Aathavaninchya Hindolyavar | आठवणींच्या हिंदोळ्यावर

By
रविवारची निवांत पावसाळी दुपार. पुस्तकाचं वाचन सुरु. बाहेर पावसाची हलकीशी रिमझिम. वातावरणात एक प्रसन्न गारवा. वाचनाची ब्रह्मानंदी टाळी लागलेली. मन पुस्तकातील मजकुरात गुंफलेलं. मोबाईलची रिंग वाजली. पुस्तकावरून लक्ष विचलित झालं. मोबाईलच्या स्क्रीनवर फक्त क्रमांक दिसतोय. नंबर सेव्ह नसल्याने काही अंदाज येणं शक्य नव्हतं. थोड्याशा नाराजीने कॉल रीसिव्ह केला. पलीकडून आवाज, ‘चंद्या, आहेस कोणत्या जगात? तुझ्या अस्तित्वाचे काही पुरावे आहेत का कुठे शिल्लक?’ क्षणाभराचीही उसंत न घेता समोरचा आवाज बरसत होता. त्या विधानांनी थोडा सरकलोच; पण तसे शब्दातून जाणवू न देता म्हणालो, ‘अरे, कोण तू? आणि असा सुसाट काय सुटतोयेस? जरा श्वास घे! आधी मला सांग, कोण बोलातोयेस?’ पलीकडून पुन्हा रिमझिम सुरु, ‘अरे बेशरम माणसा, माणसांना एवढ्या सहज विसरण्याची कला कधी अवगत केलीस रे? निदान सोबत शिकलेल्या, राहिलेल्या माणसांचे आवाज तरी आठवणीत राहू दे ना थोडे! की स्मृतीला तेवढेही कष्ट करायची सवय राहू दिली नाहीयेस!’ एव्हाना स्मृतीत साठलेल्या आवाजांना आठवत संगती लावण्याचा प्रयत्न करू लागलो. काहीच आठवेना म्हणून म्हणालो, ‘नाही आठवत काही, तूच सांग ना! कोण बोलातोयेस?’ ‘मी संज्या...! आठवले का काही?’ पलीकडून त्याचा परत प्रश्न.

खरंतर शिकताना शाळेपासून महाविद्यालयापर्यंत संजय नावाचे चारपाच मित्र सोबत होते. यातील हा नेमका कोणता संज्या असावा? काहीच संदर्भ लागेना. शेवटी त्यानेच सांगायला सुरवात केली. ओळखीच्या क्षणांना संजीवनी मिळाली. संगती लागली. बीएडच्या वर्गात हा सोबत होता. त्याला काय आठवले कोणास ठावूक मित्रांकडून नंबर मिळवून बऱ्याच दिवसांनी फोन केला. राहिला बोलत. पुढची वीस-पंचवीस मिनिटे अखंड. मनात साठलेल्या आठवणींचे आभाळ ओथंबून झरू लागले. बाहेरच्या पावसाला सोबत करीत आठवणींच्या वर्षावात भिजत राहिलो. शिकतानाच्या बऱ्या-वाईट, हसऱ्या, हळव्या आठवणी भारावलेपण घेऊन रिमझिम बरसत राहिल्या. बऱ्याच कालावधीनंतर मैत्रीच्या संवादाला शब्दांचं कोंदण लाभल्याने आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून झुलत राहिलो. स्मृतींच्या गंधगार स्पर्शाने पुलकित होत राहिलो. काय आणि किती बोलावे असे झालेले. मनात साठलेल्या आठवणींच्या गंधकोशी एकेक उघडत राहिल्या, त्यांनी मनावर गारुड घातले. आनंदाचे इंद्रधनुष्य मनाच्या क्षितिजावर उमटून आले. त्याच्या रंगात रंगत राहिलो. मोबाईलवरील संवाद संपला, मन मात्र आठवणींच्या हिंदोळ्यावर अद्यापही झुलतच होते. स्मृतींची सोबत करीत एक वेडावलेपण दिमतीला घेऊन मन काळाच्या पडद्याआड डोकावत राहिले. तेथे दिसणाऱ्या प्रतिमांना साकोळून चालत राहिले आठवणींच्या गावाकडे.

‘आठवणी’ एक छोटासाच, पण आपल्या आत अर्थाच्या अनेक संदर्भांना सामावून घेणारा शब्द. त्यात जगण्यातील आश्वस्तपण जसे सामावले आहे, तसे आनंदाचे सोहळेही साठले आहेत. त्यांचा तळ गाठण्याचा प्रयत्न करावा तेवढ्या आणखी खोल जाणाऱ्या समुद्राच्या तळासारख्या. इहतलावर जीवनयापन घडताना इच्छा असो, नसो स्वतःला अनेक रंगांनी रंगवून घ्यावे लागते. त्याच्या नानाविध छटांनी मढवून घ्यावे लागते. अशा रंगांनी मंडित स्मृतींचे इंद्रधनुष्य जीवनाचे रंग घेऊन प्रकटते. त्याने दिलेल्या रंगातून माणूस आपल्या जीवनाचा रंग शोधत राहतो. मोरपीस बनून आठवणी मनावरून फिरत राहतात; कधी सुखाचे तलम स्पर्श, तर कधी कटू प्रसंगांचे नकोसे आघात बनून. त्यांची अनवरत सोबत घडत असते. सुख-दुःखाची सरमिसळ घेऊन मनाचं आसमंत आपलं अफाटपण सोबतीला घेत काळ्या-पांढऱ्या ढगांनी भरून येते. कधी नुसतेच अंधारून टाकणारे, तर कधी धो-धो कोसळणारे.

स्मृतींच्या वर्षावात भिजत आठवणींचे झाड आपल्या अस्तित्वाच्या मुळांनी आस्थेचा ओलावा शोधत परिस्थितीच्या वादळवाऱ्याशी संघर्ष करीत उभे असते. वसंतातला बहर अंगावर फुलताना पाहून आनंदते, कधी निष्पर्ण डहाळ्यांवर आशेचे नवे कोंब अंकुरित होण्याच्या प्रतीक्षेत उन्हाची सोबत करीत आस लावून बसते. उत्क्रांतीच्या विकासक्रमात माणूस किती विकसित झाला, हा प्रश्न बाजूला सारून आठवणींच्या लहान-लहान रोपट्यांना मन उत्क्रांत करीत राहते. आठवणींचा बहरलेला मळा माणसांच्या मनाची श्रीमंती असते. त्यांची सोबत जगणं संपन्न करीत राहते. परिस्थितीने माणूस एकवेळ भणंग असेल; पण आठवणींच्या जगाचे सारेच कुबेर असतात. त्या परगण्यात सारेच सावकार असतात. येथे राव-रंक असा भेद नाहीच. सोबत करणाऱ्या आठवणी कोणत्या, कशा असतील हे ज्याचे त्यालाच माहीत. त्या जशा असतील तशा स्वीकारून तो जगण्याच्या वाटेने चालत राहतो. वाटा जीवनाचा प्रवास घडवतात. माणसांच्या जगण्याच्या अनेक प्रश्नांची उत्तरे आठवणीत सामावलेली असतात. काहींसाठी त्या आनंदयात्रा असतात, तर काहींसाठी संघर्षयात्रा. मनाला आठवणींचे कोंदण लाभलेलं असतं. त्यातील एकेक स्मृती चांदण्या बनून चमकत असतात. आठवणीनी माणसाचं जगणं श्रीमंत केलेलं असतं.

आयुष्याच्या प्रवासाची अवघड वळणं पार करीत एखाद्या वळणावर उभे राहून वळून पाहताना बऱ्यावाईट आठवणी उगीच रित्या मनात गर्दी करतात. यातील भलेही सगळ्याच काही सुखावह नसतील; पण त्यांची सोबत घडताना उगीचंच आपण आपल्यापुरते वेगळे असल्याचा भास होतो. सोबत करणारी प्रत्येक आठवण जगण्यावरील श्रद्धा वाढवत जाते. पाडगावकरांच्या ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या ओळींना आपलेपणाचा ओलावा लाभतो. नियतीने नमूद केलेल्या वाटेवरून चालताना गतकाळ बनून विस्मरणाच्या कोशात शिरलेल्या आठवणींना आशेचे अंकुर येऊन आपलेपण आणि आस्था निर्माण होत जाते. विज्ञानतंत्रज्ञानानेमंडित जगात माणसांच्या जीवनाचे आयाम बदलले. भौतिक जगणं समृद्ध झालं. जगणं समृद्ध करणाऱ्या आठवणी हाच सुखाचा प्रवास असल्याचे अनेकांना वाटते. बदलणाऱ्या काळाच्या प्रवाहांनी अनेकांच्या जगण्यात संपन्नता आणली असेलही; पण त्यापासून थोडे दूर जाऊन आपण आपल्याला एकदातरी पाहावेसे वाटते का? स्वतःच स्वतःला तपासून घेणे घडते का?

जीवन प्रवासातील काही पाने उलटून शोधताना लहानपणातील माझा मी कुठेतरी संकोचून उभा असलेला दिसतो. परिस्थितीशरण जगणं आपलं म्हणणारा आणि त्यातही आपलं लहानसं जग शोधणारा. परिस्थितीने भलेही अनुकूल दान पदरी घातले नसेल, सुखाच्या रंगांची उधळण जगण्यात झाली नसेल; पण स्वतःला तपासून पाहताना नियतीने रेखांकित केलेल्या जगण्यातील आठवणींची श्रीमंती आज खूप मोठी वाटायला लागते. मनःपटलावर आजही त्या आठवणींची सुखद गोंदणनक्षी साकारते. काळाच्या गणिताची समीकरणं सोडवत जातांना उत्तराच्या छोट्याशा ठिपक्याजवळ येऊन पोहचल्यावर माझा मी दिसतो; अगदी बिंदूमात्र, तरीही आपल्या केंद्रस्थानी असंख्य रेषा सामाऊन घेणारा. त्या लहानशा बिंदूला सिंधू होण्याचे स्वप्न देणाऱ्या अनेक गोष्टी समोर उभ्या राहतात. लहानसं का असेना, पण जगण्याला मोठं करणारं गाव आठवणीत चैतन्य घेऊन आजही उभं आहे. भलेतर माझ्या गावाला कुठलाही देदीप्यमान वारसा नसेल, कोणीही लिहिलेला गौरवशाली इतिहास नसेल. जमिनीच्या ज्या लहानशा तुकड्यावर ते वसले, तोच त्याचा भूगोल. गावाचा इतिहास कोणी घडवला नसेल; पण गावाने आमच्या जगण्याचा इतिहास घडवला. स्वतःचा भूगोल उभा करण्याइतपत सक्षम बनवले. आजही मनाचा एक हळवा कोपरा गावाच्या आठवणीनी गच्च भरलेला आहे. गाव, गावातील माणसे, त्यांचं जगणं, त्यांच्या जीवनातील संघर्ष, लहानमोठ्या संघर्षांनी पराभूत केलेली, कधी त्याच्याशी दोन हात करून विजयी झालेली माणसं, त्यांचे साधेपण, बेरकीपण, सण-उत्सव, जीवनविषयक आस्था, जगण्याला उद्दिष्ट देऊन आश्वस्त करणारी शेतं, गुरं-वासरं, शाळा, मित्र सारंसारं आपापला छोटासा कोपरा सांभाळून मनाच्या गाभाऱ्यात वसतीला आलेलं आहे. कुठल्याशा हळव्या क्षणांनी मनात रुजलेल्या आठवणींच्या झाडाच्या फांद्या थरथरतात. काळाचा वारा झुळूक बनून वाहतो, आठवणींचा गंध सोबतीला घेऊन येतो आणि आठवणींच्या गावास घेऊन जातो.

विद्यमानकाळाने कोणाला जे काही दिले असेल, नसेल. त्याची समीकरणे सोडवण्यात न गुंतता आपली वाट निवडून चालत राहावे लागते. स्मृतीच्या कोशात विसावलेल्या आठवणींवर साचलेली धूळ वर्तमानातला एखादा क्षण फुंकर घालून उडवून जातो. उडलेली माती गावाच्या मातीशी असणाऱ्या नात्यांची जाणीव करून देते. वाढत्या वयाचे देहाला आणि जगण्याला पडणारे बंध विसरून मन स्मृतीकोशात विसावलेल्या क्षणांना सोबत घेऊन येते. काळाचा पडदा दूर करीत एकेक क्षण आठवणींचा देह धारण करून समोर उभे राहतात. वारा प्यालेल्या वासरासारखे उनाड मन मित्रांसोबत हुंदडत राहते. शाळा नावाचा अप्रिय प्रकार टाळून उन्हा-पावसाची तमा न करता रानोमाळ चिंचा, बोरे, कैऱ्या जमा करीत फिरणारे, शेतातून टरबूजं, काकड्या, शेंगा चोरून खाण्यात आनंद शोधणारे, माळावर विटीदांडूच्या खेळात रमणारे, नदीच्या पाण्यात पोहण्यासाठी पालकांची नजर चुकवून पळणारे, कधी आगाऊपणाची परिसीमा घडून मार खाणारे आणि तेवढ्यापुरते रडून घेऊन पुन्हा घराबाहेर पडून रात्री उशिरापर्यंत लपाछपी खेळणारे क्षण मनःपटलावर आकृत्या कोरीत जागे होतात. जीवनाच्या झाडावर आठवणींचे एकेक कोंब अंकुरित होऊ लागतात. गावात भलेही तेव्हा विजेच्या दिव्यांचा प्रकाश नसेल; पण त्या अंधारातही आपल्या आस्थेचा काजवा हाती घेऊन समाधान शोधणारे क्षण आठवणींचा नितळ प्रकाश घेऊन मनाचं आसमंत उजळून टाकतात.

आठवणींच्या काजव्यांना सोबत घेत दिसामासांनी मोठे होत गेलो. मनाचे आकाश विस्तारत गेले. शाळेच्या आणि जीवनाच्या एकेक परीक्षा देतांना आयुष्याचे एकेक वर्ष कमी होत गेलं; पण सरणाऱ्या त्या वर्षांनी आठवणींचा एकेक अनमोल ठेवा मनाच्या खजिन्यात जमा होत गेला. ते पाथेय सोबत घेऊन जीवनाचा नम्र शोध घेण्याइतपत मन त्यांनी घडवलं. मनाचा एका कोपऱ्यात शाळा आजही विसावलेली आहे. भलेही त्या शाळेला चकचकीतपणाचा स्पर्श नसला घडेल, सर्व सुविधांनीयुक्त असल्याचे भाग्य नसेल लाभले; पण मातीच्या घरांमध्ये असणाऱ्या शाळेने मातीशी असणारी नाळ कधी तुटू दिली नाही. दहावीच्या परीक्षा तेव्हा आमच्यापुरते एक थ्रील होते. आजच्यासारखी परीक्षाकेंद्रे स्थानिक नसायची. कुठेतरी नेमून दिलेल्या परीक्षाकेंद्रावर जाऊन परीक्षा द्याव्या लागत. आमचे परीक्षाकेंद्र शेजारच्या गावाला. तराफ्यावर बसून तुडुंब भरलेली नदी पार करीत परीक्षेचे पेपर द्यायला जावे लागे. तराफ्यावर बसून नदी पार करण्याऐवजी अंगावरील कपडे सोबतच्या मित्रांच्या हाती कोंबून पोहत पैलतीर पार करण्याचा आनंद परीक्षेच्या पेपरचे दिव्य पार करण्यापेक्षा मोठा असायचा. पेपरसाठी असा अवघड प्रवास करून जाण्याचे चिरंजीव क्षण आमच्या गावातील पुढच्या पिढ्यांसाठी इतिहास झाले आहेत. परीक्षेसाठी दुसऱ्या गावी जाण्याचे भारावलेपण केवळ आठवणीतूनच उरले आहे.

शिक्षणाचे मोल फारसे माहीत नसणाऱ्या आणि तेवढे गांभीर्य नसणाऱ्या परिसरातून शिक्षणाच्या वाटेने शहराच्या रस्त्याला लागलो. अकरावीला तालुक्याच्या गावी असणाऱ्या कॉलेजला प्रवेश घेतला. महाविद्यालयातील शहरी मुलामुलींसमोर पहिल्यांदा उभं राहताना वाटणारा कमीपणा आजही आठवतो. त्यांचं छानछोकीचं राहणं, बोलणं पाहून मनात कॉम्प्लेक्स निर्माण झाला. त्यांच्यासमोर अगदी बावळट वाटत होतो. शाळा शिकताना शिलाईतून उसवलेले अन् फाटले म्हणून ठिगळ लागलेले कपडे वापरण्यात कधी कमीपणा वाटला नाही. कारण आसपास सगळेच तसे असायचे. फुलपँट परिधान करण्याचं सौख्य आयुष्यात पहिल्यांदा अकरावीत असताना लाभलं. गावाहून ये-जा करीत शिक्षण घडत होतं. खेड्यातून शिकणाऱ्या आमच्या पिढीला घडवण्यात कोणाचे योगदान काय असेल, नसेल ते असो; पण आमचा शैक्षणिक प्रवास घडला तो एस.टी. महामंडळाच्या बसेसने. बसच्या पासची सवलत घेऊन खेड्यात वाढणारी आमची पिढी घडली, असे म्हटले तर ते अतिशयोक्त ठरू नये. आजही वाटते, या बसेस नसत्या तर आम्ही सगळे एवढे शिकलो असतो का? कारण जगण्यावर पैसे खर्च करायचाच प्रश्न मोठा होता, तेथे शिक्षणावर खर्च करायचा विचारही करणे अवघड होते. एस.टी.च्या सवलतीच्या पासेसने आम्हाला शिक्षणाच्या इयत्ताच पास केल्या नाहीत, तर जगण्याच्या परीक्षेत पास होण्यासही पात्र बनवले.

तेव्हाचा सिनेमा आठवणीत अजूनही विसावलेला आहे. थिएटरमध्ये पिक्चर पाहणे एकमेव पर्याय असायचा. आजच्यासारखे टीव्ही, डिश, व्हीसीडी, मोबाईल, इन्टरनेट वगैरे काही साधनं नव्हते. तिकीट घेण्यासाठी रांगा लागलेल्या असायच्या. त्या गर्दीत मुसंडी मारून शिरण्यात केवढे साहस वाटायचे. गर्दीत अंगाचा चोळामोळा करून हाती लागलेली तिकिटे आनंदप्राप्तीचे टोक असायचे. सिनेमा पाहताना त्यातील संवादांना पडणाऱ्या टाळ्या आणि शिट्या, गाण्यांवर थिएटरात चाललेला सामुहिक नर्तनाचा प्रयोग आजूबाजूचे भान विसरायला लावायचा. आवडत्या गाण्यासाठी खिशातून हाती लागणारी वीसपंचवीस पैशाची नाणी पडद्याकडे सहज भिरकावली जायची. कोणीतरी आधीच तो सिनेमा पाहिला असला की त्याची रनिंग कॉमेंटरी सुरु असायची. पुढच्या सीनविषयी आधीच त्याच्याकडून सांगितल्या जाणाऱ्या आणि नकोशा वाटणाऱ्या प्रतिक्रियासह सिनेमा पाहण्यातही एक वेगळाच आनंद असायचा, तो आजच्या मल्टिप्लेक्समधील आधुनिक सुविधांमध्ये कसा मिळेल! कॉलेजमध्ये न जाण्याची अनेक कारणं असायची, त्यात ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’, हे एक असायचे. या पहिल्या शोची गोडी काही अवीट असायची. रिलीज होऊन वर्षभराने एखादा सिनेमा लागला असला तरी नुकताच रिलीज झाल्याच्या आनंदात तो पाहिला जायचा.

अमिताभ, जितेंद्र, राजेश खन्ना यांचे सिनेमे पाहण्याची कारणं भिन्न असली तरी हेच हिरो आपणास आवडतात, यावर बऱ्याच जणांचे एकमत असायचे. रेखा, रीना रॉय, माधुरी दीक्षित सौंदर्याच्या परिभाषा होत्या. सिनेमा आनंदासाठी पाहणे हाच एकमेव हेतू असायचा. त्याची कलात्मक, समीक्षणात्मक बाजू कोणती आणि तसे सिनेमे कोणते, हे कोणाच्या गावीही नसायचे. आवडते सिनेमे पाचसहा वेळा पाहणारे अनेक वेडेपीर आमच्याकाळी सहज सापडायचे. सिनेमे पाहण्यासाठी हजार पर्याय शोधले जायचे. कॉलेजला दांडी मारणे घडायचे; पण कॉलेजात विद्यार्थी संख्याच मर्यादित असल्याकारणाने आगाऊपणा करणाऱ्या टोळक्याकडे काही प्राध्यापकांचे खास लक्ष असायचे. त्यांच्या नजरेतून निसटून दांडी मारणे, आगाऊपणा करणे फार मोठा पराक्रम वाटायचा. बाईक्स, मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप ही व्यवधाने नसल्याने जगणं सहजपणाचं असायचं. चुकून एखाद्या दिवशी वर्गातील कोण्या मुलीने वही मागणे त्या दिवसापुरता कुंडलीतील आनंदयोग असायचा. कट्ट्यावर बसून फेसबुकचा संवाद नसायचा. सारंकाही ‘फेस टू फेस’ असायचं. त्यात एक आपलेपण असायचं. थंडीच्या दिवसात कॉलेजच्या पटांगणात शेकोट्या पेटवून चकाट्या हाणत बसण्याचा आनंद महागडे स्वेटर, ब्लेझर्स, शाली अंगावर परिधान करून कट्ट्यावर गप्पा करीत बसणाऱ्या आजच्या पिढ्यांना कसा मिळेल, निसर्गदत्त मिळणारे सहज सुख यांच्या ललाटी नाहीये! वाट्याला आलेला प्रत्येक क्षण जीवनासाठी काहीतरी देऊन जात होता. समृद्धीचे दान पदरी टाकून जात होता.

दिवस, महिने, वर्षाची सोबत करीत काळ पुढे सरकत राहतो. आपल्या अस्तित्वाच्या काही खुणा मनात कोरून जातो. जीवन आपल्या वाटांनी माणसांना पुढे नेत राहते. उपजीविकेच्या क्रमसंगत मार्गाने प्रवास घडतो. कोण कुठे, कोण कुठे स्थिरावतो. त्या जगाच्या आठवणी मनात कोरत राहतो. जुन्यावर परिस्थितीची धूळ साचत जाते. कुठल्याशा निमित्ताने आठवणींच्या झाडाची पाने थरथरतात आणि आपलं मोहरलेपण आठवत राहतात. आठवणींचे एक गाव प्रत्येकाच्या मनात गजबजलेले असते. त्याच्या बऱ्यावाईट स्मृती असतात. त्या टाळता नाही येत. त्यांची संगत करीत नियतीने निर्धारित केलेल्या पथावरून पावले चालत असतात. कोणत्यातरी अवचित क्षणी गगनभरल्या आठवणींचे थवे मनाच्या गर्द झाडीत शिरतात. आठवणींचे गगन सोबत घेऊन माणूस त्याचं सदन उभं करीत असतो. स्मृतींची एकेक शिळा रचित त्याचा महाल उभा राहतो. त्याचं जग आणि जगणं संपन्न होत राहतं. निवांतपणाची सोबत करीत कधीतरी भावनांचे, विचारांचे थवे जागे होतात आणि आठवणींनी बहरलेल्या झाडावर जाऊन विसावतात. मंतरलेल्या क्षणांची सोबत घडत राहते. एकेक पाकळ्या उमलत जातात. आनंदाचं लेणं बनून आठवणींचं फूल जीवनाच्या वेलीवर उमलते. आपल्या अंगभूत सौंदर्याने आणि गंधाने आसपासचा आसमंत गंधित करीत राहते. स्मृतींची सप्तरंगी इंद्रधनुष्ये मनावर कमान धरतात. विचारांच्या वेली मांडवभर पसरून वाढत राहतात. ऊन-सावली, पावसाचा खेळ सुरु असतो. आठवणीच्या झाडाला सचैल स्नान घालीत जगलेले क्षण रिमझिम बनून बरसत राहतात, चिंब भिजवत राहतात. पहाटेच्या प्रसन्न प्रहरी फुललेल्या फुलांचा गंध साकोळून वाऱ्यासोबत वाहत राहतात. कधी पाण्याचा ओहाळ बनून झुळझुळतात. कधी आकाशात चमकणाऱ्या चांदण्यांशी गुजगोष्टी करीत राहतात. झाडावेलींच्या पानांवर जलबिंदू बनून मोत्यासारख्या चमकत राहतात. त्या कशाही असल्या तरी त्यांची सोबत घडत राहते. असतील तशा स्वीकारून माणसांची जीवनयात्रा अनवरत सुरु असते. आठवणींच्या बहरलेल्या झाडावर क्षण, दोन क्षण स्मृतींचे पक्षी येऊन विसावतात. चिवचिव करीत जीवनाचे गाणे गात राहतात.

8 comments:

 1. Very nice thought sir... akshita jain

  ReplyDelete
 2. आठवणी आमच्या जीवनपथावरील शिदोरी आहे़ हवी तेव्हा चाखा.बांधून ठेवा.पुन्हा हवी तेव्हा उघडा.

  ReplyDelete
  Replies
  1. होय, त्यांची सोबत करीत चालणे घडते.

   Delete
 3. वैभव पवार2 September 2015 at 11:37

  सर ....आजही जेव्हा माझ्या पिढीतील मुलामुलींना तुमच्या पिढीकडून ही गावाकडची माती अन् त्या मातीत अनुभवलेले बालपण याबाबत सांगितले जाते, तेव्हा नेहमी मनात येते... हे शहरातले धावपळीचे ,यांत्रिक जीवन आमच्याच वाट्याला का? गावाची ती काळी माती, तो निसर्ग, ती माणसं आमच्यासाठी फक्त सुट्ट्यांमधील चार दिवसांच्या दिलेल्या भेटीपुरतेच मर्यादित राहिले आहे का ?

  ReplyDelete
  Replies
  1. का? कारण - कालगती.
   काळ बदलतो पण भावना, संवेदनांना मातीच्या स्पर्शाचा ओलावा असला की, वाटयास आलेले चार क्षणसुद्धा चिरंजीव करता येतात.

   Delete
 4. Khup chan ahe sir
  shivani

  ReplyDelete
 5. मन भरकटतय जगू कसा?..
  काही आहे का उपाय..?.
  मो.नंबर.9075281434
  क्रुपया कळवा😇..

  ReplyDelete