पापण्याआडचं पाणी

By
पापण्याआडचं पाणी टाळता न येणारं वास्तव, बाकी बऱ्याच गोष्टी आयुष्याचे किनारे धरून येतात अन् जातात. त्या प्रासंगिक असू शकतात अथवा आगंतुक बनून आलेल्या. त्यांचं सार्वकालिक असणंही नाकारता येत नसतं. काही बाबतीत कदाचित तात्कालिक घटितांचा तो परिपाक असू शकतो. त्याचं येणं-जाणं हा काही कोणाच्या निवडीचा भाग नसतो. की कोणी आवतन देऊन आणलेला आनंद. परिस्थितीला आहे तसं स्वीकारता आलं अन् पदरी पडलं ते पवित्र करता आलं की, आयुष्याचे एकेक कंगोरे कळू लागतात. आयुष्य कळण्याआधी जगणं समजून घ्यावं लागतं. जगण्याचे संदर्भ सापडतात, त्यांना आयुष्याचे अर्थ आकळतात. ते काही अपोआप नाही गवसत. आयुष्याला असणारी लांबी फार महत्त्वाची नाही. त्याला खोली किती आहे, हे महत्त्वाचं. जगण्याला दिशा असली की, आयुष्याला आशयघन अर्थ लाभतात. अर्थासहित असलेलं आयुष्य एक आनंदयात्रा असतं. 

अर्थात, सगळ्यांना सगळंच कळतं असं नाही. कळतं त्यांना कोणत्या वाटेने वळतं व्हावं, हे सांगावं नाही लागत. वळणांचे हात धरून सोबत करणाऱ्या वाटांचे मनोगते नाही कळत त्यांना वळणांसोबत चालत येणारे विकल्पही समजून नाही घेता येत. नाही पाहता येत अशा प्रवासाचे संदर्भ पडताळून. सगळ्याच गोष्टींना काही प्रासंगिकतेची परिमाणे वापरून मोजता येत नाही. त्याला आणखीही काही मिती असतात. 

सुख, दुःख, हर्ष, वेदनांचा प्रवाह जीवनातून अनवरत वाहत असतो. पापण्यांनी पेलून धरलेलं भावनांचं आभाळ मात्र समजून घ्यायला लागतं. पापण्यांच्या परिघात सामावलेलं ओथंबलेपण डोळ्यातून उतरून मनात वसतीला आलं की, आपणच आपल्याला नव्याने उलगडत जातो. हे उलगडणं कळीचं फूल व्हावं इतकं सहज अन् उगवतीची वाट धरून सूर्याने चालत येण्याइतकं स्वाभाविक असलं की, आसपासच्या आसमंतात एक गंधाळलेपण भरून राहतं. पण खरं हेही आहे की, स्वाभाविक होणंच अधिक अवघड असतं.

आपलेपण समजून घेता आलं की, आपणच आपल्याला नव्याने उलगडत जातो. समजून घेताना कळत असतील अथवा नकळत काही प्रमाद घडतात म्हणून अपलेपणाची प्रयोजने नाही बदलत. आयुष्याचे किनारे धरून पुढे सरकणाऱ्या काही वाटा घडलेल्या प्रमादांमुळे कदाचित धूसर दिसतील म्हणून प्रवासाला पूर्णविराम द्यायचा असं नसतं. काही वाटा अवगुंठीत होतील, काही अवघड होतीलही. म्हणून काही चालणं नाही थांबत. 

ज्ञात-अज्ञात चाकोऱ्या समजून घेता आल्या अन् त्यांच्याशी संवाद करता आला की, परिसराशी सख्य साधणे सुगम होते. अंतरी आस्थेचा ओलावा असला की, आसपासचा आसमंत चैतन्य घेऊन उमलत राहतो. उमलण्याची पुढची स्वाभाविक पायरी बहरणे असली, तरी बहरलेले परगणे सांभाळून समृद्ध करायला लागतात. पुढे पडणाऱ्या प्रत्येक पावलाला परिपूर्णतेचा परिसस्पर्श घडणे कितीही देखणे वगैरे वाटत असले, तरी ते काही सहजसाध्य नसतं. त्या करिता मोठं होणं म्हणजे काय असतं, हे समजून घ्यायला लागतं. मोठेपणाच्या व्याख्या काही कोणाच्या संमतीचा परिपाक नसतो. तो असण्याचा अन् अनुभवण्याचा प्रवास असतो. 

माहात्म्याची महती सांगून काही कोणाला मोठं होता येत नसतं किंवा एखाद्यावर महात्म्याच्या गोण्या लादून मार्गस्थ केलं म्हणून कोणी मोठं झाल्याचं उदाहरण नाही. मोठेपणाच्या परिभाषा प्रत्येकवेळी वेगळ्या असतात आणि प्रत्येकासाठी वेगळ्या असतात. माणसे त्या ठरवतात. त्यांच्या मर्यादाही तेच आखून घेतात आणि निकषांच्या पट्ट्या हाती घेऊन मोजतातही तेच. त्यांचे आयते साचे तयार असतात. तुम्हाला तुमचा आकार त्या साच्यात सामावण्याएवढा करता आला की, तुमच्या प्रवासाला महानतेची लेबले चिटकवताना सोपं होतं. 

आयुष्याच्या वाटेवर चालताना सोबत करणाऱ्या सगळ्याच आकृत्यांना अर्थ असतात असं नाही. कुठलीतरी व्याख्या बनून त्या समोर ठाकतात, पण प्रत्येकवेळी वेगळे आकार धारण करून. त्या आकारांचे अर्थ सम्यकपणे लावता यायला हवे. सगळ्याच आकारांची रेखीव शिल्पे होत नसतात. कधी मनाजोगत्या आकृत्या साकारतात, तर कधी त्यांचे कोपरे दुभंगतात. दुभंग अन् अभंग असण्यातला प्रवास समजून घेता यायला हवा. ज्यांना या सगळ्या प्रवासात अभंग राहता येतं, त्यांचा संग सगळ्यांनाच निःसंग वृत्तीने घडतो का? 

अवघड असतो असा प्रवास. आसपास कायमच धग असते. त्याची दाहकता अनुभवायला लागते सतत. वैशाखाचे अर्थ वाचनातून नाही कळत. वणवा होऊन वाहताना कळतात. मोठेपण मागून नाही मिळत. मिरवून घेण्याची मनीषा असणाऱ्यांना तर नाहीच मोठं होता येत. आयुष्याच्या वाटेवरुन पुढे पळताना आपणास काय करायचं आहे, एवढं कळलं तरी मोठेपणाच्या पाऊलखुणांचा माग काढत वणवण करायची आवश्यकता नाही उरत. मोठेपणाचा परीघ अशी माणसे स्वतः आखतात आणि आवश्यकतेनुरूप विस्तारत नेतात आणि तो कुठे थांबतो हेही जाणतात, नाही का?
-चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment