Aamachyaveli | आमच्यावेळी

By
आमच्यावेळी असं नव्हतं!

शिक्षक दालनात आम्ही काही शिक्षक ऑफ तासिकेला बसलो होतो. काहीजण निवांतपणे पेपर वाचत होते. काहीचं असंच इकडच्या तिकडच्या विषयावर बोलणं सुरु होतं. बोलण्याच्या ओघात चर्चेचा प्रवाह विद्यार्थ्यांच्या वर्तनाकडे वळला. वेगवेगळ्या विचारांनी, मतप्रवाहानी चर्चेत रंग भरायला लागले. चर्चेत सहभागी होत एक शिक्षक म्हणाले, “सर, आपल्यावेळी असं काही नव्हतं! सारं कसं करड्या शिस्तीत असायचं. शाळा, शिक्षक यांचा एक धाक असायचा. आणि आता बघावं तर असं.” “अहो, हे होणारच, या मुलांना हल्ली धाक असा कुणाचा राहिलाच नाही आणि तुम्ही तसा निर्माण करायचा प्रयत्न करून तर पाहा, म्हणजे कळेल तुम्हाला काय होतं ते.”- दुसरे शिक्षक. चर्चेत सामील होत तिसरे शिक्षक म्हणाले, “खरंतर काळ बदलला तसं आपणही बदलायला हवे. पण आपण बदलायला तयार असतोच कुठे? परंपरांचा पायबंद पडला म्हणजे नवे मार्ग कसे सापडतील?” त्याचं बोलणं ऐकून पहिले शिक्षक म्हणाले, “सर, तुमचा हा आदर्शवाद सांगण्यापुरता ठीक आहे; पण प्रत्यक्ष आचरणात आणताना समोरचे प्रश्न काय असतात, हेही बघावे लागतात ना! आदर्शवादाने प्रेरित विचारांनी एखाद्या विद्यार्थ्यास- जो काहीच समजून घेण्याच्या परिस्थितीत, मनस्थितीत नाही, त्याला शिकवून बघा, म्हणजे कळेल?” शिक्षकांचं बोलणं मी ऐकत होतो. चर्चेत सहभागी होत म्हणालो, “सर, समस्या असतील, अडचणीही असतील, प्रश्न असतीलही; पण त्यासाठी शोधलेल्या उत्तरात विद्यार्थीहित असेल, तर मुलांना दंडित करणे, हाच एक अंतिम उपाय आपल्याकडे असतो का? मुलांना नीट समजावून घेतलं तर; मला नाही वाटत त्यांच्याकडून नकारात्मक काही घडेल.” “सर, हा तुमचा स्वप्नाळू आदर्शवादच ना शेवटी! अहो, या मुलांना कितीही सांगा, यांची शेपटी वाकडी ती वाकडीच.”- दुसरे शिक्षक.

मुलांच्या शिस्तीच्या, वर्तनाच्या संदर्भात चर्चा वळणं घेत पुढे सरकत असताना तासिका संपल्याची बेल झाली आणि सारे पुढील तासिकेसाठी आपापल्या वर्गावर जाण्यासाठी निघाले. तो विषय तेवढ्यावर थांबला.

पण हे सगळे आज आठवण्याचं कारण मुलांच्या शिस्तीबाबत, वर्तनाबाबत छोट्यामोठ्या तक्रारी शाळेत अधून-मधून सुरु होत्या. याला आणखी निमित्त ठरलं ३१ डिसेंबरचा दिवस. तसं पाहिलं तर इतर दिवसांसारखाच हाही दिवस; पण मुलांनी कुठूनतरी पाहिलं, ऐकलं, अनुभवलं असावं. सरणाऱ्या वर्षाला निरोप देताना सेलिब्रेशन केलं पाहिजे. कदाचित सेलिब्रेशनचे अन्य उत्कट आविष्कारही त्यांनी पहिले असणार. पण अशा पद्धतीने आपणास काही हे सेलिब्रेशन साजरं करणं शक्य नाही आणि कोणी तसं करूही देणार नाही. काय करावं म्हणून त्यांच्यात विचार झाला असेल आणि कोणातरी मनातून विचार प्रकटला असेल. साऱ्यांनी काही थोडे-थोडे पैसे काढले खिश्यातून. आणला वाद्य वाजवणारा. धरला ताल पावलांनी वाद्यांच्या ठेक्यावर. लागले नाचायला. नाचणाऱ्या त्यांच्या पावलांना येऊन मिळाली आणखी काही थिरकती पावलं. विसरले भान आजूबाजूचे. लागली आनंदाची कारंजी थुई थुई उडायला त्यांच्या मनात. सारे देहभान हरपून ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अवस्थेपर्यंत पोहचले. नाचणाऱ्या पावलांसोबत डुलत राहिली. ना कोणाची जाण अन् ना राहिलं कोणाचं भान. आपल्याच तालात रंगले.

आतामात्र त्या वाद्यांचा वर्गात त्रास होऊ लागला. सुरवातीला वाटलं असेल शहरातला कोणतातरी धार्मिक, सामाजिक कार्यक्रम. जाईल मिरवणूक थोड्यावेळाने पुढे. वर्गाच्या खिडकीतून बाहेर पाहिले. अरे, येथेतर आपलीच मुलं नाचतायेत. मुख्याध्यापक कार्यालयातून निरोप आला. सर, बघा आपली काही मुलं तिकडे दिसतायेत. आणि ती सगळी दहावीच्या वर्गातीलच आहेत. दरम्यान धावले काही शिक्षक तिकडे. धरले त्याच्यातील काहींचे बखोटे. आणले धरून कार्यालयात. केले त्यातील काहींच्या पालकांना फोन. आले त्यांचे पालक धावतच शाळेत. त्यांच्या साहसकथा ऐकून तेही बिचारे अचंबित झाले. साऱ्या प्रकारचे जाब विचारले गेले. मुलांचे चेहरे आतामात्र पाहण्यासारखे झालेले. आपलं नक्की काय चुकलं, याचं नीट आकलन त्यांना होत नव्हतं. आतापर्यंत इतरांना वाद्यांच्या तालावर नाचताना त्यांनी पाहिलं; पण त्यांना कुणी थांबवताना नाही पाहिलं. आणि आम्हालामात्र नुसतं थांबवलंच नाही, तर रागावणंही. त्यांना काही समजेना. शेवटी शालेय शिस्त, संस्कार वगैरे विषयावर शिक्षकांनी प्रबोधनपर विचार ऐकवून पाठवलं परत. गेले आपापल्या घरी.

असेच पुढचे दोनचार दिवस उलटले असतील. सराव परीक्षेचा पेपर संपल्यावर त्या दिवशी सेलिब्रेशन करणाऱ्या आणि पाहणाऱ्या मुलांमधून काही मुलं भीत भीतच आली माझ्याकडे. म्हणाली, “सर, आमचं चुकलं, आम्ही नको होतं असं करायला त्या दिवशी! सर, इतरांना नाही पण तुम्हाला म्हणून सांगतो, तुम्ही आम्हाला खूप चांगलं समजून घेतात. सर, तुम्ही शिस्तीचे कठोर असले तरी आम्हाला लेकारांसारखं वागवतात; नव्हे मित्रांसारखं समजतात. यापुढे असं नाही होणार, कधीच नाही!” त्याचं हे बोलणं ऐकून अवाक व्हायची वेळ आता माझी होती. कारण, आम्ही ते सगळं एव्हाना विसरलो होतो. अन् मुलंच ती शेवटी. त्यांनी नाही तर एन्जॉय करायचं कुणी? असं म्हणत तो विषय आमच्या शिक्षकांपुरता संपला होता. त्याचं पश्चातापदग्ध बोलणं ऐकून त्यांना म्हणालो, बाळानो! तुम्ही आनंद साजरा केला, यात तुमचं काहीच चुकलं नाही; पण तो आनंद साजरा करायचा कसा, याची पद्धतमात्र चुकली. तुम्हाला आनंद साजरा करण्याचं स्वातंत्र्य आहे; पण मला वाटतं स्वातंत्र्य आणि स्वैराचार या गोष्टी तुम्हाला पुरेश्या समजलेल्या दिसत नाहीत किंवा तुम्ही त्या समजून घेतल्या नाहीत. अरे, तुम्ही स्वैराचाराला स्वातंत्र्याची वसनं चढवायला निघालात, कसं चालेल हे असं?” असं बरंच काही काही समजावून सांगितलं. त्यांना ते आवडलं असावं. त्यांच्या चेहऱ्यावरचे क्षणापूर्वीचे अपराधीपणाचे भाव पालटले. मुलं खुलली मनावरचं ओझं कमी झाल्यासारखे वाटले. मनातला सल सैल झाला असावा. बोर्डाच्या परीक्षा फार काही दूर राहिल्या नाहीत. आतातरी अभ्यासाकडे काळजीपूर्वक लक्ष द्या, असे सांगून पुढच्या कामाकडे वळलो.

तसं पाहता या मुलाचं असं काय चुकलं? आनंदप्राप्ती ही तर आपली उपजत प्रवृत्ती. त्यांनीही तेच तर केलं. पण त्यांची पद्धत चुकली. हा दोष नेमका कुणाचा? त्यांच्या पालकांचा, त्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा की, त्यांना शिकविणाऱ्या आम्हां शिक्षकांचा? मला वाटतं, हा दोष असेलच तर त्यांच्या वाढत्या वयाचा आहे. या वयातच मुलांना व्यवस्थित सांभाळावं लागतं ना! मग, त्यांना सांभाळणाऱ्या आम्ही साऱ्यांनी त्यांच्या उमलत्या वयास का सांभाळू नये? किशोरावस्थेतील त्यांच्या जीवनातील स्पंदने आपणास का ओळखता येऊ नयेत? या वयातील प्रचंड ऊर्जा सकारात्मक मार्गाकडे वळती केली, तर विधायकतेची शिखरं उभी राहतील. कोणातरी कवीने म्हटले आहे, ‘उठल्या सुटल्या देऊ नको मला भान वाढत्या वयाचे, वयास चुकवीत असेच आहे मला फुलायचे.’ या फुलणाऱ्या फुलांच्या गंधकोषी आपण जपल्या तर सगळ्याच नाहीत; पण बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपणास मिळतील. कोणतीही मुलं बरीवाईट नसतात. वाईट असतो, त्यावेळी त्यांच्या मनात येणारा चुकीचा विचार. अविचारांची ही काजळी वेळीच दूर केली, तर विवेकाची दिवाळी साजरी नाही का होणार?

आपण त्यांच्याकडे कसं पाहतो, यावर ते ठरतं. माझ्या या मताला तुम्ही माझी श्रद्धा समजा की, अंधश्रद्धा किंवा स्वप्नाळू आदर्शवाद. ‘आमच्यावेळी असं नव्हतं!’ म्हणून काय होईल? काळ कोणताही असू द्या, मुलं ती मुलंच ना शेवटी! आपण त्यांना जरा समजून घेतलं, थोडं त्यांच्या वयाचं होऊन त्यांच्याशी संवाद साधला तर कदाचित या समस्यांची उत्तरेही मिळतील. यासाठी आवशकता आहे, त्यांच्याकडे पाहण्याच्या कॅलिडोस्कोपला थोडं फिरवण्याची. त्याचा कोन बदलला की, त्यातील नक्षीही बदलेल. पुढचं दिसणारं चित्रही बदलून रमणीय आकार धारण करणारं असेल. म्हणतात ना आकाशही जागोजागी रितं असतं पण कोतं कधीच नसतं, नाही का? 

0 comments:

Post a Comment