मनाच्या किनाऱ्यावर धडका देणाऱ्या संतापाच्या लाटांना शक्य तेवढं सांभाळत तो बोलत होता. शब्दाशब्दांतून ठिणग्या बरसत होत्या. चेहऱ्यावर प्रचंड राग साचलेला. त्याचा असा अवतार पाहून क्षणभर विचलित झालो. काय घडलं असेल, नसेल माहीत नाही. नीटसा अदमासही घेता येत नव्हता. वादळ यावं अन् आसपासचं सगळंच अस्ताव्यस्त व्हावं, तसा हा वाक्यावाक्यातून अन् शब्दाशब्दांतून विखरत होता. अंतरी अधिवास करणारी शांतता विचलित व्हावी असं काही तरी नक्कीच झालं असावं, त्याशिवाय हे शांतिब्रह्म रुद्रावतार धारण करणं अशक्य. थोडा कानोसा घेत, तर्काचे किनारे धरून त्याच्या अंतरी धुमसणाऱ्या क्रोधाच्या वाहत्या वणव्याकडे सावधपणेच सरकलो. त्याची धग जाणावयाची ती जाणवतच होती. दाहकता काही कमी होत नव्हती. अस्वस्थपण पेरणारा वारा थांबल्याशिवाय हा वणवा नियंत्रणात येणे असंभव असल्याने धुमसणाऱ्या निखाऱ्यांच्या निवळण्याची प्रतीक्षा करीत राहिलो. बोलू दिलं त्याला तसंच थोडा वेळ. मनाला येईल ते सांगू दिलं.
मनातली किल्मिषे धुवून निघाल्याशिवाय अंतरी नांदणारं नितळपण दिसत नाही. एकेक क्षण सरकत गेला तशी त्याच्या अंतरी साकळलेली धग हळूहळू कमी होत गेली. तावातावाने चाललेलं बोलणं थांबवून थोडावेळ अस्वस्थपणे आसपासच्या वाहत्या गर्दीकडे पाहत राहिला. भरून आलेलं आभाळ रितं होऊ लागलं. उन्हाच्या झळां झेलत असतांना मधूनच एखादी हलकीशी वाऱ्याची झुळूक यावी अन् त्याचा गारवा अंगभर विखरत जावा, त्याने चित्तवृत्ती सावध व्हाव्यात तसं काहीसं झालं. या संधीचा धागा पकडून काय झालं असं अचानक संताप करायला म्हणून त्याला विचारलं.
“नियती, दैव वगैरे मानणे माझ्या विचारातच नाही आणि प्रयत्नांची वाट सोडणे स्वभावात नाही.” तो सहजच बोलून गेला. बोलला यात काही विशेष नाही. अशी असंबद्ध विधाने करणे त्याच्या स्वभावाचं अनिवार्य अंग. कुठले धागे कुठल्या गोष्टींना सांधायला घेईल, हे त्यालाही सांगता येणं अवघड. एव्हाना आम्हाला ते सवयीचं झालेलं. मनातलं काही सांगायचं नसलं, तर विषय भलतीकडे वळवण्याचं त्याचं हे नेहमीचं अमोघास्त्र. आताही विषयाला वळसा घालून त्याने पद्धतशीर दुसरीकडे वळवलं. विषयाचं मूळ अन् क्रोधाचं कुळ शोधण्यापेक्षा तर्काचे तीर धरून तीर्थक्षेत्री पोहोचणं अधिक श्रेयस्कर, म्हणून त्याला ढवळून काढण्याचा विचार बाजूला सारून कारणांपर्यंत पोहचण्याची वाट गवसते का, याची प्रतीक्षा करीत राहिलो.
हा रागराग करेल. चिडचिड करेल. क्वचित कधीतरी षष्टी विभक्तीचे सगळे प्रत्यय वापरून अस्सल शब्दांचा वापर करेल. अर्थात, हे काही अगदी सरळ सरळ नाही. ही त्याची सगळी स्वगते. थेट कुणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून सोक्षमोक्ष करेल असं नाहीच. चुकूनही कोणाला प्रताडित करण्याचा याचा स्वभाव नाही आणि कुणाचं कसलंही नुकसान करण्याचं स्वप्नातही आणणार नाही. देव, दैव न मानणारा देव माणूस म्हटलं तरी चालून जाईल असा. त्याची अशी विधाने समोरच्याला दर्पोक्ती वाटेलही. पण तसं काही नाही. तो स्वभावतःच असा. आहे ते सरळ सांगणारा. तोंडाने फटकळ, पण मनाने नितळ. कोणाविषयी सकारण किंवा अकारण आकस धरणं त्याच्या विचारांत नाही. वागण्यात कोणते किंतु नाहीत. बोलण्यात परंतु नाहीत. कोणी कळत असेल अथवा नकळत दुखावलं, तर ते खडे पाखडणं याच्या विचारांत चुकूनही नाही येणार. झालं ते तिथेच विसरणारा. आहे हे असं आहे म्हणणारा. अशी माणसे समाज नावाच्या चौकटीत सहसा फिट्ट नाही बसत. ठाकून ठोकून बसवलं तरी चारदोन झिलप्या निघतातच त्यांच्या. याच्या अशा झिलप्या कितीदा आणि किती निघाल्या असतील, हे त्यालाही ठाऊक नाही आणि त्याचं प्राक्तन लेखांकित करणाऱ्या नियतीलाही अवगत नाही. पण इतरांचं भलं करण्याच्या सोसापायी उसवण्याच्या स्वभावापासून हा काही विचलित नाही होत.
माणसांनी उभ्या केलेल्या व्यवस्थेत वैगुण्यांची कमी नाही. ती सामुहिक आहेत, तशी वैयक्तिकही आहेत. त्यांची कमतरता माणसांकडे कधीच नव्हती अन् भविष्यात ती कमी होतील अशी शक्यता नाही. आपण माणूस आहोत अन् आपल्यातही काही लहानमोठी वैगुण्ये आहेत, असं मानणारे आधीही संख्यने नगण्यच होते अन् आता तर आपल्या विचारातील विरोधाभास अन् वर्तनातील विसंगती स्वीकारणारे एखादया दुर्मिळ प्रजातीसारखे झाले आहेत.
या माणसाला स्वत्व अन् सत्त्वापेक्षा अधिक काय प्रिय असेल, तर ते तत्त्व. हे माहीत असल्याने मी बोलून काही फारसा फरक पडणार नव्हता. पण ओघाने बोलणं आलं म्हणालो, “कितीदा सांगून झालं तुला, जग साधं कधीच नव्हतं अन् सरळ तर कधी असण्याची शक्यताही नाही. मग तत्त्वांचा ताठा घेऊन उगीच का मिरवतो आहेस? आंधळ्यांच्या जगात उजेड विकायला का निघाला आहेस? निसर्गाने दिलेलं आंधळेपण अगतिकता असेलही; पण विचारांची आभाच हरवली असेल तर उजेडाचं मोल उरतंच किती? लालसा नसणारा जीव विश्वात शोधून सापडणं अवघड आहे. एखादा गवसला तर मानवकुळाचं भाग्य मानायला प्रत्यवाय नाही. ज्यांचं आयुष्य लालसेभोवती प्रदक्षिणा करतंय, त्यांना कसली आलीय तत्त्वांची चाड अन् अन्यायाची चीड? चीड त्याला येते ज्याला नीतिसंकेतांनी निर्धारित केलेल्या मार्गावर चालता येते. ज्यांच्या जगण्यात ढोंग खच्चून भरलंय त्यांना मूल्यांची चाड असेलच कशी? यांची मूल्ये यांच्यापासून सुरू होतात अन् कर्तव्ये स्वार्थात विसर्जित.”
“लाचारीची लक्तरे मिरवताना यांना कसलाही संदेह वाटत नसेल का रे? वाटेलच कसं, मनावर स्वार्थाच्या चादरी पांघरून घेतल्या असतील तर. काहींना उगीचच माज असतो. पण तो हे विसरतो की, माज करण्यासारखं काय आहे आपल्याकडे? ना हत्तीसारखी ताकद, ना गेंड्यासारखं बळ. ना गरुडासारखा आभाळ पंखावर घेण्याचा वकूब. ना पाण्यात माशासारखा सूर मारता येत त्याला. माणूसपणाच्या मर्यादा नाहीत का या? मान्य आहे मेंदू आहे तुझ्याकडे, त्याचा कुशलतेने वापर करून तू या गोष्टींची आयुष्यातील कमतरता भरून काढली. पण मन, मेंदू, मनगट केव्हा अन् कसे वापरायचे, याची जान आणि भान असायला नको का? माज नसावा असं नाही, पण त्याने निदान डोळस तर असावं. अंगी पात्रता नावाचा अंश नाही आणि वार्ता मात्र सर्वज्ञ असल्याच्या. हा अवास्तव आत्मविश्वास नाही तर काय?” माझ्या बोलण्याला पुढे नेत तो म्हणाला.
त्याच्या म्हणण्याला समर्थन म्हणा किंवा आणखी काही, बोलता झालो, “अर्थात, हा काही अशा लोकांचा दोष नसतो. त्यांच्या कुडीत वसतीला उतरलेल्या ज्ञानाचा तो प्रमाद आहे. ओंजळभर पाण्याला समुद्र समजण्याचा प्रकार आहे हा. बेडकांच्या विश्वाला जगाचा परिचय असण्याची शक्यता कशी असेल? अपघाताने वाट्याला आलेली चिमूटभर चिंधी पताका म्हणून मिरवण्याचा उद्योग असतो हा. कुणीतरी पुढ्यात फेकलेल्या तुकडा चघळत बसणारी अन् त्यात सुखाची समीकरणे शोधणारी माणसे आणखी वेगळं काय करू शकतात?”
कुठल्याशा विचारांत आपली वाक्ये शोधत होता की काय कोणास ठाऊक? माझ्या समजावून सांगण्यानंतरही त्याची समाधी विखंडीत झाली नाही. त्याच्याकडून प्रतिसादाचे शब्द नाही आले, पण मूक संमती आहे असं समजून मनात उमटणाऱ्या भावनांना शब्दांकित करत पुढे बोलू लागलो, “माणसे विचारांनी मोठी असलेली बघायला सगळ्यांना आवडतात. समाजात माणूस म्हणून वागणं देणगी नसते. ते मिळवलेलं स्वभावदत्त शहाणपण असतं. माणसे मोठी होताना पाहण्यातला आनंद अनुभवता येण्यासाठी स्वतःला लहान होता आलं पाहिजे. मोठेपण स्वयंघोषित कधीच नसते. 'स्व'भोवती प्रदक्षिणा करणाऱ्यांना गती असते, प्रगती नसते. अन्याय करणे आणि यातनादायी वाटेने प्रवास घडणे, माणसांच्या जगण्याची धवल बाजू नसते. तो कुठे होत असेल आणि मी कवचात सुरक्षित असेल, तर उपयोगच काय कमावलेल्या शहाणपणाचा आणि मिळवलेल्या ज्ञानाचा? स्वतःला मखरात मंडित करून दांभिक भक्तांकडून पूजा करून घेणारे, आरत्या ओवाळून घेणारे शोधले तर ठायीठायी सापडतील. पण सत्य हेही आहे की, मखरे फार काळ आपली चमक टिकवून ठेऊ शकत नाहीत. त्यावर परिस्थितीनिर्मित गंज चढतोच चढतो. गंज लागलेल्या लोखंडाला मोल नसतं. म्हणून गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही बरे.”
“हेच, नेमकं हेच सांगतोय मी! अरे, आदर आतून उमलून यायला हवा. त्यात उगवत्या सूर्याची सहजता आणि उमलत्या फुलांची स्वाभाविकता असायला हवी. उगीच ओढून ताणून आणलेले अभिनिवेश नकोत. आईन्स्टाईनच्या बुद्धिमत्तेबाबत जगाला संदेह वाटतो का? नाही ना! स्टीफन हॉकिंसच्या प्रज्ञेविषयी कोणी शंका विचारत नाही आणि आम्ही जिनिअस वगैरे आहोत, असे त्यांनीही कधी जगाला ओरडून सांगितले नाही. जगानेच त्यांचे मोठेपण मान्य केले. पण अर्ध्या हळकुंडात रंगण्याचा सोस असेल, तर त्याला कुणी काही करू शकत नाही, नाही का?” स्मृतीकोशात जमा केलेली तत्त्वज्ञानपर वाक्ये नेमकी आठवून त्याच्या म्हणण्याचं समर्थन करीत बोलला.
“हो रे, खरंयं! विश्वात हात पसरून, तोंड वेंगाळून एकही गोष्ट मिळत नाही. माणसाला हे माहीत असून दुर्लक्ष करतो. मिळालीच तर भीक असते ती. भिकेत सन्मान नसतो. आत्मसन्मानाचा अर्थ अशा कृतींमधून शोधण्याचं कारणच नाही. पद, पैसा, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आधी आपला वकूब नीट समजून घेता यायला हवा. पात्र बनून मिळवाव्या लागतात या गोष्टी. आपणच आपल्या कर्तृत्वाची उंची प्रत्येकवेळी नव्याने तपासून पहावी लागते. असलीच काही कमतरता तर ती दूर करून नव्या वाटा शोधाव्या लागतात. आदर, सन्मान या गोष्टींना हुरळून जाणारे अनेक आहेत, असतीलही. पण तो काही सहज चालून येत नाही. कर्तृत्त्वाने अन् कुशलतेने कमवावा लागतो तो. मिळवला तरी त्यामुळे आयुष्य संपन्न, समृद्ध वगैरे होतंच असं नाही. श्रीमंती येते ती कष्टाने आणि प्रसिद्धी मिळते इतरांसाठी केलेल्या कामाने. अरे, जंगलात कळपाने फिरणारे हरीणही वाघ समोर आल्यावर कळप सुरक्षित ठेवण्यासाठी जिवाच्या आकांताने ओरडते. वाघाच्या भक्षस्थानी पडते. पण समूहाला वाचवते. त्या मुक्या प्राण्याला जे कळतं ते मला, आपल्याला कळू नये, हा वर्तनविपर्यास नाही का?”
माझं उसनं तत्त्वज्ञान ऐकून कदाचित एक सुखसंवेदना त्याच्या अंतरी विहार करायला लागली असावी. आपल्या सांगण्याचं समर्थन करणारा कोणीतरी आहे असं वाटलं असावं, म्हणाला, “मी कोणी मोठा माणूस नाही. महात्म्य संपादनाच्या परिभाषा माझ्यापासून अनेक योजने दूर आहेत. पण आत्मसन्मान जागा असणारा आणि अंतर्यामी निनादणाऱ्या स्पंदनांची गाणी गात माणसातला माणूस शोधत मुक्कामाकडे चालणारा आहे मी. माझं जगणंच इष्ट असेल ते करण्यासाठी आणि रास्त असेल तेच बोलण्यासाठी आहे, असं मी समजतो. अर्थात ही काही माझ्या पदराची पेरलेली वाक्ये नाहीत. वाचलंय कुठेतरी. पण त्यानी काय फरक पडतो? मथितार्थ महत्त्वाचा. तोंडपूजा करून आणि मान तुकवून मोठं होता येतं. पण मान खाली जाते, तिचं काय? अशा लाचार अन् विकलांग मोठेपणात कसली आलीयेत रे सुखे? याचा अर्थ असा नाही का होत, स्वतःचं घर सुरक्षित करण्यासाठी इतरांच्या घराची राख करायला निघाला आहात. आसपास आग लागलेली असतांना स्वतःच्या घरावर पाणी टाकून तुमचं घर सुरक्षित नाही राहू शकत. बादली हातात घेऊन आधी शेजारचं घर गाठायला लागतं, तेव्हा आपण सुरक्षित असल्याची संधी सापडते. माझ्या जगण्यात मिंधेपण कधीही येऊ दिले नाही, कारण मिंधेपणाने मिळालेल्या साम्राज्यापेक्षा स्वाभिमानाने मिळवलेले चतकोर स्थान अधिक मोलाचे असते. निदान मलातरी असं वाटतं.”
बोलतांना मध्येच थांबला. एक दीर्घ उसासा टाकत म्हणाला. “मी काही तुझ्यासारखा पट्टीचा बोलणारा नाही रे! असंच आपलं कुठे कुठे वाचलेलं वाढवून मांडायचं इतकंच. वाचनाचा हा एक फायदा असतो नाही! असो, ते जे काही असेल ते. मला मात्र सहकारी, स्नेही उमदे मिळाले. माझ्या गुणदोषांसकट; असेल भलाबुरा तसा स्वीकारणारे. म्हणूनच असेल का माझं असं स्पष्ट वागणं, बेधडक जगणं? की हे सगळं करतांना माझ्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही म्हणून असेल ही बेफिकीर वृत्ती माझ्या मनात वसतीला? कदाचित...! नक्की माहीत नाही.”
आणखीही बरंच काही बोलला असता तो. मोबाईलची रिंग आली. स्क्रीनवर पाहत म्हणाला, “चल निघतो, आईने कॉल केलाय. बहुतेक बाजारातून काही आणायचं असेल. कोणी काय केलं, चौकटीतील चाकोऱ्या सोडून कोण चालला म्हणून विश्वाचा विस्तार काही संकुचित नाही होत. त्याच्या परिभ्रमणाचा मार्ग नाही बदलत. मूल्ये सगळ्यांसाठी असतात, पण आचरणात आणायला आपलं माणूसपण आपल्याला अवगत असायला लागतं. आलीच कोण्याच्या स्वार्थपरायण विचारांमुळे काही संकटे म्हणून परिस्थितीपासून पलायन नाही करता येत. प्राक्तनात प्राप्तव्याचे अर्थ आधीच विशद करून ठेवलेले असतात नियतीने, असं म्हणतात. जशी कर्मे तशी फळे पदरी पडतात म्हणून सगळेच सांगतात. माहीत नाही, असं काही असतं की नाही. असेलही अथवा नसेलही. पण माणसांचे व्यवहार सोबत असतात अन् त्याचे पडसाद जगण्यावर पडतात एवढं नक्की. तुमच्या पदराला इतरांसाठी सावली बनता आलं की, आपल्या आयुष्याचे अर्थ शोधण्यासाठी वणवण नाही करायला लागत. ते समोरच्या चेहऱ्यावर दिसतात. विकल चेहऱ्यावरचं हास्य बनता येतं, त्याला जगावं कसं, हे प्रश्न नाही पडत.”
वेळेवर घरी पोहोचणे आवश्यक असल्याने परतीच्या रस्त्याने वळता झाला तो. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिलो, पुढे पुढे सरकणारी त्याची प्रतिमा धूसर होईपर्यंत. डोक्यात मात्र विचारांची वलये फेर धरून विहार करत राहिली. शांत जलाशयात भिरकावलेल्या दगडाने पाण्यात वर्तुळे तयार व्हावीत अन् एकेक करून त्यांनी किनारे गाठण्यासाठी एकामागे एक धावत राहावे तसे. खरंतर त्याचं म्हणणं कुठे चुकीचं होतं. पण वास्तव तर हेही आहे की, जगातला हा एकमेव माणूस नाही, ज्याचा माणूसपणावरचा विश्वास दोलायमान झाला. विचारांशी प्रतारणा करणारी माणसे जगाला नवी नाहीत. माणूसपणाच्या मर्यादा पार करणारी माणसे पावलो पावली प्रत्ययास येतील, म्हणून माणसाने आपल्या पुढ्यात मांडलेल्या प्रश्नांपासून पलायनाचे पथ शोधावेत का?
माणूस जगतो दोन गोष्टींवर, एकतर भीतीने, नाहीतर प्रीतीने. तुम्ही नेमके कोणत्या रेषेवर उभे आहात हे आधी आकळायला हवं. भीतीचं भय असणारे 'स्व'प्रतिमेच्या प्रेमात पडलेले असतात. माणुसकीचा गहिवर घेऊन जगणाऱ्यांची प्रीती मूल्यांवर असते. जे सात्विकतेवर स्नेह जडवून असतात, ते द्वेषाची बीजे कधीच पेरत नाहीत. त्यांचं स्वप्न असतं स्नेहाची नंदनवने फुलवणं. मला नंदनवने नाही फुलवता येणार, पण आपलेपणाच्या ओलाव्याचे भरलेल्या ओंजळभर तुकड्यात आस्थेची रोपे नक्कीच वाढवता येतील, एवढं कळणंही माणूस म्हणून जगण्यासाठी पर्याप्त असतं नाही का? पण हेच अवघड असतं. आपल्याला प्यादा बनवून कोणीतरी वाकड्या चाली चालतो आहे. आपण त्याच्या हातातील सोंगटी बनून गरागरा फिरतो आहोत. तो स्वतःच्या स्वार्थासाठी सूत्रे हलवतो आहे अन् आपण त्या तालावर नाचतो आहोत. समोर बसलेले चारदोन अज्ञ, अल्पमती चेहरे आनंदून आपलं समर्थन करतायेत. पण यांना खरंच समजत नसेल का की, एक दिवस आपली उपयुक्तता संपली, चमक फिकी पडली की, आपण अडगळीत काढले जाणार अन् दुसरं बाहुलं हाती घेतलं जाईल. नाचवणारा नाचवत राहील. बाहुल्या तेवढ्या बदलतील. एवढंही कळत नसेल, तर यांच्या प्रज्ञेला समजून घेण्यासाठी कोणते निकष वापरावेत? बुद्धिमत्तेच्या कोणत्या वर्गवारीत मोजता येईल यांना? खरं हेही आहे की, कोणत्याही विधिनिषेधाची सूत्रे अवगत नसलेली माणसे अन् त्यांचा आयक्यू कोणत्याच चाचण्या वापरून नाही मोजता येत.
सत्तेच्या सारीपटावर सोंगट्या सरकत राहतात. कधी सोयीची समीकरणे वापरून सोयीस्करपणे सरकवल्या जातात. स्वार्थ साध्य झाला की, त्या विसर्जितही करता येतात. हे अशा लोकांना कसं समजावून सांगावं? तरीही मनात एक प्रश्न तसाच शेष राहतो की, यांना काहीच कळत नसेल असं तरी कसं म्हणावं? गांधारीने परिस्थितीवश डोळ्यांवर पट्टी बांधली असेलही. पण एखाद्यानं ठरवून विचारांवर पट्ट्या करकचून आवळून घेतल्या असतील, तर त्यांचे अर्थ कसे लावता येतील? जग प्रवादाचे प्रवाह धरून पुढे पळते. अनुकूल प्रतिकूल विचार आधीही विश्वात वसतीला होते, आताही आहेत अन् पुढेही असतील. प्रवादही त्यांचा हात धरून चालत राहतील. असाच एक प्रवाद कायम असणार आहे तो म्हणजे, सुविचारांनी जग कधी सुंदर होत नसतं अन् सुधारत तर अजिबात नसतं. तसं असतं तर माणसांना एवढे सायासप्रयास करायची आवश्यकता उरली असती का? अर्थात, अशा विधानांबाबत प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात. याला कुणी प्रमाद वगैरे म्हणेलही. तसं म्हणू नये असं नाही. पण वास्तव हेही आहे की, स्वार्थापुढे सगळी मूल्ये संकुचित होतात अन् नीतिसंकेत पोरके होतात, हे विसरून कसं चालेल. काळाचे किनारे धरून अनेक महात्मे इहतली अवतीर्ण झाले. विश्वाच्या अफाट पसाऱ्यात आपल्या सत्प्रेरीत प्रेरणांच्या समिधा समर्पित करून गेले. आपआपल्या काळी आणि स्थळी नितळ माणूसपण शोधत राहिले. प्रगतीला पायबंद घालणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेत राहिले. पण अशा प्रश्नांचं पुरेसं उत्तर काही हाती लागत नाही. या पोकळीची कारणे काहीही सांगता येतील. पण वास्तव हेही आहे की, माणूस नावाच्या प्राण्याला मोजण्याच्या प्रमाण पट्ट्या अद्याप तयारच झाल्या नाहीत. वाद, वितंडवाद, प्रवाद सगळीकडे असतात, तसे अपवादही असतातच. असं काही असलं म्हणून माणसाला आपल्या विचारांतून आशावाद काही विसर्जित करता नाही येत हेच खरं, नाही का?
••