सुविधांनी सजलेलं जगणं वावगं असतं असं नाही. पण सीमा पार करून त्यांचा सोस होणं वाईट. हे कळत नाही असं नाही. पण होतं काय की, कुठलातरी सोस माझ्यासाठी अपग्रेड होणं असतं. माझ्याकडे अमकी वस्तू आहे अन् तमकं असेल असं सांगणं मला प्रगतीची परिभाषा वाटते. जगणं सुसह्य करणारी साधने काळाची आवश्यकता असेल, तर त्याला प्रतिसाद देणंही ओघानं आलं. पण प्रतिसादासाठी विशिष्ट ब्रँडचीच वस्तू का असावी? विशिष्ट साच्यात तयार झालेली नजर का बदलता नाही येत मला? विशिष्ट वस्तूंचा मोह का पडावा? गुणवत्ता, दर्जा, सुविधा हे मुद्दे असतील, नाही असं नाही. पण त्या वस्तू स्टेटसचा सिम्बॉल होणार असतील, तर उपयुक्तता मुद्दा मागे पडतो अन् उरते केवळ मिरवणूक. मिरवण्याला अपग्रेड होणं असं कुणी म्हणत असतील तर प्रश्नच संपला. सगळ्या व्याख्या येथे परास्त होतात. समोर दिसणाऱ्या साधनांच्या साच्यात स्वतःला फिट्ट बसवून घेता यावं, म्हणून जी कवायत मी करतो तिला कुणी अपग्रेड होणं समजत असेल तर गती, प्रगतीचे अर्थ नव्याने अभ्यासावे लागतील.
माझ्या हाती असलेली सगळी सुखं अपग्रेड आहेत. ती तशी असावीत म्हणून मी काय नाही केलं. अनेक खटपटी करून त्यांच्या कडांना स्पर्श केला. पण मला मी किती अपग्रेड केलंय? माझी नैतिक, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक उंची वाढावी म्हणून मी किती कष्टलो? यासाठी मी स्वतःला किती अपग्रेड केलं? हे मी मला कितीदा विचारतो? खरं हे आहे की, मला सगळं सहज जमतं. पण स्वतःला खरवडून काढणं नाही होत संभव. माझेच पापुद्रे काढून मला मी बघायला मला वेळ नाही. असला तर तेवढी हिंमतही माझ्याकडे नाही.
जगण्यात उथळपण सामावलं की, अथांग असण्याचे अर्थ अपोआप हरवतात. कृतीचे अध्याय आयुष्यात कोरून आनंदाचे कोपरे मी शोधतच नाही. ते शोधण्यासाठी अपग्रेड होणं काही जमत नाही. माझं माझ्याशी तरी पटतं की नाही, माहीत नाही. पण माझं बऱ्याच जणांशी कधी पटत नाही. त्यांच्या अपग्रेड होण्याच्या व्याख्या मला कळत नाहीत. माझ्या बदलांचे संदर्भ त्यांना समजत नाहीत. वडिलांच्या विचारांशी मला कणभरही जुळवता नाही आलं कधी. ना आईच्या विचारांशी सख्य साधता. ना समाजाच्या चौकटी आपल्या वाटल्या. ना कोणते नाते नितळ वाटले. पटत नाही त्यांच्या मूठभर जगात जगणं. चिमूटभर सुखांना समाधानाची फाटकी लेबले लावणारे विचार. त्यांच्या आयुष्याच्या प्राथमिकता अन् आमच्या जगण्याच्या गरजा किती अंतर आहे? कशी पार करावीत ती? किती चालावं? रस्तेच वेगळे अन् मुक्कामाची ठिकाणे निराळी असल्यावर.
बापाला आपलं पोरगं कसं आदर्श आहे, हे जगाला सांगून समाजाकडून प्रशंसेचं प्रशस्तिपत्र मिळवायचं असतं. त्याच्या साच्यात घडलेला गोळा त्याच्यासाठी कृतीने अन् विचारांनी अपग्रेड असतो अन् समाजासाठी संस्कारक्षम. नात्यातल्या माणसांना उत्तम मुलगा, चांगली मुलगी, उत्कृष्ट सून आणि बरे आप्त, स्वकीय हवे असतात. पण समाजाला नेमकं काय हवं, हेच नीट माहीत नसतं. त्यांना टीकाटिप्पणी करण्यात आनंद. समूहात कोणाला कौतुक, तर कोणी मत्सराने काळवंडलेला. कुणी द्वेषाने कुजलेला. प्रत्येकाच्या तऱ्हा निराळ्या. त्यांच्या दृष्टीने हेच अपग्रेड होणं. कोणाच्या व्याख्या कोणाला कळत नाहीत अन् कुठलीही सूत्रे वापरून गणिते काही सुटत नाहीत. यालाच कोणी काळाचा महिमा वगैरे नाव देतात अन् कोणी अपग्रेडचा असण्याचा अभाव असं म्हणतात.
कुणाच्या गतीप्रगतीच्या व्याख्या वितभर वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करत असतील तर आपण आपले परीघ का विसरावेत? तसेही ज्यांचे विचार विस्तार विसरले आहेत, मूल्ये महत्तेचा मार्ग सोडून मळलेल्या वाटेने वळते झाले आहेत, ज्यांच्या कांक्षांची क्षितिजे कधीचीच आऊटडेटेड झालेली आहेत त्यांना उन्नत असण्याचे अर्थ सांगून उपयोग काय. कशाला कवटाळून बसावं काजळलेल्या विचारांना? मूल्य नसलेल्या वस्तुंना सांभाळायच्या मोहात का पडावं? काळ यूज अँड थ्रोचा आहे. असं कुणाला वाटत असेल तर तो त्याच्या स्वातंत्र्याचा भाग. खरं हेही आहे की, नाती, समाज, व्यवस्था काही वस्तू नाही वापरा अन् फेका म्हणून जगायला. त्यांच्या असण्याचे अर्थ असतात. ते समजून घेणं म्हणजे काही असतं की नाही? हे काही समजून घेणं म्हणजे अपग्रेड होणं असतं. पण हे कळण्यासाठी आपण संवेदनांनी, आपले विचार भावनांनी अन् आपले स्तर कृतीने अपग्रेड होणं आवश्यक असतं.
चंद्रकांत चव्हाण
▪
0 comments:
Post a Comment