कविता समजून घेताना ... भाग: तीन

By

दगडी खांबांचे आकाश
 
दगडी खांबांच्या आकाशाखाली
पडाव पडला आहे
बिऱ्हाडाभोवती दगडांच्या गराड्यात
कोंबड्या दाणे टिपताहेत
अर्धवट आकारातल्या दगडमूर्तींसोबत
उघडीवाघडी मुले खेळतायेत
जुनेऱ्यातल्या बाया
अजिंठ्यातल्या मग्न शिल्पांसारख्या
दगडावर टकटक करताहेत
माणसांच्या अंगावरील घाम
पाषाणमूर्तीच्या अंगात जिरतो आहे

या अंगाने त्या अंगाने पहात
माणसे दगडात जीव ओतताहेत
बोटे फुटताहेत, रक्ताळताहेत
मूर्ती आकाराला येताहेत
माणसांशी सुखदुःखाचे बोलताहेत
वेदनेचे मोल जाणून घेण्यासाठी
ऊनवाऱ्यात तिष्ठत उभ्या आहेत
दगडांच्या चुलीवर भूक खादखदते आहे
रस्त्याकडेला दगडधोंड्यासोबत
दगडी खांबांच्या आकाशाखाली
एक संस्कृती नांदते आहे

बाया, लेकरे अन दगड मूर्तीचा
लवाजमा घेऊन ते जातील
दगडी खांबांचे नवे आकाश त्यांना दिसेल
तिथे ते पडाव टाकतील
दगडधोंड्यांसोबत जतन करून ठेवलेली
परंपरा तिथेही पेरतील
तिच्यात चैतन्य ओततील, थकलेभागले
दगडी खांबांच्या आकाशाखाली झोपी जातील

- पांडुरंग सुतार, पाचोरा
••   
    
इहतली नांदणाऱ्या सकल सुखांच्या केंद्रस्थानी माणूस असावा. सुखांचे प्रवाह त्याच्या दिशेने वाहत राहावेत. नसले तर वळते करता यायला हवेत. परिस्थितीचे घाट बांधून त्यांना थांबवता यायला हवे. अशी अपेक्षा वंचितांच्या मनी अधिवास करून असेल, तर त्यात काही वावगे नाही. शेवटी माणूस महत्त्वाचा. पण असं चित्र सार्वकालिक कधी होतं? सार्वत्रिक तर नव्हतंच. हे असं सगळं घडवणं असंभव नसलं, तरी अवघड होत आहे, एवढं मात्र नक्की. कारण प्रत्येकाने आपल्याभोवती संकल्पित सुखांची कुंपणे घालून घेतली आहेत. मर्यादांचे बांध पडलेल्या वर्तुळातील संचाराला माणूस सुख म्हणतो आहे. माणूस काळाचा निर्माता नसला, तरी परिस्थितीचा उद्गगाता अवश्य असतो. परिस्थितीने केलेले आघात त्याचं माणूस म्हणून असणंनसणं अधोरेखित करीत असतात. आहे रे आणि नाही रे, हा कलह इहतली सुखनैव नांदतो आहे, शतकांपासून आणि त्याने माणसांच्या आयुष्यातून निरोप घेणे अवघड आहे. समतेचे स्वप्न पाहणाऱ्या जाणत्यांनी विषमतेच्या वाटा बुजण्याचे अनेक प्रयत्न करूनही हाती फार काही लागत नाहीये.

आभाळाच्या अफाट छताखाली किती माणसे आणि किती पिढ्यांचे आयुष्य अभावात सरले, कोणास माहीत. जगाने श्रीमंत माणसांच्या नावांची यादी देण्याची सोय करून घेतली आहे; पण गरीब कोण, याची व्याख्या अद्याप काही करता आलेली नाही. हरवलेल्या क्षितिजांचा शोध घेत टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण करणारी माणसे अजूनतरी स्वातंत्र्य शब्दाचा अर्थ समजू शकली नाहीत. अखंड कष्ट उपसित आपल्या ओंजळभर अस्तित्वाला अधोरेखित करीत जगण्याला नवे आयाम देण्याचा प्रयत्न करीत आहेत. छिन्नी-हातोडा-फावडा हाती घेऊन आला दिवस भाकरीचा शोध घेत आहेत. समजा या औजारांऐवजी त्यांच्या हातात हत्यारे आली तर... जगाचा इतिहास काही वेगळा आकारास येईल? माहीत नाही, पण धरती शेषाच्या फण्यावर नाही, तर कष्टकऱ्यांच्या हातावर तरलेली आहे, हे अण्णाभाऊ साठेंचं विधान श्रमिकांच्या अपार कष्टाला अधोरेखित करते. ज्यांच्या नावाची नोंद कुठल्याही सातबाऱ्यावर नाही. ज्यांना नमुना आठ काय आहे, माहीत नाही. अशांचे जगणे रोजच संघर्ष असतो, नियतीने केलेल्या अन्यायाविरोधात झगडा असतो तो. तसाच आपणच आपल्याशीही.

