कोणाचा जन्म कुठे व्हावा, हे काही कुणाच्या हाती नसते. जन्मपूर्व संदर्भ नियती निर्धारित करीत असेलही, पण नियतीने नेमलेल्या मार्गांना नाकारून नवा मार्ग आखणारे कालपटावर आपली नाममुद्रा अंकित करून जातात. आयुष्याला असणारे आयाम आकळतात, त्यांना जगण्याची प्रयोजने शोधावी नाही लागत. नियतीच्या अभिलेखांना नाकारून आयुष्याचे अध्याय लिहिण्याचा वकुब असणारी माणसे स्वतःची ओळख काळाच्या कातळावर कोरून जातात. काळाच्या किनाऱ्यावरून वाहताना आसपासच्या प्रदेशात प्रसन्नतेचा परिमल पेरून जातात. त्यांनी केलेलं कार्य केवळ त्यांच्यासाठी नसतं. काळाचे हात धरून इहलोकीचा प्रवास पूर्ण करूनही ते कोणाच्या तरी मनात जगत असतात. त्यांची सय लोकांच्या मनात अधिवासास असते. त्यांचं देहरुपाने अवतारकार्य पूर्ण झालेलं असलं, तरी स्मृतीरूपाने ते नव्याने अध्याय लेखांकित करीत राहतात.
निसर्गाने दिलेला देह अनंतात विलीन झाला, तरी आठवणींच्या रूपाने आसपासच्या आसमंतात विहार करणारे असेच एक नाव कविवर्य शंकर बडे. ‘वऱ्हाडी बोलीचा विठ्ठल’ म्हणून त्यांचा अतीव आदराने केलेला उल्लेख त्यांच्या साहित्यविश्वातील योगदानाला अधोरेखित करतो. त्यांच्या साहित्य परगण्यातील अस्तित्वाला स्मृतीरूपाने आकळण्याचा प्रयत्न कन्नड, जिल्हा औरंगाबाद येथून प्रकाशित झालेल्या ‘तिफण’ या त्रैमासिकाच्या माध्यमातून संपादक प्रा. शिवाजी हुसे यांनी केला आहे.
कविवर्य शंकर बडे यांच्याप्रती आणि त्यांच्या साहित्याप्रती असणाऱ्या आस्थेतून या अंकाला आयाम देण्याचा संपादकांचा प्रयत्न अधोरेखित करावा लागतो. अंकाला समृद्ध करण्यात लिहित्या हातांनी दिलेलं योगदान नक्कीच लक्षणीय आहे. ऐंशी पानांचा हा अंक वऱ्हाडी बोलीच्या विठ्ठलाला समजून घेण्याचा प्रयास आहे. रसिकांनी हृदयस्थ केलेलं हे नाव चाळीस पेक्षा अधिक वर्षे मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य करीत होते. समाजाची स्मृती संक्षिप्त असते असं म्हणतात. पण बडे याला अपवाद ठरले. कदाचित वैदर्भी मातीच्या गंधाने मंडित त्यांची वाणी आणि लेखणी अन् तिला असणारा माणुसकीचा कळवळा, हे कारण असावं. बडेंचं लेखन संख्यात्मक पातळीवर स्वल्प असलं, तरी गुणात्मक उंचीवर अधिष्ठित असल्याने असेल लोकांनी त्यांना आपलं मानलं. ‘वऱ्हाडी बोलीचा बादशाह बिरूद’ मिरवणारा बडे नावाचा बादशहा हाती सत्तेची छडी, राहायला माडी अन् फिरायला गाडीचा धनी नसेल झाला; पण लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या राजाने लोकांची हृदये जिंकली अन् त्यांनाच आपलं सिंहासन मानलं. अनेक सन्मान पदरी असूनही निष्कांचन वृत्तीने जीवनयापन करणारा हा कुबेर होता. कवितेला आपली दौलत समजणारा हा माणूस खऱ्या अर्थाने जगाला.
या अंकाचे प्रयोजन विदित करताना संपादक सांगतात, त्यांची कविता माझ्या आवडीचा भाग होताच. गुणवत्तापूर्ण लिहिणारे अनेक नावे विस्मृतीच्या कोशात विसावली. बडेंच्या बाबत असे घडू नये. त्यांच्या कार्याचा, साहित्याचा परिचय नव्या पिढीला व्हावा. त्यांच्या साहित्याचे संदर्भ सहजी हाती लागावेत, या उद्देशाने कृतिशील अभिवादन करण्यासाठी विशेष अंक करण्यास प्रवृत्त झालो. या धडपडीचं फलित हा अंक आहे. अंकाची लांबी रुंदी कमी असली, तरी आपल्या मर्यादा ओळखून त्याला खोली देण्याचा प्रयत्न संपादक करतात. वारंवार साद देवूनही प्रतिसादाचे प्रतिध्वनी पोहचत नसल्याची खंत संपादकीयात करीत असले, तरी आहे त्यात वेचक अन् वेधक असे काही देण्याचा त्यांचा प्रयास प्रशंशनीय आहे.
