प्रिय अन्वय,
हे लिहायचं होतंच. काहीतरी कारण हवं होतं. तुझा वाढदिवस निमित्त ठरतोय इतकंच. नाहीतरी तू आहेसच इतका लाघवी की, कोणालाही मोहात पाडशील. मग माझ्या शब्दांची मिजास ती काय! तुझ्यारूपाने निरागस चैतन्य आमच्या चंद्रमौळी चौकटीत चमकू लागलं तेव्हापासून अक्षरे मनाभोवती पिंगा घालत होती. शब्द संधी शोधतच होते, ती यानिमित्ताने मिळाली.
केवळ एक वर्ष... हो, एकच वर्ष केवळ. तुझ्या वयाचं हे एक छोटंसं वर्तुळ. किती यकश्चित कालावधी आहे हा, काळाच्या अफाट पसाऱ्यातील! पण परिवारासाठी... आनंदाचं एक अख्खं आवर्तन. एक प्रदक्षिणा सुखाच्या परिघाभोवती. एक कृतार्थ कोपरा. वारंवार मोहात पडावं असा क्षण. आणखीही बरंच काही... खरंतर या एका वर्षात तुझ्या रूपाने प्रत्येकाला काही ना काही गवसलं. रक्ताचा वारसा घेऊन काही नाती तुझ्यासोबत आली, तशी स्नेहगंध लेऊन काही नव्याने नामनिर्देशित झाली. तुझ्या येण्याने आयुष्यातल्या अज्ञात कोपऱ्यात विसावलेल्या सुखांच्या संकल्पित प्रतिमांना सूर गवसले. जगण्याला ताल सापडला. ओंजळभर असण्याला आणखी काही अर्थपूर्ण आयाम मिळाले. जगणं आनंदाच्या चौकटींत अधिष्ठित झालं. खरंतर आनंद शब्दाचा समानार्थी शब्द 'अन्वय' हाच केलाय या एका वर्षाने आम्हांसाठी. जगासाठी सुखांच्या परिभाषा काहीही असू दे, आमच्यासाठी तू सौख्याचा परिमल आहे. सुखांचा नितळ, निर्मळ निर्झर आहेस. दिसामासांनी वजा होत जाणाऱ्या आयुष्याला मोहरण्याचे अर्थ तुझ्या आगमनाने नव्याने अवगत होतायेत. निर्व्याजपण म्हणजे नेमकं काय असतं, ते तुझ्याकडे पाहून आकळतंय. आयुष्याचं गाणं तुझ्या बोबड्या बोलातून बहरतं, इवल्या पावलातून पळतं. हसण्यातून फुलतं अन् रडण्यातून सापडतं. तुझ्या प्रत्येक लीला प्रतिरूप आहेत आनंदाच्या. खरंतर तूच केंद्रबिंदू झालाय सुखांच्या व्याख्यांचा.
मला माहितीये बाळा, हे लिहिलेलं तुला वाचता येणार नाही. येईलच कसं? काही गोष्टी समजायला तेवढं वय असावं लागतं. वाचता यावं म्हणून वाढत्या वयाच्या वाटेने नव्या वळणावर विसावण्याएवढं आपण असावं लागतं ना! चिमूटभर वयाच्या या पडावावर लिहिलेलं कोणी कधी वाचलंय का? कसं शक्य आहे? अगदी खरंय! तुही यास अपवाद नाही. असंभव गोष्टी संभव होणं जादूच्या कथेत शक्य असतं आणि त्या तेथेच देखण्या वगैरे दिसतात.
हेही खरं आहे की, लिहिलेलं सगळं वाचायलाच हवं असं कुठेय? वाचता नाही आलं तरी माणसाला ऐकता-पाहता येतं ना? हो, ऐकता येतं अन् पाहताही! ऐकण्याला अन् पाहण्याला सीमांकित करता येत नसलं, तरी ते समजायला मर्यादा असतात. पाहण्यासाठी नुसते डोळे असणं पुरेसं असतं, पण पाहण्यापलीकडे असणारं बघण्यासाठी दृष्टी असायला लागते. त्यासाठी दृष्टिकोन तयार होण्याएवढं व्हावं लागतं. स्वतःकडे बघायची नजरच नाही आली अजून, तर जगाकडे बघावं तरी कोणत्या कोनातून? डोळ्यांना दिसणारा प्रत्येक 'कोन' हा 'कोण' असा प्रश्न आहे. उत्तरे शोधावी कशी, हेच कळत नसेल तर अक्षरे आकळावीत तरी कशी?
तसंही माणसांच्या आयुष्याच्या परिघात अन् व्यवस्थेच्या परिप्रेक्षात प्रश्न कधी नसतात. काळाच्या कोणत्याही तुकड्यात डोकावून पाहिलं तरी त्यांची वसती दिसेल. म्हणूनच माणूस प्रश्नांच्या पंक्तीत फिरणारा अन् विचारांच्या संगतीने विहरणारा जीव आहे, असं म्हणण्यात अतिशयोक्ती नाही. प्रश्नांचं शेपूट कितीही कापलं तरी त्याची वाढ कायम असते. विस्ताराला बांध घालण्यासाठी मर्यादा मान्य करायला लागतात, हेही खरंच. विशिष्ट विचारांनी जगाकडे बघायला वय आणि वाढत्या वयाने आत्मसात केलेले अनुभव पदरी असायला लागतात. ते महत्त्वाचे असतात, याबाबत संदेहच नाही. पण हेही खरंच की, कल्पनासृष्टीत विहार करायला कसली आलीयेत मर्यादांची वर्तुळे?
तू हे पाहशील? माहीत नाही. पाहशील म्हणण्यापेक्षा मम्मी-पप्पाच तुला दाखवतील. पण पाहूनही काहीच कळणार नाही. कळण्याएवढं तुझं वयही नाही. समजणार नसेल काहीच, तर एवढा खटाटोप कशाला? असा काहीसा विचार कोणाही वाचणाऱ्याच्या मनात येईल. कुणी म्हणेल, अबोध मनाला बोधमृत पाजणे हा शुद्ध बावळटपणा नाही का? अगदी खरंय! खरंतर हे लिहणं केवळ निमित्तमात्र. कुठल्याशा कारणाचा हात धरून केलेले सायास. आज सायास वगैरे वाटत असले तरी काळ असाच चालत आणखी काही पावले पुढे निघून आल्यावर कदाचित या प्रयासाच्या परिभाषा तुला समजलेल्या असतील. प्रसन्नतेचा परिमल घेऊन तुझं विचारविश्व त्या प्रमुदित करतील, ही शक्यता कशी नाकारावी.
कधी कधी चौकटींच्या बाहेर अन् चाकोऱ्यांच्या पलीकडे असणंही देखणं असतं, नाही का? कुणी केलेल्या एखाद्या कृतिबाबत अनुकूल-प्रतिकूल असं काही कुणाला वाटत असेल, तर तो त्याचा प्रश्न. कोणाला काहीही बरं वाटू शकतं. पण काहींना काहीही केलं तरी नाहीच आवडत. कुणाच्या विचारांत नकाराचे कोंब अंकुरित झालेले असतील, तर तुमच्या कोणत्याही कामात अंधारच दिसतो. कुणाला कसलं वाईट वाटावं किंवा वाटू नये, हे कसं सांगता येईल? काय वाटावं, याची काही सुनिश्चित परिमाणे नसतात. ती ज्याची त्याने तयार करायची असतात. कुणी नितळपणाच्या पट्ट्या लावून एखादी कृती मोजू पाहतात. कोणाकडे त्या गढूळलेल्या विचारांत मळलेल्या असतात इतकंच.
आसपास निनादणाऱ्या सगळ्याच स्पंदनांना सुरांचा साज चढवून नाही सजवता येत. नाही सापडत कधी त्यांचा ताल. प्रयत्न करूनही नसेल सापडत एखादा सूर, तर बेसूर असलं तरी आपण आपलंच गाणं शोधून बघायला काय हरकत असते. जगाकडे बघण्याच्या आणि लोकांची मने सांभाळण्याच्या नादात आपल्याला काय वाटतं, हे विसरावं का माणसाने? नाही, अजिबात नाही! 'मी' म्हणून काही असतं आपल्या प्रत्येकाकडे. आपलं 'मी'पण आकळतं, त्यांना 'आपण' शब्दाच्या आशयाशी अवगत नाही करायला लागत. ज्यांचा 'मी' 'आपण'मध्ये विसर्जित झालेला असतो, त्यांना विरघळूनही उरण्यातले अर्थ अवगत असतात. दुधात पडलेल्या साखरेचं दृश्य अस्तित्व संपतं, पण तिच्यातलं माधुर्य दुधाच्या पदरी गोडवा पेरून जातं. माणसाला असंच माधुर्य मागे ठेऊन विरघळून जाता येणं अवघड आहे का? असेलही कदाचित. पण अशक्य नक्कीच नाही. आपल्या प्रत्येकाच्या अंतरी काही अहं अधिवास करून असतात. त्यापासून विभक्त होण्यासाठी विरक्तीची वसने परिधान करून विजनवासाच्या वाटा धरूनच चालावं लागतं असं काही नाही. विचारांना विकारांपासून वेगळं करता आलं तरी खूप असतं यासाठी. आपल्यातला 'अहं'वाला 'मी' नाही, तर आपली पर्याप्त ओळख करून देणारा 'मी' अवश्य सांभाळता यावा माणसांला.
असो, सगळ्याच गोष्टी काही सहेतुक करायच्या नसतात. हेतूसाध्य असतील त्या कराव्यातच; पण काही निर्हेतुक गोष्टीही कधी कधी आनंददायी असू शकतात, त्याही करून पहाव्यात. काही गोष्टी अशाही असतात, ज्यांची प्रयोजने शोधण्याच्या भानगडीत पडू नये. त्या कराव्याशा वाटल्या म्हणून कराव्यात असंही नाही. पण त्या केल्याने प्रसन्नतेचा परिमल मनाचं प्रांगण प्रमुदित करीत असेल, तर तो गंध अंतरी का कोंडून घेऊ नये? प्रत्येक कृतीत किंतु, परंतु शोधायचा नसतो, तर त्यांच्या प्रत्येक कोपऱ्यात कृतार्थता कोरायची असते. असेल काही गोमटे मार्गावर तर वळावे त्या वाटेने. वेचावेत क्षण लहानमोठ्या आनंदाचे अन् वाचावीत वाटेवरची वेडीवाकडी वळणे. झालंच शक्य तर घ्यावा त्यावर क्षणभर विसावा, नव्याने बहरून येण्यासाठी.
प्रत्येकाच्या अंतरी आनंदाचा कंद असतो. आस्थेचा ओंजळभर ओलावा त्याला अंकुरित करतो. जपावेत जिवापाड ते कोवळे कोंब. वेड्यागत बहरून येण्यासाठी स्वप्ने पेरावी पानांच्या हरएक हिरव्या रेषेत. मोहरून येण्यासाठी त्याला ऋतूंच्या मोहात पडता यावं. धरतीच्या कुशीत विसावलेल्या बिजाने पावसाच्या पहिल्या सरींसोबत कोंब धरून जागं व्हावं. देहावर पांघरून घेतलेल्या मातीचा पदर दूर सारत क्षितिजाच्या टोकावर विहरणाऱ्या रंगभरल्या किनारकडे हलकेच डोकावून पाहावं अन् आपणच आपल्याला नव्याने गवसावं. वाहत्या वाऱ्याशी सख्य करावं. प्रकाशाशी खेळावं. पाण्यासोबत हसावं. आकाशाशी गुज करावं अन् दिसामासांनी मोठं होताना एकदिवस आपणच आभाळ व्हावं. तसं वाढत राहावं आपणच आपल्या नादात. ना आनंदाचं उधाण, ना अभावाची क्षिती. उगीच कशाला खंत करावी पायाखाली पडलेल्या पसाऱ्याची, माथ्यावर खुणावणारं विशाल आभाळ असतांना. अफाट आभाळ माथ्यावर दिसतं म्हणून पायाखालची माती दुर्लक्षित होऊ नये. हेही लक्षात असू द्यावं की, उंचीची सोयरिक पायथ्याशी अन् विस्ताराचं नातं मुळांशी असतं. मुळं मातीला बिलगून असली की, उन्मळायची भीती नसते.
नितळपण घेऊन वाहणारा परिमल प्रयोजनांच्या पसाऱ्यात हरवतो. प्रयोजनांची प्राथमिकता समजण्याएवढं जाणतेपण आपल्याकडे असावं. जगण्याचा गंध सापडला आहे, त्याला बहरलेल्या ताटव्याची कसली आलीये नवलाई. आयुष्यात विसावणाऱ्या प्रत्येक पळाला प्रमुदित करता आलं की, परिस्थितीच्या परिभाषा पाकळ्यांसारख्या उलगडत जातात. अमर्याद सुखांच्या कामनेपेक्षा परिमित समाधानासमोर सुखांची सगळीच प्रयोजने दुय्यम ठरतात. सुख अंगणी खेळतं राहावं म्हणून विचारांत समाधान अखंड नांदते असायला लागते. अथांगपण अंतरी अधिवास करून असले अन् संवेदना वसती करून असल्या की, पद, पैसा, प्रतिष्ठा वगैरे सारखी तात्कालिक सुखे केवळ टॅग म्हणून उरतात. त्यांना केवळ दिसणं असतं, पण पाहणं नसतं. दुःखात दडलेलं सौंदर्य पाहण्यासाठी नजरकडे नजाकत अन् वंचनेत सामावलेलं विकलपण समजून घेण्यासाठी विचारांत डूब असायला लागते. चमकत्या सुखांच्या तुकड्यांना लेबले लावून किंमत करता येते. विचारात नितळपण अन् कृतीत साधेपण घेऊन धावणाऱ्या आयुष्याचं मोल करणं अवघड असतं. आयुष्याच्या पटावर पसरलेल्या सगळ्याच सोंगट्या काही अनुकूल दान पदरी नाही टाकून जात. कधी कधी फासे उलटे पडतात. होत्याचं नव्हतं होतं क्षणात. नांदत्या चौकटी विसकटणारा हा एक क्षण समजून घेता येतो, त्याला कसली आलीये मोठेपणाची मिरासदारी. त्याचं मोठेपण त्या क्षणांना गोमटे करण्यात असतं.
एक सांगू का बाळा? माणूसपणाच्या मर्यादा माहीत असतात, त्यांना महात्म्याच्या व्याख्या नाही शिकवाव्या लागत. मर्यादांचं भान हीच त्यांची महती असते. आपण करत असलेल्या अथवा कराव्या लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी काही विचारांच्या वर्तुळात नाही शोधता येत. कधीतरी त्यांना भावनांच्या चौकटीतही तपासून पाहावं. तर्कनिष्ठ विचार जगण्याची अनिवार्यता असेल, तर भावना आयुष्याची आवश्यकता असते. प्रत्येकवेळी तर्काच्या तिरांनी पुढे सरकण्याऐवजी कधीतरी भावनांच्या प्रतलावरूनही वाहता यावं. मान्य आहे, तर्क ज्यांचं तीर्थ असतं, त्यांच्या आयुष्यात तीर्थे शोधण्याची आवश्यकता नसते. सत्प्रेरीत कृतीच तीर्थक्षेत्रे असतात. सद्विचारांची वात विचारांत तेवती असेल तर तेच मंदिर अन् तेच तीर्थक्षेत्र असतं. पाण्याला तीर्थरूप होता येतं, कारण त्यात कुणीतरी नितळ भक्तीचा भाव ओतलेला असतो. त्यातला भक्तिभाव वगळला तर उरतं केवळ ओंजळभर अस्तित्व, ज्याला केवळ पाणीच म्हटलं जातं. पाणी महत्त्वाचंच, पण त्याहून अधिक महत्त्वाचा असतो तो भाव. अंतरी आस्थेचे दीप तेवते असले की, आयुष्यातले अंधारे कोपरे उजळून निघतात. उजेडाची कामना करत माणसाचा प्रवास अनवरत सुरू असतो. वाटा परिचयाच्या असणं हा भाग तसा गौण. कदाचित दैवाने टाकलेल्या अनुकूल दानाचा भाग. कुण्या एखाद्या अभाग्याला जगण्याचा अर्थ विचारला तर आपल्या आयुष्याचे अन्वयार्थ शोधण्यासाठी वणवण नाही करायला लागत.
तुमच्याकडे सुखांचा राबता असणं माणूसपणाची परिभाषा नसते. अभावात प्रभाव निर्माण करता येतो, त्याचा मोलभाव नाही करता येत. अंतरीच्या भावाने त्यांकडे पाहता यायला हवं. तुमच्याकडे असणाऱ्या साधनसंपत्तीने तुम्ही काही काळ चमकालही. पण झगमग आयुष्यात कायम अधिवास करून असेलच असं नाही. काजव्यांचं चमकणं देखणं असूनही त्यांना अंधाराचा नाश नाही करता येत. पण अंधाराच्या पटलावर आपल्या अस्तित्वाची एक रेषा नक्कीच अधोरेखित करता येते. आसपास अगणित प्रकाशपुंज दिमाखात मिरवतात म्हणून काजव्याने प्रकाशापासून पलायन करावं का? अंधाराच्या ललाटी प्रकाशाची प्राक्तनरेखा कोरण्याच्या कामापासून विलग करून घ्यावं का? नाही, अजिबात नाही. त्याला त्याच्या मर्यादा आकळल्या तरी पुरे. पणतीला उजेडाच्या परिभाषा अवगत असतात अन् आपल्या मर्यादाही माहीत असतात, म्हणून तर ती सभोवार पसरलेल्या काजळीतला ओंजळभर अंधार पिऊन मूठभर कोपरा उजळत राहतेच ना! स्वैर विहार करणाऱ्या झगमगाटमध्ये कुणाची तरी तगमग दुर्लक्षित होणं विपर्यास असतो.
अक्षरांकित केलेल्या या पसाऱ्यातील एक अक्षरही तुला आज आकळणार नाही. काहीच कळत नसलं तरी देह दिसामासांनी वाढत असतो. तुही निसर्गाने निर्धारित केलेल्या चाकोऱ्यात वाढत राहशील. वाढता वाढता आसपास समजून घेण्याएवढा होशील. समजण्याच्या वयात ही अक्षरे तुझे सवंगडी होतील, तेव्हा त्यांचे अर्थ अन् अन्वयार्थ तुला आकळतील. शक्यता आहे, मी तुला हे सगळं समजावून सांगण्यासाठी असेन अथवा नसेन, पण माझ्याकडून कोरलेली ही अक्षरे कोणतंही व्यवधान नाही आलं तर अबाधित असतील. तुझ्या हाती ही अक्षरे लागतील. तू वाचशील. कदाचित मला आणि अक्षरांनाही. शक्यता आहे आम्हाला सोबतीने समजून घेशील.
एव्हाना एखाद्याच्या मनात विचार आलाही असेल की, हा प्रकार म्हणजे वावदूकपणाचा आहे. असेल अथवा नसेलही. काही गोष्टी कुणाला बऱ्या वाटतात म्हणून आपणही तशाच कराव्या का? कुणाच्या कांक्षा आपल्या समजून अंगीकार करावा असं कुठे असतं? जगाला जगण्यात जागा असावी; पण त्याचा कोलाहल होऊ नये इतकीच ती असावी. जगावं स्वतःला लागतं. जग एक तर मार्गदर्शन करतं किंवा तुमच्या मर्यादा मांडतं. कधी कुणी कुणाच्या कर्तृत्त्वाला कोरतं. कोरणारा हात कलाकाराचा असेल तर सुंदर शिल्प साकारतं अन्यथा केवळ टवके निघतात. तसंही ढलपे काढणारेच अधिक असतात आपल्या आसपास. जग तुमच्या जगण्याचं साधन असावं. साध्य आपणच निवडायचं. ते निवडण्याची कला जगातील भल्याबुऱ्या वृत्तीप्रवृत्तीकडून शिकून घ्यावी. समोर दिसणारी धवल बाजू पाहून जगाचे व्यवहार गोमटे आहेत, असं म्हणणं अज्ञानच. पलीकडील परगण्यात अपरिचित असं काही असू शकतं. अंधारात हरवलेला अज्ञात आवाज ऐकता यायला हवा. प्रत्येक परंतुत एक प्रश्नांकित किनार दडलेली असते. तिच्या छटा समजल्या की, आयुष्याचे अर्थ गवसत जातात.
तुमच्या जगाने चांगलं-वाईट काय दिलं-घेतलं माहीत नाही, पण अक्षरांना चिरंजीव करण्याची सोय करून ठेवली आहे. या अर्थाने तुमच्या पिढीचं जग उत्तमच म्हणायला हवं, तुमचं जगणं कसंही असलं तरी, नाही का? आयुष्याच्या पटावर परिस्थितीने पेरलेल्या वाटांनी तुला चालायला लागेल. त्या कशा असतील हे सांगणं इतकं सहज नाही. सुगम असण्यापेक्षा अवघडच अधिक वाट्यास येतील. चालत्या पावलांना सोबत करणाऱ्या पथावर पहुडलेल्या काही वाटा खुणावतील. काही खुलवतील. काही भुलवतील, तर काही झुलवतीलही. त्या प्रत्येकांचे अर्थ शोधण्याएवढं प्रगल्भपण तुला प्राप्त करता यावं. साद देणारी सगळीच वळणे विसावा होत नसतात अन् सोबत करणाऱ्या सगळ्याच वाटा देखण्या नसतात. पायासमोर पसरलेल्या प्रत्येक चाकोऱ्या मुक्कामाच्या ठिकाणांपर्यंत नेणाऱ्या नसतात, हेही तेवढंच खरं.
वाटा दिसतात देखण्या, पण सहजसाध्य कधी नसतातच. निदान सामान्यांच्या आयुष्यात तरी नाही. असंख्य अडनिड वळणे असतील त्यावर. संयमाची परीक्षा घेणारे सुळके समोर दिसतील. आपण शून्य असल्याची जाणीव करून देणाऱ्या दऱ्या असतील. परिस्थितीने पेरलेले अगणित काटे असतील. म्हणून पावलांना एका जागी थांबवून नाही ठेवता येत. निवडलेला पथ अन् वेचलेल्या वाटा वाचता आल्या की, विचारांचं विश्व समृद्ध होतं. चालत्या पावलांना सोबत करणाऱ्या वाटा कशा असाव्यात, हे कदाचित सीमित अर्थाने ठरवता येईलही. निवडीचे काही विकल्प हाती असले, तरी ते सम्यक असतीलच असंही नाही. म्हणून आपल्याला चालणं टाकून नाही देता येत. लक्ष ठरलेले असतील अथवा नसतील, चालायचं तर सगळ्यांनाच असतं; फक्त नजरेत क्षितिजे अन् विचारात आभाळ उतरून यायला हवं, नाही का?
बाळा, खूप मोठा नाही झाला तरी चालेल, पण चांगला माणूस अवश्य हो! वाढदिवसाप्रीत्यर्थ खूप खूप शुभेच्छा!
तुझा,
नानू
0 comments:
Post a Comment