भाकरीच्या शोधात बाहेर पडलेलं बिऱ्हाड अफाट आभाळाच्या सावलीखाली कुठेतरी विसावलेलं. आसपास पडलेले दगड. हे दगड यांच्या जगण्याला आश्वस्त करणारे. नियतीने पदरी घातलेल्या आयुष्याचा अस्ताव्यस्त पसारा. चरणाऱ्या कोंबड्या आणि अर्धवट आकाराला आलेल्या मूर्तींसोबत खेळणारी उघडीवागडी पोरं. अंगावरील जुनेऱ्यासोबत दगड कोरणाऱ्या बाया आणि पाषाणमूर्ती घडवताना घामाघूम झालेली माणसे. श्रम करूनही हाती शून्य आणि आणि सोबतीला अनेक अनुत्तरित प्रश्न. अभावाचाच प्रभाव असणारं जिणं. असं का घडावं? या प्रश्नाचा शोध घेण्यात झालेली दमछाक. सुखाचं चांदणं का हाती लागत नसेल? याची मनाला सलणारी खंत घेऊन एक वंचना येथे नांदते आहे.

दगडाला आकार देणाऱ्या माणसांना देव घडवता आला, पण माणसाच्या मनातल्या दगडाला काही कोरता आलं नाही. दगडाने नव्या आकारात स्वतःला मढवून घेतलं, पण माणसांनी स्वतःला सजवून घेण्यासाठी तयार केलेली मखरे काही बदलली नाहीत. भौतिक प्रगतीच्या परिघात सुखांचा शोध घेणाऱ्यांना भुकेचा परीघ काही समजला नाही. फॅशन बदलली म्हणून घरातील कपड्यांच्या संखेत भर पडते. सुखांचा राबता आपल्याकडे असावा म्हणून मनात अधिवास करून असलेली असोसी. आजच्या गोष्टी उद्या कालबाह्य होतात, म्हणून नव्याचा सोस काही सुटत नाही. नवेही काही चिरंजीव नसते. हे माहीत असूनही सगळेच प्रवाह सुखाच्या उताराने वाहते ठेवण्यात माणसे धन्यता मानत आहेत. आर्थिक प्रगतीचे आलेख आकाशाच्या दिशेने पाहत निघाले आहेत, पण अखंड कष्ट करूनही बायकोच्या, मुलांच्या अंगावर एक नवा कपडा देण्याइतपतही एखाद्याची कमाई नसावी, याला कोणत्या समानतेच्या चौकटींच्या साच्यात बसवता येईल?

माणसे दगडात देव शोधतायेत. दगडाला देवत्व देणारे हात दगडाच्या उडणाऱ्या टवक्यांनी घायाळ होतायेत, पण विषमतेच्या प्रतलावर उभ्या असणाऱ्या व्यवस्थेचा टवका काही त्याला काढता येत नाही. यांच्या श्रमातून कोणाचा तरी देव आस्था बनून आकाराला येणार आहे. दगडाला देवत्व देता येतं, पण तोच देव माणसाला माणुसकी का शिकवू शकला नसेल? त्याला समानतेच्या पातळीवर का आणू शकला नसेल? खरंतर देवाला टीचभर पोटाचा प्रश्न सोडवणं काय अवघड आहे? प्रश्न आस्थेचा असेलही. देव असला नसला, म्हणून प्रश्न काही बदलत नाहीत. संस्कारांच्या श्रीमंतीसाठी माणसाने देव घडवला, पण माणूस माणसाला घडवायला कमी पडला. संस्कृतीचा प्रवाह हजारो वर्षाचं संचित जमा करून वाहतो आहे. अधिक परिणत होण्याच्या दिशेने. विश्वात काय काय असेल नसेल, माहीत नाही. पण पोटात खड्डा पाडणारी भूक मात्र अनवरत सोबत करते आहे आणि तिचा शोध घेण्यासाठी घडणारी वणवणही. भाकरीचा परीघ शोधण्यासाठी वणवण करणारी वंचितांची एक संस्कृती इहतली सतत नांदते आहे, कष्टाच्या गाथा रचित. नेमका प्रश्न येथेच उभा राहतो. काहींकडे सगळंच असावं, काहींकडे काहीच नसावं, असं का? संस्कृती काही भाकरीपेक्षा मोठी नसते. भाकरीचा परीघ विश्वव्यापी आहे आणि तोच आपल्यात एक संस्कृती घेऊन नांदतो आहे.

आयुष्यातून हरवलेलं सुखाचं ओंजळभर चांदणं शोधण्यासाठी वणवण करणारी माणसे आज येथे असतील, उद्या आणखी कोठे असतील, पण भाकरीचा प्रश्न सगळीकडेच सोबत असेल. दगडाला देवपण देणाऱ्यांना माणसातल्या देवत्वाचा अंश शोधण्यासाठी आणखी दुसरे आकाश शोधावे लागेल. सगळा लवाजमा घेऊन भटक्यांचे संसार आणखी कुठल्या तरी आभाळाचा तुकडा शोधत निघतील. आपल्या परंपरा तेथे पेरतीलही. तिचे अंकुर तेथल्या मातीत रुजतील का? त्यांचं भविष्य कोणत्या मातीतून उगवेल? माहीत नाही. पण अशाच कुठल्यातरी दगडी खांबाच्या आकाशाखाली एक निद्रा चैतन्याचे मळे फुलवण्याचे स्वप्न पाहत असेल. स्वप्ने सुंदर असतीलही, पण वास्तवाचं कुरूपपण कसे विसरता येईल.         

काळाचे पेच अधिक गुंतागुंतीचे होत आहेत. नव्या समस्या, नवे प्रश्न समोर येतायेत. आयुष्याचा परीघ रोजच आक्रसतो आहे. आसपास वास्तव्य करणाऱ्या फाटक्या माणसांच्या मनात असुरक्षितता अधिवास करून आहे. माणूस माणसापासून सुटतो आहे, मनातून तुटतो आहे. परिस्थितीशरण अगतिकता अधिक वेदनादायी ठरते आहे. माणूस माणसाला विस्मृतीच्या कोशात ढकलून ‘स्व’साठीच जगू लागतो आणि अशा जगण्याला प्रमाण मानतो, तेव्हा माणुसकी शब्दावरचा विश्वास उठायला लागतो. माणसे नुसत्या चेहऱ्यानेच नाही, तर विचारांनीही हरवत आहेत. जगण्यात एक उपरेपण येत आहे. हे उपरेपण माणसांच्या माणूस म्हणून असणाऱ्या स्थानाला धक्का देत आहे. माणसे विस्थापित होत आहेत. विस्थापन प्राक्तन होत आहे. समस्यांच्या जंजाळातून मुक्त होण्याच्या वाटा शोधतांना माणसे संभ्रमित होत आहेत. संयमाचे बांध फुटत आहेत. व्यवस्थेत एक साचलेपण आले आहे. जुन्या-नव्याचा संघर्ष माणसाला काही नवा नाही. नव्याच्या पाठीमागे धावणे टाळता येत नाही. जुने टाकता येत नाही आणि नवे अंगीकारता. या निवडीच्या संभ्रमात बहुतेकांचा अभिमन्यू होणे अटळ होते आहे. नवा अवकाश आकारास येतो आहे. मृगजळी सुखांचे विभ्रम दिसू लागले आहेत. जगण्याचे नवे साचे घडवले जातायेत.

कवीला आसपास पाहता न्याहाळता यावच, पण वाचताही यायला हवा. तो समजून घेता यायला हवा. सामान्यांच्या संवेदनांशी सोयरिक सांगणारी अभिव्यक्ती असली की, अभिनिवेशाचे साज चढवून शब्दांना सजवायला लागत नाही. ही कविता अंतरावर उभी राहून स्वतःला अन् आसपासच्या आसमंताला निरखत, संवेदनशील भावनांचे तीर धरून वहात राहते. संस्कृती एक प्रवाह असतो अनवरत वाहणारा. त्याला अनाहत राखायची आवश्यकता सार्वकालिक आहे. श्रमसंस्कृतीने येथील मातीला सत्व दिले आणि मातीने माणसांना स्वत्व. काळाच्या प्रवाहात स्वत्व विसरलेली माणसे सत्व कसे टिकवतील, हा प्रश्न अधिक जटील होतो आहे. श्रमाला संस्कृती मानणारे दगडधोंड्यांसोबत परंपरा पेरतील, हा आशावाद या कवितेत जागता आहे. अन् तोच आधाराचा खांब आकाशाला अथांगपण देणारा आहे. म्हणूनच माणसांच्या अफाट असण्याला, अमर्याद असण्याला अस्थिरतेचा अभिशाप नसावा, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment