सुखांचे पिंजरे

By
दुःख आणि संकटांना काही कोणी आवतन देऊन आपल्या अंगणी आणत नाही. आपल्या पावलांनी ती चालत येतात. त्यांनी यावं की नाही, हेही काही कोणाला ठरवता नाही येत. म्हणजे मर्यादित अर्थाने दुःखापासून अंतर राखता येत असलं अन् सुखांशी सलगी करता येत असली, तरी कधी परिस्थितीच अशी काही वळण घेते की, मानलेल्या मातब्बरांनाही मात देते. खरंतर दुःखाचं येणं कोणालाच नको असतं. दुःख माझ्या पदरी पडूदे म्हणून सांगणारी कुंती एखादीच. बाकी सगळे सुखांचे पिंजरे शोधणारे. मनाजोगत्या आकारात आयुष्य मापता नाही आलं की, कुणाच्या तरी पदरी आपल्या अपयशाचं माप टाकता यावं म्हणून अनेक मार्ग शोधले जातात. माझ्याच वाट्याला हे भोग का येतात म्हणून माणूस प्रत्येकवेळी परिस्थितीच्या कपाळी आपल्या नाकर्तेपणाचे चिटोरे चिटकवत असतो. 

पुढ्यात पडलेल्या प्रसंगांचं दायित्व नेमकं कोणाकडे कलतं करावं? परिस्थिती की प्राक्तन? नाहीच निर्णय घेता येत. खरंतर कोणाकडे ते वळते करायची आवश्यकता नसतेच. केवळ आपण आपल्या मर्यादा मान्य केल्या तरी बऱ्याच प्रश्नांची उत्तरे हाती लागू शकतात. पण स्वतःला मोठं मानण्याच्या नादात आपलं अपयश अमान्य करण्याचे अमाप प्रयत्न आपण करत असतो. दुःखाच्या कथा रंगवून सांगत असतो. वेदनांना सहानुभूतीचा संग घडवून देखणं करण्याची कोणतीच संधी दडवत नाहीत. सुखाचें निसटते स्पर्श जगणं वगैरे सजवू शकत होते, पण ते फारकाळ अंगणी नांदते राहिलेच नाहीत म्हणून नशीब वगैरे नावाची बेटं नव्याने उभी करतो. खरंतर दुःख कुणाच्या ललाटी लिहलं नाही आणि सुखाचा चतकोर तुकडा सापडला नाही, असा माणूस सापडायचा आहे. सुखाचा शोध सहजवृत्ती असली तरी दुःखाचा संगही स्वाभाविक आहे. फक्त प्रत्येकाच्या दुःखाची प्रत वेगळी अन् सुखाचा पोत निराळा असतो.

आयुष्य, जीवन, जगणं वगैरे शब्द देखणे वाटत असले तरी ते काही सरळ रेषेत चालत नाही. सरळ रेषा फक्त मनात असतात. जगण्यात नसतात. वास्तवात अनेक वळसे घेत धावत राहतात त्या इकडेतिकडे. सैरभैर वासराचे पाय वाट दिसेल तिकडे वळतात. त्याला वाटा कळतात, पण परिस्थितीने पकड मजबूत केल्याने गांगरून वाटेवरील ओळखीच्या खुणा विसरून धावत राहतं. असंच काहीसं आयुष्याचे अर्थ शोधताना होतं. सगळंच नसेल, पण बरंच काही हाती असून ते शोधण्यासाठी उगीच वणवण सुरू असते.

जगण्यात असलं काय अथवा वागण्यात असलं काय, करंटेपण आहे तेच अन् तसंच असतं. त्याच्या वेगळ्या व्याख्या नाही करता येत. ठिकाण बदललं म्हणून अर्थ नाही बदलत त्याचे. करंट्यांनी स्वतःच्या कर्माने कपाळी कोरून घेतलेले अभावाचे अभिलेख ना नियतीला बदलता येत, ना नियंत्याला मिटवता. ना नशिबाला नव्याने लिहता येत, ना संधीचे सूर पकडून त्यांना जगण्यावर साज चढवता येत. स्वतःच अंधाराकडे चालणं स्वीकारलं असेल कोणी, तर त्याला पर्याय नसतात. समजा दिले कोणी संधीचे कणभर कवडसे वेचून त्यांच्या हाती, म्हणून नव्या वळणाशी सख्य साधता येतंच असंही नाही. तेवढं ओझं पेलायला हातच समर्थ नसतील तर... अशावेळी कोणी काहीही केलं तर काहीतरी सकारात्मक होण्याची संभावना उरतेच किती? समर्थ खांदेच ओझं पेलायला सक्षम असतात. हे खरं असलं तरी जगण्यात विसावलेली सकारात्मकता अनेक अवघड गोष्टींना आवाक्यात आणते हेही खरं.

आयुष्याच्या सोबत चालत येणाऱ्या अंधाराचे अर्थच कळत नसतील कोणाला, तर उजेडाचा व्याख्या समजावून सांगण्यात कसलं आलंय शहाणपण. पणतीच्या प्रकाशाच्या परिभाषा सांगून पुण्य पदरी पडणं कसं शक्य आहे? त्यासाठी वात पेटवून आस्थेला साद घालता यायला हवी. श्रद्धा डोळस असल्या की, भक्तीचे अर्थ शोधता येतात. ते सापडले की त्यांचे अन्वय तेवढे लावता यायला हवेत. दगडातून नको असणारा भाग काढून मूर्ती घडवता येते हे खरंय. अनावश्यक भार काढून दगडाला आकार देता येईलही, पण देव कसा साकार करता येईल. देव घडवण्यासाठी त्यात भाव ओतावा लागतो. नुसत्या दगडाला देवपण देण्यात काहीच हाती लागत नसतं. दगडाला शेंदूर लावून पूजा केल्याने त्याचं असणं देखणं नाही करता येत. त्यावर रंगांचा लेप लावता येईलही. पण अंतरंगी असणाऱ्या आकृतीचं काय? 

कोरडेपण कोणत्याही कृतीला प्रतिसाद नाही देऊ शकत. ओंजळभर ओलावा रुजण्याच्या संधी देतो, मुळांना त्याला प्रतिसाद देता आला की, उगवून येण्याचे संदर्भ नाही शोधायला लागत. संधीचा अव्हेर करणाऱ्यांना हे कळणं असंभव. अंधार हेच प्राक्तन असेल, तर प्रकाशाची सगळी प्रयोजने अशावेळी पोरकी होतात. प्रवास कोणताही असो तो कधीही सहज, सुगम नसतो. तो तसा असता तर भटक्यांच्या भटकंतीचे गोडवे कोणी गायले नसते. वैयक्तिक असलं म्हणून आयुष्याचंही गणित वेगळं कुठं असतं. आपल्याकडे काहीतरी असावं ही आस अंतरी अधिवास करून असल्याने माणसांची पावले सतत पळत राहिली आहेत. सुखांची आस नसती तर अज्ञात परगण्यात पाऊल ठेवणाऱ्यांच्या पाऊलखुणाचा माग काढत माणसे नव्या वाटांनी वळती झाली नसती. अनभिज्ञ वाटा अन् अनोळखी वळणांशी सख्य साधत देशांतर करायला कुणी धजलं नसतं, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

1 comment: