अपग्रेड तर राहावंच लागतं, नसेल तर व्हावं लागतं. मग तो माणूस असो, त्याने निर्माण केलेली व्यवस्था अथवा अन्य काही. सगळ्यांनाच बदलाच्या वाटेने वळतं व्हावं लागतं. नुसता बदलच पुरेसा नसतो, तर प्रगतही व्हावं लागतं. एवढं कशाला काळालाही अपग्रेड नाही करता आलं तर तोही सोकावतो. आठवणीतून कोमेजतो अन् विस्मरणाच्या वाटेने वळतो. अपग्रेड होणं म्हणजे नेमकं काय? फार अवघड नाही याचं उत्तर. पण कृतीत आणणं बऱ्यापैकी मुश्किल असतं. माझ्यातील न्यून कणाकणाने वेचत राहणे अन् वैगुण्ये क्षणाक्षणाने कमी करत जाणे म्हणजे अपग्रेड होणे. हे कण अन् क्षण कळले की, अन्य परिभाषा पहाव्या नाही लागत. आपण आपल्याला पडताळून पाहता आलं तरी पुरेसं असतं.
परिस्थितीचे किनारे पकडून सरकणारा जीवनप्रवाह जगणं समृद्ध करणारा असावा. आयुष्याचा अर्थ शोधण्यासाठी पुढे पडणाऱ्या प्रत्येक पावलांचा प्रवास वर्धिष्णू असावा. अपेक्षा तर हीच असते सगळ्यांची. अन् सार्वकालिकही. पण परिस्थिती प्रत्येकवेळी अनुकूल असेलच असं नाही. पावलांना पुढच्या वाटा दिसाव्या. नजरेला क्षितिजांनी खुणावत राहावं. प्रतिसादाच्या पथावर पडलेलं धुक्याचं पटल पार करण्यासाठी चालता चालता आपणच आपल्याला गवसणं म्हणजे अपग्रेड होणं. काल आणि आज यात असणारं अंतर अन् या अंतराला पार करताना करावे लागणारे सायासप्रयास म्हणजे अपग्रेड होणं. उद्याच्या कुशीत असलेली सुखे वेचण्यासाठी कूस बदलणं म्हणजे अपग्रेड होणं असतं. नाही का?
जगण्याचे सोहळे असतात, तसे आयुष्याचे ऋतूही. त्यांना प्रांजळ प्रतिसाद देता येणं असतं अपग्रेड होणं. ऋतूंच्या सोबत बहरता यावं म्हणून सृष्टीने कोरलेल्या रंगांना समजून घेणं म्हणजे अपग्रेड होणं असतं. पाण्यासोबत वाहताना लाटांशी सख्य साधत किनाऱ्यांशी गुज करता येणं म्हणजे अपग्रेड होणं. पहाटेच्या प्रसन्न प्रहरी पाखरांच्या गळ्यातून येणाऱ्या गाण्यांना प्रतिसाद देणं म्हणजे अपग्रेड होणं. वाऱ्यासोबत वेडीवाकडी वळणे घेत वाहता येणं असतं अपग्रेड होणं. पावसासोबत रिमझिम बरसणं, ढगांसोबत कोसळणं, विजांसोबत लख्ख चमकणं असतं अपग्रेड होणं. फुलांसोबत गंध बनून विहरत राहणं म्हणजे अपग्रेड होणं. झाडावरून पिकलेल्या पानासारखं कोणतेही आसक्ती मागे न ठेवता देठ सोडून निखळपणे निखळणं अन् कोवळ्या कोंबातून नव्याने उगवून येऊन डहाळ्यांवर हसत राहणं असतं अपग्रेड होणं. न निरोपाचं दुःख, ना आगमनाचा आनंद. आहे केवळ बदलणं. बदलासाठी नव्या वळणाकडे वळणं म्हणजे अपग्रेड होणं असतं. नितळपणाचे साज लेवून विहरणाऱ्या लेकराच्या निर्व्याज जिज्ञासेत सामावलेलं असतं ते. कुतूहलाने ओथंबलेल्या त्याच्या डोळ्यात एकवटलेलं असतं. निसर्ग सहजपणाचे साज घेऊन सजलेला असतो. त्यात कोणतेही अभिनिवेश नसतात. एक वळण पार केलं की, दुसऱ्यालाही तेवढ्याच आस्थेने साद देता येणं म्हणजे अपग्रेड होणं असतं. सहजपण जगण्यात सहजपणे सामावलं की, अपग्रेड होण्याचे ज्ञातअज्ञात अर्थ आपसूक समजतात. त्यांचे एकेक कंगोरे कळू लागतात. हे कळणं म्हणजे अपग्रेड होणं असतं.
मी अपग्रेड होतो म्हणजे काय. तर भौतिक सुविधांनी सजलेलं वितभर जग पाहून हरकतो. ते आपलसं करण्यासाठी यातायात करत राहतो. आवाक्यात असलेली, नसलेली सुखं अंगणी आणण्यासाठी धडपडत राहतो. या धडपडण्याला अपग्रेड असं म्हणतो. भौतिक सुखांना अपग्रेड करण्याच्या ओघात आंतरिक समाधानाला सोयीस्कर दुर्लक्षित करतो. नको असणाऱ्या किंवा आवश्यक असल्याच तर नगण्य गोष्टीना अपग्रेड करत राहतो अन् त्यातून हाती लागलेल्या चारदोन चुकार क्षणांना सुखाच्या व्याख्या समजतो. वास्तविक समाधानाचा जेथून उगम आहे, तो प्रवाह अपग्रेड करायचं राहूनच जातं.
मी घर अपग्रेड करून बंगला करतो. दुचाकी वरून प्रवास प्रतिष्ठाप्राप्त नाही वाटत, म्हणून चारचाकी आणून दारात उभी करतो. साधसंच पण आपलेपणाने सजलेलं घर समाधान नाही देत, म्हणून ते जमीनदोस्त करून बंगला बांधतो. नानाविध सुविधांनी मंडित करतो. एकाची आवश्यकता असेल तर गरज नसतानाही त्यात आणखी चार गोष्टी आणून पेरतो अन् समाधानाची रोपटी उगवण्याची प्रतीक्षा करत राहतो. गाडीचं नवं मॉडेल दाराशी असावं, मोबाईल अपग्रेड असेल तोच हाती दिसावा म्हणून कासावीस होतो. हवं ते आणि तेच हाती लागावं म्हणून नाना कवायती करतो. का करतो आहोत आपण एवढी कसरत याचा काडीमात्र विचार न करता जुळवत राहतो एकेक चौकटी. चौकटीची सूत्रे सापडणे म्हणजे अपग्रेड होणं नसतं, तर संदर्भांच्या साखळीतून सुटलेल्या सूत्रांचा शोध घेता घेता समष्टीला आपल्यात सामावून घेणाऱ्या चौकटींचा अन्वयार्थ कळणे म्हणजे अपग्रेड होणं असतं.
- चंद्रकांत चव्हाण
▪
अपग्रेड
बोन्साय
प्रलोभनांना लाथाडून तत्त्वांशी बांधील असणारी माणसे आत्मसन्मानार्थ उन्मादाच्या विरोधात उभी राहतात, तो क्षण माणूस म्हणून माणसावर विश्वास अधिक गहिरा करणारा असतो. अशी माणसे मानवकुलाचं वैभव असतात. त्यांच्या असण्याने माणूस असण्याचे संदर्भ सापडतात अन् संवेदनांचे अर्थ उलगडत जातात. पण असं कितीदा प्रत्ययास येतं? सहज नाही सापडत अशा प्रश्नांची उत्तरं. याचा अर्थ कणा असलेली माणसे आसपास नसतात असं नाही. ती असतात. पण त्यांचं असणं अभावाच्या आसपास रेंगाळत असतं. म्हणूनच कणा सलामत असणारी माणसे अनेकांच्या आस्थेचा विषय असतात. एकांगी विचारांनी विहरणारी अन् स्वकेंद्रित वृत्तीने वर्तणारी माणसे कोणाला प्रिय असतील? माणसे मोठी असली, अगदी हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करणारी असली, पण त्यांच्या विचारविश्वाला ग्रहण लागलं असेल, तर आत्मसन्मान आबाधित असणाऱ्या वितभर माणसांसमोर टीचभर वाटू लागतात.
बोन्साय कुंड्यातच शोभून दिसतात. ती देखणी वगैरे दिसत असली, म्हणून वाटेवरून चालत निघालेल्या पांथस्थाला क्षणभर सावली देण्याचं भागधेय त्यांच्या ललाटी नियतीने कोरलेलं नसतं. त्याच्या विस्ताराचं विश्व कुणीतरी कोरून दिलेल्या परिघाएवढं असतं. मातीशी असलेलं सख्य मुळं विसरले की, विस्ताराचे परीघ हरवतात. प्रवास सीमांकित झाला की उंची हरवते. मूल्यांमधून माणूस सुटला, की विचारांचं विश्व आक्रसत जातं. सीमा संकुचित होत जातात. एकवेळ माणूस हरवला तर शोधून आणता येईलही, पण जगण्यातून संवेदनांनी काढता पाय घेतला की मुक्कामाची ठिकाणे हरवतात. नीतिसंस्कारांनी निरोप घेतला अन् मूल्यांनी पाठ फिरवली की, माणूसपणाच्या कक्षा विस्ताराचे अर्थ विसरतात.
मूल्यांमधून माणुसकी वजा केली की, हाती उरतं केवळ एक शून्य ज्याला आकार तर असतो, पण विस्तार नसतो. तत्त्व केंद्रस्थानी असलेली माणसे विचारांच्या विश्वात विहार करतात. त्यांचं असणं आश्वस्त करणारं असतं. वैयक्तिक स्वार्थासाठी कुलंगड्या करणारी माणसं आसपास असणं अस्वस्थ करणारं असतं. अविचारांशी लढावं लागलं की, विचारांचं महत्त्व अधोरेखित होतं. वेदना प्रखर होतात, तेव्हा सहनशीलता शब्दाचे अर्थ कळतात. वैयक्तिक स्वार्थापायी समाधानाला तिलांजली देणारी माणसे कितीही निकट असली, तरी नकोशी वाटतात. स्वतःला सजवायच्या सगळ्या संधी सहजपणे हाती असतानाही केवळ इतरांच्या सुखांचा विचार करून, स्वार्थाच्या सीमा पार करता येतात त्यांचं जगणं अधिक देखणं असतं.
समर्पणाचा प्रवास कधीच एकेरी नसतो. स्वार्थप्रेरित विचारांनी स्वीकारलेल्या मार्गाने प्रवास घडताना परतीच्या शक्यता धूसर होतात. प्रत्येक वेळी, प्रत्येकाला समंजसपणे वागता येईलच असं नाही. पण संवेदना जाग्या ठेवता येणं काही अवघड नसतं. संवेदनांचे किनारे पकडून प्रवास करता आला की, स्नेहाचे संदर्भ उलगडत जातात. त्यांच्या शोधात वणवण नसते. असतो केवळ आपलेपणाच्या ओलाव्याचा शोध. स्वार्थ हाच जगण्याचा मार्ग वाटू लागला की, संस्कार, संस्कृती वगैरे गोष्टी पुस्तकांपुरत्या उरतात. आपलेपणा विसर्जित झाला की, नाती आशय हरवून बसतात. आपणच आपल्या विश्वात विहार करू लागलो की, आस्थेचा परिमल घेऊन वाहणारे वारे दिशा पालटतात. झुळूझुळू वाहणारे स्नेहाचे झरे आटतात. नात्यातील नितळपण जतन करता यायला हवं. मनाच्या शांत जलाशयात भिरकवलेला अविश्वासाचा एक धोंडा तळाशी साचलेली धूळ जागी करून ढवळून काढतो.
आस्था दोनही किनारे धरून वाहत असते. ती कधीच एका काठाने प्रवास करत नसते. किनारे प्रवाहाशी कधीही प्रतारणा नाही करीत. सामावून घेतात आपल्या कुशीत. नात्यांतील अंतर कलहनिर्मितीचे कारण असू शकतं. प्रत्येकवेळी सयुक्तिकच असेल, पर्याप्त असेल असं नाही. माणसे दुरावतात. कारणे अनेक असतात. त्यांचा शोध घेता येतो. त्यांची पर्याप्त उत्तरे मिळतीलच, याची शाश्वती नसते. वर्तननीती प्रघातनीतीच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करायला लागली की, प्रघातनीतीला प्राक्तन मानणाऱ्यांना वेगळ्या वाटा शोधण्याची आवश्यकता नाही राहत. वेगळं विश्व शोधू पाहणाऱ्यांच्या हाती विकल्प अबाधित असतात. असणे आणि नसणे दरम्यान एक संदेह असतो. तो कळला की, आयुष्याचे एकेक अर्थ उलगडत जातात. स्वार्थाभोवती प्रदक्षिणा घडू लागल्या की, पर्यायांचा प्रवास संपतो अन् पर्याप्त शब्दाचे आयुष्यातले अर्थही आपसूक हरवतात.
चंद्रकान्त चव्हाण
••
तो, ती आणि...
कुणीतरी मी :
तो आणि ती एक मात्रा, एक वेलांटीची सोबत करीत लेखांकित केलेली वर्णमालेतील केवळ अक्षरे, की कुणीतरी कुणाला अधोरेखित करण्यासाठी आकलनाच्या प्रतलावरून प्रवास करणारे शब्द, की अर्थाचे आणखी काही आयाम घेऊन येणारे संदर्भ, की आणखी काही? काहीही असो, पण कधी कधी काही अक्षरांना अक्षय आशय प्राप्त होतो एवढं नक्की. कुण्या अज्ञाताने कसल्याशा कारणाने कधीकाळी कुठल्यातरी शिलाप्रस्तरावर कोरलेली अक्षरे ध्यानीमनी नसताना हाती लागतात अन् काळाच्या कोपऱ्यात गाडले गेलेले संदर्भ नव्याने उलगडत जातात. विस्मृतीच्या निबीड अंधारातून कवडशाचा हात धरून विसकटलेले प्रसंग, विखुरलेले संदर्भ चालत येतात आपल्यापर्यंत, कुठलीतरी कहाणी सोबत घेऊन. विस्मृतीच्या कोशात विसावलेले अध्याय नव्याने वाचले जातात अन् आशयाच्या अथांग डोहात विहार करीत राहतात. जगण्याच्या वाटेवर अशा किती गोष्टी हरवल्या आणि गवसल्या असतील, ते इतिहासाच्या पानात पहुडलेल्या काळाच्या तुकड्यांनाच माहीत. प्रक्तानाने परेलेल्या वाटेवर चालून थकलेले, हताश झालेले, हरलेले, जिंकलेले, जिंकूनही हरलेले, हरूनही जिंकलेले असे कितीतरी तो आणि ती काळाच्या अफाट विवरात सामावले असतील. काही कायमचे हरवले, काही हरवून गवसले. गवसले त्यांना काळानेच चिरंजीव केले. पण सगळ्यांच्या ललाटी नियतीने अनुकूल अभिलेख लेखांकित केलेले नसतात.
तो आणि ती एकाच पथावरून मार्गस्थ झालेले पथिक की, पात्राच्या मर्यादांचे तीर पकडून समांतर सरकणारा प्रवाह. वाहणे सोबत, पण कधीही एक न होणारे. की प्रवाहात पडल्याने काही काळ सोबत करीत निघालेले, पण उसळत्या लाटेच्या आघाताने विलग होऊन अनामिक दिशेने ढकलले गेलेले. वाहणे होते, पण सामावणे नव्हते. की वावटळीच्या आवर्तात अडकून नुसतेच दिशाहीन भिरभिरत फिरणाऱ्या पानासारखे. यांच्या असण्या-नसण्याला कुणी काही म्हटले, तरी त्याने फार फरक नाही पडत. काळाच्या मनातील गणिते काही वेगळीच असतात. तो त्याच्या मर्जीने सोंगट्या सरकवीत असतो.
तो आणि ती काही कोणी वेगळे नव्हते अन् अलौकिक वगैरे तर नव्हतेच नव्हते. चारचौघांसारखे आणि चारचौघातले एक. पण शोधलं तर चारचौघांपासून वेगळे. हे वेगळेपणही निकषांच्या पट्ट्या घेऊन पडताळून पाहिलं तर निराळे आणि नाहीच पाहिलं, तर सामान्यांसारखे. समजा घेतलाच जाणीवपूर्वक आणखी थोडा धांडोळा, तर यांचं चारचौघांपासून वेगळं असणं, हीच त्यांच्या वेगळेपणाची ओळख. असं काय वेगळं होतं यांच्यात?
आता वेगळंच करायचंच आखून घेतलेल्या चौकटींतून, तर तो आणि ती किंवा ती आणि तो जोडी कुठल्याही क्रमसंगतीने जुळवली तरी उत्तर एकच येणारये, मग यांना वेगळं करण्यासाठी एवढी कवायत करण्याची आवश्यकताच काय, असा प्रश्न साहजिकच मनात येईल. यांच्या असण्याला निर्देशित करणाऱ्या अक्षरांच्या कानामात्रावेलांटीला वेगळं म्हणायचं इतकंच. असंही सांगता येईल. अर्थात, असं म्हणणंही अवास्तव नाही. पण तरीही हे वेगळेपण यांना पुन्हा एकाच अक्षावर आणून उभं करणारंच आहे, नाही का? खरंतर दोघांनाही दोन वाटांनी येऊन एकाच वळणावर आणून विसावणारं.
यांचं सोबतीने जुळणं ठरवून निवडलेला प्रवास होता, निव्वळ योगायोग होता, की नियतीने नियत केलेला मार्ग होता, की निसर्गाने त्याच्या नियमांचे अनुमान काढण्यासाठी केलेल्या प्रयोगाची पात्रे होती ही? यातील नेमकं एकच एक कारण सांगणं अवघड. म्हणून प्रत्येकाने आपआपल्या आस्थेने अर्थाच्या आशयाला अधोरेखित करणं अधिक सयुक्तिक. पण एक मात्र नक्की की, यापैकी नक्कीच काहीतरी होतं. या काहीतरी शब्दात बरंच ‘काही’ सामावलेलं. सरळ रेषेत बघायची सवय असणाऱ्या नजरेला हे दिसणं जरा अवघड.
सरळसरळ सांगायचं, तर तो आणि ती आपणास एकमेकांसाठीच घडवलं आहे, असं समजण्याचा प्रमाद करीत होते. अनेक जण करतात. यांनीही केला. पण घडणाऱ्या प्रमादाला एक देखणी किनारही होती. वर्तनात संकेतांच्या चौकटीं पार करून प्रवास करू पाहणारे पर्याय होते, पण विचारांत विचलित करणारा संदेह नव्हता. यांच्या नजरेला नितळपण लाभलं होतं, पण पाहणाऱ्यांच्या नजरांना ते मिळालं नव्हतं. म्हणून की काय कुतूहलाची उद्गारचिन्हे अंकित व्हावीत, तिथे संदेहाची प्रश्नचिन्हे अधिक ठळक होत होती.
अडीच अक्षरांची सोबत करीत प्रकटणारा एक आशयघन शब्द - प्रेम. अर्थाचे किती पदर. संदर्भांच्या किती कोमल कळ्या. आशयाच्या किती उत्फुल्ल पाकळ्या. आकलनाचे किती बिंदू. जगण्याचे किती अर्थ या एका शब्दांत सामावलेले आहेत. याच्या संदर्भांच्या पाकळ्या उलगडतात, ते शहाण्यांच्या जगात उगीचच वेडे ठरतात. असं वेड मुळात आतच असायला लागतं. एकदाका ते धमन्यांतून वाहू लागलं की, थांबायला अवधी असतोच कुठे. हा प्रवास मेंदूपासून मनाकडे नाही घडत. याचा आरंभ मनातून होतो आणि अंत मनातच. म्हणूनच की काय भावनांच्या आवेगात अवरुद्ध झालेल्या मनाने घेतलेल्या निर्णयांना चुकण्याचा शाप असावा.
मनातल्या मनात समीप राहण्याचं प्रत्यंतर प्रेमात पडलेल्यांना प्रत्येक पळी येत असावं. असतं. प्रेमात पडणं कदाचित अपघात असू शकतो. कुणाच्या मते गफलत असू शकते. कुणासाठी समस्या किंवा फार थोड्यांसाठी सुखांचं अंगणभर पसरलेलं चांदणं. काहींना हे सगळं अविचार वगैरे वाटेल. कोणाला काय, आणखी कोणास काय. पण या परगण्यात विहार करणाऱ्यांना एवढा विचार करायला उसंत असतेच कुठे. समजा, असली तरी उमजून घेण्याएवढं शहाणपण मोहर धरलेल्या ऋतूची सोबत करताना उरलेलं असतंच कुठे.
तर, तो आणि ती उमलत्या वयाच्या झुल्यावर स्वार होऊन आभाळाला हात लावू पाहत होते. वाऱ्यासोबत गाणी गात होते. पावसात भिजत होते. फुलांसोबत खेळत होते. पाखरांसोबत उडत होते. फुलपाखरांच्या पंखात रंग भरू पाहत होते. उगवत्या सूर्याच्या कोमल किरणांच्या वर्षावात नाहत होते. चंद्राच्या प्रकाशात मनातलं गुज कथन करीत होते. चांदण्यांच्या सोबत बोलत होते. तीरावरील वाळूत मनोरथांचे मनोरे रचित होते. स्वप्नांच्या सप्तरंगी इंद्रधनुष्यावर झोके घेत होते. उगवणारा दिवस आनंदाची पखरण करायचा. संधिप्रकाशाचा हात पकडून आभाळाने मावळतीच्या क्षितिजावर रंगांची केलेली उधळण यांच्या अंतरी आस्थेचे किती किती रंग भरायची. काळोखाची चादर देहावर ओढून घेणाऱ्या रात्री सुखाच्या ओंजळी रित्या करायच्या. अलगद पावलांनी धरतीवर चालत येणारा अंधार कधी मनात उगीचच काहूर कोरायचा. मनात दाटून आलेल्या अनामिक अस्वस्थतेने कधी कातरवेळा कातरकंप करायच्या. अर्थात, हे सगळं वेडं असल्याशिवाय घडत नाही. म्हणून ते वेडेच होते. तो तिच्यासाठी, ती त्याच्यासाठी अन् दोघे एकमेकांसाठी.
त्याने तिला, तिने त्याला नजरेच्या वाटेने मनाच्या गाभाऱ्यात कधी सामावून घेतलं, काहीच आठवत नाही. नेमका आरंभ कुठून आणि कुणाकडून झाला? शोधूनही उत्तरे हाती लागली नाहीत. मग घडलंच कसं हे सगळं? असा कुठला चुकार क्षण होता, या हृदयाचे त्या हृदयी पोहचवणारा? अशी कोणती स्पंदने होती, एकच सूर छेडणारी? असे कोणते बोल होते, जे एकच गाणं गात होते? शोधणं अवघड आहे. खरंतर नाही सांगता येणार नेमकं, हे म्हणणं अधिक योग्य. पण कुठल्यातरी गाफील क्षणी हे घडलं अन् त्यांचे प्रत्येक पळ प्रतीक्षेच्या तीरावर संचार करीत राहिले.
प्रेमात पडायला वयाच्या चौकटी निर्देशित करणारा भाग वगैरे कारण असतो का? कदाचित नसावा. प्रेमपरगण्यात विहार करायला कसली आलीयेत मर्यादेची वर्तुळे! उमलतं वयचं वादळविजांचं. या स्वप्नाळू वयाच्या आसपास दोघेही. नवथर संवेदनांचे पंख लेऊन अवघं आकाश आपल्याला आंदण दिल्याच्या थाटात विस्तीर्ण निळाईत विहार करीत होते. तसं हे वयच झोपाळ्यावाचून झुलायचं. दोघेही झोक्यावर बसून आकाशाशी सलगी करू पाहत होते. त्यांना खुणावत होतं ते. मनाच्या अथांग विवरात लपलेल्या आकृत्यांचा शोध घेता घेता मनं कधी इकडची तिकडे गेली, कळलंच नाही. कळावंच कसं, कळण्याआधी वळावं लागतं ना! वळणाचा प्रवास वेग कमी करतो. वेगाशी सलगी करणाऱ्यांना सावकाश सरकणे रुचेल कसे? मनात विसावलेल्या वाटेने दाखवलेलं वळण त्यांनी निवडलं. धावले तिकडे. रमले. जगाच्या गतिप्रगतीच्या खुणांपासून कोसो दूर. भावनांच्या वर्षावात चिंब चिंब भिजत राहिले. किनाऱ्याच्या वाळूवर कोरलेल्या आपल्याच पदचिन्हांच्या नक्षीत भविष्याचे अर्थ शोधून पाहू लागले.
तो- देखणेपण नियतीकडून घेऊन आलेला. उजळ वर्ण. वर्णाला साजेसा देह. रेखीव चेहरा. त्यावर प्रसन्नतेची पाखरे सतत विहरत राहणारी. सरळ दिशेने चालत येऊन चेहऱ्यावर विसावलेल्या नाकाने देखणेपणाला अधिक आखीव केलेलं. डोळ्यांच्या डोहात अथांगपण सामावलेलं. उंची आणि देह देखणेपणाची गणिते आधीच करून निसर्गाकडून मागून सोबत आणलेले. देखणेपणाला घडलेला उमदेपणाचा संग. सहजसुंदर बोलण्याची मिळालेली देणगी समोरच्याच्या मनावर आपसूक गारुड करणारी. शब्दांच्या लाघवाने मंत्रमुग्ध होणारी मने परत परत मोहात पडावी असं वागणं. कदाचित काहींना नियतीच सुंदरतेचे साज चढवून इहलोकी पाठवत असावी.
ती- रंगरुपाने डावा कोण अन् उजवा कोण, याची तुलना करण्याचा मोह व्हावा असे दोघेही. पण त्याच्याशी तुलना करताना गौरकांती विशेषण तिच्याबाबत वापरता आले नसते. पण तिच्या सावळेपणातही एक आशयघन अर्थ दडलेला. नितळ अंगकांती शब्द तिच्या सौंदर्याचे परिमाण परिभाषित करायला पर्याप्त होता. वाऱ्याच्या संगतीने स्वैर खेळणारे काळेभोर केस. टपोऱ्या पाणीदार डोळ्यांमध्ये खच्चून भरलेलं खट्याळपण. धनुष्यालाही हेवा वाटावा अशा भुवया निसर्गानेच कोरून ठेवलेल्या. पापण्यांच्या पंखात दडलेली डोळ्यांची पाखरे सतत काहीतरी वेचत असायची. चाफेकळीने लाजून चूर व्हावे असे नाक. उमलत्या वयाची वाट पकडून येणारी बंधने झुगारून अवखळपणाचा झरा झुळझुळ वाहत होता. संमोहनाच्या बिंदूवर नेऊन उभं करणारं निखळ सौंदर्य. सहजतेची परिमाणे परत पारखायला लावणारं. देहाच्या आकृतीला कमनीय बांध्याचा लाभलेला घाट अन् या सगळ्या सरंजामासह जगण्यात सामावलेला बेधडकपणाचा थाट. कुठल्याही प्रसंगाला थेट भिडायचं धाडस. स्व-तंत्राने वर्तने. प्रसंगी काहीसं बेफिकीर असणं आणि तसंच जगणंही. कोण काय म्हणेल, म्हणून कधी काळजी न करण्याएवढा बिनधास्तपणाही.
मुग्ध वयाच्या वाटेने सोबत करीत निघाले दोघेही. मुक्कामाचे ठिकाण माहीत नसूनही चालत राहिले. आमंत्रण देणाऱ्या चोरट्या कटाक्षांपासून झालेला आरंभ आव्हानापर्यंत अन् तेथून आणाभाकांपर्यंत पोहचला कधी दोघांना कळलेच नाही. कधी कळत, कधी नकळत, कधी ठरवून घडणाऱ्या या प्रवासाचा विराम बिंदू काय असेल, त्यांनातरी नेमकं कुठे माहीत होतं? आस्थेचे अनुबंध विणले जात होते. अनामिक हुरहूर, आस, ओढ वगैरे शब्द आपला अंगभूत आशय सोबत घेऊन कोशात लपले. पण नवा आशय, नवे अर्थ दिमतीला घेत यांच्या जीवनकोशात अलगद येऊन सामावले कसे ते ना याला, ना तिला कळलं. ते समजून घ्यायची संधी मिळाली नाही, असं नाही. तिने साद घातली, पण यांना प्रतिसादाचा प्रतिध्वनी नाही होता आलं. वारंवार दस्तक देऊनसुद्धा त्याकडे पाहणे जमलेच नाही. समजून घ्यायची आवश्यकताच वाटली नाही. वाटेलच कशी? संकल्पनांच्या पटावर आपला सारीपाट मांडून खेळणाऱ्यांकडे इतर गोष्टी समजून घ्यायला तसाही अवधी असतोच कुठे? अनामिक स्पंदनांना आस्थेचं कोंदण मिळालं अन् अलगद पावलांनी चालत आलेल्या आपलेपणाने आपला अधिवास एकमेकांच्या अंतरी शोधला.
तो :
‘मनाची मनोगते मेंदूला बहुदा कळत नसावीत. कळली तरी वळत नसतात की काय, माहीत नाही! वळायचा प्रयत्न केला, तरी मन त्याला दाद देईलच असं नाही, हेच खरं.’ कुणीतरी असं काहीतरी सांगायचं, तेव्हा नवल वगैरे वाटायचं या सगळ्याचं. मला तरी कुठे ठाऊक होतं, असं काही माझ्या जगण्याचा भाग होईल एक दिवस म्हणून! प्रघातनीतीचे किनारे पकडून वाहणारा अनेकातला मीही एक. अगदी तंतोतंत मापात वगैरे नसलो, तरी चारचौघांसारखा. माझं वागणं याहून आणखी काय वेगळं असणार? गुंता जगण्याच्या वाटेवरील विकल्पविहीन पर्याय असावा बहुतेक. तसंही प्रत्येकाचे गुंते वेगळेच की! नावे निराळी, समस्या वेगळ्या असल्या म्हणून अर्थ नाही पालटत काही. तसेही जटिल गुंत्यात गुरफटणे कोणाला आवडेल? पण काही गुंतेच इतके लाघवी असतात की, ठरवूनही त्यांचा मोह टाळता येत नाही. भ्रमर कमलपुष्पांच्या मोहात अडकतोच ना!
खरं सांगायचं तर व्यवस्थेच्या अफाट पसाऱ्यात नजरेत भरण्याएवढ्या अस्तित्वाच्या ठळक खुणा भिंग घेऊन शोधूनही न सापडणारा मी एक. पण कसा कोण जाणे, या पडावावर पोहचलो. नजरेला नजर भिडली. विसावलेल्या क्षितिजावर एक पुसटसा बिंदू कोरला गेला. त्याच्या असंख्य शक्यतामधून एक रेघ ओढली गेली. कळत असेल अथवा नकळत, काही म्हणा, त्याने काही लक्षणीय फरक नाही पडत. पण माझ्या असण्यात फरक पडायला आरंभ झाला, जेव्हा ही रेघ नजरेत सामावण्याएवढी ठळक होत गेली. मोहाच्या मधुर ओढीने वाढत गेली. गुंत्याचे बहुपेडी गोफ विणले जात होते. धांडोळा घेऊनही उत्तरांची उकल करणारा धागा हाती लागत नव्हता. लाटा किनारा कवेत घेऊ पाहत होत्या. कोणत्या चुकार क्षणाने पारध झाली, माहीत नाही. पण घाव थेट काळजावर! तीव्रकोमल संवेदना घेऊन जखम वाहत राहिली. आपला किनारा शोधत राहिली. उसळता दर्या आपलासा वाटू लागला. त्याच्या उसळणाऱ्या लाटा आमंत्रित करीत होत्या. त्याची गाज सुरांचे साज लेऊन सजू लागली.
घरपरिवार, स्नेहीसवंगडी आदि नात्यांचे तीर धरून सरळ वाहणारा प्रवाह अनपेक्षित वळण घेऊन गवसलेल्या उताराच्या दिशेने वळता झाला. खुणावणाऱ्या क्षितिजाचे आकर्षण वाटू लागले. त्यावर देखणेपणाचा साज चढवणारे रंग आपलेसे वाटू लागले.
खरं सांगू, तिच्या अभिमंत्रित पाशात मन कधी कैद झालं कळलंच नाही! तिचा अटकर बांधा संवेदनांना आमंत्रित करू लागला. तिच्या मुखातून प्रकटणारा प्रत्येक शब्द सुरावटी वाटू लागल्या. तिचं पळभर दिसणंही मोरपीस बनून देहावरून फिरू लागलं. तिलाही याची जाणीव असेल का, म्हणून उगीचच स्वतःच स्वतःला हजार प्रश्न विचारू लागलो अन् उत्तरेही स्वतःच देऊ लागलो. तिच्या एका कटाक्षासाठी मन झुरणी लागायचं. नजरेचा ओझरता स्पर्शही किती आनंददायी वाटायचा.
सवंगडी सोबत असूनही त्यांच्या सोबत नसणारा मी तिची सोबत करता कधी झालो, कळलंही नाही. कायेने कोलाहलासोबतच असायचो, पण मनाने तिच्याभोवती. मकरंद मिळतो म्हणून मोहात पडलेल्या भ्रमरासारखा भटकायचो तिच्याच आसपास. मित्रांना हे सगळं दिसत नव्हतं, असं नाही. याची जाणीव झाल्यावर उगीचच विकतचं दुखणं घेऊ नको, म्हणून सावध करण्याचे का कमी प्रयत्न केले त्यांनी. सगळं सगळं सांगून पाहिलं. पण इशारा समजून घेण्याएवढे जागेपण असायला लागते ना विचारांत. ते तर कधीच हरवले होते माझ्या चिमूटभर जगण्यातून. त्यांच्या इशाऱ्यांकडे, सांगण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं. निमित्त शोधत राहिलो तिला पाहण्याचे, भेटण्याचे. भिरभिरणारी नजर तिलाच तर वेचत असायची.
अवखळ झऱ्यासारखी वाहत राहायची तीही. वाऱ्याच्या झुळकेसारखी अलगद यायची अन् हलकेच पसार व्हायची. तिच्या घरासमोरच्या रस्त्यावरून जाताना पावलं उगीचच मंदावयाची. डोळे शोधत राहायचे तिला इकडेतिकडे. तिला हे कळत नव्हतं का? नाही! सगळंच तिला माहीत होतं. तिनेच तर या वाटेवर चालायला आवतन दिलं होतं. परीक्षा शब्दाचा अर्थ चांगला अवगत होता तिला. अगदी प्रांजळपणे सांगायचं, तर माझ्या सहनशीलतेचा ती ठरवून अंत पाहत होती. तिचे विभ्रम अंतरी अनेक प्रश्न चिन्हांकित करीत होते. तिच्या गल्लीकडून जाण्यासाठी नसलेली निमित्ते शोधली जात. कुठलंही कारण तिथे रेंगाळायला पुरेसं असायचं. तिच्या नजरेचा ओझरता स्पर्शही किती सुखावह वाटायचा. मैत्रिणींसोबत बोलण्याचा बहाणा करून ती बघायची, तेव्हा मन किती सैरभैर व्हायचं. तिच्या चोरट्या कटाक्षाने देहावर उमललेला मोहर मनाचं आसमंत गंधित करायचा. कधी मी दिसलो की, आपल्याकडे कुणी पाहत नाही असं समजून उगीचच कुठल्याशा आडोशाचा आधार घेऊन बघायची. हे मला दिसत नव्हतं, असं नाही. पण मी तुझ्याकडे पाहिलेच नसल्याचे दाखवतांना केवढी कसरत व्हायची तिची.
मला कळत होतं, तसं तिलाही. काहीतरी अनामिक, पण मनातून हवं असणारं घडत होतं. एकमेकांपर्यंत पोहचायची वाट सहजी हाती लागत नव्हती. मनात अवकाळी वसंत बहरून आला. अगणित सुमने उत्फुल्लतेची वसने परिधान करून मनाच्या डाहळ्यांवर झुलत होती. वारा सांगावा घेऊन वाहत होता. पानाआड दडलेल्या कोकिळेचे कूजन आपल्यालाच साद घालीत असल्याचे वाटत होते. प्रतिसादाचा प्रतिध्वनी परिसराच्या परिघावरून उगीचच प्रदक्षिणा करीत होता. वारा झुरणी लागल्यासारखा वेडावून धावत होता.
उगवणारा सूर्य उमेदीच्या किरणांची पखरण करीत होता. बोचऱ्या थंडीत भेटीची ऊब शोधली जायची. गवताच्या पात्यांवरून ओघळणारे दवबिंदू हाती पकडून ठेवण्याचा वेडा मोह टाळता येत नव्हता. अगणित जलधारांचे हात पकडून बरसणारं आभाळ मनाचं आसमंत चिंब भिजवून जात होतं. माती तृप्ततेचा गंध घेऊन आसपास गंधित करीत होती. श्रावणातला ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ आमच्या वाटांना घनगर्द करीत होता. तरारल्या पिकांचा गंध गुजगोष्टी करू लागला. पौर्णिमेचे चांदणे देहावरून पखरण करीत होतं. शुष्क उन्हाळाही आठवणींच्या हव्याशा झळा घेऊन येत होता.
सांजसकाळ जगण्याचे नवे अर्थ शोधत राहिलो. मनात वाढणारं प्रेमाचं रोपटं ऋतूंसोबत बहरत राहिलं, आकाशाशी हितगुज करीत स्वप्ने पाहत. सृष्टीच्या सर्जनाच्या सोहळ्यात मी मुक्त विहार करीत राहिलो. पण पुढे काय? या प्रश्नाचं उत्तर शोधून पहावं असं कधी वाटलं नाही. सगळ्याच प्रश्नांची उत्तरे आमच्या ओलावलेल्या सहवासात सामावलेली असल्याचं वाटत होतं. प्रश्न अन् त्यांची उत्तरे आमची आमच्यापुरती हाती होती. पण नियती आपल्या हाती सूत्रे घेऊन खेळ खेळत होती याचं भान कधी राहिलंच नाही. राहीलच कसं, मनाने विचारांवर कधीच अंमल प्रस्थापित केला होता. आम्हांला विचारांचं सरळपण लाभलं होतं; पण व्यवस्थेला सहसा सरळ चालता येतं नाही, हे सत्य आम्ही सोयीस्करपणे विसरलो होतो. परिणाम व्हायचा तो झालाच...!
ती :
का, कधी, कसे, कशासाठी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी उगीचच शोधत राहिली. शोधण्यासाठी मनाची माती खोल खोल खोदत राहिले. पण एवढं करूनही उत्तरांचा एक तरी विकल्प हाती लागला का? नाही. कारण, विकल्प असतात, पण त्यांना पडताळून पाहावं लागतं याचंही भान असायला लागतं ना! आम्ही मनाने जागे होतोच कुठे. का केलं मी हे असं? अशी कोणती अनामिक आस मला त्याच्याकडे ओढून नेत होती? तो दिसावा म्हणून मन उगीच का झुरणी लागत होतं? आसपास एवढी सगळी माणसे असतांनाही याच्यातच असं काय होतं की, मी त्याच्याकडे ओढत गेली? मनापासून की मनाविरुद्ध?
आरंभ कदाचित अपघात असेल. पण चूक तर माझीही होती. प्रमाद घडायचा होता. घडला. त्याचे बरेवाईट परिणाम घडणारच होते. त्यासाठी कुणाला दोष देण्यात काय अर्थ आहे? या सगळ्या प्रकाराची अंधुकशीही जाणीव मनाला नसावी का? काय म्हणावे माझ्या अशा वागण्याला? परिणामांना सामोरे जाण्याची तयारी का केली नसेल मी? आज मन उगीच खंतावतंय. स्वतःवर चिडतंय. पण आता चिडून काय उपयोग! मनाला हजार वेळा बजावत होते. नाहीच या रस्त्याने धावायचं म्हणून संकल्प करीत होते. निर्धार करूनही त्याच्याकडे वेड्यागत धावत होते मी. हो, मीच! केवळ मीच कारण याला, म्हणून त्रास करून घेत होते. तो आवडला मला, बस्स! का आवडला? याचं उत्तर माझ्याकडे तेव्हाही नव्हतं आणि आजही नाही. बहुदा त्याच्याकडेही! पण काहीतरी खासच असेल ना त्याच्यात, म्हणून मनाला मोहिनी पडली! कुणीतरी गारुड केल्यागत त्याचीच मूर्ती मनाच्या कोऱ्या कातळावर कोरीत राहिली. आकार देणाऱ्या अनेक आघातांनी आखलेल्या या आकृतीच्या रेषा थोडीच मिटता येणार होत्या. नको मिटू देत! नकोच मिटायला! मला याच आकारात आस्थेचे अनुबंध शोधायचे होते. जगण्याचे ऋतू सांभाळून आयुष्याचे सोहळे साजरे करायचे होते.
तुला कदाचित नसेलही याची वार्ता. तसं आपण रोजच एकमेकांना दिसायचो. पण त्या दिसण्यात, पाहण्यात सहजपण होतं. वाढत्या वयाच्या वाटेने देहाला चैतन्याची पालवी फुटली. डाहळ्या शहारून आल्या. अंकुरणारी पालवी स्वप्नांचे अगणित रंग घेऊन सजू लागली. सजण्याचा सोहळा साजरा होत होता. स्नेहाचे साकव त्यावर कधी घातले गेलेत, समजलेच नाही. पावले त्या वाटेने कधी वळती झाली कळलंच नाही. आपणच आखलेल्या पथावरून धावताना धापा टाकत राहिले. वणवण करीत राहिले. आपलेपणाचा ओलावा शोधत राहिले.
वाऱ्याच्या संगतीने उडत आलेल्या बीजाने मातीत मुळं रुजवावी, तसं तुझं असणं माझ्या मनात, देहात रुजत गेलं. ओंजळभर ओलावा शोधत मुळं मातीला घट्ट बिलगावी तसा तू माझ्या असण्याला घट्ट वेढून राहिला. तुला हे सगळं कळलं, तेव्हा तू किती खुलून आला होतास अन् मी किती मोहरून! पुसटशा स्पर्शाने देहातून वीज सळसळून धावली. तुझ्या त्या थरथरत्या पहिल्या स्पर्शाने केलेली किमया मनातून कधीच मिटवता आली नाही. सगळं काही मार्गी लागूनही आज इतक्या वर्षानंतरही मी हे सगळं का विसरू शकत नसेल?
तुझ्या सहवासासाठी आसुसलेली मी...! आणि तू... तू नेहमीच अंतर राखून राहिलास. खरंतर तुझ्या गात्रांची थरथर मला जाणवत नव्हती, असं नाही. तुझ्या मनाची स्पंदने टिपण्याइतकी मी संवेदनशील नक्कीच होते. संमोहन शब्दाचा अर्थ मला कळत नव्हता का? की तुलाच तो अधिक समजला होता? बंधनांच्या चौकटी पार करून बाहेर पडण्याइतपत मी बेधडक होते का? की सारासार विचार करायचं विसरले होते? की मनाची मनोगते माझ्या भाववेड्या मनाला कळत नव्हती, म्हणून अविचाराने कृती घडत होत्या?
माझ्या अशा वागण्याचा तेव्हा तू कोणता अर्थ लावलास, हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. आज तू याला काय समजतो? तुलाच माहीत! पण मनांचा प्रवास जर सोबतीने घडत होता, तर मी मला एकटीला का म्हणून अपराधी मानावं? मनाच्या मातीतून उगवलेल्या रोपट्यांना मर्यादांच्या कुंपणाने तू बंदिस्त करू पाहत होता. जाणवणाऱ्या, पण न दिसणाऱ्या चौकटी तू रेषा ओढून आखून घेतल्या अन् त्यांना ओलांडण्यासाठी बाहेर पडणारे एक पाऊल कधी उचलले नाहीस. ही तुझ्या संस्कारांची आणि माझ्या मर्यादांची सीमा असेल कदाचित.
तू भेटत राहिलास. तुलाही ते आवडायचेच की! माझ्यासाठी तुला कासावीस होतांना पाहिले नाही, असे तुला वाटते का? तसं असेल तर तो तुझा गोड गैरसमज. या सगळ्यासाठी मी जितकी जबादार असल्याचे दिसते, तेवढंच तुझंही असणं नाही का? तू भेटत राहिलास. भेटण्यासाठी कधी मी हट्टाने तुला बाध्य करीत राहिली. तुझ्या खऱ्याखोट्या नकाराने भांडत राहिली. त्रागा करीत राहिली. तरीही तू शांतच असायचा. कसं जमलं तुला हे सगळं? तुझी घालमेल दाखवत नसला, तरी जाणवत होतीच. तुझ्या स्पर्शाची भाषा कळत होती. पण मन मानायला तयार होतंच कुठे?
वाहणाऱ्या वाऱ्याच्या झोक्यावर झुलणाऱ्या माझ्या केशसंभारात तू हरवत होतास. शेजारी लगटून बसताना कोसळण्याच्या कड्यावर उभा राहून सावरत होतास स्वतःला. हिरवाई घेऊन पळणाऱ्या पाउलवाटेने चालताना कायकाय विचार करीत होतास. शेतात भराला आलेल्या पिकांचा गंध वेडावलेपण देहात उतरवत होता. क्षितिजावर कमान धरणाऱ्या इंद्रधनुष्यातल्या रंगाना जगण्यात सामावू पाहत होतास. रात्रीच्या अंधारात हसणाऱ्या चांदण्यांच्या ठिपक्यांना जोडत तू स्वप्नांच्या चौकटी आखत होतास. त्या आकारात मनातल्या संकल्पित आकृत्या साकारत होतास. अन् मी वेडावल्यागत तुझ्या स्वप्नांच्या हिंदोळ्यावर बसून आकाशाशी सलगी करू पाहत होते. गाणाऱ्या पक्षांना माझ्या मनीचे गुज कथन करीत होते.
तुझ्या सहवासाची कोणतीच संधी सोडायला मी तयार नव्हते. नुसत्या डोळ्यांवर नाही... मनावर नाही... तर विचारांवरसुद्धा तुझ्या प्रेमाची पट्टी ठरवून घट्ट बांधून घेतली होती. तुझं तरी याहून काय वेगळं होतं रे! तुझ्याशिवाय मला काहीही बघायचं नव्हतं. तुझ्याशिवाय काहीच दिसत नव्हतं मला. मान्य! पण तू... तुला तरी दुसरं काही दिसत होतं का? हे सगळं खरं असलं, तरी जगाला सगळं दिसत होतं. किती दिवस तू मला, मी तुला अन् आपण जगाला एकमेकांपासून लपवणार होतो? घडायचं ते घडलंच. प्रेम नावाच्या अध्यायाचा अंत अटळ असतो. मग तो कसाही असो. तो घडणार होता. घडला. पण एवढ्या लवकर निर्णायकी येईल, असं नव्हतं वाटत. आणि घडला म्हणून कोसळून जायला मी अन् तू काही एवढे अविचाराने वागणारे नव्हतो. आयुष्य डावावर लाऊन जगणंच उधळायला निघालेलो नव्हतो. टोकावर उभं राहून कडेलोट करून घेण्याएवढे व्यवहारशून्यही नव्हतो. परिस्थितीला स्वीकारण्याइतकं म्हणा की, कोरभर का असेनात, पण आयुष्याचे अर्थ समजण्याइतकं शहाणपण दोघांत होतं.
वाईट वाटलं. तगमग झाली. अस्वस्थपणही सोबतीला राहिलं. पण म्हणून विरोध केला असता तर काय घडलं असतं? ते काळालाच माहीत! आपल्या पावलांनी चालत आयुष्यात येणाऱ्या गोष्टींचे आनंदपर्यवसायी शेवट फार कमी असतात. त्यासाठी नियतीकडून अभिलेख कपाळी कोरून आणावे लागतात. सुखांनी बहरलेल्या ताटव्यात नेण्यास नियती तयार नव्हती. अनेकांच्या कथेचा अंत झाला, तसा आपल्या कथेचाही. तेव्हा वाटलं आपलं काहीतरी आपल्याकडून निसटल्याचं, हरवल्याचं. त्या वेदना जखमा करीत राहिल्या. वाहत राहिल्या तशाच. पण काळ खूप गमतीदार असतो नाही का? बऱ्याच गोष्टी विसरायला लावतो तो माणसांना. म्हणून आज काही वाईट वगैरे वाटत नाही. मग कुणी म्हणेल, हा सगळा खटाटोप केलाच का तुम्ही? याचा अंत अटळ होता, तर या गुंत्यात गुरफटलातच का? की निसर्गदत्त आकर्षणाचा भागच अधिक असल्याने अशा अंताची खंत नाही वाटली तुम्हाला? यांना काय माहीत, निसर्गाच्या सगळ्या नियमांना पुरून उरलोच ना आपण. मोहाचे अनेक क्षण टाळले. त्याच्या अनेक उर्मी परतवून लावल्या, अगदी निर्धारपूर्वक. त्यांना भिक न घालण्याइतका संयम सोबत होता म्हणूनच ना! आज इतक्या वर्षानंतरही प्रतारणा, फसवणूक या शब्दांना आपल्या जगण्यात निदान याबाबत तरी जागाच नाही. याचा अभिमान वाटावा असंच जगलो. हेही आपल्या सहवासातून हाती आलेलं शहाणपणच, नाही का?
तो आणि ती :
उमलत्या वयाच्या प्रेमाचं पदरी दान पडत असावं का? ते सगळ्यांच्या वाट्यास येते की नाही, माहीत नाही. पण आपल्या आयुष्यात आलं. जगण्यात सामावलं. निदान याबाबत आपण नशीबवान म्हणायला हरकत नाही. खरंतर आपण एकमेकांकडे आकर्षिले गेलो, ते वय प्रेम वगैरे समजायचं होतंच कुठे. कदाचित निसर्गाचंच प्रयोजन असेल. पण निसर्गाच्या नियमांपेक्षा नीतीच्या चौकटींचे भक्कम बुरुज भोवती बांधले असल्याने असेल का? सांगता नाही येणार नेमकं. निसरड्या वाटांवरून चालताना घसरून पडायचे अनेक क्षण होते, पण नाही घसरलो. हे आपण दोघांशिवाय कुणाला अधिक चांगलं ठाऊक आहे? जगाची नजर कोणत्या कोनातून तुमच्याकडे बघते, यावर आपलं नियंत्रण असतंच कुठे? त्यांनी समजायचं अन् सोयिस्कर अर्थ लावायचे, ही रीतच आहे.
कितीतरी किंतु मनाच्या दलदलीत अधिवास करून आहेत, त्यांच्याकडून नितळपण घेऊन वाहण्याची अपेक्षा करावी कशी? काय नाही केलं त्यांनी आपल्यात अंतराय आणण्यासाठी. घर, घराणे, कुल, जात, परिस्थिती किती किती भिंती... ध्वस्त करायचा प्रयत्न करून टवकाही न उडणाऱ्या. शेवटी व्हायचं तेच अन् तेवढंच झालं. हताश, गलितगात्र. झालं ते योग्य की, अयोग्य हा भाग अलाहिदा. आपल्या सुखांची सूत्रे आणि वेदनांची गोत्रे वेगळी होतीच कुठे! आरंभी अधिक अवघड होतं हे सगळं पार पडायला. तू किती सहजपणे सगळं विस्मृतीच्या कोशात टाकून दिलंस हे. म्हणतात ना, पुरुष ठाम असतात. कठोर वगैरे असतात. पण मला वाटतं सगळेच कसे असू शकतील तसे? तू त्यावेळी केलं ते योग्यच वाटतं या पडावावर उभं राहून. काळाच्या अंधाऱ्या कोपऱ्यांना कोरून पाहताना तूच योग्य होती असं वाटतंय. तुझ्या जागी मी असतो, तर एवढा पटकन निर्णय घेतला असता का? माहीत नाही. कदाचित नाहीच!
...
खरं सांगू का, प्रेमपरगण्याकडे प्रवासाचं पहिलं पाऊल मीच तुझ्या दिशेने टाकलं ना! पुढे पडत्या पावलांस गवसलेली वाट मुक्कामाच्या बिंदूवर पोहचेल की, नाही याची अंशमात्र तमा नव्हती. केवळ तू आणि मी एवढंच मला दिसत होतं. परिणाम काय असतील, याची काळजी करायला अवधीच कुठे होता अधीर मनाला. झाकून ठेवलं म्हणून कोंबडं आरवायचं थोडंच राहतं! काय नाही सोसलं केवळ तू अन् तूच मला हवा होतास म्हणून? मैत्रिणींच्या नजरा, कुणा कुणाचे सूचक टोमणे, नातेवाईकांचे नाके मुरडणे, घरच्यांचा असहकार, प्रसंगी टोकाची भांडणे, अवतीभवती सतत असणारे सक्त पहारे. आणखी किती अन् काय काय. संशयी नजरांच्या पहाऱ्यात बंदिवान असूनही डोळे तुलाच तर शोधत राहिले. तुला बघून साऱ्या वेदनांचे गाणे व्हायचे. आपलं ओअॅसिस हाती लागल्याचा आनंद व्हायचा. आनंदाचं झाड मनाच्या अंगणी वाढवताना वेदना विसरत होते. विरोधाचे वाहणारे वारे बदलतील दिशा एक दिवस, सावकाश का होईना, पण संपेल हे सगळं या वेड्या आशेने.
घडू नये ते घडणार होते. नियतीचे ते अभिलेख होते. तुला साधं खरचटलं, तरी जीव तुटणारी मी. माझं काय, मी सहन करीतच होते. पण तुझ्याबाबत वेडावाकडा विचार स्वप्नांतही करू शकत नव्हते. भलतंसलतं काही घडलं असतं तर... नुसत्या विचाराने काळीज कंप करायचं. म्हणूनच तुला बघणं, भेटणं निग्रहाने टाळत गेले, असंभव असूनही! तुझ्या मनात तेव्हा काय अन् कोणते विचार आले असतील, तुलाच माहीत. मला तू विसरावं म्हणून प्रयत्न करीत होते. तू विचलित झालास. वेडेपण करीत राहिलास. पण तुझ्या वेडेपणात टोकाचा अविचार करण्याची शक्यता नव्हती, हे माझ्याशिवाय कोणाला आणखी चांगलं माहीत असणार होतं? या उसळत्या लाटांना बांध घालणं आवश्यक होतं.
शेवटी मीच पर्याय निवडला. विसरणं...! हो, विसरणंच! खूप अवघड होतं. पण आपलं असणाऱ्यासाठी असंभवही नव्हतं. विसरले...! हो, ठरवूनच अगदी जाणीवपूर्वक! जुळणाऱ्या बंधांना बांध घातले. निदान मनात सजवून ठेवण्याकरिता तरी ते गरजेचं होतं. एक सांगू! ते तुझ्या अन् माझ्याही भल्याचंच होतं. कारण, जुळणारच नव्हतं, त्या नात्याला उगीचच कुठूनतरी उसनवार आणलेली लेबलं लावून नावे देण्यात काडीचाही अर्थ नव्हता. असला तरी समाजसंमत संकेतांच्या चौकटीच्या कुंपणांना तो मान्य होणार नव्हता. जगणं नियतीचं देणं असेल, मन मारून जगणं शाप असेलही; पण मनात बसल्या माणसासाठी मनाला समजावून जगणं वरदान असतं, एवढंमात्र नक्की. मग कोणी काय समजायचं ते समजोत. अगदी तूसुद्धा...!
आणि आपण सगळेच :
काळ चालतच आहे. त्याला थांबवणं कोणास शक्य झालंय? त्याची संगत करीत सारेच सरकत असतात. ऋतू येतात अन् जातात. निसर्ग बहरतो. फुलतो अन् उजडतोही. जुनी पाने डाहळ्यांचा निरोप घेतात. नवी अंकुरित होतात. अंगाखांद्यावर खेळत वाढलेली पाने एकेक करून निरोप घेताना फांद्या हिरमुसतात. पण हेही काही कायम नसतं.
आसपास नव्याने सजू लागतो. काळाने कूस बदलली की बहार येतो. काही दिवसांनी तोही ओसरतो. ती त्याची नियती नसते, तर नियतमार्ग असतो. दाटून आलेलं आभाळ निथळत राहतं. ढगांच्या ओंजळी रित्या झाल्या की, आकाश मुक्त होतं. त्याचा विस्तीर्ण पट नितळ रंगांनी नटू लागतो. तोही सोहळा संपतो. दोनचार चुकार मेघ कुठूनतरी चालत येतात अन् हरवलेलं काहीतरी शोधत उगीचच इकडे-तिकडे भटकत राहतात. अवघं आकाश कवेत घेऊ पाहणाऱ्या पंखांनी विहार करीत कुठून कुठून येऊन मिळत जातात. दुरावत राहतात. वाऱ्याच्या पदर पकडून खेळत राहतात. सावकाश सरकत राहतात. गहिरे होत जातात अन् बरसण्याची प्रतीक्षा करीत राहतात.
किंवा आणखी कोणीही :
पात्र बदलतात. थोडे इकडे-तिकडे कलते झाले, तरी घटना प्रसंग जवळपास तेच अन् तसेच असतात. पण कहाणी मात्र बहुदा तीच असते. भटकत भटकत कधीतरी अनोळखी वळणाचा हात पकडून ती चालत येते. अनामिक आस्थेचे अनुबंध घेऊन बहरत राहते, फुलत राहते, काळाच्या कातळावर अंकित होते अन् नियतीने पदरी पेरलेले पडाव पार करून परिस्थितीने पुढ्यात पसरलेल्या प्रतलावरून वाहत राहते...
चंद्रकांत चव्हाण
••
प्रयासाची पावले
नितळपण अंतरी नांदते असणे सार्वकालिक आवश्यकता आहे. याबाबत किंतु असण्याचं कारण असेल, असं वाटत नाही. वेगवेगळ्या परगण्यात नांदणाऱ्या माणसांचा तोंडवळा निराळा असला, तरी अंतरीचा भाव आगळा कसा असेल? उमदेपण धारण करून असणारी माणसे मानवकुलाचं वैभव असतात. धवल चारित्र्याचे धनी अन् विमल विचारांनी वर्तनारी माणसे समाजाची संपत्ती असतात. असं काहीसं म्हणणं देखणं वगैरे वाटत असलं, तरी वास्तव अन् कल्पितात अंतर असतं, हेही खरंय.
आपलेपणाचा ओलावा घेऊन नांदणारी माणसे आसपास असणे हा काही योगायोग नसतो. ती जडणघडण असते. निर्व्याज मनाची माणसे इहतली नांदती असणे हा काही निसर्गाने निर्धारित केलेला नियत मार्ग नसतो, तर नेटक्या विचारांनी वर्तनाऱ्या माणसांनी निवडलेल्या वाटेवरचा प्रवास असतो. तो काही पूर्वसुकृतांच्या पुण्याईने प्राप्त झालेला प्रसाद नसतो.
सत्प्रेरीत प्रेरणांनी प्रवास करणारी माणसे सदिच्छांचे पाथेय घेऊन चालत असतात. संचित असतं ते व्यवस्थेचे किनारे पकडून वाहणारं. उमदेपण हरवण्याच्या काळात निर्मळपण नांदते ठेवणाऱ्या माणसांचं मोल म्हणूनच काकणभर अधिक असतं. माणुसकीचे प्रवाह अनवरत वाहते ठेवणारी माणसं गवसणं म्हणूनच अधिक अर्थपूर्ण असतं. माणूस हरवण्याचा काळात माणूस मला सापडतो, ही भावना अंतर्यामी समाधान पेरणारी असते. कुणी याला पुण्याई वगैरे म्हटलं काय अन् आणखी दुसरं काही, त्याने अर्थात फारसा फरक नाही पडत. माणूसपणाच्या परिभाषा अबाधित ठेवणारा माणूस सापडणं अधिक आनंदपर्यवसायी असतं.
वाटेवर पावले पुढे पडताना पायाखाली आनंदाच्या बिया पेरता यायला हव्यात. न जाणो भविष्यात काही रोपटी उगवून येतीलही. पण जगणंच उजाड होत असेल अन् सगळीकडून शुष्क वारे वाहत असतील तर अंकुरण्याची अपेक्षा तरी करावी कशी? कोरडेपण वाढत असतांना उरलेल्या ओलाव्याची डबकी होत जाणे स्वाभाविकच. वाहते राहण्याला पायबंद पडला की, पाण्यालाही कुजण्याचा शाप असतो.
विचारांची विलसिते विकत नाही आणता येत. ती वेचावी लागतात. त्यासाठी माणसे वाचावी लागतात. समजून घ्यावी लागतात. अन्वयार्थ लावावे लागतात. रस्त्याने बघावं तिकडे गर्दी असंख्य प्रश्नचिन्हे घेऊन पळताना दिसते. माणसे झुळझुळ वाहणेच विसरली आहेत. साचलेपणास विस्तार नसतो. त्याच्या कक्षा सीमांकित असतात. विस्ताराचं विश्व संकुचित झालं की, विचारांची क्षितिजे हरवतात. सहजपणाची सांगता झाली की, आपलेपणाचे सेतू कोसळतात. आपणच आपल्यातून निखळत जातो. संकेतांच्या सूत्रातून सुटत जातो.
शेकडो वर्षे झाली. माणूस काही न काही शोधतो आहे. भटकतो आहे अस्ताव्यस्त. त्याच्या आयुष्याला वेढून असणारी अस्वस्थ वणवण हव्यास की आस्था, सांगणे अवघड आहे. वाटांवर लागतं काही हाती, सापडतं काही थोडं आपलं असं अन् बरंच काही निसटतंही, म्हणून प्रयासांच्या प्रेरणांनी पूर्णविराम घेतला आहे असं नाही. पावलांना सापडलेल्या वाटांनी कुणी निघतो. कुणी शोधतो नव्या वाटा. कुणी मळलेल्या वाटांना प्राक्तन मानतो. कुणी प्रशस्त पथांची प्रतीक्षा करतो.
कोणी शब्दांची अस्त्रे-शस्त्रे करतो, कोणी शास्त्राला प्रमाण मानून निरीक्षणे नोंदवतो. कोणी वेदनांच्या कातळावर शिल्पे कोरु पाहतो. कुणी चित्रे रेखाटतो. कोणी आणखी काही. कुणी सेवेच्या साह्याने जग सुंदर करू पाहतायेत. कुणी ज्ञानाच्या पणत्या हाती घेऊन अंधारे कोपरे उजळायला निघालेयेत. कुणी व्यवस्थेला अधिक व्यवस्थित करू पाहतायेत. माणसे काहीना काही तरी करतायेत म्हणून जग बदललं का? या प्रश्नाचं उत्तर हाती लागणं बऱ्यापैकी अवघड आहे. तसंही जग कधी सुघड असतं? ते सहज, सुगम असतं तर एवढे गुंते असते का. आयुष्यात अनेक किंतु-परंतु असतात, म्हणून आस्थेची पणती टाकून तिच्या उजेडाला निरोप द्यायचा नसतो. भलेही तिला जगाच्या अंधाऱ्या कोपऱ्यांच्या कपाळी कोरलेल्या अभावाच्या रेषा नाही मिटवून टाकता येत; पण पावलापुरता प्रकाश पेरता येतोच ना!
जगाच्या जगण्याची आपली रीत असते. रीतिरिवाज नंतर केलेली सोय असते. सोयीचा सोयीस्कर अर्थ शोधता येतो. एकाच्या सोयीचं जग दुसऱ्याला गैरसोयीचं वाटणार नाही असं नाही. जेवढी डोकी तेवढे विचार इहतली नांदते असतात. विचारांना योग्य वाटेने वळते करण्याचा प्रयत्न करावा. नसेल कुणास आवडत तर द्यावं सोडून. सगळ्यांना सगळ्या गोष्टी अवगत असतील असं नाही. आपल्याला काय योग्य वाटतंय, हे महत्त्वाचं. चालत राहावं आपणच आपलं पसाभर प्रकाशाच्या सोबतीने. कारण, परिस्थिती प्रयासाच्या पावलांनी प्रवास करत असते. नाही का?
चंद्रकांत चव्हाण
**