नाही शोधता येत सगळीच उत्तरे

By
तो आणि ती उमलत्या वयाच्या झुल्यावर स्वार होऊन आभाळाला हात लावू पाहतात. वाऱ्यासोबत वाहतात. झऱ्यासोबत गाणी गातात. पावसात भिजतात. फुलांसोबत खेळतात. पाखरांसोबत उडतात. फुलपाखरांच्या पंखात रंग भरतात. कोमल किरणांच्या वर्षावात नाहतात. चांदण्यांसोबत बोलत बसतात. तीरावरील वाळूत मनोरथांचे मनोरे रचित, स्वप्नांच्या सप्तरंगी इंद्रधनुष्यावर झोके घेत राहतात. त्यांचा उगवणारा दिवस आनंदाची पखरण करतो. काळोखाची चादर देहावर ओढून घेणाऱ्या रात्री सुखाच्या ओंजळी रित्या करतात. अंतरी दाटून आलेल्या अनामिक काळजीने कधी कातरवेळा काळीज कोरत राहतात. साद देत राहतात प्रत्येक पळ. असं काही घडण्यासाठी एक वेडेपण जगण्यात विसावलेलं असायला लागतं.

हो, खरंय! हे सगळं वेडं असल्याशिवाय कळत नाही अन् घडतही नाही. असं वेडं सगळ्यांना होता येतंच असं नसतं अन् वेडेपणातलं शहाणपण अवघ्याना आकळतं असंही नाही. या विश्वात विहार करणाऱ्यांची जातकुळीच वेगळी असते. ना तेथे मर्यादांचे बांध बांधता येतात, ना विस्ताराला सीमांकित करणारी कुंपणे घालता येतात. ना वेग अवरुद्ध करणारे गतिरोधक टाकता येतात. म्हणून ते वेडेच...! तो तिच्यासाठी, ती त्याच्यासाठी आणि दोघे एकमेकांसाठी. जगाच्या गणितात कुठलीही उत्तरे नसणारे, पण अंतरी आपलं ओंजळभर देखणं जग उभं करू पाहणारे.

त्याने तिला, तिने त्याला नजरेच्या वाटेने अंतरी उतरवत मनाच्या गाभाऱ्यात कधी कोंडून ठेवलं... काहीच आठवत नाही... प्रारंभ नेमका कुठून आणि कुणाकडून झाला, हे सांगणही बऱ्याचदा अवघड. असा कोणता क्षण असेल तो, ज्याने ही दोन टोकं सांधली गेली असतील? असं कुठलं बंधन असेल ज्याने हे बांधले गेले असतील? जगात वावरणारे असंख्य चेहरे आसपास असताना हेच नेमके एकमेकांना का दिसावेत? बघून आपण एकमेकांसाठीच आहोत असंच का वाटावं? असा कुठला क्षण होता, या हृदयाचे त्या हृदयी पोहचवणारा? अशी कोणती स्पंदने होती, एकच सूर छेडणारी? असे कोणते बोल होते, एकच गीत गाणारे? नाही करता येत काही प्रश्नांसोबत असणाऱ्या किंतुपरंतुंची मीमांसा. नाही शोधता येत त्यांची उत्तरे लाख धांडोळा घेऊनही. नाही सांगता येत सगळ्या गोष्टींमागची कारणे. नाही करता येत विशद सगळ्याच भावनांच्या व्याख्या, हेच खरंय.

प्रेमात पडायला वयाच्या चौकटी निर्देशित करणारा भाग वगैरे कारण असतो का? कदाचित नसावा. तसं असतं तर वयाच्या वर्तुळांचा विसर प्रेम परगण्यात विहार करणाऱ्या जिवांना कसा पडला असता? खरं हेच आहे की, प्रेमाला बहुदा बंधने मान्य नसतात कुठलीच. मग ती कशीही असोत. उमलतं वयचं वादळविजांचं. नवथर संवेदनांचे पंख लेऊन आभाळ आंदण दिल्याच्या थाटात विस्तीर्ण निळाईत विहार करीत राहायचं. झोपाळ्यावाचून झुलायचं. 

दोघेही स्वप्नांच्या झोक्यावर बसून आकाशाशी सलगी करू पाहतात. आभाळ त्यांना खुणावतं. वारा धीर देत राहतो. आयुष्याचे कंगोरे समजून घेता घेता मनं कधी बांधली जातात, कळतच नाही. कळावंच कसं, कळण्याआधी वळावं लागतं. वळणाचा प्रवास वेग कमी करतो. वेगाशी सलगी करणाऱ्यांना संथ वाहणे कसे रुचेल? मनात विसावलेल्या वाटेची वळणं निवडून धावतात तिकडे. रमतात जगाच्या गतिप्रगतीच्या परिभाषांपासून कोसो दूर. भावनांच्या रिमझिम वर्षावात चिंब भिजत राहतात. किनाऱ्याच्या वाळूवर कोरलेल्या आपल्याच पदचिन्हांच्या नक्षीत भविष्याचा कोलाज शोधत राहतात.

तो आणि ती... एक पूर्ण वर्तुळ. की फक्त एक मात्रा आणि एक वेलांटीची सोबत करीत लेखांकित करता येणारी वर्णमालेतील अक्षरे. काहीही म्हणा, त्याने असा कोणता फरक पडणार आहे. पण कधी कधी काही अक्षरांना अक्षय आशय प्राप्त होतो. कुण्या अज्ञाताने कधीकाळी शिलाप्रस्तरावर कोरलेली अक्षरे अनपेक्षित हाती लागतात. काळाच्या उदरात सामावून पडद्याआड गेलेले संदर्भ नव्याने उलगडत जातात. विस्मृतीच्या निबीड अंधारातून कवडशाचा हात धरून विसकटलेले प्रसंग, विखुरलेले संदर्भ चालत येतात, कुठलीतरी कहाणी सोबत घेऊन. विस्मृतीच्या कोशात विरलेले अध्याय नव्याने वाचले जातात आणि आशयाच्या अथांग डोहात विहार करीत राहतात. जगण्याच्या वाटेवर आतापर्यंत अशा किती कहाण्या हरवल्या असतील आणि गवसल्याही असतील, माहीत नाही. 

जगण्यात गोमटेपण कोरणारा हा खेळ किती काळापासून काळ खेळतो आहे, ते त्यालाही अवगत नसेल कदाचित. इतिहासाच्या कुशीत विसावलेल्या त्याच्या तुकड्यांनाच ते विचारता येईल. पण त्याला तरी ते सांगता येईल का? माहीत नाही. वाटेवर चालून थकलेले, हताश झालेले, जिंकलेले आणि हरलेले... असे कितीतरी तो आणि ती काळाच्या अफाट विवरात सामावले. काही कायमचे हरवले. काही हरवून गवसले. गवसले त्यांना काळानेच चिरंजीव केले. पण वास्तव हेही आहे की, सगळ्यांच्या ललाटी पुन्हा प्रकाशण्याचे प्राक्तन नियतीने पेरलेलं नसतं, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment