आशयघन अक्षरांचा कोलाज: अक्षरलिपी

By

पुस्तकांचा अन् वाचनाचा इतिहास काय असेल तो असो. स्मृतीच्या पाऊलखुणा शोधत काळरेषेवरून मागे प्रवास करत गेलो की कुठल्यातरी बिंदूवर तो सापडेलही. शोधलाच तर अक्षरांशी असणाऱ्या अनुबंधांच्या अर्थांचे काही कंगोरे हाती लागतील अन् नाहीच तपासलं तर काळाची चाके काही उलट्या दिशेने वळणार नाहीत. जे काही असेल, ते असो. पण एक वास्तव दुर्लक्षित नाही करता येत, ते म्हणजे वाचनस्नेही माणसं काल होती, आजही आहेत आणि पुढेही असतील. भले  त्यांची संख्या सीमित असेल. आताही आहेत अशी माणसे आसपास. त्यांना शोधत फिरायची आवश्यकता नाही. चांगलं कुठे काही लिहलं, बोललं जातंय का, याचा शोध घेत तेच भटकत असतात. खरं तर हेही आहे की त्यांना हवं असणारं अन् आनंदाची अभिधाने अधोरेखित करणारं असं काही माध्यमांच्या गलक्यात विनासायास हाती लागतं का? हा बऱ्यापैकी जटिल प्रश्न. जत्रेत एखादं पोरगं वाट चुकावं अन् आपलं असं कुणीच समोर दिसत नसावं, तसंच काहीसं नेटक्या अन् नेमक्या साहित्यापर्यंत पोहचण्याबाबत झालंय. दिशा भरकटलेल्या पोरासारखं केवळ सैरभैर भटकणं. आसपास चेहरे अनेक आहेत, पण ओळखीची एकही आकृती त्यात असू नये. अपरिचितांच्या गजबजाटात अनपेक्षितपणे एखादा ओळखीचा चेहरा नजरेस यावा अन् हायसं वाटावं. अगदी अशी अन् अशीच नसली, तरी काहीशी अशीच परिस्थिती दिवाळीनिमित्ताने येणाऱ्या अंकांबाबत आहे म्हटलं, तर कुणाला वावदूकपणा अथवा आगाऊपणा वाटेल. तो वाटू नये असं अजिबात नाही. पण थोडं आतल्या डोहात डोकावून पाहिलं तर हे म्हणणं अतिशयोक्त असलं, तरी असंभव नक्कीच नाही याची प्रचिती सजग, संवेदनशील वाचकांस येईल.

दीपपर्वाच्या साक्षीने पावलापावलावर पणत्या पेटतात. पण त्यांचा उपयोग अंधार दूर सारण्यासाठी किती अन् शोभेसाठी किती, याचा आपण शोध घेतोच असं नाही. मन भारून टाकणाऱ्या अन् आसमंत भरून उरणाऱ्या प्रकाशात एका पणतीचा अवकाश असा कितीसा असणार आहे? माहीत नाही. पण तिचा ओंजळभर उजेड अंतर्यामी समाधानाचा एक कवडसा कोरून जातो, एवढं नक्की. अर्थात, तो पर्याप्त असेलच असंही नाही. आपल्याकडे अधिक काही असावं म्हणून माणसे अहर्निश वणवण करीत असतात. कुणाला काय हवं, हा ज्याचा त्याचा प्रश्न. जगात वेड्यांची वानवा नाही. प्रेत्येकाच्या वेडाची तऱ्हा न्यारी. वाचनवेडे ही एक त्यातील जमात, परिभाषेच्या परिघात न सामावणारी. सकस असं काही वाचनासाठी मिळावं म्हणून शोध घेत भटकणारी अशी माणसे मुलखावेगळी नसली, तरी त्यांचं असणं आगळं असतं एवढं नक्की. पुस्तक श्वास असतो यांचा. कमकुवत दुवा असतो तो त्यांचा अन् दिवाळीचं निमित्त करून येणारे अंकही तेवढ्याच आस्थेचा विषय असतो. अशी वाचनस्नेही माणसं शोधत असतात आपणास हवं असणारं काहीतरी प्रत्येकवर्षी. ते त्यांना गवसतं का? नक्की नाही सांगता येत. कदाचित असं म्हणणं विसंवादाला, विवादाला आवतन वगैरे देणारं वाटेल कुणाला. असं काही कुणास वाटलं म्हणून आक्षेप घेण्याचं आणि म्हणणं नाकारलं म्हणून विचलित होण्याचंही प्रयोजन नाही. असो, त्याकडे थोडं सोयीस्कर दुर्लक्ष करूयात.

दिवाळी अंकांना काही आशयघन अर्थ आहेत. सामाजिक, सांस्कृतिक वगैरे संदर्भ आहेत. हे नाकारण्यात काही हशील नाही. त्या त्या काळाचा तुकडा त्यांत सामावलेला असतो, भल्याबुऱ्या बाबींसह. काळाचे किनारे धरून वाहत आलेल्या प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयास असतो तो. प्रत्येक संपादक आपापल्या परीने तो करत असतोच. पण प्रत्येकाच्या ललाटी वर्धिष्णू यशाचे अभिलेख गोंदलेले असतातच असं नाही. अर्थात, हे विधानही तसे ढोबळच. सगळ्यांना हे कौशल्य अवगत असतंच असं नाही. पण काहींना अशी किमया करण्याचं कसब साधलेलं असतं. त्यांच्या विचक्षण विचारांना अन् विलक्षण नजरेला या वर्तुळांचा परीघ आकळलेला असतो. उर्ध्वगामी विचारांची वाट धरून आपल्या अस्तित्वाची अक्षरे कोरणारी लिपी त्यांनी आत्मगत केलेली असते. दिवाळीअंकांच्या पानावर अंकित होणाऱ्या अक्षरांना आगळे आयाम देणाऱ्या संपादकांची नावे शोधली, तर स्मृतिकोशातून मोजकेच चेहरे समोर येतात. या नामावलीत महेंद्र मुंजाळ अन् प्रतीक पुरी (शर्मिष्ठा भोसले- पहिल्या आणि दुसऱ्या अंकाच्या संपादक त्रयीतील एक संपादक) यां नावांचा समावेश केल्याशिवाय आणि 'अक्षरलिपी' अंकाचं असणं अधोरेखित केल्याशिवाय दिवाळी अंकांची परिभाषा अपूर्ण आहे. कसदार साहित्याला केंद्रस्थानी नेणाऱ्या ‘अक्षरलिपीने’ अंकांची परिभाषा आणखी एक पाऊल पुढे नेली आहे, असं म्हणणं अतिशयोक्त ठरू नये.

‘अक्षरलिपीचं’ हे तिसरं वर्ष. दिवाळी अंकांच्या अफाट पसाऱ्यात शोधलं तर त्याचं रांगण्याचं हे वय. वय विसरून सोय समजते त्यांना फायद्याची सूत्रे शोधावी नाही लागत. तो स्वतंत्र वाटेवरचा प्रवास असतो. पण विधायक विचारांचं अधिष्ठान आपल्या असण्याशी निगडित असतं अन् ते अधोरेखित करायला लागतं, हे आकळतं त्यांना वाचकांच्या मनी विलसणारी विचारांची वर्तुळे विस्तारण्यात आनंद गवसतो. 'अक्षरलिपी' याच वाटेने गेल्या तीन वर्षांपासून प्रवास करतो आहे. आधीच्या दोनही अंकांकडे कटाक्ष टाकला, तरी या विधानाचं प्रत्यंतर विचक्षण वाचकांना अवश्य येईल. समकालीन प्रश्न, जटिल होत जाणारं जगणं, अभावाचं आयुष्य, अर्थ हरवलेलं अस्तित्व अन् त्यांतून प्रसवणारे प्रश्न घेऊन हा अंक काहीतरी सांगू पाहतो. आसपासच्या आसमंतात साठत जाणाऱ्या अविचारांचे मळभ दूर करू पाहतो. जगण्यातील समस्यांचा अन् आयुष्यात वसतीला आलेल्या ससेहोलपटीचा वेध घेऊ पाहतो. चिंतनाच्या वाटेने चालत समाजातील चिंतेवर लक्ष केंद्रित करतो.

अक्षरलिपीने याआधीच्या अन् आताच्याही अंकांतून रिपोर्ताज आशयाच्या केंद्रस्थानी आणून उभे केले आहेत. ओंजळभर आयुष्यात मुक्कामाला आलेली वैगुण्ये, जगण्याच्या वाटेने चालताना सोबत करणारी वंचना, आकांक्षांच्या क्षितिजांना वेढून असणारी उपेक्षा समजून घेत त्यांचा अन्वय लावण्याचा प्रयास सतत केला आहे. हे लेख वाचून आपण जे जगतो अन् आपल्या पदरी पडलेल्या आहेत, त्यापेक्षा समाज नावाच्या चौकटीत आयुष्याचे अर्थ शोधू पाहणाऱ्या सामान्यांच्या जगण्यात सामावलेल्या समस्या कितीतरी अधिक टोकदार असल्याचं कुण्याही संवेदनशील मनाच्या धन्यांना जाणवेल. मला काय त्याचं, असाही एक एकांगी विचार शुष्क मनाच्या मालकांना करता येतो. त्याला संवेदनशील आयुष्याचे अर्थ अवगत असतील हे सांगावं तरी कसं? जगणं उन्मळून टाकणाऱ्या अशा समस्या केवळ संयोगवश माझ्या आयुष्याला वेढून नाहीयेत, यात आपला कोणता पराक्रम? या विषयांशी दुरान्वयानेंही आमचा संबंध नाही, निदान आज तरी; असं कुणाला वाटत वगैरे असेल तर हे म्हणणं आपणच केलेली आपली वंचना नाही काय? अंकातील रिपोर्ताजमधून समस्याकेंद्रित आयुष्याचा घेतलेला धांडोळा संवेदनांचे किनारे कोरत राहतो. अंकात समाविष्ट रिपोर्ताज, लेख, शोधलेख नजरेखालून घातले, तरी आपल्या आसपास नांदणाऱ्या वास्तवाचे अन्वयार्थ आकळतील. त्याला असणाऱ्या संदर्भांची सूत्रे गवसतील.

ऊसतोड कामगारांच्या जगण्याची होरपळ अन् त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या होणाऱ्या हेळसांडमागचं विदारक वास्तव ‘प्रगती बाणखोले’ यांनी प्रत्ययकारीपणे समोर आणलंय. क्षयग्रस्त महिलांच्या जगण्यातील अगतिकता अन् त्यातून आयुष्याला वेढून असणारी वेदना ‘शर्मिला कलगुटकर’ यांनी संवेदनशील विचारातून शब्दांकित केली आहे. मातीच्या स्पर्शाला पारखे झालेल्या अन् तिच्या मूठभर अस्तित्वाला आपल्या आयुष्याचं स्वप्न समजणाऱ्या अन् ती आस अंतरी धारण करून तिच्या मुक्तीचे श्वास शोधणाऱ्या तिबेटी माणसांचं निर्वासित जगणं ‘मिनाज लाटकर’ यांनी सहृदयपणे समोर आणलं आहे. कन्नोजच्या अत्तरनिर्मितीची गंधाळलेली सफर ‘मनोज गडनीस’ यांनी घडवली आहे. तर नागालँडमध्ये स्थलांतर करून आपल्या अभावग्रस्त आयुष्याच्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेणाऱ्यांचा जगण्याचा धांडोळा ‘शर्मिष्ठा भोसलेंनी’ घेतला आहे. ‘महेशकुमार मुंजाळेंनी’ साडीच्या पदरचे अनेक पदर प्रत्ययकारी शब्दांत लेखांकित केले आहेत. ‘संदेश कुरतडकरांनी’ गे डेटिंग ऍप्सच्या दुनियेतील जगणं आणि ‘मुक्ता चैतन्य’ यांनी पॉर्नच्या आहारी गेलेल्या उमलत्या वयाच्या मुलांच्या मनाचे कंगोरे तपासून वास्तवाचा वेध घेतला आहे. ‘हृषीकेश पाळंदेनी’ शब्दांचा हात धरून लेह, लडाखचा प्रवास घडवला आहे.

‘कल्पना दुधाळ’ यांचा ललित लेख, ‘मुकेश माचकर’ यांची फेसबुक सोडलेल्या माणसाची भन्नाट गोष्ट, ‘बब्रुवान रुद्रकंठावार’ यांची विनोदी कथा, ‘सुरेंद्र पाटीलांनी’ शब्दांकित केलेलं आजोबांचं व्यक्तिचित्र, ‘प्रसाद कुमठेकर आणि मोनालिसा वैजयंती विश्वास’ यांच्या दमदार कथा आणि ‘श्रीकांत देशमुख’ यांच्या आगामी कादंबरीतून घेतलेला तुकारामाची काठी हा अंश; याशिवाय सेवालय- ‘मयूर डुमणे’ आणि बालग्राम- ‘अक्षय कांबेकर’ यांनी सामाजिक संस्थांच्या संघर्षमय वाटचाल अन् कार्याशी अवगत करून दिलं आहे.

आसपासचा आसमंत, त्यात विहरणारे अगणित प्रश्न, आयुष्याचे गुंते अन् भंजाळलेला भवताल शब्दांच्या ओंजळीत साकळणारा कविता विभाग नेहमीप्रमाणे आश्वस्त करणारा अन् लक्षणीय. ‘इंद्रजित खांबे’ यांनी केरळमधील पुलीकाली उत्सवाचं केलेलं फोटोफीचर आणि सुंदर मुखपृष्ठ अंकाचं देखणेपण वाढवणारं.

'अक्षरलिपी' अंकाचं नातं आशयघन शब्दांशी आहे. शब्दांनी पेरलेल्या विचारांशी आहे. विचारसंचित घेऊन फुलून आलेल्या वाक्यांशी आहे. वाक्यांच्या सहवासात मोहरलेल्या भावनांशी आहे अन् भावनांचा बंध अक्षरलिपीशी आहे, एवढं मात्र खरं. आवर्जून वाचावेत अशा अंकांना कोण्या शिफारशीची आवश्यकता नसते; पण काही वेगळं वाचून प्रतिक्रियेचे शब्द अंतरप्रेरणेने लेखांकित होत असतील तर... त्याला कोणता टॅग लावता येईल

••

1 comment:

  1. अप्रतिम,अक्षरांचे कोलाज व विचारांचे बांध
    खरचं,अप्रतिम


    मयूर महाजन

    ReplyDelete