त्याच्या हाती लागतात. त्यावर जमा झालेले धुळीचे थर कुतूहल म्हणून कुणी झटकतो. कुणी कोरून ठेवलेल्या ओळी वाचतो. कुणी शोधत राहतो अक्षरांचे अर्थ. उलटत जातात एकेक पाने अन् उलगडत जातात काळाच्या कुशीत विसावलेल्या कहाण्यांचे काही अर्थ. समोर येतात काही हवे असणारे आणि नको नसणारे संदर्भ. आकळत जातात अन्वयार्थ. त्यांना वेढून असतं आठवणींचं कोंदण अन् भावनांचं गोंदण. समोरच्या पसाऱ्यात विखरून पडलेले एकेक बिंदू सांधले जातात, जुळत जातात एकेक रेषा अन् साकारते एक चित्र. कधी अर्थांची चौकट घेऊन, तर कधी चौकट हरवलेलं. हाती लागलेल्या तुकड्यातून गोळा केले जातात एकेक धागे. उपसल्या जातात तर्काच्या राशी. ढवळून काढला जातो प्रवाह. घेतले जातात गोते तळ गाठण्यासाठी. लागतं काही हाती. पण बरंच निसटून जातं. तरीही शोधत राहतात माणसे काही ना काही.

काळाची सोबत करीत पडलेल्या अज्ञात परगण्यातील रहस्यांना जिज्ञासेची लेबले लावून उपसले जातात एकेक ढिगारे. सापडतात कधी आपलेच काही अवशेष अंधाराची चादर ओढून निजलेले. जागी असणारी माणसे अंधाराला जागवतात. कवडशाच्या सोबतीनं चालत राहतात. आपलं असणं-नसणं पाहतात. परत मांडतात. तुलना करून पारखून घेतात आयुष्याला. अज्ञाताच्या कुशीत शिरून काढू पाहतात आपल्या अस्तित्वाचे अंश. शोधून पाहतात आपल्या सभ्यतेच्या संदर्भांना. धांडोळा घेतात संस्कृती नावाच्या प्रवासाचा. लावतात अर्थ संस्कार बनून वाहणाऱ्या प्रवाहाचे नव्याने. अदमास घेत राहतात. अनुमानाच्या चौकटीतून काही हाती आलेले, कधी हवे असलेले शोधत राहतात. वेचू पाहतात अंधाराच्या विस्तीर्ण पटावर चमकत पडलेली चारदोन नक्षत्रे.

पण तरीही अंधार असतोच आसपास नांदता. किती उपसावा त्याला? शतकांची साचलेली रहस्ये किती खोदावीत? गणती नाही करता येत सगळ्याच गोष्टींची अन् शोधताही नाही येत सगळंच. विचारांच्या वर्तुळात वसतीला उतरलेलं काही सापडतं. काही संदर्भांच्या चौकटीतून शोधून काढावं लागतं. काही संदेहाच्या परिघातून निसटलेलंही असतंच. सगळेच तुकडे हाती लागतात असं नाही. सापडलेल्या तुकड्यांना जोडत काही आकृत्यांना आकार देता येतो. त्याचे अर्थ कधी अनुमानाने तर कधी अनुभवाने आकारास आणावे लागतात. बऱ्याच गोष्टी सूत्रातून सुटतात. तरीही आस्थेची पणती हाती घेऊन वाट तुडवत राहतात माणसे. काळाच्या अफाट विवरात काय काय दडले असेल? हा प्रश्न काही स्वस्थ बसू देत नाही हेच खरे, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

काळाचे कंगोरे

By // No comments:
काळ म्हणजे नेमकं काय असतं? विशिष्ट वेळ की, ज्याचे मोजमाप दिवस, प्रहर इत्यादीनी करता येते. की कुठलासा हंगाम, मोसम जो बहरण्याचे, उजाड होण्याचे अर्थ सांगतो. अथवा मृत्यु, ज्याने स्मृतींशिवाय मागे काहीच शेष राहत नसल्याचे सूचित होते. की कुठलंही आवतन न देता चालून आलेलं एखादें संकट किंवा चांगलें-वाईट होण्यास कारणीभूत अशी परमेश्वराची इच्छा. की भूत, भविष्य, वर्तमान इत्यादी संकल्पना निर्देशित करणारा विशिष्ट शब्द. की याहून आणखी बरंच काही अनुस्यूत असतं त्यात. खरंतर एखादा शब्द लिहला, बोलला जातो, तेव्हा तो आपल्या सोबत अनेक दृश्यअदृश्य शक्यता घेऊन येत असतो. त्याच्या असण्याला अनेक कंगोरे असतात, तसे अर्थाला अगणित कोपरे अन् आकलनाला अनंत आयाम.

कदाचित असं काही असेल अथवा नसेलही. शक्यतांचा गर्भात अनेक ज्ञातअज्ञात किंतु सामावलेले असतात. अर्थात, सगळ्याच गोष्टी काही सरळसोट मार्गाने प्रवास करणाऱ्या नसतात. सगळ्यांना सगळेच अर्थ आकळतात असं नाही अन् अथपासून इतिपर्यंत सगळं कळायलाच हवं असंही नसतं काही. पण शब्दमागे असणाऱ्या भावार्थचं किमान सरळ आकलन व्हावं इतपत शहाणपण समजून घेणाऱ्याकडे असायला लागतं. या माफक मागणीला वळसा घालून मार्गस्थ नाही होता येत. म्हणूनच असेल की काय अर्थासोबत अनेक अनर्थही अधिवास करून असतात.

बोलण्याच्या ओघात कुणी मनात असलेलं सहज बोलून जातो. त्याचे भलेबुरे पडसाद नंतर उमटतात. कधी शब्दांचे अर्थ सरळ लागतात. कधी आडवळणे आडवी येतात. कधी अर्थाचा अनर्थ होतो अन् अंतरी कायमचे ओरखडे ओढले जातात. खरंतर बोलणाऱ्याच्या विधानाला असणारा अर्थ आणि आकलनकर्त्याच्या अंतरी उभी राहणारी त्याची प्रतिमा अन् प्रकटणारी प्रतिमाणे सगळंच परिमाणांच्या परिभाषेत तंतोतंत बसवता नाही येत. सोबत परिणामांची पडछायाही पाहून, समजून घ्यायला लागते.

भूतवर्तमानभविष्य सोयीसाठी केलेले तुकडे असतीलही, पण त्या प्रत्येक तुकड्याला त्याचा काही अंगभूत अर्थ असतो अन् त्याच्या असण्याचे काही कंगोरे. काही कातर कोपरे असतात, तसे काही हळवे पळसुद्धा. किती किती ज्ञात, अज्ञात गोष्टींना आपल्या आत घेऊन धावत असतो तो अनवरत. त्याला फक्त गतीचे अर्थ तेवढेच अवगत असतात की काय कोणास ठाऊक. असेलही तसे. पण अधोगती शब्दाचं आकलन असतं, त्यांना प्रवासाच्या परिभाषा पाठ नाही करायला लागत, एवढं मात्र खात्रीने सांगता येईल.

काळ पुढ्यात अनेक गुंते पेरून ठेवतो. कोणाच्या वाट्याला काय यावं, हे काही कुणाला सांगता नाही येत. काहींच्या जगण्याला तो इतकं सजवतो की, सुखाच्या व्याख्येचे उत्तर यापेक्षा आणखी वेगळं काय असू शकतं असं वाटतं अन् काहींच्या पदरी तो एवढ्या वेदना पेरत राहतो की, वेदनांचे अर्थही विचलित व्हावेत. काहींच्या जगण्याचा ऋतू सतत बहरलेला, तर काहींच्या आयुष्यात सदासर्वदा वैशाख वणवा. असं का व्हावं? नेमकं सांगणं अवघड आहे. काही प्रश्नांची उत्तरे सहजी हाती लागत नसतात हेच खरे. दुःखानेही ते दुःख पाहून क्षणभर दुःखी व्हावं इतकं दुःख काहींच्या आयुष्यात असतं. याला कोणी नियती म्हणा की, प्राक्तन किंवा कर्माचे भोग. कारण काही असले तरी काळ खेळत असतो माणसांशी एवढं म्हणायला प्रत्यवाय आहे.

काळाने पुढ्यात पेरलेल्या प्रश्नांची नेमकी अन् हवी तेवढी आणि हवी तशीच उत्तरे लिहता यावीत म्हणून आयती सूत्रे नसतात की, कोणीतरी करून ठेवलेल्या अचूक व्याख्या. पदरी पडलेल्या प्रश्नांच्या मुळाशी पोहचण्यासाठी किमान काही गोष्टी अवगत असायला लागतात. त्या काही कुठून विकत नाही आणता येत, ना उसनवार. आयुष्यात आगंतुकासारख्या आलेल्या अवधानांच्या, अनावधानांच्या अर्थांची उकल करण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रयत्नपूर्वक अवगत करायला लागतात. ती अभ्यासाने आकळतात. सरावाने सख्य साधता येतं त्याच्याशी. परिशीलनाने प्रकट होता येतं.

काळाची समीकरणे सोडवताना कुणाचा कुठलातरी हातचा सुटतो अन् गणित चुकतं. खरंतर काळ नावाची गोष्ट ही अशी अन् अशीच असते, म्हणून दाखवता नाही येत. त्याचं असणं-जाणवणं एक अमूर्त अनुभूती असते. त्याच्या असण्या-नसण्याचे अन्वयार्थही लावता येतात. ते सम्यक असतीलच असं नाही. हाती लागलेल्या त्याच्या तुकड्यातून आयुष्याला अर्थपूर्ण करणारी सूत्रे सगळ्यांनाच गवसतात असं नाही. जगण्याला वेढून बसलेल्या अन् मूर्त-अमूर्ताच्या झोक्यांवर झुलणाऱ्या तुकड्यांच्या सोबत अव्याहत झोके घेत झुलत राहणं प्राक्तन असतं का माणसाचं? असेलही अथवा नसेल, नक्की नाही सांगता येत. पण काळाचा कुठलातरी अज्ञात तुकडा खेळत असतो आयुष्याशी, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

विवेकाच्या वाती

By // No comments:
आयुष्य नावाच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा घडत असतात. कोणत्याही जिवांच्या जगण्याची तऱ्हा याहून वेगळी नसते. ते काही नियतीचं देणं नसतं, तर निसर्गाने आखून दिलेला नियत मार्ग असतो. श्वासांची स्पंदने सुरात सुरू असली की, जगण्याचा सूर सापडतो. सूर सापडला की आयुष्याचा नूरही बदलतो. इहतली जीवनयापन करणाऱ्या प्रत्येकाच्या विस्ताराच्या परिभाषा वेगळ्या असतात. परिमाणे निराळे असतात, तसे परिणामही. विस्ताराचे सम्यक अर्थ सगळ्यांना अवगत असतीलच असं नाही. काही गोष्टी आपल्याभोवती संदेहांचं धुकं घेऊन असतात हेच खरं. विचारांतून विस्तारच हरवला असेल तर लांबीरुंदीच्या व्याख्या केवळ पुस्तकापुरत्या उरतात. काही पश्नांची उत्तरे सापेक्षतेची वसने परिधान करून विचारांच्या विश्वात विहार करीत असतात. त्याबाबत एक अन् एकच विधान करणे तितकेसे सयुक्तिक नसते. सांगणं बरंच अवघड असतं अशा काही प्रश्नांबाबत. अनेक कंगोऱ्यांना कुशीत घेऊन त्यांचा प्रवास सुरु असतो. शक्यतांचे दोनही किनारे धरून ते वाहत असतात. पण प्रवाहच आटले असतील तर... वाहण्याचे अर्थ बदलतात. एक ओसाडपण आसपास पसरत जातं. हेही तेवढं खरं. चिमूटभर ज्ञानाला अफाट, अथांग, अमर्याद वगैरे समजून त्यावर आनंदाची अभिधाने चिटकवणाऱ्यांना प्रगल्भ असण्याच्या परिभाषा कशा उमगतील? त्या समजण्यासाठी आवश्यक असणारं सुज्ञपण आधी अंतरी रुजलेलं तर असायला हवं ना!

विवेकाच्या वाती विचारांत तेवत असतील, तर पावलापुरता प्रकाश सापडतो. अंतरी नांदत्या भावनांचा कल्लोळ असतो तो. तो आकळतो त्यांना बहरून येण्यासाठी प्रतीक्षा नाही करायला लागत. बहर घेऊन ऋतूच त्यांच्या अंगणी चालत येतात. फक्त त्यांच्या आगमनाचा अदमास तेवढा घेता यायला हवा. भावनांचा पैस ज्यांना कळला त्यांना प्रतिसादाच्या परिभाषा नाही पाठ कराव्या लागत. प्रतिसाद देता येतो त्यांना विस्ताराचे अर्थ नाही शोधावे लागत. चिमूटभर डोळस शहाणपण अंतरी नांदते असले की, आयुष्याचे एकेक ज्ञातअज्ञात अर्थ आकळू लागतात.

इहतली अधिवास करणाऱ्या जिवांकडे जुजबी असली, तरी काहीतरी माहिती असतेच. ती अनुभवातून अंगीकारली असेल, निसर्गदत्त प्रेरणांच्या पसाऱ्यात सामावली असेल अथवा गुणसूत्रांच्या साखळ्या धरून वाहत आली असेल. याचा अर्थ एखाद्याकडे असलेली माहिती म्हणजे ज्ञान असते का? माहितीचे उपयोजन सम्यक कृतीत करता येण्याला ज्ञान म्हणता येईल आणि ज्ञानाचा समयोचित उपयोग करता येण्याला शहाणपण. पण वास्तव हेही आहे की, सम्यक शहाणपण प्रत्येकाकडे पर्याप्त मात्रेत असेलच असे नाही आणि असलं तरी त्याचं सुयोग्य उपयोजन करता येईलच याची खात्री बुद्धिमंतांनाही देता येणार नाही. शहाणपणाची सूत्रे समजली की, जगण्यात सहजपण येतं. सहजपण सोबत घेऊन जगता येतं, त्यांना आयुष्याची समीकरणे सोडवताना अभिनिवेशांच्या झुली पांघरून प्रवास नाही करायला लागत. मखरांचा मागोवा घेत मार्ग नाही शोधावे लागत.

जगण्याच्या वाटेवरून घडणाऱ्या प्रवासाची पावले पुढे पडताना काहीतरी पदरी पडतेच, हेही खरेच. पण पदरच फाटका असेल तर... त्याला इलाज नसतो. ना तो प्राक्तनाचा दोष असतो, ना नियतीने ललाटी कोरलेला अभिलेख. ज्याच्या त्याच्या विस्ताराची वर्तुळे ज्याने त्याने तयार करायची असतात. वाढवायची असतात अन् सजवायचीही. ती काही कुणी कुणाला उसनी आणून देत नाही की, कुणाकडून  दत्तक घेता येत. शहाणपण काही कोणाची मिरासदारी नसतं. खाजगी जागीर नसते. कुळ, मूळ बघून ते दारी दस्तक देत नसतं. त्यासाठी माणूस असणे आणि किमान स्तरावर का असेना विचारी असणे पर्याप्त असते. पण वास्तव याहून वेगळं असतं. माणूस असणं निराळं आणि विचारी असणं आणखी वेगळं. या दोनही शक्यता एकाठायी लीलया नांदत्या असणं किंतु परंतुच्या पर्यायात उत्तर देणारं असतं, नाही का? असेलही तसं कदाचित, पण असंभव आहे असंही नाही.

विचारांच्या वाटेने वळते होण्यासाठी अनुभूतीचे किनारे धरून वाहते राहावे लागते. केवळ कोरडी सहानुभूती असणे पुरेसे नसते. नियतीने माथ्यावर धरलेल्या सावलीपासून थोडं इकडेतिकडे सरकून ऊन झेलता आलं की, झळांचे अर्थ आकळतात. वातानुकूलित वातावरणात वास्तव्य करणाऱ्यांना चौकटींपलीकडील विश्वात नांदणारी दाहकता कळण्यासाठी धग समजून घ्यावी लागते. ती समजून घेण्यासाठी स्वतःभोवती घालून घेतलेली मर्यादांची कुंपणे पार करायला लागतात. सुखांच्या वर्षावात चिंब भिजणाऱ्यांना वणव्याचा व्याख्या कळतीलच असं नाही. त्यासाठी वणवा झेलावा लागतो. कदाचित त्याची दाहकता कोण्या प्रतिभावंताने लेखांकित केलेल्या शब्दांतून कळेल. पण सहानुभूती आणि अनुभूतीत अंतर असतं. ते पार करण्यासाठी स्वतः झळा झेलाव्या लागतात. वणवा होऊन जळावं लागतं. नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••