या लहान चणीच्या अंकात नऊ लेख शंकर बडे यांच्या जीवितकार्याला अन् त्यांच्या साहित्याला केंद्रस्थानी ठेऊन लिहिले गेलेयेत. पहिल्या तीन लेखात बडेंच्या जीवनाचा शोध घेतला आहे, नंतरच्या सहा लेखातून साहित्याचा वेध घेतला आहे. शेवटचे पाच लेख संकीर्ण आहेत. डॉ. किशोर सानप यांच्या लेखाने अंकाचा प्रारंभ होतो. तो बडेंच्या जगण्यातील गहिरे रंग घेऊन. लेखक आपलेपणाने त्यांच्या जगण्याच्या अन् साहित्याच्या प्रवासाला समजून घेताना त्यांची कविता मुळचाच झरा असल्याचे निरीक्षण नोंदवतात. ‘शंकर बडे नावाचा कवी आणि माणूस’ हा लेख बडेंच्या आयुष्याची परिक्रमा करणारा स्मृतींचा जागर आहे. ‘वऱ्हाडीचा मुकुटमणी’ डॉ. सतीश तराळ आणि ‘वऱ्हाडी मायबोलीचा विठ्ठल’ नितीन पखाले यांचे लेख बडेंच्या जीवनाचा, साहित्यक्षेत्रातील योगदानाचा परमर्श घेतात.
‘इरवा ते सगुन गतवैभवाचा काव्याविष्कार’ या दीर्घ लेखातून डॉ. किशोर सानप बडेंच्या ‘इरवा’तल्या कविता समृद्ध, संपन्न, सुखी खेड्याचा अभिलेख आहेत, तर ‘सगुन’ मधील कविता पडझडीत जगणं मौलिक मानणाऱ्या शेतकऱ्याच्या मनातलं धाडस व्यक्त करणारी असून ‘मुगुट’ मधील ग्लोबल व्हिलेजचं गाजर नागरी सुखांसाठी वापरणाऱ्या भांडवली व्यवस्थेचं पितळ उघडं पाडणारी असल्याचा निष्कर्ष काढतात. ‘भल्या सगुणाचा मुगुट ठरणारी लोककवी शंकर बडेंची कविता’ या लेखातून इरवा, सगुन, मुगुट या कवितासंग्रहाच्या अनुषंगाने डॉ. कैलास दौंड शंकर बडेंच्या साहित्यविश्वाची परिक्रमा करतात. बडेंच्या काव्यविश्वाचा सखोल धांडोळा घेणारे हे दोनही लेख अंकाला आशयघन बनवतात. डॉ. प्रमोद गारोडे, पंढरीनाथ सावंत, डॉ. प्रवीण बनसोड यांचे लेख अंकाच्या आशयाला अन् बडेंच्या साहित्याला समजून घेताना त्यांचं महत्त्व अधोरेखित करतात.
‘धापाधुपी शैलीदार लेखनाचा उत्कृष्ट नमुना’ या लेखातून बाबाराव मुसळे बडेंच्या ललित लेखनाचा सविस्तर परामर्श घेतात. त्यांच्या वऱ्हाडी बोलीतल्या लेखांचा लेखाजोखा मांडतात. त्यांच्या लेखनातील पारदर्शकता, अभिव्यक्ती, भाषिक वैशिष्ट्ये आदि विशद करताना बडेंच्या लेखणीचे यश माणसं जिवंतपणे वाचकांसमोर साकार करण्याचं कसब, तसेच निवेदन आणि लेखनशैलीला आलेल्या मोहरलेपणात असल्याचे सांगतात.
अंकाच्या शेवटच्या भागात बडेंच्या काही कविता आणि ‘जलमगाव’ हा ‘धापाधुपी’मधील लेख समाविष्ट केला आहे. बडेंच्या व्यक्तित्वाला समजून घेण्यात या लेखांचा अन् कवितांचा उपयोग होईल, असा संपादकांचा कयास असावा. संपादकीयात त्यांनी नमूद केल्याप्रमाणे अंकासाठी फार साहित्य उपलब्ध झाले नसल्याने प्रासंगिक गरज म्हणून कदाचित हा समावेश झाला असावा. असो, हे सगळं जमवून आणणं किती यातायात करायला लावणारं असतं, हे संपादकाशिवाय चांगलं कोण सांगू शकेल? एखाद्या साहित्यिकाप्रती वाटणाऱ्या जिव्हाळ्यातून अन् त्यांच्या साहित्याविषयी असणाऱ्या आस्थेतून विशेषांक काढावा वाटणे हेही खूप आहे. हा अंक भारदस्त विशेषांकांच्या संकल्पित परिभाषेत भलेही अधिष्ठित करता येत नसला, तरी प्रयत्नांच्या परिभाषा या अंकाकडे पाहताना आकळतात, एवढं मात्र नक्की.
बडेंच्या सगुन काव्यसंग्रहाची पाठराखण करताना कविवर्य फ. मु. शिंदे लिहितात, ‘जिभेचा सगळा जीव बोलीत असतो. बोलीतला जिव्हाळा जिभेवरच्या जगाने जपला आहे... बोली हाच भाषेचा जलाशय आणि बलाशय असतो. बोलींचे जे बादशहा आहेत, त्यात बडे बलाढ्य बादशहा आहेत’. बोलीचं विश्व समृद्ध करणारी गावे, गावाला समृद्ध करणारी माणसे आणि माणसांना संपन्न करणारे असे बादशहा आहेत, तोपर्यंत बोलींचं साम्राज्य अबाधित असेल, असे म्हणायला संदेह नसावा. हेच काम बडेंनी केलंय. बोलीचा हा बुलंद बादशहा खऱ्या अर्थाने बोलीचं प्रतिरूप होता. ‘पावसानं इचीन कहरच केला’ या कवितेने आणि ‘बॅलिस्टर गुलब्या’ या एकपात्री प्रयोगाने मराठी साहित्याच्या परगण्यात आपली नाममुद्रा अंकित करणाऱ्या बडेंच्या स्मृतींना अधोरेखित करणारा हा अंक आपल्या मर्यादांना स्मरून केलेला एक सफल प्रयत्न आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये.
**