ओंजळभर उजेडाच्या संगतीने

By
शेकडो वर्षे झाली. माणूस काहीना काही तरी शोधतो आहे. भटकतो आहे अस्ताव्यस्त. त्याच्या आयुष्याला वेढून असणारी अस्वस्थ वणवण कधी थांबली नाही आणि पुढे कधी थांबणारही नाही. फक्त त्या भटकंतीसोबत असणारे अर्थ तेवढे बदलतील. भटकणं जिवांचं प्राक्तनच आहे. त्याच्या वणवणला अनेक संदर्भ असतात. प्रसंगपरत्वे कारणे बदलली म्हणून पुढे पडत्या पावलांच्या प्रवासाचे अर्थ नाही बदलत. प्रवासामागे उभ्या असणाऱ्या संदर्भांची प्रयोजने बदलली तरी हेतू आबाधित असू शकतात. भटकंती केवळ भाकरीच्या कोरभर तुकड्यासाठीच असते असं नाही. या व्यतिरिक्त अनेक ज्ञात अज्ञात कंगोरे असतात त्याच्या ललाटी गोंद्लेल्या प्रवासाला. प्रगतीच्या परिभाषा प्रवासात सामावलेल्या असतात, हे नाकारण्याचे कारण नाही. 

प्रस्थान वाटांवरील प्रवासाला प्रयोजने असतात, पण पुढे पडत्या पावलांना स्वप्ने. स्वप्ने पाहता यायला हवीत अन् पूर्ण करताही यावीत. स्वप्ने करंट्यांनी कमावलेली संपत्ती नसते, तर उदारमनस्क वृत्तीने अनेकांच्या भल्यासाठी उधळून देणाऱ्या वीरांची दौलत असते. चालत्या वाटांशी सख्य साधता आलं अन् पावलांवर विश्वास असला की, लागतं काही मनात असलेलं हाती. सापडतं काही थोडं आपलं असं. खरंतर सापडण्यापेक्षा निसटतंही बरंच काही. म्हणून जगण्यातून प्रयासांनी पूर्णविराम घेतला आहे असा अर्थ होत नाही. प्रयासांच्या परिभाषा बदलल्या म्हणून प्रवासाचे पर्याय संपतात असं नाही. 

प्रत्येकाचा प्रवास वेगळा असला. प्रवासाच्या दिशा निराळ्या असल्या अन् मुक्कामाची ठिकाणे वेगवेगळी असली म्हणून प्रयोजने पालटत नसतात. कुणी शोधतो नव्या वाटा. कुणी मळलेल्या वाटांना प्राक्तन मानतो. कुणी प्रशस्त पथांची प्रतीक्षा करतो. कोणी पावलापुरती वाट शोधत चालत राहतो. कोणी काय काय करावं हा वैयक्तिक विकल्प असला, तरी विस्ताराच्या व्याख्या समजून घेण्यासाठी तेवढा पैस असायला लागतो. पावलापुरती वाट असण्याचे अन् पावलांसाठी वाट निर्माण करण्याचे अर्थ वेगळे आहेत. लाभलेल्या एवढ्याशा आयुष्यात माणूस एवढी सगळी सव्यापसव्य का करत आला आहे? कारण या प्रश्नाचं उत्तर त्याच्या जगणं या संकल्पनेभोवती एकवटलं आहे. जगण्याशी सुख सांधलं गेलं आहे अन् मनाशी समाधान बांधलं गेलंय.

कोणाला समाधान कोठून गवसेल याची काही सुनियोजित सूत्रे नसतात. तशी सुनिश्चित परिमाणेही नसतात. सगळ्यांना सगळी कौशल्ये अवगत नसतात. प्रत्येकजण आपल्यापरीने आपला धांडोळा घेत असतो. अभिव्यक्तीची माध्यमे बदलतात फक्त, अर्थ नाही. कोणी शब्दांची अस्त्रे-शस्त्रे करतो, कोणी शास्त्राला प्रमाण मानून निरीक्षणे नोंदवतो. कोणी लेखणीला खड्ग करू पाहतो. कोणी वेदनांच्या कातळावर शिल्पे कोरु पाहतो. कुणी काळाच्या पटलावर चित्रे रेखाटतो. कोणी काही, कोणी आणखी काही करतायेत. 

कितीतरी लोक लिहतायेत, बरेच जण बोलतायत. कुणी करपलेलं जगणं देखणं करू पाहतायेत. कुणी काळाच्या कुशीतून आस्थेचे कवडसे शोधू पाहतायेत. कुणी कुरूपपणाला रूप देऊ पाहतायेत. कुणी आसपास सुंदर करू पाहतायेत. कुणी ज्ञानाच्या पणत्या हाती घेऊन अंधारे कोपरे उजळायला निघालेयेत. कुणी व्यवस्थेला अधिक व्यवस्थित करू पाहतायेत. जगाचा चेहरा देखणा करण्यासाठी आसपासचा अंधार कोरून कोरभर कवडसे शोधतायेत.

माणसे काहीना काही तरी करतायेत, म्हणून जग बदललं का? या प्रश्नाचं उत्तर हाती लागणं बऱ्यापैकी अवघड आहे. बदललं असतं तर एवढी वैगुण्ये आसपास नांदती दिसली असती का? तसंही जग कधी सुघड असतं? ते सहज, सुगम असतं तर आयुष्यात एवढे गुंते वाढले असते का? आयुष्यात अनेक किंतु-परंतु असतात, म्हणून अंतरी अधिवास करणारी आस्थेची पणती टाकून अंधाराच्या कुशीत विरघळून जावं का? तिच्या ओंजळभर उजेडाला निरोप द्यायचा का? नाही. असं अधांतरी नाही सोडून देता येत आयुष्याला. भलेही तिला जगाच्या अंधाऱ्या कोपऱ्यांच्या कपाळी कोरलेल्या अभावाच्या रेषा नाही मिटवून टाकता येत; पण पावलापुरता प्रकाश पेरता येतोच ना! 

खरंतर जग बदलावं म्हणून कोणी लिहू, बोलू नये आणि ते बदलतं, या विचारधारेला प्रमाण मानण्याचा प्रमादही करू नये. जगाच्या जगण्याची आपली अंगभूत रीत असते. रीतिरिवाज नंतर केलेली सोय असते. सोयीचा सोयीस्कर अर्थ शोधता येतो. एकाच्या सोयीचं जग दुसऱ्याच्या जगण्याला गैरसोयीचं असणारच नाही असं नाही. जेवढी डोकी तेवढे विचार इहतली नांदते असतात. विश्वाच्या विचारांना विचक्षण विषयांकडे वळते करण्याचा कोणी प्रयास करीत असेल, तर तो त्यांच्या निवडीचा भाग. सगळ्यांना सगळ्या गोष्टी अवगत असतील असे नाही. आपल्याला काय सयुक्तिक वाटतंय, हे महत्त्वाचं. आपल्या मनी असलेल्या ओंजळभर प्रकाशाच्या सोबतीने मांगल्याच्या शोधात चालत राहणे म्हणूनच अधिक श्रेयस्कर असतं, कारण परिस्थिती परिवर्तनाच्या पावलांनी प्रवास करत असते, नाही का?
-चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment